लिझीकीचे जग

Submitted by मामी on 13 September, 2019 - 12:22

लीझीकी (Li Ziqi) - चीनच्या शेझुआन प्रांतातील एका गावात शांत, निसर्गरम्य परिसराच्या सोबतीत राहणारी एक गोडशी मुलगी. तिच्यापेक्षाही गोड असलेल्या आजीबरोबर ती राहते. आजूबाजूला केवळ एक भरभरून देणारा, डोळे निववणारा निसर्ग आहे. या सकस मातीतून पिकवलेल्या ताज्या भाज्या, धान्य, फळं यापासून ती मुलगी काय काय पदार्थ आणि प्रकार बनवते. वेलकम टु लिझीकी चॅनल - हा एक युट्युबवरचा आनंदाचा खजिना आहे आणि ती आहे या चॅनलची अनभिषिक्त राणी. लीझीकीचा एक एपिसोड बघा की तुम्ही तिचे चाहतेच होऊन जाता.

गेल्या दोन वर्षांपूर्वी युट्युबवर आलेली २९ वर्षांची लिझीकी आता खूप प्रसिद्ध युट्युबर आहे. आज तिच्या चॅनलचे ६० लाखांपेक्षाही जास्त चाहते आहेत. पण तिचं बालपण आणि युट्युबवर येण्याआधीचं जीवन खूप खडतर होतं. अगदी लहानपणीच आईवडिलांचा घटस्फोट पाहिलेली, १४व्या वर्षापासून शाळा सोडून देऊन नोकरीला लागलेली, वेळप्रसंगी भुकेली राहलेली, पुलाखाली झोपलेली, पडेल ते काम करणारी अशी ही लिझीकी आजीच्या आजारपणामुळे शहर सोडून गावात आली. तिच्या आजोबांकडून तिनं चीनचं पारंपारीक जेवण, बागकाम, मासेमारी, सुतारकाम, बुरुडकाम अश्या गोष्टी शिकल्या होत्याच. चीनमध्ये युट्युबचं प्रस्थ वाढायला लागल्यावर तिनं तिच्याकडे असलेल्या या खजिन्याचा उपयोग करून व्हिडिओ बनवायला सुरवात केले. हळू हळू तिचे व्हिडिओ लोकांना आवडायला लागले आणि केवळ दोन वर्षांत ती प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन बसलीये. तिनं तिची एक स्टाईल निर्माण केलीये. इतकं असूनही तिनं तिची प्रायव्हसी जपलीये बरं. ती नक्की कुठे राहते हे नेटवर उपलब्ध नाहीये.

लिझीकी नेहमी पारंपारीक तिच्या प्रांतातील पोशाख करून व्हिडिओत दिसते. ते पोशाखही देखणे असतात. तिच्या प्रांतातील चार मोसम तिच्या व्हिडिओंतून बघायला मिळतात. तिच्या घरातील सर्व वस्तू, भांडी, तिची जेवण करण्याची पद्धत एकदम पारंपारीक आहेत. एका दृष्टीनं पाहिलं तर ती तिच्या या व्हिडियोंद्वारे या जुन्या चिनी परंपरांचं डॉक्युमेंटेशन करून एक भरीव कार्यही आपसुकच करत आहे. तिचं ऑनलाईन शॉपही आहे.

ती तिच्या व्हिडिओत सुंदर, नाजूक तर दिसतेच पण त्याचबरोबर काटक आणि मेहनतीही दिसते. जंगलातली, शेतातली, सुतारकामाची कामं करणं सोपं नाही. यामुळेच कदाचित तिला तिचे चाहते 'ब्रदर ली' असंही म्हणतात. तिचं त्या गावात खरंखुरं शेत आहे आणि त्यात ती मका आणि भुईमुग उगवते. शिवाय ती डुकरं आणि रेशमाचे कीडेही पाळते. हा तिचा पारंपारीक व्यवसाय आहे.

