तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी सगळं ठीक आहे पण >> या स्टॉल्सच्या दरवाजांना आतून कडीदेखील नसते. >> हे जरा अती होतय. Rofl

हं
पण धुवायला पाणी नसतं हे अति नाही होत?
If it touches other parts of your body you wash it with water. Whats the bloody inhibition in putting in a bidet?

आरारा, कल्चर आहे हो.
पाण्याने जास्त स्वच्छ होईल याच्याशी दुमत नाहीच. पेपर घासुन आंघोळ करत नाहीतच. पण आतुन कडी नसते हे सत्य नाही या अर्थी अती होतय लिहिलेलं. चुक बरोबर या अर्थी न्हवे.

अहो या हीटिंग/कुलिंगच्या पद्धती किती उशीरानं आल्या, त्याआधी हाडं गोठवणार्‍या थंडीत पाणी वापरण्यापेक्षा कागद बरा असा सोयीस्कर विचार केला गेला असेल. अमेरिकेतच नाही का साध्या पाण्यानं रोगराई होते म्हणून अ‍ॅपल सायडर किंवा बीयर प्यायची पद्धत होती पुराणकाळात. ते अ‍ॅपल सायडर/बीयर कल्चर अजूनही-मोप शुद्ध पाणी मिळण्याच्या काळात- आहेच की.

कडी असते/नसते पेक्षा दारात आणि स्टॉलच्या पॅनेलमध्ये किती अंतर असतं. ज्येना येतात तेव्हा त्यांना तर फारच संकोच होतो अशी स्व.गृ. वापरताना. म्हणजे कनांना संकोच होत नाही असं नाही पण सवय होउन जाते सावकाश.

अमेरिकेत नविन होते, पहिल्या ऑफिसमध्ये माझ्या cubicle मध्ये माझ्या across बसणारी होती सारा!

पहिल्याच दिवशी ओळख झाली, तिचा पेहेराव एकदम पुरुषी, केस अगदी पुरुषां सारखे कापलेले. छाती एकदम सपाट . मी बुचकळ्यात! आवाज तर बाईसारखा वाटतोय, नाव तर बाईचं आहे, कपडे पुरुषी घालायला आवडत असतील तर ठीकच आहे पण काहीतरी गडबड आहे हे कळत होतं. असेल बुवा, म्हणून मी फार विचार केला नाही.

पुढल्या आठवड्याभरात माझा गोंधळ वाढतच गेला. काही जणं तिचा उच्चार she असा करताना वाटायचे नी काही जणं he असा. मला वाटायचं, मलाच नीट ऐकू येत नाहीये.. काही वेळेला she च्या जागी he ऐकू येतय मला. पण काहीतरी गोंधळ आहे असं वाटतच राहिलं. पण आधीच नवखी नी त्यात हे कोणाला विचारणार म्हणून गप्प बसले. पण मी आपली तिच्या बद्दल तिसर्‍या कोणाशी बोलताना, pronoun कटाक्षाने टाळू लागले. eg. Ask Sara. Sara might know. I have seen Sara using that yesterday. He/She असा उल्लेखच करायचे नाही... (फार कठीण आहे असं बोलणं, एकदा बोलून बघा!)

मग एकदा सारा ladies restroom मध्ये भेटली. आता माझी खात्री झाली, सारा बाईच आहे, बुवा नाही.. हुश्श झालं. चला आता आरामात she बोलायला हरकत नाही म्हणून मी सुटकेचा निश्वास सोडला.

अजून २-३ आठवड्यांनी एका colleague बरोबर lunch ला गेले. तिच्याशी बोलता बोलता ती म्हणाली - Are you not curious about Sara? Do you know about her? मी म्ह्टलं, काय ते? तर मग तिने मला साराची गोष्ट सांगितली.

साराने सुमारे ३-४ महिन्यांपुर्वी सुट्टी घेऊन sex change operation म्हणून breast removal करून घेतले होते. genitals वर मात्र काही operation केले नव्हते. तिने सुट्टीवर जाण्यापुर्वी सर्वांना ईमेल करून हे सर्व सांगितले होते. नाव मात्र तिला बदलायचे नव्हते. Operation झाल्यानंतर थोडयाच दिवसांत सारा बाई की बुवांनी त्यांच्या girl friend शी लग्न पण केले. तिला he का she म्हणायचे तो निर्णय तिने लोकांवर सोडला होता.
प्र चं ड कल्चरल शॉक मोडात होते मी! (ही २००३ ची गोष्ट आहे. त्यानंतर अश्या खूप नाही पण काही प्रमाणात तरी ऐकल्या/ बघितल्या.)

