मराठी चित्रपट: काही भावलेले, काही न झेपलेले (संवाद/दृश्ये/गाणी इत्यादी)

Submitted by atuldpatil on 31 July, 2018 - 06:11

रवा एका मित्राबरोबर गप्पा मारत होतो. विषय निघाला जुन्या मराठी चित्रपटांचा. पूर्वीचे काही चित्रपट किती जडशिळ होते (आजकालच्या हलक्याफुलक्या चित्रपटांच्या तुलनेत). भावनिक गुंतागुंत, नात्यांतील समस्या, परंपरा, प्रतिष्ठा, मानअपमान, अहंकार इत्यादी गोष्टीना दिलेले अवाजवी महत्व. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंती आणि नाट्य. असे साधारण स्वरूप असे. चित्रपटाचे मुख्य पात्र म्हणून सगळ्यांना आवडणारी आनंदी ठेऊ पाहणारी एखादी व्यक्ती असायची. चित्रपटभर तिला अनेक समस्या. त्रास त्रास त्रास नुसता. मग शेवटी कुणालातरी वाचवताना किंवा इतरांच्या सुखासाठी वगैरे तिलाच मरण येणार. मग त्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील आधीचेच एखादे आनंदी गाणे "टेंपो स्लो" करून दु:खद पार्श्वगीत म्हणून वाजत राहणार. सगळे प्रेक्षक डोळ्यात पाणी आणून जड मनाने चित्रपटगृहाबाहेर जाणार. असा एकंदर मामला असलेले खूप चित्रपट होते. किंबहुना तो काळच तसा होता. यावर या मित्राने मला सहज विचारले, "तू अंगाई चित्रपट पहिला आहेस का? गावच्या पाटलांची सून गाव दुष्काळमुक्त व्हावे म्हणून आपल्या बाळासहित बलिदान देते". त्याने असे सांगितल्यावर एक खूप जुनी आठवण जागी झाली. अंगाई हा चित्रपट पाहिला तर नव्हता. पण लहानपणी या चित्रपटाची खूप चर्चा होती ते मात्र आठवले. (त्या काळात चित्रपट गाजला कि त्याची चर्चा वर्षानुवर्षे चालत असे). मनात विचार आला कि असे चित्रपट तेंव्हा का निघत असावेत? कदाचित अशा घटना कुठेतरी घडल्या असाव्यात असे उगीचच वाटून गेले. आज इतक्या वर्षांनी हा चित्रपट अनेकांच्या विस्मरणात गेला आहे. पण सहज म्हणून युट्युब वर शोधला आणि मिळाला. ते सुद्धा अत्यंत उत्कृष्ट दर्जा मध्ये:

https://www.youtube.com/watch?v=znBfvU-Lztg

घाईघाईने पाहायला सुरवात केली. आणि माझा अंदाज खरा ठरला. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात एक विलक्षण घटना घडली होती. त्यावर आधारित तो चित्रपट होता. या चित्रपटात दाखवलेल्या अनेक गोष्टी आजच्या काळात विचित्र वाटतात. मनाला अजिबात पटत नाहीत. पण दोन-अडीचशे वर्षापूर्वीची परिस्थिती, त्याकाळातील लोकांची मानसिकता, तेंव्हाचे वातावरण, सामाजिक रचना या सगळ्याचा विचार केला तर त्याकाळात अशी अथवा अशा प्रकारची घटना घडली असावी हे पटू लागते.

