मराठी चित्रपट: काही भावलेले, काही न झेपलेले (संवाद/दृश्ये/गाणी इत्यादी)

Submitted by अतुल. on 31 July, 2018 - 06:11

रवा एका मित्राबरोबर गप्पा मारत होतो. विषय निघाला जुन्या मराठी चित्रपटांचा. पूर्वीचे काही चित्रपट किती जडशिळ होते (आजकालच्या हलक्याफुलक्या चित्रपटांच्या तुलनेत). भावनिक गुंतागुंत, नात्यांतील समस्या, परंपरा, प्रतिष्ठा, मानअपमान, अहंकार इत्यादी गोष्टीना दिलेले अवाजवी महत्व. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंती आणि नाट्य. असे साधारण स्वरूप असे. चित्रपटाचे मुख्य पात्र म्हणून सगळ्यांना आवडणारी आनंदी ठेऊ पाहणारी एखादी व्यक्ती असायची. चित्रपटभर तिला अनेक समस्या. त्रास त्रास त्रास नुसता. मग शेवटी कुणालातरी वाचवताना किंवा इतरांच्या सुखासाठी वगैरे तिलाच मरण येणार. मग त्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील आधीचेच एखादे आनंदी गाणे "टेंपो स्लो" करून दु:खद पार्श्वगीत म्हणून वाजत राहणार. सगळे प्रेक्षक डोळ्यात पाणी आणून जड मनाने चित्रपटगृहाबाहेर जाणार. असा एकंदर मामला असलेले खूप चित्रपट होते. किंबहुना तो काळच तसा होता. यावर या मित्राने मला सहज विचारले, "तू अंगाई चित्रपट पहिला आहेस का? गावच्या पाटलांची सून गाव दुष्काळमुक्त व्हावे म्हणून आपल्या बाळासहित बलिदान देते". त्याने असे सांगितल्यावर एक खूप जुनी आठवण जागी झाली. अंगाई हा चित्रपट पाहिला तर नव्हता. पण लहानपणी या चित्रपटाची खूप चर्चा होती ते मात्र आठवले. (त्या काळात चित्रपट गाजला कि त्याची चर्चा वर्षानुवर्षे चालत असे). मनात विचार आला कि असे चित्रपट तेंव्हा का निघत असावेत? कदाचित अशा घटना कुठेतरी घडल्या असाव्यात असे उगीचच वाटून गेले. आज इतक्या वर्षांनी हा चित्रपट अनेकांच्या विस्मरणात गेला आहे. पण सहज म्हणून युट्युब वर शोधला आणि मिळाला. ते सुद्धा अत्यंत उत्कृष्ट दर्जा मध्ये:

https://www.youtube.com/watch?v=znBfvU-Lztg

घाईघाईने पाहायला सुरवात केली. आणि माझा अंदाज खरा ठरला. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात एक विलक्षण घटना घडली होती. त्यावर आधारित तो चित्रपट होता. या चित्रपटात दाखवलेल्या अनेक गोष्टी आजच्या काळात विचित्र वाटतात. मनाला अजिबात पटत नाहीत. पण दोन-अडीचशे वर्षापूर्वीची परिस्थिती, त्याकाळातील लोकांची मानसिकता, तेंव्हाचे वातावरण, सामाजिक रचना या सगळ्याचा विचार केला तर त्याकाळात अशी अथवा अशा प्रकारची घटना घडली असावी हे पटू लागते.

