आठवणीतलं पुणं

Submitted by चिनूक्स on 27 March, 2017 - 03:17

गेले काही दिवस अमा, लिंबूटिंबू, केपी, विक्रमसिंह, पूनम, वरदा, आशूडी, गजानन, हिम्सकूल हे 'पुण्यातले पुणेकर' या धाग्यावर जुन्या पुण्याबद्दल लिहीत होते / आहेत. या आठवणी अतिशय रंजक आहेत.

जुन्या पुण्याच्या या आठवणी एकत्र वाचता याव्या, म्हणून हा धागा.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> जुन्या पुण्याची आणखी एक अगम्य आठवण - वरातीत की मिरवणुकीत डोक्यावर तसेच एका विशिष्ठ आकाराचे दिवे घेउन जाणार्‍या बायका असत - ते काय असायचे? फक्त अंधुक आठवते. <<< अरे ते पेट्रोमॅक्सचे दिवे. रॉकेलवर चालायचे. काकासाहेब गाडगीळांच्या घराच्या रस्त्यावर, कोपर्‍यावर भिंतीकडेला त्यांचा ढीग लावुन ठेवलेला असायचा. त्याच भिंतीवर एक वाघ व शिकार्‍याचे (बहुधा संभाजी महाराज) चित्र चितारलेले होते, ते बरीच वर्षे तसेच होते. (या आठवणी १९६८ ते १९७८ दरम्यानच्या). पुढे १९८८ पर्यंत तो पेट्रोमॅक्स दिव्यांचा ढिगारा तसाच होता, कालौघात, जनरेटर्स आले, अन या बत्या नष्ट झाल्या.

"पिक्चर" च्या आठवणी - नुसत्या गर्दीच्या म्हंटल्या तरी बर्‍याच आहेत

मंगला - "बच्चन" चे टॉकीज. मुकद्दर का सिकंदर ची अनेक आठवडे तुडुंब गर्दी. नंतर कुली व शराबीलाही. त्या आधी कस्मे वादे, परवरिश. खूप नंतर शहेनशाह सुद्धा. बच्चन ची सर्वात नंतरची आठवण म्हणजे 'हम' ची पहिल्या दिवशीची गर्दी. मित्राने फर्स्ट डे फर्स्ट शो ची तिकीटे सोमवारी गर्दीत घुसून काढली होती. थिएटर बाहेर शो च्या वेळेस इतके पब्लिक होते की मंगलाच्या कम्पाउण्ड मधून सुद्धा फक्त तिकीटे असलेल्यांना सोडत होते. तो विडी फेकून खुर्चीतून उठणारा बच्चन व थिएटर मधे पडणारी नाणी - ही एक जबरी आठवण आहे.

राहुल - इंग्रजी पिक्चर्स ना तुडुंब गर्दी फारशी पाहिली नाही. एक अपवाद - जुरासिक पार्क. थिएटरला वळसा घालून मागे पार्किंग पर्यंत लाइन असे, अनेक आठवडे.

नटराज - कुर्बानी, बेताब!

नीलायम - कयामत से कयामत तक! तरूण मुलामुलींची इतकी गर्दी क्वचितच पाहिली

अलका - यांचे सिलेक्शन जगात सर्वात अजब होते. एरव्ही इंग्रजी पिक्चर्स लागत. ती गर्दी वेगळी असे. पण मग "दादांचा" पिक्चर आला, की तो इथेच ठाण मांडून बसे अनेक महिने!

विजय - धूमधडाका - आमच्या आठवणीत ब्लॉकबस्टर गर्दी मराठी पिक्चरला पहिल्यांदाच पाहिली होती इथे.

खुन्या मुरलीधराच्या देवळातला पहाटेचा काकडा व दिवसा होणारे अनेक धार्मिक कार्यक्रम मी अनेक्दा ऐकले आहेत. माझ्या आत्याचे घर त्या वाड्यात देवळाच्या अगदी जवळ होते.

