‘करोना’च्या जागतिक साथीमुळे वैयक्तिक स्वच्छतेबाबत बरीच चर्चा सर्वत्र होत आहे. रोगप्रसार कमी होण्याचे दृष्टीने त्याचे महत्व नक्कीच आहे. क्षणभर आपण ही साथ बाजूला ठेवू. कुठलाही संसर्गजन्य रोगप्रसार टाळण्याचे दृष्टीने वैयक्तिक स्वच्छता ही कायम खूप महत्वाची आहे. त्यातील एकाच महत्वाच्या पैलूकडे या लेखाद्वारे लक्ष वेधत आहे आणि तो म्हणजे आपल्या हातांची स्वच्छता.
आपले हात शास्त्रीयदृष्ट्या स्वच्छ कसे करावेत यावर काही मूलभूत माहिती देत आहे. वरवर पाहता हा विषय सामान्यज्ञान किंवा शालेय पातळीवरचा वाटेल. पण वास्तव तसे नाही. काही अपवाद वगळता बहुसंख्य लोक ही क्रिया उरकून टाकल्यासारखी करतात. हात धुण्याची महत्वाची कृती ही कायम व्यवस्थित व्हावी या उद्देशाने काही सूचना करतो. आपणही आपापले अनुभव लिहा. ही चर्चा सर्वांसाठी आरोग्यदायी व्हावी ही इच्छा.
..........
१. हात धुण्यासाठीचे पाणी स्वच्छ आणि वाहते असावे. ते गार किंवा गरम याने फरक पडत नाही. फक्त हात जर तेलकट असतील तर गरम असल्याचा फायदा होतो.
२. धुण्याची क्रिया किमान २० सेकंद झाली पाहिजे. जरा आजूबाजूस निरीक्षण केल्यास असे दिसेल, की बरेच लोक हे काम ३-४ सेकंदात उरकतात, अगदी पाटी टाकल्यासारखे.
३. हात धुताना ते खरखरून घासले पाहिजेत.
४. बहुतेक लोक फक्त हाताचा तळवा वरवर धुतात. हात नीट धुताना तळहाताची खालची बाजू आणि हातांची मागची बाजू ही देखील नीट धुतली पाहिजे.
५. साबणाचा वापर : हा या प्रक्रियेतील कळीचा मुद्दा आहे. आता साबणाच्या वापराने काय फायदे होतात ते पाहू.
इथे एक मुद्दा स्पष्ट करतो. साबणाचा एक गुणधर्म म्हणजे तो surfactant असतो. आपण हातांनी विविध कामे करताना त्यांच्यावर कमी अधिक प्रमाणात मेदाचा थर जमा होतो. नुसत्या पाण्याने हात धुताना हा थर सहज निघून जात नाही. याचे कारण म्हणजे पाणी आणि मेद ही दोन एकमेकात न मिसळणारी माध्यमे आहेत. त्या दोघांच्या संपर्कात साबण सोडला की मग मात्र ‘इमल्शन’ तयार होते आणि परिणामी त्वचेवरील मेदाचा थर पाण्याबरोबर छान निघून जातो. आता हाताला लागून आलेले जीवजंतू आणि साबण यांचा संबंध पाहू. करोना आणि अन्य काही जंतू यांच्या पेशीभोवती मेदाचे आवरण असते. जेव्हा आपण साबणाने हात धुतो त्यावेळेस हे आवरण तोडले जाते. साबणाचा वापर करीत हात खसाखसा चोळले की हातावरचे काही जंतू फुटून जातात. त्वचेला साबण लावल्याने ती निसरडी होते आणि त्यामुळे तिथले जंतू पाण्याबरोबर वाहून जातात. साबणवापराचे असे हे फायदे आहेत.
६. आता कुठल्या प्रकारचा साबण वापरावा, हा पुढचा मुद्दा. साबणाचे साधारणपणे उपलब्ध असलेले दोन प्रकार म्हणजे वडी आणि द्रवसाबण. हे दोन्ही प्रकार वापरून काही संशोधन अभ्यास झालेले आहेत. त्याबद्दल आता पाहू.
