लिझीकीचे जग

Submitted by मामी on 13 September, 2019 - 12:22

लीझीकी (Li Ziqi) - चीनच्या शेझुआन प्रांतातील एका गावात शांत, निसर्गरम्य परिसराच्या सोबतीत राहणारी एक गोडशी मुलगी. तिच्यापेक्षाही गोड असलेल्या आजीबरोबर ती राहते. आजूबाजूला केवळ एक भरभरून देणारा, डोळे निववणारा निसर्ग आहे. या सकस मातीतून पिकवलेल्या ताज्या भाज्या, धान्य, फळं यापासून ती मुलगी काय काय पदार्थ आणि प्रकार बनवते. वेलकम टु लिझीकी चॅनल - हा एक युट्युबवरचा आनंदाचा खजिना आहे आणि ती आहे या चॅनलची अनभिषिक्त राणी. लीझीकीचा एक एपिसोड बघा की तुम्ही तिचे चाहतेच होऊन जाता.

गेल्या दोन वर्षांपूर्वी युट्युबवर आलेली २९ वर्षांची लिझीकी आता खूप प्रसिद्ध युट्युबर आहे. आज तिच्या चॅनलचे ६० लाखांपेक्षाही जास्त चाहते आहेत. पण तिचं बालपण आणि युट्युबवर येण्याआधीचं जीवन खूप खडतर होतं. अगदी लहानपणीच आईवडिलांचा घटस्फोट पाहिलेली, १४व्या वर्षापासून शाळा सोडून देऊन नोकरीला लागलेली, वेळप्रसंगी भुकेली राहलेली, पुलाखाली झोपलेली, पडेल ते काम करणारी अशी ही लिझीकी आजीच्या आजारपणामुळे शहर सोडून गावात आली. तिच्या आजोबांकडून तिनं चीनचं पारंपारीक जेवण, बागकाम, मासेमारी, सुतारकाम, बुरुडकाम अश्या गोष्टी शिकल्या होत्याच. चीनमध्ये युट्युबचं प्रस्थ वाढायला लागल्यावर तिनं तिच्याकडे असलेल्या या खजिन्याचा उपयोग करून व्हिडिओ बनवायला सुरवात केले. हळू हळू तिचे व्हिडिओ लोकांना आवडायला लागले आणि केवळ दोन वर्षांत ती प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन बसलीये. तिनं तिची एक स्टाईल निर्माण केलीये. इतकं असूनही तिनं तिची प्रायव्हसी जपलीये बरं. ती नक्की कुठे राहते हे नेटवर उपलब्ध नाहीये.

लिझीकी नेहमी पारंपारीक तिच्या प्रांतातील पोशाख करून व्हिडिओत दिसते. ते पोशाखही देखणे असतात. तिच्या प्रांतातील चार मोसम तिच्या व्हिडिओंतून बघायला मिळतात. तिच्या घरातील सर्व वस्तू, भांडी, तिची जेवण करण्याची पद्धत एकदम पारंपारीक आहेत. एका दृष्टीनं पाहिलं तर ती तिच्या या व्हिडियोंद्वारे या जुन्या चिनी परंपरांचं डॉक्युमेंटेशन करून एक भरीव कार्यही आपसुकच करत आहे. तिचं ऑनलाईन शॉपही आहे.

ती तिच्या व्हिडिओत सुंदर, नाजूक तर दिसतेच पण त्याचबरोबर काटक आणि मेहनतीही दिसते. जंगलातली, शेतातली, सुतारकामाची कामं करणं सोपं नाही. यामुळेच कदाचित तिला तिचे चाहते 'ब्रदर ली' असंही म्हणतात. तिचं त्या गावात खरंखुरं शेत आहे आणि त्यात ती मका आणि भुईमुग उगवते. शिवाय ती डुकरं आणि रेशमाचे कीडेही पाळते. हा तिचा पारंपारीक व्यवसाय आहे.

