लिझीकीचे जग

Submitted by मामी on 13 September, 2019 - 12:22

लीझीकी (Li Ziqi) - चीनच्या शेझुआन प्रांतातील एका गावात शांत, निसर्गरम्य परिसराच्या सोबतीत राहणारी एक गोडशी मुलगी. तिच्यापेक्षाही गोड असलेल्या आजीबरोबर ती राहते. आजूबाजूला केवळ एक भरभरून देणारा, डोळे निववणारा निसर्ग आहे. या सकस मातीतून पिकवलेल्या ताज्या भाज्या, धान्य, फळं यापासून ती मुलगी काय काय पदार्थ आणि प्रकार बनवते. वेलकम टु लिझीकी चॅनल - हा एक युट्युबवरचा आनंदाचा खजिना आहे आणि ती आहे या चॅनलची अनभिषिक्त राणी. लीझीकीचा एक एपिसोड बघा की तुम्ही तिचे चाहतेच होऊन जाता.

गेल्या दोन वर्षांपूर्वी युट्युबवर आलेली २९ वर्षांची लिझीकी आता खूप प्रसिद्ध युट्युबर आहे. आज तिच्या चॅनलचे ६० लाखांपेक्षाही जास्त चाहते आहेत. पण तिचं बालपण आणि युट्युबवर येण्याआधीचं जीवन खूप खडतर होतं. अगदी लहानपणीच आईवडिलांचा घटस्फोट पाहिलेली, १४व्या वर्षापासून शाळा सोडून देऊन नोकरीला लागलेली, वेळप्रसंगी भुकेली राहलेली, पुलाखाली झोपलेली, पडेल ते काम करणारी अशी ही लिझीकी आजीच्या आजारपणामुळे शहर सोडून गावात आली. तिच्या आजोबांकडून तिनं चीनचं पारंपारीक जेवण, बागकाम, मासेमारी, सुतारकाम, बुरुडकाम अश्या गोष्टी शिकल्या होत्याच. चीनमध्ये युट्युबचं प्रस्थ वाढायला लागल्यावर तिनं तिच्याकडे असलेल्या या खजिन्याचा उपयोग करून व्हिडिओ बनवायला सुरवात केले. हळू हळू तिचे व्हिडिओ लोकांना आवडायला लागले आणि केवळ दोन वर्षांत ती प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन बसलीये. तिनं तिची एक स्टाईल निर्माण केलीये. इतकं असूनही तिनं तिची प्रायव्हसी जपलीये बरं. ती नक्की कुठे राहते हे नेटवर उपलब्ध नाहीये.

लिझीकी नेहमी पारंपारीक तिच्या प्रांतातील पोशाख करून व्हिडिओत दिसते. ते पोशाखही देखणे असतात. तिच्या प्रांतातील चार मोसम तिच्या व्हिडिओंतून बघायला मिळतात. तिच्या घरातील सर्व वस्तू, भांडी, तिची जेवण करण्याची पद्धत एकदम पारंपारीक आहेत. एका दृष्टीनं पाहिलं तर ती तिच्या या व्हिडियोंद्वारे या जुन्या चिनी परंपरांचं डॉक्युमेंटेशन करून एक भरीव कार्यही आपसुकच करत आहे. तिचं ऑनलाईन शॉपही आहे.

ती तिच्या व्हिडिओत सुंदर, नाजूक तर दिसतेच पण त्याचबरोबर काटक आणि मेहनतीही दिसते. जंगलातली, शेतातली, सुतारकामाची कामं करणं सोपं नाही. यामुळेच कदाचित तिला तिचे चाहते 'ब्रदर ली' असंही म्हणतात. तिचं त्या गावात खरंखुरं शेत आहे आणि त्यात ती मका आणि भुईमुग उगवते. शिवाय ती डुकरं आणि रेशमाचे कीडेही पाळते. हा तिचा पारंपारीक व्यवसाय आहे.

तिच्या घराबाहेरच भाज्या धुवायला एक डोणी आहे. त्यावर बांबूमधून पाणी पडतं. भांडी सगळी लाकडी किंवा बीडाची असावीत. बांबूचा तर उपयोग ठायी ठायी दिसतो. सगळं कसं नेटकं, देखणं. दिवस असो वा रात्र, कोणताही ऋतू असो, ही आपली टणटण उड्या मारत काय काय पटापट करत असते. घराच्या परसातल्या बागेतून, बाहेरच्या जंगलातून, तळ्यातून ती कायबाय चटचट तोडते, खुडते, गोळा करते. घरी येऊन लगेच झटपट कामाला लागते. ती फळं साठवते, पीठं करते, वाळवणं घालते, जॅम-जेली-वाईन करते. हे सगळे साठवणीचे पदार्थ. याबरोबरच ती जेवणंही करते. दोघीच तर जेवणार पण तरीही निदान चार प्रकार तर हवेच. सुंदर, सुबक, साधेच असे ते प्रकार असतात. छानश्या भांड्यांतून , प्लेटींतून ती जेवणाच्या लाकडी टेबलावर ते नेते. तिची आजी तिथे बसलेली असतेच. एका सुंदर पंख्यानं वारा घेत. मग दोघी मिळून हसतखेळत त्या जेवणाचा आस्वाद घेतात.

