मराठी चित्रपट: काही भावलेले, काही न झेपलेले (संवाद/दृश्ये/गाणी इत्यादी)

Submitted by अतुल. on 31 July, 2018 - 06:11

रवा एका मित्राबरोबर गप्पा मारत होतो. विषय निघाला जुन्या मराठी चित्रपटांचा. पूर्वीचे काही चित्रपट किती जडशिळ होते (आजकालच्या हलक्याफुलक्या चित्रपटांच्या तुलनेत). भावनिक गुंतागुंत, नात्यांतील समस्या, परंपरा, प्रतिष्ठा, मानअपमान, अहंकार इत्यादी गोष्टीना दिलेले अवाजवी महत्व. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंती आणि नाट्य. असे साधारण स्वरूप असे. चित्रपटाचे मुख्य पात्र म्हणून सगळ्यांना आवडणारी आनंदी ठेऊ पाहणारी एखादी व्यक्ती असायची. चित्रपटभर तिला अनेक समस्या. त्रास त्रास त्रास नुसता. मग शेवटी कुणालातरी वाचवताना किंवा इतरांच्या सुखासाठी वगैरे तिलाच मरण येणार. मग त्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील आधीचेच एखादे आनंदी गाणे "टेंपो स्लो" करून दु:खद पार्श्वगीत म्हणून वाजत राहणार. सगळे प्रेक्षक डोळ्यात पाणी आणून जड मनाने चित्रपटगृहाबाहेर जाणार. असा एकंदर मामला असलेले खूप चित्रपट होते. किंबहुना तो काळच तसा होता. यावर या मित्राने मला सहज विचारले, "तू अंगाई चित्रपट पहिला आहेस का? गावच्या पाटलांची सून गाव दुष्काळमुक्त व्हावे म्हणून आपल्या बाळासहित बलिदान देते". त्याने असे सांगितल्यावर एक खूप जुनी आठवण जागी झाली. अंगाई हा चित्रपट पाहिला तर नव्हता. पण लहानपणी या चित्रपटाची खूप चर्चा होती ते मात्र आठवले. (त्या काळात चित्रपट गाजला कि त्याची चर्चा वर्षानुवर्षे चालत असे). मनात विचार आला कि असे चित्रपट तेंव्हा का निघत असावेत? कदाचित अशा घटना कुठेतरी घडल्या असाव्यात असे उगीचच वाटून गेले. आज इतक्या वर्षांनी हा चित्रपट अनेकांच्या विस्मरणात गेला आहे. पण सहज म्हणून युट्युब वर शोधला आणि मिळाला. ते सुद्धा अत्यंत उत्कृष्ट दर्जा मध्ये:

https://www.youtube.com/watch?v=znBfvU-Lztg

घाईघाईने पाहायला सुरवात केली. आणि माझा अंदाज खरा ठरला. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात एक विलक्षण घटना घडली होती. त्यावर आधारित तो चित्रपट होता. या चित्रपटात दाखवलेल्या अनेक गोष्टी आजच्या काळात विचित्र वाटतात. मनाला अजिबात पटत नाहीत. पण दोन-अडीचशे वर्षापूर्वीची परिस्थिती, त्याकाळातील लोकांची मानसिकता, तेंव्हाचे वातावरण, सामाजिक रचना या सगळ्याचा विचार केला तर त्याकाळात अशी अथवा अशा प्रकारची घटना घडली असावी हे पटू लागते.

