मराठी चित्रपट: काही भावलेले, काही न झेपलेले (संवाद/दृश्ये/गाणी इत्यादी)

Submitted by अतुल. on 31 July, 2018 - 06:11

रवा एका मित्राबरोबर गप्पा मारत होतो. विषय निघाला जुन्या मराठी चित्रपटांचा. पूर्वीचे काही चित्रपट किती जडशिळ होते (आजकालच्या हलक्याफुलक्या चित्रपटांच्या तुलनेत). भावनिक गुंतागुंत, नात्यांतील समस्या, परंपरा, प्रतिष्ठा, मानअपमान, अहंकार इत्यादी गोष्टीना दिलेले अवाजवी महत्व. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंती आणि नाट्य. असे साधारण स्वरूप असे. चित्रपटाचे मुख्य पात्र म्हणून सगळ्यांना आवडणारी आनंदी ठेऊ पाहणारी एखादी व्यक्ती असायची. चित्रपटभर तिला अनेक समस्या. त्रास त्रास त्रास नुसता. मग शेवटी कुणालातरी वाचवताना किंवा इतरांच्या सुखासाठी वगैरे तिलाच मरण येणार. मग त्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील आधीचेच एखादे आनंदी गाणे "टेंपो स्लो" करून दु:खद पार्श्वगीत म्हणून वाजत राहणार. सगळे प्रेक्षक डोळ्यात पाणी आणून जड मनाने चित्रपटगृहाबाहेर जाणार. असा एकंदर मामला असलेले खूप चित्रपट होते. किंबहुना तो काळच तसा होता. यावर या मित्राने मला सहज विचारले, "तू अंगाई चित्रपट पहिला आहेस का? गावच्या पाटलांची सून गाव दुष्काळमुक्त व्हावे म्हणून आपल्या बाळासहित बलिदान देते". त्याने असे सांगितल्यावर एक खूप जुनी आठवण जागी झाली. अंगाई हा चित्रपट पाहिला तर नव्हता. पण लहानपणी या चित्रपटाची खूप चर्चा होती ते मात्र आठवले. (त्या काळात चित्रपट गाजला कि त्याची चर्चा वर्षानुवर्षे चालत असे). मनात विचार आला कि असे चित्रपट तेंव्हा का निघत असावेत? कदाचित अशा घटना कुठेतरी घडल्या असाव्यात असे उगीचच वाटून गेले. आज इतक्या वर्षांनी हा चित्रपट अनेकांच्या विस्मरणात गेला आहे. पण सहज म्हणून युट्युब वर शोधला आणि मिळाला. ते सुद्धा अत्यंत उत्कृष्ट दर्जा मध्ये:

https://www.youtube.com/watch?v=znBfvU-Lztg

घाईघाईने पाहायला सुरवात केली. आणि माझा अंदाज खरा ठरला. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात एक विलक्षण घटना घडली होती. त्यावर आधारित तो चित्रपट होता. या चित्रपटात दाखवलेल्या अनेक गोष्टी आजच्या काळात विचित्र वाटतात. मनाला अजिबात पटत नाहीत. पण दोन-अडीचशे वर्षापूर्वीची परिस्थिती, त्याकाळातील लोकांची मानसिकता, तेंव्हाचे वातावरण, सामाजिक रचना या सगळ्याचा विचार केला तर त्याकाळात अशी अथवा अशा प्रकारची घटना घडली असावी हे पटू लागते.

