मराठी चित्रपट: काही भावलेले, काही न झेपलेले (संवाद/दृश्ये/गाणी इत्यादी)

Submitted by अतुल. on 31 July, 2018 - 06:11

रवा एका मित्राबरोबर गप्पा मारत होतो. विषय निघाला जुन्या मराठी चित्रपटांचा. पूर्वीचे काही चित्रपट किती जडशिळ होते (आजकालच्या हलक्याफुलक्या चित्रपटांच्या तुलनेत). भावनिक गुंतागुंत, नात्यांतील समस्या, परंपरा, प्रतिष्ठा, मानअपमान, अहंकार इत्यादी गोष्टीना दिलेले अवाजवी महत्व. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंती आणि नाट्य. असे साधारण स्वरूप असे. चित्रपटाचे मुख्य पात्र म्हणून सगळ्यांना आवडणारी आनंदी ठेऊ पाहणारी एखादी व्यक्ती असायची. चित्रपटभर तिला अनेक समस्या. त्रास त्रास त्रास नुसता. मग शेवटी कुणालातरी वाचवताना किंवा इतरांच्या सुखासाठी वगैरे तिलाच मरण येणार. मग त्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील आधीचेच एखादे आनंदी गाणे "टेंपो स्लो" करून दु:खद पार्श्वगीत म्हणून वाजत राहणार. सगळे प्रेक्षक डोळ्यात पाणी आणून जड मनाने चित्रपटगृहाबाहेर जाणार. असा एकंदर मामला असलेले खूप चित्रपट होते. किंबहुना तो काळच तसा होता. यावर या मित्राने मला सहज विचारले, "तू अंगाई चित्रपट पहिला आहेस का? गावच्या पाटलांची सून गाव दुष्काळमुक्त व्हावे म्हणून आपल्या बाळासहित बलिदान देते". त्याने असे सांगितल्यावर एक खूप जुनी आठवण जागी झाली. अंगाई हा चित्रपट पाहिला तर नव्हता. पण लहानपणी या चित्रपटाची खूप चर्चा होती ते मात्र आठवले. (त्या काळात चित्रपट गाजला कि त्याची चर्चा वर्षानुवर्षे चालत असे). मनात विचार आला कि असे चित्रपट तेंव्हा का निघत असावेत? कदाचित अशा घटना कुठेतरी घडल्या असाव्यात असे उगीचच वाटून गेले. आज इतक्या वर्षांनी हा चित्रपट अनेकांच्या विस्मरणात गेला आहे. पण सहज म्हणून युट्युब वर शोधला आणि मिळाला. ते सुद्धा अत्यंत उत्कृष्ट दर्जा मध्ये:

https://www.youtube.com/watch?v=znBfvU-Lztg

घाईघाईने पाहायला सुरवात केली. आणि माझा अंदाज खरा ठरला. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात एक विलक्षण घटना घडली होती. त्यावर आधारित तो चित्रपट होता. या चित्रपटात दाखवलेल्या अनेक गोष्टी आजच्या काळात विचित्र वाटतात. मनाला अजिबात पटत नाहीत. पण दोन-अडीचशे वर्षापूर्वीची परिस्थिती, त्याकाळातील लोकांची मानसिकता, तेंव्हाचे वातावरण, सामाजिक रचना या सगळ्याचा विचार केला तर त्याकाळात अशी अथवा अशा प्रकारची घटना घडली असावी हे पटू लागते.

गावात दुष्काळ पडलेला असतो. पाण्यावाचून हवालदिल झालेले गावकरी गाव सोडायच्या विचारात असतात. तेंव्हा गावचे पाटील त्यांना धीर देतात. गावाशेजारी तलाव खोदायचे सुचवतात. गाव सगळे मेहनत करते तलाव खणला जातो. पण त्याला पाणी लागत नाही. शेवटी ग्रामदैवत पाटलांना स्वप्नात दृष्टांत देते आणि सांगते ओल्या बाळंतिनीचा बळी दिल्याशिवाय पाणी लागणार नाही. गावात कोणीच ओली बाळंतीण मिळत नाही. मग शेवटी पाटलांची सूनच रात्री बाळासहित तलावापाशी जाऊन अंगाई म्हणत उभी राहते. तोच तलावाला पाझर फुटतो. पाणी वाढू लागते. त्यात तिचा आणि बाळाचा बळी जातो. असे शेवटी खूप विदारक दाखवले आहे. तलावाला पाणी लागलेले असते पण गावकरी रडत उभे असतात आणि पार्श्वभूमीवर अंगाई ऐकायला येत असते. वगैरे. (हि घटना सत्यकथेवर आधारलेली असून आजही या गावात त्या पाटलांचे वंशज राहतात असे चित्रपटात सांगितले आहे. अलीकडेच तिथे त्या तळ्याच्या पाण्यातील गाळ काढताना पुरावे आढळले वगैरे बातम्या आल्या होता. पण आज काळ खूप बदलला आहे. अर्थातच कधीकाळी या गावात असे काही घडले असेल यावर कोणाचा विश्वास बसणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे दोन-अडीचशे वर्षांपूर्वी तिथे नक्की काय घडले व कसे घडले हे गूढ कदाचित कायमचेच काळाच्या गुलदस्त्यातच राहील)

