मराठी चित्रपट: काही भावलेले, काही न झेपलेले (संवाद/दृश्ये/गाणी इत्यादी)

Submitted by अतुल. on 31 July, 2018 - 06:11

रवा एका मित्राबरोबर गप्पा मारत होतो. विषय निघाला जुन्या मराठी चित्रपटांचा. पूर्वीचे काही चित्रपट किती जडशिळ होते (आजकालच्या हलक्याफुलक्या चित्रपटांच्या तुलनेत). भावनिक गुंतागुंत, नात्यांतील समस्या, परंपरा, प्रतिष्ठा, मानअपमान, अहंकार इत्यादी गोष्टीना दिलेले अवाजवी महत्व. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंती आणि नाट्य. असे साधारण स्वरूप असे. चित्रपटाचे मुख्य पात्र म्हणून सगळ्यांना आवडणारी आनंदी ठेऊ पाहणारी एखादी व्यक्ती असायची. चित्रपटभर तिला अनेक समस्या. त्रास त्रास त्रास नुसता. मग शेवटी कुणालातरी वाचवताना किंवा इतरांच्या सुखासाठी वगैरे तिलाच मरण येणार. मग त्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील आधीचेच एखादे आनंदी गाणे "टेंपो स्लो" करून दु:खद पार्श्वगीत म्हणून वाजत राहणार. सगळे प्रेक्षक डोळ्यात पाणी आणून जड मनाने चित्रपटगृहाबाहेर जाणार. असा एकंदर मामला असलेले खूप चित्रपट होते. किंबहुना तो काळच तसा होता. यावर या मित्राने मला सहज विचारले, "तू अंगाई चित्रपट पहिला आहेस का? गावच्या पाटलांची सून गाव दुष्काळमुक्त व्हावे म्हणून आपल्या बाळासहित बलिदान देते". त्याने असे सांगितल्यावर एक खूप जुनी आठवण जागी झाली. अंगाई हा चित्रपट पाहिला तर नव्हता. पण लहानपणी या चित्रपटाची खूप चर्चा होती ते मात्र आठवले. (त्या काळात चित्रपट गाजला कि त्याची चर्चा वर्षानुवर्षे चालत असे). मनात विचार आला कि असे चित्रपट तेंव्हा का निघत असावेत? कदाचित अशा घटना कुठेतरी घडल्या असाव्यात असे उगीचच वाटून गेले. आज इतक्या वर्षांनी हा चित्रपट अनेकांच्या विस्मरणात गेला आहे. पण सहज म्हणून युट्युब वर शोधला आणि मिळाला. ते सुद्धा अत्यंत उत्कृष्ट दर्जा मध्ये:

https://www.youtube.com/watch?v=znBfvU-Lztg

घाईघाईने पाहायला सुरवात केली. आणि माझा अंदाज खरा ठरला. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात एक विलक्षण घटना घडली होती. त्यावर आधारित तो चित्रपट होता. या चित्रपटात दाखवलेल्या अनेक गोष्टी आजच्या काळात विचित्र वाटतात. मनाला अजिबात पटत नाहीत. पण दोन-अडीचशे वर्षापूर्वीची परिस्थिती, त्याकाळातील लोकांची मानसिकता, तेंव्हाचे वातावरण, सामाजिक रचना या सगळ्याचा विचार केला तर त्याकाळात अशी अथवा अशा प्रकारची घटना घडली असावी हे पटू लागते.