जेवण तरी किती मजेमजेशीर. एका कमळाच्या तळ्यातून तिनं कमळं, त्यांची पानं, त्यांचे देठ आणि त्यांची मूळं आणली आणि काय काय बनवलं. मूळांपासून पीठ केलं, त्या पीठाचं सूप केलं, देठ भाजीला वापरले, पानात गुंडाळून काहीतरी उकडलं आणि कमळाच्या गुलाबी पाकळ्यात काही भाज्या घालून ते रॅप्स बनवून खाल्ले. बघूनही मन तृप्त होतं अगदी. असंच एकदा भोपळ्यापासून अनेक प्रकार केले तिनं. त्यात भोपळ्याच्या मॅशला दोरे बांधून त्यांना मिनी भोपळ्यांचा आकार दिला. काय देखणं होतं ते. एकदा काय तर सगळे प्रकार मक्यापासून केलेले. असली गुणी मुलगी ना!

तिचं स्वयंपाकघर भारी मस्त. एक छोटुशी शेगडी तर दुसरं एक मोठं चुलाण आहे तिच्या स्वयंपाकघरात. चुलाणाला मागून लाकडं टाकायला जागा आहे. तिची आजी कधीकधी तिथे बसून लाकडं चुलीत सारत असते. त्या चुलाणावर एक भलं मोठं वोक म्हणजे कढई असते. त्यात ही सुगरण निगुतीनं जेवण बनवते. तिच्याकडे खूप खाद्यपदार्थ उकडलेलेही बनतात. त्यासाठी एक बांबूचा पारंपारीक स्टीमर आहे. तो ती त्याच वोकवर ठेऊन वापरते. तिच्याकडे घराबाहेर एक भट्टी/आवनही आहे. त्यातही काय काय भाजते ती.

तिच्या व्हिडिओजमधली अगदी प्रत्येक फ्रेम देखणी. सुर्योदय, सूर्यास्त, तार्‍यांनी खचाखच भरलेलं रात्रीचं आकाश, बर्फ, विविध झाडं, फळं, भाज्या, फुलं, प्राणी आणि स्वतः लिझीकी असं सगळं कसं मिळून आलेलं असतं. किती रंग असतात आणि ऋतुप्रमाणे बदलतातही. पण सगळं कसं आदब राखून, अजिबात उथळपणा नाही तिथं. मागे एक अत्यंत शांतवणारं हलकं संगीत सुरू असतं. तिच्या रोजच्या कामाच्या निमित्तानं होणार्‍या आवाजांनाही एक सुंदर नाद आहे. पाण्याचे, भांड्याचे, झाकणांचे आवाज, बांबूच्या गोल परातीत बिया सुकवायला टाकते, त्या सुकलेल्या बिया बरणीत ओतते ते आवाजही निव्वळ आनंददायी.

शिवाय आपल्याला न कळणारं आजी आणि नातीचं बोलणं, त्यांचं खळखळून हसणं इतकंच असतं. संवादांची गरज नाही, भाषांतराची गरज नाही. अगदी अलगदपणे त्या हृदयीचे आपल्या हृदयी पाझरत राहतं. एक विलक्षण अनुभव असतो हा. तिच्याच शब्दांत सांगायचं तर Life isn't easy, BUT YOU CAN LIVE WITH YOUR HEART!

*****************************************************
लिझीकी चॅनल : https://www.youtube.com/channel/UCoC47do520os_4DBMEFGg4A
लिझीकीची गोष्ट : https://raknife.com/li-zi-qi/
ऑनलाईन दुकान : https://liziqishop.com/

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ली झिकी व डियांशी, दोघींचेही विडिओ आले नाहीत गेल्या महिन्यापासून.>>>>> असं तुमच्या लक्षात आलं हे काहीतरी वेगळेच(चांगल्या अर्थाने) वाटले.

त्या बऱ्या असतील
तेथे अफवा पसरवणे टाळायला युट्युब आणि सोशल मीडिया बॅन केले असेल कदाचित.

डियांशीने प्रकाशित केलेल्या शेवटच्या व्हिडिओत तिने करोनाचा उल्लेख केला होता. तिच्या प्रांतात बहुतेक पसरला नव्हता.

