लीझीकी (Li Ziqi) - चीनच्या शेझुआन प्रांतातील एका गावात शांत, निसर्गरम्य परिसराच्या सोबतीत राहणारी एक गोडशी मुलगी. तिच्यापेक्षाही गोड असलेल्या आजीबरोबर ती राहते. आजूबाजूला केवळ एक भरभरून देणारा, डोळे निववणारा निसर्ग आहे. या सकस मातीतून पिकवलेल्या ताज्या भाज्या, धान्य, फळं यापासून ती मुलगी काय काय पदार्थ आणि प्रकार बनवते. वेलकम टु लिझीकी चॅनल - हा एक युट्युबवरचा आनंदाचा खजिना आहे आणि ती आहे या चॅनलची अनभिषिक्त राणी. लीझीकीचा एक एपिसोड बघा की तुम्ही तिचे चाहतेच होऊन जाता.
गेल्या दोन वर्षांपूर्वी युट्युबवर आलेली २९ वर्षांची लिझीकी आता खूप प्रसिद्ध युट्युबर आहे. आज तिच्या चॅनलचे ६० लाखांपेक्षाही जास्त चाहते आहेत. पण तिचं बालपण आणि युट्युबवर येण्याआधीचं जीवन खूप खडतर होतं. अगदी लहानपणीच आईवडिलांचा घटस्फोट पाहिलेली, १४व्या वर्षापासून शाळा सोडून देऊन नोकरीला लागलेली, वेळप्रसंगी भुकेली राहलेली, पुलाखाली झोपलेली, पडेल ते काम करणारी अशी ही लिझीकी आजीच्या आजारपणामुळे शहर सोडून गावात आली. तिच्या आजोबांकडून तिनं चीनचं पारंपारीक जेवण, बागकाम, मासेमारी, सुतारकाम, बुरुडकाम अश्या गोष्टी शिकल्या होत्याच. चीनमध्ये युट्युबचं प्रस्थ वाढायला लागल्यावर तिनं तिच्याकडे असलेल्या या खजिन्याचा उपयोग करून व्हिडिओ बनवायला सुरवात केले. हळू हळू तिचे व्हिडिओ लोकांना आवडायला लागले आणि केवळ दोन वर्षांत ती प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन बसलीये. तिनं तिची एक स्टाईल निर्माण केलीये. इतकं असूनही तिनं तिची प्रायव्हसी जपलीये बरं. ती नक्की कुठे राहते हे नेटवर उपलब्ध नाहीये.
लिझीकी नेहमी पारंपारीक तिच्या प्रांतातील पोशाख करून व्हिडिओत दिसते. ते पोशाखही देखणे असतात. तिच्या प्रांतातील चार मोसम तिच्या व्हिडिओंतून बघायला मिळतात. तिच्या घरातील सर्व वस्तू, भांडी, तिची जेवण करण्याची पद्धत एकदम पारंपारीक आहेत. एका दृष्टीनं पाहिलं तर ती तिच्या या व्हिडियोंद्वारे या जुन्या चिनी परंपरांचं डॉक्युमेंटेशन करून एक भरीव कार्यही आपसुकच करत आहे. तिचं ऑनलाईन शॉपही आहे.
ती तिच्या व्हिडिओत सुंदर, नाजूक तर दिसतेच पण त्याचबरोबर काटक आणि मेहनतीही दिसते. जंगलातली, शेतातली, सुतारकामाची कामं करणं सोपं नाही. यामुळेच कदाचित तिला तिचे चाहते 'ब्रदर ली' असंही म्हणतात. तिचं त्या गावात खरंखुरं शेत आहे आणि त्यात ती मका आणि भुईमुग उगवते. शिवाय ती डुकरं आणि रेशमाचे कीडेही पाळते. हा तिचा पारंपारीक व्यवसाय आहे.