आपल्याकडे वडीचा वापर खूप होतो. अनेक जण लागोपाठ एकच वडी वापरतात तेव्हा ती सतत ओली राहते. त्यामुळे तिच्यावर धुणाऱ्याच्या हातातून आलेले जंतू राहू शकतात. मात्र हे जंतू पुढील हात धुणाऱ्याला ‘हस्तांतरित’ होत नाहीत असे आढळले आहे. त्यामुळे वडीबद्दल अकारण गैरसमज नको. फक्त एक काळजी सर्वांनी घ्यावी. एखाद्याने हात धुतल्यावर ती वडी पुरेशी कोरडी व्हावी. मग दुसऱ्याने तिचा वापर करावा. आपण वडीला हात लावण्यापूर्वी जर ती बुळबुळीत दिसली तर ती आधी पाण्याखाली धुवावी आणि मगच वापरावी.
द्रवसाबणाच्या वापराने अर्थातच वडीच्या तोट्यापासून सुटका होते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी त्याचा वापर प्राधान्याने व्हावा.
७. हात धुवायला साबण की सॅनिटायझर , हा सध्याचा बहुचर्चित मुद्दा आहे. सॅनिटायझरमध्ये दोन प्रकार असतात – अल्कोहोलयुक्त आणि विरहित. अल्कोहोलयुक्त प्रकाराला जंतुनाशक गुणधर्म आहे. त्यासाठी त्यातील अल्कोहोलचे प्रमाण कमीत कमी ६२% असणे गरजेचे आहे.
सर्वसाधारण जनतेसाठी साबणाने नीट हात धुणे हे पुरेसे आणि योग्य आहे. संसर्गजन्य रुग्णाशी जे लोक थेट संबंधित आहेत त्यांच्यासाठी सॅनिटायझरची शिफारस केली आहे. तसेच ज्या परिस्थितीत वाहते पाणी, साबण आणि हात धुण्याची जागा उपलब्ध नसतात, त्या वेळीही ते वापरावे.
८. हात धुऊन झाल्यावर ते कशाने पुसावेत? हाही एक महत्वाचा मुद्दा.
धुतलेले हात कोरडे करण्यासाठी दोन पर्याय आहेत – कापड व कागदी रुमाल. घरगुती वापरासाठी कापड योग्य वाटते. असे हात पुसायचे कापड रोज स्वच्छ धुवून उन्हात वाळवलेले असावे. ही काळजी बऱ्याच घरांत घेतली जात नाही.
कागदी रुमालाने हात कोरडे करण्यात अजून एक फायदा आहे. कागद त्वचेवर अगदी घासून फिरवता येतो आणि त्यामुळे पूर्ण कोरडा होतो. घासण्याच्या क्रियेने हातावरील उरलेसुरले जंतू निघून जातात. हे पाहता सार्वजनिक ठिकाणी कागदी रुमालाचा वापर योग्य वाटतो.
सारांश: हात कशानेही पुसले तरी ते अगदी कोरडे करणे महत्वाचे.
९. कोणत्या परिस्थितीत हात नीट धुणे अत्यावश्यक आहे? शौचालयातून बाहेर आल्यावर, स्वयंपाक करण्यापूर्वी आणि जेवणापूर्वी हात धुणे या मूलभूत गोष्टी आपण जाणतो आणि पाळतो. या व्यतिरिक्त काही मुद्द्यांचा उल्लेख आवश्यक वाटतो.
a. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णास भेटण्याआधी आणि नंतर.
b. बाळांचे लंगोट बदलल्यानंतर
c. आपल्या तोंडापुढे हात धरून शिंकल्या वा खोकल्यानंतर
d. पाळीव प्राण्यांना स्पर्श केल्यानंतर
e. कचरा हाताळल्यानंतर.
