मराठी चित्रपट: काही भावलेले, काही न झेपलेले (संवाद/दृश्ये/गाणी इत्यादी)

Submitted by atuldpatil on 31 July, 2018 - 06:11

रवा एका मित्राबरोबर गप्पा मारत होतो. विषय निघाला जुन्या मराठी चित्रपटांचा. पूर्वीचे काही चित्रपट किती जडशिळ होते (आजकालच्या हलक्याफुलक्या चित्रपटांच्या तुलनेत). भावनिक गुंतागुंत, नात्यांतील समस्या, परंपरा, प्रतिष्ठा, मानअपमान, अहंकार इत्यादी गोष्टीना दिलेले अवाजवी महत्व. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंती आणि नाट्य. असे साधारण स्वरूप असे. चित्रपटाचे मुख्य पात्र म्हणून सगळ्यांना आवडणारी आनंदी ठेऊ पाहणारी एखादी व्यक्ती असायची. चित्रपटभर तिला अनेक समस्या. त्रास त्रास त्रास नुसता. मग शेवटी कुणालातरी वाचवताना किंवा इतरांच्या सुखासाठी वगैरे तिलाच मरण येणार. मग त्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील आधीचेच एखादे आनंदी गाणे "टेंपो स्लो" करून दु:खद पार्श्वगीत म्हणून वाजत राहणार. सगळे प्रेक्षक डोळ्यात पाणी आणून जड मनाने चित्रपटगृहाबाहेर जाणार. असा एकंदर मामला असलेले खूप चित्रपट होते. किंबहुना तो काळच तसा होता. यावर या मित्राने मला सहज विचारले, "तू अंगाई चित्रपट पहिला आहेस का? गावच्या पाटलांची सून गाव दुष्काळमुक्त व्हावे म्हणून आपल्या बाळासहित बलिदान देते". त्याने असे सांगितल्यावर एक खूप जुनी आठवण जागी झाली. अंगाई हा चित्रपट पाहिला तर नव्हता. पण लहानपणी या चित्रपटाची खूप चर्चा होती ते मात्र आठवले. (त्या काळात चित्रपट गाजला कि त्याची चर्चा वर्षानुवर्षे चालत असे). मनात विचार आला कि असे चित्रपट तेंव्हा का निघत असावेत? कदाचित अशा घटना कुठेतरी घडल्या असाव्यात असे उगीचच वाटून गेले. आज इतक्या वर्षांनी हा चित्रपट अनेकांच्या विस्मरणात गेला आहे. पण सहज म्हणून युट्युब वर शोधला आणि मिळाला. ते सुद्धा अत्यंत उत्कृष्ट दर्जा मध्ये:

https://www.youtube.com/watch?v=znBfvU-Lztg

घाईघाईने पाहायला सुरवात केली. आणि माझा अंदाज खरा ठरला. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात एक विलक्षण घटना घडली होती. त्यावर आधारित तो चित्रपट होता. या चित्रपटात दाखवलेल्या अनेक गोष्टी आजच्या काळात विचित्र वाटतात. मनाला अजिबात पटत नाहीत. पण दोन-अडीचशे वर्षापूर्वीची परिस्थिती, त्याकाळातील लोकांची मानसिकता, तेंव्हाचे वातावरण, सामाजिक रचना या सगळ्याचा विचार केला तर त्याकाळात अशी अथवा अशा प्रकारची घटना घडली असावी हे पटू लागते.