गावात दुष्काळ पडलेला असतो. पाण्यावाचून हवालदिल झालेले गावकरी गाव सोडायच्या विचारात असतात. तेंव्हा गावचे पाटील त्यांना धीर देतात. गावाशेजारी तलाव खोदायचे सुचवतात. गाव सगळे मेहनत करते तलाव खणला जातो. पण त्याला पाणी लागत नाही. शेवटी ग्रामदैवत पाटलांना स्वप्नात दृष्टांत देते आणि सांगते ओल्या बाळंतिनीचा बळी दिल्याशिवाय पाणी लागणार नाही. गावात कोणीच ओली बाळंतीण मिळत नाही. मग शेवटी पाटलांची सूनच रात्री बाळासहित तलावापाशी जाऊन अंगाई म्हणत उभी राहते. तोच तलावाला पाझर फुटतो. पाणी वाढू लागते. त्यात तिचा आणि बाळाचा बळी जातो. असे शेवटी खूप विदारक दाखवले आहे. तलावाला पाणी लागलेले असते पण गावकरी रडत उभे असतात आणि पार्श्वभूमीवर अंगाई ऐकायला येत असते. वगैरे. (हि घटना सत्यकथेवर आधारलेली असून आजही या गावात त्या पाटलांचे वंशज राहतात असे चित्रपटात सांगितले आहे. अलीकडेच तिथे त्या तळ्याच्या पाण्यातील गाळ काढताना पुरावे आढळले वगैरे बातम्या आल्या होता. पण आज काळ खूप बदलला आहे. अर्थातच कधीकाळी या गावात असे काही घडले असेल यावर कोणाचा विश्वास बसणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे दोन-अडीचशे वर्षांपूर्वी तिथे नक्की काय घडले व कसे घडले हे गूढ कदाचित कायमचेच काळाच्या गुलदस्त्यातच राहील)

पण किती अतिभावविवश आणि जड चित्रपट असायचे. आज जर या घटनेवर चित्रपट काढला तर तो नक्कीच वेगळ्या धाटणीचा असेल हे मात्र खरे. पूर्वीच्या अशा अनेक चित्रपटांत इंटेन्स दृश्ये आणि संवाद असायचे. त्या काळात ते लोकांना आवडायचे सुद्धा. पण आज यातले खूप चित्रपट पाहवत सुद्धा नाहीत. डोके जड होते. काही काही दृश्ये तर आजच्या काळात मनाला पटत सुद्धा नाहीत. आणि याउलट काही चित्रपट असे आहेत कि इतका काळ उलटून गेला तरी आजदेखील पाहायला छान वाटतात. त्यातले संवाद/गाणी मनाला आजही भावतात.

तर अशाच काही न झेपलेल्या किंवा खूप भावलेल्या मराठी चित्रपटांवर आणि त्यातल्या अशा दृश्यांवर गाण्यांवर वगैरे चर्चा करण्यासाठी हा धागा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतुल पाटील कदाचित जब्बार पटेलांनी त्यांच्या माहीतीत असलेल्या एखाद्या नात्यावर सूचक भाष्य केले असावे. जे थोड्यांसाठी असावे. त्यामुळे बाकीचे ऑकवर्ड होऊ शकतात.>>>>>

मलाही हेच म्हणायचे होते पण उगीच कुणाच्या शेपटीवर पाय पडेल ह्या भीतीने गप्प राहिले. Happy Happy

शेवटी सगळ्या वॉन्टेड गुन्हेगारांची प्रेते पोलिसांना मिळतात पण ते कसे मेले हे समजत नाही, ते समजण्याचा मार्गही बंद होतो >> शेवट सूचक आहे. तशा जागा चित्रपटात अनेक आहेत. एकमेकांवर असलेल्या अविश्वासातून आणि लालसेने एकमेकांचे खून करतात असे सुचवले गेले आहे. थेट नाही पण.

मुक्काम पोस्ट ढेबेवाडीसुद्धा छानच आहे. बहुतेक व्यंकटेश माडगुळकर यांची कथा आहे ती. पोस्ट ऑफिसात एका रात्री घडते वगैरे. एकदम गोळीबंद मांडणी आहे. पण शेवट आठवत नाही.

>> कदाचित जब्बार पटेलांनी त्यांच्या माहीतीत असलेल्या एखाद्या नात्यावर सूचक भाष्य केले असावे
>> सासरा- सून संबंध खरेच असतीलही राजकीय घरांमध्ये.. अरुण साधू आणि जब्बारनी फक्त ते उघड मांडले

+१११

माफ करा जब्बार पटेल यांच्या माहितीत नव्हे. मूळ कादंबरी आहे याचा विसर पडला होता. अरूण साधू पत्रकार होते त्यामुळे ब-याच गोष्टी त्यांना ठाऊक असणार.