<<<
तेव्हा रात्रीची ड्रायव्हिंग या मुली करतात >>> बापरे.. धक्कादायक आहे
>>>

@मधुरांबे,
हा महिला ड्रायव्हर्सचा अपमान आहे. हे बघा: https://youtu.be/HYnwAB4DnqM
Ice Road Truckers Himalayas बघा जरा यूट्यूबवर.
लिसा केली हिने भारतात, रोहतांग पासवर ट्रक चालवले आहेत जे भल्याभल्या पुरुषांना पण जमणार नाही.

त्याआधी हाडं गोठवणार्‍या थंडीत पाणी वापरण्यापेक्षा कागद बरा असा सोयीस्कर विचार केला गेला असेल.
<<
म्हणून भारतातल्या मुंबईत ५* हाटेलात पण कागद? नो चान्स ऑफ पाणी?

>> मायदेशात पदोपदी दिसणारी बिडी आणि पान भांडारे अथवा 'अमृततुल्य' चहाच्या टपऱ्या. किंवा रस्त्यात कोणालाही थांबून पत्ता विचारला की काम भागत असे.

याला मी आयएनएस अर्थात इंडियन नॅविगेशन सिस्टीम असे म्हणतो. गुगल वगैरे नव्हते त्याकाळात द बेस्ट सिस्टीम होती ही Happy अजूनही.
---

>> वेगळा धागा काढून लिहा मग याच्याबद्दल.

हो नक्की. (रिस्पॉन्स किती मिळेल शंकाच आहे. खेडेगावातली लग्नाची पार्श्वभूमी वातावरण वगैरे. तेही काही दशके झाली. आता थोडाफार फरक असेल. पण रिगार्डलेस, लिहायला हरकत नाही. प्रयत्न करतो.)
---

>> पण त्या नॅपकिनवर जोरदार नाक शिंकरणे इज टोटली ओके अ‍ॅट एनी प्लेस

हे मात्र खरे आहे. त्यांच्याकडे ट्रेनमध्ये वगैरे भर गर्दीत रुमालात फराफरा नाक शिंकरणे वावगे नाही. आपल्यकडे मात्र आजूबाजूचे लोक नाक मुरडतील. पण हीच गोष्ट ढेकर देण्याबाबत मात्र उलट आहे. आपण भर गर्दीत ढेकर देतो बिनधास्त. तिकडे मात्र त्या लोकांना ते फार किळसवाणे वाटते.

अहो काही भारतीय लोकं अमेरिकेत आल्यावर तिखटाच्या पुडया टाकुन टाकून खातात. भारतात घाम येतो/ गरम असतं तिकडे तिखट अन्न मानवतं. पण जिभेची सवय झालेली जात नाही. आता भारतात फुल प्यांट कोट टाय घालून पब्लिक फिरतंच की.
फाय स्टार मध्ये पाणी वापरायला दिलं आणि गबाळ्या पब्लिकने पाणीच पाणी चहुकडे करुन सोडलं असेल किंवा त्या हाटेलच्या लोकांना पाणी गेलं की होणारी बोंब वाचवायची असेल. Wink Proud

अजून एक अनुभव युके आणि भारतातला. कल्चरल डिफरन्स:

युके मध्ये एकदा माझ्या घरी एक चुकीच्या पत्त्यावरचे पत्र येऊन पडले. तो पत्ता जवळपासच असेल असे समजून शोधत शोधत गेलो तर होता होता बरेच बरेच लांब अंतर चालून आलो. अखेर ते घर सापडले. घराला कुलूप होते. चुकीच्या पत्त्यावर आले होते ते तुमच्याकडे देत आहे अशी नोट लिहून ते तिथल्या बॉक्समध्ये टाकून आलो. दोन एक दिवसांनी सकाळी मी घराचे उघडतो तर दारातच धन्यवाद लिहिलेली नोट आणि बरोबर श्याम्पेनची बाटली होती Happy