तिच्या घराबाहेरच भाज्या धुवायला एक डोणी आहे. त्यावर बांबूमधून पाणी पडतं. भांडी सगळी लाकडी किंवा बीडाची असावीत. बांबूचा तर उपयोग ठायी ठायी दिसतो. सगळं कसं नेटकं, देखणं. दिवस असो वा रात्र, कोणताही ऋतू असो, ही आपली टणटण उड्या मारत काय काय पटापट करत असते. घराच्या परसातल्या बागेतून, बाहेरच्या जंगलातून, तळ्यातून ती कायबाय चटचट तोडते, खुडते, गोळा करते. घरी येऊन लगेच झटपट कामाला लागते. ती फळं साठवते, पीठं करते, वाळवणं घालते, जॅम-जेली-वाईन करते. हे सगळे साठवणीचे पदार्थ. याबरोबरच ती जेवणंही करते. दोघीच तर जेवणार पण तरीही निदान चार प्रकार तर हवेच. सुंदर, सुबक, साधेच असे ते प्रकार असतात. छानश्या भांड्यांतून , प्लेटींतून ती जेवणाच्या लाकडी टेबलावर ते नेते. तिची आजी तिथे बसलेली असतेच. एका सुंदर पंख्यानं वारा घेत. मग दोघी मिळून हसतखेळत त्या जेवणाचा आस्वाद घेतात.

जेवण तरी किती मजेमजेशीर. एका कमळाच्या तळ्यातून तिनं कमळं, त्यांची पानं, त्यांचे देठ आणि त्यांची मूळं आणली आणि काय काय बनवलं. मूळांपासून पीठ केलं, त्या पीठाचं सूप केलं, देठ भाजीला वापरले, पानात गुंडाळून काहीतरी उकडलं आणि कमळाच्या गुलाबी पाकळ्यात काही भाज्या घालून ते रॅप्स बनवून खाल्ले. बघूनही मन तृप्त होतं अगदी. असंच एकदा भोपळ्यापासून अनेक प्रकार केले तिनं. त्यात भोपळ्याच्या मॅशला दोरे बांधून त्यांना मिनी भोपळ्यांचा आकार दिला. काय देखणं होतं ते. एकदा काय तर सगळे प्रकार मक्यापासून केलेले. असली गुणी मुलगी ना!

तिचं स्वयंपाकघर भारी मस्त. एक छोटुशी शेगडी तर दुसरं एक मोठं चुलाण आहे तिच्या स्वयंपाकघरात. चुलाणाला मागून लाकडं टाकायला जागा आहे. तिची आजी कधीकधी तिथे बसून लाकडं चुलीत सारत असते. त्या चुलाणावर एक भलं मोठं वोक म्हणजे कढई असते. त्यात ही सुगरण निगुतीनं जेवण बनवते. तिच्याकडे खूप खाद्यपदार्थ उकडलेलेही बनतात. त्यासाठी एक बांबूचा पारंपारीक स्टीमर आहे. तो ती त्याच वोकवर ठेऊन वापरते. तिच्याकडे घराबाहेर एक भट्टी/आवनही आहे. त्यातही काय काय भाजते ती.

तिच्या व्हिडिओजमधली अगदी प्रत्येक फ्रेम देखणी. सुर्योदय, सूर्यास्त, तार्‍यांनी खचाखच भरलेलं रात्रीचं आकाश, बर्फ, विविध झाडं, फळं, भाज्या, फुलं, प्राणी आणि स्वतः लिझीकी असं सगळं कसं मिळून आलेलं असतं. किती रंग असतात आणि ऋतुप्रमाणे बदलतातही. पण सगळं कसं आदब राखून, अजिबात उथळपणा नाही तिथं. मागे एक अत्यंत शांतवणारं हलकं संगीत सुरू असतं. तिच्या रोजच्या कामाच्या निमित्तानं होणार्‍या आवाजांनाही एक सुंदर नाद आहे. पाण्याचे, भांड्याचे, झाकणांचे आवाज, बांबूच्या गोल परातीत बिया सुकवायला टाकते, त्या सुकलेल्या बिया बरणीत ओतते ते आवाजही निव्वळ आनंददायी.