पद्मा चव्हाण फार बोल्ड, सेक्सी म्हतली जायची म्हणे.. काय लोकांच्या टेस्ट्स होत्या पुर्वीच्या..>>>>

ब्रह्मचारी नाटकात ती शॉर्टस घालून आल्यावर बोल्ड व सेक्सि वाटणारच हो. आताच्या युगात टूथपेस्टच्या जाहिरातीमध्येही टू पीस बिकिनीधारी ललना बघायला मिळणाऱ्या पिढीला तेव्हाच्या पिढीतले अभावग्रस्त जीवन कसे कळणार?

ब्रह्मचारी नाटकातल्या दृश्याला बोल्ड म्हणण्याची प्रथा का आहे ? हे कौतुक वाटते उगीचच्या उगीच.

त्या काळी बिकीनी घालणे हे आजच्या काळात न्युड बॉडी पेंटिंग करण्या इतकेच सेन्सेशनल असणार,
अत्रेंच्या कर्‍हेचे पाणी मध्ये ब्रह्मचारी च्या यशाचा, त्यानंतर बर्‍याच तरुण तरुणींनी बिकिनी घालून पाण्यात खेळताना फोटो काढल्याचा, ते काढताना काही जोडपी बुडून मेल्याचा उल्लेख आहे.
हल्लीच्या किकि चॅलेंज किंवा तत्सम व्हायरल प्रकारांइतकेच ते खळबळजनक आणि तरीही प्रसिद्ध असेल.
(अवांतरः ब्लू व्हेल नंतर मोमो चॅलेंज नावाचा एक प्रकार्/तशी अफवा सध्या आहे.त्यापासून आपल्या मोबाईल्/व्हॉटसप वापरत्या मुलांना सावध ठेवा.)

तुम्ही आजचा चष्मा लावून पाहताय. नाटक पहिल्यांदा रंगमंचावर आले तेव्हा अश्लील ठरवले गेले होते. नंतर अश्लील बोल्ड झाले व आता तो सिन येऊन गेला तरी कुणाला कळणार नाही. आजची पिढी उलट 'स्विमिंग पुलात कुणी शॉर्टस घालून उतरते का? स्विमिंग कॉस्टयूम घालायला हवा हे कळत नाही का' म्हणून नाके मुरडेल.

तुम्ही आजचा चष्मा लावून पाहताय. >> मान्य आहे. बहुतेक वेळा असंच होतं.
दीवार माझ्या पुतणीला बोअर वाटला होता. मला फार वाईट वाटले. पण चालायचंच.

पद्मा चव्हाण म्हटलं कि "ज्योतिबाचा नवस" आठवतो आणि त्यातले ते पन्हाळ्यावर शुटींग केलेले "कल्पनेचा कुंचला" गाणे. काही म्हणा त्याकाळातल्या चित्रपटांतील गाणी छानच होती. वादच नाही. आज चाळीस पन्नास वर्षांनी सुद्धा ऐकली जातात. पण बरेचसे चित्रपट मात्र कालबाह्य झालेत. त्यांचा देवघर म्हणून एक चित्रपट होता रविंद्र महाजनी बरोबर (चर्चा झालीय का त्याची आधी इथे?). डॉक्टर दांपत्य असते. प्रेमविवाह झालेले. हा गरीब व होतकरू टाईप. ती मात्र श्रीमंत घरातून आलेली. आणि त्यांच्या संसारातील तिच्या आईच्या अतिहस्तक्षेपास बळी पडून ते दोघे अखेर तिच्या माहेरी राहायला जातात. आणि शेवटी पुन्हा परत येतात. इतकीच कथा आहे. पारंपारिक रीतीरिवाज आणि बदलत्या काळातील जीवनशैली यांचा संघर्ष हा विषय आहे. मान्य आहे. पण घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारे वाद, डॉक्टर असूनही समस्यांशी भिडताना दाखवलेली त्या पात्रांची वैचारिक अपरिपक्वता, छोटे छोटे वाद पण नको तितके ताणले जाणे या सगळ्यांमुळे हा चित्रपट झेपत नाही पाहताना. एका प्रसंगी हे सगळे कुटुंबीय जेवायला बसलेले असतात. त्यांचा लहान मुलगा आजोबांनी केलेल्या संस्कारांमुळे जेवण जेवण्याआधी वदनी कवळ घेता म्हणायचा आग्रह करतो (परंपरा). तर त्याची आई म्हणते "काहीही काय. डॉक्टर होणार आहेस का भटजी होणार आहेस?" (आधुनिक विचारधारा). झाले. केवळ तेवढ्यावरून त्यांच्यात वाद सुरु होतो. वाढत जातो. आणि सगळे भरल्या ताटावरून उठून निघून जातात. बोंबला Lol अरे, बाब केवढीशी आणि डॉक्टर असूनही तुमचा प्रतिसाद केवढा.

