मराठी चित्रपट: काही भावलेले, काही न झेपलेले (संवाद/दृश्ये/गाणी इत्यादी)

Submitted by अतुल. on 31 July, 2018 - 06:11

रवा एका मित्राबरोबर गप्पा मारत होतो. विषय निघाला जुन्या मराठी चित्रपटांचा. पूर्वीचे काही चित्रपट किती जडशिळ होते (आजकालच्या हलक्याफुलक्या चित्रपटांच्या तुलनेत). भावनिक गुंतागुंत, नात्यांतील समस्या, परंपरा, प्रतिष्ठा, मानअपमान, अहंकार इत्यादी गोष्टीना दिलेले अवाजवी महत्व. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंती आणि नाट्य. असे साधारण स्वरूप असे. चित्रपटाचे मुख्य पात्र म्हणून सगळ्यांना आवडणारी आनंदी ठेऊ पाहणारी एखादी व्यक्ती असायची. चित्रपटभर तिला अनेक समस्या. त्रास त्रास त्रास नुसता. मग शेवटी कुणालातरी वाचवताना किंवा इतरांच्या सुखासाठी वगैरे तिलाच मरण येणार. मग त्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील आधीचेच एखादे आनंदी गाणे "टेंपो स्लो" करून दु:खद पार्श्वगीत म्हणून वाजत राहणार. सगळे प्रेक्षक डोळ्यात पाणी आणून जड मनाने चित्रपटगृहाबाहेर जाणार. असा एकंदर मामला असलेले खूप चित्रपट होते. किंबहुना तो काळच तसा होता. यावर या मित्राने मला सहज विचारले, "तू अंगाई चित्रपट पहिला आहेस का? गावच्या पाटलांची सून गाव दुष्काळमुक्त व्हावे म्हणून आपल्या बाळासहित बलिदान देते". त्याने असे सांगितल्यावर एक खूप जुनी आठवण जागी झाली. अंगाई हा चित्रपट पाहिला तर नव्हता. पण लहानपणी या चित्रपटाची खूप चर्चा होती ते मात्र आठवले. (त्या काळात चित्रपट गाजला कि त्याची चर्चा वर्षानुवर्षे चालत असे). मनात विचार आला कि असे चित्रपट तेंव्हा का निघत असावेत? कदाचित अशा घटना कुठेतरी घडल्या असाव्यात असे उगीचच वाटून गेले. आज इतक्या वर्षांनी हा चित्रपट अनेकांच्या विस्मरणात गेला आहे. पण सहज म्हणून युट्युब वर शोधला आणि मिळाला. ते सुद्धा अत्यंत उत्कृष्ट दर्जा मध्ये:

https://www.youtube.com/watch?v=znBfvU-Lztg

घाईघाईने पाहायला सुरवात केली. आणि माझा अंदाज खरा ठरला. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात एक विलक्षण घटना घडली होती. त्यावर आधारित तो चित्रपट होता. या चित्रपटात दाखवलेल्या अनेक गोष्टी आजच्या काळात विचित्र वाटतात. मनाला अजिबात पटत नाहीत. पण दोन-अडीचशे वर्षापूर्वीची परिस्थिती, त्याकाळातील लोकांची मानसिकता, तेंव्हाचे वातावरण, सामाजिक रचना या सगळ्याचा विचार केला तर त्याकाळात अशी अथवा अशा प्रकारची घटना घडली असावी हे पटू लागते.

गावात दुष्काळ पडलेला असतो. पाण्यावाचून हवालदिल झालेले गावकरी गाव सोडायच्या विचारात असतात. तेंव्हा गावचे पाटील त्यांना धीर देतात. गावाशेजारी तलाव खोदायचे सुचवतात. गाव सगळे मेहनत करते तलाव खणला जातो. पण त्याला पाणी लागत नाही. शेवटी ग्रामदैवत पाटलांना स्वप्नात दृष्टांत देते आणि सांगते ओल्या बाळंतिनीचा बळी दिल्याशिवाय पाणी लागणार नाही. गावात कोणीच ओली बाळंतीण मिळत नाही. मग शेवटी पाटलांची सूनच रात्री बाळासहित तलावापाशी जाऊन अंगाई म्हणत उभी राहते. तोच तलावाला पाझर फुटतो. पाणी वाढू लागते. त्यात तिचा आणि बाळाचा बळी जातो. असे शेवटी खूप विदारक दाखवले आहे. तलावाला पाणी लागलेले असते पण गावकरी रडत उभे असतात आणि पार्श्वभूमीवर अंगाई ऐकायला येत असते. वगैरे. (हि घटना सत्यकथेवर आधारलेली असून आजही या गावात त्या पाटलांचे वंशज राहतात असे चित्रपटात सांगितले आहे. अलीकडेच तिथे त्या तळ्याच्या पाण्यातील गाळ काढताना पुरावे आढळले वगैरे बातम्या आल्या होता. पण आज काळ खूप बदलला आहे. अर्थातच कधीकाळी या गावात असे काही घडले असेल यावर कोणाचा विश्वास बसणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे दोन-अडीचशे वर्षांपूर्वी तिथे नक्की काय घडले व कसे घडले हे गूढ कदाचित कायमचेच काळाच्या गुलदस्त्यातच राहील)