गावात दुष्काळ पडलेला असतो. पाण्यावाचून हवालदिल झालेले गावकरी गाव सोडायच्या विचारात असतात. तेंव्हा गावचे पाटील त्यांना धीर देतात. गावाशेजारी तलाव खोदायचे सुचवतात. गाव सगळे मेहनत करते तलाव खणला जातो. पण त्याला पाणी लागत नाही. शेवटी ग्रामदैवत पाटलांना स्वप्नात दृष्टांत देते आणि सांगते ओल्या बाळंतिनीचा बळी दिल्याशिवाय पाणी लागणार नाही. गावात कोणीच ओली बाळंतीण मिळत नाही. मग शेवटी पाटलांची सूनच रात्री बाळासहित तलावापाशी जाऊन अंगाई म्हणत उभी राहते. तोच तलावाला पाझर फुटतो. पाणी वाढू लागते. त्यात तिचा आणि बाळाचा बळी जातो. असे शेवटी खूप विदारक दाखवले आहे. तलावाला पाणी लागलेले असते पण गावकरी रडत उभे असतात आणि पार्श्वभूमीवर अंगाई ऐकायला येत असते. वगैरे. (हि घटना सत्यकथेवर आधारलेली असून आजही या गावात त्या पाटलांचे वंशज राहतात असे चित्रपटात सांगितले आहे. अलीकडेच तिथे त्या तळ्याच्या पाण्यातील गाळ काढताना पुरावे आढळले वगैरे बातम्या आल्या होता. पण आज काळ खूप बदलला आहे. अर्थातच कधीकाळी या गावात असे काही घडले असेल यावर कोणाचा विश्वास बसणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे दोन-अडीचशे वर्षांपूर्वी तिथे नक्की काय घडले व कसे घडले हे गूढ कदाचित कायमचेच काळाच्या गुलदस्त्यातच राहील)

पण किती अतिभावविवश आणि जड चित्रपट असायचे. आज जर या घटनेवर चित्रपट काढला तर तो नक्कीच वेगळ्या धाटणीचा असेल हे मात्र खरे. पूर्वीच्या अशा अनेक चित्रपटांत इंटेन्स दृश्ये आणि संवाद असायचे. त्या काळात ते लोकांना आवडायचे सुद्धा. पण आज यातले खूप चित्रपट पाहवत सुद्धा नाहीत. डोके जड होते. काही काही दृश्ये तर आजच्या काळात मनाला पटत सुद्धा नाहीत. आणि याउलट काही चित्रपट असे आहेत कि इतका काळ उलटून गेला तरी आजदेखील पाहायला छान वाटतात. त्यातले संवाद/गाणी मनाला आजही भावतात.

तर अशाच काही न झेपलेल्या किंवा खूप भावलेल्या मराठी चित्रपटांवर आणि त्यातल्या अशा दृश्यांवर गाण्यांवर वगैरे चर्चा करण्यासाठी हा धागा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठी नाही. पण नुकताच हिंदी सिनेमा येऊन गेला एक. त्याचं ट्रेलर पाहीले होते अभिरुचीला. ग्रॅण्डमस्ती.

तो खिचडी मधला शेखर नाईक असेल. दोघांची उंची सारखीच आहे. >>>> असेल मग. मला त्याचं ते 'प्रेमासाठी झुकले खाली धरणीवर आकाश' गाणं आठवतंय.

प्रेमासाठी झुकले .... खिचडीच.

खिचडीचे कथानक अजिबात आठवत नाहीय, पण अ स चा डबल रोल त्यात नसेल तर मग कुठल्या दुसऱ्यात असेल. कारण असे कॉम्बो पाहिल्याचे आठवतेय पण कुठे हे नाही.

मुक्ता बर्वे, सुबोध भावे व सराफचा एक चित्रपट होता, फुल्ल कॉमेडी... त्यात अ स ला म्हातारपणी किशोरी शहाणे भेटते व तिच्याबरोबर तरुणपणातले प्रेम आठवते. त्या निमित्ते त्या दोघांच्या जुन्या चित्रपटातले गाणे दाखवलंय या चित्रपटात .

अशोक सराफचा डबल रोल असलेला सिनेमा म्हणजे अनपेक्षित. त्याच्यासोबत नितिश भारद्वाज, अर्चना जोगळेकर आणि रेखा राव होते त्यात. सो कॉल्ड सस्पेन्स थ्रिलर होता. बाप अशोक सराफ मंत्री असतो आणि त्याचा अनौरस मुलगा अशोक खुनी. अर्चना जोगळेकर त्याला खून करताना पाहते आणि त्यामुळे तो तिच्या मागे लागतो अशी कथा होती.