तसेच तेथून चिमण्या गणपतीकडे जाणार्‍या रस्त्यावर डावीकडे वळले, की लगेच उजव्या बाजूला एका वाड्यात बहुधा दत्ताचे देउळ होते. तेथे एक जिवंत कासव होते. ते ही पाहायला गेल्याचे लक्षात आहे.

पेशवे पार्क मधला हत्ती की हत्तीण गणपतीच्या मिरवणुकीत वापरत का? असे काहीतरी अंधुक लक्षात आहे.

दक्षिणा - चतु:शृंगी चा परिसर आतापेक्षा कमी गर्दीचा होता पण गावाबाहेर वगैरे वाटले इतका नव्हता. तेव्हाच्या मानाने बराच गजबजलेला होता. फक्त सेनापती बापट रस्त्याच्या अगदी बाजूला फारसे काही नव्हते.

आमच्या घराजवळ सकाळी साडेदहाला भोंगा होत असे. चांगला दणदणीत आवाज होता. तो तेथे अजून होतो का माहीत नाही. तो 'दीप बंगला' नावाच्या एका चौकात कोठेतरी होतो असे ऐकले होते. त्यापेक्षा जास्त माहिती काढावी असे कधी वाटले नाही.

फा, खुन्या मुरलीधर देऊळ आणि वाडा अजूनही तसाच आहे, पाडला नाही, पण आता खर्‍या अर्थाने जीर्ण झालंय बांधकाम. मी आत्ताच १-२ महिन्यांपूर्वी जाऊन आले देवळात. भर उन्हातही शांत वाटलं मात्र! टिपिकल देऊळ फील. मंद तेवणारी समई, मोजकीच फुलं वाहिल्यामुळे पाना-फुलांच्या गर्दीत न हरवलेली प्रसन्न वाटणारी मूर्ती, आणि उदबत्ती-धुपाचा वास. आजूबाजूच्या फरशीमुळे आणि बैठ्या कौलारू घरांमुळे कोकणी देवळाचा भास होणं अपरिहार्य!

आपापल्या आठवणीतलं पुणं कोणत्या सालचं तेही लिहा लोकहो म्हणजे ह्या संकलनाला जरा संदर्भमुल्यही प्राप्त होईल.

डेक्कन जिमखाना पोस्ट ऑफिस पाशी उभे राहिल्यावर डेक्कन जिमखाना क्रिकेट ग्राउण्ड, मागची झाडी, त्यामागे दिसणार्‍या टेकड्या हा व्ह्यू खूप सुंदर दिसत असे. अगदी इग्लंड मधल्या ग्राउण्ड्सइतका भारी असेल असे तेव्हा वाटायचे. आता खुद्द इंग्लंडमधली ग्राउण्ड्स बघून आल्यावर ते खरेच होते हे जाणवते.>> अगदी अगदी. बेस्ट प्लेस इन द वर्ल्ड. मी त्या गवताचा वास घेत घेत किती तरी मॅचेस बघितल्या आहेत.
एकदा खुद्द बेदी आले होते. तर आत जाउन बेदी कुठे आहे असे विचारले. आपण घरी कुठे अहो जाहो करतो तर तिथल्या माणसाने बेदीजी कहिये असे सांगितले. तेव्हा पासोन कधीही ति र्‍हाइताला अरेतुरे केले नाही. तिथे तो एक तास ग्राउंड अ‍ॅक्टिवीटीज. माझी मैत्रेण घेत असे काही दिवस. २०० रु महिना मिळत. ह्या मुलांचे आम्ही गॅदरिग केले होते.

