तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जी पी एस मधलं 'गोल चक्कर से तिसरा निकास ले' मला कधीही कळलेलं नाही. आधी 'गोल चक्कर 'म्हणे. आमच्या इथे दवाखान्याचं प्लस सारखं चिन्ह असतं तसले असतात चौक. वर त्यात चौकात येऊन वळणं मोजायची. त्यात तिसरं घ्यायचं. बाकी लेफ्ट राईट वगैरे काही नाहीच. गोल चक्र हा एखादा सूर्य आहे का, की ज्याचे निकास रस्त्यांचे बाण सूर्याची किरणे क्लियर व्हिजिबल बाहेर जातात तशी बाहेर जावी? त्यात आणि चौकात हजार फ्लेक्स असतात. एखादे फळाचे दुकान असते. एक पेपर वाला असतो. या सगळ्यातून तिसरा निकास शोधायचा, आणि हे सगळं करत असताना समोर कट मारणार्‍या रिक्षा आणि दुचाकी वाल्यांना कन्वाळू स्माईल द्यायचं हे सगळं एकावेळी कसं जमेल?

सगळ्यात पहिल्यांदा एका नॉर्थ इंडियन मैत्रिणीच्या घरी कांदा आणि हळद घातलेली सा खि पाहिली तेव्हा धक्का बसला होता. पण चांगली लागते. फक्त फोडणी चा साबुदाणा म्हणत खायचे. Proud

आम्ही अमेरिकेत आलो तेव्हा आजच्यासारखा मोबाईल्सचा सुळसुळाट नव्हता. ( प्रवास करायचा म्हणजे mapquest वर पत्ता टाकून प्रिंट घ्यायची आणि प्रवासाला निघायचे.) तरीही एक लक्षात आले की इथल्या सामान्य लोकांनासुद्धा दिशांचे ज्ञान उत्तम असते. ते अगदी सहज अमुक एका रस्त्याने आग्नेय दिशेला ४ mile जा. मग पूर्वेला २ mile जा. नंतर गाडी पार्क करून एक ब्लॉक चाला इ. इ. असा पत्ता सांगतात. त्याकाळी पूर्व - पश्चिम समजण्यासाठी आधी आम्हाला आकाशात सूर्य कुठे आहे हे पाहावे लागत असे! (आकाश ढगाळ असेल तर कल्याणच!) हा एक शॉकच होता कारण मायदेशात पदोपदी दिसणारी बिडी आणि पान भांडारे अथवा 'अमृततुल्य' चहाच्या टपऱ्या. किंवा रस्त्यात कोणालाही थांबून पत्ता विचारला की काम भागत असे. इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी कधी दिशा समजून घेण्याची गरजच पडली नव्हती.
दुसरा शॉक म्हणजे एकदा काही कारणाने मुलीच्या शाळेत गेले होते ती जुनिअर हायस्कूलमध्ये असताना. तेव्हा वर्गातल्या बऱ्याच मुलांची पुस्तके (भारतीय मुले सोडून!) बाकाखाली पायाशी ठेवलेली होती. एक- दोघांनी तर चक्क त्यांचे एकावर एक रचून फूट-रेस्ट बनवले होते Sad त्यापूर्वीच काही दिवस आधी एका 'बॅक to स्कूल' जाहिरातीत पुस्तकांवर बूट ठेवलेले बघितले तेव्हाही असाच धक्का बसला होता.

मुंबई पुण्यात ऑफीसमधे सकाळी नुसतच हसून हाय असं म्हणायची सवय होती. चंदिगडला लोक आल्याआल्या सगळ्यांना हातात हात घेऊन किंवा गळाभेट घेऊन गुड मॉर्निंग जी, कैसी है जी आप आज, सब ठीक ना जी, वगैरे करतात, अगदी रोजच्या रोज आणि पूर्ण टीम ला. मग इकडे तिकडे फिरून बाकीच्यांना पण. अर्थात तो वेळ भरून काढतात काम करून. पण नंतर जातानाही रीतसर तेच सगळे सोपस्कार करत गूड नाईट जी म्हणतात. खूप मोठा कल्चरल शॉक माझ्यासाठी. अजीर्ण होतं Wink

