मराठी चित्रपट: काही भावलेले, काही न झेपलेले (संवाद/दृश्ये/गाणी इत्यादी)

Submitted by atuldpatil on 31 July, 2018 - 06:11

रवा एका मित्राबरोबर गप्पा मारत होतो. विषय निघाला जुन्या मराठी चित्रपटांचा. पूर्वीचे काही चित्रपट किती जडशिळ होते (आजकालच्या हलक्याफुलक्या चित्रपटांच्या तुलनेत). भावनिक गुंतागुंत, नात्यांतील समस्या, परंपरा, प्रतिष्ठा, मानअपमान, अहंकार इत्यादी गोष्टीना दिलेले अवाजवी महत्व. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंती आणि नाट्य. असे साधारण स्वरूप असे. चित्रपटाचे मुख्य पात्र म्हणून सगळ्यांना आवडणारी आनंदी ठेऊ पाहणारी एखादी व्यक्ती असायची. चित्रपटभर तिला अनेक समस्या. त्रास त्रास त्रास नुसता. मग शेवटी कुणालातरी वाचवताना किंवा इतरांच्या सुखासाठी वगैरे तिलाच मरण येणार. मग त्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील आधीचेच एखादे आनंदी गाणे "टेंपो स्लो" करून दु:खद पार्श्वगीत म्हणून वाजत राहणार. सगळे प्रेक्षक डोळ्यात पाणी आणून जड मनाने चित्रपटगृहाबाहेर जाणार. असा एकंदर मामला असलेले खूप चित्रपट होते. किंबहुना तो काळच तसा होता. यावर या मित्राने मला सहज विचारले, "तू अंगाई चित्रपट पहिला आहेस का? गावच्या पाटलांची सून गाव दुष्काळमुक्त व्हावे म्हणून आपल्या बाळासहित बलिदान देते". त्याने असे सांगितल्यावर एक खूप जुनी आठवण जागी झाली. अंगाई हा चित्रपट पाहिला तर नव्हता. पण लहानपणी या चित्रपटाची खूप चर्चा होती ते मात्र आठवले. (त्या काळात चित्रपट गाजला कि त्याची चर्चा वर्षानुवर्षे चालत असे). मनात विचार आला कि असे चित्रपट तेंव्हा का निघत असावेत? कदाचित अशा घटना कुठेतरी घडल्या असाव्यात असे उगीचच वाटून गेले. आज इतक्या वर्षांनी हा चित्रपट अनेकांच्या विस्मरणात गेला आहे. पण सहज म्हणून युट्युब वर शोधला आणि मिळाला. ते सुद्धा अत्यंत उत्कृष्ट दर्जा मध्ये:

https://www.youtube.com/watch?v=znBfvU-Lztg

घाईघाईने पाहायला सुरवात केली. आणि माझा अंदाज खरा ठरला. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात एक विलक्षण घटना घडली होती. त्यावर आधारित तो चित्रपट होता. या चित्रपटात दाखवलेल्या अनेक गोष्टी आजच्या काळात विचित्र वाटतात. मनाला अजिबात पटत नाहीत. पण दोन-अडीचशे वर्षापूर्वीची परिस्थिती, त्याकाळातील लोकांची मानसिकता, तेंव्हाचे वातावरण, सामाजिक रचना या सगळ्याचा विचार केला तर त्याकाळात अशी अथवा अशा प्रकारची घटना घडली असावी हे पटू लागते.