फर्ग्युसन टेकडी (आम्ही तिला हनुमान टेकडी म्हणायचो) वर जे मारूतीचे देऊळ आहे तेथे सकाळी फिरायला, पळायला वगैरे अनेकदा गेलो. सूर्योदयाच्या आधी तेथे गेलो, की मग होणारा सूर्योदय व त्यावेळचे अर्धेअधिक धुक्यातले पुणे खूप सुंदर दिसत असे. आणि बरेचसे पुणे दिसत असे. सदाशिव पेठेत नागनाथ पाराजवळ राहणार्‍या आमच्या एका नातेवाइकांचा वाडा पाडून तेथे अनेकमजली इमारत झाली होती. तिच्या गच्चीवर गेलो, की असेच "बरेच" पुणे दिसायचे. आजूबाजूला उंच इमारती नव्हत्या फारशा. नंतर ते सगळे बदलले.>> हे पण अगदी अगदी.
मला इम्तेहान सिनेमातील रोज शाम आती थी मधली टेकडी म्हणजे हीच असे नेहमी वाट्त असे.

दक्षिणा, सिंहगडच्या बसेस निघायच्या टिळक रोड वरून सारसबागेकडे/पेशवे पार्काकडे येणार्‍या त्या रस्त्यावरच्या मैदानातून. त्याला भिकारदास मारुतीचा बसस्टँड म्हणायचे का बहुतेक?

त्या रस्त्यावर पुढे कॉर्नरवर (सणस मैदानाच्या डायगोनली आपझिट) एक कावेरी का कृष्णा नावाचे उडप्याचे हाटेल आहे. तिथे म्हणे जक्कल-सुतार लोकं बसत असत. म्हणुन ते अनेक वर्षे चालत नव्हते पुढे. या जक्कल सुतार प्रकरणाची बरीच धास्ती पुणेकरांनी घेतली होती असे ऐकले आहे. सुतारची धाकटी बहीण आईची मैत्रीण होती शाळेतली. आई नेहेमी त्यांच्या घरी येत-जात असे व जक्कलला पण बरेचदा बघत असे. तो सुतार असे काही करेल असे वाटले नाही कधी असे आई म्हणे. जोशी-अभ्यंकरांपैकी जे वाचले ते अभ्यंकर आजोबा आमच्या घरी (आजोळी) येत असत. ब्राह्मसूत्रशांकरभाष्य या ग्रंथाचे मुद्रण करायचे होते बहुतेक म्हणुन त्याचे मुद्रित शोधन माझे आजोबा करत होते. त्यासाठी ते अभ्यंकर जवळपास एक-दोन वर्षे रोज दुपारी तास-दोन तास येत.

दीप बंगला म्हणजे पोलीस ग्राऊंडच्या डावीकडच्या (आताच्या हॉटेल श्रावणच्या बोळातून) मधल्या रस्त्याने निघाल्यावर सेनापती बापट रस्त्याशी असलेल्या चौकातला जुना बंगला. मी पर्सिस्टंट च्या भगीरथ ऑफिसला असताना याच रस्त्यानी जायचे. श्रावण हॉटेल ज्या सोसायटीत आहे तिथेच, त्या हॉटेलच्या वरच्या फ्लॅट्मधली, अगदी हॉटेलच्याच वरची खोली माझी होती. रोज रात्री थाळीजेवणाचा मस्त वास यायचा हॉटेलातून!

>>>>> आमच्या घराजवळ सकाळी साडेदहाला भोंगा होत असे. चांगला दणदणीत आवाज होता. तो तेथे अजून होतो का माहीत नाही. <<<<<
हल्ली, म्हणजे गेली पंचवीसेक वर्षे तरी होत नाही अन होत असेल, तर बाकी वाहनांच्या आवाजात ऐकुही जात नसेल, किंवा कुणा आगाऊ पुणेकराने "ध्वनिप्रदुषण नको" म्हणून आडकाठीही आणली असेल.... काय की ! Proud
आईने सांगितलेल्या आठवणींप्रमाणे, तो भोंगा फुलेमंडईच्या घुमटात बसविलेला होता. १९६१ च्या पानशेत पुरानंतर तो बसविण्यात आला, जेणेकरुन परत संकट आले तर भोंगा वाजवुन पूर्वसूचना देता येईल. एरवी रोज साडेदहास (तत्कालिन सरकारी कार्यालयांची सुरु होण्याची वेळ) भोंगा होई.