मी एकदा VIP ची बॅग दुरूस्त करायला घेउन गेलो होतो. (२ -३ वर्षांनी).
त्याने सांगितले या मॉडेलमधे डिफेक्ट आहे (जो वेगळाच होता, मला माहित नव्हता). बॅग फुकट बदलून दिली. Happy

माझा भारतातलाच अनुभव ज्याला कल्चरल शॉक म्हणता येणार नाही पण इथे अमेरिकेतले / युके तले खरेदीचे अनुभव लिहले जात आहेत म्हणून मला ही माझा अनुभव लिहावा वाटला.

मी एकदा एक हँडमेड एबोनाईट मटेरियलचे फौटनपेन हैद्राबाद च्या डेक्कन पेन्स या कंपनीशी फोना फोना करुन मागवले (त्यांची अजुनही वेबसाईट नाही) . मला काळा रंग, फाईन निब इ स्पेसिफिकेशन्स असलेलेच पेन हवे होते (किंमत रुपये ८०० + कुरियर खर्च रु १०० ) , ऑर्डर केल्या नंतर सुमारे महीनाभराने पेन मिळाले (हँडमेड होते त्यामुळे इतका वेळ लागला) . पण दुर्दैवाने ते पेन गळायला लागले म्हणजे शाई टोपणातून सतत बाहेर यायला लागली , परत फोना फोनी झाली , कंपनी ने दिलगीरी व्यक्त करत त्याच स्पेसिफिकेशन्स चे बदली पेन पाठवायचे कबूल केले (गळके पेन तुमच्या कडेच ठेवा परत पाठवू नका असे ही सांगीतले ) , मी मागच्या अनुभवा नुसार महीनाभर वाट पाहीली पण पेन काही आले नाही, परत फोना फोनी सुरु! ‘पाठवतो... पाठवतो ‘ असे करत तीन महीने उलटले. शेवटी एकदाचे त्या कंपनी पाठवलेले बॉक्स कुरीयर ने घरपोच आले , उघडून पाहीले तर काय ! आत एक नवे कोरे चकाचक भारीतले फौटनपेन होते , ज्याची कंपनी कॅटलॉग किंमत रुपये २७०० होती !

सोबत एक पत्र होते ..

“.... आपल्याला काळ्या रंगातले एबोनाईट पेन हवे होते पण दुर्दैवाने काळ्या रंगाचा एबोनाईट रॉ स्टॉक आमच्या कडे उपलब्ध नाही आणि नजिकच्या काळात उपलब्ध होण्याची शक्यताही नाही, आपण आमचे सन्मान्य ग्राहक आहात आपल्याला फार काळ प्रतिक्षा करायला लावणे आम्हाला रुचले नाही तसेच आम्ही आधी पाठवलेले पेन खराब निघाले याची आम्हाला खंत आहेच , त्यामुळे आपल्याला झालेल्या या मन:स्तापाची थोडी का होईना भरपाई व्हावी म्हणून आम्ही आपल्याला आमच्या प्रॉडक्ट लाइन मधले सगळ्यात टॉप चे पेन सप्रेम भेट म्हणून पाठवत आहोत त्याचा स्विकार करावा ! ....”

त्यांना माझे ८०० रुपये परत करणे सोपे होते पण तसे न करता त्यांनी नुकसान सोसुन एक ग्राहक टिकवला !

कस्टमर सर्विस असावी तर अशी !

ब्राझिलमधे अनेक धक्के बसले. त्यापैकी Public display of affection मुख्य.

लिफ्ट, सरकते जिने, ट्रॅफिक सिग्नल, कुठलिही लाईन, पेमेंट काउंटर्स, ही चुंबन घेण्याची अधिकृत ठिकाणे म्हणून जाहीर केलेली आहेत की काय कुणास ठाउक. Happy

डायव्होर्स, लग्नाशिवाय मुले हे तर अगदी कॉमन.