पण किती अतिभावविवश आणि जड चित्रपट असायचे. आज जर या घटनेवर चित्रपट काढला तर तो नक्कीच वेगळ्या धाटणीचा असेल हे मात्र खरे. पूर्वीच्या अशा अनेक चित्रपटांत इंटेन्स दृश्ये आणि संवाद असायचे. त्या काळात ते लोकांना आवडायचे सुद्धा. पण आज यातले खूप चित्रपट पाहवत सुद्धा नाहीत. डोके जड होते. काही काही दृश्ये तर आजच्या काळात मनाला पटत सुद्धा नाहीत. आणि याउलट काही चित्रपट असे आहेत कि इतका काळ उलटून गेला तरी आजदेखील पाहायला छान वाटतात. त्यातले संवाद/गाणी मनाला आजही भावतात.

तर अशाच काही न झेपलेल्या किंवा खूप भावलेल्या मराठी चित्रपटांवर आणि त्यातल्या अशा दृश्यांवर गाण्यांवर वगैरे चर्चा करण्यासाठी हा धागा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अविनाश खर्शीकर च एक गाणं आठवत आहे, ज्यात तों पायजमा घालून बागेत फ़िरत असतो. "येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील, तुझिया माझिया प्रेमाची पावती साखर चुंबन देशील ". >>> Lol

हा पिक्चर शोधून ताबडतोब पाहायची ऑर्डर जनहितार्थ जारी करत आहे येथील हौशी लोकांना. अविनाश खर्शीकर म्हणजे बंदिवान मी या संसारी मधला पुस्तक व आशा काळे प्रेमी? आकाचा प्रेमी असा रोल केलेला हीरो म्हणजे लास वेगास कल्चर मधे ज्याला "Shook Sinatra's hand" म्हणत तशा इलाइट कॅटेगरीतला. किंवा ब्रिटिश स्टेजवर किंग लिअर केलेला. किंवा नटसम्राट केलेला.

मी बिल्वा. Happy

बस यही अपराध मै हर बार करता हु, आदमी हु आदमी से प्यार करता हु. … हे गाणे सहज गुणगुणत असताना आईने पाठीत रट्टा दिलेला.. काय तरी भलते सलते गाऊ नकोस म्हणत..

चानी बघितला तेव्हा मीही सुशांत रेच्याच वयाची होते, त्यामुळे त्याला जसे चानीचे नक्की काय चाललेय हे कळत नाही तसे मलाही कळले नव्हते. त्यात तो भयानक विग… त्याचे प्रयोजनही कळले नव्हते.

नंतर बर्‍याच वर्षांनी चानी कादंबरी वाचली तेव्हा बर्‍याच गोष्टी कळल्या. चित्रपट किती प्रचंड टोन डाऊन केलाय हेही कळले.
चित्रपटाच्या नायिकेला सोज्वळ दाखवायचे तर मग अशा कथेवर चित्रपट काढायचाच नाही ना…

तिच्या तोंडची गाणी मुद्दाम रॉ ठेवली असावी. घराच्या, आईच्या मायेशिवाय वाढलेली असंस्कृत मुलगी कुठुन तालासुरात गाणार.

तो एक राजपुत्र, मी एक रानफुल गाणे गाजले होते. अजुनही विविधभारतीवर चानीतली गाणी लागतात.

ओह about that kavita type गाणी असा गूढ दृष्टिकोन होता का director चा Sad मला आपलं वाटायचं कि सगळ्या सिनेमातले सगळे जण सगळी गाणी, गाणी असल्या सारखी गातात मग हीच चानी का अशी गाते.

व्ही शांताराम यांना गाण्याची चांगली जाण होती.. चानीतील
सर्वच गाणी वेगळी आहेत, तबला पेटी वगैरे वाद्ये सोबतीला न घेता गाणी गायलेली आहेत. लता नसती तर ती गाणी इतर कोणालाही गाता आली नसती हेमावैम. Happy यमकात न बसणारे मुक्तकाव्य चालीत बांधायचे कठीण काम हृदयनाथ मंगेशकरांनी केलेय आणि लता गायला होती म्हणुन त्या गाण्यांचे घोडे गंगेत न्हायले.