गावात दुष्काळ पडलेला असतो. पाण्यावाचून हवालदिल झालेले गावकरी गाव सोडायच्या विचारात असतात. तेंव्हा गावचे पाटील त्यांना धीर देतात. गावाशेजारी तलाव खोदायचे सुचवतात. गाव सगळे मेहनत करते तलाव खणला जातो. पण त्याला पाणी लागत नाही. शेवटी ग्रामदैवत पाटलांना स्वप्नात दृष्टांत देते आणि सांगते ओल्या बाळंतिनीचा बळी दिल्याशिवाय पाणी लागणार नाही. गावात कोणीच ओली बाळंतीण मिळत नाही. मग शेवटी पाटलांची सूनच रात्री बाळासहित तलावापाशी जाऊन अंगाई म्हणत उभी राहते. तोच तलावाला पाझर फुटतो. पाणी वाढू लागते. त्यात तिचा आणि बाळाचा बळी जातो. असे शेवटी खूप विदारक दाखवले आहे. तलावाला पाणी लागलेले असते पण गावकरी रडत उभे असतात आणि पार्श्वभूमीवर अंगाई ऐकायला येत असते. वगैरे. (हि घटना सत्यकथेवर आधारलेली असून आजही या गावात त्या पाटलांचे वंशज राहतात असे चित्रपटात सांगितले आहे. अलीकडेच तिथे त्या तळ्याच्या पाण्यातील गाळ काढताना पुरावे आढळले वगैरे बातम्या आल्या होता. पण आज काळ खूप बदलला आहे. अर्थातच कधीकाळी या गावात असे काही घडले असेल यावर कोणाचा विश्वास बसणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे दोन-अडीचशे वर्षांपूर्वी तिथे नक्की काय घडले व कसे घडले हे गूढ कदाचित कायमचेच काळाच्या गुलदस्त्यातच राहील)

पण किती अतिभावविवश आणि जड चित्रपट असायचे. आज जर या घटनेवर चित्रपट काढला तर तो नक्कीच वेगळ्या धाटणीचा असेल हे मात्र खरे. पूर्वीच्या अशा अनेक चित्रपटांत इंटेन्स दृश्ये आणि संवाद असायचे. त्या काळात ते लोकांना आवडायचे सुद्धा. पण आज यातले खूप चित्रपट पाहवत सुद्धा नाहीत. डोके जड होते. काही काही दृश्ये तर आजच्या काळात मनाला पटत सुद्धा नाहीत. आणि याउलट काही चित्रपट असे आहेत कि इतका काळ उलटून गेला तरी आजदेखील पाहायला छान वाटतात. त्यातले संवाद/गाणी मनाला आजही भावतात.

तर अशाच काही न झेपलेल्या किंवा खूप भावलेल्या मराठी चित्रपटांवर आणि त्यातल्या अशा दृश्यांवर गाण्यांवर वगैरे चर्चा करण्यासाठी हा धागा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>तोपर्यंत ते सेवादलात होते असे वाटते.<<
हो, आणि निळु फुले, वसंत बापट सुद्धा होते राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकात. पिएस्पीला उतरण्/गळती लागल्यावर बहुतेक धडाडीचे कार्यकर्ते त्यावेळेला सेनेत आले. ते थिएटर बहुतेक दादरचं, चित्रा किंवा ब्रॉडवे(?). प्लाझाची पण अशीच काहितरी स्टोरी आहे कारण त्यावेळेला प्लाझाची मालकि व्हि. शांताराम यांच्याकडे होती... Happy

फाॅरेनची पाटलीण नामक एक अ आणि अ चित्रपट आहे.
काही काही प्रसंग अतिशय अचाट आहेत.
फाॅरेनची पाटलीण मराठी तर शिकतेच.. आणि मराठी तून गाते..! Lol

V शांताराम व दादा कोंडके यांचे काहीतरी बिनसले होते व त्यांनी शेवटपर्यंत दुश्मनी निभावली. शांतारामांनी असला नवरा नको ग बाई काढल्यावर दादांनी ह्योच नवरा पाहिजे काढला.

दादांनी नंतर कितीही वाह्यात व पांचट चित्रपट काढले तरी एक जिनियस माणूस म्हणून त्यांची ओळख राहील. घरात कलेचे कुठलेही वातावरण नसताना, लहानपणापासून मुंबईच्या गिरणगावात आयुष्य गेले असतानाही त्यांनी अफाट पोवाडे, गाणी लिहीली. ओळीने 7 सिनेमे रौप्यमहोत्सवी केले. त्या काळी एका थेटरात चित्रपट 25 आठवडे चालला तर तो रौप्यमहोत्सवी म्हणत. आजच्यासारखे 25 थेटरात जेमतेम 1 आठवडा टिकला तरी खूप गाजला म्हणतात तसे तेव्हा नव्हते. त्यांचे सुरवातीचे चित्रपटही द्व्यर्थी संवादांनी भरले असले तरी बघायला मजा यायची, खदखदून हसवायचे. नंतर मात्र कहर केला.

