मराठी चित्रपट: काही भावलेले, काही न झेपलेले (संवाद/दृश्ये/गाणी इत्यादी)

Submitted by atuldpatil on 31 July, 2018 - 06:11

रवा एका मित्राबरोबर गप्पा मारत होतो. विषय निघाला जुन्या मराठी चित्रपटांचा. पूर्वीचे काही चित्रपट किती जडशिळ होते (आजकालच्या हलक्याफुलक्या चित्रपटांच्या तुलनेत). भावनिक गुंतागुंत, नात्यांतील समस्या, परंपरा, प्रतिष्ठा, मानअपमान, अहंकार इत्यादी गोष्टीना दिलेले अवाजवी महत्व. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंती आणि नाट्य. असे साधारण स्वरूप असे. चित्रपटाचे मुख्य पात्र म्हणून सगळ्यांना आवडणारी आनंदी ठेऊ पाहणारी एखादी व्यक्ती असायची. चित्रपटभर तिला अनेक समस्या. त्रास त्रास त्रास नुसता. मग शेवटी कुणालातरी वाचवताना किंवा इतरांच्या सुखासाठी वगैरे तिलाच मरण येणार. मग त्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील आधीचेच एखादे आनंदी गाणे "टेंपो स्लो" करून दु:खद पार्श्वगीत म्हणून वाजत राहणार. सगळे प्रेक्षक डोळ्यात पाणी आणून जड मनाने चित्रपटगृहाबाहेर जाणार. असा एकंदर मामला असलेले खूप चित्रपट होते. किंबहुना तो काळच तसा होता. यावर या मित्राने मला सहज विचारले, "तू अंगाई चित्रपट पहिला आहेस का? गावच्या पाटलांची सून गाव दुष्काळमुक्त व्हावे म्हणून आपल्या बाळासहित बलिदान देते". त्याने असे सांगितल्यावर एक खूप जुनी आठवण जागी झाली. अंगाई हा चित्रपट पाहिला तर नव्हता. पण लहानपणी या चित्रपटाची खूप चर्चा होती ते मात्र आठवले. (त्या काळात चित्रपट गाजला कि त्याची चर्चा वर्षानुवर्षे चालत असे). मनात विचार आला कि असे चित्रपट तेंव्हा का निघत असावेत? कदाचित अशा घटना कुठेतरी घडल्या असाव्यात असे उगीचच वाटून गेले. आज इतक्या वर्षांनी हा चित्रपट अनेकांच्या विस्मरणात गेला आहे. पण सहज म्हणून युट्युब वर शोधला आणि मिळाला. ते सुद्धा अत्यंत उत्कृष्ट दर्जा मध्ये:

https://www.youtube.com/watch?v=znBfvU-Lztg

घाईघाईने पाहायला सुरवात केली. आणि माझा अंदाज खरा ठरला. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका खेडेगावात एक विलक्षण घटना घडली होती. त्यावर आधारित तो चित्रपट होता. या चित्रपटात दाखवलेल्या अनेक गोष्टी आजच्या काळात विचित्र वाटतात. मनाला अजिबात पटत नाहीत. पण दोन-अडीचशे वर्षापूर्वीची परिस्थिती, त्याकाळातील लोकांची मानसिकता, तेंव्हाचे वातावरण, सामाजिक रचना या सगळ्याचा विचार केला तर त्याकाळात अशी अथवा अशा प्रकारची घटना घडली असावी हे पटू लागते.

गावात दुष्काळ पडलेला असतो. पाण्यावाचून हवालदिल झालेले गावकरी गाव सोडायच्या विचारात असतात. तेंव्हा गावचे पाटील त्यांना धीर देतात. गावाशेजारी तलाव खोदायचे सुचवतात. गाव सगळे मेहनत करते तलाव खणला जातो. पण त्याला पाणी लागत नाही. शेवटी ग्रामदैवत पाटलांना स्वप्नात दृष्टांत देते आणि सांगते ओल्या बाळंतिनीचा बळी दिल्याशिवाय पाणी लागणार नाही. गावात कोणीच ओली बाळंतीण मिळत नाही. मग शेवटी पाटलांची सूनच रात्री बाळासहित तलावापाशी जाऊन अंगाई म्हणत उभी राहते. तोच तलावाला पाझर फुटतो. पाणी वाढू लागते. त्यात तिचा आणि बाळाचा बळी जातो. असे शेवटी खूप विदारक दाखवले आहे. तलावाला पाणी लागलेले असते पण गावकरी रडत उभे असतात आणि पार्श्वभूमीवर अंगाई ऐकायला येत असते. वगैरे. (हि घटना सत्यकथेवर आधारलेली असून आजही या गावात त्या पाटलांचे वंशज राहतात असे चित्रपटात सांगितले आहे. अलीकडेच तिथे त्या तळ्याच्या पाण्यातील गाळ काढताना पुरावे आढळले वगैरे बातम्या आल्या होता. पण आज काळ खूप बदलला आहे. अर्थातच कधीकाळी या गावात असे काही घडले असेल यावर कोणाचा विश्वास बसणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे दोन-अडीचशे वर्षांपूर्वी तिथे नक्की काय घडले व कसे घडले हे गूढ कदाचित कायमचेच काळाच्या गुलदस्त्यातच राहील)