टण्या, ते कल्पना हॉटेल. तिथेच शेजारी विश्व हॉटेल झालं. मग बरीच वर्षं विश्व-कल्पना अशी जोडी फेमस होती. जक्कल-सुतारांचा अड्डा होता तो, पण तेव्हा बहुतेक 'विश्व' नव्हतं. माझ्या मामाआजोबांनी (ते दै. प्रभातमधे होते) बराच अभ्यास केला होता जोशी-अभ्यंकर हत्याकांडाचा.

अय्या साडेदहाचा भोंगा ?! आनंदाने गिरकी घेणारी बाहुली. लकडी पूल संपला की लक्ष्मि रोड सुरू होताना एक एल आयसीचे ऑफिस असलेली इमारत होती त्याच्या छपरावरही हे भाँग्याचे उपकरण होते. तो भोंगा संपेपरेन्त अगदी ठाय लईत उ करत असे ते ही मी ऐकत असे. हा साडेदहालाच का होत असे?

टण्या, त्या हॉटेलचे नाव विश्व आणि शेजारी कल्पना. अजूनही आहेत.
त्या बसेस सुटतात त्याला सणस पुतळा स्टँड वगैरे काहीतरी नाव असेल. सिंहगडच्या बसेस आधी भिकारदास मारुती पासून सुटायच्या. तो थांबा राणाप्रताप बाग, जादूगार रघुवीर बंगल्यावरून निंबाळकर तालमीकडे जाणार्‍या रस्त्यावर जिज्ञासा महाविद्यालयासमोर आहे.

लिंब्या, त्या पेट्रोमॅक्सच्या बत्त्या वाघाच्या बोळात नसत (एक मोठ्ठी हातभर पोस्ट लिहिलेली वाचली नाहीस का त्या बोळावर). तर त्या बोळाकडून चंदूभाईच्या दुकानाला उजवीकडे ठेवून अप्पा बळवंत चौकाकडे निघालं की डावीकडच्या भडभुंज्याच्या दुकानाच्या शेजारच्या दुकानात असत.
आणि वाघाचे चित्र मोहरमच्या वाघाशी संबंधित होते, संभाजी महाराजांचा त्याच्याशी काडीमात्र संबंध नव्हता. बहुदा चंदूभाईची स्पॉन्सरशिप असणार त्याला. अगदी लहानपणी तिथून मोहरमची मिरवणूक जाताना बघितल्याचंही अंधुक आठवतं आहे (७९ च्या आसपास).

दहाचा भोंगा ९५-९६ पर्यंत ऐकलेला आठवतोय स्पष्टपणे. त्यावेळेस मी बरोब्बर झेड पुलावर असायचे, डेक्कन कॉलेजला जाताना. तो मंडईतून व्हायचा.

फारेण्ड, ते सहस्रबुद्धे वाड्यातलं दत्तमंदिर. तिथे कासव आहे की नाही माहित नाही पण चिमण्या गणपती चौकापाशी जो अक्कलकोट स्वामींचा मठ आहे तिथल्या विहिरीत होतं ते माहित आहे.

पेठी पुण्याची आणखी एक खासियत म्हणजे वाड्यावाड्यातल्या विहिरी. ८०-८५ पर्यंत तिथे जी अपार्टमेंट्स झाली त्यांनी त्या विहिरी तशाच वापरात ठेवल्या, पुढचे माहित नाही. त्यामुळे कितीही पाणीटंचाई असली तरी वापरायला मर्यादित का पाणी या विहिरींमधे कायम असे. अजूनही असेलच. अग्दी तो पर्वती कॅनॉल फुटून आख्ख्या पुण्याचं पाणी जेव्हा बंद झालं होतं (९२च्या आसपास? ) तेव्हाही आम्हाला झळ लागली नव्हती. अडीअडचणीच्या वेळेस प्यायलं तरी चालायचं. पेशवेकालीन पुण्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेच्या त्या विहिरी एक भाग होत्या.. आपण करंटे. ती पाणीपुरवठा व्यवस्था अखंड ठेवून, सामावून घेऊन नवी व्यवस्था आखली नाही. सगळी जुनी व्यवस्था बंद करून टाकली. सगळे पेठांमधले हौद बंद केले....