अजून एक अलिखित रूल. if you happen to have eye contact , you must smile and greet. Happy

लिफ्ट किंवा कुठलंही दार समोरच्याला उघडून 'पहले आप' वालं कल्चर मी प्रथम इकडे ओमानमधेच पाहिलं. यात 'पहले आप, पहले आप में नवाब साहब की गाडी निकल गयी' या अतिशयोक्तीवाल्या प्रसंगापर्यंत पण १-२ वेळा मजल गेलेली पाहिली आहे.
तेच झेब्रा क्रॉसिंग वर गाडी थांबवून पादचार्‍यांना रस्ता क्रॉस करा म्हणणे या बद्दल पण.
अजून एक गोष्ट , रस्त्यावरुन जाताना विरुद्ध दिशेने जर दोन गाड्या समोर आल्या, आणि त्यातल्या पहिल्याला वळायचं असेल तर, दुसर्‍याला थांबावच लागेल अशी परिस्थिती असल्यास, तो दुसरा इमाने इतबारे आपल्या गाडीचा लाइट फ्लॅश करतो, आणि पहिला त्याला धन्यवाद करत वळून निघून जातो. गाडीचा हॉर्न हा अगदी अपरिहार्य परिस्थितीतच वाजवायचा असतो हे ज्ञान जसं इकडे आल्यावर मिळालं तसंच लाइट फ्लॅश करुन 'पहले आप' करणे ही सवय पण इकडेच समजली. पण ह्याचमुळे दरवर्षी पुण्यात आल्यावर गाडी चालवताना जाम मजा येते.. पहिले १-२ दिवस ! Happy
अजून एक मजेशीर पद्धत म्हणजे, एकमेकांना भेटल्यावर 'हाय हॅलो, नमस्कार चमत्कार' वगैरे ची पद्धत चांगलीच लांबलचक असते.
बरेचदा पेमेंट घ्यायला सप्लायर आला की, ही प्रश्नमंजुषा सुरु होते. उदा-
कसा आहेस?
काम कसं चालू आहे?
बायका-पोरं कशी आहेत?
गाडी कशी आहे?
.. पासून ते गाय-बकरी-उंट कसे आहेत ? इथपर्यंत हे प्रश्न जाऊ शकतात..
बर्‍याचदा गडबडीत असताना असले प्रश्न सुरु झाले की... लवकर मुद्द्यावर ये रे बाबा अशी परिस्थीती होते.
शहरी भागातल्या नागरिकांनी आता सवयीने/अनुभवाने हे प्रश्न विचारणं कमी केलं असलं, तरी दूरच्या वाळवंटी भागातून येणारा एखादा मनुष्य अजूनही असले प्रश्न विचारतोच !
.. बाकी आठवेल तसं.. Happy

मला गावाकडे गेल्यावर लोक सकाळी डब्याला पार अगदी शेजारी शेजारी बसून गप्पा मारत प्रोग्रॅम उरकतात ते पाहून शॉक बसला होता.

माझ्या एका मित्राच्या बहिणीकडे जेवायला गेलो होतो पुण्याला. आम्हाला दोन कॉलेज मधे जाणारी मुले, त्यांना दोन मुली. मुलांनी आधी जेवायचे व मोठ्यांनी नंतर असे ठरले. थोड्यावेळाने मुलांची जेवण झाल्यावर माझी बायको आणि मित्राची बहिण स्वयंपाकघरात. दोघीही स्वयपाक घरात. आमच्या पहिलवानानी पोळी, भाजी कोशिंबीर साफ केली होती. Happy
त्यातून एक शिकलो, कुठल्याही फक्त मुली असलेल्या घरी जायचे तर मुलांना आधी घरी थोड खायला दिल पाहिजे. Happy मुल किती खातात हा मुलींना एक प्रकारचा शॉकच असतो. Happy

मुद्दाम सांगायला पाहिजे की हे घर पुण्याचे असण्याचा काहिही संबंध नव्हता. (तसेही असे म्हणणार्‍या मंडळींची मला कीव येते.)
माझ्या मित्राच्या आईने व या बहिणीने अगणीत वेळा आम्हाला तुडुंब जेवण करायला लावले आहे.
आताच वाटत आपण किती वेळा मित्रांकडे अचानक जायचो, आणि त्या माउल्यांनी कधिही न चेहर्‍यावर त्रास न दाखवता अत्यंत प्रेमाने कसे खाउ घातले असेल.