गावात दुष्काळ पडलेला असतो. पाण्यावाचून हवालदिल झालेले गावकरी गाव सोडायच्या विचारात असतात. तेंव्हा गावचे पाटील त्यांना धीर देतात. गावाशेजारी तलाव खोदायचे सुचवतात. गाव सगळे मेहनत करते तलाव खणला जातो. पण त्याला पाणी लागत नाही. शेवटी ग्रामदैवत पाटलांना स्वप्नात दृष्टांत देते आणि सांगते ओल्या बाळंतिनीचा बळी दिल्याशिवाय पाणी लागणार नाही. गावात कोणीच ओली बाळंतीण मिळत नाही. मग शेवटी पाटलांची सूनच रात्री बाळासहित तलावापाशी जाऊन अंगाई म्हणत उभी राहते. तोच तलावाला पाझर फुटतो. पाणी वाढू लागते. त्यात तिचा आणि बाळाचा बळी जातो. असे शेवटी खूप विदारक दाखवले आहे. तलावाला पाणी लागलेले असते पण गावकरी रडत उभे असतात आणि पार्श्वभूमीवर अंगाई ऐकायला येत असते. वगैरे. (हि घटना सत्यकथेवर आधारलेली असून आजही या गावात त्या पाटलांचे वंशज राहतात असे चित्रपटात सांगितले आहे. अलीकडेच तिथे त्या तळ्याच्या पाण्यातील गाळ काढताना पुरावे आढळले वगैरे बातम्या आल्या होता. पण आज काळ खूप बदलला आहे. अर्थातच कधीकाळी या गावात असे काही घडले असेल यावर कोणाचा विश्वास बसणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे दोन-अडीचशे वर्षांपूर्वी तिथे नक्की काय घडले व कसे घडले हे गूढ कदाचित कायमचेच काळाच्या गुलदस्त्यातच राहील)

पण किती अतिभावविवश आणि जड चित्रपट असायचे. आज जर या घटनेवर चित्रपट काढला तर तो नक्कीच वेगळ्या धाटणीचा असेल हे मात्र खरे. पूर्वीच्या अशा अनेक चित्रपटांत इंटेन्स दृश्ये आणि संवाद असायचे. त्या काळात ते लोकांना आवडायचे सुद्धा. पण आज यातले खूप चित्रपट पाहवत सुद्धा नाहीत. डोके जड होते. काही काही दृश्ये तर आजच्या काळात मनाला पटत सुद्धा नाहीत. आणि याउलट काही चित्रपट असे आहेत कि इतका काळ उलटून गेला तरी आजदेखील पाहायला छान वाटतात. त्यातले संवाद/गाणी मनाला आजही भावतात.

तर अशाच काही न झेपलेल्या किंवा खूप भावलेल्या मराठी चित्रपटांवर आणि त्यातल्या अशा दृश्यांवर गाण्यांवर वगैरे चर्चा करण्यासाठी हा धागा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पाहिलाय हा चित्रपट. असे चित्रपट म्हणजे बाया रुमाल घेऊनच बसायच्या. यातली गाणी छान आहेत बहुतेक. सुरवातीची अंगाई.

ती उमा होती हे माहीत नव्हते. मला जयश्री गडकर वाटलेली. अजून एक चित्रपट होता थांब लक्ष्मी कुंकू लावते. यातही जयश्रीच आहे असा माझा समज आहे. यात मोठया घरातले सगळेच नादान निघतात. शेवटी लक्ष्मी घर सोडून निघते तेव्हा मोठी सून थांब बाई निदान कुंकू तरी लावून जा म्हटल्यावर बिचारी सुवासिनी लक्ष्मी थांबते. मग ही सून मागच्या विहिरीत जीव देते, त्याआधी रांगोळीने सगळी हकीकत लिहून ठेवते. मी हा चित्रपट थेटरात बघितलेला. त्यातला शेवटचा रांगोळीचा सिन आठवतोय व कुंकू लावून घेण्यासाठी थांबून कंटाळलेली लक्ष्मी आठवतेय फक्त.

त्यात एक सीन आहे. पाटलांना भेटायला एक गृहस्थ आलेले असतात . ते प्यायला पाणी मागतात. पण घरात पाणी नसते. पाटील चिंतीत होतात. की घरी आलेल्या पाहुण्याला पाणी कसं देऊ.
पण ती सून असते ते नारळ फोडून त्यातील पाणी त्यांना प्यायला देते. आणि ते फार खुश होतात. त्यांचे आशीर्वाद तिला मिळतात.