सणस मैदान. आता ते फक्त खेळाला वापरत असले तरी पूर्वी तिथे अनेक स्टॉल पडायचे. जत्राच जणु. त्यामधे माझ्या मामाचा भेळेचा स्टॉल असायचा. तिथेच एक तंबु सिनेमागृहही असायचे. बर्फाचा गोळा, भेळ, म्हातारीचे केस व हा तंबु हे खास आकर्षण. ते रिंग टाकुन वस्तु जिंकायचे खेळ सुद्धा. याच मधे कुठे तरी तो मौतका कुवा असायचा. अशी धडकी भरायची ते बघताना. त्या तंबु सिनेमात शशीकपुरचे 'नि सुल्तानो रे, प्यार का मौसम आया' गाणे लागले की मी व माझा मामेभाऊ पळत जाउन ते बघायचो. याच मैदानात. द ग्रेट रॉयल सर्कस, जंबो सर्कस, रँबो सर्कस बघणे म्हणजे कमाल आनंददायी गोष्ट. काय एकेक तंबु असायचे. तिथुन जाताना त्या वाघ सिंहाच्या लिदीचा वास व हत्तीच्या पोचा ढिग पण अचंबित करत असे. विदुषकांच्या गमती, सिंहाला काहीही करायला लावणारा तो मास्टर व शेवटच्या झोक्यावरचे खेळ म्हणजे पर्वणीच. हत्तीने मारलेला फुटबॉल आपल्याकडे यावा असे वाटत असताना तो आपल्याला लागेल की काय याची भिती पण असे. त्या झोक्यावर विदुषकाची चड्डी सुटुन तो खाली पडे तेव्हा काळजाचा ठोका चुकत असे. धमाल होती सर्कस म्हणजे. नंतर ते मुक्या प्राणी कायदा वगैरे आला आणी सर्कशीचा धंदा बसला. नदिपात्रातली सर्कस हा तर मला छळ वाटतो.

अमा Happy सही.

दीप बंगला म्हणजे पोलीस ग्राऊंडच्या डावीकडच्या (आताच्या हॉटेल श्रावणच्या बोळातून) मधल्या रस्त्याने निघाल्यावर सेनापती बापट रस्त्याशी असलेल्या चौकातला जुना बंगला. >>> प्रज्ञा, थोडी गडबड आहे. मला दीप बंगला चौक चांगला माहीत आहे. फक्त तो भोंगा तेथे होता का माहीत नाही. दीप बंगला म्हणजे सेनापती बापट रस्त्यापासून बराच दूर आहे. तेथून मॉडेल कॉलनी कडे जाणार्‍या रस्त्यावर "लकाकि" म्हणून जो फोर्क आहे त्याच्या अलिकडचा चौक.

भगीरथ म्हणजे वेताळबाबा चौकाजवळची ती त्या हॉस्पिटलजवळची इमारत का? आमच्या कंपनीच्या बसचा स्टॉप तेथेच होता. पर्सिस्टण्टच्या इमारती त्यांच्या त्या पौराणिक नावांमुळे लक्षात राहात.

(मी धरून) इथले अर्धे माबोकर एकमेकांच्या जवळपासच राहात होते वा वावरत होते असे दिसते Happy

