लिझीकीचे जग

Submitted by मामी on 13 September, 2019 - 12:22

लीझीकी (Li Ziqi) - चीनच्या शेझुआन प्रांतातील एका गावात शांत, निसर्गरम्य परिसराच्या सोबतीत राहणारी एक गोडशी मुलगी. तिच्यापेक्षाही गोड असलेल्या आजीबरोबर ती राहते. आजूबाजूला केवळ एक भरभरून देणारा, डोळे निववणारा निसर्ग आहे. या सकस मातीतून पिकवलेल्या ताज्या भाज्या, धान्य, फळं यापासून ती मुलगी काय काय पदार्थ आणि प्रकार बनवते. वेलकम टु लिझीकी चॅनल - हा एक युट्युबवरचा आनंदाचा खजिना आहे आणि ती आहे या चॅनलची अनभिषिक्त राणी. लीझीकीचा एक एपिसोड बघा की तुम्ही तिचे चाहतेच होऊन जाता.

गेल्या दोन वर्षांपूर्वी युट्युबवर आलेली २९ वर्षांची लिझीकी आता खूप प्रसिद्ध युट्युबर आहे. आज तिच्या चॅनलचे ६० लाखांपेक्षाही जास्त चाहते आहेत. पण तिचं बालपण आणि युट्युबवर येण्याआधीचं जीवन खूप खडतर होतं. अगदी लहानपणीच आईवडिलांचा घटस्फोट पाहिलेली, १४व्या वर्षापासून शाळा सोडून देऊन नोकरीला लागलेली, वेळप्रसंगी भुकेली राहलेली, पुलाखाली झोपलेली, पडेल ते काम करणारी अशी ही लिझीकी आजीच्या आजारपणामुळे शहर सोडून गावात आली. तिच्या आजोबांकडून तिनं चीनचं पारंपारीक जेवण, बागकाम, मासेमारी, सुतारकाम, बुरुडकाम अश्या गोष्टी शिकल्या होत्याच. चीनमध्ये युट्युबचं प्रस्थ वाढायला लागल्यावर तिनं तिच्याकडे असलेल्या या खजिन्याचा उपयोग करून व्हिडिओ बनवायला सुरवात केले. हळू हळू तिचे व्हिडिओ लोकांना आवडायला लागले आणि केवळ दोन वर्षांत ती प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन बसलीये. तिनं तिची एक स्टाईल निर्माण केलीये. इतकं असूनही तिनं तिची प्रायव्हसी जपलीये बरं. ती नक्की कुठे राहते हे नेटवर उपलब्ध नाहीये.

लिझीकी नेहमी पारंपारीक तिच्या प्रांतातील पोशाख करून व्हिडिओत दिसते. ते पोशाखही देखणे असतात. तिच्या प्रांतातील चार मोसम तिच्या व्हिडिओंतून बघायला मिळतात. तिच्या घरातील सर्व वस्तू, भांडी, तिची जेवण करण्याची पद्धत एकदम पारंपारीक आहेत. एका दृष्टीनं पाहिलं तर ती तिच्या या व्हिडियोंद्वारे या जुन्या चिनी परंपरांचं डॉक्युमेंटेशन करून एक भरीव कार्यही आपसुकच करत आहे. तिचं ऑनलाईन शॉपही आहे.

ती तिच्या व्हिडिओत सुंदर, नाजूक तर दिसतेच पण त्याचबरोबर काटक आणि मेहनतीही दिसते. जंगलातली, शेतातली, सुतारकामाची कामं करणं सोपं नाही. यामुळेच कदाचित तिला तिचे चाहते 'ब्रदर ली' असंही म्हणतात. तिचं त्या गावात खरंखुरं शेत आहे आणि त्यात ती मका आणि भुईमुग उगवते. शिवाय ती डुकरं आणि रेशमाचे कीडेही पाळते. हा तिचा पारंपारीक व्यवसाय आहे.

तिच्या घराबाहेरच भाज्या धुवायला एक डोणी आहे. त्यावर बांबूमधून पाणी पडतं. भांडी सगळी लाकडी किंवा बीडाची असावीत. बांबूचा तर उपयोग ठायी ठायी दिसतो. सगळं कसं नेटकं, देखणं. दिवस असो वा रात्र, कोणताही ऋतू असो, ही आपली टणटण उड्या मारत काय काय पटापट करत असते. घराच्या परसातल्या बागेतून, बाहेरच्या जंगलातून, तळ्यातून ती कायबाय चटचट तोडते, खुडते, गोळा करते. घरी येऊन लगेच झटपट कामाला लागते. ती फळं साठवते, पीठं करते, वाळवणं घालते, जॅम-जेली-वाईन करते. हे सगळे साठवणीचे पदार्थ. याबरोबरच ती जेवणंही करते. दोघीच तर जेवणार पण तरीही निदान चार प्रकार तर हवेच. सुंदर, सुबक, साधेच असे ते प्रकार असतात. छानश्या भांड्यांतून , प्लेटींतून ती जेवणाच्या लाकडी टेबलावर ते नेते. तिची आजी तिथे बसलेली असतेच. एका सुंदर पंख्यानं वारा घेत. मग दोघी मिळून हसतखेळत त्या जेवणाचा आस्वाद घेतात.