पण किती अतिभावविवश आणि जड चित्रपट असायचे. आज जर या घटनेवर चित्रपट काढला तर तो नक्कीच वेगळ्या धाटणीचा असेल हे मात्र खरे. पूर्वीच्या अशा अनेक चित्रपटांत इंटेन्स दृश्ये आणि संवाद असायचे. त्या काळात ते लोकांना आवडायचे सुद्धा. पण आज यातले खूप चित्रपट पाहवत सुद्धा नाहीत. डोके जड होते. काही काही दृश्ये तर आजच्या काळात मनाला पटत सुद्धा नाहीत. आणि याउलट काही चित्रपट असे आहेत कि इतका काळ उलटून गेला तरी आजदेखील पाहायला छान वाटतात. त्यातले संवाद/गाणी मनाला आजही भावतात.

तर अशाच काही न झेपलेल्या किंवा खूप भावलेल्या मराठी चित्रपटांवर आणि त्यातल्या अशा दृश्यांवर गाण्यांवर वगैरे चर्चा करण्यासाठी हा धागा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरत जाधव खुप म्हणजे खुप ताकदीचा अभिनेता आहे. बिचार्‍याच्या वाट्याला चांगले चित्रपट येत नाहीत..

याउलट काही चित्रपट आपण आधी थियेटरला का नाही पाहिले असे पण झालेय.

गिरीश कुलकर्णीचा "मसाला (२०१२)". सहज एकदा मित्राकडे टीव्हीवर बघितला. इतका आवडला कि नंतर डीव्हीडी घेऊन घरी दोनवेळा पाहिला. खूपच सुंदर आणि अफलातून कॉमेडी. गिकु ने इतका नैसर्गिक अभिनय केलाय यात कि बस्स!

आणि दुसरा सरीवर सरी. गंभीर विषयावर आहे. पण अप्रतिम! खूप म्हणजे खूपच भावला.

मागच्या ४-५ वर्षात आलेले आणि फार हाईप झालेले तीन अतिफालतू पिक्चर मी टॉकिजला जाऊण बघितले आहेत.
टपाल, शहाणपण देगा देवा आणि नागरिक.
असले बोगस, दळभद्री पिक्चर की बोलता सोय नाही. अतीव पीलू कारभार. नागरिकला तर टॉकिजमधून उठून जावेस वाटत होत.

चित्रपट न झेपल्याने अर्ध्यातून उठून बाहेर येणे असे कधी केलेय का? >>> मी केलंय. ज्यु. सोकुचा अजिंठा सिनेमा जेमतेम मध्यंतरापर्यंत झेपवला आणि मग बाहेर येऊन मी आणि माझी बहिण १० मिनिटं हसत होतो. अगदीच अ आणि अ होता तो.

भरत जाधव खुप म्हणजे खुप ताकदीचा अभिनेता आहे. बिचार्‍याच्या वाट्याला चांगले चित्रपट येत नाहीत.. >>>> parat ringa ringa chi aathavan aali

>> त्या पूर्ण चित्रपटाची ट्रीटमेन्टच वेगळी होती . पण जाउएदे तो या धाग्याचा विशय नाही
>> parat ringa ringa chi aathavan aali

आता सांगूनच टाका. धाग्याचा विषय भावलेले/न झेपलेले मराठी चित्रपट वर चर्चा असा आहे.

दादांनी अंजनीच्या सुता, तुला रामाचे वरदान हे गाणे >> यात सबकुछ दादा कोंडके होते आणि गाणं खरंच अप्रतिम आहे. ऐकून पहा.

