लिझीकीचे जग

Submitted by मामी on 13 September, 2019 - 12:22

लीझीकी (Li Ziqi) - चीनच्या शेझुआन प्रांतातील एका गावात शांत, निसर्गरम्य परिसराच्या सोबतीत राहणारी एक गोडशी मुलगी. तिच्यापेक्षाही गोड असलेल्या आजीबरोबर ती राहते. आजूबाजूला केवळ एक भरभरून देणारा, डोळे निववणारा निसर्ग आहे. या सकस मातीतून पिकवलेल्या ताज्या भाज्या, धान्य, फळं यापासून ती मुलगी काय काय पदार्थ आणि प्रकार बनवते. वेलकम टु लिझीकी चॅनल - हा एक युट्युबवरचा आनंदाचा खजिना आहे आणि ती आहे या चॅनलची अनभिषिक्त राणी. लीझीकीचा एक एपिसोड बघा की तुम्ही तिचे चाहतेच होऊन जाता.

गेल्या दोन वर्षांपूर्वी युट्युबवर आलेली २९ वर्षांची लिझीकी आता खूप प्रसिद्ध युट्युबर आहे. आज तिच्या चॅनलचे ६० लाखांपेक्षाही जास्त चाहते आहेत. पण तिचं बालपण आणि युट्युबवर येण्याआधीचं जीवन खूप खडतर होतं. अगदी लहानपणीच आईवडिलांचा घटस्फोट पाहिलेली, १४व्या वर्षापासून शाळा सोडून देऊन नोकरीला लागलेली, वेळप्रसंगी भुकेली राहलेली, पुलाखाली झोपलेली, पडेल ते काम करणारी अशी ही लिझीकी आजीच्या आजारपणामुळे शहर सोडून गावात आली. तिच्या आजोबांकडून तिनं चीनचं पारंपारीक जेवण, बागकाम, मासेमारी, सुतारकाम, बुरुडकाम अश्या गोष्टी शिकल्या होत्याच. चीनमध्ये युट्युबचं प्रस्थ वाढायला लागल्यावर तिनं तिच्याकडे असलेल्या या खजिन्याचा उपयोग करून व्हिडिओ बनवायला सुरवात केले. हळू हळू तिचे व्हिडिओ लोकांना आवडायला लागले आणि केवळ दोन वर्षांत ती प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन बसलीये. तिनं तिची एक स्टाईल निर्माण केलीये. इतकं असूनही तिनं तिची प्रायव्हसी जपलीये बरं. ती नक्की कुठे राहते हे नेटवर उपलब्ध नाहीये.

लिझीकी नेहमी पारंपारीक तिच्या प्रांतातील पोशाख करून व्हिडिओत दिसते. ते पोशाखही देखणे असतात. तिच्या प्रांतातील चार मोसम तिच्या व्हिडिओंतून बघायला मिळतात. तिच्या घरातील सर्व वस्तू, भांडी, तिची जेवण करण्याची पद्धत एकदम पारंपारीक आहेत. एका दृष्टीनं पाहिलं तर ती तिच्या या व्हिडियोंद्वारे या जुन्या चिनी परंपरांचं डॉक्युमेंटेशन करून एक भरीव कार्यही आपसुकच करत आहे. तिचं ऑनलाईन शॉपही आहे.

ती तिच्या व्हिडिओत सुंदर, नाजूक तर दिसतेच पण त्याचबरोबर काटक आणि मेहनतीही दिसते. जंगलातली, शेतातली, सुतारकामाची कामं करणं सोपं नाही. यामुळेच कदाचित तिला तिचे चाहते 'ब्रदर ली' असंही म्हणतात. तिचं त्या गावात खरंखुरं शेत आहे आणि त्यात ती मका आणि भुईमुग उगवते. शिवाय ती डुकरं आणि रेशमाचे कीडेही पाळते. हा तिचा पारंपारीक व्यवसाय आहे.

तिच्या घराबाहेरच भाज्या धुवायला एक डोणी आहे. त्यावर बांबूमधून पाणी पडतं. भांडी सगळी लाकडी किंवा बीडाची असावीत. बांबूचा तर उपयोग ठायी ठायी दिसतो. सगळं कसं नेटकं, देखणं. दिवस असो वा रात्र, कोणताही ऋतू असो, ही आपली टणटण उड्या मारत काय काय पटापट करत असते. घराच्या परसातल्या बागेतून, बाहेरच्या जंगलातून, तळ्यातून ती कायबाय चटचट तोडते, खुडते, गोळा करते. घरी येऊन लगेच झटपट कामाला लागते. ती फळं साठवते, पीठं करते, वाळवणं घालते, जॅम-जेली-वाईन करते. हे सगळे साठवणीचे पदार्थ. याबरोबरच ती जेवणंही करते. दोघीच तर जेवणार पण तरीही निदान चार प्रकार तर हवेच. सुंदर, सुबक, साधेच असे ते प्रकार असतात. छानश्या भांड्यांतून , प्लेटींतून ती जेवणाच्या लाकडी टेबलावर ते नेते. तिची आजी तिथे बसलेली असतेच. एका सुंदर पंख्यानं वारा घेत. मग दोघी मिळून हसतखेळत त्या जेवणाचा आस्वाद घेतात.