जुन्या एकदम जुन्या ५०%सिनेमामध्ये एक सीन असायचा. हिरोईन वाड्यातल्या खांबाकडे किंवा देवळीत ल्या दिव्या कडे तोंड करून उभी असायची.हिरो मागून यायचा आणि एक वा क्य टाकायचा." एक माणूस रुसलंय वाटत ". हे सेन्टेन्स मला इतकं खटकायच की हे विधानार्थी वाक्य आहे का प्रश्नार्थी? मला ते विधानार्थी वाटायचं, अस वाटायचं की हिरो बाहेर काही झालंय आणि कोणीतरी त्याच्याशी बोलत नाहीये ते हिरोईन ला सांगतोय. पण हिरोईन स्वतः बाई असताना आणि वाक्यात माणूस असा शब्ब्द असताना सुद्धा तों आपल्याला च प्रश्न आहे अस समजून 'आम्ही नाही जा 'असं प्रश्नाशी irrelevant उत्तर लाजत द्यायची

Yes, बरोबर कार्तिका राणे छान होती एकदम, तुम्ही म्हणाल्यावर क्लिक झालं नाव,गायब च झालि एकदम नंतर ती.

आमच्या शेजारच्या वाड्यात एक वेडी बाई /मुलगी राहायची. ती तरुणपणी कॉलेज ला जायची तेव्हा तिचे affair होते पण घरचे लग्न करू देणार नाहीत हे कळल्यावर तिच्या प्रियकराने आत्महत्या केली आणि हिला वेड लागले अशी तिच्या बद्दल माहिती उडत उडत ऐकली होती. कट टु हा खेळ सावल्यांचा मूवी मधलं काजळ रातीन ओढून नेला गाणं Sad ते गाणं पाहिलं आणि माझ्या मनात लगेच त्याच कनेकशन त्या बाईशी लागलं. आमच्या वाड्यापाठी बरीच मोठी झाड होती. मला सारखं वाटायचं ती बाई पण हे गाणं म्हणत असेल का तिथं बसून. तो सिनेमा बघितल्यावर त्या बायबद्दल जी भीती होती ती थोडी कमी होऊन त्याची ती जागा दया, कणवं यान घेतली Sad

>>" एक माणूस रुसलंय वाटत ". हे सेन्टेन्स मला इतकं खटकायच की हे विधानार्थी वाक्य आहे का प्रश्नार्थी? <<
मी बिल्वा., काळानुसार शब्दांचा भावार्थ बदलत जातो. भावना, प्रेम व्यक्त करण्याच्या रिती, पध्दती बदलत जातात.
त्या काळातल्या लोकांसाठी कदाचित हा एक Most Romantic Scene असू शकेल.
आणि हा/असा प्रसंग बघताना एखाद्या आजी/आजोबांच्या मनाला आजही गुदगुल्या होत असतील.. (किंवा डोळे पाणावत असतील).

निरु सहमत… त्या आधीचे चित्रपट पाहिले तर दोघेही विरुद्ध दिशांना तोंडे करुन सांकेतिक भाषेत प्रेमाच्या गप्पा मारताना दिसतात… थेट प्रेम तेव्हा व्यर्ज होते :). असो.

नवरा बायकोने एकमेकांशी बोलले तरी इतरांनी एकमेकांना कोपराने खुणावण्याचा काळ होता तो. त्या काळात नवरा बायकोचे असे प्रेमाचे, लटक्या रागाचे प्रसंग हे चवीने बघितले जायचे. दिवसभर घरात बाईला आणि बाहेरच्या कामात नवर्‍याला एकमेकांशी बोलायला वेळच नसायचा. घरातही माणसांचा हा गोतावळा. काही घरात स्वतंत्र खोलीही नसायची. अशा वेळेला नवरा बायकोने संधी साधून एकमेकांशी बोलताना कुणी पाहिले तर चोरी पकडली गेली या अविर्भावात सर्वांसाठी तो सोहळा असायचा.

थोडक्यात दोन विजातीय चुंबक एकमेकांपासून त्यांच्या चुंबकीय क्षेत्रातच जबरदस्तीने लांब ठेवल्यावर ओढाळ बल (चॅट जीपीटी पर्यायी शब्द) कमी झाले कि ते चुंबक क्षणार्धात एकमेकांना आकर्षून घ्यायचे तसला प्रकार या "एक माणूस रूसलंय वाटतं" या संवादात येतो. यात चुंबकीय बलाबलाची आमंत्रण, स्विकृती सुद्धा दडलेली आहे. फार काळ दूर राहिल्याने गुरूत्वाकर्षण बल महाप्रचंड असायचं. उगीच नाही बारा बारा मुलं होत.