जेवणापूर्वी हात धुण्याची सवय बहुतेक घरांत बहुतांश वेळा पाळली जाते. परंतु सार्वजनिक ठिकाणी मात्र बरेच लोक याचा आळस करताना दिसतात. जरा मंगल कार्यालये, उपाहारगृहे आणि प्रवासातील निरीक्षण करून पाहा. हे चित्र बिलकूल समाधानकारक नाही. बफेसाठी रांग लावण्यापूर्वी हात धुवून येणारे लोक अत्यल्प आहेत. काहींना या कृतीचा जाम आळस आहे तर काहींना त्यात कमीपणाही वाटतो ! “इथे काय चमच्यानेच तर खायचे आहे”, असा युक्तिवाद करणारेही आढळतात. पण जेवताना रोटी तोडणे आणि लिंबू पिळणे ही कामे तरी आपण हातानेच करतो, याचा त्यांना विसर पडतो.
प्रवासातील खाण्यादरम्यान तर हातांची स्वच्छंता हा विषयच अनेकांनी धाब्यावर बसवलेला दिसतो. यामध्ये जाणीवपूर्वक सुधारणा व्हायला हवी.
१०. सध्याच्या युगात आपण दिवसभर अनेकवेळा मोबाईल आणि कम्प्युटर हाताळतो. त्यामुळे मोबाईलचा पडदा आणि कम्प्युटरचा कीबोर्ड यांच्यावरही अगणित जंतू जमा होतात. या उपकरणांची योग्य ती स्वच्छता नियमित करावी. त्यात हलगर्जीपणा करू नये.
“हातांची नियमित स्वच्छता राखल्यास संसर्गजन्य रोग पसरणारच नाहीत का?” असा युक्तिवाद कधीकधी केला जातो. कुठल्याही रोगाचा १००% प्रतिबंध शक्य नाही हे बरोबर. परंतु काही मूलभूत स्वच्छता पाळल्यास रोगप्रसार रोखला जातो हे निःसंशय. म्हणूनच सामाजिक आरोग्याचे दृष्टीकोणातून हातांची स्वच्छता हा विषय अत्यंत महत्वाचा आहे.
…….
समाजात काही भीषण रोगांची साथ आल्यानंतर वैयक्तिक स्वच्छतेचे मुद्दे खूप चर्चिले जातात. कालांतराने आपल्याला या सगळ्याचा विसर पडतो. व्यवस्थित हात धुण्याची सवय ही खरे तर कायमस्वरूपीच हवी. ही साधी गोष्ट वारंवार सांगायची आणि चर्चेला घ्यायची वेळ यायला नको. दरवर्षी १५ ऑक्टोबर हा ‘जागतिक हातस्वच्छता दिवस’ म्हणून पाळला जातो. वास्तविक असा ‘दिन’ ठेवण्याची वेळ यावी हे खेदजनक आहे. सध्याच्या जागतिक साथीच्या निमित्ताने जगातील सर्वच नागरिक ही आरोग्यविषयक मूलभूत गोष्ट कायम आचरणात आणतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.
*********************************************
नागरिकांनी समंजसपणे वागून
नागरिकांनी समंजसपणे वागून गर्दी टाळावी
आपल्याकडे पोलिसांच्या दंडुक्याला पण भीक घालत नाहीत उलट पोलिसांवर दगडफेक आणि मारहाण होते आणि वर त्याचे राजकारण करू नका म्हणून सल्ले दिले जातात.
कोविद च्या निमित्ताने अनेक
कोविद च्या निमित्ताने अनेक मानवी मनांचाही अभ्यास होत आहे. त्यातून जाणवलेले काही मुद्दे अभ्यासकांनी नोंदवले आहेत. सध्याच्या काळात प्रामुख्याने खालील लक्षणे आढळून आली:
१. दीर्घकालीन भीती
२.अनिश्चितता आणि अस्थिरता
३. विलगीकरण अथवा वाळीत टाकण्याची भीती
४. राग आणि चिडचिड
५. शासकीय यंत्रणांकडून दिली जाणारी माहिती आणि आकडेवारी यावरील विश्वास डळमळीत होणे.
कोविड१९ : पुढील २ वर्षांचा
कोविड१९ : पुढील २ वर्षांचा अंदाज:
संसर्गजन्य रोगांच्या तद्न्य समितीच्या मते ३ प्रकारच्या परिस्थिती उद्भवू शकतात :
१. दोन वर्षांत या आजाराच्या लघुलाटा येऊ शकतात. त्या हळूहळू कमी होणार.