>>>मला गावाकडे गेल्यावर लोक सकाळी डब्याला पार अगदी शेजारी शेजारी बसून गप्पा मारत प्रोग्रॅम उरकतात ते पाहून शॉक बसला होता.<<<

गावात सगळी हेच करायच्स ८० च्या दशकात हे माहिती होते, त्यात शॉक कसला. Proud

आम्ही लहानपणी असे सगळे मुली फक्त मिळून जायचो सकाळी. ८० च्या दशकात मामाकडे परसाकडेच जायचो. मस्त गप्पा मारत, रेड्यांना हाकलत उरकायचो. एकदम सुरुवातीला वाटलेली भिती पण आजूबाजूच्या ताया माया जायच्या घेवून. आता हे अगदी लहान असताना ७-८ वर्षे वय असताना... मग ८५-८६ मध्ये सेप्टी टँकची परमिशन मिळाली व संडास बर्‍याच जणांनी बांधले आठवतेय..

<<< ऑफीस मधल्या एका सहकार्याला मुलगी झाली. विचारंती कळाल की त्याचे लग्न नाही झाले. नंतर कळाले की लग्न केल्यावर कायद्यानुसार बायको नवर्याच्या आणि नवरा बायकोच्या संपत्तिमधे अर्धा भागीदार असतो / असते. म्हणून हे लोक लग्न करत नाहीत. बर्याचदा हॉटेलात बिल वेग वेगळे देतात. दोन मुले असतील तर एका मुलाच नवरा आणि दुसर्या मुलाच बील बायको देते. अरे....>>>
आवडले ब्वा आपल्यालातर हे!
कोणता देश?-> फिनलॅंड. सहकारी हंगेरियन आहे आणि त्याची मैत्रीण फिनिश.

मी ऑफीस च्या कामासाठी फिनलंड ला गेलेलो..थोड्या महिन्यानी बायको आणि मुलगा आले. येताना फ्लाइट 10 तास लेट झाली. सहज म्हणून घर मालकाला हे सांगितले तर तो म्हणाला नुकसान भरपाई माग. कायाद्यानुसार त्याना द्यायला लागेल. परत सहज म्हणून गूगल वर चेक केला तर एक कॅंपनी तुमच्या वतीने क्लेम करून त्यांचे कमिशन घेऊन बाकीचे पैसे देते असे कळाले. तिकडे फोर्म भरून दिला तर पवर ऑफ अटयर्नी आणि 2-3 डॉक्युमेंट्स सही करून द्या म्हणाले. उगाच काही गडबड नको म्हणून त्या एका सहकार्याला विचारल तर म्हणे देऊन टाक बिनधास्त, एकडे फसवत नाहीत कारण पकडले गेले तर दंड खूप असतो. हो नाही करता करता दिले. आम्ही तुमचा क्लेम विमान कंपनी ला पाठवला आहे असे आम्हाला कलवले.तीनमहिने लागतील निकाल लागायला. नंतर म्हणाले..आमचा वकील दिल्ली किंवा हेलसिंकी मधे नाहीए (कंपनी जर्मन होती) तरी तुम्हाला क्लेम दुसर्या कोणाला द्यायचा असेल तर द्या. मी विचार केला बघू तर काय होताय..I have nothing to loose ... 2 आठवाड्यानंतर कळवल की क्लेम आला आहे. बॅंक अकाउंट डीटेल्स द्या रक्कम ट्रान्स्फर करायला. बायकोचे तर अकाउंट नवते एथे म्हणून माझ्या अकाउंट मधे टाका म्हणालो तर अजुन एक फॉर्म पाठवला..टॅक्स साठी त्याना लागतो म्हणे. तो ही भरून पाठवला ..10 दिवसात तिकिटच्या 80% रक्कम माझ्या अकाउंट मधे आली. सुखद धक्का.. Happy

