तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंडोनेशियात आपला माणूस गेल्यावर तेरावा असतो तसा एक दिवस सांत्वनासाठी ठेवलेला असतो. तिथे खरोखर रिसेप्शन सारखे उत्साहाचे वातावरण असते.

मस्त धागा आहे, मजा आली वाचायला Happy
आम्ही अमेरिकेत काही महिने होतो. पहिल्या गावी तीन महिने राहिल्यानंतर नवर्‍याची बदली दुसर्‍या गावी झाली आणि तो लगोलग तिकडे रुजूही झाला. मी आणि आमचा मुलगा काही दिवस पहिल्याच गावी मागे राहिलो. घराचं लीज एक वर्षाचं केलेलं होतं, बदली अचानक झाली होती, त्यामुळे आता लीज कसं मोडायचं, पेनल्टी वगैरे लागेल का असे प्रश्न विचारायला मी अपार्टमेन्ट कॉम्प्लेक्सच्या ऑफिसात गेले. मी तिथल्या बाईला आमची परिस्थिती सांगितली आणि माझे प्रश्नही विचारले. तिने शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाली, 'तुझ्या नवर्‍याला भेटायला सांग मला'. मी चाटच पडले. 'का?' 'मी त्याला सांगेन सगळं नीट समजावून'. तिला बहुतेक वाटलं असावं की मला नीट समजेल की नाही Proud भारतातलं माझं उच्चशिक्षण, माझा हुद्दा, मी एकटीने तिकडे सगळी करणारी कामं वगैरे सगळं या देशात किती झूट होतं याचा मला जाम शॉक बसला होता तेव्हा! 'घरातलं सग्गळं मी बघते आणि घराबाहेरचं प्रत्येक काम आमचे 'हे'च करतात असं मी माना वेळावून डोक्यावरून साडीच्या घेतलेल्या पदराखालून सांगतेय असं व्हिज्युअलही तरळून गेलं! Lol
मग प्रेमाने 'नवरा इथे नाहीये, माझ्याशीच बोलावं लागेल तुला' असं तिला सांगितल्यावर नाईलाजाने तिने मला सगळी प्रोसिजर सांगितली. आणि ती शेवटी पूर्ण केली मी एकटीनेच! त्या दरम्यान तिला अनेकदा भेटावं लागलं. मग हळूहळू तिचा विश्वास बसला बहुतेक माझ्यावर Happy
त्याच गावात एका मॉलमध्ये मी पंजाबी ड्रेस घालून गेले होते किराणा आणायला, तेव्हा एका गोर्‍या म्हातार्‍या बाईने आवर्जून जवळ येऊन 'युअर ड्रेस इज नाईस' असं सांगितलं होतं तेही मला फार भारी वाटलं होतं Happy आमच्या नातेवाईक बायकांत मुलींचं कौतुक करायची पद्धत नसल्याने, माझ्याकरता हा प्लेझन्ट शॉकच होता! Lol

>>>घरातलं सग्गळं मी बघते आणि घराबाहेरचं प्रत्येक काम आमचे 'हे'च करतात असं मी माना वेळावून डोक्यावरून साडीच्या घेतलेल्या पदराखालून सांगतेय असं व्हिज्युअलही तरळून गेलं!<<<
चित्र तरळलं डोळ्यासमोर.. ते मोठं कुंकू राहिलच...

माझा ब्रिटीश मॅनेजर लंच ला फक्त सॅंडविच खायचा. ते सुद्धा कामाच्या जागी बसूनच. सुरवातीला मला वाटले याचे डायट वगैरे असेल. नंतर कळले तेच त्याचे लंच आहे. पण त्याच ऑफिसमध्ये लंचला फिश आणून कीचन मध्ये साग्रसंगीत जेवण बनवण्याचा कार्यक्रम पण काहीजण करीत. ऑफिसमध्ये फ्रीज असे त्यात कुणाचा फिश तर कुणाचे काय काय पदार्थ ज्याने त्याने आणून ठेवलेले असत. डबा घेऊन येणारा मी एकटाच असे. किंबहुना त्या ऑफिसमध्ये भारतीय मी एकटाच होतो. मी जेवणातून नेहमी "करी"च आणतो असे त्यांना वाटायचे. त्यामुळे बटाट्याच्या भाजीचा जरी वास आला कि "नाईस करी" असाच त्यांचा फीडबॅक असे Lol