हेच पुण्यात. एका सदगृहस्थांच्या नावे नेहमी एक कसलासा अहवाल यायचा. पण त्यांनी पत्ता चुकीच्या दिल्याने पोस्टमन नेहमी माझ्या पोस्टबॉक्स मध्ये टाकायचा. सहकार्य म्हणून मी काही महिने थोडे दूर अंतर चालत जाऊन त्यांच्या बॉक्स मध्ये टाकले. पण नंतर कंटाळा येऊ लागला. मग मी नोट जोडली कि मागचे काही महिने माझ्या पत्यावर येत आहे ते मी तुमच्या बॉक्समध्ये टाकतोय. कृपया पत्ता बदलून घ्या. पण एक नाही का दोन नाही. आहे तसे पुन्हा पुन्हा माझ्या पत्त्यावर ते नंतरही येतच राहिले. Lol

तसेच होस्टेल वगैरेमध्ये कॉमन बाथरुम म्हणजे अक्षरशः कॉमन असतात. एका मोठ्या बाथरुममध्ये आठ दहा शॉवर्स ओळीने चार चार फूटांवर असतात. मध्ये कुठलाही आडोसा नसतो. सगळे बिनधास्त बिनकपड्यांचे आंघोळी करत असताना एकमेकांना दिसतात. .......
Submitted by बिपीन चन्द्र हर... on 28 June, 2018 - 22:31

म्हणजे Water Kingdom मध्ये आहेत तसे? मग त्यात एवढं शॉकींग काय आहे? अंधेरी येथील 'शहाजी राजे क्रीडा संकुल' (Andheri Sports Complex) मधील जलतरण तलावाच्या परिसरातही असे शॉवर्स आहेत. बाथरूम रिकामे नसतील तर आम्ही तेथे बिनधास्त आंघोळ करतो, अगदी साबण लावून!!!

शॉवर असणं वेगळं आणि बिना कपड्याची आंघोळ करणं वेगळं विमु. हा शॉक मलाही बसलेला स्विमिंग पूल मध्ये.

>> पुण्यातुन रात्री सुटणार्‍या काही खासगी ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हर महिला आहेत.

इज इट? हे माझ्यासाठी नवीन आहे. कारण काही वर्षांपूर्वी पुणे हैदराबाद वारंवार खासगी ट्रॅव्हल्स प्रवास केला आहे तेंव्हा तर असे काही आढळले नाही. मागच्या चारपाच वर्षात झाले असेल. तसेही आपल्यकडे झपाट्याने बदल होत आहेत. बसची/एसटीची कंडक्टर म्हणून महिला काम करू लागल्या तेंव्हा जुन्या लोकांच्या दृष्टीने तो कल्चरल शॉकच होता.

अगदी कल्चरल नाही म्हणता येणार पण सोशल शॉक होता तो!

बारा एक वर्षापूर्वीची गोष्ट असेल.... पहील्यांदाच ऑन साइट US ला गेलो होतो.... ट्रॉय सारख्या छोट्याश्या गावात मुक्काम होता.... ज्या हॉटेलमध्ये राहीलो होतो तिथल्या हाउसकीपर बायका कॅमरी, सीव्हीक आणि तत्सम गाड्या घेउन येताना बघून उडालोच होतो!
एक बाई तर निस्सानचा मिनीट्रक घेउन यायची
(अस्मादिकांनी तेंव्हा नुकतीच स्वताच्या पैशाने कशीबशी नवीकोरी स्प्लेंडर घेतली होती!)
फार मोठा आश्चर्याचा धक्का होता माझ्यासाठी तो.... पुढेपुढे जसा हा देश कळत गेला तसे मग आपल्याला इतके आश्चर्य का वाटलेले याचेच आश्चर्य वाटायला लागले Wink