जेवण तरी किती मजेमजेशीर. एका कमळाच्या तळ्यातून तिनं कमळं, त्यांची पानं, त्यांचे देठ आणि त्यांची मूळं आणली आणि काय काय बनवलं. मूळांपासून पीठ केलं, त्या पीठाचं सूप केलं, देठ भाजीला वापरले, पानात गुंडाळून काहीतरी उकडलं आणि कमळाच्या गुलाबी पाकळ्यात काही भाज्या घालून ते रॅप्स बनवून खाल्ले. बघूनही मन तृप्त होतं अगदी. असंच एकदा भोपळ्यापासून अनेक प्रकार केले तिनं. त्यात भोपळ्याच्या मॅशला दोरे बांधून त्यांना मिनी भोपळ्यांचा आकार दिला. काय देखणं होतं ते. एकदा काय तर सगळे प्रकार मक्यापासून केलेले. असली गुणी मुलगी ना!

तिचं स्वयंपाकघर भारी मस्त. एक छोटुशी शेगडी तर दुसरं एक मोठं चुलाण आहे तिच्या स्वयंपाकघरात. चुलाणाला मागून लाकडं टाकायला जागा आहे. तिची आजी कधीकधी तिथे बसून लाकडं चुलीत सारत असते. त्या चुलाणावर एक भलं मोठं वोक म्हणजे कढई असते. त्यात ही सुगरण निगुतीनं जेवण बनवते. तिच्याकडे खूप खाद्यपदार्थ उकडलेलेही बनतात. त्यासाठी एक बांबूचा पारंपारीक स्टीमर आहे. तो ती त्याच वोकवर ठेऊन वापरते. तिच्याकडे घराबाहेर एक भट्टी/आवनही आहे. त्यातही काय काय भाजते ती.

तिच्या व्हिडिओजमधली अगदी प्रत्येक फ्रेम देखणी. सुर्योदय, सूर्यास्त, तार्‍यांनी खचाखच भरलेलं रात्रीचं आकाश, बर्फ, विविध झाडं, फळं, भाज्या, फुलं, प्राणी आणि स्वतः लिझीकी असं सगळं कसं मिळून आलेलं असतं. किती रंग असतात आणि ऋतुप्रमाणे बदलतातही. पण सगळं कसं आदब राखून, अजिबात उथळपणा नाही तिथं. मागे एक अत्यंत शांतवणारं हलकं संगीत सुरू असतं. तिच्या रोजच्या कामाच्या निमित्तानं होणार्‍या आवाजांनाही एक सुंदर नाद आहे. पाण्याचे, भांड्याचे, झाकणांचे आवाज, बांबूच्या गोल परातीत बिया सुकवायला टाकते, त्या सुकलेल्या बिया बरणीत ओतते ते आवाजही निव्वळ आनंददायी.

शिवाय आपल्याला न कळणारं आजी आणि नातीचं बोलणं, त्यांचं खळखळून हसणं इतकंच असतं. संवादांची गरज नाही, भाषांतराची गरज नाही. अगदी अलगदपणे त्या हृदयीचे आपल्या हृदयी पाझरत राहतं. एक विलक्षण अनुभव असतो हा. तिच्याच शब्दांत सांगायचं तर Life isn't easy, BUT YOU CAN LIVE WITH YOUR HEART!

*****************************************************
लिझीकी चॅनल : https://www.youtube.com/channel/UCoC47do520os_4DBMEFGg4A
लिझीकीची गोष्ट : https://raknife.com/li-zi-qi/
ऑनलाईन दुकान : https://liziqishop.com/

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नक्की बघा. मी काही दिवसांपूर्वीच अचानक एक व्हिडिओ पाहिला. आणि मग एकामागोमाग एक बघतच सुटले आहे.

मी पाहिलेला पहिला व्हिडिओ हा होता : https://www.youtube.com/watch?v=_jUJrIWp2I4&t=3s

मस्त ओळख मामी. माझ आवडतं चॅनल झालय हे. तीनी केलेले आईस क्रीम्स पहीलेत का? कसले अफलातून आहेत!
बाकी गावात जरी असली तरी कधी कधी जे काय घर - बेडरूम वगैरे दिसतं ते अधुनिक स्वरूपाचं आहे.