शिवाय आपल्याला न कळणारं आजी आणि नातीचं बोलणं, त्यांचं खळखळून हसणं इतकंच असतं. संवादांची गरज नाही, भाषांतराची गरज नाही. अगदी अलगदपणे त्या हृदयीचे आपल्या हृदयी पाझरत राहतं. एक विलक्षण अनुभव असतो हा. तिच्याच शब्दांत सांगायचं तर Life isn't easy, BUT YOU CAN LIVE WITH YOUR HEART!

*****************************************************
लिझीकी चॅनल : https://www.youtube.com/channel/UCoC47do520os_4DBMEFGg4A
लिझीकीची गोष्ट : https://raknife.com/li-zi-qi/
ऑनलाईन दुकान : https://liziqishop.com/

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

यापूर्वी नेटवर फिरता फिरता हे सापडले होते. ह्या बाईचे व्हिडिओ मला आवडले.भरपूर पाहिले.
https://www.google.com/imgres?imgurl=https%3A%2F%2Fi.ytimg.com%2Fvi%2FVN...

बरेच जणांचे व्हिडियो पाहिले.एक पाकिस्तानी बुवा जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी बिस्मिल्लाह ए रहीम म्हणून पुढे चालू करायचा.त्याची मातीची भांडी मस्त दिसायची.

Submitted by मामी on 5 October, 2019 - 13:54, मामी मस्त व्हिडियेयो आहे हा.तिचा सुगरणपणा,कलात्मकता लाजवाब!

मी पाहिलं हे. ली झिकी व्हिडीओ ब्लोगर आहे. तिची वेब साइट. व इन्स्टा अकाउंट आहे. आणी त्या साइट वर माल विकायला पण आहे. कपडे प्रोडक्ट्स आणि अ‍ॅक्सेसरीज अन्न पदार्थ. हा एक चांगला प्रो ड्युस्ड व्हिडीओ ब्लोग आहे. चिनी सरकारचे प्रयत्न चालू असतात स्वतः बद्दल माहिती देण्याचे त्यातले हे सरकारी अ‍ॅप्रुव्ड असणार. खरी खेड्यातली परिस्थिती इतकी गोंडस नसते, व नाही पण पण चीन देश खरेच अतिशय नैसर्गिक सौंदर्याने नटलेला व वैविध्यतेने परिपूर्ण आहे. नव्या नव्या पारंपारिक रेसीपी समजत आहेत. व मला पण तिचे मर्च घ्ययला आव्डेलच. इस्टा वर पण तिला फॉलो करणार् आहे. ह्या मागे एक मेहनती मोठी तांत्रिक टीम आहे पोस्ट प्रॉडक्षन वर्क आहे व लुक अचीव्ह केला आहे मेहनतीने. त्यांचा ही तिच्या यशात भाग आहे. वापरलेली भांडी कटलरी पण उपलब्ध आहे असावी विकाय्ला.

मस्तच आहेत भांडी. चिकनचे पदार्थ करू शकतो पोर्क घरी आणले नाही अजून.

एक व्हिडिओ पहिला तो नेमका भोपळा वाला निघाला. छान आहे .
मला प्रश्न आहे की ही व्हिडियोग्राफी एकदम छान आहे, ती कोण करतं आणि त्याचं फंडिंग कोण करतं? कारण एक मिल व्हिडिओमध्ये दाखवलं असलं तरी त्याच्या आधीचे प्रिपरेशनचे शूट एका दिवसात केलेले नाहीये. एडिटिंग पण छान आहे.