अमेरिकेतील क्ल्चरल शॉक्स बर्‍याच लोकांनी सांगितले, त्यात आणखी थोडी भर.
- विद्यार्थी असतांना क्लास मधे विद्यार्थीच काय पण काही प्रोफेसर्स सुद्धा बर्मुडा घालुन शिकवायचे.
- आफ्रिकन मुलांची चड्डी/पॅन्ट घालायची जगावेगळी फॅशन.
- काही मुली तर चक्क अर्ध-डोकं भादरुन, अर्ध-डोकं तसच ठेवायच्या. सुरुवातीला फार विचित्र वाटायचं ते.
- कुठलेही टॅप-वाटर पिण्यासाठी वापरने, अगदी बाथरुम मधील सुद्धा !
- रस्त्यावर स्वतःच्या कूत्र्याने केलेली शी , स्वतः हाताने साफ करणे.
- मूव्ही पहायला थेटरात गेल्यावर, एका तिकिटात अनेक चित्रपट पहाता येतात (अर्थात भारतीय जुगाड, कारण एकदा का तिकिट तपासुन आत सोडले की, आख्खे थेटर तुम्च्या मालकीचे Wink ) विद्यार्थीदशेत काहि वेळेस वापरून पाहीला हा जुगाड, पण नंतर बोर झाले,
- एका बर्गरप्लेस मधे काम करत अस्तांना वाटायचं की ही लोकं दुपारचे जेवण फक्त बर्गर खाउन कशी भागवत असतील.
- माझ्या मित्राच्या बॉसची आई, त्याच्या दुसर्‍या घरात रितसर भाडे देउन राहते. ही जवळ्जव्ळ नव्वदितली म्हतारी, ऑक्सिजन सप्लाय सोबत घेउन एकटी शॉपींगला जाते, कसिनो मधे गॅमबलिंग करते.
- आपल्याकडे ओल्या बाळंतनीला महिनोन्महिने, घरातून बाहेर जाउदेत नाहीत, इथे तर आई काही दिवसाचे/आठवड्याचे मुल घेउन शॉपिंग करताना पहिल्यावर खुप अप्रुप वाटले.

>> काही दिवसाचे/आठवड्याचे मुल घेउन शॉपिंग करताना पहिल्यावर खुप अप्रुप वाटले.

अगदी अगदी. एवढेसे बाळ असल्या भयाण थंडीत प्र्याम मध्ये घेऊन फिरत असतात. त्या बाळाच्या अंगावर पण फार जाडजूड कपडे वगैरे नसतात आणि ते सुद्धा निवांत झोपलेले असते. कळवळा आपल्यालाच येतो Lol शिवाय तिकडे बाळाला आईवडील दोघांच्या मध्ये घेऊन झोपणे हा प्रकार नसतो. बाळाची रूम वेगळी. निदान आम्ही तरी असेच ऐकले होते. तेंव्हा आमच्यासाठी तो शॉकच होता.

>>अमेरिकेत आल्यावरचे कल्चरल शॉक अनेकांनी लिहिले आहेत त्यात माझीही थोडी भर... इतर वेळी शिंकल्यावर अगदी एक्स्क्युज मी म्हणत हाताला सॅनीटायझर लावायला पळणारे हे लोक भर मीटींग मधे, वर्गात वगैरे जोरजोरात नाक शिंकरतात. म्हणजे शिंकेसारख्या ज्या गोष्टी वर आपला कंट्रोल नसतो त्यासाठी माफी मागतात पण नाक शिंकरताना, जे पटकन बाहेर जाऊन करता येत, काही म्हणत नाहीत!..<<

पादणं पण चालतं... माझा बॉस पादायचा आणि बीन्स गाईज म्हणत स्वतःच हसायचा.
कधी तर इतके जोरात असाय्स्चे, तर फक्त हसून .. समवन ईज नॉट हॅप्पी .. सॉरी टीम.

>>>म्हणून भारतातल्या मुंबईत ५* हाटेलात पण कागद? नो चान्स ऑफ पाणी?<<<
अहो तिथे फक्त तुम्हीच जात नाही ना, गोरे पण जातात ना..
पण भारतीय सोय सुद्धा असतेच त्यस्मुळे नक्की कुठल्या हॉटेला बद्दल लिहिलय समजत नाही.

दुबै एयरपोर्ट टॉईलेट्स बेस्ट...

नात्यांचेही काही किस्से काही शॉक.
म्हणलं तर सगळे लोक इकडून तिकडून सारखेच म्हणलं तर खूप मोठ्ठे फरक.