२. यंदाचे थंडीचे काळात आतापेक्षाही मोठी लाट येऊ शकते. मग हळूहळू कमी होणार. ( असेच १९१८ च्या महासाथीत झाले होते).
३. २ वर्षे संसर्ग सौम्यपणे धुमसत राहील (slow burn).
जगभरातील भौगोलिक परिस्थितीनुसार यांत कमी अधिक बदल होऊ शकतात.
आता काही नवीनच लक्षण आलेय
आता काही नवीनच लक्षण आलेय म्हणे कोरोना चे
चालता बोलता ऑक्सिजन लेव्हल कमी होतो आणि फटकन जीवच जातो
खरे आहे का हे की उगाच अतिशयोक्ती आहे ???
आदू,
आदू,
ती जरा अतिशयोक्ती वाटते. मात्र काही तातडीने उद्भवलेली धोकादायक लक्षणे ही असतात :
१. तीव्र श्वसनअवरोध
२. छातीत सतत दुखत राहणे किंवा दाब वाटणे
३. अर्धवट जागृतावस्था
४. चेहरा अथवा ओठ निळे पडणे.
कोविड१९ : पुढील २ वर्षांचा
कोविड१९ : पुढील २ वर्षांचा अंदाज: >>>
कुमार सर,
चिंताजनक आहे.....
Vaccine , 100% treatment.... हे factor consider केले तर ???
सतीश,
सतीश,
तुम्ही लसीचा मुद्दा उपस्थित केला हे छान झाले. सध्या या संदर्भात माध्यमांतून काही उलटसुलट आणि अर्धवट बातम्या आलेल्या आहेत. या निमित्ताने काही अधिकृत माहिती इथे देतो.
कुठलीही लस प्रत्यक्ष वापरात येण्यापूर्वी ती सुरक्षित आणि प्रभावी अशी सिद्ध व्हावी लागते. हे दीर्घकालीन काम असते. एखाद्या लसीवरील संशोधन परिपूर्ण व्हायला तब्बल वीस वर्षे जावी लागतात. आता सध्याच्या आजारावरील लस्सीबद्दल पाहू.
ही लस जर घाईघाईत तयार केली तर तिच्या संशोधनातील बरेच टप्पे नजरेआड करावे लागतात. कुठलीही लस तिच्या संशोधनादरम्यान अनेक लोकांना देऊ पहावी लागते, तसेच तिचे निरनिराळे डोस देखील देऊन पहावे लागतात. त्यानंतर संबंधित लोकांचे दीर्घकाळ निरीक्षण केल्यावरच योग्य निष्कर्ष निघतात.
हे सर्व पाहता सुरक्षित आणि प्रभावी अशी लस लवकर वापरात येणे अवघड दिसते. म्हणून कोविडशी सामना करीतच बराच काळ जावा लागेल असे दिसते.
कुमार सर,
कुमार सर,
महितीत भर घत्ल्याबद्दल...thanks
हे सर्व पाहता सुरक्षित आणि प्रभावी अशी लस लवकर वापरात येणे अवघड दिसते. म्हणून कोविडशी सामना करीतच बराच काळ जावा लागेल असे दिसते. ==>
ह्या सर्वाचे आपल्या सर्वांवर होणार्या परिणामाचे मापनही कठीण आहे....
इसराईलने कोविड उपचारासाठी
इसराईलने कोविड उपचारासाठी Antibody शोधल्याचा दावा केला आहे. हा उपाय antiviral औषधांपेक्षा भारी असतो का?
कुमार सर,
कुमार सर,
नवीन प्रश्न ....pneumococcal किंवा BCG लस घेतली तर कोरोनाची शक्यता व तीव्रता कमी होते ...यात तथ्य आहे का ?
धन्यवाद ...तुम्ही मनाला पडलेल्या न पडलेल्या सगळ्या प्रश्नांंची उत्तरे देताय.
आधी साद यांचा प्रश्न घेतो.
आधी साद यांचा प्रश्न घेतो.
* Antibody शोधल्याचा दावा केला आहे. हा उपाय antiviral औषधांपेक्षा भारी असतो का?