पण किती अतिभावविवश आणि जड चित्रपट असायचे. आज जर या घटनेवर चित्रपट काढला तर तो नक्कीच वेगळ्या धाटणीचा असेल हे मात्र खरे. पूर्वीच्या अशा अनेक चित्रपटांत इंटेन्स दृश्ये आणि संवाद असायचे. त्या काळात ते लोकांना आवडायचे सुद्धा. पण आज यातले खूप चित्रपट पाहवत सुद्धा नाहीत. डोके जड होते. काही काही दृश्ये तर आजच्या काळात मनाला पटत सुद्धा नाहीत. आणि याउलट काही चित्रपट असे आहेत कि इतका काळ उलटून गेला तरी आजदेखील पाहायला छान वाटतात. त्यातले संवाद/गाणी मनाला आजही भावतात.

तर अशाच काही न झेपलेल्या किंवा खूप भावलेल्या मराठी चित्रपटांवर आणि त्यातल्या अशा दृश्यांवर गाण्यांवर वगैरे चर्चा करण्यासाठी हा धागा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून एक होता,
स्मिता तळवळकर आधुनिक(म्हणून आगाऊ खडूस) सून दाखवलेली आहे. आणि बहुतेक सविता प्रभुणे सोशिक सून आहे
त्यात नवीन fashion चा देव्हारा करतात आणि त्यात छे ते तुमचे जुनाट देव नकोत , म्हणून नवीन white मेटल चा नाचणारा गणपती आणतात Happy
खल्लास होता हो पिक्चर

एका चित्रपटात आदर्शाची पुतळी असलेली, त्यागमुर्ती; अलका कुबल का स्मिता तळवल्कर (नक्की आठ्वत नाही), दिराला / भावाला लग्न झाल्यावर फिराय्ला म्हणून कुठल्यातरी तीर्थक्षेत्री / शिर्डी / शेगाव अस कुठेतरी पाठवते !

भारी चाललंय ... जुने चित्रपट आठवतात. आणि आठवणीही जाग्या होतायत. कोणी भुजंग पाहिलंय का ? निळुफुलेचा ?? अशक्य अगदी...!!!

भुजंग आठवला अस्पष्टसा !!! त्यात निळुफुले खादाड दाखवलेला होता आणि रंजनाला सतत भुजंग दिसायचा असे काहीतरी होते.

त्यागमुर्ती; अलका कुबल >>>

तिचा 'सुवासिनीची ही सत्वपरिक्षा' अशा भयानक नावाचा एक चित्रपट होता. त्या नावातच सगळ्या चित्रपटाचे सार होते Happy त्यात ती महान सोशीक. वडील त्यांच्या मित्राला ही तुमची सून होईल असा शब्द देतात. त्या मित्राचा मुलगा एकदम मवाली, वाया गेलेला गुंड. त्याने तिला त्रासही दिलेला असतो पण ही वडिलांचा शब्द मोडू नये म्हणून लग्नाला तयार होते. पण तो गुंड एका नाचणार्‍या बाईबरोबर लग्न करतो. पण वडिलांचा शब्द खोटा तर होऊ द्यायचा नाही म्हणून ती त्याच्याच मतिमंद धाकट्या भावाशी निमूटपणे लग्न करते. दीर-जाऊ-सावत्र सासूचा छळ सहन करते. एवढेच नाही तर दीर-जावेला मूल हवे आहे आणि तिला ते होऊ शकणार नसल्याचे समजल्यावर आपल्या जिवाला धोका असल्याचे कळल्यावरही ती मूल जन्माला घालते आणि ते जावेच्या पदरात घालून हसत हसत प्राण सोडते.
कायच्या काय सिनेमा होता. एक दोन गाणी बरी होती त्यातल्या त्यात.

रंजना आणि अशोक सराफ यांचा बिनकामाचा नवरा पाहिलंय का कोणी?
अशक्य भारी सिनेमा आहे. गंगी चे पात्र तर हहपुवा
रच्याकने ह्या धाग्यावर स्तुती चालते ना ? Proud

' वाट पहाते पुनवेची ' नावाचा आणखी एक महान चित्रपट होता .
सोशिक अलका कुबलचा पूनर्जन्म निशिगंधा वाड होती .
अशोक सराफ एक्दम भारी होता त्यात .