तिच्या घराबाहेरच भाज्या धुवायला एक डोणी आहे. त्यावर बांबूमधून पाणी पडतं. भांडी सगळी लाकडी किंवा बीडाची असावीत. बांबूचा तर उपयोग ठायी ठायी दिसतो. सगळं कसं नेटकं, देखणं. दिवस असो वा रात्र, कोणताही ऋतू असो, ही आपली टणटण उड्या मारत काय काय पटापट करत असते. घराच्या परसातल्या बागेतून, बाहेरच्या जंगलातून, तळ्यातून ती कायबाय चटचट तोडते, खुडते, गोळा करते. घरी येऊन लगेच झटपट कामाला लागते. ती फळं साठवते, पीठं करते, वाळवणं घालते, जॅम-जेली-वाईन करते. हे सगळे साठवणीचे पदार्थ. याबरोबरच ती जेवणंही करते. दोघीच तर जेवणार पण तरीही निदान चार प्रकार तर हवेच. सुंदर, सुबक, साधेच असे ते प्रकार असतात. छानश्या भांड्यांतून , प्लेटींतून ती जेवणाच्या लाकडी टेबलावर ते नेते. तिची आजी तिथे बसलेली असतेच. एका सुंदर पंख्यानं वारा घेत. मग दोघी मिळून हसतखेळत त्या जेवणाचा आस्वाद घेतात.

जेवण तरी किती मजेमजेशीर. एका कमळाच्या तळ्यातून तिनं कमळं, त्यांची पानं, त्यांचे देठ आणि त्यांची मूळं आणली आणि काय काय बनवलं. मूळांपासून पीठ केलं, त्या पीठाचं सूप केलं, देठ भाजीला वापरले, पानात गुंडाळून काहीतरी उकडलं आणि कमळाच्या गुलाबी पाकळ्यात काही भाज्या घालून ते रॅप्स बनवून खाल्ले. बघूनही मन तृप्त होतं अगदी. असंच एकदा भोपळ्यापासून अनेक प्रकार केले तिनं. त्यात भोपळ्याच्या मॅशला दोरे बांधून त्यांना मिनी भोपळ्यांचा आकार दिला. काय देखणं होतं ते. एकदा काय तर सगळे प्रकार मक्यापासून केलेले. असली गुणी मुलगी ना!

तिचं स्वयंपाकघर भारी मस्त. एक छोटुशी शेगडी तर दुसरं एक मोठं चुलाण आहे तिच्या स्वयंपाकघरात. चुलाणाला मागून लाकडं टाकायला जागा आहे. तिची आजी कधीकधी तिथे बसून लाकडं चुलीत सारत असते. त्या चुलाणावर एक भलं मोठं वोक म्हणजे कढई असते. त्यात ही सुगरण निगुतीनं जेवण बनवते. तिच्याकडे खूप खाद्यपदार्थ उकडलेलेही बनतात. त्यासाठी एक बांबूचा पारंपारीक स्टीमर आहे. तो ती त्याच वोकवर ठेऊन वापरते. तिच्याकडे घराबाहेर एक भट्टी/आवनही आहे. त्यातही काय काय भाजते ती.

तिच्या व्हिडिओजमधली अगदी प्रत्येक फ्रेम देखणी. सुर्योदय, सूर्यास्त, तार्‍यांनी खचाखच भरलेलं रात्रीचं आकाश, बर्फ, विविध झाडं, फळं, भाज्या, फुलं, प्राणी आणि स्वतः लिझीकी असं सगळं कसं मिळून आलेलं असतं. किती रंग असतात आणि ऋतुप्रमाणे बदलतातही. पण सगळं कसं आदब राखून, अजिबात उथळपणा नाही तिथं. मागे एक अत्यंत शांतवणारं हलकं संगीत सुरू असतं. तिच्या रोजच्या कामाच्या निमित्तानं होणार्‍या आवाजांनाही एक सुंदर नाद आहे. पाण्याचे, भांड्याचे, झाकणांचे आवाज, बांबूच्या गोल परातीत बिया सुकवायला टाकते, त्या सुकलेल्या बिया बरणीत ओतते ते आवाजही निव्वळ आनंददायी.

शिवाय आपल्याला न कळणारं आजी आणि नातीचं बोलणं, त्यांचं खळखळून हसणं इतकंच असतं. संवादांची गरज नाही, भाषांतराची गरज नाही. अगदी अलगदपणे त्या हृदयीचे आपल्या हृदयी पाझरत राहतं. एक विलक्षण अनुभव असतो हा. तिच्याच शब्दांत सांगायचं तर Life isn't easy, BUT YOU CAN LIVE WITH YOUR HEART!