>>>>
‘भारी’ असे नाही म्हणता येत; उपचारांच्या त्या दोन दिशा आहेत. सध्या सुमारे ५० प्रकारच्या करोनाविरोधी औषधांच्या चाचण्या चालू आहेत. ढोबळ मानाने त्यांचे असे वर्गीकरण करता येईल:
१. पारंपरिक रासायनिक औषधे ( HCQ इ.)
२. विषाणूविरोधी औषधे
३. अॅन्टिबॉडीज
४. मूळ पेशींचे उपचार.
या सर्वांचे रुग्णप्रयोग शास्त्रीय पद्धतीने चालू आहेत. त्यांचे दखलपात्र निष्कर्ष बाहेर यायला काही महिने जावे लागतील. काही रुग्णांना अॅन्टिबॉडीजच्या जोडीने विषाणूविरोधी औषधे
देखील द्यावी लागतात.
पुरेसे निष्कर्ष हाती आल्याखेरीज अमुक एक उपचार ‘भारी’ आहे असे म्हणता येणार नाही.
आदिश्री,
आदिश्री,
* करोना 2 आणि बीसीजीचे उपचार ? >>>>>
चांगला प्रश्न. बीसीजी लस आणि कोविड यांचा संबंध तपासण्यासाठी एप्रिलपासून अनेक रुग्णप्रयोग चालू झालेले आहेत. त्यांचे निष्कर्ष हाती यायला सुमारे ४ महिने तरी लागतील.
यानिमित्ताने बीसीजीबद्दल काही उपयुक्त माहिती:
१. ज्या देशांत ती बालपणी सर्वांना देतात, तिथे बालकांच्या श्वसनाच्या गंभीर आजारांचे प्रमाणात घट दिसली आहे.
२. मुळात ही लस जरी जीवाणूविरोधी असली तरी तिच्यात काही विषाणूविरोधी गुणधर्म आहेत.
३. या लसीचे देखील काही उपप्रकार आहेत. त्यानुसार तिचे गुणधर्मही बदलतात. याचाही पुरेसा अभ्यास व्हायचा आहे.
४. सध्यातरी करोना 2 आणि बीसीजीचे उपचार यासंदर्भात पुरेसा विदा मिळालेला नाही
डॉ., खात्रीशीर माहितीसाठी
डॉ., खात्रीशीर माहितीसाठी अनेक धन्यवाद.
हल्ली ‘पी हळद अन हो गोरी’ प्रकारच्या बातम्यांचे पेव फुटले आहे. माध्यमांचा बेतालपणा वाढतोच आहे.
लस तयार करणे हा पोरखेळ नसतो. या आशयाचा एक चांगला लेख इथे वाचला-
https://www.loksatta.com/vishesh-news/covidoscope-article-various-ailmen...
आदिश्री,
आदिश्री,
न्यूमोकॉकस- विरोधी लसीमुळे कोविड पासून संरक्षण होत नाही.
या संदर्भात WHO प्रसृत हे सुंदर चित्र पहा.
धन्यवाद कुमार सर,
धन्यवाद कुमार सर,
. कुठेतरी लहानपणी दिलेल्या लसीकरणचा फायदा होतो म्हणजे ....
माझी एक ताई न्युयार्क मध्ये Hospital च्या IT Dept साठी काम करते. तिने सांगितले की बरीच Orthodox Jews आहेत ते इम्युनायझेशनच्या विरोधात आहे. ते कोरोना चे बळी ठरले आणि आकडा हा भयंकर वाढला आणि जीव गेलेल्यांची संख्या सुद्धा
अर्थात हे ऐकीव आहे.
तुमचे खूप खूप आभार.
'बीसीजी’ लशीचा ससूनमध्ये
'बीसीजी’ लशीचा ससूनमध्ये प्रयोग सुरू; ६० जणांची निवड
बातमी : https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/bcg-vaccine-test-begi...
शुभेच्छा !
विटामिन डी घेतल्याने कोविडचा
विटामिन डी घेतल्याने कोविडचा प्रतिबंध होऊ शकतो यात कितपत तथ्य आहे ?
ड जीवनसत्वामुळे कोविडचा
ड जीवनसत्वामुळे कोविडचा प्रतिबंध होत नाही.