स्कॉटलंड कदाचित अजून इतकं मेट्रोपोलिटन न झाल्यामुळे असेल कदाचित पण युरोपातून रिलोकेट झालेले काही मोजके लोक सोडले तर बाकी सगळे पिढ्यांपिढ्या तिथेच राहिलेले. जन्म, शिक्षण तिथेच. बहुतेकांनी कॉलेजच्या गर्लफ्रेंडशी लग्न केलेले. घर घेताना ठरवून आई-वडील, सासू- सासरे यांच्या जवळ घेतलेले.

एक कलिगने त्याचे घर विकले तेंव्हा सांगत होता, "माझी आई (खाजगीत) म्हणाली- तुझ्या बायकोच्याने घर काही साफ होणार नाही. तिने माझ्या घरी येऊन इंच न इंच ब्लीच केला आणि त्यानंतर आलेल्या गिर्‍हाईकाने लगेच ऑफर दिली."

दुसर्‍या एका कलीगची ३ लग्न (आणि घटस्फोट) झाली होती. त्याला आधीच्या लग्नांच्या ३ मुली आणि एक मुलगा होता. तो एका २७ वर्षाच्या मुलीबरोबर रहात होता. तिला मुलगी झाल्यावर तिच्याशी त्याने चौथे लग्न केले. आणि आश्चर्य म्हणजे जेव्हा त्याला कळले की पुन्हा मुलगीच होणार आहे तेव्हा तो नाराज झाला होता. त्याचा सर्वात मोठा मुलगा २३ वर्षांचा आणि धा़कटी एका महिन्याची.
दर आठवड्यात त्याच्या इतर ४ मुलांचा त्याच्या घरी राहण्याचा दिवस ठरला होता. त्यापैकी एक दिवस ठरवून सगळी मुलं एकत्र असतील असा.
त्याच्या चौथ्या बायकोचे इतर मुलांशी छान जमायचे. ( कारण - "She is not their parent. They have mum. She is just Ellen for them.") हा मनुष्य अपवाद होता. सगळ्यांची एवढी लग्न झाली नव्हती.

एकाने मला डेटींगची रुपरेशा सांगितली होती. ओळख झाल्यानंतर सुरुवातीला आठवड्यातून एकदा भेटायचे, मग दोनदा, तिनदा. साधारणपणे ३-४ महिने भेटल्यानंतर दिवसभर फिरायला जायचे. मग काही काळाने ३-४ दिवसांची ट्रीप. ही खूप महत्वाची असते कारण यातच तुमच्या सवयी, स्वच्छता, पध्दती कळतात. जर इथे पटलं तर मग मुलं (असतील तर) मित्र मंडळ यांच्या भेटी. मग एखाद्या सणावारी किंवा प्रसंगी एकमेकांच्या आई वडीलांशी ओळख. मग पार्टनर म्हणून एकत्र राहायला लागणे . आणि मग लग्न / मूल.
भेट ते एकत्र राहणे यामध्ये जनरली एका वर्षाचा काळ जातो. यामध्ये काही फिसकटलं तर पुन्हा पहिल्यापासून. पण कमिटमेंट करताना नीट पारखून विचार करून ठरवायचे.

यू.के. मध्ये तरी मला शिकलेले पांढरपेशे लोक कुटुंब व्यवस्था, मुलांवर संस्कार, वेळेत लग्न, तिशीच्या आत मूल याला मह्त्त्व देताना दिसले. तरी हे अचिव करण्यासाठी वाट्टेल त्या तडजोडी नाहीत. लग्न मूल वेळेत झालेले, डिवोर्स झालेले, पार्टनर न मिळालेले सगळेच लोक मला एकूणातच सुखात दिसतात. (संपन्नता हा एक भाग असेल पण सोसायटीचे नॉन-जजमेंटल असणे हेही मोठे कारण असावे. )

एका वयवर्ष पन्नास असलेल्या कलीगनी त्याच्या घरी हाउस वॉर्मिंगला गर्लफ्रेंड्शी ओळख करुन दिली होती. साधारण चाळीसी पार केलेल्या त्या बाईला हा "गर्लफ्रेंड" म्हणतोय याचा मला धक्का बसला होता. जेवण झाल्यावर मस्त झालयं सगळं असं सांगितल्यावर "तिला सांग. तिनचं केलीय सगळी मेहनत. ३० लोकांचा स्वयंपाक पण घरीच केला तिनं. फार थोड्या गोष्टी बाहेरून मागवल्या आहेत" हे नवीन नवीन प्रेमात पडलेल्या लोकांसारखा खूप कौतूकाने म्हणाला होता.