*****************************************************
लिझीकी चॅनल : https://www.youtube.com/channel/UCoC47do520os_4DBMEFGg4A
लिझीकीची गोष्ट : https://raknife.com/li-zi-qi/
ऑनलाईन दुकान : https://liziqishop.com/

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मला पण खूप मजा आली बघायला. हे तिला जमतेच कसे तिला दुसरे काही काम नाही का, इ. ला काही अर्थ नाही. तिचा तोच व्यवसाय असेल आणि कॅमेर्‍यामागचे मदतनीस असतील, अमूक टाइम धरलेला नही एडिट केले असेल इ. सगळे धरले तरी प्रॉडक्ट उत्तम बनले आहे - हे व्हिडिओ बघायला मस्त वाटतात ते कुठे नाही जात. आणि आपल्या लाइफ शी तुलना हे तर इर्रेलेवन्ट वाटले अगदीच.

आपल्या कार्यसंस्कृती बरोबर तुलना केली तर लिझिकी मला यंत्रमानवासारखी वाटली. की काहीतरी अज्ञात दडपणाखाली आहे असे वाटून गेले. इतक्या शांततेत रहाणं हे आपल्या पचनी पडणं औघड आहे. कलाकुसर एकच नंबर करते. चिनी स्रिया उत्तम पत्नी असतात हे ऐकलेले खरं असावं.

कलाकुसर तर अफलातून आहे. अस वर्क / कलाकुसर असलेल्या वस्तू पुण्याला कशा मागवता येतील? मला अशा एका तरी handwork असलेल्या वस्तू ची फ्रेम करायची आहे. कोणती वेबसाईट आहे सांगु शकाल का?

मामी thank u, मला आवडतात असे व्हिडीओज बघायला. फार गोड वाटली लिझीकी, घर आणि परिसर सर्वच. छान ओळख करून दिलीस. मला माहिती नव्हती ही.

मी बघते आपल्याकडेपण शेतातल्या भाज्या, मिरच्या घेऊन चूल पेटवून स्वयंपाक करतात. हल्ली असे छोटे छोटे व्हिडीओज आहेत. आता कोकणात गेलं की एक आमच्या घरचा पण करायला हवा. अशाच भाज्या, मिरच्या खुडून आणतो आम्ही ताज्या ताज्या. फणसाच्या दिवसांत फणस कापण्यापासून भाजी करेपर्यंत एक माहोल असतो, मागे एक केलेला.

ती लिझीकी वरून गरम तेल ओतते ते आपल्याकडे वरून फोडणी घालतो आपण त्याला रिलेट झालं एकदम. आता बघेन तिचे व्हिडीओज. चूल आवडली मला त्यांची, उभ्याने स्वयंपाक करता येतो. अशी मी tv वर रवींद्रनाथ टागोर यांचे घर दाखवलेलं जुने, त्यात बघितलेली, उभ्याने स्वयंपाक करायची.

मी एक विडीओ पाहिला.
काही विशेष आवडला नाही. सारखंच बघत रहावं असंही काही वाटलं नाही.
सगळं विडीओ करायचा म्हणून करतेय असं वाटत राहिलं. स्क्रिप्टेड.

मी बघितला काल विडीओ. तिची बाग, वाफे, सभोवतालचे जंगल छान आहे. ती तिच्या शेतीबद्द्ल , स्वयंपाकाबद्द्ल, बागकामाबद्दल बोलली असती तर मला जास्त आवडले असते. मे बी मला विक्टरी गार्डन आणि तत्सम पब्लिक टेलिविजन शोजची सवय असल्याने असेल, पण ती न बोलता काम करत रहाते आणि आपण नुसते बघायचे हे नाही झेपले. डोळ्याला सुखद फ्रेम्स, जोडीला शांत संगीत आहे पण एकंदरीत मला ते एअरब्रश केलेला मॉडेलच्या फोटोसारखे वाटले. निसर्गासोबत रहाताना सगळे असे सातत्याने सुखद, परीपूर्ण कधीच नसते पण त्याच वेळी तिला तिचा टार्गेटेड ऑडिअन्स कोण हे पक्के माहित आहे , तिला एवढे लोकं सबस्क्राईब करत आहेत हे बघून तिच्या हुशारीचे कौतुकही वाटले.

लोक उद्या वसंतराव देशपांडेंचं गाणं ऐकून देखील म्हणतील असा २४ तास चांगला आवाजात कोणीही बोलत नाही. सगळ्यांना ढेकर येतात!