ज्यांना करोनासंसर्ग होतो, त्यांच्या शरीरातील ‘ड’ साठा जर चांगला असेल तर त्याचा उपयोग प्रतिकारशक्तीसाठी होऊ शकतो. त्यातून संभाव्य कोविडची तीव्रता कमी होऊ शकते.
सध्या या संदर्भात काही संशोधन घाईघाईने झाले आहे. परंतु ते अर्धवट स्वरूपाचे आहे. जगभरात यावर पुरेसे संशोधन झाल्या खेरीज असा निष्कर्ष काढता येणार नाही.
खूप छान माहिती आणि चर्चा.
खूप छान माहिती आणि चर्चा.
ड जीवनसत्व आणि कोविडची
ड जीवनसत्व आणि कोविडची तीव्रता यासंबंधी आता जोरदार संशोधन आणि काथ्याकूट होत आहे त्यासंदर्भात काही रोचक मुद्दे असे आहेत:
१. आपल्या त्वचेत तयार होणारे ड आणि आपले राहण्याचे भौगोलिक स्थान यांचा घनिष्ट संबंध असतो. हे स्थान विषुववृत्तापासून जसजसे उत्तरेकडे वरवर जाते तसे ड कमी प्रमाणात तयार होते.
२. ज्या शहरांत हवेच्या प्रदूषणाचे प्रमाण खूप असते तिथे देखील शरीरात ड कमी तयार होते.
३. वरील दोन्ही घटक वुहान, तेहरान, मिलान, सिएटल, न्यूयॉर्क आणि लॉस एंजेलिस या शहरांना लागू होतात.
४. वाढत्या वयानुसार देखील त्वचेतील ड चे उत्पादन कमी होत जाते. बरेच जेष्ठ लोक आहारातून पुरेसे ड मिळेल याची काळजी घेत नाहीत. त्यामुळे त्यांना ड ची कमतरता होते.
५. तसेच दीर्घकाळ धूम्रपान केल्यास देखील ड ची कमतरता होते.
६. ड ची पातळी आणि श्वसनसंस्थेची रोगप्रतिकारशक्ती यांचा संबंध काही अभ्यासांत दिसला आहे.
..... जसे या विषयावर अधिक संशोधन होत राहील, तसा अधिकाधिक प्रकाश पडेल.
डॉ, खूप छान अपडेट्स .
डॉ, खूप छान अपडेट्स .
अनेक धन्यु .
सध्या या संदर्भात काही संशोधन
सध्या या संदर्भात काही संशोधन घाईघाईने झाले आहे. परंतु ते अर्धवट स्वरूपाचे आहे.>>>
हा खुप महत्वाचा मुद्दा घेतलात डॉ. सध्या बरेच संशोधक घाई घाईने निष्कर्ष काढत आहेत आणि काही दिवसांनी तोंडावर आपटत आहेत.
गेल्या १५ दिवसात “अमुक-तमुक
गेल्या १५ दिवसात “अमुक-तमुक रसायने खा आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवा”, या आशयाचे अनेक सल्ले ढकलपत्रांतून फिरवले गेले.
या संदर्भात मला एका वैद्यकीय तज्ञांचे मत दखलपात्र वाटले. ते इथे लिहितो.
शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीसाठी लागणाऱ्या विविध घटकांपैकी जर कशाची खरोखर कमतरता असेल, तरच तो घटक बाहेरून देण्याने उपयोग होतो.
“ प्रतिकारशक्ती वाढवा (बूस्ट)” हे विधान मुळात अशास्त्रीय आहे. जर एखाद्या कमतरतेमुळे प्रतिकारशक्ती कमी झाली असेल, तर ती कमतरता बाहेरून घटक देऊन भरून काढली जाते. त्यामुळे कमी झालेली प्रतिकार शक्ती पूर्ववत (नॉर्मल) होते.
तेव्हा नागरिकांनी निव्वळ ढकलपत्रातील संदेश वाचून वैद्यकीय सल्याविना कुठलेही रसायन/ औषध घेण्यात मतलब नाही.