चरपस, शिरीष कणेकर पांचट जोक मारणारे,मुळात जोक मारणारे म्हणून कधी प्रसिद्ध होते।? मला ते चित्रपटविषयक व क्रिकेटविषयक शक्य तितके खरे लिहिणारे म्हणून माहीत आहेत. जेव्हा ते या विषयांवर वृत्तपत्रात लिहीत होते तेव्हा तुम्ही बहुतेक जन्मलाही नसाल. तेव्हा इंटरनेट नव्हते त्यामुळे कुणीही सोम्यागोम्या उठला व नेट धुंडाळून लिहिता झाला असे होत नसे.

आणि तुम्हाला कोण ग्रेट वाटतात याची यादी द्या बघू एकदा. कारण कुणीही कुणाबद्दल काहीही लिहिले तरी तुमचे मत तो ओव्हर रेटेड, ओव्हर हाईपेड असेच असते. आणि प्लिज, या देशातल्या लोकांचीच नावे द्या, भारी उच्च परदेशस्थ लोकांची नावे देऊ नका. Happy Happy

शांताराम Vs दादा कोंडके कधी वाचले ऐकले नव्हते. इंटरेस्टिंग. नवीन माहिती मिळाली. शांतारामांचा 'झुंज' हा एकच चित्रपट अगदी लहानपणी थिएटरला पाहिल्याचे आठवते. स्टोरी काहीच आठवत नाही. पण "झुंजार माणसा झुंज दे" आणि "कोण होतास तू / कोण होतीस तू" हि दोन गाणी. हे "कोण होतास/होतीस गाणे" तेंव्हा सतत रेडिओवर लागत असे. आजकाल ते कुठे फार ऐकायला मिळत नाही. आजच्या काळात ते फारच स्टेरोटाइप्ड वगैरे वाटते.

शांताराम Vs दादा कोंडके कधी वाचले ऐकले नव्हते. >>> आंधळा मारतोय डोळा हे टायटल त्यांना उद्देशून होते असे म्हटले जायचे.

शांताराम Vs दादा कोंडके कधी वाचले ऐकले नव्हते. >>>>>

खरे की काय? ते दोघे चित्रपट काढत होते तेव्हा खूप जोरदार चर्चा होती या विषयाची. ह्योच नवरा पाहिजे जाहीर झाल्यावर तर ऑफिशियल स्टॅम्पच लागलेला. तेव्हा सो मि नव्हता म्हणून.. नैतर लोकांनी मेमेज बनवुन हैराण केलें असते त्यांना.

झुंज त्या काळी गाजलेला, स्टोरी चांगली होती. गाणी खूप सुंदर होती. निसर्गराजा ऐक सांगतो...हे ऑल टाईम ग्रेट प्रेमगीत आहे हेमावैम.

शांतरामांच्या इतर चित्रपटासारखी ह्याची कथा ही स्त्री भोवतीच केंद्रित होती.

त्यातल्या एका भजनावरून वाद झालेला. कुणीतरी ते भजन आपल्या वडिलांचे आहे , शांतारामांनी ते घेतले व श्रेयअव्हेर केला हा आरोप केला होता.

<फाॅरेनची पाटलीण नामक एक अ आणि अ चित्रपट आहे.
काही काही प्रसंग अतिशय अचाट आहेत.
फाॅरेनची पाटलीण मराठी तर शिकतेच.. आणि मराठी तून गाते..! Lol>
हो अशक्य पांचट, आचरट, हास्यास्पद पिक्चर.
आम्ही लावून हसत बसतो. काहीच्च्या काहीच ट्रान्स्फॉर्मेशन होतं त्यातल्या हिरोचं, फॉरेनला जाउन. अ‍ॅक्सेंट तर बदलतोच(असला भयाण खोटा अ‍ॅक्सेंट) पण स्वत:च्या भावाला तो ओळखत नाही, जास्तीत जास्त चार वर्षे गेलेला असतो तो. यी पाटलीन तर काय सांगावी. कॉमेडी नुसती.
बिचारे विनय आपटे. काय काय करावं लागलंय बिचार्‍यांना..