हो लिझिकीचे व्हिडिओ हे एका टीम चे प्रोफेशनल प्रॉडक्ट आहे असेच दिसते. पण जे आहे ते सुरेख जमलेय. आणि ते एडिटेड फूटेज असते हे नक्कीच. ती कॉर्न किंवा बांबू शूट्स किंवा फळे वगैरे चे अनेक प्रकार बनवताना एकाच व्हिडिओत दिसत असले तरी त्याला बरेच दिवस लागलेले असतात. काही गोष्टी नुस्त्या जमा करून धुवून प्रोसेस करणे यात पण दिवस च्या दिवस लागत असतील. नंतर ते वाळवायचे, खारवायचे वगैरे. त्या व्हिडिओत दिसतेही की अमूक दिवस वाळवा, तमूक दिवस फर्मेन्ट करा वगैरे, शेवटी त्या दोघी ते सर्व एकत्र चाखताना दिसत असल्या तरी ते मील त्याच दिवशी बनवलेले नसते हे लक्षात येते.
खरी गावरान चव चॅनल छान आहे. खारे वांगे वाल्या सासू - सून किंवा ज्या दोघी आहेत त्या आवडल्या मला. आजी तर काय ठसक्यात बोलते!! रेसिपीऑथेन्टिक आणि त्यांचे करणे पण पण स्वच्छ सुंदर दिसते. तसे त्या सिन्थेटिक साडीवाल्या बाईचे नाही. तिचे स्वयंपाकघर गलिच्छ आणि करणे पण अनअपेटायजिंग वाटले मला!

अगो, किती सुरेख लिहिलयस!
लिझिकी बद्दल https://raknife.com/li-zi-qi/ या दुव्यात बरीच माहिती दिलेय. खूप खडतर वाटचाल करत तिने मिळवलेले यश खूप कौतुकास्पद आहे.
इथे सुचवलेले इतर चिनी vlogs देखील बघितले पण एक -दोन एपिसोड्स बघितल्यावर इंटरेस्ट उडाला. कदाचित हाताशी मोजका वेळ आहे आणि कंटेंट माझ्यासाठी तितकासा रिलिवंट नाही म्हणून असे झाले असावे.
गावरानच्या दुव्यासाठी धन्यवाद! मला आवडला हा vlog. त्यातले साधेसुधे मराठी आणि सहज करुन बघता येतील अशा पाकृ छान वाटल्या.

एक बाई आणि एक आज्जी शेतातल्या भाज्या वगैरे घेऊन, त्याचे पदार्थ करतात. आजीबाई जास्त काम करतात, दुसऱ्या बाई बोलत असतात जास्त. त्यातले खारे वांगे हा प्रकार आवडलेला मला, करून बघणार आहे. तो मिळाला तर पोस्ट करते इथे.>>>>
नाही ग अंजु तस नाही ते. सुरुवातीला फक्त त्या काकीच होत्या. आजींना एकक्दा आण्लं आणि लोकांना त्या प्रचंड आवडल्या. मग आजी रेग्युलर झाल्या. पण मग लोक त्यालाही शंका काढु लागली कि आजीनांच जास्त काम लावतात. Happy बाकीच दुसर्‍या पेजवर लिहिते. इथे बाफ हायजॅक केल्यासारख वाटेल.

नाही ग अंजु तस नाही ते. सुरुवातीला फक्त त्या काकीच होत्या. आजींना एकक्दा आण्लं आणि लोकांना त्या प्रचंड आवडल्या. मग आजी रेग्युलर झाल्या. पण मग लोक त्यालाही शंका काढु लागली कि आजीनांच जास्त काम लावतात. >>> अच्छा असं झालं का, thank u हे सांगितल्याबद्दल . खालच्या कमेंट्स मी फार क्वचित वाचते. एकदोन vlog एकट्या त्या ताईंचे बघितले आहेत बहुतेक. पिठलं का झुणका त्यांच्या एकट्याचा आहे.

https://www.youtube.com/watch?v=JP97SFufw4Q

हा एक छान आहे. छोटी मुलं गोड आहेत. आईने ग्लोव्ज घातलेत, मुलांनी नाही. आपल्याकडे तसे शेतात काम करताना ग्लोव्ज वगैरे घालत नाहीत. त्यामुळे त्यांचे थोडं वेगळं वाटतं. हे बटाटे काढतानाचे फोटो आहेत. त्यांचे फावडे लांब दांड्याचं असते, हे काटे असलेलं आहे, बटाटे काढण्यासाठी योग्य वाटलं. मुलं छान एन्जॉय करतायेत मातीत खेळणे, पाण्यात खेळणे. त्यांच्या आईने खूप वजन उचललं शेवटी. त्यांचे घर म्हणजे आधुनिक बंगला वाटतोय.