मामी सुंदर विदियोज. एकदम स्पा म्युझिक असतं तसं शांत वाटलं. ते मेड अप आहे वगैरे इथल्या कॉमेंट्स वाचून वाटलं की मग काय फरक पडतो? तसंही ती इतर वेळी काय करते हे बघून आपण काय करणार? रेसिपिज चे अनेक चॅनल्स आहेतच. हे कॉम्बो मला एक सायलेंट गोष्ट वाटली. आपण गुंतून जावं अशी.
अनेकांप्रमाणे मला पण गुड अर्थ आठवली. पाडस पण आठवली. शांत , स्वच्छ जगण्या खाण्याची वर्णनं ही एक ट्रीट असते. ती खरी खोटी मेड्प याने काय फरक पडतो. स्टोरी म्हण्जे एडिटेड आयुष्यच. सगळं सांगितलं तर संगती हरवेलच.
बिंज नाही करणार पण छान शांत वाटावं वाटत असेल तेंव्हा बघेनच.
असाच एक मराठी विदियो पण दिसला यु ट्युब वर.
https://www.youtube.com/watch?v=7tgvOvimA3I

चिडकू, माणूस आहे तर त्याला देहधर्म असणारच! मी गाणं ऐकायला जाते तेव्हा देखील क्वचित मैफल तितकीशी रंगली नाही, आवाज थोडा त्रास देत होता असे होते आणि मला ते चालते. मला निसर्गा सोबतचे जगणेही त्यातल्या चार पावले पुढे, दोन पावले मागे सह आवडते . तिचा टार्गेटेड ऑडियन्स मी नाही, एवढेच.

मामी खरं तर मला खुसपटं काढायची नव्हती. या व्हिडिओचा येथे उल्लेख केल्याबद्दल आभार. खूप मेडिटेटिव्ह व्हिडिओ आहे. संगीतही शांतवणारं आहे.
______
सांगायचा मुद्दा हाच की कोणतेही मेडिटेटिव्ह टेक्निक अवलंबताना, आपण वेळचा अपव्यय करत आहोत असे उगाचच वाटते. काल मी एक टेड टॉक पाहीला ज्यात एका संशोधक्/प्राणीतज्ञाने 'स्लॉथ' नावाच्या भयानक म्हणजे अतोनात मंद प्राण्याबद्दल माहीती दिली ज्यात ती संशोधक म्हणते, आपण माणसं 'इन्स्टन्ट ग्रॅटिफिकेशन/ वेग/घाई-घाई' ला इतके सरावलो आहोत की आपण दर्ज्यापेक्षा सोयीला प्राधान्य देतो. जरा मंदावलं की आपल्याला गुन्हेगारीची भावना येते. स्लॉथ या प्राण्याकडून आपल्याला खूप शिकण्यासारखे आहे. Slow down!! Embrace your 'Inner sloth' Happy हा तो व्हिडिओ - https://www.ted.com/talks/lucy_cooke_sloths_the_strange_life_of_the_worl...
__________________
मला तो संदेश इतका आवडला. खरच असे संथ , शांत आयुष्य जगले पाहीजे. सततची धावधाव, रश, घाई टाळून कधीतरी अशा सुंदर व्हिडिओजकरता वेळ काढला पाहीजे. असो. आशा करते की मला काय म्हणायचे आहे ते लक्षात आले असेल. Happy