चर्चा अ आणि अ चित्रपटांची चाललेली असली तरी काही चांगल्या चित्रपटांबद्दल बोलतो.
अजिंक्य देव माझ्या मते तरी प्रचंड पोटेन्शियल असणारा, मराठीतला एकमेव स्टार मटेरियल असणारा अभिनेता होता/आहे. त्याचे सरकारनामा, सर्जा, माझं घर माझा संशंष, षंढयुग, भन्नाट रानवारा हे गाणं असलेला कुठला तो, वासुदेव बळवंत फडके असे अनेक चांगले चित्रपट आहेत. कॉमेडीच्या लाटेत त्याला आचरटपणा करावा लागला असेल आणि त्यात तो गंडला. नाही तर अभिनय उत्तम, आवाज, अ‍ॅक्शन्साठी योग्य शरीरयष्टी हे उत्तम कॉम्बिनेशन ठरलं असतं. खुप्ते तिथे गुप्तेमध्ये त्याने सांगितलेले, त्याला खूप टँट्रम्स आहेत, तो उशीरा सेटवर येतो, सेटवर नीट वागत नाही अश्या अफवा त्याच्याविषयी लोक पसरवायचे.
खखो'दे'जा.

अजिंक्य देव ने आचरट कॉमेड्या केल्यात???
मला आवडतो अजिंक्य देव. माहेरच्या साडीत पण होता तो.
रीसेंटली २४ मधेही होता.

हो.

स्टार मटेरियल माझ्याकडे पण होते हो. पण माझी दखलच नाही घेतली मग मी पण इग्नोर केले. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी एका रांगड्या नायकाला मुकली. माझी आणि अर्चना जोगळेकरची जोडी जमली असती तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी थरथर कापली असती.

सरकारनामामधलं अजिंक्य देव व सुकन्या मोने(२५ वर्षांपुर्वीची) यांच्यावर चित्रीत झालेलं 'अलवार तुझी चाहूल' हे युगुलगीत नितांतसुंदर आहे. कविता कृष्णमुर्तीचा आवाज. लै भारी.

<माहेरच्या साडीत पण होता तो.>
माहेरच्या साडीतले त्याचे संवाद म्हणजे क्या बात! 'तू बाप नाही साप आहेस' असला फालतूपणा..

<स्टार मटेरियल माझ्याकडे पण होते हो. पण माझी दखलच नाही घेतली मग मी पण इग्नोर केले. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी एका रांगड्या नायकाला मुकली. माझी आणि अर्चना जोगळेकरची जोडी जमली असती तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी थरथर कापली असती.>
Happy
मराठीत स्टार असला तरीही किशोरी अंबिये, प्रेमा किरण असल्या नट्यांबरोबर रोमान्स करावा लागतो मिश्टर. अर्चना जोगळेकर, आश्विनी भावे चूकून एखाद्यावेळेस असतात.

किशोरी अंबिये, प्रेमा किरण >> Lol
या अशा हिरविनी असतील तर हिरो कोण हिरविन कोण हे नक्की करण्यातच वेळ जातो पब्लिकचा.
पण अर्चना जोगळेकर सुंदर होती. शाळेत असल्यापासून आवडायची.

अजिंक्य देव माझ्या मते तरी प्रचंड पोटेन्शियल असणारा, मराठीतला एकमेव स्टार मटेरियल असणारा अभिनेता होता/आहे. >>> + १००००
मलाही तो नेहमी जंटलमन कॅटेगरी मधला वाटला.
त्याचा आणखी एक बघितलेला आणि आवडलेला हल्लीचा चित्रपट म्हणजे रिन्गा रिन्गा .
त्या पूर्ण चित्रपटाची ट्रीटमेन्टच वेगळी होती . पण जाउएदे तो या धाग्याचा विशय नाही Happy

प्यार किये जा - धुमधडाका. काही सीन्स तर जसेच्या तसे घेतलेत. पण तरी मजा येते. शरद तळ. ला लक्ष्या स्टोरी ऐकवतो तो सिन पूर्ण उचललाय.