वेळेच्या बाबतीत त्या ऑफिसमध्ये सगळे फार पर्टिक्युलर असायचे. कामाच्या वेळी काम म्हणजे कामच. तिथे टाईमपास वगैरे अजिबात करणार नाहीत. पण शुक्रवार असला कि मात्र सगळे दुपारपासूनच कल्टी मारायचे. शुक्रवारची संघ्याकाळ हि इंग्लंडमध्ये खूप वेगळी असते. शुक्रवारी संध्याकाळी ऑफिसमधून घरी येताना ट्रेन मध्ये खूप सारे रंगीबेरंगी, झगमगते, चकमकते आणि विविध सुवासांनी दरवळलेले कल्चर पाहायला मिळायचे Biggrin

या धाग्यामुळे एकेक जुन्या आठवणी जाग्या होत आहेत.

जर्मनीत इंडियन शॉप मध्ये एका जर्मन बाईने एक इंडियन प्रिंटेड साडी विकत घेतली आणि मी कौतुकाने 'तुला ही नेसता येते का' विचारलं तेव्हा तिने 'याचे सोफा स्प्रेड आणि पडदे घरी मस्त दिसतात' सांगितले होते तेव्हा जोरदार कल्चरल शॉक बसला होता. Happy
आता हे साडी पासून सोफा स्प्रेड्/पिशव्या वगैरे उद्योग भारतात पण डिझायनर शॉप्स मध्ये होतात त्यामुळे काहि वाटत नाही.

सिंबा,
तुमच्या घरी देवापुढचे दिवे शॅनेल(चॅनेल)५ चे जाळतात का हो? Happy

लीज तुमच्या दोघांच्या नावाने होते का? >>> मला वाटले की नवर्‍याच्या नावाने लीज होते का? ज्याच्या नावावर असेल त्याचा आयडी बघितल्याशिवाय काही माहिती न देणे शक्य आहे. किंवा काही कम्युनिकेशन गॅप. अशा काही ऑब्व्हियस कारणाशिवाय असे नवर्‍याची चौकशी वगैरे करण्याची पद्धत नाही अजिबात, विचारले.

तुमच्या घरी देवापुढचे दिवे शॅनेल(चॅनेल)५ चे जाळतात का हो? >>>
अगदी शॅनेल चे नाही, पण साध्या अत्तरात वाती भिजवून समईत लावायचे उद्योग केलेले एकदा, काही सुगंध वगैरे आला नाही, मेल्या नुसत्याच दंतकथा Happy

अगदी शॅनेल चे नाही, पण साध्या अत्तरात वाती भिजवून समईत लावायचे उद्योग केलेले एकदा, काही सुगंध वगैरे आला नाही, मेल्या नुसत्याच दंतकथा
>>>
छाती भरली असेल कफाने तर अमृतांजन फासून सिगारेट प्यायली म्हणजे कफ सुटतो असा सुट्टल लोकांत समज असे त्याची आठवण झाली

छाती भरली असेल कफाने तर अमृतांजन फासून सिगारेट प्यायली म्हणजे कफ सुटतो असा सुट्टल लोकांत समज असे त्याची आठवण झाली
<<

त्याला चुकीची गैरसमजूत असे म्हणतात. Rofl

>> अमृतांजन फासून सिगारेट प्यायली
अमृतांजन की व्हिक्स?? आणि या दोन्हींपैकी काहिही असलं तरी Uhoh
(मला ही दोन्हीं औषधं फार जालीम वाटतात आणि सर्दी वगैरे पळण्याऐवजी ही औषधं लावण्यामुळे जी जळजळ होते त्याचीच भिती वाटते)

भयंकर अवांतर सुरू,....