मला ही खूप आवडलेला तो मुव्ही.

छान लिहिलं आहे. हा आणि थांब लक्ष्मी... दोन्ही मी दूरदर्शनवर शनिवारच्या चित्रपटांमध्ये बघितले आहेत. लहानपणी बघितल्यामुळे रडका सिनेमा या पल्याड विशेष नोंद घेतली नाही कधी. सत्य घटनेवर आधारित आहे माहित नव्हतं. Happy

कसली अमानुष कथा आहे! असले खुळचट सिनेमे विस्मरणात गेलेलेच बरे. इथे घरच्या सुनेने सासर्‍याच्या इज्जतीसाठी प्राण दिल्याचे ग्लोरिफिकेशन. Angry पूर्वी खूप असायचे असले सिनेमे. वरदाने लिहिलेला थांब लक्ष्मी कुंकू लावते असाच. अजून बरेच होते. सुनेच्या सोशिकपणाची कमाल ही बेसिक थीम.

>> अजून एक चित्रपट होता थांब लक्ष्मी कुंकू लावते

हो. अजून एक थोरली जाऊ म्हणून एक होता. त्यातले ते गाणे "फुलला, साजिरा, संसार माझा" (आशाजींनी अतिशय गोड व सुरेल गायिलेय) पण हेच गाणे शेवटी ती थोरली जाऊ मरते तेंव्हा पार्श्वसंगीत म्हणून प्ले केले आहे. कारुण्य हाच गाभा असलेले चित्रपट होते. एकटी नावाचा चित्रपट तर हद्द होता. लाडाने वाढवलेल्या एकुलत्या एक मुलाला शहरातली सून कशी आईपासून तोडते आणि त्या आईचा एकटेपणी दुर्दैवी मृत्यू होतो वगैरे. हा चित्रपट पाहून तर ढसा ढसा रडायला येत असे.

>> इथे घरच्या सुनेने सासर्‍याच्या इज्जतीसाठी प्राण दिल्याचे ग्लोरिफिकेशन.

मुळीच नाही. ग्लोरिफिकेशन कुठे दिसले तुम्हाला? सिनेमाची कथा सांगितली आहे आणि ती (इतर सिनेमांप्रमाणे) काल्पनिक असती तर हे मी लिहिले पण नसते. पण जेंव्हा सत्य घटनेवर आधारित आहे असे वाचले तेंव्हा मनात अनेक प्रश्न उभे राहिले. आपण धागा शेवटपर्यंत वाचलेला दिसत नाही. शेवटी काही प्रश्न उपस्थित केलेत. तिथे रीड बिट्वीन लाईन्स. त्याकाळात अंधश्रद्धांचा जनमानसावर किती जबरदस्त पगडा होता हेच दिसून येते. जशी घटना चित्रपटात सांगितली आहे तशी ती नक्कीच घडलेली नसणार. भूजलपातळी जिथे उथळ आहे तिथे पाणी लागणार. अन्यथा नाही. विज्ञान आहे. पण पुरावे मिळालेत त्याअर्थी हि घटना पूर्ण काल्पनिक आहे असेही म्हणता येत नाही. म्हणजेच घडलेय काहीतरी पण नक्की काय ते वेगळेच घडले असणार. जे चित्रपटात दाखवलेय किंवा पिढ्यानपिढ्या सांगितले जातेय ते आजच्या काळात प्रश्नांकित करण्याला बराच वाव आहे. तोच हेतू आहे धागा काढण्यामागे.