येस, हाच होता.

दक्षे हो ग, मघाशी नाव आठवत नव्हते. गुगलला माहीत होते, त्याने सांगितले.

अशोक सराफ आणि निशीगंधा वाडचा एक सिनेमा होता. त्यात ती साऊथ इंडियन असते आणि तो दारूच्या नशेत तिला लग्न करून घरी आणतो.
त्यात तिचे "बापूसायबा" वाले डायलाॅग्ज छान आहेत.
त्यात एसिपी प्रद्युम्न पण आहेत हो. Wink

अशोक सराफ, महागुरु पिळगावकर (काय समर्पक आडनाव आहे!) आणि लक्ष्मिकांत बेर्डे यांचा 'भुताचा भाऊ' नावाच एक सिनेमा आठवतो का कोणाला? विजू खोटे, अनंत जोग आणि सुधीर जोशी हे व्हिलन अशोक सराफचा खून करतात आणि मग तो भूत होतो. सचिन त्याचा धाकटा भाऊ असतो आणि लक्ष्मिकांत बेर्डेला व्हिलन त्रिकूट भावाची अ‍ॅक्टींग करण्यासाठी आणतात अशी काहीतरी स्टोरी होती. त्यातला आठवणारा सीन म्हणजे भूत झालेला अशोक सराफ सुधीर जोशीच्या पार्श्वभागावर चहा ओततो तेव्हा सुधीर जोशीचा डायलॉग, "अहो कुणीतरी उकळता चहा माझ्या बसायच्या जागेवर ओतला हो.."

पिंजरा हा मला न पटणारा, अतीरंजित सिनेमा वाटतो. श्रीराम लागूच्या पात्राची त्याच्या तत्त्वांवरची निष्ठा अत्यंत ठिसूळ आहे असे वाटते. संध्याचे दिसणे, बोलणे असहय होते! ती म्हणे अत्यंत सुंदर तमासगीर बाई असते!
मास्तराला मास्तराच्या खुनाकरता शिक्षा होणे आणि आरोपी हाच मास्तर आहे हे कुणालाही ओळखता न येणे म्हणजे आचरटपणाची कमाल आहे. नाट्यमय क्लायमॅक्स ऐवजी एक हास्यास्पद प्रसंग वाटतो.

गाणी मात्र सुरेल, अविस्मरणीय. व्ही शांतारामने दादा कोंडकेच्या सोंगाड्याची टर उडवायला त्यात काही ओळी घातल्या आहेत असे ऐकले आहे. दाजिबा गावात होईल शोभा आणि बत्ताशा कशाला पिळतोस मिशा ह्या त्या ओळी. दाजिबा आणि बत्ताशा ही सोंगाड्यातील दादा कोंडके आणि निळू फुले ह्यांची नावे. (नंतर पांडू हवालदार ह्या सिनेमात पोलिसाला एका गटारात पिंजरा आणि चोळी सापडतात असा प्रसंग दाखवून दादांनी आपला हिशेब चुकता केला!)

गाणी मात्र सुरेल, अविस्मरणीय. व्ही शांतारामने दादा कोंडकेच्या सोंगाड्याची टर उडवायला त्यात काही ओळी घातल्या आहेत असे ऐकले आहे. दाजिबा गावात होईल शोभा आणि बत्ताशा कशाला पिळतोस मिशा ह्या त्या ओळी. दाजिबा आणि बत्ताशा ही सोंगाड्यातील दादा कोंडके आणि निळू फुले ह्यांची नावे. (नंतर पांडू हवालदार ह्या सिनेमात पोलिसाला एका गटारात पिंजरा आणि चोळी सापडतात असा प्रसंग दाखवून दादांनी आपला हिशेब चुकता केला!)
>>>>>>

'ढगाला लागली कळ' या गाण्यातली 'बघतोय संतू माळी' ही ओळपण दादांनी शांतारामना मारलेला टोमणाच आहे.