तिच्या घराबाहेरच भाज्या धुवायला एक डोणी आहे. त्यावर बांबूमधून पाणी पडतं. भांडी सगळी लाकडी किंवा बीडाची असावीत. बांबूचा तर उपयोग ठायी ठायी दिसतो. सगळं कसं नेटकं, देखणं. दिवस असो वा रात्र, कोणताही ऋतू असो, ही आपली टणटण उड्या मारत काय काय पटापट करत असते. घराच्या परसातल्या बागेतून, बाहेरच्या जंगलातून, तळ्यातून ती कायबाय चटचट तोडते, खुडते, गोळा करते. घरी येऊन लगेच झटपट कामाला लागते. ती फळं साठवते, पीठं करते, वाळवणं घालते, जॅम-जेली-वाईन करते. हे सगळे साठवणीचे पदार्थ. याबरोबरच ती जेवणंही करते. दोघीच तर जेवणार पण तरीही निदान चार प्रकार तर हवेच. सुंदर, सुबक, साधेच असे ते प्रकार असतात. छानश्या भांड्यांतून , प्लेटींतून ती जेवणाच्या लाकडी टेबलावर ते नेते. तिची आजी तिथे बसलेली असतेच. एका सुंदर पंख्यानं वारा घेत. मग दोघी मिळून हसतखेळत त्या जेवणाचा आस्वाद घेतात.
जेवण तरी किती मजेमजेशीर. एका कमळाच्या तळ्यातून तिनं कमळं, त्यांची पानं, त्यांचे देठ आणि त्यांची मूळं आणली आणि काय काय बनवलं. मूळांपासून पीठ केलं, त्या पीठाचं सूप केलं, देठ भाजीला वापरले, पानात गुंडाळून काहीतरी उकडलं आणि कमळाच्या गुलाबी पाकळ्यात काही भाज्या घालून ते रॅप्स बनवून खाल्ले. बघूनही मन तृप्त होतं अगदी. असंच एकदा भोपळ्यापासून अनेक प्रकार केले तिनं. त्यात भोपळ्याच्या मॅशला दोरे बांधून त्यांना मिनी भोपळ्यांचा आकार दिला. काय देखणं होतं ते. एकदा काय तर सगळे प्रकार मक्यापासून केलेले. असली गुणी मुलगी ना!
तिचं स्वयंपाकघर भारी मस्त. एक छोटुशी शेगडी तर दुसरं एक मोठं चुलाण आहे तिच्या स्वयंपाकघरात. चुलाणाला मागून लाकडं टाकायला जागा आहे. तिची आजी कधीकधी तिथे बसून लाकडं चुलीत सारत असते. त्या चुलाणावर एक भलं मोठं वोक म्हणजे कढई असते. त्यात ही सुगरण निगुतीनं जेवण बनवते. तिच्याकडे खूप खाद्यपदार्थ उकडलेलेही बनतात. त्यासाठी एक बांबूचा पारंपारीक स्टीमर आहे. तो ती त्याच वोकवर ठेऊन वापरते. तिच्याकडे घराबाहेर एक भट्टी/आवनही आहे. त्यातही काय काय भाजते ती.
तिच्या व्हिडिओजमधली अगदी प्रत्येक फ्रेम देखणी. सुर्योदय, सूर्यास्त, तार्यांनी खचाखच भरलेलं रात्रीचं आकाश, बर्फ, विविध झाडं, फळं, भाज्या, फुलं, प्राणी आणि स्वतः लिझीकी असं सगळं कसं मिळून आलेलं असतं. किती रंग असतात आणि ऋतुप्रमाणे बदलतातही. पण सगळं कसं आदब राखून, अजिबात उथळपणा नाही तिथं. मागे एक अत्यंत शांतवणारं हलकं संगीत सुरू असतं. तिच्या रोजच्या कामाच्या निमित्तानं होणार्या आवाजांनाही एक सुंदर नाद आहे. पाण्याचे, भांड्याचे, झाकणांचे आवाज, बांबूच्या गोल परातीत बिया सुकवायला टाकते, त्या सुकलेल्या बिया बरणीत ओतते ते आवाजही निव्वळ आनंददायी.
शिवाय आपल्याला न कळणारं आजी आणि नातीचं बोलणं, त्यांचं खळखळून हसणं इतकंच असतं. संवादांची गरज नाही, भाषांतराची गरज नाही. अगदी अलगदपणे त्या हृदयीचे आपल्या हृदयी पाझरत राहतं. एक विलक्षण अनुभव असतो हा. तिच्याच शब्दांत सांगायचं तर Life isn't easy, BUT YOU CAN LIVE WITH YOUR HEART!
