लीझीकी (Li Ziqi) - चीनच्या शेझुआन प्रांतातील एका गावात शांत, निसर्गरम्य परिसराच्या सोबतीत राहणारी एक गोडशी मुलगी. तिच्यापेक्षाही गोड असलेल्या आजीबरोबर ती राहते. आजूबाजूला केवळ एक भरभरून देणारा, डोळे निववणारा निसर्ग आहे. या सकस मातीतून पिकवलेल्या ताज्या भाज्या, धान्य, फळं यापासून ती मुलगी काय काय पदार्थ आणि प्रकार बनवते. वेलकम टु लिझीकी चॅनल - हा एक युट्युबवरचा आनंदाचा खजिना आहे आणि ती आहे या चॅनलची अनभिषिक्त राणी. लीझीकीचा एक एपिसोड बघा की तुम्ही तिचे चाहतेच होऊन जाता.
गेल्या दोन वर्षांपूर्वी युट्युबवर आलेली २९ वर्षांची लिझीकी आता खूप प्रसिद्ध युट्युबर आहे. आज तिच्या चॅनलचे ६० लाखांपेक्षाही जास्त चाहते आहेत. पण तिचं बालपण आणि युट्युबवर येण्याआधीचं जीवन खूप खडतर होतं. अगदी लहानपणीच आईवडिलांचा घटस्फोट पाहिलेली, १४व्या वर्षापासून शाळा सोडून देऊन नोकरीला लागलेली, वेळप्रसंगी भुकेली राहलेली, पुलाखाली झोपलेली, पडेल ते काम करणारी अशी ही लिझीकी आजीच्या आजारपणामुळे शहर सोडून गावात आली. तिच्या आजोबांकडून तिनं चीनचं पारंपारीक जेवण, बागकाम, मासेमारी, सुतारकाम, बुरुडकाम अश्या गोष्टी शिकल्या होत्याच. चीनमध्ये युट्युबचं प्रस्थ वाढायला लागल्यावर तिनं तिच्याकडे असलेल्या या खजिन्याचा उपयोग करून व्हिडिओ बनवायला सुरवात केले. हळू हळू तिचे व्हिडिओ लोकांना आवडायला लागले आणि केवळ दोन वर्षांत ती प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन बसलीये. तिनं तिची एक स्टाईल निर्माण केलीये. इतकं असूनही तिनं तिची प्रायव्हसी जपलीये बरं. ती नक्की कुठे राहते हे नेटवर उपलब्ध नाहीये.
लिझीकी नेहमी पारंपारीक तिच्या प्रांतातील पोशाख करून व्हिडिओत दिसते. ते पोशाखही देखणे असतात. तिच्या प्रांतातील चार मोसम तिच्या व्हिडिओंतून बघायला मिळतात. तिच्या घरातील सर्व वस्तू, भांडी, तिची जेवण करण्याची पद्धत एकदम पारंपारीक आहेत. एका दृष्टीनं पाहिलं तर ती तिच्या या व्हिडियोंद्वारे या जुन्या चिनी परंपरांचं डॉक्युमेंटेशन करून एक भरीव कार्यही आपसुकच करत आहे. तिचं ऑनलाईन शॉपही आहे.
ती तिच्या व्हिडिओत सुंदर, नाजूक तर दिसतेच पण त्याचबरोबर काटक आणि मेहनतीही दिसते. जंगलातली, शेतातली, सुतारकामाची कामं करणं सोपं नाही. यामुळेच कदाचित तिला तिचे चाहते 'ब्रदर ली' असंही म्हणतात. तिचं त्या गावात खरंखुरं शेत आहे आणि त्यात ती मका आणि भुईमुग उगवते. शिवाय ती डुकरं आणि रेशमाचे कीडेही पाळते. हा तिचा पारंपारीक व्यवसाय आहे.