गावात दुष्काळ पडलेला असतो. पाण्यावाचून हवालदिल झालेले गावकरी गाव सोडायच्या विचारात असतात. तेंव्हा गावचे पाटील त्यांना धीर देतात. गावाशेजारी तलाव खोदायचे सुचवतात. गाव सगळे मेहनत करते तलाव खणला जातो. पण त्याला पाणी लागत नाही. शेवटी ग्रामदैवत पाटलांना स्वप्नात दृष्टांत देते आणि सांगते ओल्या बाळंतिनीचा बळी दिल्याशिवाय पाणी लागणार नाही. गावात कोणीच ओली बाळंतीण मिळत नाही. मग शेवटी पाटलांची सूनच रात्री बाळासहित तलावापाशी जाऊन अंगाई म्हणत उभी राहते. तोच तलावाला पाझर फुटतो. पाणी वाढू लागते. त्यात तिचा आणि बाळाचा बळी जातो. असे शेवटी खूप विदारक दाखवले आहे. तलावाला पाणी लागलेले असते पण गावकरी रडत उभे असतात आणि पार्श्वभूमीवर अंगाई ऐकायला येत असते. वगैरे. (हि घटना सत्यकथेवर आधारलेली असून आजही या गावात त्या पाटलांचे वंशज राहतात असे चित्रपटात सांगितले आहे. अलीकडेच तिथे त्या तळ्याच्या पाण्यातील गाळ काढताना पुरावे आढळले वगैरे बातम्या आल्या होता. पण आज काळ खूप बदलला आहे. अर्थातच कधीकाळी या गावात असे काही घडले असेल यावर कोणाचा विश्वास बसणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे दोन-अडीचशे वर्षांपूर्वी तिथे नक्की काय घडले व कसे घडले हे गूढ कदाचित कायमचेच काळाच्या गुलदस्त्यातच राहील)

पण किती अतिभावविवश आणि जड चित्रपट असायचे. आज जर या घटनेवर चित्रपट काढला तर तो नक्कीच वेगळ्या धाटणीचा असेल हे मात्र खरे. पूर्वीच्या अशा अनेक चित्रपटांत इंटेन्स दृश्ये आणि संवाद असायचे. त्या काळात ते लोकांना आवडायचे सुद्धा. पण आज यातले खूप चित्रपट पाहवत सुद्धा नाहीत. डोके जड होते. काही काही दृश्ये तर आजच्या काळात मनाला पटत सुद्धा नाहीत. आणि याउलट काही चित्रपट असे आहेत कि इतका काळ उलटून गेला तरी आजदेखील पाहायला छान वाटतात. त्यातले संवाद/गाणी मनाला आजही भावतात.

तर अशाच काही न झेपलेल्या किंवा खूप भावलेल्या मराठी चित्रपटांवर आणि त्यातल्या अशा दृश्यांवर गाण्यांवर वगैरे चर्चा करण्यासाठी हा धागा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हद्द म्हणजे मुलीला बघायला येऊन हलकट भाषा वापरणाऱ्या मुलाशीच तिचे लग्न लावून देतो. >>>>
नाही असे नाहीये,
विगो च्या बायकोला बरे करायला तिला मूल देणे हा मार्ग असतो, आणि लवकरात लवकर मूल मिळवायला जो पहिला मुलगा येतो त्याच्याशी लग्न करायचं ती हट्ट धरते, i think भाऊ तिला विरोध करतो वगैरे दाखवलंय, पण ती हट्टाने लग्न करते.

तो नवरा पण उपरसे सक्त वगैरे टाईप असतो, कधीतरी त्याच्या आई ला तिच्या बद्दल चांगले सांगत असतो.

*बालपणी मनावर झालेले आघात खोल जातात, म्हणून हे इतके आठवते आहे Lol

>> लवकरात लवकर मूल मिळवायला जो पहिला मुलगा येतो त्याच्याशी लग्न करायचं ती हट्ट धरते

ओह्ह ओह येस.. असेच आहे. आठवले आता Happy

यावरून स्व परमवीर कुलदीप पवार यांचा आली लहर केला कहर पिक्चर आठवणे अपरिहार्य आहे.यात परमवीर कायम बायकोला मारायच्या प्रयत्नात असतो.
शिवाय तो एक पिक्चर आहे ज्यात लग्नात दिर घोडा स्टॅम्पएड ने मरतो असे काहीतरी.
एकंदर मराठी जनता खूप दुःखात जगली असावी.सगळे पिक्चर असेच होते.नंतर काळ बदलला
थँक्स टू अशोक लक्ष्या सचिन महागुरू आणि डॅम इट.