गावात दुष्काळ पडलेला असतो. पाण्यावाचून हवालदिल झालेले गावकरी गाव सोडायच्या विचारात असतात. तेंव्हा गावचे पाटील त्यांना धीर देतात. गावाशेजारी तलाव खोदायचे सुचवतात. गाव सगळे मेहनत करते तलाव खणला जातो. पण त्याला पाणी लागत नाही. शेवटी ग्रामदैवत पाटलांना स्वप्नात दृष्टांत देते आणि सांगते ओल्या बाळंतिनीचा बळी दिल्याशिवाय पाणी लागणार नाही. गावात कोणीच ओली बाळंतीण मिळत नाही. मग शेवटी पाटलांची सूनच रात्री बाळासहित तलावापाशी जाऊन अंगाई म्हणत उभी राहते. तोच तलावाला पाझर फुटतो. पाणी वाढू लागते. त्यात तिचा आणि बाळाचा बळी जातो. असे शेवटी खूप विदारक दाखवले आहे. तलावाला पाणी लागलेले असते पण गावकरी रडत उभे असतात आणि पार्श्वभूमीवर अंगाई ऐकायला येत असते. वगैरे. (हि घटना सत्यकथेवर आधारलेली असून आजही या गावात त्या पाटलांचे वंशज राहतात असे चित्रपटात सांगितले आहे. अलीकडेच तिथे त्या तळ्याच्या पाण्यातील गाळ काढताना पुरावे आढळले वगैरे बातम्या आल्या होता. पण आज काळ खूप बदलला आहे. अर्थातच कधीकाळी या गावात असे काही घडले असेल यावर कोणाचा विश्वास बसणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे दोन-अडीचशे वर्षांपूर्वी तिथे नक्की काय घडले व कसे घडले हे गूढ कदाचित कायमचेच काळाच्या गुलदस्त्यातच राहील)

पण किती अतिभावविवश आणि जड चित्रपट असायचे. आज जर या घटनेवर चित्रपट काढला तर तो नक्कीच वेगळ्या धाटणीचा असेल हे मात्र खरे. पूर्वीच्या अशा अनेक चित्रपटांत इंटेन्स दृश्ये आणि संवाद असायचे. त्या काळात ते लोकांना आवडायचे सुद्धा. पण आज यातले खूप चित्रपट पाहवत सुद्धा नाहीत. डोके जड होते. काही काही दृश्ये तर आजच्या काळात मनाला पटत सुद्धा नाहीत. आणि याउलट काही चित्रपट असे आहेत कि इतका काळ उलटून गेला तरी आजदेखील पाहायला छान वाटतात. त्यातले संवाद/गाणी मनाला आजही भावतात.

तर अशाच काही न झेपलेल्या किंवा खूप भावलेल्या मराठी चित्रपटांवर आणि त्यातल्या अशा दृश्यांवर गाण्यांवर वगैरे चर्चा करण्यासाठी हा धागा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवांतर ...
टू पीस बिकिनी = पिवळा पीतांबर
ब्रह्मचारी मध्ये नायिकेने बिकिनी घातला नाहीये
(काय हे, पुर्शांनी बैकांना फॅशनचे धडे द्यायची वेळ यावी?...)
अवांतर समाप्त

अहो ते कॅडबरीचं चॉकलेट सारखं म्हटलं होतं
मिनाक्षीताईंनी बेदिंग सूट घातला होता आणि तो एकतुकडीय होता याची पूर्ण जाणीव आहे ☺️☺️☺️

चित्रपट : हेच माझे माहेर
कलाकार : रवींद्र महाजनी, मधु कांबीकर, मोहन गोखले, सुलभा देशपांडे, अशोक सराफ
तर चित्रपटाची कथा सुरु होते अनाथ मधु कांबीकर आणी रवींद्र महाजनी यांच्या लग्नाने. काही दिवसांनंतर सासू (सुलभा देशपांडे), सासूपणा गाजवायाला सुरु करते. दरम्यान या जोडप्याला एक मुलगा होतो आणि ते ठरवतात कि त्याला डॉक्टर करायचे. इकडे सासू सुनेच्या भांडणात बिचारा नवरा पिचून जातो आणि रागात घरातून स्कुटरवर निघून जातो, अपघात होऊन त्यात मरण पावतो.
आता मोठे होऊन डॉक्टर होण्याची जबाबदारी त्या मुलावर येऊन पडते. आणि काय आश्चर्य मोहन गोखले कादंबऱ्या वाचून डॉक्टर बनतो.

अवांतर : या चित्रपटातील "रंग अबोली लाज गाली" हे गाणे फार सुंदर आहे.