रिंगा रिंगा खरंच एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. वेगवान हाताळणी, उत्तम सस्पेन्स, आणि अजिंक्य देव, अंकुश चौधरी आणि भरत जाधव यांच्या हटके भूमिका. अजून संतोष जुवेकर आहे तोही छान आहे. सोनाली सिनियर आहेत त्यांनीही चांगलं काम केलं आहे. चित्रपटाचे नावच 'रिंगा रिंगा रोझी, पॉकेट फुल ऑफ पो़झी' या लहान मुलांच्या बडबडगीतावर आधारले आहे आणि ते चपखल बसतं. १-२ गाणीही चांगली आहेत. यातल्याच 'मस्ती की बस्ती' गाण्याची चाल अजय-अतुलने बोल बच्चन मधे 'नच ले नच ले' ला वापरली आहे.

३.१४ , लेख खरेच धमाल आहे आनि खराही आहे. हेच ते अगदी बालगंधर्वाच्या नावाने गळे काढणारे तसलेच...

सरकारनामामधलं अजिंक्य देव व सुकन्या मोने(२५ वर्षांपुर्वीची) यांच्यावर चित्रीत झालेलं 'अलवार तुझी चाहूल' हे युगुलगीत नितांतसुंदर आहे. कविता कृष्णमुर्तीचा आवाज. लै भारी. >>>>
माझं ही खूप लाडकं गाणं आहे हे !
पण पद्मजा फेणाणी-जोगळेकरांचं आहे ना हे गाणं ?

शि.क. वाला लेख आधीही वाचला होता
मी शिरीष कणेकर शैली ची फॅन असल्याने दिलीपकुमार आणि लता मंगेशकर ची व्यक्तिपूजा इग्नोर मारू शकते ☺️☺️☺️
लेखातली चित्र मस्त.

साधनाजी आणि किल्लीताई.. मी कनेकरांचे लेखन वाचलं नाहीय पण youtube वर माझी फिल्लंबाजी नावाचा एक कार्यक्रम पाहिलाय. खूप पांचट विनोद आहेत त्यात.

'भेट' हा चंद्रकांत कुलकर्णीचा चित्रपट खूप सुंदर आहे. प्रतीक्षा लोणकर, अतुल कुलकर्णी, तुषार दळवी, मोहन जोशी, वंदना गुप्ते, श्रेयस तळपदे, प्रिया बापट ( बालकलाकार) इत्यादी. अतिशय साधी, तरल कथा, उत्कृष्ट अभिनय, दिग्दर्शन. अॅमेझॉन वर आहे बहुतेक.
तसाच अश्विनी भावेचा ' कदाचित'. सचिन खेडेकर, सदाशिव अमरापूरकर यांचे उत्कृष्ट अभिनय. उत्तम कथा.

कणेकरांचे लेख वाचले आहेत, त्यांचे एकपात्री प्रयोग पण पाहिले आहेत. वर कुणीतरी म्हट्ल्याप्रमाणे, क्रिकेट आणी सिनेमा ह्या विषयावर ची माहिती चांगली असते. बाकी विनोद आणी 'शैली' नाही भावली कधी. शैली अगदीच कट्टा स्टाईल वाटते आणी एखाद्याचा अपमान करत केलेला 'विनोद' is out of my league.

शिरिष कणेकर मलाही फारसे आवडत नाहीत.
माझी फिल्लमबाजी/फटकेबाजी बर्‍या कथाकथन प्रकारात मोडतात. पण त्यांचं लिखाण एकूणच अ‍ॅव्हरेज (त्यापेक्षाही खाली वाटत) एक ते फक्त हॉटेलातून साबण चोरून आणून वापरतो तो पॅरा मात्र हसवून गेला होता मला.

गिरीश कुलकर्णीचा "मसाला (२०१२)". सहज एकदा मित्राकडे टीव्हीवर बघितला. इतका आवडला कि नंतर डीव्हीडी घेऊन घरी दोनवेळा पाहिला. खूपच सुंदर आणि अफलातून कॉमेडी. >>>>११११ comedy बरोबर कथानक पन खूप सुंदर मांडल आहे. सामान्य माणूस पन जिद्दी न धडाडीने नवनवीन उद्योग करतो भले अपयश येउदे परंतु निराश न होता नविन उद्योग. हे खुप भावल मला.

कणेकरांचे एकला बोलो रे जमल्यास वाचा.