*****************************************************
लिझीकी चॅनल : https://www.youtube.com/channel/UCoC47do520os_4DBMEFGg4A
लिझीकीची गोष्ट : https://raknife.com/li-zi-qi/
ऑनलाईन दुकान : https://liziqishop.com/
अगदी बरोबर, सायो. आजी खरंच
अगदी बरोबर, सायो. आजी खरंच नशिबवान आहे
बघायला मलाही आवडत होतं.
मला तर खूप साम्य दिसलं.
मला तर खूप साम्य दिसलं. कित्येक फळ व पालेभाज्या, कडधान्ये, मसाले सारखेच आहेत. फक्त करायची/शिजवायची पद्धत वेगळी आहे. तिचे जाते तर खूप आवडले. आपल्याकडे असे बेस असलेली जाती वापरात आहेत पण ती फक्त सुक्यासाठी. त्या दोघीच्या व्हिडीओजवर ईशान्य भारतीयांच्या खूप कमेंट्स असतात, त्यांच्या खाद्यसंस्कृतीत खूप साम्य आहे असे त्यांचे म्हणणे असते.
आज भात पेरून नंतर एकेक प्रोसेस होत शेवटी त्याचा नंतर तांदूळ बनवून पेज, भाताचे मुटक्यासारखे काहीतरी, नॉनव्हेज रस्सा (पोर्क असावे) व सोबत भात, भाताची खरपुडी, त्यात लाल मूळ्याची कोशिंबीर असा भरगच्च बेत होता. फॉर अ चेंज आज तिच्या क्रूलाही तिने जेवायला बोलावले.
बाकी आपला वेळ फुकट जातो व त्यांची कमाई होते याच्याशी सहमत. मी शोध लागला तेव्हा खूप बघितले, आता फीडमध्ये आला व इंटरेस्टिंग वाटला तर बघते. असेच मी मस्तानमाचे बघायचे. आता त्या चॅनेलची रयाच गेली असावी. मुबशीर सादिकचे व्हिडीओज पण मस्त असतात. मला त्याची भाषा खूप आवडते. त्याचे अधून मधून बघते.
साधना, तिच्या घरात दिसणारं
साधना, तिच्या घरात दिसणारं जातं किंवा उसाचा रस काढला ते मशिन? किंवा बाहेर झाडाला पंचा बांधून टांगलेलं मोठं गाळणं वगैरे सगळंच एकदम मस्त दिसतं. मला आपले ही सगळी भांडी आता कोण घासणार वगैरे फुटकळ प्रश्न पडलेच.
चायनीज आणि आपल्या खाद्य
चायनीज आणि आपल्या खाद्य संस्कृती मध्ये फारच साम्य दिसलं. लोणची, मोदकासारखे डम्पलिंग, फोडणी, आणि बारकाईने पहिले तर अजून हजारो साम्यस्थळं दिसतील.
बाकी औत धरून खाचर नांगरता येणारी मुलगी फारच दुर्मिळ आहे. आणि दोन झिपरी कुत्री आणि कोकरू पण भारी आहे.
मला आवडते हे चॅनल!
मला आवडते हे चॅनल!
खुप भाग बघितले नाहीत पण जे बघितले ते आवडले.
दोन व्हिडिओ बघितले आताच. छान
दोन व्हिडिओ बघितले आताच. छान आहेत.
असेच भारतातील खेड्यापाड्यात, आदिवासी भागात जाऊन व्हिडिओ बनवायला हवेत.
हे प्रकरण मला महानच वाटलं.
हे प्रकरण मला महानच वाटलं. अर्थात आपल्याकडेही अशा पारंपारिक कलेची कमतरता नाही पण ...
https://youtu.be/UmEXbJUnFG0
मस्त वाटतंय. नक्की बघणार.
मस्त वाटतंय. नक्की बघणार. थँक्स मामी.
काय स्वादिष्ट व मोहमयी चॅनल
काय स्वादिष्ट व मोहमयी चॅनल आहे वा!!! संगीत किती गोड आहे.
मला आपले ही सगळी भांडी आता
मला आपले ही सगळी भांडी आता कोण घासणार वगैरे फुटकळ प्रश्न पडलेच.>> मलाही पडले. शिवाय चिराचिरी किती! या सगळ्या शेतीवाडीचा मेंटेनन्सही काही सोपा नाही.
बघायला खूप सुंदर वाटतं मात्र. आवडले व्हिडिओज.