रणांगण नावाचा सिनेमा प्राईम वर आहे. महागुरू आणि लघुगुरू दोघेही आहेत. फेसबुकवर त्याचं परीक्षण व्हायरल झालेलं. लघुगुरू उर्फ लव्हगुरू म्हणजे आपला झबा याच्याकडे कुठलीतरी विशेष शक्ती असते. तो बासरी वाजवून आणि खीर खायला देऊन मूल होत नसलेल्यांना प्रेग्नंट करत असतो. >>>>>>>>>
रणांगण चित्रपट पाहिला त्यात महागुरू आणि लघुगुरू आहेत. महागुरू तरुणपणी चक्क मुक्ता बर्वे या शिक्षिकेच्या प्रेमात पडतात (महागुरूंना तरुणपण दाखवण्यासाठी जास्त काळे केस (डाय केलेले) आणि एक मिशी, शर्ट पॅन्ट पुरते) पण ते केवळ टाईमपास म्हणून तिच्याकडे पाहतात. मुक्ताई प्रेमाच्या प्रतिकाला जन्म देते पण महागुरू ते नाकारतात. आणि कुणाला खरे नाही वाटणार पण हो ते प्रतीक मोठे होऊन लघुगुरू होतात. त्यांचे वय पूर्ण सिनेमात पंचवीस आहे.

होऊन डॉक्टर होण्याची जबाबदारी त्या मुलावर येऊन पडते. आणि काय आश्चर्य मोहन गोखले कादंबऱ्या वाचून डॉक्टर बनतो.>>>>>>>>
पुढे जाऊन तो प्रिया तेंडुलकर (की अर्चना जोगळेकर) बरोबर लग्न करतो आणि कंबिकर बाईंच्या नशिबी परत सूनवास येतो

चित्रपट : देवता
कलाकार : रवींद्र महाजनी, आशा काळे, महेश कोठारे, प्रिया तेंडुलकर
या चित्रपटात रवींद्र महाजनी एका डाकूंच्या टोळी सरदार असतो. आणि रिवाजाप्रमाणे टोळीत एक तरुणी साथीदारही असते जिचे सरदारावर प्रेम असते. परंतु रवींद्र महाजनीने आशा काळेसोबत लग्न केल्यामुळे कथेत प्रेमाचा त्रिकोण येतो आणि कोणाचेतरी बलिदान आवश्यक ठरते.
पोलिसांबरोबरीच्या चकमकीत डाकूंची टोळी नाश पावते. काही साथीदार पकडल्या जातात परंतु सरदार आपल्या बायकोसोबत पळून जाण्यात यशस्वी होतो. तो आपल्या सासऱ्याकडे नादात मागतो तेव्हा सासरा त्याला एका अटीवर मदत करायला तया होतो कि त्याने हा मार्ग सोडून द्यावा. रवींद्र महाजनी त्याची अट स्वीकारून शहरात बांधकाम व्यवसाय सुरु करतो. त्याचे साथीदार मात्र जेलमध्ये जातात.
आता हा जर एवढा मोठा डाकू असतो तर शहरातील पोलीस किंवा पूर्ण पोलीस यंत्रणा त्याला कशी ओळखू शकत नाही.

अवांतर : या चित्रपटातील "ढोलकीच्या तालावर" ही लावणी त्या काळी फार गाजली होती.

यातच ते 'मी असो, ती असो, कुणी असो' गाणे आहे ना? भारी फनी सिच्युएशन आहे तीत. गाणे गंभीर पण पाहताना हसायला येते.

अवांतर : या चित्रपटातील "ढोलकीच्या तालावर" ही लावणी त्या काळी फार गाजली होती. >> आणि खेळ कुणाला दैवाचा कळला... हे गाणं सुद्धा खूप गाजलं होतं...

या धाग्याचे शिर्षक बदलून 'मराठि चित्रपटांविषयी चर्चा" असं करायला हवंय.

अपराध नावाचा एक सिनेमा पण आला होता ज्यात रमेश देव आणि सीमा देव होते.
यात या दोघांना श्रीमंत व्हायचे असते म्हणून सीमा देव, रमेश देव ला आपल्या एका श्रीमंत पेशंटला जाळ्यात अडकवून प्रेमाचे नाटक करायला सांगते, (ती स्वत: नर्स असते)
पण रमेश त्या पेशंटच्या खरोखरी प्रेमात पडतो...
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला आणि सूर तेच छेडीता ही दोन गाजलेली गाणी.