V शांताराम व दादा कोंडके यांचे काहीतरी बिनसले होते व त्यांनी शेवटपर्यंत दुश्मनी निभावली>>>> साधना, आम्हाला माझ्या सासर्‍यांनी याबाबतचा एक किस्सा सांगीतला. दादा कोंडके हे स्वतः गीतकार पण होते. व्ही शांताराम यांनी त्यांना चॅलेंज दिले की पांचट पणा सोडुन एक तरी चांगले गीत वा भजन लिहुन दाखवा. त्यावर दादांनी अंजनीच्या सुता, तुला रामाचे वरदान हे गाणे लिहीले जे प्रचंड गाजले. तेव्हा शांताराम दादांना म्हणाले की मानलं तुला.

फाॅरेनची पाटलीण >> अतिचशय उच्च चित्रपट. मेघना एरंडेचा व्हॉईस ओवर आहे त्या फॉरीनवालीला. फार भारी Happy

आणि असाच एक नितांत सुंदर चित्रपट : " आई मला माफ कर". हा मागे कधीतरी सह्याद्रीवर पाहिला होता. युट्युबवर आहे. ह्याला तोडच नाही. सगळ्या रसिक मायबाप प्रेक्षकांनी प्लिज प्लिज बघा ही कलाकृती. अलका कुबल आहे.

चरपस, शिरीष कणेकर पांचट जोक मारणारे,मुळात जोक मारणारे म्हणून कधी प्रसिद्ध होते।? मला ते चित्रपटविषयक व क्रिकेटविषयक शक्य तितके खरे लिहिणारे म्हणून माहीत आहेत. जेव्हा ते या विषयांवर वृत्तपत्रात लिहीत होते तेव्हा तुम्ही बहुतेक जन्मलाही नसाल. तेव्हा इंटरनेट नव्हते त्यामुळे कुणीही सोम्यागोम्या उठला व नेट धुंडाळून लिहिता झाला असे होत नसे.

आणि तुम्हाला कोण ग्रेट वाटतात याची यादी द्या बघू एकदा. कारण कुणीही कुणाबद्दल काहीही लिहिले तरी तुमचे मत तो ओव्हर रेटेड, ओव्हर हाईपेड असेच असते. आणि प्लिज, या देशातल्या लोकांचीच नावे द्या, भारी उच्च परदेशस्थ लोकांची नावे देऊ नका.>>>>>>>>>> साधना तुला +११११११११

ओ च्रप्स मी जाम फॅन आहे कणेकरांची. आधी त्यांच लिखाण वाचा आणी मग बोला.

मला आवडतं कणेकर लिखाण.
वय वाढलं तसे ते जरा सॅड मोड मध्ये लिहीतात बट दॅट इज नॅचरल.
फिल्लमबाजी चा लाईव्ह शो झाला होता आमच्या कॉलनीत.

एक ते अचाट गाणं
नन मीन प्रेमन चिनु हा
नन मीन प्रेमन चिनु
असं काहीतरी आहे ना? मला एवढंच आठवतंय Lol

निन्ने प्रेमीनचिन्नु
निन्ने प्रेमीनचिन्नु
तु ग माझ्यावरी केलीस जादू,
चल जाऊया दोघेही.. जादू नगरीत प्रेमाच्या
Proud

चित्रपट न झेपल्याने अर्ध्यातून उठून बाहेर येणे असे कधी केलेय का? मी फक्त एकाच मराठी चित्रपटाला असे केले आहे. भरत जाधवचा एक होता साधारण २००४-५ च्या आसपास आला असेल किंवा आधीच. आता नाव नाही आठवत. पण बापरे! इतकी पकव कॉमेडी. अत्याचार होता अक्षरशः अडीच तीन तास ते पाहणे म्हणजे. मध्यंतरात उठून निघून आलो. (आणि एका हिंदी चित्रपटाला पण असे झाले होते. त्याचेही नाव नाही आठवत. पण अक्की कि संजूबाबा यापैकी कोणतरी होते त्यात. कि दोघेही? सत्यान्नवच्या आसपास आला असेल)

तसेही नंतर सुद्धा मला भरत जाधव कॉमेडीयन म्हणून चित्रपटात कधीच क्लिक नाही झाला. ठराविक लकब काढून बोलणे वगैरे. तरीही खूप हिट कॉमेडी चित्रपट दिलेत त्याने. काय आवडत होतं लोकांना काय माहित. बाकी त्याचे दामोदरपंत नाटक आवडायचे.

Pages