गावात दुष्काळ पडलेला असतो. पाण्यावाचून हवालदिल झालेले गावकरी गाव सोडायच्या विचारात असतात. तेंव्हा गावचे पाटील त्यांना धीर देतात. गावाशेजारी तलाव खोदायचे सुचवतात. गाव सगळे मेहनत करते तलाव खणला जातो. पण त्याला पाणी लागत नाही. शेवटी ग्रामदैवत पाटलांना स्वप्नात दृष्टांत देते आणि सांगते ओल्या बाळंतिनीचा बळी दिल्याशिवाय पाणी लागणार नाही. गावात कोणीच ओली बाळंतीण मिळत नाही. मग शेवटी पाटलांची सूनच रात्री बाळासहित तलावापाशी जाऊन अंगाई म्हणत उभी राहते. तोच तलावाला पाझर फुटतो. पाणी वाढू लागते. त्यात तिचा आणि बाळाचा बळी जातो. असे शेवटी खूप विदारक दाखवले आहे. तलावाला पाणी लागलेले असते पण गावकरी रडत उभे असतात आणि पार्श्वभूमीवर अंगाई ऐकायला येत असते. वगैरे. (हि घटना सत्यकथेवर आधारलेली असून आजही या गावात त्या पाटलांचे वंशज राहतात असे चित्रपटात सांगितले आहे. अलीकडेच तिथे त्या तळ्याच्या पाण्यातील गाळ काढताना पुरावे आढळले वगैरे बातम्या आल्या होता. पण आज काळ खूप बदलला आहे. अर्थातच कधीकाळी या गावात असे काही घडले असेल यावर कोणाचा विश्वास बसणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे दोन-अडीचशे वर्षांपूर्वी तिथे नक्की काय घडले व कसे घडले हे गूढ कदाचित कायमचेच काळाच्या गुलदस्त्यातच राहील)

पण किती अतिभावविवश आणि जड चित्रपट असायचे. आज जर या घटनेवर चित्रपट काढला तर तो नक्कीच वेगळ्या धाटणीचा असेल हे मात्र खरे. पूर्वीच्या अशा अनेक चित्रपटांत इंटेन्स दृश्ये आणि संवाद असायचे. त्या काळात ते लोकांना आवडायचे सुद्धा. पण आज यातले खूप चित्रपट पाहवत सुद्धा नाहीत. डोके जड होते. काही काही दृश्ये तर आजच्या काळात मनाला पटत सुद्धा नाहीत. आणि याउलट काही चित्रपट असे आहेत कि इतका काळ उलटून गेला तरी आजदेखील पाहायला छान वाटतात. त्यातले संवाद/गाणी मनाला आजही भावतात.

तर अशाच काही न झेपलेल्या किंवा खूप भावलेल्या मराठी चित्रपटांवर आणि त्यातल्या अशा दृश्यांवर गाण्यांवर वगैरे चर्चा करण्यासाठी हा धागा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चोळी काढल्यावर बाईंना नसेल का थंडी वाजली? अक्षरशः हावरटासारखा 'पोळी दे' म्हटल्यासारखं 'दे दे चोळी दे' म्हणतोय. अरे काही स्त्रीदाक्षिण्य-बिक्षिण्य...
>>>
ह्या: ह्या: अहो हुरळली मेंढी अन लागली लांडग्याच्या पाठी अशी गत आहे तीची. तो बिचारा काही पण चालेल म्हनतोय आणि बाइ मात्र चोळी द्यायला निघाल्यात मग त्याने काय नको नको म्हणावं? मग डोके दुखी कशी थांबेल? मेडिकेटेड चोळी असावी बहुधा.
राज कपूर्ला ही आयडिया मिळाली असती तर त्याने अख्खा पिक्चर काढला असता.
एक भाबडा प्रश्न . त्याने स्वतःची पैरण काढून का नाही बांधली बरं ? Uhoh कदाचित स्त्रीदाक्षिण्य म्हणून नसेल काढली.
भाबडा प्रश्न क्र.२. डोकेदुखी थांबण्यासाठी दुकानातली नवी चोळी चालते का? की अंगातून काढलेलीचाच गुण येतो?. नाही म्हनजे औषध म्हणून पाच पन्नास आणून ठेवायला नव्या चालत असतील तर.
प्रश्न ३. चोळीने गळा आवळला तर कायमचीच डोके दुखी थांबणार नाही का?

त्या गाण्यात राजा गोसावीने जो पेशाने फोटोग्राफर असतो, तारेवर जयश्री गडकरचे धुवून काढलेले फोटो लटकवलेले असतात, ते काय क्लास असतात. जयश्रीबाई कसल्या सुंदर दिसायच्या!
सुगंधी कट्टा मधील 'नाचू किती, नाचू किती' हेदेखिल अति आवडतं गाणं..

पण मी काय म्हणते चोळी का ? पदराचा तुकडा नसता का चालला?
Happy

नन्द्या, सॉरी इफ इट हर्ट यु. मूळ मुद्दा ७५ वर्षाचा बळी हा नसून खडूस माणसाचा बळी का नाही द्यायचा हा होता.