@साधना तुम्ही म्हणता तो जयश्री गडकर चा चित्रपट होता की माहीत नाही की ज्यात तिला एका मागोमाग एक दोन मुले (ती पण काही वेळाच्या अंतराने) होतात, त्या चित्रपटात बहुतेक अरूण सरनाईक हिरो होते. पहिले मुल जन्माला येते. ते मृत आहे असे समजून त्याला स्मशानात घेऊन अरूण सरनाईक जातात आणि स्मशानातल्या माणसाकडे त्याला सोपवून निघून जातात. (त्याने त्याचे क्रियाकर्म केले की नाही हे पहात पण नाहीत). पण ते बाळ जिवंत असते आणि स्मशानातला माणूस त्याला चांगला पाकीटमार बनवतो. परत जाताना पुर आल्यामुळे सरनाईक कोठेतरी भरकटतात. त्यांची आणि त्यांच्या बायकोची ताटातूट होते. ते ज्यावेळी स्मशानात जातात त्यावेळी इकडे बायकोला दुसरे मुल होते. नर्स बाई तिला पहिल्या मुलाबद्दल काहीच सांगत नाही म्हणुन तिला या बाळाच्या आधी एकाचा जन्म झाला हे माहित नसते. इकडे सरनाईकलाही माहीत नसते की त्याला दुसरे मुल झाले आहे ते. कालांतराने पाकिटमार झालेला पहिला मुलगा सरनाईकचेच पाकीट मारतो आणि मग स्मशानतल्या त्याला सांभाळणार्‍या माणासाला उपरती होऊन तो मुलगा त्याच्या बापाकडे (म्हणजे अरूण सरनाईक कडे) पाठवतो. त्याच वेळी सरनाईकला त्याची बायको आणि दुसरा मुलगा भेटतात. मग दोघांची नक्की मुलगा कोण यावर भांडणे, कोर्ट केस, नर्सचा कबुलीजबाब, शेवट गोड वगैरे वगैरे होते. एकदम युनिक स्टोरी होती..!! ह्या चित्रपटाचे नाव काय होते?

बाकी अरूण सरनाईक यांचा तोतया आमदार म्हणून एक चित्रपट होता. त्यात कुलदीप पवार आणि उषा नाईकही होते. एकदम हॉरिबल चित्रपट...

कुणी कुलदीप पवार यांचा एक डबल मिनींगचे भरपूर डायलॉग असलेला चित्रपट पाहीला आहे का? चित्रपटाचे नाव आठवत नाही पण दादा कोंडके ही लाजतील एवढे धमाल डायलॉग होते. त्यात एक प्रसंग असा काहीतरी होता. थोडा वाह्यात प्रसंग आहे त्याबद्दल आधीच सॉरी म्हणतो...पण तरीही सांगतो. ह्या चित्रपटात पद्मा चव्हाण गावाच्या पाटलाची बायको असते. आख्या गावाची तिच्यावर नजर असते पण सगळे पाटलाला टरकून असतात. एकदा पाटील गावातल्या एका बारक्याला सांगतात, "जरा मी आत्ता कामात आहे पटकन माझ्या घरी जा. पाटलीण बाई तुझी आठवण काढत आहेत, जरा मारून दे". त्या बारक्याचे अविश्वासाने डोळे पांढरे होतात... दोन-चार वेळा पाटलाला विचारतो. मीच जाऊ ना? पाटील शेवटी रागाने त्याला सांगतात, "पाटलीण बाई तुझ्या शिवाय कोणाकडून ही मारून घेणार नाहीत". हा बारक्या दबकत पाटलाच्या वाड्यावर जातो. पद्मा चव्हाण तोर्‍यात उभी असते. त्याच्यावर का आलास म्हणून खेकसते. बारक्या घाबरत म्ह्णणतो की पाटील साहेबांनी पाठवले आहे. ते म्हणाले की तुम्ही माझीच आठवण काढत होतात मारून द्यायला. एकदम पद्मा चव्हाण विरघळते, म्हणते त्याला गोडीने सांगते बरे झाले तू आलास मारायला. जरा कपडे काडून तयार हो मी आलेच. असे म्हणून आत जाते. इकडे बारक्या पाणी पाणी झालेला...अंगावरचा शर्ट काढून तयार आणि आतून पद्मा चव्हाण हातात इस्त्री घेऊन येते आणि म्हणते अरे दोरीवरचे कपडे काढ आणि इस्त्री मारून दे पटकन...!! सॉलीड हसलो होतो.....