मला बसलेला लेटेस्ट कल्चरल शॉक. Wink

मागच्या महिण्यात कारचे हायपोथिकेशन कॅन्सल करून नविन रजिस्ट्रेशन कार्ड मिळवायचे होते!
एस्बीआय मधून एन् ओ सी घेतले आवश्यक कागदपत्रे आणि ऑन लाईन रु. २५०/- भरल्याची पावती आरटीओत जमा केले २० व्या दिवशी नवीन रजिस्ट्रेशन कार्ड घरपोच! एक देखिल पैसा त्या कार्यालयात जाताच सामोर्‍या येऊन साहेब काय करायचयं विचारणार्‍यांना मोजावा लागला नाही की त्यांच्याशी बोलावेदेखिल लागले नाही!

गावात सगळी हेच करायच्स ८० च्या दशकात हे माहिती होते, त्यात शॉक कसला.

मी शहरात जन्मलो आणि वाढलो कारणाने मला बसला होता. आणि नंतर ट्रेकनिमित्ते मस्त वावरात, झाडीत जाण्यात संकोच वाटला नाही. पण असे पार अगदी शेजारी शेजारी बसून म्हणजे अगदीच. कहर म्हणजे आपण कधी दिसलो तर पार आवाज वगैरे देऊन काय रे कसा आहेस वगैरे गप्पा.

लईच निवांत

गावात सगळी हेच करायच्स ८० च्या दशकात हे माहिती होते, त्यात शॉक कसला. Proud>>>

अगदी अगदी आम्ही पण आजोळी गेलो की असेच! एकच वेळी सर्वांनी कॉल असायचा!
आणि एक दोघे नसायचो १०-१२ जण एक रांगेत चिंचेच्या झाडांखाली! Proud

>> गावात सगळी हेच करायच्स ८० च्या दशकात हे माहिती होते, त्यात शॉक कसला.

काल यावर लिहिता लिहिता थांबलो. पण आता विषय निघालाच आहे तर सांगतो. त्याकाळात हेच "कल्चर" होते. आमच्या घरी पहिल्यांदा टोयलेट झाले. सगळे आम्ही लहान होतो. एकदा एक मित्र घरी आला होता. त्याला कॉल आला. त्याने टोयलेटचे दार उघडले आणि म्हणाला,

"आयला असं असतंय व्हय? मला वाटलं हुतं आत माती आसंल"

एनसेंट कल्चरल शॉक Lol

माझ्या आईची खास शिकवण, जेवायला आलेल्याला पोटभरून वाढावे. माणसं आपल्या घरी येणं शुभं असतं.
मी आईसारखा खूप आग्रह नाही करत पण व्विचारते नक्कीच एक दोनदा.. >>> +१११

एक किस्सा माझाही.

लहान असताना एकदा मावशीच्या गावी गेले होते. तीथे बाजुच्या घरात लग्न कार्य होते. गावी गल्लीत रस्त्याच्या दोन्ही बाजुला गवत अंथरले होते, त्यावर बसुन जेवायचे. यापुर्वी मी असा प्रकार पाहिला नव्हता , खरेतर त्यांनी माझा स्वभाव पाहता आधीच सांगीतले होते की तु आत घरात बसुन खा, बाहेर रस्त्यावर पंगतीत नको. पण मला ते खुप छान वेगळे वाटल्यामुळे मी हट्ट करुन पंगतीत बसले. छान पैकी पंतराळी भरेस्तोर वाढुन घेतले ताईचे बघुन, पणं काही केल्या समजेना की सुरुवात कुठुन करायची, मग आजुबाजुला पाहुन खिरीपासुन सुरुवात केली. मस्तपैकी बुंदी कालवुन खिरीचा स्वाद घेत खात होती , अर्धी खीरपण खावुन झाली नव्हती ईतक्यात ईतरांचे पुर्ण जेवुन होवुन लोकं उठुन जायला लागले. काहीच कळेना की काय करावे. मी ईतकी हळु खात होती की पोट अर्ध काय कोरभर पण भरले नव्हते, पण एकटी कशी बसणार त्यात माझ्यामुळे मोठी ताई पण खरकटा हात घेवुन बसली होती. मग म्हटले जावु दे, सोडले जेवण तसेच अन पळत गेले मावशीकडे रडत की भुक लागलीये म्हणुन.