बाकीच दुसर्‍या पेजवर लिहिते. इथे बाफ हायजॅक केल्यासारख वाटेल. >> सीमा, लिही गं बिन्दास. असा काय मोठा रिसर्च पेपर लिहिलाय इथे मी. असल्या व्हिडिओज बद्दलच तर चर्चा करतोय. लिही तू आजीबाईंबद्दल.

आपल्याकडे तसे शेतात काम करताना ग्लोव्ज वगैरे घालत नाहीत. त्यामुळे त्यांचे थोडं वेगळं वाटतं. >> अहो ते खरे शेतकरी नसतील अ‍ॅक्टर असतील खरा शेतकरी बाई किंवा पुरु ष इतका गोरा गोमटा क्युट टीव्हीवर्धी दिसत नाही. डोळ्या भोवती सुरकुत्या असतात. अंग चिपडलेले मेहनत करून. व्हिजुअल कल्चर वेगळे बनवलेले गेलेले असते.

@सामो
मामी हे बघ - https://www.youtube.com/watch?v=8UYcbAP5TQw
हे आवाज ऐकायचे, व्हिडीओ पहायचे. >> मला नाही हा भावला, सामो.

रच्याकने, तू उरलेला सा का नाही लावत नावाच्या शेवटी? Wink

https://www.youtube.com/watch?v=-xF4v5lU5hA

जपानमधली कोबी शेती. यांची मशिनरी कसली सॉलिड आहे पेरणी, काढणीसाठीची. हे व्हिडीओज बघताना मी आवाज mute ठेवते.

https://www.youtube.com/watch?v=9eF0bM1KGyA

हा मात्र मला फारसा नाही आवडला. ही आंब्याची झाडं polyhouse मध्ये का ग्रीनहाऊस म्हणायचं याला, इथली नाही आवडली. ओपन हवीत आंब्याची झाडे आणि विशिष्ट अंतर हवं त्यात. आपल्याकडचीच मस्त वाटतात.

ओळख आवडली. बघेनच हे विडिओज.
---
प्रतिसादही सर्व वाचले.
----
Nhk world channel आहे जपानचं. त्यावर खूप कार्यक्रम चालू असतात.
At Home with Venetia हा आठवड्यातून एकदा असतो. त्याचे विडिओ कुणी युट्युबवर टाकतात ते पाहा. वेनेशिया इंग्लडमधून इथे जपानमध्ये इंग्रजी शिकवायला आली. तिचे लग्न एका जपानी फोटोग्राफरशी झाले आहे. ती ( आता ६०+) स्वत:च्या गार्डनींगची ओळख करून देतानाच गावातल्या इतर जपानी कलाकार कुटुंबाची,व्यवसायाच,,कलेची ओळख करून देते. सगळं खरंखुरं आहे.
तिच्याकडे जुन्या डायरीमध्ये फोटो चिकटवून सगळं लिहिलेलं आहे. मुलीला कर्करोगामुळे शहरात राहावे लागते. नातवंडं कधी येतात. एका एपिसोडमध्ये एक ओळख असते.
------
ओस्ट्रेलियाच्या ABC channel वरही मजेदार कार्यक्रम असतात. आता तो चानेल माझ्याकडे लागत नाही. पण काही विडिओ युट्युबवर असतात. Bondi vet ( बोन्डाइ वेट.) हा एक पाळीव प्राण्यांच्या उपचारावर आहे.

-----------
Terrace garden - by Laal Garden हे बंगळुरुच्या मुलीचे गच्चीवरची बाग विडिओ पाहा. खास करून how to grow rice in a contener. चार महिन्याचा विडिओ जोडून बनवला आहे. प्रामाणिक विडिओ माहिती.

https://www.youtube.com/watch?v=UF2zR4eWxMo

हा कोकणातला, कुडाळजवळचा पारंपारीक काजू कारखाना. फार पूर्वी tv वर पण आमची माती आमची माणसे मध्ये बघितलेला काजू कारखाना असं आठवतय . आधुनिकही आता असतील म्हणा. इथे काजू वरून खाली येतात भाजण्यासाठी ते बघायला नाही मिळाले मात्र. पहाटे करतात ते.

https://www.youtube.com/watch?v=jlALCnMCsak

हा आधुनिक मंगलोरचा.