.... निव्वळ ढकलपत्रातील संदेश
.... निव्वळ ढकलपत्रातील संदेश वाचून वैद्यकीय सल्याविना कुठलेही रसायन/ औषध घेण्यात मतलब नाही....
सल्ला लाखमोलाचा डॉक !
कुमार सर,
कुमार सर,
प्रतिकारशक्ती कशी वाढवावी ? विटमिन सी, डी आणि झिंक तिन्ही महत्त्वाचे आहेत का, प्रमाण किती असावे. सगळ्यांंनी उठसूट घेणे गरजेचे आहे का , म्हणजे निरोगी आणि तरुण असणाऱ्या लोकांनी. लहान मुलांना काय द्यावे. मला मनाने विटमिन घेणे सुद्धा पटत नाही. नवरा सर्वांना झिंकचा आग्रह करत आहे. आपली प्रतिकारशक्ती योग्य आहे कसं ओळखावे. आता घरी राहून महिन्याच्या वर होतो आहे. त्यानीच कमी व्हायची की काय वाटतं आहे.
तुम्ही सांगा. सध्या फक्त तुमच्यावरच विश्वास राहिला आहे.
आभार. तुम्ही पण काळजी घ्या.
तेव्हा नागरिकांनी निव्वळ
तेव्हा नागरिकांनी निव्वळ ढकलपत्रातील संदेश वाचून वैद्यकीय सल्याविना कुठलेही रसायन/ औषध घेण्यात मतलब नाही. >>>>>>>>> Dr, very agreed n correct
we need to live with covid19...... Lock down is getting relaxed.... तस आवश्यकच आहे......
आदिश्री,
आदिश्री,
१. क जीवनसत्व >>> औषधरूपात घेण्याची गरज नाही. रोजच्या आहारात लिंबू आणि मोसमानुसार पेरू, आवळा इत्यादी फळे व्यवस्थित खावीत.
२. ड जीवनसत्व >>> वयाच्या 50 ते 55 नंतर जर हाडांची दुखणे उद्भवली असतील तरच संबंधित डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधरूपात घ्यावे. उगाचच स्वतःच्या मनाने नाही.
३. जस्त >>> हे आपल्याला अख्खी धान्ये, बीन्स आणि कठीण कवचाची फळे यातून चांगले मिळू शकते.
या तीनही घटकांच्या अधिक माहितीसाठी माझ्या संबंधित लेखांचे हे दुवे :
‘क’ : https://www.maayboli.com/node/68676
‘ड’ : https://www.maayboli.com/node/68623
जस्त : https://www.maayboli.com/node/69114
धन्यवाद . मीही वाचते पुन्हा
धन्यवाद
. मीही वाचते पुन्हा आणि कुटुंबातील इतरांना लिंक्स पाठवते. तुमच्या लेखातील फोटो दिसत नाहीत. हे असे का होते माहिती नाही काही दिवसानंतर लेखातील फोटो दिसतं नाहीत.. ठीक आहे.
Dr,
Dr,
मी हे शोधत्च होतो.....
Thanks....
आदिश्री,
आदिश्री,
२.
आपली प्रतिकारशक्ती योग्य आहे कसं ओळखावे.>>>
आपल्या प्रतिकारशक्तीचे दोन महत्वाचे घटक असतात. त्यापैकी एक म्हणजे इम्युनोग्लोब्यूलिनस. त्यांचेही पाच उपप्रकार असतात. अर्थात निरोगी व्यक्तींमध्ये ऊठसूट यांची रक्तपातळी मोजली जात नाही. ते आवश्यक आणि व्यवहार्य नाही.
स्वतः आपल्या आरोग्याचे निरीक्षण करून आपण या शक्तीबद्दल काहीसा अंदाज बांधू शकतो. आपल्याला ऊठसूट संसर्गजन्य आजार न होणे,
किंवा
मोसमातील बदलाचे वेळी जे काही नियमित आजार होतात, ते लवकर नियंत्रणात येत असतील तर आपली प्र-शक्ती चांगली आहे, असे समजायला हरकत नाही.
….
अनिंद्य, धन्यवाद.
सतीश >>> बरोबर.
Pages