अकु चा पुनर्जन्म निवा?
मला परत एकदा केतकी माटेगावकर मोठी होऊन प्रिया बापट होते तसा धक्का बसला ☺️☺️☺️☺️☺️

स्त्रीधन हा अलका कुबलचा अजून एक भयानक चित्रपट. त्यात नवरा कुलदीप पवार गुप्तधनाच्या मागे लागलेला. चेहर्‍यावर विशिष्ट ठिकाणी तीळ असलेल्या मुलीचा बळी दिल्यास खजिना मिळेल असा नकाशा त्याला मिळालेला. मग अलका कुबलच्या चेहर्‍यावर तसे तीळ असतात तर तो तिच्याशी प्रेमाचे नाटक करून लग्न करतो आणि तिचा बळी द्यायचं ठरवतो. अलका कुबलला तो नकाशा सापडतो आणि नवर्‍याचे प्रताप समजतात. कोणतीही शहाणी स्त्री त्याक्षणी तिथून पळून जाईल आणि पोलीसात तक्रार देईल. पण अलकाबाई त्याग आणि सोशीकतेचे प्रतीक. नवरा हेच आपले 'स्त्रीधन' मानणार्‍या. नवर्‍याबरोबर निमूटपणे बळी जायच्या ठिकाणी जातात. आपल्याला मारून नवर्‍याला हत्येचे पाप लागू नये म्हणून स्वतःच देवीपुढे आत्महत्या करायला जातात Sad मग नवर्‍याचे डोळे उघडतात आणि तो पत्नीची माफी मागून गुप्तधनाचा नाद सोडतो आणि शेवट गोड (?) होतो.

स्त्रीधन सुद्धा आठवला !!! त्यागमूर्ती , सोशिकतेचे शिखर गाठलेल्या , अश्रूंचा महापूर असलेल्या अलका कुबलचे त्याकाळी खरोखर वर्चस्व होते. लहानपणी "माहेरची साडी" प्लाझाला बघितलेला. आता टीव्हीवर लागला तर टीव्ही फोडावासा वाटतो.

भारी धागा आहे.
वर तो आशा काळे जळून मरते आणि मग भूत होऊन बसते असा उल्लेख आलाय त्या चित्रपटाचं नाव अर्धांगी. आशा काळेच्या वाईट पायगुणामुळे तिच्या नणंदेचा ( भारती आचरेकर ) नवरा मरतो वाटतं. मग आशा काळेला घरात कोंडून ठेवतात. मग ती जाळून घेते की घरचेच तिला जाळतात काय माहित. मग तिच्या बाळाला ( जो मोठा होऊन अजिंक्य देव होतो) आणि स्वतःच्या मुलीला ( बहुतेक निवेदिता जोशी) घेऊन भारती आचरेकर बाहेर पडते. अर्चना जोगळेकर अजिंक्य देवची प्रेयसी असते. ती चित्रकार असते. तिला या घरी आणल्यावर तिला ' त्या' खोलीत जळणारी बाई दिसते आणि ती तिचं चित्र काढते.
' प्रेमासाठी झुकले खाली धरणीवर आकाश' हे महान विनोदी गाणं यातच आहे की ' खिचडी' नावाच्या पिक्चरमध्ये?
त्यातल्या नटाला ( किंवा कोरिओग्राफरला, to be fair to him) बहुतेक प्रेक्षकांच्या सामान्य ज्ञानाबद्दल काहीतरी मोठा गैरसमज होता. धरणी आणि आकाश यातलं नेमकं वर काय आहे आणि खाली काय आहे, हे प्रत्येक वेळी त्याने ठासून हात वर आणि खाली दाखवून सांगितले आहे.

रंजना आणि अशोक सराफ यांचा बिनकामाचा नवरा पाहिलंय का कोणी?
अशक्य भारी सिनेमा आहे. गंगी चे पात्र तर हहपुवा.+१ माझा फेवरिट आहे..

>> हे प्रत्येक वेळी त्याने ठासून हात वर आणि खाली दाखवून सांगितले आहे.