तिथे सोशल मीडिया बंद केला असावा हे कारण असणार...

डियांशीने काल 1 विडिओ अपलोड केला. तिच्या चॅनेलवर ती कौटुंबिक कारणांमुळे थोडे दिवस येणार नाही असे लिहिले होते. कालच्या व्हिडिओत तरी कुठलेही कारण दिसले नाही. कालचा विडिओ चिनी भाषेत आहे, थोड्या दिवसात तोच इंग्रजीतून देईल. तिने कुठल्यातरी झाडाच्या कळ्या तोडून आणून त्यापासून पदार्थ बनवले. तिच्या नेहमीच्या जेवणात खूप तोच तोचपणा आहे. म्हणजे आपण कशी तीच ती फोडणी दिलेली भाजी, तोच तो भात, पोळ्या करतो तसे. फरक वेगळे मसाले व भाजी यात. तसे तिचेही रोज भरपूर तेलात लसणाच्या फोडणीवर परतलेल्या भाज्या, मडकेभर पाण्यात उकडलेले मांस व त्यासोबत भाज्या असे असते. तेल इतके खातात तरीही ते लोक इकडे बारीक कसे कळत नाही. एका प्लेटमध्ये काढलेले उचलून सगळेजण सगळेजण खातात मग खाली उरलेला रस कोण पित असेल?? की तेल उरले असेल ते टाकून देतात आणि म्हणून बारीक राहतात?

काल ज्या कळ्या आणल्या त्या आंबट असाव्यात. नंतर भावासोबत बसून कळ्याना तिखट मीठ लावून खात होती, माझ्या तोंडाला प्रचंड पाणी सुटले तेव्हा Happy Happy कोणी आंबट काही खाताना बघितले की आपल्या तोंडाला का इतके पाणी सुटते नकळे.

ही अजून एक चिनी मुलगी आहे. तिच्या चॅनेलवर मुस्लिम लोकांच्या जास्त कमेंट्स असतात कारण त्यांच्या मते ती चिनी मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करते.

नदी नावाची श्रीलंकन मुलगी हल्लीच ली व डियांशीपासून स्फूर्ती घेऊन अवतरली आहे. तिच्या व्हिडिओतील निसर्ग नेत्रसुखद हिरवागार आहे.
>>> https://www.youtube.com/watch?v=ZE8Iq6TqfF4 इथे नदी शिकरण करते. Lol

ही अजून एक चिनी मुलगी आहे. तिच्या चॅनेलवर मुस्लिम लोकांच्या जास्त कमेंट्स असतात कारण त्यांच्या मते ती चिनी मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करते. >>> साधना, ही लिंक नदीकडेच जातेय.

चीन मध्ये इतका समृद्ध निसर्ग आहे... व्हिडिओत तर भरभरून फळे फुले आणि काय काय दिसते. मग कुत्री मांजरी वटवाघळे खायचे कसले खुळ आहे यांच्या डोक्यात??. या संदर्भात असे वाचले होते की 50-60 च्या दशकात आपल्याकडे भरपूर धान्य उगवते असे दाखवायचे सरकारने ठरवले व त्यानुसार धान्याचे सगळे शत्रू म्हणजे चिमण्या वगैरे मारून टाकल्या. लोकांना स्वतःची पोटे मारून सरकारात धान्य द्यावे लागले. मग भूक मिटवणार कशी? तेव्हा लोक या पर्यायांकडे वळले व मग तीच संस्कृती झाली.

व्हिडिओत मात्र सगळे भरभरून असल्याचे दिसते.

नदीचा भाऊ अगदीच लाडावलेला आहे. बाहेर पाय हलवत बसलेला असतो, दोन वेळच्या जेवणाची वाट बघत.

मुंबईत राहून खिडकीत गार्डनिंग करायची हौस असलेल्यानी हे चॅनेल बघा. ही हेअरलूम सिड्स विकते सुद्धा.

मुंबई बाल्कनी गार्डनर.

थोड्याश्या जागेत बरेच काही पिकवते. तिचे खूप कौतुक वाटते मला.

लिझिकी चे व्हिडीओज इतके सुंदर आहेत की कधीकधी चायना सरकार (किंवा सिचूआन प्रॉव्हिन्स सरकार) तिला टुरिझम प्रमोट केल्याबद्दल थोडीफार पैश्याची मदत करत असेल असे उगीचच वाटते.तिचे कर्तृत्व, जे ती करते ते वगैरे ओरिजिनलच असेल.
एक स्वप्नांचं जग समोर उघडतं.रोजच्या दारिद्र्याने गांजलेल्या एखादया मुलाने ड्रग्स घ्यावे आणि त्याला सगळी सुंदर रंगीत स्वप्नां पडावी तसं.
इतक्या प्रॉपर्टीची निगा, स्वच्छता, एका मुली आणि आजीच्याने होते का?की बॅकग्राउंड मध्ये नोकर किंवा संयुक्त कुटुंब असेल आणि सगळे मिळून करत असतील?
काही असो.लिझिकीचे व्हिडिओ डोळ्याला प्रचंड शांती देतात.तो बेरी आईस्क्रीम वाला परत परत बघते मी.