बाबा कामदेव, भयंकर Happy
त्याच्या आधीचे डायलॉग पण भयंकर आहेत. खरं तो चोळी डोक्याला बांधण्याचा सीन सोडला तर मला खूप दु:खी वाटलं. ज्याप्रकारे तो सगळं वैर काल रात्रीच संपलं वगैरे सांगतो त्याने.

तुला पाहते रे तुला पाहते. व्वा. एक जुनी आठवण जागी झाली. थोडेसे विषयांतर...

हे गाणे तेंव्हा रेडिओवर सारखे लागायचे. भावाच्या वर्गात इतिहासात फ्रेंच राज्यक्रांती नुकतीच शिकवली होती. त्यात कोणी एक लाफायते नावाचा होता. हे गाणे रेडिओवर लागले कि भाऊ "तू लाफायते रे तू लाफायते" म्हणायचा. Lol

अजून एक मुत्सोहितो असे काहीतरी नाव होते इतिहासात. वाचन करताना एका मुलाला ते नीट म्हणता येत नव्हते. सर त्याला ओरडून म्हणाले "मु त्सो हि तो. मुततो हितं नव्हे" Biggrin

विषयांतर समाप्त.

जुन्या सूर्यकांत चंद्रकांतच्या सिनेमात मस्त डायलॉग असायचे.
"एक माणूस................. रागावलंय का ? "
कौटुंबिक संवाद चांगले असायचे त्या सिनेमात.

अशोक सराफ दादांच्या काळातला सुसह्य होता. बेर्डेच्या काळातले त्याचे विनोद खटकायचे. चिरका आवाज काढून मोठ्याने बोलायचे, आणि समोरचा मूर्ख आहे अशा थाटाचे विनोद करायचे . ते अत्यंत बालीश वाटायचे. त्यातून चुकीचा शब्द बोलणे... मग ते आपलं.. मला असं म्हणायचं होतं....याचा अतिरेक झाला नंतर नंतर. ते खटकायचे.

अनुल्लेखाचे शस्त्र उपसले की "एक माणूस ..." चा डायलॉग विपूत चिकटवून बघावा का ? पण ते तीन क्रमांकाचं माणूस रागावलं की पंचाईत

त्या गाण्यात राजा गोसावीने जो पेशाने फोटोग्राफर असतो, तारेवर जयश्री गडकरचे धुवून काढलेले फोटो लटकवलेले असतात, ते काय क्लास असतात. जयश्रीबाई कसल्या सुंदर दिसायच्या!>>>>
तो खूप सुरेख चित्रपट आहे, जयश्री कातील दिसलीय एकदम. गाणेही तितकेच कातील.

जे वेड मजला लागले, तुजलाही ते लागेल का
माझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल का

ह्या कथेवर हिंदीत पण चित्रपट आलेला बहुतेक. राजा गोसावी जयश्रीच्या प्रेमात पडतो पण जयश्रीच्या मोठ्या 3 बहिणी असतात, त्यांना उजवल्याशिवाय हिचा नंबर कसा येणार? मग हाच मॅचमेकींग सुरू करतो.

जयश्रीचा अजून 1 चित्रपट आहे, कधी करीशी लग्न माझे? त्यात ती स्वसौंदर्याच्या तोऱ्यात स्थळे नाकारते, एक स्थळ रमेश देवचेही असते, तेही नाकारते व नंतर लग्न जमत नाही व समाज टोचून खातो व रमेशही लग्न करतो म्हणून आत्महत्या करते. त्यांनंतर ती नेमकी तिच्या थोरल्या बहिणीच्या पोटी परत जन्म घेते, 3 मुलींवर चौथी. यु ट्यूबवर इतकाच आहे पण मी मूळ चित्रपट पाहिलाय. त्यात तिला हे सगळे स्वप्न पडलेले असते, रमेश देवचे लग्न काही झालेले नसते, शेवटी हिच्याच गळ्यात पडतो वगैरे आहे.

भाबडा प्रश्न . त्याने स्वतःची पैरण काढून का नाही बांधली बरं ? Uhoh कदाचित स्त्रीदाक्षिण्य म्हणून नसेल काढली.>>>>>>
थंडी वाजणाऱ्या माणसाने स्वतःचा शर्ट काढला तर त्याला अजून थंडी नाही का वाजणार??