कमेंट बघुन काय बोलाव कळत नाही. इतका सुंडर व्हिडिओ , तिचे कष्ट , तिचं पर्फेक्ट भाज्या कापण , तिच निसर्गावरच प्रेम, तिच प्लॅस्टीक अजिब्बत न वापरण, तिची कलाकुसर, तिची अगदी साध्या रोजच्या गोष्टी कित्ती सुरेख पद्धतीने करता येतात हे दाखविण , कमी साधन सामग्रीमध्ये सगळ बनविणे ( एका ठिकाणि ती पत्रा घेते. भोक पाडते आणि त्याची किसणी बनवते .) हे सगळ बघायच , त्यावरून स्फुर्ती घ्यायची . कंपॅरिजन ,अ‍ॅप्रुव्हल वगैरे कुठून आल यात ?
मी खुप दिवसापासून (थँक्स टु रैना. तिने ओळख करुन दिली या व्हिडिओची) हे व्हिडिओ फॉलो करत आहे. हे काहीही डोक्यात पण आल नव्हत. तिच्या सारखा चाकु आणला आणि भाज्या मात्र तिच्यासारख्या कापायचा प्रयत्न करुन मात्र बघितला. Happy
तिच्यासारख काहीही करून बघितलच पाहिजे वगैरे अज्जिब्बात उद्देश्य नाही पण त्या व्हिडिओ बघण्याचा मुळ उद्देश्य माझ्यासाठी तरी , दररोजच्या साध्या गोष्टीत सुद्धा कशा देखण्या करता येवू शकतात (सुखद , चकचकित व्हिडिओ सारखच ते दिसल पाहिजे अस नाही) . आई चपाती लाटताना तीची लय, आजी कपडे वाळत घालताना आपोआपच कसे नीटनेटके घाली, आत्या कोबीची भाजी एकसारखी कापुन कशी सुरेख भाजी करते, मैत्रिण हाताने करंजी इतकी सुरेख दुमडते कि खाण्याच्या अगोदर ती बघावीशी वाटते दहा सेकंद हे सगळ आठवल.
अगदी न आवडणार काम सुद्धा देखणं करता आल तर त्याचा आनंद घेता येतो अस वाटल.

अगदी न आवडणार काम सुद्धा देखणं करता आल तर त्याचा आनंद घेता येतो अस वाटल.
नवीन Submitted by सीमा on 16 September, 2019 - +१११
मी स्लॉथ पेक्षा जास्त संथ आयुष्य जगतो. शहरात तर जावेसेच वाटत नाही.

मामी छान ओळख व लेख. मी बघेन. मला काम करताना काहीतरी लागते बघायला. मला अशी जीवन शैली पण चालेल. खूप दिवसांनी काही लिहिलेस. अजून लिहीत जा बघू.

चिनी खेड्यातील वातावरण व ग्रामीण जीवनावर डे हाँग कादंबरी पूर्वी वाचलेली आहे. असे जीवन आता जपले नाहीतर काही पिढ्यांत नाहीसे होउन जाईल. त्यामुळे बघून ठेवावे .

आमची जागू पण अश्याच अस्सल भारतीय गोष्टी करते की, व्हिडीओ बनवत नाही एवढंच!

आमच्या घरी जेवण हा प्रिय विषय आहे. दाखवतेच आज घरी सगळ्यांना. घटकाभर विरंगुळा!

हा व्हिडिओ काल बघितला.

https://youtu.be/Jt_66qXys10

हे फळ तिथले स्थानिक आहे. आपल्या कोकमाची आठवण झाली.

डियांशीचे विडिओ मला जास्त आवडतात. ती एकदम घरगुती मुलगी वाटते. यात तिच्या किचनमध्ये मागे जी बांबूची मांडणी आहे, ज्यावर तिच्या बरण्या बसलेल्या असतात तिच्याही मी प्रेमात आहे Happy बांबूच्या इतर वस्तूही खूप छान आहेत.

विडिओमधून हे जे बरेच काही जग दिसते त्यासाठी मी हे विडिओ बघते.

मामी, हीची ओळख करुन दिल्याबद्दल आभारी आहे. खूप छान आहे लिझीकी Happy

मला सून म्हणून आवडेल ही मुलगी! Happy

साधना, देवांशीचे ( Lol ) विडिओ बघितले नाहीत. बघेन.

मला खरंतर लिझिकी पूर्णपणे कामात मग्न असते आणि अगदी शांत, न बोलता कामं करते ते आवडतं. माइंडफुलनेस दिसतो तिच्या कामात.

साधना, मस्त आहे तो व्हिडीओ. त्यांचं घर आंगण पण मस्त आहे प्रशस्त.

मामी आणि साधना दोघींनी छान ओळख करुन दिली. मजा वाटते बघायला.

काल मी देवांशीचा एक एपिसोड नेटानं पाहिला पण तिचं पांढर्‍या रंगाच्या चकचकीत टाईल्स लावलेल्या चुलाणानं आणि अ‍ॅल्युमिनियमच्या वोकनं खचून गेले.

मामी, साधना यांचे व्हिडीओज बघितल्यावर आता आपोआप दुसरे त्या टाईपचे व्हिडीओज दिसायला लागले. आता प्रकर्षाने वाटायला लागलं, यार आपल्या गावचे पण करावेत असे.

https://www.youtube.com/watch?v=2MFrCTgCgdo

हा एक बघितला. किवी फळाचा.