छोटी सी बात हा सुंदर पिक्चर आजच्या जमान्यात स्टॅकिंग तसेच त्या काळात ते विनोद ओके असावेत.वन मॅन स्टँडप टॉक शो हा प्रकार मराठीत त्यांनी प्रसिद्ध केला.

अत्यंत पर्सनालाईझ, लाऊड विनोद करणारा कपिल शर्मा शो सुद्धा पब्लिक ला आवडतो.

अत्यंत पर्सनालाईझ, लाऊड विनोद करणारा कपिल शर्मा शो सुद्धा पब्लिक ला आवडतो>>>>

मी या आधी एक दोनदा पाहिलाय हा शो, भयानक आहे. हे असले शोज खूप टीआरपी खेचतात म्हणे.

मी कणेकरांचे कुठलेही शोज पाहिलेले नाहीत. त्यांनी सुरवातीपासूनचे हल्लीपर्यंतचे लिखाण वाचलेले आहे व आवडलेले आहे. तो वरचा लेख वैयक्तिक आकसातून लिहिलाय असे अधून मधून वाटले. बाकी चांगला आहे लेख. फोटो आवडले. लेखकाला फोटो जुनेच द्यावे का लागले कळले नाही. नव्या जमान्यांच्या नव्या शिलेदारांचे फोटो देता आले असते की. पण मग फारसे कुणी ओळखता आले नसते असे वाटले असावे का? लेखनात अजून एक खटकले. लेखकाला भारतोय चित्रपटात अचानक कुणी कुठेही गायला सुरू करतो हे खूप खटकले. खटकू दे, हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण आजच्या गायकांची स्तुती करताना आजही बरीच गाणी पात्रांच्या तोंडी असतात हे तो विसरला का हे कळले नाही. हे जर तेव्हा हास्यास्पद वाटू शकते तर आजही का वाटू नये हे कळले नाही.

कणेकर मला आवडायचे. पण वंदना खरे यांचा अपमान करणारे दोन लेख त्यांनी लिहीले तेव्हांपासून मनातून उतरले. ज्या कारणासाठी कपिल शर्मा मनातून उतरला तेच. समोरच्याचा अपमान करून आपण लोकप्रिय व्हायचं हे झेपणारं नाही. काही लोकांचं काहीही केलं तरी कौतुक होतं, हेच दुस-याने केले तर त्याची सालटी निघतात.

अर्थात जे आवडलेलं आहे ते आवडलेलं याच सदरात कायम आहे. माणूस मनातून उतरला म्हणून फुली नाही मारता येत.
फिल्लमबाजी आणि क्रिकेटला पर्याय नाही. पैकी फिल्लमबाजी आवडण्याचे कारण म्हणजे यातल्या ब-याच गोष्टी मित्रांच्यात अशाच पद्धतीने डिस्कस झालेल्या असायच्या. कणेकरांनी त्याचं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करून ठेवलं. पण नंतर कणेकरांच्या शैलीची एव्हढी कॉपी झाली कि आवरा असं म्हणावंसं वाटू लागलं. क्रिकेटच्या बाबतीत मात्र संझगिरी कणेकरांची कॉपी मारतात कि कणेकर संझगिरींची असं वाटायचं.

एखाद्याचा अपमान करून हशा मिळवणे यात AIB रोस्ट चे ओरोगीनल म्हणावेत असे त्यांचे विनोद असत. अतिशय फटकळ आणि बोचरे.

स्वतः वर सुद्धा ते तितकेच बोचरे विनोद करत.

लेखनाचा फॅन वगैरे नाही म्हणता येणार पण त्यांचे लिखाण आवडीने वाचून हसलो आहे भरपूर.

कणेकर आवडावे किंवा नाही हा व्यक्तिगत चॉईस आहे.
इतकं खरं की सुरुवातीचे त्यांचे फिल्लमबाजी इ. मधले विनोद मस्त असायचे.गाजर का हलवा बद्दलच्या टिपणी वगैरे.त्यांचे अखंड दिलीपकुमार प्रेम मला झेपलेले नाही पण ते इग्नोरता येते.
कणेकरांच्या आयुष्यात झालेली ट्रजीडी(आई अगदी लहान वयात जाणे, वडिलांशी फारसे न पटणे यामुळे त्यांच्या मनावर स्कार्स आहेत हे लेखनात जाणवते.
नंतर वय वाढेल तसे हे रिग्रेटस वाढत गेले आणि लिखाणात तो 'गुड ओल्ड डेज' सूरही.सध्या मला त्या लिखाणात दुःख जास्त दिसत असल्याने हल्लीचे लिखाण वाचत नाही.कारण इट मेक्स मी वॉन्ट टू गो बॅक इन टाईम अँड ब्रिन्ग हिज यंग डेज बॅक.