तिच्या घराबाहेरच भाज्या धुवायला एक डोणी आहे. त्यावर बांबूमधून पाणी पडतं. भांडी सगळी लाकडी किंवा बीडाची असावीत. बांबूचा तर उपयोग ठायी ठायी दिसतो. सगळं कसं नेटकं, देखणं. दिवस असो वा रात्र, कोणताही ऋतू असो, ही आपली टणटण उड्या मारत काय काय पटापट करत असते. घराच्या परसातल्या बागेतून, बाहेरच्या जंगलातून, तळ्यातून ती कायबाय चटचट तोडते, खुडते, गोळा करते. घरी येऊन लगेच झटपट कामाला लागते. ती फळं साठवते, पीठं करते, वाळवणं घालते, जॅम-जेली-वाईन करते. हे सगळे साठवणीचे पदार्थ. याबरोबरच ती जेवणंही करते. दोघीच तर जेवणार पण तरीही निदान चार प्रकार तर हवेच. सुंदर, सुबक, साधेच असे ते प्रकार असतात. छानश्या भांड्यांतून , प्लेटींतून ती जेवणाच्या लाकडी टेबलावर ते नेते. तिची आजी तिथे बसलेली असतेच. एका सुंदर पंख्यानं वारा घेत. मग दोघी मिळून हसतखेळत त्या जेवणाचा आस्वाद घेतात.
जेवण तरी किती मजेमजेशीर. एका कमळाच्या तळ्यातून तिनं कमळं, त्यांची पानं, त्यांचे देठ आणि त्यांची मूळं आणली आणि काय काय बनवलं. मूळांपासून पीठ केलं, त्या पीठाचं सूप केलं, देठ भाजीला वापरले, पानात गुंडाळून काहीतरी उकडलं आणि कमळाच्या गुलाबी पाकळ्यात काही भाज्या घालून ते रॅप्स बनवून खाल्ले. बघूनही मन तृप्त होतं अगदी. असंच एकदा भोपळ्यापासून अनेक प्रकार केले तिनं. त्यात भोपळ्याच्या मॅशला दोरे बांधून त्यांना मिनी भोपळ्यांचा आकार दिला. काय देखणं होतं ते. एकदा काय तर सगळे प्रकार मक्यापासून केलेले. असली गुणी मुलगी ना!
तिचं स्वयंपाकघर भारी मस्त. एक छोटुशी शेगडी तर दुसरं एक मोठं चुलाण आहे तिच्या स्वयंपाकघरात. चुलाणाला मागून लाकडं टाकायला जागा आहे. तिची आजी कधीकधी तिथे बसून लाकडं चुलीत सारत असते. त्या चुलाणावर एक भलं मोठं वोक म्हणजे कढई असते. त्यात ही सुगरण निगुतीनं जेवण बनवते. तिच्याकडे खूप खाद्यपदार्थ उकडलेलेही बनतात. त्यासाठी एक बांबूचा पारंपारीक स्टीमर आहे. तो ती त्याच वोकवर ठेऊन वापरते. तिच्याकडे घराबाहेर एक भट्टी/आवनही आहे. त्यातही काय काय भाजते ती.
तिच्या व्हिडिओजमधली अगदी प्रत्येक फ्रेम देखणी. सुर्योदय, सूर्यास्त, तार्यांनी खचाखच भरलेलं रात्रीचं आकाश, बर्फ, विविध झाडं, फळं, भाज्या, फुलं, प्राणी आणि स्वतः लिझीकी असं सगळं कसं मिळून आलेलं असतं. किती रंग असतात आणि ऋतुप्रमाणे बदलतातही. पण सगळं कसं आदब राखून, अजिबात उथळपणा नाही तिथं. मागे एक अत्यंत शांतवणारं हलकं संगीत सुरू असतं. तिच्या रोजच्या कामाच्या निमित्तानं होणार्या आवाजांनाही एक सुंदर नाद आहे. पाण्याचे, भांड्याचे, झाकणांचे आवाज, बांबूच्या गोल परातीत बिया सुकवायला टाकते, त्या सुकलेल्या बिया बरणीत ओतते ते आवाजही निव्वळ आनंददायी.
शिवाय आपल्याला न कळणारं आजी आणि नातीचं बोलणं, त्यांचं खळखळून हसणं इतकंच असतं. संवादांची गरज नाही, भाषांतराची गरज नाही. अगदी अलगदपणे त्या हृदयीचे आपल्या हृदयी पाझरत राहतं. एक विलक्षण अनुभव असतो हा. तिच्याच शब्दांत सांगायचं तर Life isn't easy, BUT YOU CAN LIVE WITH YOUR HEART!
*****************************************************
लिझीकी चॅनल : https://www.youtube.com/channel/UCoC47do520os_4DBMEFGg4A
लिझीकीची गोष्ट : https://raknife.com/li-zi-qi/
ऑनलाईन दुकान : https://liziqishop.com/
Wow. I love liziki very
Wow. I love liziki very calming. Yes guilt free watch.
लिझिकीचा कालचा विडिओ बघितला.