एकंदर मराठी जनता खूप दुःखात जगली असावी.सगळे पिक्चर असेच होते.नंतर काळ बदलला >> करेक्शन.. एकंदर मराठी बाईमाणूस जनता खूप दुःखात जगली असावी. त्यांच्यासाठीचे सगळे पिक्चर असेच होते.

पुरूष माणसांसाठी दादांचा रामबाण ऊतारा होता हो. Lol
सराफ बेर्डे पांचट चित्रपट (बनवाबनवी आणि धुमधडाका सारखे काही अपवाद वगळता) आल्याने बाईमाणसांची हसायची सोय झाली पण पुरूषमाणसांची पंचायत झाली ती झालीच.

बालपणी मनावर झालेले आघात खोल जातात, म्हणून हे इतके आठवते आहे >>> Lol

कहर पिक्चर होते ते. परवा त्या "पर्णपाचू..." गाणे बघता बघता तसाच पुढे 'भालू' थोडाफार पाहिला. काय भीषण अभिनय आहे पब्लिक चा. ज्या काळात सामना, सिंहासन, उंबरठा वगैरे बनत होते त्या काळात असा अभिनय लोक करत याचे आश्चर्य वाटते.

. यात एक गाण आहे ज्यात आशा काळे विक्रमबरोबरच्या सुखी संसाराचे स्वप्न बघत असते त्यात तो घरी आल्यावर ती त्याचे बूट काढून पदराने बूट आणि त्याचे पाय पुसते असा चीड आणणारा प्रसंगही आहे >>>
दिसते मजला सुखचित्र नवे...
मी संसार माझा रेखिते

गाणी एक से एक होती खरं

दिसते मजला सुखचित्र नवे...
मी संसार माझा रेखिते >>> ओये ते अष्टविनायक मधलं आहे. बघायला कायच्या काय असले तरी ऐकायला सुरेख आहे.

>> अश्या कथा खऱ्या असल्या तरी त्यावर पिक्चर बनणं धोकादायक वाटतं..... सून बलिदान द्यायला गेली, योगायोगाने तेव्हाच खालून झिरपायला वेळ लागलेले पाणी वर आले असा काहीसा योगायोग असेल

हा फार फार दुर्मिळ योगायोग. प्रत्यक्षात अंधश्रद्धेपोटी कदाचित वेगळेच काही घडले असण्याची शक्यता जास्त आहे. अनेक किल्ले वगैरे बांधताना बळी दिले गेले आहेत. हे विदारक सत्य आहे त्या काळातले. पण लोककथांच्या नावाखाली जे सांगितले जाते ते नक्की कसे घडले असावे याच्या खोलात फार कोणी जात नाही आपल्याकडे. तसे पाहिल्यास इतिहास काव्यमय नसून खूप ब्रूटल आहे. बीबीसी वर खूप वर्षापूर्वी एक सेरीज पाहिली होती. इजिप्तच्या तूतान खामून नावाच्या राजकुमाराचा तरुणपणीच आजारी पडून मृत्यू झालेला असतो असे रूढ इतिहास सांगतो. पण प्रत्यक्षात त्याची ममी व इतर पुरावे पाहून संशोधक अनुमान काढतात कि त्याचा खून झाला आहे. मग त्यावर ती सेरीज होती, Who killed Tutankhamun?

लिंबोणीच्या झाडा.. ची आठवण,
मी लहान असताना आत्याकडे राहायला गेलो होतो 3 री मध्ये वगैरे असेन, करकरीत संध्याकाळची वेळ होती, आत्या बाहेर गेलेली आणि काका हीच अंगाई म्हणत आत्येभावाला झोपवत होते,
भावाचे रडणे, काकांचा आवाज, आई ची आठवण, संध्याकाळ, थोडीशी अपरिचित जागा याचा एकत्र असा परिणाम होऊन मी एकदम रडायला लागलो.
पुढे काय झाले अजिबात आठवत नाही, पण इतकाच भाग अगदी लख्ख आठवतो