अरुण सरनाईकांची शब्दफेक एक टिप्पीकल कोल्हापुरी असायची. एका चित्रपटात त्यांच्या तोंडी संवाद आहे. "काय करावं तेच कळंना. सगळा गुत्ताप्पा झालाय नुसता". हा गुताप्पा शब्द त्याकाळी कोल्हापूर भागात गुंता/complications अशा अर्थाने वापरत. अगदी आमच्या लहानपणीपर्यंत सुद्धा तो प्रचलित होता. बऱ्याच वर्षांनी टीव्ही वर हा चित्रपट बघत असताना गुताप्पा अनेक वर्षांनी ऐकायला मिळाला Lol

>> समोरचा मूर्ख आहे अशा थाटाचे विनोद करायचे . ते अत्यंत बालीश वाटायचे. त्यातून चुकीचा शब्द बोलणे... मग ते आपलं.. मला असं म्हणायचं होतं....याचा अतिरेक झाला नंतर नंतर +११११

>> तिला हे सगळे स्वप्न पडलेले असते, रमेश देवचे लग्न काही झालेले नसते, शेवटी हिच्याच गळ्यात पडतो
हो हो... असायची अशी कथानके. ह्यांचा अख्खा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांवर केलेला प्रॅंक... चित्रपटभर राडा आणि शेवटी "तीच त्याची आई असते" किंवा "तोच भाऊ असतो" वगैरे... हा हा हा

इंटरेस्टिंग धागा आहे Lol

भाऊबीज नावाचे दोन खतरनाक मराठी चित्रपट होऊन गेले. एक १९५५ साली आलेला सुलोचना-चंद्रकांत जोडीचा. पण आपल्याला जो अभ्यासायचा आहे तो १९९५ सालचा (आणि अनेक साईट्सकडून चुकून २००४ सालचा नमूद केला गेलेला) भाऊबीज! यामध्ये सोशिकतेचे दोन मानदंड अलका कुबल आणि निशिगंधा वाड एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. जणू दोन सोशिकमिनारच! आता अशा मिनारांभोवती मध्ययुगीन शिल्पकलेचे भोक्ते ठोकळे उभारत. या चित्रपटाचे सृजन करणार्‍या महानुभावास मध्ययुगीन शिल्पकला भावत असल्यामुळे त्याने अनुक्रमे प्रमोद शिंदे आणि अशोक शिंदे असे दोन ठोकळे उभारले आहेत. तसा तर हा चित्रपट एक पीएचडी निघेल इतका सखोल आहे पण इथे अल्पपरिचय आणि न झेपणारे एक दृश्य सांगतो.

थोडक्यात कहाणी अशी की अशोक-निवा हे हिंदू जोडपे आहे आणि प्रमोद-अकु हे मुस्लिम जोडपे आहे. प्रमोद-अकु मुस्लिम असल्याने ते सतत हिंदीत बोलतात. त्याकाळी द्वैभाषिक चित्रपट बनवल्यास सरकार विशेष अनुदान द्यायचे काय? अशोक-निवाला राज नामक पुत्ररत्न आणि प्रमोद-अकुला झीलू नामक कन्यारत्न आहे. दोघेही दहा वर्षांच्या आतली कारटी! हे दोघे एकमेकांना बहीण-भाऊ मानतात. गंमत म्हणजे दोघेही भालचंद्र कुलकर्णी फादर असलेल्या कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकत असतात. दोन्हीकडून या नात्याला माईल्ड विरोध करणारी (अधून मधून "आता बस बरं का नाहीतर बागुलबुवा येईल" लेव्हल) लोकं आहेत.