हम्म. काही जणांना दोन्ही
हम्म. काही जणांना दोन्ही खाद्यसंस्कृतीत साम्य दिसते आहे. मी हे videos बऱ्याच महिन्यांपूर्वी पहात होते त्यावेळी तिने अनवट भाज्या, कंद, पालेभाज्या, झाडांची पाने स्वयंपाकात वापरल्याचे आठवते. त्यामुळे साम्य नाही असा माझा समज झाला असेल.
मला आपले ही सगळी भांडी आता
मला आपले ही सगळी भांडी आता कोण घासणार वगैरे फुटकळ प्रश्न पडलेच.>> मलाही पडले. शिवाय चिराचिरी किती! या सगळ्या शेतीवाडीचा मेंटेनन्सही काही सोपा नाही.>>>+१
भांडी कोण घासणार तर पडलाच पण
भांडी कोण घासणार तर पडलाच पण एकटे असताना आपण(मी) बूडही हलवुन स्वयंपाकघरात शक्यतो जात नाही, गेले तर ४ दिवसांचा स्वयंपाक एकदाचा उरकून करुन ठेवते आणि ही लिझ्झिकी बया काय उत्साहाने ती रोजमर्रा (mundane) कामे करते. कुठुन येते एवढी उर्जा व वेळ असेही वाटून गेले.
मस्त चॅनेल आहे.
लिझीकी मस्त चॅनेल आहे.
https://www.youtube.com/watch?v=so0BwyMEO8w
भारतात ही एक शेतकरी असा चॅनेल चालवतो. पार अगदी एनपीआर वर त्याची चर्चा होती.
जस्ट टू बी क्लिअर - मी ते
जस्ट टू बी क्लिअर - मी ते व्हिडिओ 'काल्पनिक' समजून बघते आहे. ते जसे दाखवले आहे तसे जगणे अजिबात ग्लॅमरस नसणार. त्यांनी जस्ट इल्यूजन बनवलं आहे. शहरी लोकांसाठी फॅन्टसी....
मस्त ओळख मामी,2 व्हिडीओज
मस्त ओळख मामी,2 व्हिडीओज पाहिले,फार शांत वाटलं पाहताना! आता पाहीन एकेक करून पुढचे
आत्ताच मका (corn) हा व्हिडिओ
आत्ताच मका (corn) हा व्हिडिओ बघितला. सिनेमाटोग्राफी खूपच सुंदर आहे, पण २-३ डिश करण्यासाठी ती फार अफाट मेहनत करते असे वाटले.
किती सुंदर लिहिलंय. वाचून च
किती सुंदर लिहिलंय. वाचून च मस्त वाटलं. लगेच जाऊन बघते एक एपिसोड आता.
अँमी, तुमच्या मताशी सहमत.
अँमी, तुमच्या मताशी सहमत.
तिचा हा व्यवसाय असणारे. एवढे
तिचा हा व्यवसाय असणारे. एवढे मुरांबे, लोणची, पिठं दोघींसाठी नक्कीच नसतील.
ग्लॅमरस तर जाऊदे, सोपंही नाहीये. व्हिडिओमधे न दिसणारी अफाट कामं, अडचणी, अपयशं असणार आहेत. आपण आपलं गंमत म्हणून बघायचं.
मला काही आवडला नाही लिझिकी चा
मला काही आवडला नाही लिझिकी चा विडिओ.इथे वाचून पहिल्यांदा बघितला. दुसरी मुलगी प्रतिसादात आहे ती पण नाही आवडली.
मला एक दिवस मोलकरीण नाही आली तर अडचण होते. दोन दिवस टीव्ही नसणाऱ्या, simple food / simple living असणाऱ्या जंगल किंवा बीच रिसॉर्टमध्ये जाऊन राहिलं तर घराची, टीव्हीची, आवाजाची आणि dominos पिझ्झा ची आठवण यायला लागते.
कधी घरून काळा वाटाणा, जवस, कांदा असं शेतातून आलंय ते वापरायला घेताना खूप निवडण-टिपणं करून, स्वच्छता करुन घेऊन वापरावं लागतं. स्वतः निवडणं काम आहेच पण मोलकरीण पण खूप मागे लागलं की निवडून देते. इतकी उस्तवार करावी लागली की घरच्या शेतातील खातोय ही मजा निघून जाते.