ओये ते अष्टविनायक मधलं आहे. बघायला कायच्या काय असले तरी ऐकायला सुरेख आहे.>>>
होय काय?
ऐकायला सुरेख असल्याने जास्त बघितले नाहीये. त्यामुळे गडबड झाली. Happy

ते बूट पुसायचे गाणे बहुतेक " माझ्या संसारला कधी दृष्ट लागू नये" असं आहे Happy चांगलाच आठवतो मला तो सीन. हिरो बर्‍यापैकी आधुनिक शर्ट पँट घालून कारखान्यात नोकरीला वगैरे टाइप्स आणि हीच बया अशी का बुरसटलेली दाखवलीय हे खटकायचे आणि म्हणुनच विनोदी वाटायचे भयंकर.

>> थोडीशी अपरिचित जागा याचा एकत्र असा परिणाम होऊन मी एकदम रडायला लागलो. पुढे काय झाले अजिबात आठवत नाही, पण इतकाच भाग अगदी लख्ख आठवतो

हा हा हा Lol अगदी अगदी. किरकोळ असतात पण लहानपणी मनावर कोरले जातात काही प्रसंग. आम्हाला लहानपणी झोपवताना एका डॉक्टरांची भीती घातली जात असे. "झोप नाहीतर ते डॉक्टर येऊन इंजेक्शन देतील" त्याचा इतका परिणाम झालाय कि आजही त्या डॉक्टरांचे नाव आठवले कि मनात कुठेतरी पोइंट नॉट नॉट नॉट वगैरे परसेंटमध्ये भीती वाटतेच Biggrin

>> यात एक गाण आहे ज्यात आशा काळे विक्रमबरोबरच्या सुखी संसाराचे स्वप्न बघत असते त्यात तो घरी आल्यावर ती त्याचे बूट काढून पदराने बूट आणि त्याचे पाय पुसते

माझ्या मनी प्रियाची... हेच गाणे आहे ते. नेमके हेच मी वर माझे सर्वात आवडते म्हणून लिहून गेलो आहे Proud अर्थात ह्या प्रसंगासाठी नाही नक्कीच, पण बाकी एकंदर चित्रण चांगले आहे त्याचे म्हणून आवडते. हो मी आता पुन्हा बघितले गाणे. वीगो येतो आणि हि त्याच्या बुटाचे लेस सोडते. आणि ही तिच्या संसाराची स्वप्ने आहेत असे दाखवलेय. कायच्या काय.

मराठी बायका कायम दुःखात नव्हत्या हो, माझे सासर/महेर/कुंकू/बांगड्या/जोडवी व अजून असतील ते सगळे सौभाग्यलंकार नावात असलेले चित्रपट यायच्या आधी जेव्हा राजा परांजपे, गदिमा व सुधीर फडके मराठीवर राज्य करत होते तेव्हा एकापेक्षा एक निखळ विनोदी चित्रपट दिलेत त्यांनी. आज वाटते तितकी वाईट परिस्थिती एकंदर नव्हती.

यात एक गाण आहे ज्यात आशा काळे विक्रमबरोबरच्या सुखी संसाराचे स्वप्न बघत असते त्यात तो घरी आल्यावर ती त्याचे बूट काढून पदराने बूट आणि त्याचे पाय पुसते>>>>>>> अहो त्या आशा काळे आहेत. तुम्ही काय वेगळं एक्स्पेट करणार? बाकी गाणे छान असले तरी ह्या प्रसंगाचे lyrics चीड आणणारेच आहेत!