लिझिकीचा कालचा विडिओ बघितला. छान आहे पण आता ती सुरवातीची गंमत निघुन गेली. सुरवातीची साधी व नंतरची पॉलिश्ड ली पाहताना तेव्हाच गंमत गेली होती.. ती कामे एकट्याची नाहीत, फुलांना इतका बहर की कसली जादु आहे ते कळत नाही. तरी टाईमपास म्हणुन ठिक … वेळ असेल तर नक्की पाहता येईल.
इथल्या माझ्या जुन्या कमेंटी वाचुन मलाच गंमत वाटली. मी इतके यु ट्युब विडिओ पाहत होते?? असे वाटले. कित्येक चॅनेल्स विस्मरणात गेलेत. आता काहीच पाहवत नाही, तितका वेळही आता नाही.
अरे वाह !! आता बघेन अधून मधून
अरे वाह !! आता बघेन अधून मधून पुन्हा
सुरवातीची साधी व नंतरची
सुरवातीची साधी व नंतरची पॉलिश्ड ली पाहताना तेव्हाच गंमत गेली होती.. ती कामे एकट्याची नाहीत, फुलांना इतका........ +१.
नंतर तिच्यापेक्षा दियांशी की कोण ती जास्त आवडतं होती.नंतर सगळ्यांचाच कंटाळा आला.
इतके यु ट्युब विडिओ पाहत होते?? असे वाटले. कित्येक चॅनेल्स विस्मरणात गेलेत. आता काहीच पाहवत नाही, तितका वेळही आता नाही....प्रचंड अनुमोदन!
For Everyone Who Knows My
For Everyone Who Knows My Name.丨Liziqi Channel : https://www.youtube.com/watch?v=8Cg3p9K0il4
या व्हिडिओत लिझिकीने पियानोवर गाणं गायलं आहे. अर्थात तिने स्वत: गायलंय की कसं ते माहीत नाही. पण ते गाणं फारच परिणामकारक पक्षी इमोशनल झालंय. लिझिकीचे आजीसोबतच्या शॉटसचा कोलाज आहे यात.
या व्हिडिओत कोणीतरी प्रतिसादात लिहिलंय की
For the international fans who haven't kept up with Liziqi. She has now won her court case to retain her name and now going solo to promote the videos she had initially intended to show which was purely to show the Chinese way of life, ancient skills and culture. She is no longer going to be forced to do things for the sake of $$. Good for her. I do prefer these natural and inspiring videos more. Wish her the best in her endeavors to follow the path to righteousness and alignment with nature.
अजून एका प्रतिसादात त्या गाण्याबद्दल लिहिलंय
The song’s name is As wished
You are a distant long road,
the light in the fog and mountains.
I am a child, walking in your eyes.
You are the cool breeze and bright moon.
I am the dream you had.
Either meet or not meet you, I will embrace you into my life.
And I will love the world you loved,
Wish for the smile you wished.
I hold your hand and haltingly walk.
Please take me to tomorrow.
If you have suffered from my sweetness,
I wish to live as you wished,
will be regretless, will go courageously,
every day in this great era.
लिझिकीचा तिच्या आजीबरोबरचा प्रवास तसंच तिच्या चाहत्यांचा तिच्यासोबतचा प्रवास ....
मामी, तिने स्वतच गायलंय.
मामी, तिने स्वतच गायलंय. तिच्या पिन्ड कमेंट मध्ये तिने लिहिलेय तसे. छान गायलेय तसे. छान आहे विडिओ.
साधना, ओके. हो छान गायलंय.
साधना, ओके. हो छान गायलंय.
आम्ही पँडेमिकच्या सुरूवातीला
आम्ही पँडेमिकच्या सुरूवातीला लिझिकीचे व्हिडीयो बघायचो. नंतर कंटाळा आला. शिवाय ते सगळं खोटं आहे, चीनी सरकारी प्रपोगंडा छाप व्हिडीयो आहेत ह्याबद्दल एक आर्टीकल वाचल्यावर अजिबात बघणं बंद केलं. हा बाफ बघून पुन्हा चॅनलवर गेलो पण पँडेमिकच्या आठवणींनी बघवेना अजिबात. आता परत नाही जाणार वाट्याला. ही सगळीच चॅनेल नको वाटतायत आता. त्यापेक्षा भारतीय शेफ्सच्या रेसिपीज चे चॅनेल जास्त बरे वाटतात.
Pages