रोजची तीन-चार जेवणं plan-execute करतेच, त्यामुळे तीच्या स्वयंपाकाच काही नवल विशेष करते असं वाटलं नाही. फक्त दोघींचा स्वयंपाक, ते पण दोघी बायका! किती फ्रीडम? सकाळी उठून बसच्या आधी डबा करायची घाई नाही, त्या एवढया डब्यात सगळ्या nutritional values कश्या बसवाव्यात ची चिंता नाही, डबा करायच्या धांदलीत झोपलेल्याना हाले-हाले करायचं नाही. नो वंडर बागडत-बागडत, musical background वर सगळी कामं करते
घरी आम्ही राहतो त्या ठिकाणी बर्यापैकी शांतता असते, घरातून दूरवर जंगल दिसतं, त्या जंगलातले पक्षी कधी कधी बाल्कनीत येतात, बाल्कनी घाण होऊ नये म्हणून आम्ही जाळी लावतो
कधी प्राणी आले तर मात्र प्राणिमित्रांना बोलवावं लागलंय
रात्रीच्या वेळेस जंगलाच्या पलीकडे दिवे दिसतात ते पण छान वाटतं.
मामी, thank you for sharing this videos
माझ्याकडे कसं जग आहे आणि ते किती छान आहे हे बघायची नवीन दृष्टी मिळाली लिझिकी बघितल्यावर 
आवडले व्हिडीओ .
आवडले व्हिडीओ .
मला अशा घरात जाऊन रहायला आवडेल. पण सोबत आणखी 3-4 लोकं हवी. १-२ माणसांसाठी एवढी रोजची उठाठेव नाही जमायची. आणि मग कधीतरी change म्हणून आठवडाभर शहरात येऊन रहायचं.
विडिओ खरेच आहेत, त्यात
विडिओ खरेच आहेत, त्यात काल्पनिक काहीही नाही. फक्त काळ, काम, वेगाचा हिशोब ठेवलेला नाही. लीच्या घराभोवती जी फळांफुलांनी वाकलेली झाडे आहेत त्यांची नियमित काळजी घ्यावी लागते, वेगवेगळे पदार्थ बनतात त्याचा वेळ धरलेला नाही व आणि 5 मिनिटांच्या व्हिडिओत 2 ऋतूबदलही असतात. विडिओ 10 मिनिटांपेक्षा लहान बनवले नाहीत तर लोक बघत नाहीत ह्या गृहितकावर आधारित लहान विडिओ आहेत.
ली झिकी रेडी टू ईट पदार्थ बनवायचा व्यवसाय करते. एका भागात दाखवले होते. पूर्ण पदार्थ करून तो vacuum पॅक करायचा, काहीतरी अजून प्रोसेस असणार, जी दाखवली नाही. नंतर तिने ते पॅकेट गरम पाण्यात घालून ठेवले, ताजा वाटणारा पदार्थ तयार झाला जो तिने क्रूसोबत खाल्ला.
असो. झिकी व डियांशी दोघीनाही या चॅनेलमुले चांगले दिवस आले . डियांशीचा एक व्हिडिओ आहे ज्यात तिने कशी सुरवात केली व आज काय स्थिती आहे हे सांगितलंय.
त्यांचा तो सुरा, खरेतर खाटकाकडचा सुरा म्हणायला हवा, मी त्या सु-याच्या प्रेमात आहे
जास्ती लोड नका घेऊ लोकहो.
जास्ती लोड नका घेऊ लोकहो. फुललेली बाग, समुद्र किनारा, खळखळणारी नदी हे बघून आपल्याला शांत वाटतं, आनंद होतो तसंच हे व्हिडिओ. त्यामागे तिची मेहनत, तिच्या क्रू ची मेहनत आहेच. आणि हे व्हिडिओ बनवण्यामागे तिला आर्थिक फायदाही आहेच. त्यामुळे ते कमर्शियल असतीलही. असोत बापडे.
यात तिच्या लाईफस्टाईलची आणि आपल्या लाईफस्टाईलची तुलना कशाला करायची? निखळ आनंद मिळाला तर ठीक, नाहीतर द्या सोडून. मला हे व्हिडिओ बघून खूप शांत समाधानी वाटलं म्हणून शेअर केले.