अहो ते स्वप्नाळू दिवस होते,
सदाशिवराव भाऊ आणि पार्वतीबाई रात्री सारीपाट खेळत असताना दिव्यातील तेल संपले, आणि भाऊंनी दिव्यात अत्तर भरून डाव सुरू ठेवला,
या आठवणी वरून पार्वतीबाई भाऊंचा तोतया ओळखतात, अशी काहीतरी गोष्ट वाचली होती .
तेव्हा पासून ते अत्तराचे दिवे लावायचे डोक्यात होते. Happy
शेवटी कोणाच्यातरी तेराव्याला मिळालेली (हे अगदी निश्चित आठवतेय, rathr तेराव्याला अत्तर वाटलेले पाहुन कल्चरल शॉकच बसला होता) बोटभर उंचीची अत्तराची बाटली हाती लागली आणि माझी इच्छा पूर्ण केली.

>>>>>>
अवांतर समाप्त

भयंकर अवांतर पुन्हा चालू ....

पण साध्या अत्तरात वाती भिजवून समईत लावायचे उद्योग केलेले एकदा, काही सुगंध वगैरे आला नाही, मेल्या नुसत्याच दंतकथा Happy>>>> तसलं अत्तर नसतं ते. तिळाच्या (बहुतेक) तेलात आवडता सुगंध असलेली फुलं भिजत घालायची असतात काही दिवस. तो सुगंध तेलात उतरला की ते तेल दिव्यात घालून दिवा प्रज्वलित करायचा.

मी हे उपद्व्याप केले नाहियेत पण कृती ऐकून आहे.

भ. अ. समाप्त.

सदाशिवराव भाऊ आणि पार्वतीबाई रात्री सारीपाट खेळत असताना >> वरच्या चर्चेनंतर हे "सदाशिवराव भाऊ आणि पार्वतीबाई रात्री सिगरेटओढत असताना" वाचलं आणी वेगळाच पार्वती आठवला Rofl
वरचं अमृतांजन सिगरेटला फासायचं की छातीला ही एक काशिनाथ नाडकर्णी टाईप शंका आली.

हेला,
ते एकांतात होते, तेल घालायला नोकराला बोलावून एकांत भंग करायचा नव्हता, म्हणून त्यांनी अव्हेलेबल असणारे तेल ,पक्षी अत्तर दिव्यात भरले....

वरच्या चर्चेनंतर हे "सदाशिवराव भाऊ आणि पार्वतीबाई रात्री सिगरेटओढत असताना" वाचलं >> मी ही

माझ्या माहितीनुसार, तोतयाचे कान टोचलेले नव्हते याच्यावरून तोतया ओळखला होता. अत्तराच्या दिव्याबद्दल कल्पना नव्हती. खरेखोटे माहीत नाही.

अती अती अती भयंकर अवांतर
अत्तराचे दिवे सारखंच ज्ञानसागरातील शिंपले मध्ये 1 चमचा अश्रू 1 लिटर पाणी निर्जंतुक करतं वाचून बरेच दिवस घरी भांडण झालं की डोळ्याखाली चमचा धरून रडायचे.चमचाभर अश्रू जमले, पण त्याने शुद्ध झालेलं 1 लिटर पाणी कधी प्यायलं नाही. ☺️☺️☺️

अरे ज्ञानसागरातील शिंपले कित्ती दिवसांनी ऐकलं. फार भारी पुस्तक होतं ते. Lol त्याचे भाग पण होते. अनेकदा वाचलंय.

त्यात स्किन केअर च्या टीप पण मस्त होत्या.
माझ्या तीळ आणि डोळ्याचा रंग भविष्याप्रमाणे मी एकाच वेळी 'यशस्वी आयुष्य' आणि 'जीवनात कष्ट, प्रेमाच्या खेळापासून दूर,स्त्री असल्यास पती अगोदर मृत्यू, पुरुष असल्यास 2 लग्न' होते

Pages