तुम्हाला अरुण सरनाईक आठवतोय, मला जयश्री आठवतेय म्हणजे दोघेही असावीत. मलाही अरुण सरनाईक असल्याचे आठवतेय. पण खूप खूप वर्षे झाली पाहून. एकदाच पाहिलाय. त्यामुळे कथा नीट आठवत नाही.

सिंहासन पाहीला तेव्हा पहाताना ठीक / चांगला / ओके वाटला. पण नंतर दोन दिवस वगैरे त्याचा हँगओव्हर राहिला होता. असा हँगओव्हर राहिलेला, मी पाहिलेला पहिला सिनेमा. मग माझ्यासाठी ती कुठल्याही कलाकृतीच्या चांगल्या-वाईटाचा मापदंड ठरवणारी व्याख्याच झाली.

देवता मुव्ही मध्ये रवींद्र महाजनी चा मुलगा डॅमईट आणि त्याची गर्लफ्रेंड प्रिया तेंडुलकर च एक गाणं आहे. त्यात डॅम ईट स्कुटर चालवत असतो आणि प्रिया साडी नेसून मागच्या सीट वर चक्क उभी असते त्याच्या गळ्यात हात घालून.... हे सुरुवातीला च आहे अगदी आणि आम्ही असे हसलेलो. नंतर चा डान्स पण भयानक च आहे....

दे टाळी मला
घे टाळी तुला
तुझी अन माझी प्रीत आगळी
सांगू या जगाला

'दृष्ट लागण्याजोगे सारे' वाला सिनेमा कुठला? ती हिरोईन जाम क्यूट होती. एकदम नाजूक. हिरो थोडा विचित्र अॅक्टिंग करायचा.

ऑ,
डॅमिट हा महेश कोठारे ना? तो महाजनी चा मुलगा कसा असेल?
महाजनी चा मुलगा काश्मिर का गश्मिर बद्दल म्हणायचंय का तुला?

'दृष्ट लागण्याजोगे सारे' नेमके हेच गाणे गुणगुणत होतो आता. अजिंक्य देव आणि मुग्धा चिटणीस. कित्ती कित्ती लाजणारी. हा हा हा. खूप मस्त चित्रण आणि गाणे सुद्धा. चित्रपट: माझं घर माझा संसार.

त्यात अजिंक्य देव आहे? मग तो विचित्र अॅक्टिंग करणारा हिरो कशात आहे?? Uhoh
बादवे 'दृष्ट लागण्याजोगे सारे' माझं पण फेवरेट गाणं आहे.
'पाहिले न मी तुला' पण छान आहे.

योगी तुमची कुलदिप पवार ची पोस्ट वाचली. मला तो चित्रपट नाही माहिती, पण मराठी चित्रपटात एक काळ असा द्वैर्थी संवादांचा होता. तो काळ आणला दादा कोंडके यांनी.
त्यांचे बरेचसे सिनेमे आपल्या कथेनुसार नाही आठवत (मी सर्व रौप्य महोत्सवी सिनेमे पाहिले आहेत त्यांचे) त्यातल्या एका सिनेमात दादा कोंडकेंची १०० ची नोट हरवते (पाकिट मारलं या शब्दानुसार) ते सिनेमात माझी नोट मारली या धर्तीवर तो संवाद म्हणतात. तेव्हा एक भाजीवाली म्हणते की मी इथे रोज भाजी घेऊन बसते, पण माझी (नोट) कधी कुणी मारली नाही, तुझी कशी मारली? या वरून त्या चित्रपट बनवताना सेन्सॉर बोर्डात गदारोळ उठला होता आणि तो संवाद चित्रपटातून काढून टाकला जावा यासाठी बैठक घेण्यात आली. माझ्या आठवणीनुसार ( मी वाचल्याप्रमाणे) तेव्हा त्या बोर्डावर वंदना विटणकर होत्या.
दादांनी एक उदा. दिले की कुणाची सोन्याची चेन पाहिल्यावर आपण ही सोन्याची चेन कधी घेतली? हि सोन्याची चेन केवढ्याला मिळाली? असे प्रश्न विचारत नाही तर पहिल्या प्रश्नात त्याबद्दल जो उल्लेख होतो त्याला ओघात घेऊन पुढचे प्रश्न विचारतो, उदा. सोन्याची चेन कधी घेतली? केवढ्याला पडली. इ. हा युक्तिवाद पचनी पडला नाही पण त्यावर प्रतिवाद करता न आल्याने तो संवाद चित्रपटात जसा च्या तसा ठेवण्यात आला, कारण दादा कोंडके पहिल्या वाक्यात माझी नोट कुणितरी मारली हे स्पष्ट करतात...