विडिओ खरेच आहेत, त्यात
विडिओ खरेच आहेत, त्यात काल्पनिक काहीही नाही. फक्त काळ, काम, वेगाचा हिशोब ठेवलेला नाही. लीच्या घराभोवती जी फळांफुलांनी वाकलेली झाडे आहेत त्यांची नियमित काळजी घ्यावी लागते, वेगवेगळे पदार्थ बनतात त्याचा वेळ धरलेला नाही व आणि 5 मिनिटांच्या व्हिडिओत 2 ऋतूबदलही असतात. विडिओ 10 मिनिटांपेक्षा लहान बनवले नाहीत तर लोक बघत नाहीत ह्या गृहितकावर आधारित लहान विडिओ आहेत. >> साधना +१
@ साधना, इथे बघ. लिझिकीच्या सुर्याविषयी माहिती दिली आहे. लिझीकीची गोष्ट : https://raknife.com/li-zi-qi/
> त्यामुळे तीच्या स्वयंपाकाच
> त्यामुळे तीच्या स्वयंपाकाच काही नवल विशेष करते असं वाटलं नाही. फक्त दोघींचा स्वयंपाक, ते पण दोघी बायका! किती फ्रीडम? सकाळी उठून बसच्या आधी डबा करायची घाई नाही, त्या एवढया डब्यात सगळ्या nutritional values कश्या बसवाव्यात ची चिंता नाही, डबा करायच्या धांदलीत झोपलेल्याना हाले-हाले करायचं नाही. नो वंडर बागडत-बागडत, musical background वर सगळी कामं करते Happy > हेच ते शहरी लोकांसाठी बनवलेल डिल्युजन!
ते परवा (म्हणजे एकाधदोन वर्षापूर्वी) नाहीका एका धाग्यावर "आम्हाला सकाळी उठून, वजनदार दप्तर उचलून शाळेत जावं लागायचं, हाताला घट्टे पडेपर्यंत अभ्यास करावा लागायचं. आणि तेव्हा तुम्ही हिरव्यागार शेतात बागडत-नाचत फिरत होतात. म्हणून आता आम्ही आयटीत नोकरी करतोय आणि तुम्ही आमच्या घरी भांडी घासायला येता." अशा अर्थाचं काहीतरी लिहलं होतं. तसंच हे!!
बाकी प्रतिसाद ठीक आहे.
===
तरी आखाडी धाग्यावर म्हणलं होतं मी "अजूनेक निरीक्षण हे की गावाकडंचे जे काही थोडेबहुत लिहते लोक इथे आहेत ते त्या आयुष्याच ग्लॅमराईज्ड/ व्हाईटवॉश केलेलं वर्णन करतात, किंवा डॉक्युमेंटरी लिहतात. वाचकांकडून अप्रूव्हल मिळावी म्हणून असेल?. विकतं तेच पिकतं?"
एनिवे,
ज्यांना निखळ आनंद मिळतोय त्यांनी एंजॉय
त्या आयुष्याच ग्लॅमराईज्ड/
त्या आयुष्याच ग्लॅमराईज्ड/ व्हाईटवॉश केलेलं वर्णन करतात, किंवा डॉक्युमेंटरी लिहतात. वाचकांकडून अप्रूव्हल मिळावी म्हणून असेल? <<< म्हणजे काय? वाचकांनी (शहरी?) छान म्हटले (पक्षी अप्रूव्ह केले) म्हणजे ‘हां... बरे झाले आपण लिहिले. आपणही चांगले आयुष्य जगतोय म्हणायचे...’ असे काही का?
यात तिच्या लाईफस्टाईलची आणि
यात तिच्या लाईफस्टाईलची आणि आपल्या लाईफस्टाईलची तुलना कशाला करायची? निखळ आनंद मिळाला तर ठीक, नाहीतर द्या सोडून. मला हे व्हिडिओ बघून खूप शांत समाधानी वाटलं म्हणून शेअर केले.>>>>
परफेक्ट. मला दोन्ही मुलींचे विडिओ आवडतात, मी बघते.
मलाही Dianxi Xiaoge चे
मलाही Dianxi Xiaoge चे व्हिडिओ आवडतात. अतिशय नम्रपणे आणि संयमाने काम करते. मोहक आणि
मंत्रमुग्ध करतात तिच्या हालचाली. हसली कि किती गोड दिसते.
Dianxi Xiaogचा व्हिडियो
Dianxi Xiaogचा व्हिडियो पाहिला.छान वाटला.एक.टी.पी म्हणून चांगले वाटले या मुलींचे व्हिडियो.
Pages