तेव्हा पासुन एक धडा घेतला की असे कधी कुठे गेले की अगदी पटापट जेवायचे किंवा शक्यतो आधी थोडेसे घरुन खावुनच जायचे.

मी पुण्याच्या लॉ कॉलेज रोड वरच्या आयडियाच्या ऑफिस मधे सिमकार्डच्या काही कामासाठी गेले होते. माझे नंबरचे तिकिट घेउन काही सेकंद थांबताच माझा नंबर आला. मी माझे म्हणने समोरच्या कर्मचार्‍याला सांगितले. त्यावर तिने मला पुढच्या काउंटवरून जाऊन ते काम आधी करून घ्या असे सांगितले. तस मी त्या काऊंटवर गेले, तर तिथे कोणीच न्हवते. माझ्या मागे आता अजुन तिन चार जण येऊन उभी राहिली. जवळ जवळ दहा मिनिट होत आली तरी तिथ कोणी येईना म्हणून शेजारच्या काऊंटवर विचारले तर टी टाईम झाला आहे येतील दहा मिनिटात असे उत्तर मिळाले. तिथे थांबून राहाण्याशिवाय पर्याय न्हवता. दहा बारा मिनिटाने तिथला कर्मचारी आला. मी आवश्यक ती कागदपत्र दिली. पण नेमक त्याच्या मशिनला काहीतरी झाल आणि त्याने मला परत पाच मिनिट थांबा अस सांगीतल.
तेवढ्यात दुसरी एक कर्मचारी त्याच्या नावाने आरडा ओरडा करत आली आणि त्याला बडबड करू लागली. त्यांची चर्चा ऐकली तेव्हा कळाल की त्यांच्या बॉस ने तिला बरच झापल का तर त्याने सी सी टिव्ही मधे मला त्या काऊंटरवर पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबवून ठेवलेल पाहिल. जर समोरचा कर्मचारी जागेवर न्हवता तर मला दुसर्‍या काऊंटवर वर पाठवून माझे काम का करून दिले नाही. कस्टमर थांबून का राहिले या वरून दोघांनाही रहिलेले कस्टमर संपवून भेटण्यास बॉसने बोलावले.
हे पाहून मला खरच धक्का बसला की कस्टमरची ईतकी काळजी खरच केली जाते.......

माझी मुलगी युकेला काही शिकायला गेली होती. तिच्या ग्रुपमध्ये ती एकटीच भारतीय होती. तिथल्या फॅकल्टीला तिने सर, मॅम करायला सुरुवात केल्यावर त्यांनी नावाने हाक मार म्हणून सांगितले. शिकवणाऱ्यांना नावाने हाक मारायचे वळण जिभेला पाडायला तिला 1 आठवडा लागला. Happy Happy

पु.ल. आणि सुनीताबाईंच्या लग्नाचा किस्सा कोणी वाचलाय का? आजच्या काळात देखील कल्चरल शॉक वाटतो वाचताना.. त्या काळात तर किती मोठा शॉक असेल. सुनीताबाई आणि त्यांच्या आई यांच्यातला दुरावा अधिकच वाढला त्या घटनेने. सख्या मायलेकी दुरावल्या पण सासरे आणि जावई यांच्यात पितापुत्राप्रमाणे जवळीक झाली तीही त्याच घटनेने.

बिपिन किस्सा लिहा ना.

अवांतर - बाय द वे इथे विशिष्ट जाती चा थेट उल्लेख न करता कित्येकांनी जे किस्से लिहिलेत, त्याला अधोरेखित करत भभा यांनी एक काडीटाकू धागा उघडला होता जाती बद्दलचा... अ‍ॅडमिन नी तो उडवलेला दिसतोय. ( बरं झालं )

Pages