जेवण तरी किती मजेमजेशीर. एका कमळाच्या तळ्यातून तिनं कमळं, त्यांची पानं, त्यांचे देठ आणि त्यांची मूळं आणली आणि काय काय बनवलं. मूळांपासून पीठ केलं, त्या पीठाचं सूप केलं, देठ भाजीला वापरले, पानात गुंडाळून काहीतरी उकडलं आणि कमळाच्या गुलाबी पाकळ्यात काही भाज्या घालून ते रॅप्स बनवून खाल्ले. बघूनही मन तृप्त होतं अगदी. असंच एकदा भोपळ्यापासून अनेक प्रकार केले तिनं. त्यात भोपळ्याच्या मॅशला दोरे बांधून त्यांना मिनी भोपळ्यांचा आकार दिला. काय देखणं होतं ते. एकदा काय तर सगळे प्रकार मक्यापासून केलेले. असली गुणी मुलगी ना!

तिचं स्वयंपाकघर भारी मस्त. एक छोटुशी शेगडी तर दुसरं एक मोठं चुलाण आहे तिच्या स्वयंपाकघरात. चुलाणाला मागून लाकडं टाकायला जागा आहे. तिची आजी कधीकधी तिथे बसून लाकडं चुलीत सारत असते. त्या चुलाणावर एक भलं मोठं वोक म्हणजे कढई असते. त्यात ही सुगरण निगुतीनं जेवण बनवते. तिच्याकडे खूप खाद्यपदार्थ उकडलेलेही बनतात. त्यासाठी एक बांबूचा पारंपारीक स्टीमर आहे. तो ती त्याच वोकवर ठेऊन वापरते. तिच्याकडे घराबाहेर एक भट्टी/आवनही आहे. त्यातही काय काय भाजते ती.

तिच्या व्हिडिओजमधली अगदी प्रत्येक फ्रेम देखणी. सुर्योदय, सूर्यास्त, तार्‍यांनी खचाखच भरलेलं रात्रीचं आकाश, बर्फ, विविध झाडं, फळं, भाज्या, फुलं, प्राणी आणि स्वतः लिझीकी असं सगळं कसं मिळून आलेलं असतं. किती रंग असतात आणि ऋतुप्रमाणे बदलतातही. पण सगळं कसं आदब राखून, अजिबात उथळपणा नाही तिथं. मागे एक अत्यंत शांतवणारं हलकं संगीत सुरू असतं. तिच्या रोजच्या कामाच्या निमित्तानं होणार्‍या आवाजांनाही एक सुंदर नाद आहे. पाण्याचे, भांड्याचे, झाकणांचे आवाज, बांबूच्या गोल परातीत बिया सुकवायला टाकते, त्या सुकलेल्या बिया बरणीत ओतते ते आवाजही निव्वळ आनंददायी.

शिवाय आपल्याला न कळणारं आजी आणि नातीचं बोलणं, त्यांचं खळखळून हसणं इतकंच असतं. संवादांची गरज नाही, भाषांतराची गरज नाही. अगदी अलगदपणे त्या हृदयीचे आपल्या हृदयी पाझरत राहतं. एक विलक्षण अनुभव असतो हा. तिच्याच शब्दांत सांगायचं तर Life isn't easy, BUT YOU CAN LIVE WITH YOUR HEART!

*****************************************************
लिझीकी चॅनल : https://www.youtube.com/channel/UCoC47do520os_4DBMEFGg4A
लिझीकीची गोष्ट : https://raknife.com/li-zi-qi/
ऑनलाईन दुकान : https://liziqishop.com/

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अगो, सुंदर लिहिलंय!! +!11111
तुम्ही सगळे एव्ह्ढे म्हणताय तर आज बघ्तेच लिसीकीचे व्हीडीओझ Happy

आज एक अजून नवी उदयोन्मुख कलाकार सापडली- वाईल्ड गर्ल. दोनच महिन्यांपूर्वी सुरू केलंय असं दिसतंय.