'धुंद मधुमती रात रे' हे कीचक वध सिनेमामध्ये असलेले गाणे आठवते आहे का कोणाला?
लतादिदींच्या आवाजात हे अप्रतिम गाणे आहे, पण का माहित नाही, त्यातला जो कीचक म्हणून जो कोणी पहिलवान आहे, त्याचा एकूण आवेश पाहता तो त्या सैरंध्रीला 'कंबरड्यात घालतो लाथ गे' म्हणेल असच वाटत राहतं कायम.

एक गाव धोबीपछाड का? >>>> गाव नाही ग बयो, डाव. मस्त विनोदी चित्रपट आहे. फुल्ल टू एंजॉय.

'ढगाला लागली कळ' या गाण्यातली 'बघतोय संतू माळी' ही ओळपण दादांनी शांतारामना मारलेला टोमणाच आहे. >>>>>> इस्कटून सांगा की.

यावरून आठवले कि दादा शिवसैनिक. एका चित्रपटात त्यांचा डायलॉग आहे, आमच्या वाघाने डरकाळी फोडली कि भल्याभल्यांची बारामतीपर्यंत पिवळी होते.

Submitted by डागदार अड्डावाला on 9 August, 2018 - 21:06
तो खिचडी मधला शेखर नाईक असेल. दोघांची उंची सारखीच आहे. >>>> त्या हिरोच नाव आज समजल. त्याचा चित्रपटामधला शेवटचा climax scene तर epic होता... 'आSSS ई' अस काहितरी ओरडतो भयंकर त्यांच्या आईला काहितरी होत किंवा पडते तेव्हा Lol

रिव्हर्स स्वीप , भुताचा भाऊ धर्मेंद्रच्या एका सिनेमावरून (गजब) काढला होता. फक्त त्यात धर्मेंद्र डबल रोल आहे. एक मतीमंद असतो , त्याचा खून होतो. दुसरा धर्मेंद्र त्याचा भाऊ असतो. हा सिनेमाही साऊथच्या एका सिनेमावरून आलेला.

मूळ सिनेमा : कल्याणरमण (तमिळ) बहुतेक कमल हसन आहे.

देवता चित्रपटात रवींद्र आणी महेश कोठारे पिता पुत्र आहेत तर थोरली जाऊ या चित्रपटात भाऊ भाऊ आहेत. आशा काळे देखील दोन्ही चित्रपटात आहे परंतु प्रिया तेंडुलकर थोरली जाऊ मधे आहे की नाही ते आता लक्षात नाही.

धर्मेंद्रचा ङबलरोलवाला सिनेमा आठवला. भुताचा भाऊ मध्ये त्यांची कॅरेक्टर्स उलटीपालटी केलेली आहेत. अशोक सराफ डॅशिंग असतो पण दारुच्या नशेमुळे मारला जातो तर सचिन एकदम घाबरट.

काही दिवसांपूर्वी मकरंद अनासपुरे आणि संजय नार्वेकर यांचा एक सिनेमा पाहिला. पंधरा - वीस मिनिटांनी एकदम स्ट्राईक झालेली गोष्ट म्हणजे हा धर्मेंद्र - अमिताभच्या अफलातून 'चुपके चुपके' चा भयाण मराठी अवतार होता. संपूर्ण सिनेमा डोक्याला शॉट आहे. नार्वेकर - अनासपुरेंनी धर्मेंद्र - अमिताभचं काम करण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे देवांग गांधी - विक्रम राठोड यांनी ग्रिनिज - हेन्स असल्यासारखी बॅटींग करण्याइतक हास्यास्पद वाटत होते.

हॉलीवूडवरून ढापाढापी समजू शकते. पण मराठी सिनेमावाल्यांनी आपल्या प्रेक्षला हिंदी काय कळतंय असं समजून ढापाढापी करणं म्हणजे..