शिकलेली बायको नावाचा सिनेमा होता. आमच्या आधीच्या पिढीच्या लहानपणीचा. गाणी खूप चांगली आहेत म्हणून पाहिला. त्या वेळी नात्यातल्या मुलाचे लग्न जमले की शिकलेली आहे मुलगी, एका घराची दोन घरं करते की नाही बघा असे बायकांचे बोलणे कानी पडत असे. ( बायका पण लहान मुलांच्या कानी या गोष्टी पडू नयेत याची अजिबात काळजी घेत नसत)

पिंजरा त्याकाळात प्रचंड गाजला. गाणी आज अजूनही ऐकली जातात. पण चित्रपट पाहणे किती बोजड? खूपच इंटेन्स आहे. एका भल्या माणसाच्या आयुष्याची बाई मुळे वाट लागली हे दाखवताना तब्बल चार तास लावलेत. खरे तर डॉ. लागूंचे पात्रच मला झेपले नाही. अतिशय दुबळ्या मानसिकतेचा वाहवत जाणारा मनुष्य "मास्तर" म्हणून दाखवलाय. मग वेगळे काय होणार? त्यासाठी चार तास घालवायची गरज नव्हती. शेवटी शेवटी तर प्रेक्षकांचे हाल हाल होतील आजच्या काळात.>>>
त्यातले काही सिन्स खुप छान आहेत, ते निळु फुले मास्तरांना विडि (की तंबाखु) देतो, जेवताना काहीतरी कुत्र्याचा प्रसंग आहे तो, अजुनही आहेत बरेच.

पिंजरा ची कथा ओरिजिनल नाही.

मूळ कलाकृती जर्मन आहे
Der blaue Engel' >>> The Blue Angel

हा सिनेमा प्रोफेसर उन्रत उ + न_+ र + त या कादंबरीवर आधारीत आहे.
लेखक - Heinrich Mann

Atulpatil, आजही काही घरात असल्या कारणांनी वाद होतात. वाद सुधारक व बुरसटलेले ह्या भेदामुळे होत नाहीत तर घरातली अदृश्य सत्ताकेंद्रे विरोधाला विरोध म्हणून वाद घालतात. तिथे कोण काय शिकलेय याला महत्व नसते Happy Happy

हो, ओरिजिनल नाहीय हे माहीत आहे, मूळ कथानक वाचलंय नेटवर. शांतरामांनी त्याचे भारतीयीकरण खूप छान केलेय.

फुल्यांना संवाद फारसे नसले तरी नजरेतून व छद्मी हसण्यातून त्यांनी पात्र उभे केलेय. कुत्र्याचा प्रसंग खरेच भारी आहे. मास्तरांचे पूर्ण खच्चीकरण होत जातेय हे एकेक प्रसंगातून दिसत राहते.

अ आणि अ अशा चित्रपटांच्या धाग्यामध्ये पिंजरा आणला याच आश्चर्य वाटतं.. मला तरी न झेपलेलं दृश्य मध्ये सिनेमाचा एकही भाग येईल असं वाटत नाही अजिब्बात..

पिंजरा अ आणि अ नाही. एका आदर्शवादी मास्तरचे आदर्श हाच त्याचा पिंजरा. त्यासाठी तो आपल्या अस्तित्वाचा बळी मान्य करतो..

Atulpatil, आजही काही घरात असल्या कारणांनी वाद होतात. वाद सुधारक व बुरसटलेले ह्या भेदामुळे होत नाहीत तर घरातली अदृश्य सत्ताकेंद्रे विरोधाला विरोध म्हणून वाद घालतात. तिथे कोण काय शिकलेय याला महत्व नसते >>>>>>> १०००+

पिंजरा ची कथा ओरिजिनल नाही.