एकदा मॅनेजर सांगत होता. "परवा माझ्या मुलाचा अठरावा वाढदिवस झाला. बायको म्हणाली - त्याला बिअर घेण्यासाठी घेऊन जा. मग मी त्याला सेरीमोनीअसली पबला घेऊन गेलो, त्याच्याबरोबर बिअर घेतली. पण त्याला बघून एकूणात असं वाटलं नाही की ही त्याची पहिली वेळ असावी. एल ओ एल"

लंच टेबलवर एक कलीग मूल प्लॅन करावे याबद्द्ल चर्चा करत होता. मी एवढी दचकले होते. बाकीचे लोक त्याला सल्ला देत होते. "अरे लवकर होऊन जाऊ दे. तिशीच्या आत झालेलं बरं. पण तू न्यूझिलंडच्या ट्रीपचा विचार करतो आहेस ना. मग आत्त कन्सिव झाली तर पहिल्या ट्राय सेमि मध्ये तिला कुठेही जाता येणार नाही. दुसर्‍या मध्ये जाता येईल पण तिला पिता येणार नाही. न्यूझिलंडला बीचवर जाऊन तू पिणार मग तिची चिडचिड नाही होणार?" वगैरे वगैरे.

एका कलिगने त्याच्या तीन दिवसाच्या बाळाचे फोटो दाखवले होते. बागेत फिरताना. मी चकीत. म्हणाला ३-४ दिवस बायकोला बाहेर जाता आलं नव्हतं . ती बोअर झाली म्हणून बागेत जाऊन काही तास बसलो.

बर्‍याच समाजात ( जातित मुद्दम लिहत नाही) जावयाला पाहुणे म्हणून सबोधतात तर असच माझ्या मैत्रीणिला बघायला येणार होते म्हणुन त्या काकुच सारख"पाहुणे येणार, पाहुणे येणार" चालु होत .यथावकाश लग्न वैगरे झाल आणि २-३ महिन्यात त्या सकाळी सकाळि परत भेटल्या आणि म्हणे अग पाहुणे यायचेत उद्या ! मी अनवधानाने म्हणून गेले " परत??" मग घोळ लक्षात आला.

<<< हो नक्की. (रिस्पॉन्स किती मिळेल शंकाच आहे. खेडेगावातली लग्नाची पार्श्वभूमी वातावरण वगैरे. तेही काही दशके झाली. आता थोडाफार फरक असेल. पण रिगार्डलेस, लिहायला हरकत नाही. प्रयत्न करतो.) >>>
प्रतिसाद किती मिळेल याचा विचार करू नका. म आं जा वर शक्यतो पुणे-मुंबईमधे जन्मले वाढलेले, तिथून परदेशात गेलेले, खाऊजानंतरचे नवश्रीमंत असा साधारण एकच गट (जातपण म्हणता येईल) लिहीत असतो. फारच तेचते होऊन जातं.

कारुण्यच जास्त वाटायचे. विविध कारणांसाठी. >> हा भाग फार जास्त महत्वाचा आहे. सगळ्यांना (मलादेखील अंदाज आहे पण डायरेक्ट अनुभव नाही) काहितरी नवीन कळेल.

बर्‍याच समाजात ( जातित मुद्दम लिहत नाही) जावयाला पाहुणे म्हणून सबोधतात >>> मला पण हे श्रीरामपुरला कळले.

चांगला धागा.