पूर्वीच्या काळी, मध्ययुगापासूनच कदाचित, मोठमोठ्या बांधकामांसाठी - ती यशस्वी होण्यासाठी - नरबळीची गरज असते अशी बहुदा समजूत होती असे अशा प्रकारच्या लोककथांवरून वाटते. श्री.म. माटे यांनी सुद्धा पुरंदर किल्ल्याच्या बांधकामाच्या वेळेस एका पौगंडावस्थेतील जोडप्याचा नरबळी दिला जातो अशा दंतकथेवर आधारित कथा लिहिली आहे (नाथनाक आणि देवकाईची गोष्ट). तेव्हा वरची घटना घडली नसेलच असं छातीठोकपणे सांगता येणार नाही.
सत्तरच्या दशकात गोव्याच्या काळी नदीवर बरीच वर्षे पूल बांधायला यश येत नव्हतं. तेव्हा तिथे नरबळी दिल्याशिवाय तो पूल पूर्ण होणारच नाही अशी स्थानिक समजूत पसरली होती ती इथल्या बर्‍याच जणांना आठवत असेलच.

खरंच करुण कहाणी आहे.. बाळाला घरीच ठेवायचं होतं ना.. बळी तर बाळंतिणीचा हवा होता..
जुन्या घटनेची माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद !

सोलापूर ला भुईकोट किल्ला आहे त्याच्याशी पण अशीच एक कथा निगडित आहे असे ऐकलेले,
किल्ल्यावरून रात्री स्त्रीच्या रडण्याचा आवाज येतो वगैरे ऐकलेले

श्री.म. माटे यांनी सुद्धा पुरंदर किल्ल्याच्या बांधकामाच्या वेळेस एका पौगंडावस्थेतील जोडप्याचा नरबळी दिला जातो अशा दंतकथेवर आधारित कथा लिहिली आहे >> मी वाचलेली ही कथा Sad

विनिता पुरंदर बांधते वेळी बांधकाम पूर्ण होत नव्हतं. एक बुरुज सारखा ढासळत होता. तेव्हा त्या बांधकामात बाळ आणि बाळंतिणीला चिणून त्यांचा बळी द्यायला सांगितलं होतं. तेव्हा तिथल्या कोणीतरी सून आणि तिच्या बाळाला भिंतीत पुरून बळी दिलेला. मग तो बुरुज पूर्ण झाला. अशी पण कथा मी वाचलीय.

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाचे काम चालू असताना एक स्त्री आत्मसमर्पण करते असा ट्रॅक गोनीदांच्या कादंबरीत आला आहे

बघायला हवा सिनेमा.
त्याकाळात अंधश्रद्धांचा जनमानसावर किती जबरदस्त पगडा होता हेच दिसून येते. >>>>>>>+१

बिचाऱ्या लहान बाळांचा काय दोष>>>> मग त्यांच्या आईचा तरी काही दोष असतो का?

>> पुरंदर किल्ल्याच्या बांधकामाच्या वेळेस एका पौगंडावस्थेतील जोडप्याचा नरबळी दिला जातो

हे माझ्याही वाचनात आलेय. किल्ले, धर्मशाळा, तलाव, धरण इत्यादी बांधकामं करताना बळी द्यावा लागतो हि अंधश्रद्धा त्याकाळात कदाचित खूप प्रमाणात असावी. म्हणून अशा कथा ज्याप्रकारे उदात्तीकरण करून दाखवल्या/सांगितल्या जातात तशा त्या नक्कीच घडल्या नसणार असे वाटते.