Village Cooking Channel : https://www.youtube.com/channel/UCk3JZr7eS3pg5AGEvBdEvFg हे एक अस्सल भारतीय ( दाक्षिणात्य - बहुतेक तमिळ) चॅनेल मिळालं. हे लिझिकीच्या खूप जवळ जातं. हिरव्यागार शेतातील अगदी निसर्गरम्य परिसरात ५-६ पुरुष भल्या मोठ्या प्रमाणात गावाकरता जेवण करतात. चुलीवर. सर्व मसाले वगैरे पाट्यावर वाटून, पाटाच्या पाण्यात भाज्या, मांस, मासे धुऊन वगैरे. धुताना एकमेकांच्या अंगावर पाणीदेखिल उडवतात. मस्त हसत खेळत स्वयंपाक करतात. या चॅनेलमधेही भाज्या चिरण्याचा, वाटतानाचा, भाज्या धुतानाचा वगैरे आवाज मस्त आहेत.

मी ३-४ च व्हिडिओ पाहिलेत पण मजा आली. व्हिडिओची सुरवात तर थेट लिझिकीसारखी. कोणतीतरी सुरेखशी हिरवीगार फ्रेम आणि मागे पक्ष्यांचे मधूर आवाज. मग हे सगळे मिळून त्या त्या जेवणाचे सगळे जिन्नस घेऊन येतात आणि आपल्याशी कायबाय बोलतात. चॅनल सबस्क्राईब करा वगैरे टाईप. या घोळक्यातले एक काका मस्त मजेशीर आहेत. अन्न शिजवायला घेतलं की त्या भल्यामोठ्या भांड्यांत भला मोठा चमचा, कालथा घेऊन एकजण परतायला, ढवळायला उभा असतो. एकजण कापलेल्या वस्तू घेऊन भांड्यात एकामागोमाग एक घालतो. त्यातल्या त्यात हलक्या वस्तू म्हणजे तेल, मीठ, मसाले वगैरे हे काका घालतात. घालताना त्या त्या जिन्नसांची नावं मोठ्यानं अनाउन्स करतात. भाज्या वगैरे ची पण नावं मोठ्यानं अनाउन्स करतात.

नंतर हे सगळे आणि बरोबर काही लहान मुलं, म्हातार्‍या बायका वगैरे जेवतात - केळीच्या पानावर. मग एका हॉलमध्ये गावातील (बहुतेक गरीब असावीत किंवा एखाद्या आश्रमातील असावीत) काही लोकांना जेवायला देतात.

वानगीदाखल, https://www.youtube.com/watch?v=8snZfekKvig : सुरणाचे अनेक कंद जमिनीतून काढून, धुऊन त्यातील काहींची आमटी, काहींचे मसाला लावून तळलेले काप आणि काही सुरणांचे चिप्स केले.

https://www.youtube.com/watch?v=YDw2TkCmXgQ हा एक आहे भरपूर भाज्या घालून केलेल्या सांबाराचा.

यांचे नॉनव्हेज जेवणाचे व्हिडिओ जरा अंगावर येतात. त्यामुळे ते आपापल्या जबाबदारीवर पहावेत.

यांचे नॉनव्हेज जेवणाचे व्हिडिओ जरा अंगावर येतात. त्यामुळे ते आपापल्या जबाबदारीवर पहावेत. >>> हे सांगितलंस ते बरं झालं. मी गावरानमधे पण नॉनव्हेज असलेले बघत नाही.

मुगाच्या कोंबांचा आणि हर्बल टीचे व्हीडीओ पाहिले. मस्त आहेत.
हिने चीनमध्ये जाणार्‍या पर्यटकांमध्ये लक्षणीय वाढ केली असणार.

Pages