त्यांनी मेंशन केलेली 85% हिंदी गाणी मला माहिती नाहीत.ती मिळवून ऐकणारही नाही.पण त्या गाण्यांवर असलेले त्यांचे प्रेम, दिलीपकुमार बद्दलची पॅशन मला लोभस वाटते.

इथले वाचून रिंगा रिंगा बघायला घेतला. भयंकर बोअर आहे. सो कु व भ जा प्रेमात बुडालेले नवरा बायको हे कॉम्बो पूर्ण फसलेय. चित्रपटात ते दोघेही एकमेकांसोबत comfortable नाहीत व ते प्रत्येक दृश्यात दिसते. काल पाऊण बघितला पण शेवट काय होणार ते कळले. ही येडा बनून पेडा खाणारी बाई सगळ्यांना संपवणार.

बाकी एकही पात्र भूमिकेत convincing वाटत नाही. ठीक आहे, अमुक पात्र असे असावे याचे स्टेरिओटैप्स माझ्या डोक्यात होते ते या चित्रपटाने तोडले म्हणायचे तर तसेही नाही. पात्रे स्टिरिओ टाइप उभी केली नाहीत, जी उभी केली ती हास्यास्पद वाटतात.

पूर्ण चित्रपट उथळ आहे, सोकू व भ जा च्या प्रेमासकट.

फक्त एक प्रसंग होता ज्यात कलाकार जान ओतू शकले असते. रंगाराव व पक्षाध्यक्ष यांची सुरवातीला भेट होते तो प्रसंग. यात रंगाची मुजोरी व पक्षाध्यक्षांची हतबलता कलाकारांना दाखवता आली असती. पण पूर्ण फसलाय हा प्रसंग. कलाकार कमी पडले की दिग्दर्शकाने त्यांना सिन असा उभा करायला भाग पाडले हे कळले नाही. पण हा एकमेव सिन होता जो खरा वाटू शकला असता, तो वाया गेला. बाकी पूर्ण चित्रपट अतीउथळ आहे.

अत्युच्च दर्जाचे चित्रपट बनवणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे. उत्तम दर्जाचे कमी बनतात. त्यामुळे मॉडरेट अपेक्षा ठेवून सिनेमे पाहीले तर प्रेक्षक, दिग्दर्शक, निर्माता, फायनान्सर, एक्झिबिटर असे सगळे खूष होऊ शकतो. अगदी अ आणि अ असतील तर ते वेगळ्या त-हेचे मनोरंजन असते. ते एण्जॉय करणे ही सुद्धा एक कला आहे आणि ती सर्वांना जमेलच असे नाही.
रिंगा रिंगा प्रेडिक्टेबल असूनही जमलेला संदेहपट आहे.

चेकमेट आणि अजून दोन धक्कातंत्र असलेले सिनेमे ओळीने पाहील्याने नावे लक्षात नाही राहिली. मराठीत कमी आहेत असे सिनेमे.

चेकमेट व गैर दोन्ही पाहिलेत, चेकमेट व्यवस्थित बांधून ठेवतो, धक्के बसतात ते खरेच बसतात. क्लायमॅक्स थोडासा ढेपळलाय. गैर चेकमेटच्या तुलनेत ठीकठाक वाटला. या दोघांच्या तुलनेत रिंगा अगदीच फुळकवणी व प्रेडिक्टेबल वाटला. पहिल्याच दृश्यात सोकू नसलेल्या व्यक्तीला ती आहेच असे दुसऱ्याला भासवून बोलायचे नाटक इतक्या सफाईने करताना पाहून हे स्किल नंतर वापरणार हे कळायला रॉकेट सायन्स लागत नाही. नंतर बंदुकीने आमनासामना झाल्यावर, त्यातला एक वीर जिवंत दाखवल्यावर दुसरा मेला असणार हे कळते. त्यामुळे भ जाबद्दल कसलाही धक्का बसत नाही.

असो. धागा न झेपलेल्या प्रसंगाबद्दल आहे, त्यात चांगला म्हणून रिंगा चा उल्लेख झाला म्हणून तो पाहिला व मला तो ह्या धाग्याशी सुसंगत वाटला. म्हणजे माझया पोस्टी अगदीच अस्थानी नाहीयेत. Happy

Pages