अश्या कथा खऱ्या असल्या तरी त्यावर पिक्चर बनणं धोकादायक वाटतं.जिथे एक ऐकिवातली लोककथा म्हणून लोक अशी प्रथा आहेच असं मानतात तिथे पिक्चर निघाला म्हणजे शिक्का मोर्तबच.
सून बलिदान द्यायला गेली, योगायोगाने तेव्हाच खालून झिरपायला वेळ लागलेले पाणी वर आले असा काहीसा योगायोग असेल, त्याची रूढ प्रथा बनली.प्रत्येकाला ओल्या बाळंतिणी किंवा बाळं किंवा कुमारिका का बळी म्हणून एलिजीबल वाटतात?एखादा 75 वर्षांचा गावातला खडूस म्हातारा चालत नाही?
(म्हणजे ज्यांच्याकडून प्रतिकार होणे शक्य नाही असे घटक सोयीस्कर पणे देवाला/देवीला चालतात का?)
या का कोणत्यातरी अश्याच चित्रपटात आशा काळे किंवा कोणीतरी शेवटी भूत बनून बाळाला अंगाई गायला आलेली असते.

अग हा पिक्चर 1968 साली बनलाय. त्यामुळे जाऊदे.

आणि तो आशा काळे वाला बाळा गाऊ कशी अंगाई. पिक्चर तेव्हा पाहताना मी ढसाढसा रडले होते पण आता आठवून हसूनहसून डोळ्यातून पाणी येते. अतीफालतू स्टोरीलाईन वर बनवलेला एक चांगला सिनेमा, चांगला यासाठी की स्टोरी कशीही असली तरी सगळ्यांनी कामे भारी केली होती व त्यातली गाणी अप्रतिम होती.

पिक्चर तेव्हा पाहताना मी ढसाढसा रडले होते पण आता आठवून हसूनहसून डोळ्यातून पाणी येते. +११११

आणि अजून एक आहे ना.भिवा चा खून झालेला असतो.आणि तरी तो बैलगाडीतून जयश्री गडकर ला पिकअप करायला येतो.त्याला थंडीने मायग्रेन होते म्हणून जयश्री बाई चोळी काढून त्याच्या डोक्याला बांधतात.(मेलं भूत होऊनही आंबट शौक काही जात नाही हो!)
मग तश्याच पदर रॅप अराउंड करून घरी येतात तर भिवा मेल्याचे कळते.प्रेताच्या डोक्याला चोळी तशीच असते.
(भूत असला म्हणून काय, गाडीत एखादी स्पेअर पगडी किंवा मुंडासे नको का?)

>> बाळा गाऊ कशी अंगाई... आता आठवून हसूनहसून डोळ्यातून पाणी येते. अतीफालतू स्टोरीलाईन... सगळ्यांनी कामे भारी केली होती व त्यातली गाणी अप्रतिम होती.
+11111

बाळा गाऊ कशी अंगाई वरून जितेंद्र जयाप्रदा चा माँ बनला होता का? >>>> नाही. पण जितेंद्र जयाप्रदा च्या सन्जोग वरुन एक मराठी चित्रपट बनला होता 'बाळा बाळा जो जो रे' अजिन्क्य देव आणि निशिगन्धा वाड होते त्यात. 'जो जो रे बाळा' ची चाल हुबेहूब 'यशोदा का नन्दलाला' वरुन त्यात घेतली (चोरली) होती.

एखादा 75 वर्षांचा गावातला खडूस म्हातारा चालत नाही? >>>> Rofl

त्याला थंडीने मायग्रेन होते >>>> भूताला मायग्रेन. Lol

आणि अजून एक आहे ना.भिवा चा खून झालेला असतो.आणि तरी तो बैलगाडीतून जयश्री गडकर ला पिकअप करायला येतो.>>

तो बहुतेक 'टिळा लाविते मी रक्ताचा' हा चित्रपट आहे.