लिझ्की सारखी अजून एक आहे. Dianxi Xiaoge. या नवानी सर्चा.

हो तश्या बर्याच आहेत. पण मला ही दिसली आणि थेट आतपर्यंतच पोचली म्हणून लेख लिहीला. त्या निमित्ताने अश्या छान छान युट्युबर्सची इथे यादी तयार झाली तर उत्तमच.

मी आधी ली झिकी ला पाहत होते पण Dianxi Xiaoge भेटल्यापासून झिकी मागे पडली. झिकी अर्थातच पहिली आहे पण ती थोडी शिष्ट वाटते, चेहऱ्यावर सहसा कसलेही भाव नसतात. डियांची अगदी साधी आहे, कर्कश आवाजाची पण चेहरा सदा हसतमुख. झिकी ची आजी वगळता कोणीही दिसत नाही, एकदाच तिच्या क्रू मेम्बर्सपैकी एकजण दिसला होता. डियांचीची फॅमिली खूप मोठी आहे. सगळे एकत्र बसून जेवतात.

योकुनं सुचवलं म्हणून Dianxi Xiaoge बघितली पण मला खूप आवाज वाटला. तरीही अजून बघण्याचा प्रयत्न करेन.

लिझिकी चे व्हिडिओ शांत आहेत ते मला तरी आवडलं.

....

त्यांचे बाँबु किती उंच आहेत.. ली झिकी एका भागात बांबूचा सोफा आणि इतर फर्निचर बनवते ते बघण्यासारखे आहे.

ली झिकी प्रोफेशनल आहे , डियांची अजून धडपडतेय..

मला आवडतात हे व्हिडीओ. खरच प्रत्येक फ्रेम सुरेख असते. तिच्याविषयी काही माहित मात्र नव्हते. मस्त लेख.

वा, मस्त ओळख. ह्या चॅनलबद्दल आणि लिझीकीबद्दल काहीच माहित नव्हतं.वरच्या लिंकमधून एक व्हिडीओ बघायला सुरुवात केली. काय सुंदर आहे सगळंच. आता नियमित बघेन.

माझ्या पण युट्यूब सजेशन्स मध्ये हा व्हिडीओ आला होता काही दिवसांपूर्वी. मस्त चॅनल आहे! मी ही अधूनमधून बघत असते.. आईस्क्रीम चा व्हिडिओ खूप छान आहे!

मामी किती सुरेख लिहिलंय हो! तसेच मंद,शांत सूर तुमच्या लिखाणात आला आहे.
त्यात भोपळ्याच्या मॅशला दोरे बांधून त्यांना मिनी भोपळ्यांचा आकार दिला. काय देखणं होतं ते.>>> अगदी चकित व्हायला झाले ते पाहून.रोजच्या जेवणाला असा साज करत असेल तर दंडवतच.बाकी सायोची कॉमेंट पटली.

मस्त लिहिले आहे. आता व्हिडीओ बघते.
तिच्या घराचं वर्णन वाचून द गुड अर्थ मधला वांग लुंग आणि ओ-लान, त्यांचं घर आठवलं. Happy किती तरी वेळा त्या पुस्तकातली खाद्यपदार्थांची, शेताची वर्णनं वाचली होती. सोनेरी गहू, खरपूस भाजलेले केक्स.. काय नि काय!

वावे, सेम पिंच Happy

मामी, मस्त लेख. मी काही व्हिडीओज पाहिल्यावर तिची फॅन झाले होते, पण नन्तर काही कारणाने ती आठवणीतून पुसली गेली होती. आता परत मोह होतो आहे, पण सायोची कमेंट Lol Lol

सायाे + १
कोणे एके काळी मीही बघत असे लिझिकीचे videos.
उपलब्ध वेळेचा दुरूपयोग होतोय हे लक्षात आल्यावर बंद केले पहायचे. Video तला निसर्ग सुंदर आहे यात वादच नाही पण ती जे पदार्थ रांधते त्यांच्या बऱ्याचश्या मूळ घटकांशी / साहित्याशी माझा काडीमात्र संबंध येत नाही.

चंद्रा, ते झालंच. आपलं फूड कल्चर आणि त्यांचं फूड कल्चर ह्यात काहीच साम्य नाही. पण मला आवडलं बघायला. तिच्या व्हिडीओमध्ये प्लॅस्टिकचा वापर कुठेही नाही हे एक लक्षात आलं. एक प्लॅस्टिकचा टब दिसला एकदा. तसंच मेटलही दिसत नाही विशेष. फूड प्रेपकरता वापरते ती बरीच भांडी लाकडाची आहेत आणि अतिशय सुंदर आहेत.
तिच्या आजीची मात्र मजा आहे. तिला गरम गरम काय मस्त जेवायला मिळतं.

Pages