मी आज हा एकच पाहिला. https://www.youtube.com/watch?v=kv-BSCRhswI
राजगिर्‍याचे तुरे आणून, सुकवून, पाखडून बिया काढल्या आणि तांदळाबरोबर उकडून त्यांचे उंडे केले. मग त्यांच्या चकत्या कापून शेगडीवर
भाजल्या. तर त्या छानपैकी फुगल्या. शिवाय, तांदूळ-राजगिरा सूपही केलं. त्या सूपाबरोबर खायला चटकमटक सॉस केला ते डिटेलवार दाखवलं.

वाईल्ड गर्ल अगदी सेम टू सेम लिझिकी कॉपी करतेय असं वाटलं. अजून व्हिडिओज बघून नक्की मत ठरवावं लागेल. पण चालेल की. आपल्याला नेत्रसुखद, आनंददायी असं काही बघायला मिळालं तर उत्तमच.

वाह!! राजगिर्‍याचे तुरे वगैरे आणून का? पहायला पाहीजे.
____________
मामी तुम्ही ऑडली सॅटिसफाइंग व्हिडीओज पाहीले आहेत का? ज्यात सोप कटिंग वगैरे असते आणि त्याचा आवाज आपल्याला आवडतो. अगदी क्लिअर, मस्त आवाज असतात त्या व्हि डीओज मध्ये. ते कसे रेकॉर्ड करतत त्याचे काहीतरी हायफाय टेक्निक आहे बहुतेक.

मामी, एक अजून मस्त व्हिडिओ! धन्यवाद!
लिझिकीचे व्हिडिओ जास्त पॉलिश्ड वाटतात.तिच्या व्हिडिओत तरलता आणि घराच्या परिसराचे सौंदर्य ठळकपणे दिसून येते.जेवण वाढण्यातही नजाकत आहे.पण कदाचित त्यामुळे असेलही,पण ती दूरस्थ वाटते. त्यामानाने डियांशी जास्त जवळची वाटते.तशीच वाईल्ड गर्ल पण साधीसुधी वाटते.
वरच्या लिंकमधल्या व्हिडिओतला तांदूळ(मला सब्जा का वाटला?)+ राजगिर्‍याची चायनीज भाकरी पाहून तोंडाला पाणी सुटले.थायलंडमधला तांदूळ चिकट असतो तसा चीनमधला पण असावा.
बाकी स्वयंपाकाला लागते ते सामान आधी तयार ठेवावे.उगाच मिरची हवी, धाव शेतात . Wink

निसर्गाची विपुलता आणि सौंदर्य पाहून डोळे निवतात हे खरे आहे.
____________
सूपात आपण पाखडतो तसं पाखडलं तिनी. तो कुटलेला गोळा काय यमी दिसतो. त्यांच्याकडेदेखील आलं - लसूण ही इनसेपरेबल जोडी दिसते. एक घेतलं की दुसरा आलाच पाठोपाठ Happy
तो ब्रेड पाहून तोंपासु.

बाकी स्वयंपाकाला लागते ते सामान आधी तयार ठेवावे.उगाच मिरची हवी, धाव शेतात .
>>> त्यांशिवांय पदांर्थ तांजे आंणि पौंष्टिक कंसे बंनतींल?

होय. त्याला गवळण म्हणतात. पुढचे दोन्ही पाय जुळवून डोक्यावर हंडा घेऊन चालल्यासारखा वाटतो. प्रार्थना किटक असे सुध्दा म्हणतात. इंग्रजी मध्ये praying mantis असे म्हणतात. मादी नराचे डोके तोडून खाते असे वाचलं होतं. नाकतोड्याचा एक प्रकार आहे.

>> बाकी स्वयंपाकाला लागते ते सामान आधी तयार ठेवावे.उगाच मिरची हवी, धाव शेतात >> त्याशिवाय का तुम्हांला तिचं शेत दिसेल?
माझं लिझिकीचे व्हिडिओ बघायचं वेड आता मागे पडलं. मागे एका व्हिडीओत तिने परसात फिरणारी कोंबडीच मारलीशिजवायला असं वाटलं.

कदाचित त्यामुळे असेलही,पण ती दूरस्थ वाटते. त्यामानाने डियांशी जास्त जवळची वाटते.>>>>

मलाही. डियांशी अगदी साधी, गोड, कसलाही आव न आणणारी वाटते.

सायो, चीनमध्येच काय, इथेही परसदारी कोंबड्या पाळतात, एखाद्या खास पाव्हण्यासाठी एखादी राखून ठेवली जाते व तो आल्यावर कापली जाते.