बरं झालं मी हा लेख वाचला.तिचा सर्वात जास्त व्ह्यू असलेला एक व्हिडिओ बघितला.प्रेझेंटेशन, मुलगी, निसर्ग,काम सगळंच गोड.
काय पटापट शेतात भात लावतेय.
काटक आणि मेहनती वाटतेच.

मी तो भातपेरणी, भातलावणीपासून ते भाताचे विविध प्रकार करते लिझीकी, तो व्हिडीओ बघितला. कसला भन्नाट आहे. ती शेवटी दिवा किती छान लावते. कुठले फळ होते ते, त्याच्या सालीत लावते. पपनस वगैरेसारखं वाटलं ते फळ.

मनुष्यबळ मात्र कमी, आपल्याकडे लावणीला वगैरे बरेच जण असतात, शेत लहान असलं तरी. नंतर सुद्धा, त्यामुळे पटापट होतं. ह्या लोकांना भात झोडपणी करायला खूप वेळ लागला, माणसं कमी असल्याने.

मामी, लिझिकीच्या अद्भूत जगाची ओळख करुन दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ! काहीतरी विलक्षण असं जग आहे हे.... लहानपणी रशियन परीकथा वाचल्या होत्या अगदी तसंच जणू चायनीज परीकथेतलं जग सजीव होऊन साकारल्यासारखं !!
निसर्गसंपन्न परंतु निर्जन परिसर, दिवसाच्या शांततेतली किड्यांची किरकिर, आजूबाजूला घोटाळणारं एखादं झिपरं कुत्रं वा माऊ आणि त्या जगात मूक कार्यमग्नतेने चटचट वावरणारी, अत्यंत काटक आणि चपळतेने कष्टाची कामं लीलया पार पाडणारी, झर्‍याच्या स्वच्छ पाण्यात नितळ पावलं बुडवत अलगद शिंपले वेचणारी, अळंब्या खुडणारी आणि म्हातार्‍या निष्क्रिय आजीसाठी ( सॉरी, परीकथेचा पगडा असल्याने ती आजी अशीच वाटतेय मला Wink ) रुचकर जेवण रांधणारी नाजूक चणीची लिझिकी पाहून सुंदर वासिलिसाच आठवली. विजनवासात राहणारी लिझिकी प्रत्येक बाबतीत स्वयंपूर्ण आहे. द्राक्षांच्या रसाने फिकट जांभळ्या रंगाचे नाजूक झगे स्वतःच बेतून शिवणारी वा आजीसाठी मऊ कापसाची पादत्राणं शिवणारी !
परीकथेतल्या सुंदर चित्रांसारखेच इथे सूर्य चंद्र उगवतात, पानं सळसळतात, ढग आकाशातून तरंगत जातात, ऋतू पालटतात. एकेक फ्रेम सुंदर देखणी, त्याला पूरक असं शांत, किंचित गूढ पार्श्वसंगीत किंवा नीरव शांततेतले केवळ निसर्गाचे किंवा कामं करताना उत्पन्न झालेले हलके नाद.

आपल्या एकविसाव्या शतकातल्या जगापासून पूर्ण अलिप्त असं हे स्वतःतच मग्न जग आहे ( म्हणजे अर्थात तसं भासवलं आहे ). वर कुणीतरी म्हटलंय तसं आपल्या आयुष्याशी त्याची तुलना नाहीच होऊ शकत वा त्या जगाचा भाग व्हावं असंही मला अजिबात वाटलं नाही. हे जग कथांसारखंच आटोपशीर... काही मिनिटांचं. रोज भसाभस व्हिडियो ओतण्याचा हव्यास नाही... महिन्याला तीन चार मोजके व्हिडियो ( अजूनतरी असंच दिसतंय आणि ते असंच राहावं नाहीतर त्यातलं अप्रूप ओसरेल ) ते फक्त अनुभवावं, पाहताना डोळ्यांत, मनात भरुन घ्यावं, नंतर कधीमधी(च) आठवावं ... बस्स, इतकंच !

किती मस्त लिहिलंयस अगो. अगदी नेमकं हेच मनात येतं. आपल्याला जे शक्य नाही असं कल्पनातीत सुंदर आयुष्य जगते आहे लिझिकी. ते थोडं खरं आणि बरचसं भासमय असेलही. पण तू म्हणतीयेस तशी ती परीकथा आहे नक्कीच.

Pages