भुताचा भाऊ मध्ये त्यांची कॅरेक्टर्स उलटीपालटी केलेली आहेत. अशोक सराफ डॅशिंग असतो पण दारुच्या नशेमुळे मारला जातो तर सचिन एकदम घाबरट. >>> हा पाहिलाय मी Lol सचिन आधी चष्मिष्ट आणि शामळू दाखवलाय आणि भुताच्या मदतीने अचानक एकदम हेय बेबी बेबी बेबी असं गाणं गात कॉलेज च्या गॅदरिंग मधे रॉक्स्टार टाइप पर्फॉर्म करतो ! अर्थात मराठीतला रॉकस्टार, तो पण सचिन च्या रुपात त्यामुळे तो पांढरी पँट घालून बायकी कंबर हलवत सुबल सरकार च्या स्टेप्स वरच नाचतो Lol

अनासपुरे चे बरेचसे चित्रपट रिमेक्स / इन्स्पायर्ड / उचललेले असतात असं माझं (शितावरून भाताची) मत झालय. कायद्याचं बोला, तुल शिकवीन चांगलाच धडा, दोघात तिसरा ई.

"कायद्याचं बोला मात्र झकास जमलाय." - हे लिहीणार होतो. खरय. First of a kind म्हणून जमला असावा किंवा इंटरनेट च्या विस्फोटाआधीचा काळ जेव्हा इंग्लिश सिनेमे, नेटफ्लिक्स वगैरे भारतात इतक्या मोठ्या प्रमाणात पोहोचलं नव्हतं म्हणून असेल. पण तो जमून गेला.

मरिसा टोमे च्या त्या गेट-अप चा शेवटच्या टेस्टीमनी शी काँट्रॅडिक्टरी असण्याशी खूप जवळून संबंध होता, तसा शर्वरी जमेनिस च्या बाबतीत झालं नाही. ती निव्वळ कॉपी वाटली. संजय मोने मात्र कधीच नाही आवडला. त्याच्या कॅरेक्टर ची गरजही नव्हती.

कायद्याचं बोला ' हां सिनेमा खरच खूप छान होता. दोघात तीसरा पण बरा आहे. पण काहीकाही प्रसंग अतिशय बोअर करतात

विषयांतराबद्दल क्षमस्व. दादा कोंडके शिवसेनेचे एकनिष्ठ अनुयायी कसे झाले ह्याची गोष्टही सिनेमाशी संबंधित आहे. त्यांच्या आत्मचरित्रात आहे. १९७१ साली सोंगाड्या प्रदर्शित झाला तेव्हा मुंबईतील कुठल्याशा मध्यवर्ती थेटरात तो लावला जाईल असा करार झाला होता. पण तो थेटरमालक अमराठी आणि अप्रामाणिक होता. त्याने ऐनवेळी नकार दिला. त्याला त्याच सुमारास प्रदर्शित झालेला तेरे मेरे सपने हा सिनेमा लावायचा होता. दादा कोंडक्यांनी त्याला विनवण्या केल्या, भांडले पण काही उपयोग झाला नाही. मग ते तक्रार घेऊन बाळासाहेब ठाकर्‍यांकडे गेले. ठाकर्‍यांनी त्या थेटर मालकाला बोलावले स्पष्टीकरण द्यायला बोलावले . पण त्या वेळेस बाळासाहेबांची कीर्ती इतकी मोठी नव्हती. तो मालक म्हणाला मै किसी ठाकरे वाकरे को नही जानता. उसे यहा बुलाओ! हे ऐकल्यावर बाळासाहेब खवळले. त्यांनी त्यांची माणसे पाठवून त्या थेटर मालकाची धुलाई केली. मार पडताच थेटर मालक सरळ झाला. दादांच्या आणि बाळासाहेबांच्या पाया पडला, माफी मागितली आणि ठरल्याप्रमाणे सोंगाड्या लावला. नंतरचेही अनेक सिनेमे बिनबोभाट लावले. (अर्थात सगळे सिनेमे गाजले त्यामुळे नुकसान झाले नाहीच)
पण ह्या प्रसंगानंतर दादा कोंडके बाळासाहेबांचे भक्त आणि शिवसेनेचे अनुयायी बनले. तोपर्यंत ते सेवादलात होते असे वाटते.

Pages