न झेपणारे दृश्य - https://youtu.be/b3SQrHyAIZE?t=1h52m48s
तशी तर बरीच आहेत पण क्लायमॅक्स बघूयात. चित्रपट फार पाल्हाळ लावतो पण मुख्य मुद्दा असा की त्या झीलूच्या दोन्ही किडन्या फेल झालेल्या आहेत. तरी ती राजला ओवाळायचा हट्ट धरते. हो ना करता करता ती एकदाची त्याला ओवाळते आणि उभ्या उभ्या कोसळते. कुलदीप पवार डॉक्टर दाखवला आहे. त्याच्या हॉस्पिटलमध्ये असे ठरते की हिला ट्रान्सप्लांटची गरज आहे. आता तिचे दोन्ही पालक ठणठणीत, चाळीशीच्या आतले दाखवले असतानासुद्धा राज ओवाळणी म्हणून स्वतःची किडनी देण्याचा हट्ट धरतो. जेमतेम मिनिटभर रडारड होते आणि कुलदीप पवार तडक दोघांना ऑपरेशन थिएटरमध्ये घेतो. ऑपरेशन होताना बरीच रडारड आणि अर्थातच ऑपरेशन सक्सेसफुल! या भाऊबीजेने गहिवरून जाऊन सगळा माईल्ड विरोध नाहीसा होतो, सो कॉल्ड "धर्माचे कुंपण" तोडले जाते आणि चित्रपट संपतो. वास्तविक पाहता अशा ऐतिहासिक ऑपरेशन आणि ओवाळणीबद्दल या घटनेची गिनेस बुकमध्ये नोंद व्हायला हवी होती पण त्यागमूर्ती लोकांच्या नशीबी असलेला विस्मरणाचा शाप या कलाकृतीच्या वाटेला आलेला आहे.

सचिनचे सिनेमे तेव्हां आवडले. आत्ता आपल्याला हे सिनेमे आवडले याचं हसायला येतं. विशेषतः सचिनच्या तोंडी असलेले विनोद पांचट असायचे. प्पण त्याने अशोक सराफला चांगले प्रेझेंट केले त्यामुळे तोल सांभाळला जायचा. माझा पती करोडपती हा सिनेमा अक्षरशः अशोक सराफने तोलला. हा सिनेमा आताच्या काळात चालणारही नाही आणि विनोदीही वाटणार नाही. इतर सिनेमांच्या मानाने शाब्दीक कॉमेडी जरा कमी असायची. प्रासंगिक विनोद सचिन महेश कोठारेंच्या सिनेमात जास्त असायचे, त्यातही महेश कोठारे अ‍ॅक्शन आणि थरार हिंदीप्रमाणे आणू पहायचा. त्यातले काही सीन्स आजही चांगले वाटतात.

हिंदीत संजय सत्त सारखा ठोकळा पण चांगला विनोद करायचा. त्यामानाने मराठीत बडबड कॉमेडी जास्त झाली.
आम्ही सातपुते हा सिनेमा बालीशपणाचा कळस आहे. सत्ते पे सत्ता चा हा मराठी रिमेक. मराठीत अमिताभ सचिन म्हटल्यावर बाकीच्या चपट्या हिरोंबद्दल बोलायलाच नको. वांगं , रताळं असली नावं काय आणि सुप्रिया सबनीस हेमामालिनी काय... बघवला नाही सिनेमा.

निशिगंधा वाड रामदास पाध्येंची बोलकी बाहुली होती. अनेक जण तिला खरी समजतात.

त्या गाण्यात राजा गोसावीने जो पेशाने फोटोग्राफर असतो, तारेवर जयश्री गडकरचे धुवून काढलेले फोटो लटकवलेले असतात, ते काय क्लास असतात. जयश्रीबाई कसल्या सुंदर दिसायच्या!>>>>
तो खूप सुरेख चित्रपट आहे, जयश्री कातील दिसलीय एकदम. गाणेही तितकेच कातील. >>> अगदी, अगदी.

जयश्रीबाईंचाच 'अशीच एक रात्र होती' हा सिनेमा होता..वरती उल्लेख झालाय बहुदा. चांगला सस्पेन्स होता, म्हणावा तर भूतपट पण चांगली ट्विस्ट होती त्याच्यात! त्यातले एक गाणं थेट 'नैना बरसे', 'कही दीप जले कही दिल', आणि तत्सम प्रेताम्यांच्या गाण्याची हुबेहूब आठवण करून देणारं आहे. कही दीप मधे लता मधे जे आलाप घेते तेही या चित्रपटाच्या पार्श्वसंगीतात वापरले गेलेत बहुतेक. मराठीत जे काय थोडेबहुत सस्पेन्स सिनेमे आहेत (पाठलाग, पडछाया, हा खेळ सावल्यांचा) यात या चित्रपटाचाही उल्लेख करता येईल.