बघितले नाही पण कल्पना करू शकतो कसे दाखवले असेल. Biggrin

धाग्यात उल्लेख केलेल्या अंगाई चित्रपटात अजून एक दृश्य आहे. चंद्रकांत मांडरे (पाटलाचा पोरगा) शिकारी दाखवलाय. म्हणजे तो छानसा स्वच्छंद उडणारा एक छोटा पक्षी बंदुकीने मारतो. आणि त्यानंतर त्याचे नायिकेबरोबरचे (उमा भेंडे) संवाद म्हणजे "शिकार करणे म्हणजे मर्द असल्याचे लक्षण" अशा थाटात आहेत. त्या काळात शिकारीच्या नावाखाली गरीब पक्षाला मारणे हिरोगिरी असेल. पण आता बघताना "काय नीच निर्दयी माणूस आहे" असे वाटते Lol

(म्हणजे ज्यांच्याकडून प्रतिकार होणे शक्य नाही असे घटक सोयीस्कर पणे देवाला/देवीला चालतात का?) >> अश्वं नैव, गजं नैव, व्याघ्रं नैव च नैव च , अजापुत्रो बलिं दद्यात देवो दुर्बल घातकः असा श्लोकच आहे की
( घोडा नव्हे, हत्ती नव्हे, वाघ तर नव्हेच नव्हे. बकरीचा पुत्रच बळी जातो , (कारण) देव देखील दुबळ्यांचा घात(च) करतो )

शिकलेली बायको हा असाच एक अचाट व आचरट सिनेमा. नायक शेतकरी असतो आणि फारसा शिकलेला नसतो. पण वडिलांच्या मित्राची मुलगी शिकलेली असते आणि तिच्याशी लग्न करावे लागते. आणि लग्नात काही लोक अशिक्षित नवरा मिळाला म्हणून टोमणे मारतात. ते ऐकून तो आपल्या बायकोला टाकतो! मग अनेक दु:खाचे डोंगर कोसळतात. मग नायिका शहरात परत जाऊन डॉक्टर बनते. पुन्हा त्याच सासरच्या गावात दवाखाना उघडते. एक चष्मा आणि नऊवारी ऐवजी पाचवारी पातळ असे बेमालूम वेषांतर करते त्यामुळे नवरा तिला आजिबात ओळखत नाही (दवाखाना उघडताना डॉक्टरचे नाव लिहावे लागत नाही का हा तपशील विसरा)! मग यथावकाश बैलगाडीच्या शर्यतीत नवरा जखमी होतो आणि डॉक्टरीण बाई सेवा करुन त्याला वाचवतात आणि शेवटी सगळे गोड होते.
ह्या सिनेमातील गाणी मस्त होती. पण स्टोरी म्हणजे काहीच्या काहीच.

अंगाई चित्रपट सत्यकथा आहे. चंद्रकुमार नलगे यांच मुळगाव भेडसगाव येथे घडलेली. ते प्रोफेसर आणि लेखक होते. आणि या चित्रपटाचे निर्माते ही.

बाळा गाऊ कशी अंगाई 'त चौकोनाचे उरलेले कोन नयनतारा आणि सतीश दुभाषी.
हनिमूनचं गाण़ं धुंदीत राहू, मस्तीत गाऊ...

पदराने बूट पुसायचा सीन यात नाहीए.
रवींद्र महाजनीसोबतच्या सिनेमात आहे.
लोकसत्तेच्या वाचकपत्रांत याचा निषेध झाला होता..

रंजना आणि अशोक सराफ यांचा बिनकामाचा नवरा पाहिलंय का कोणी?
अशक्य भारी सिनेमा आहे. गंगी चे पात्र तर हहपुवा.+१ माझा फेवरिट आहे.. >>> +१

चेहर्‍यावर विशिष्ट ठिकाणी तीळ असलेल्या मुलीचा >>>>> त्या वरुन आठवलं , लक्ष्या आणि विजय कदम (?) अतिशय वाह्यात एक चित्रपट आहे . तो मांडीवर तीळ असणारी मुलगी शोधत असतात.

अकु चा पुनर्जन्म निवा? >>>>> हो अनु , आणि त्यांचे नवरे अनुक्रमे तरूण गिरीश ओक आणि दिपक देऊलकर. अशोकमामांचा व्हिलन मात्र जबरा.

त्यापेक्षाही वाह्यात हवा असेल तर क्या कुल है हम. दिल पे तील असलेल्या नायीकेच्या शोधात
तो मराठी पिक्चर कुठे कुठे शोधू मी तिला.

त्या वरुन आठवलं , लक्ष्या आणि विजय कदम (?) अतिशय वाह्यात एक चित्रपट आहे . तो मांडीवर तीळ असणारी मुलगी शोधत असतात.>> यावरुन आठवल कि याचा एक हिंदी रिमेक सुद्धा आ।ए.. आहात कुठं Lol

अरे हो.आठवतंय असं काही.त्याचं नाव काय?
बाय द वे मॅट्रिक्स पिक्चर प्रमाणेच घुंघट या आयेशा झुलका च्या पिक्चर चा सस्पेन्स मला अजूनही कळला नाही.

Pages