लहानपणापासून मामेभाऊ, मामेबहीण, आतेभाऊ, आतेबहीण ही सर्व भावंडं असंच कल्चर होतं. पण गावाला गेल्यानंतर मामाच्या मुलीला मेव्हणी म्हणतात हे ऐकून शॉक बसला होता. तसेच मामाच्या मुलीशी लग्न करतात हे पहिल्यांदा कळाले तो कल्चरल शॉक होता. सोलापूर भागात तर मामा आणि भाचीचे लग्न होते. हा मात्र जबरदस्त धक्का होता.
आमच्याकडे चुलतभावंडं वगैरे असा प्रकार नसतो. सगळे भाऊबहीणच. पण शेजारी अन्यधर्मिय कुटुंब होतं. त्यांच्यात चुलतभावंडांत लग्न होतं हे समजले तो धक्का होता.
मामाच्या मुलीशी लग्न हे नंतर ब-याच ठिकाणी आणि ब-याच समा़जात आढळले. बहुतेक त्यामुळं सास-याला मामा आणि सासूला मामी म्हणतात (जावयाकडून). तर मुलगी सासूला आत्या म्हणते.
भारतात फुटाफुटाला असे शॉक्स बसतात. नंतर सवयीचे होऊन जातात.
पारशी कुटुंबात सख्ख्या भावाबहीणीचं लग्न होतं असं ऐकून आहे. एक पारशी कुटुंब ओळखीचं होतं. पण कधी विचारलं नाही त्याबद्दल.

>> बर्‍याच समाजात ( जातित मुद्दम लिहत नाही) जावयाला पाहुणे म्हणून सबोधतात

आजवर माझी समजूत होती सगळीकडेच असेच संबोधत असतील. म्हणजे प्रत्यक्षात नसले तरी फॉर्मली किंवा व्याख्येनुसार. त्यामुळे माझ्यासाठी हा इथल्या इथेच छोटासा कल्चरल शॉक Lol

<अवांतर>
अर्थात आमच्या घरी सुद्धा लहानपणी चुलत/आते/मामे/मावस हे सगळे भाऊ बहिणच. पाहुणे असे नाही. त्यामुळे लहानपणी मला वाटायचे नात्यात नसेल तोच पाहुणा. तो फरक कळायला मला सुद्धा कैक वर्षे गेली. हायस्कूलमध्ये असताना एकदा वर्गात कुणालातरी गमतीने "काय रे पावण्या" म्हणालो. यावर दुसरा एकजण पटकन म्हणाला "तो तुझा पावणा कसा? तो तर तुझाच भाउबंद". अशा प्रसंगांमुळे मलाही कळत गेले. वडील, चुलते, चुलत-चुलते वगैरे वगैरे हे सगळे एकच आडनाव. हे म्हणजे हे भाऊबंद. पाहुणे नव्हेत. आणि मामा, आत्ती, मावशी वगैरे हे सगळे (ज्यांची आडनावे बहुतांशी वेगळी असतात) म्हणजे पाहुणे. लग्न जमवताना भाऊबंद नाही किंवा आईकडून नाते असेल तर मावस किंवा मावस मावस असे नाही हे पाहिले जाते. भाऊबंदाना सगे असाही शब्द आहे (त्यावरूनच सख्खे म्हणजे क्लोज हा शब्द). आणि पाहुणे म्हणजे ज्यांच्याशी लग्नानंतर नाते(सोयरिक) निर्माण झाले ते सोयरे. सगेसोयरे म्हणजे सगळे जवळचे नातेवाईक.