अंगाई वरुन बाळा गाऊ कशी अंगाई वर गेले का सगळे.
आशा काळेचे बरेच चित्रपट पाहिलेत दुर्दर्शनच्या कृपेने.
बागाकअं, रवींद्र महाजनीचा कोण्ता तो एक डाकुवाला, हा खेळ सावल्यांचा, एक प्रिया तेंडुलकर तिची जाउ असते आणि ही कहर सोशिक
एकात अजिंक्य देव तिचा मुलगा असतो ज्यात ती जळुन मेलेली असते. त्यात एक शुभदा ये ये वाला भयंकर सीन आहे

"त्याग करणारे महान लोक" अशी ओळख देऊन त्यांना देवत्व दिले जात होते समाजात ! अन्याय (विषेशतः स्त्रीयांवर होणारा) सहन करणे हे मोठेपणाचे लक्षण म्हणून मानले जात असे.
एक आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवले गेले असे प्रसंग , आणि त्यातले "त्याग" करणारे आणि "सहन" करणार्या माउली.
हे मोठे Emotional Blackmail होते मराठी समाजाचे!
आणि घरातली मोठे माणसे आणि विषेशकरून आया - आज्या - मावश्या हा स्त्रीवर्ग पदर डोळ्याला लाऊन आनंदाने हे चित्रपट बघताना आमच्या पिढीने पाहिले , त्यामुळे हे चित्रपट आणि त्यातल्या शिकवणी चांगल्या असल्याचे नकळत मनावर ठसले गेले.
आता कळते हे सगळे कसे चुकीचे होते ते!

हो का, बागाकअं स्ग्वेत श्याम असावा असे आठवत होते.
आणी तो भूताच्या मायग्रेन वर चोळी बांधण्याचा श्युअरली ब्लॅक व्हाईट आहे. (त्याचे नाव काय हा चमत्कार असे काही आहे.)

भूताच्या मायग्रेन वर चोळी बांधण्याचा> >>>> हो ब्लॅक व्हाईट. जयश्री गडकर आहे त्यात.
आशा काळे सगळे रंगीत.

माझी मावशी मुलांना घेउन सुटीत आमच्याकडॅ आली होती. तेव्हा पप्पांनी माहेरची साडी सिनेम्याची टिकटं काढली होती.
भयाण सिनेमा . मला तेव्हा भयाणता नाही कळली पण. आई मावशी रडत होत्या. माझ्या मावस बहिणी पण रडत होत्या. मी थोड्यावेळाने झोपले होते Happy

<< भूताच्या मायग्रेन वर चोळी बांधण्याचा<< हाय्ला, कहर आहे एकेक सिनेमे! काय पण डोके चालायचे निर्मात्याचे!

बागाकअं मधे शेवटी आशा काळे मरायला (खरंच Happy ) जात असते तेव्हा ते मोकळे केस वैगेरे अजुनही लक्षात आहेत. भयाण सीन आहे तो.

एका सिनेमात आशा काळेचा नवरा गेल्यावर ती नर्स च काम करते आणि उठ्सूठ सारखी नवर्‍याच्या फोटोसमोर जाऊन रडगाण गात असते. रवींद्र महाजनी (अर्थात ही नर्स म्हणजे तो डॉक्टर) चांग्ला लग्नाबद्दल विचारतो त्याला नाही म्हणते .
आणि एका सीन मधे नवर्‍याच्या मित्राला 'मी अ‍ॅरूण ला डॉक्टर आणि नितीन ला इंजिनीअर करणार म्हणते'. मुलांच्या (अरूण, नितीन) मर्जीचा प्रश्नाच नाही. आणि निर्विकार चेहेर्‍याने एकटक कुठेतरी बघत डाय्लॉग म्हणणे हाच अभिनय !

कहर आहे एकेक सिनेमे! काय पण डोके चालायचे निर्मात्याचे!----------- वर ती त्याला म्हणते " मुंडावळ्या लावल्यासारखा दिसतोयस " hahahaha

रावी कदाचित याच मुव्ही मध्ये तो अरुण डॉक्टर होतो तेव्हा तो एक कागद गोल गुंडाळून ती डिग्री या अर्थाने घेऊन येतो तेव्हा ती तिच्या नवऱ्याला ( फोटोतल्या ) म्हणते, " पाहिलंत, आपला अरुण डॉक्टर झालाय " इकडे माझी हसून अवस्था बेजार

Pages