डियांशीनेही मागे त्यांच्या नव्या वर्षाला काय काय बनवले त्याची लिस्ट दिली होती तयात डुकराच्या कच्च्या मांसाचा एक पदार्थ होता. सुरवातीलाच तिने सांगितले की हा पदार्थ युनानी परंपरेचा एक भाग आहे. शिवाय डुकरे आम्ही घरीच प्रेमाने पाळतो, त्यामुळे आमच्या परंपरेला उगीच नावे ठेऊ नका.

एक दोन व्हिडीओ बघितले तिचे . गोड आहे ती स्वतः आणि मन लावून स्वैपाक करत असते. पाठी बॅकग्रान्ड म्युझिक अजिबात नाही किव्वा फार कमी हे पण आवडलं आपल्या भारतात सुद्धा अशा काही बायका आहेत ज्या गावात राहणाऱ्या आणि रोजचा घरच रुटीन दाखवतात. सकाळी उठल्यापासून नवर्याकरता मुलांकरता नाश्ता बनवणं - जेवण बनवणं असं काय काय चालू असत त्यांचं . बाहेर चुलीवर जेवण बनवत असतात त्या . पण पाठीमागून कॉमेंटरी असते त्यांच्याच आवाजात आणि त्यांचं शूटिंग घरातली कोण तरी एक व्यक्ती करत असते कारण हि स्वैपाक करण्यात बिझी

हिच्या बाबतीत पण हि जेव्हा बाहेर जाते काही काही फळ खुडते भाज्या खुडते तेव्हा कोणी तरी शूटिंग करत असणारच . ती व्यक्ती कोण असेल ? मला भारतीय गावातल्या काही बायकांचे पण व्हिडीओ तुफान चालतात त्यातल्या एकीची आठवण झाली तिची फक्त तोंडाने कॉमेंट्री चालू असते एवढाच काय तो फरक आणि हि मात्र गप्प आहे Happy

https://www.youtube.com/watch?v=Ftut4X3D2gU

हा एक अजून. आपल्याला खूप जवळचा वाटणारा, इथेही खेडेगावातून बायका येतात स्वतः पिकवलेल्या भाज्या घेऊन विकायला, ही मुलगी तशीच. मला ह्या लोकांची पाठीला लावतात ती बास्केट आवडते, दोन्ही हात मोकळे, डोक्यावर टोपली घ्यायला नको भाज्यांची.

मामीने लिझिकीशी ओळख करुन दिल्यावर खजिना मिळाला वेगवेगळ्या व्हिडीओजचा, थँक यु मामी.

बापरे, मी भारतातला हा एक व्हिडिओ पाहिला. किती भयाण आहे. सगळ्यात डेंजर म्हणजे ती बाई त्या चुलीपाशी सिंथेटिक साडी नेसून वावरतीये.
https://www.youtube.com/watch?v=275w4NGumhY

जर भारतातले छानसे व्हिडिओ असतील तर सुचवा प्लीज.

मामी तुम्ही ऑडली सॅटिसफाइंग व्हिडीओज पाहीले आहेत का? ज्यात सोप कटिंग वगैरे असते आणि त्याचा आवाज आपल्याला आवडतो. अगदी क्लिअर, मस्त आवाज असतात त्या व्हि डीओज मध्ये. ते कसे रेकॉर्ड करतत त्याचे काहीतरी हायफाय टेक्निक आहे बहुतेक. >> नाही गं. जरा सजेस्ट कर ना.

एक बाई आणि एक आज्जी शेतातल्या भाज्या वगैरे घेऊन, त्याचे पदार्थ करतात. आजीबाई जास्त काम करतात, दुसऱ्या बाई बोलत असतात जास्त. त्यातले खारे वांगे हा प्रकार आवडलेला मला, करून बघणार आहे. तो मिळाला तर पोस्ट करते इथे.

https://www.youtube.com/watch?v=LzNwE1JT9L0

गावरान, एक खरी चव असं त्यांच्या vlog चं नाव. हे शेत त्यांचे. वेगवेगळ्या वेज, नॉनवेज रेसिपीज आहेत त्यांच्या शेतात केलेल्या, खारे वांगे मात्र मिळत नाहीये आता.

अरे वा, so sweet of u मामी, मला हा सापडत नव्हता. मी स्पेसिफिक लिहिलं नाही सर्च मध्ये पण त्यांच्या पेजवर शोधत होते.

गावरान, एक खरी चव छान वाटतोय. खार्‍या वांग्याची रेसिपी मस्तच आहे. त्या बाई पण मस्त ठसक्यात बोलतात. काम करतानाचे त्यांचे हात फार छान दिसतात.

Pages