शेवटच्या वाक्यासाठी Lol

आणी, जुनी लोक म्हणायची ते - १ मूल होईपर्यंत आम्ही एकमेकांशी नीट बोललो ही नव्हतो Lol

>> पानात पडेल ते खाणे दूरदर्शन दाखवेल ते पाहणे

Lol योगायोगाने परवाच एका गाण्याच्या बाबत मी हे बोललो. किती गद्य गाणे होते ते. तरीही त्या काळातले गायक किती सहजपणे गात. एखादी कायदेशीर नोटीस जरी दिली वाचायला तरी ती सुंदर गाऊनच वाचतील इतक्या तयारीचे गायक होते. दुसरीकडे, अतिशय साधे राहणीमान होते त्यांचे. "असेल ते खायचे आणि देतील ते गायचे"

>> फारच धार्मिक-भोळसट काळ होता.

+१ Happy अगदी अगदी

@मी बिल्वा. मस्त किस्से शेअर केलेत एकेक.
लहानपणी "पाडाला पिकलाय आंबा" मोठ्याने गाऊन मी सुद्धा बोलणी खाल्लीत. झाडाला पिकलेल्या आंब्याचे गाणे, त्यात काय वावगे आहे असा प्रश्न पडला होता,

>>आणी, जुनी लोक म्हणायची ते - १ मूल होईपर्यंत आम्ही एकमेकांशी नीट बोललो ही नव्हतो Lol <<
Rofl
खरं तर ह्या दोन संपूर्णपणे स्वतंत्र गोष्टी नाहीत का..? Happy

आत्ता कळतंय, आईच बरोबर होती

>> अगदीच. लहानपणी दूरदर्शन वर माला डी या गर्भनिरोधकाची जाहिरात सारखीच लागायची. ती सारखी बघून पाठ होऊन मोठमोठ्याने म्हणून रट्टे खाल्ल्याचे मलाही चांगलेच आठवते आहे.

हो काळानुसार, पिढी नुसार रोमँटिक सीन आणि रोमान्स च्या कल्पना बदलत जाणार, एक चुटकी सिंदूर की किंमत, आणि मंगलसूत्र नही है ये जन्मो जन्म का बंधन है etc हे आताच्या पिढीला "एक माणूस रुसलंय वाटत "इतकंच खटकेल कदाचित

सिनेमा च नाव आठवत नाही पण त्यात अशोक सराफ भूत असतो आणि दिलीप प्रभावळकर हिरो आणि शाळा मास्तर असतो. त्यात सुरुवातीला काही थोडा फार त्रास गंम्मत म्हणून दिल्यावर ते भूत हिरो ला सिनेमा भर मदत करत. इतका आवडला होता तो सिनेमा मला.चांगली भूत पण असतात जगात असं वाटलं होत.त्यात ते भूत हिरो ला'मास्तुरे 'अशी हाक मारत असत. तो डायलॉग मला इतका आवडला होता. मी सारखी म्हणायचं तशाच टोन मध्ये मास्तुरे..... Happy

सिनेमा च नाव आठवत नाही पण त्यात अशोक सराफ भूत असतो आणि दिलीप प्रभावळकर हिरो आणि शाळा मास्तर असतो. >>>
एक डाव भुताचा .

मी लहान पणी सुट्टीला काकू कडे गेलेले तो प्रसंग, माझ्या आजीला ऐकू यायचं नाही, बेड वरून हलता यायचं नाही, पण दिसायच खणखणीत. पडवीत जिथं tv होता तिथेच थोड्या अंतरावर तिचा बेड होता जेणेकरून ती टीव्ही बघू शकेल. एकदा मधू कांबीकर चा सिनेमा लागला होता, दिस जातील दिस येतील गाणं असलेला. मी आजी शेजारी सिनेमा बघत बसले होते. आजी ने मला कंमेंट्रेटर नेमले होते Biggrin दर दोन मिनिटांनी डायलॉग सकट सिनेमा ची कंमेंट्री आजी मला विचारत होती आणि मी सांगत होते. तेवढ्यात काकू तिथं आली आणि तिला सिनेमात आणि प्रत्यक्षात पुढ येणाऱ्या बाक्या प्रसंगांचं गांभीर्य लक्षात आलं आणि तिनं बाहेर बघ तुला अमुक तमुक खेळायला बोलावायला आली होत असं सांगून बाहेर पिटाळ ल. माझा तो सिनेमा बघायचा राहून गेला Lol

Pages