एक गंमत सांगूनच टाकते माझ्या फ ची. त्या लिझिकीचे व्हिडिओ बघून बघून प्रचंड प्रेरित होऊन एकदा लाल भोपळा आणि हाताशी होता म्हणून दुधी भोपळा घालून फ्राईड राईस केला. शिवाय गाजर, फ्लॉवर, पातीचा कांदा, फरसबी असे नेहमीचे यशस्वी कँडिडेट होतेच. मला वाटलं की काय भारी केलं आपण. पण ते प्रकरण बोअर लागलं आणि घरातले कावलेच माझ्यावर. असो. गागुच्का म्हणून गब्बसले न काय!

.तो बेरी आईस्क्रीम वाला परत परत बघते मी. >>>मी पण ....गारगार शांत वाटते.
सध्या काय खरे काय खोटे कळणे अशक्य झाले आहे. अशावेळी जे डोळ्यांना शांतवते ते बघायचे, अजून काय करणार?>>>>>सहमत.
आधी amazing places on our planet बघायचो आता हे.
https://youtu.be/g5hA2qo2EFc
अप्रतिम HD videos...No talking...यांचे background music पण अत्यंत छान आहे.
माझे तर स्वप्न आहे ...सगळ्यात मोठा टिव्ही घेऊन प्रवास बघत बसायचा. सगळीकडे जाणे तर अशक्य आहे . मुलगी अपंग असल्याने स्वप्नंपण बघता येत नाहीत.
जितके बोलणे कमी तितके आवडते मला !!
प्रवास, निसर्ग आणि पाककृती हेच आता कामिंग वाटते. बाकी सगळे not as soothing Happy
धन्यवाद .

आदिश्री, प्रत्यक्षात दिसणार नाही इतके सुंदर पडद्यावर दिसते. त्यातच आनंद....

माझ्या ऑफिसमधली 1 मुलगी फेब्रुवारीत व्हिएतनामला गेली होती. पण तिच्या फोटोत तेच ते सगळे दिसले जे इतरत्र दिसते. पण वर दिलेल्या एका यु ट्युबरच्या व्हिडिओत अगदी माईंड ब्लोविंग व्हिएतनाम दिसते. हे जास्त चांगले Happy Happy

बाईगं, पहिल्यांदा च ऐकतेय आणि बघतेय मी हे प्रकरण! भराभरा भराभरा कामं करत असते हि लिझीकी, युट्यूब चॅनेलच्या धाग्यावर मामीने लिहीलं होतं म्हणून हा धागा कळला. आज पूर्ण दिवस खाल्ला माझा ह्या लिझीकीने Happy पण छान आहे बघायला. तीचं भरतकाम पण अचाटच आहे. म्हणजे कोणी असं हाताने करू शकेल हे अशक्य वाटतं पण ती दिसतेच भरताना म्हणून विश्वास बसतो.

मला कोकणातील पदार्थांचे अपेक्षित असलेले व्हिडीओ मिळाले.
https://www.youtube.com/watch?v=31jlS3Rr5Rc

रातांबा, त्यापासून अनेक प्रकार तयार करणे. तसेच अजून व्हिडीओ पण दिसले आंब्याची साटे वगैरे पण ते बघितले नाहीत अजून.

रातांबे फोडण्याच्या जास्त आठवणी माहेरच्या आहेत. हाराभर रातांबे गप्पा मारत फोडत बसायला मजा यायची हात लालचुटुक व्हायचे, मधेच बिया आतल्या चघळायला मजा यायची, साल पण तोंडात टाकायचो मधेच. आमचे रातांबे मस्त डार्क रंगाचे असायचे ह्याच्यापेक्षा काळपट, मस्त चॉकलेटी मरून रंग. सासरी पण ह्याच रंगाचे आहेत. असे फिकट, जरा लहान रातांबे पहिल्यांदा बघितले. ते असे का हे त्यात कारण सांगितलं आहे. आमचे कोकम फळ ( रातांबा ) माहेरी सासरी जरा मोठं आणि टपोरे आहे.

कोकम तेलाला वेगळा शब्द वापरला आहे तो मी पहिल्यांदाच ऐकला.

Pages