पोस्ट अवांतर किंवा अश्लिल वाटल्यास उडवण्यात येईल, पण कधी काळी द्वैर्थी संवाद हा मराठी चित्रपटांचा कणा होता. मुख्य म्हणजे ग्रामिण लोक त्याच्याबरोबर खूप रिलेट करत. त्यांच्या अंगमेहनतीच्या कामानंतर त्यांना हाच विरंगुळा वाटल्याने, त्या लोकांनी दादा कोंडके यांना अनेक वर्ष डोक्यावर घेतले होते. आणि दादांनी सुद्धा ही नस पकडून चित्रपटसृष्टित आपला एक वेगळा ठसा उमटवला होता.

पुढे प्रेक्षक सुजाण झाले आणि मराठी चित्रपटांची धाटणी बदलली आणि ती आजही काळानुसार बदलते आहे.

द्वैअर्थी संवादात डोकं लावलं असेल तरच त्याला दाद मिळते. त्या काळात दादांनी पहिलटकरीण असल्याचा फायदा उचलला. अर्थात ग्रामीण शैलीमुळे ते सहज वाटतात. यात जरा जरी बेअरींग ढासळलं तर सगळंच फसतं.

त्यात अजिंक्य देव आहे? मग तो विचित्र अॅक्टिंग करणारा हिरो कशात आहे?? >>>

तो खिचडी मधला शेखर नाईक असेल. दोघांची उंची सारखीच आहे. शेखर वडिलांची पुण्याई म्हणून त्यांनी निर्मिलेल्या चित्रपटात झळकला. खिचडी मी पाहिलाय पण आता काही आठवत नाही. अशोक सराफचा डबल रोल, एक शहरी व एक ग्रामीण. ग्रामीण सूड घेतो असे काहीसे असल्याचे आठवते.

शेखर नाईक नंतर दिग्दर्शक झाला बहुतेक.

>> Submitted by दक्षिणा on 9 August, 2018 - 20:23

+११११

अनेकांना दादांचा हा द्विअर्थी ट्रेंड कधी भावला नाही (मी त्यातलाच एक). कारण त्यामुळे मराठी चित्रपटाने उंची गाठली किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकने जाऊन त्यामुळे मराठी चित्रपटांची पत वाढली वगैरे काहीच झाले नाही, म्हणून. पण हेच चित्रपट महाराष्ट्रात खेड्यापाड्यांत धो धो चालले हि वस्तुस्थिती आहे. विशेष म्हणजे आज त्यातलीच गाणी मी सतत ऐकत असतो. फारच गोड आहेत काही काही. तेंव्हा वाटते बाकी काही असले तरी ओरिजिनल मराठी होते दादा.

खिचडीधे अशोक सराफ चा सिंगल रोल आहे
तो dr लागुंचा मुलगा असतो त्याला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी शिक्षा म्हणून घराबाहेर काढतात,
त्यानची बाकी मुले नाठाळ निघतात,
मग मोठा अशोक सराफ परत येऊन सगळे नीट करतो अशी स्टोरी होती

यात जरा जरी बेअरींग ढासळलं तर सगळंच फसतं. >> सुदैवाने किंवा दुर्दैवाने द्वैर्थी संवादीक चित्रपटांचं बेअरिंग ढासळलेलं मी पाहिलं नाहिये. तशी उदा. असतील कदाचित.

Pages