मराठीतले अजून सस्पेन्स सिनेमे कोणाला माहीत आहेत का?

सावट हा इतक्यात येऊन गेलेला सस्पेन्स. रात्रारंभ हा एक चांगला गूढ सिनेमा आहे. नेमकी कॅटेगरी लिहीली तर रहस्य संपेल.

झपाटलेल्या बेटावर आणि एक डाव भुताचा....लहानपणी बघितलेले. तेव्हा टिव्हीमधे कुणी किंचाळलं की भूत दिसतं आणि त्याला आपण घाबरायचं असतं एवढंच कळत होतं.
लक्ष्याचे सिनेमे कधीच आवडले नाहीत. सचिन, महेश कोठारे फुल्लऑन ओव्हरअॅक्टिंग..तरी अशोक सराफ बराच सुसह्य होता. बाळाचे बाप ब्रम्हचारी आणि आयत्या घरात घरोबा फक्त त्याच्यामुळे आवडले.

एक रात्र मंतरलेली हा " कुणीतरी आहे तिथे" नाटकाचे सिने अडाप्शन होते, पण माध्यमांतर न जमल्याने फसले.

पुनरावृत्तीचा दोष आणि रोष पत्करुन परत एकदा इया उवा तुळ तुळ गाण्याची आठवण काढते.
माझं सौभाग्य मधलं गाणं. हा पूर्ण पिक्चरच बघण्यासारखा आहे.गाणं ५५ व्या मिनीटाला आहे बहुतेक.
https://www.youtube.com/watch?v=rZBZ_OcR5dI&t=3300s

'अशीच एक रात्र होती' मध्ये जयश्री गडकर आधी भूत नसते पण व्हिलन हिरोच्या मनात तसं भरवून देतो. मग ती रेल्वेने गाव सोडून जायला लागते तेव्हा व्हिलन तिच्यावर ऍटॅक करतो. इकडे हिरोला आपली चूक कळते, मग गडकरबाई येतात समोर तेव्हा माफी मागतो. तोवर बाई भूत झालेल्या असतात.

मी आपली सुखांत होईल म्हणून उत्सुकतेने बघत बसलेले. ते 'ऐकशील का या गीताचे गहिवरलेले बोल' का काहीतरी गाणे सॉलिड वाटलेले तेव्हा.

'अशीच एक रात्र होती' मध्ये जयश्री गडकर आधी भूत नसते पण व्हिलन हिरोच्या मनात तसं भरवून देतो. मग ती रेल्वेने गाव सोडून जायला लागते तेव्हा व्हिलन तिच्यावर ऍटॅक करतो. इकडे हिरोला आपली चूक कळते, मग गडकरबाई येतात समोर तेव्हा माफी मागतो. तोवर बाई भूत झालेल्या असतात.>>> बरोबर

रिंगा रिंगा हा ही एक चांगला सस्पेन्स सिनेमा आठवतोय. अजिंक्य देव, भरत जाधव, अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी होते त्यात. सगळ्याच्याच भूमिका एकदम वेगळ्या, पठडीबाहेरच्या होत्या.

श्रद्धा, याला व्हाईल च्या प्री इन्क्रीमेंट लूप शी कंपेअर करता येईल.

डू{
गिव्हत्रासटूहिरॉईन(हिरोच्यामनात्किल्मिष);
ह्युमन--;
भूत++;
}व्हाईल(हिरॉईन != भूत)

कुणी 'हा खेळ सावल्यांचा' बघितला नाही वाटतं? आशा काळेंचा मेकओव्हर करून मॉडर्न बनवलंय. सुरुवातीलाच घोड्यावर बसून विचित्र जीन्स आणि टीशर्ट मधली आशा काळे बघून मी जाम हसले होते. सिनेमा पण अत्यंत अ आणि अ आहे.

"हा खेळ सावल्यांचा" - लहानपणी आमच्या सोसायटीत गणेशोत्सवात दाखवला होता हा सिनेमा. रात्री मांडवापासून, बिल्डींग पर्यंत येताना भिती वाटलेली आठवते.
नंतर एकदा यू-ट्युब वर बघायचा प्रयत्न केला होता, पण खूप लाऊड वाटल्याने बंद केला.

Pages