मूळ कलाकृती जर्मन आहे
Der blaue Engel' >>> The Blue Angel
हे नविनच आहे माझ्यसाठी
हो, ओरिजिनल नाहीय हे माहीत आहे, मूळ कथानक वाचलंय नेटवर. शांतरामांनी त्याचे भारतीयीकरण खूप छान केलेय.>>
होना, तमशा, गाव, साक्षरता अभियान, अस्सल देशी वाटतय.. मुळ कथा english मध्ये वाचायला हवी आता.

सचिन बाल कलाकार म्हणून अतिशय गाजला होता त्याचा 'हा माझा मार्ग एकला' पहा... राजा परांजपे आहेत बहुधा, त्यात तो इतका छोटा होता, अभिनय त्याच्या रक्तात होता तेव्हा ही आणि आजही. महागुरू रोल मध्ये शिरला की थोडा घोळ होतो त्याचा.

पिंजरा माईलस्टोन चित्रपट आहे यात वादच नाही. पण आजच्या काळात तो खूप खूपच ताणला गेलेला आणि जडशीळ वाटतो म्हणून इथे त्याचा उल्लेख. (आजच्या नामांकित दिग्दर्शकांनी किंवा त्याकाळात जब्बार पटेलांनी हा विषय घेतला असता तर कसा चित्रपट झाला असता असा विचार सहज डोकावून गेला. असो)

बाकी जर्मन कलाकृतीवरून बेतलेला आहे हे माहित होते. पण त्याने त्याचे महत्व कसुभरही कमी होत नाही. कारण स्क्रिप्ट किंवा सिन्स शांतारामानी पीस टू पीस कॉपी केलेली नाही. प्रचंड मेहनत घेतली आहे. इन्स्पायर्ड म्हणता येईल फारतर. गाणी तर आजही पन्नास वर्षांनी ऐकली जातात यातच खूप काही आले.

>> त्याचे भारतीयीकरण खूप छान केलेय

+१११११

(विषयांतर: परवा एका युट्युब च्यानल वर शंकर-जयकिशन यांनी कॉपी/इन्स्पायर्ड केलेली गाणी असे विडीओ बघितले. कमाल वाटली. चार गाणी कुठेतरी इटालियन फ्रेंच गाण्याशी कुठेतरी मिळतीजुळती वाटली म्हणून "ते सुद्धा ओरिजिनल संगीत देत नव्हते" हा शिक्का? पूर्वी एक वेबसाईट सुद्धा पाहिली. भारतीय संगीतकारांनी परदेशातल्या कोणत्या संगीतावरून गाणी ढापली वगैरे. त्यात जुने नावाजलेले संगीतकार सुद्धा आहेत हे पाहून आश्चर्य वाटले होते. पुढे एका मित्राशी यावरून वाद पण झाला होता. कलाकृती इन्स्पायर्ड असली तरी त्यांनी तसा डिस्क्लेमर् द्यायला हवा होता असे त्याचे म्हणणे. मला ते थोडे हास्यास्पद वाटले. असो. वेगळा विषय. वेगळा धागा होईल)

मूळ कलाकृतीवरून पीस टू पीस घेतला आहे असे कुठेच म्हटलेले नाही. मूळ कथा जर्मन आहे. तिचे श्रेय तिला मिळाले पाहीजे इतकेच.
त्यात प्रोफेसर आहे , यात मास्तर आहे. बाकी वातावरणाचा फरक पडणारच. त्याचे भारतियीकरण करावेच लागणार.

रुका "एक रुका हुआ फैसला" हा अप्रतिम चित्रपट आहे. मूळ कलाकृती १२ अँग्री मेन .
श्रेयनामावालीत हे यायला हवे.

राजा परांजपे नावावरून आठवले. तसे पाहिले तर त्यांचा "प्रपंच" सुद्धा खूप गाजलेला चित्रपट आहे. कुणी पाहिला आहे का इथे? गाणी तर आजसुद्धा ऐकली जातात. "फिरत्या चाकावरती..." वा ! (मला वाटतंय दारूमुळे कुटुंबाची कशी वाट लागते असा विषय आहे जर मला नीट आठवत असेल तर. पण शोकांतिका आहे इतके आठवतेय) पण आज तो पाहायला होईल का? बापरे! मला तर नाही पहावणार.

Pages