छान धागा आहे.
जपान मध्ये बसलेले काही धक्के.
- पहिल्या आठवड्यात इंटरनेट चालत नसल्याने सर्व्हिस अपा. मधून फोन केला. तो माणूस म्हणाला ३:१७ ला येतो ( ३/४ ते आता आठवत नाही पण १७ आठवतं) मी विचार करत होते की १७ व्या मिनिटाला बरोब्बर कसं काय वेळ दिली असेल. पण ३:१७ ला वाजली दरवाजाची बेल !!
- बुलेट ट्रेन ने येत असताना एकदा स्नो मुळे ट्रेन बरीच लेट झाली. तर नॉर्मल ट्रेन ने होईल इतके भाडे कट करून उरलेली रक्कम परत दिली होती.
- ट्रेन तिकीट काढून ऑटो मेटिक गेट मधून आत गेलो की डेस्टिनेशन ल पोचल्यावर ते तिकीट गेट मध्ये टाकायचं असतं. ते कधी तरी नेमकं हरवलं की तिथे उभा असलेल्या स्टे. मा. ला सांगायचं. मग तो तुम्ही कुठून चढलाहोता ते विचारतो. लोक शिस्तीत जिथून चढले ते सांगतात. आणि जे होईल तितकी रक्कम देतात. पण नंतर मी ऐकले की बांगलादेशी, पाकिस्तानी, भारतीय आणि कोरियन वगैरे लोकांनी याचा फार दुरुपयोग केला. सुरुवातीला सगळ्यात कमी पैशाचं तिकीट काढायचं. दूर डेस्टिनेशन ल पोचल्यावर तिकीट हरवलं म्हणाजयच. आणि चढलेलं स्टेशन एकदम जवळचं सांगायचं. म्हणजे मग एकदम कमी खर्चात प्रवास होतो. त्यांना कळल्यावर ही सिस्टीम बदलली होती. आता तर स्मार्ट कार्ड किंवा स्मार्ट फोन पे वापरलं जातं.
- तरुण मुलं मुली रस्त्यावर , स्टेशन वर कुठेही सहज खाली बसतात.
- स्टेशन तिथले जिने, प्लॅटफॉर्म पाणी साबण वापरून चक्क धुतले जाते. चुकून लोकांनी बाकावर विसरलेला कचरा स्टे. मास्तर येऊन कचऱ्यात टाकतो. त्यावेळी खाली काही चिखल , च्युईंग गम इ. चिकटलेले दिसलं तर खरवडायला काहीतरी घेऊन येतात आणि ते काढून टाकतात.
- ट्रेन मध्ये चढायला लाईन लावतात. आणि खूप गर्दीच्या वेळी काही ठराविक स्टेशन वर पुशर असतात. ते लोकांना ट्रेन मध्ये ढकलून दार बंद होण्याची व्यवस्था करतात. अशा गर्दीत कोणाची पर्स वगैरे दरवाज्यात अडकली तर दार नीट बंद होत नाही आणि अलार्म वाजतो मग ते जाऊन दरवाजा उघडून ती वस्तू आत टाकतात.
- नवीन नवीन गेलो तेव्हा कुठल्या बाजूला स्टेशन येणार याचा इंडिकेटर दरवाज्यात असतो तो बघून भारी वाटलेले. मुंबई ट्रेन स्टेशन डीलेमा माहिती असल्यामुळे...
- ट्रेन १/२ मिनिट लेट येणार असेल तर अनाऊंस मेंट होते आणि दिलगिरी व्यक्त केली जाते.
- तोक्योत आणि सबर्ब मध्ये सुमारे पन्नास एक ट्रेन लाइन्स आहेत ( जश्या आपल्याकडे सेंट्रल , वेस्टर्न तशा ) ऑफिसला जाताना त्यातल्या दोन तीन ट्रेन लाईन बदलून जाण कॉमन आहेच. पण असं करताना आपण वेळेवर गेलो तर कधीच कंनेक्टींग ट्रेन चुकत नाहीत. दोनतीन ट्रेन बदलूनही १५ २० मिनिटात ऑफिसला पोचणे शक्य आहे.
- आम्ही राहत होतो तिथल्या त्या स्टेशन वर नवीन ब्रीज आणि लिफ्ट बांधणार होते. त्यासाठी आडोसा केला होता. मला वाटलं आता खूप दिवस राडा , सिमेंटचा त्रास असे होणार की काय. पण काही महिन्यात तो आडोसा काढला आणि बघतो तर नवा ब्रीज , लिफ्ट , नवीन एन्ट्री सगळं तयार. त्याच दिवशी वापरात पण आणलं. नंतर काही दिवस स्टेशन स्टाफ तिथे लोकांना गाईड करायला उभा असायचा.
- असाच ऑलमोस्ट अचानक स्मार्ट कार्ड सिस्टीम सुरू झाली. आधी सुरुवातीला बरेच महिने फक्त काही स्टेशन वर आणि ट्रेन लाईन वर होती. मग अचानक कोणालाच त्रास न होता सगळ्या स्टेशन वर आणि बस मध्येही सुरू झाली. त्यासाठीचे एन्ट्री एकझिट गेट बदलणं वगैरे अगदी सहज लोकांच्या लक्षातही न येता झालं. हेच कार्ड आता वेंडीग मशीन ल पण चालतं.
- पोलीस तुम्हाला थांबवून आयाडी विचारतो मग ओ हो इंडो ! ( इंडियन) असं म्हणतो आणि थांबवलं म्हणून सॉरी पण म्हणतो हे पण धक्कादायक.

असो आत्ता इतकेच धक्के आठवलेत..:D

Pages