बाळा गाऊ कशी अंगाई वरून जितेंद्र जयाप्रदा चा माँ बनला होता का?>>> नाही, स्टोरी वेगळी आहे. बाळा गाऊ कशी अंगाई अचाट आणि अतर्क्य आहे. आशा काळेचं विक्रम गोखलेवर प्रेम असतं पण तो दुसर्‍या मुलीशी लग्न करतो. मग आशा काळे त्यांच्या बाळाला सांभाळते पण तिच्या हातून बाळ गच्चीतून चुकून खाली पडतं आणि त्याचा मृत्यु होतो. विक्रम गोखलेच्या बायकोला वेड लागतं आणि ती आशा काळेला दोष देते. मग पापक्षालन करण्यासाठी आशाबाई दुसर्‍या माणसाशी लग्न करतात आणि आपले मूल विक्रम गोखलेच्या स्वाधीन करतात (स्वतःच्या नवर्‍याला काही थांगपत्ता लागू न देता) आणि घर सोडून जातात. पण सुदैवाने विक्रम गोखलेची बायको बरी होते आणि त्यांचे डोके ताळ्यावर असल्यामुळे ते मूल आशा काळेच्या नवर्‍याला परत करतात. इकडे आशाबाई अपघातात्/की वादळात मरतात पण आत्मा बनून आपल्या बाळाला अंगाई म्हणायला परत येतात Sad
कायच्या काय स्टोरी होती..पण गाणी सुरेख होती. 'निबोणीच्या झाडामागे', 'अरे मन मोहना', 'धुंदीत राहू' वगैरे. गाण्यांसाठी सिनेमा सहन केला Sad आशा काळेचं पात्र tragic वाटावं असं तयार केलं असावं पण पूर्ण चित्रपटभर सगळी सहानुभूती विक्रम गोखलेच्या बायकोला आणि आशा काळेच्या नवर्‍याविषयीच वाटत राहाते. यात एक गाण आहे ज्यात आशा काळे विक्रमबरोबरच्या सुखी संसाराचे स्वप्न बघत असते त्यात तो घरी आल्यावर ती त्याचे बूट काढून पदराने बूट आणि त्याचे पाय पुसते असा चीड आणणारा प्रसंगही आहे Sad

ते चिंचेचे झाड पण याच चित्रपटातील आहे ना?विगो च्या हनिमून च्या वेळी बहुतेक.

आणि हाईट म्हणजे विगो आणि बायको लग्नानंतर् आशा काळे च्या बंगल्यात राहत असतात असे काहितरी आहे

खरंच हद्द आहे बाळा गाऊ कशी अंगाई. ज्या मुलामुळे प्रेमभंग झाल्याने आपली मुलगी लग्न न करण्याचा निर्णय घेते, त्याच मुलाला व त्याच्या बायकोला त्या मुलीचा पिता आपल्या घरी राहायला परवानगी देतो! कोण करेल असे? एखाद्या बापाने संबंध तोडले असते. आणि हद्द म्हणजे मुलीला बघायला येऊन हलकट भाषा वापरणाऱ्या मुलाशीच तिचे लग्न लावून देतो. थोडक्यात, मुलगी/स्त्री म्हणजे किस झाडकी पत्ती. कसेही वागवा तिला आणि दाखवा पडद्यावर. बहुदा त्याकाळात खपून गेले हे सगळे.

या निमित्ताने हिंदी `इजाजत` मधले एक दृश्य आठवले. नसरुद्दिन शाह खुर्चीवर बसलेला असतो. आणि त्याच्या पायाशी रेखा, पण खाली जमिनीवर बसलेली असते. तर हा काहीतरी जोक सांगून कोपरखळी मारावी तशा अर्थाने पण पायाने तिच्या डोक्याला ढोसलतो! एक दोन सेकंदाचाच सीन आहे तरीही cheap वाटते पाहताना आजच्या काळात.

पण हो. बाळा गाऊ मधली गाणी सुंदरच आहेत. त्यातल्या त्यात "माझ्या मनी प्रियाची..." हे माझे अत्यंत आवडते गाणे. चित्रीकरण सुद्धा खूप सुंदर आहे त्याचे.

>> ते चिंचेचे झाड पण याच चित्रपटातील आहे ना

नाही. ते "मधुचंद्र" मधले आहे. काशिनाथ घाणेकर आणि उमा भेंडे.

Pages