पेठी पुण्याची आणखी एक खासियत म्हणजे वाड्यावाड्यातल्या विहिरी. ८०-८५ पर्यंत तिथे जी अपार्टमेंट्स झाली त्यांनी त्या विहिरी तशाच वापरात ठेवल्या, पुढचे माहित नाही. त्यामुळे कितीही पाणीटंचाई असली तरी वापरायला मर्यादित का पाणी या विहिरींमधे कायम असे. अजूनही असेलच. अग्दी तो पर्वती कॅनॉल फुटून आख्ख्या पुण्याचं पाणी जेव्हा बंद झालं होतं (९२च्या आसपास? ) तेव्हाही आम्हाला झळ लागली नव्हती. अडीअडचणीच्या वेळेस प्यायलं तरी चालायचं. पेशवेकालीन पुण्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेच्या त्या विहिरी एक भाग होत्या.. आपण करंटे. ती पाणीपुरवठा व्यवस्था अखंड ठेवून, सामावून घेऊन नवी व्यवस्था आखली नाही. सगळी जुनी व्यवस्था बंद करून टाकली. सगळे पेठांमधले हौद बंद केले....>> +१०१

मी पण लिहीले आहे त्यावर. आमच्या वाड्यात पण होती एक विहीर. मीच त्यात दोन कासवे व अनेक किसींग गोरामी मासे आणुन सोडले होते. उन्हाळ्यात विहीरीतुन पाण्याची बादली काढणे व तशीच अंगावर घेणे ही मजा अनुभवली आहे. माझा तर दिवसातला तासभर विहीरीवर जात असे. पावसाळ्यात तर हीच विहीर दुथडी भरुन वाहलेली बघीतली आहे. तेव्हा हाताने बादली टाकुन पाणी काढता येत असे. बाकी वेळी रहाट. धमाल होती. शेजारी इमारत बांधली व त्याचे ड्रेनेज जेव्हा या विहीरीला लागले तेव्हा मेली विहिर. आत्ताही त्या आठवणीने पाणावले डोळे.

वरदा - मग तेच देउळ असेल. माझी मेमरी थोडी अंधुक आहे तेव्हाबद्दल.

विहीरींबद्दल टोटली सहमत. ते हौदही तसेच बहुधा. मी लिहीले आहे त्या खरे वाड्यातही विहीर होती. तेथील पाणी सुद्धा वापरत. अजून एक आठवण म्हणजे ज्या घरांच्या परिसरात विहीर असे त्या घरांच्या पुढे "विहीर" असे लिहीलेले असे. ते अग्निशामक दला करता असे की आणखी कशासाठी माहीत नाही.

जुन्या गोष्टींबद्दल आपल्याकडे "आपले सगळे भारी होते" किंवा "सगळ्या कल्पनारम्य गप्पा" या दोन टोकाच्या मधे फारसे काही दिसत नाही Happy

हो तो भोंगा कुठला ते अत्ता कळलं वरच्या पोस्टी वाचून. आणि दीप बंगलाही बरोबर. माझंच कंन्फ्युजन झालं. लकाकि रोड वगैरे.. आता आठवलं.

>>>टण्या, त्या हॉटेलचे नाव विश्व आणि शेजारी कल्पना. अजूनही आहेत.

विश्वची माझी चांगली आठवण आहे. मला विश्वचा साबुदाणा वडा भयंकर आवडायचा. अजूनही साबुदाणा वडा म्हंटलं की विश्व आणि तिथे बसून खाल्लेले अनेक वडे आठवतात. तसे लहानपणीचे खायचे दिवस आलेच नाहीत परत. Sad

तुळशीबागेत राममंदिर आहे. तिथे भांड्यांची दुकानं आहेत. आणि बाहेर लहान मुलांची भातुकली पण विकायला असते. अजूनही असते.
आणि हल्लीच्या त्या रंगीत, हलक्या कुचकामी प्लॅस्टिकच्या भातुकली बरोबर तिथे अभिजात पितळी भातुकली मिळते. मी लहान असताना जायचे तिथे आणि आत्ता सुद्धा माझ्या मुलाला घेऊन द्यायला गेले. तो परिसर मात्र बदलल्यासारखा वाटत नाही. अजूनही भातुकली महागडी वाटते, विकणारे तितकेच खडूस असतात पण भातुकली सोडवत नाही.

The bungalow was originally called Pradeep. PRA fell off later and Deep remained. Shanta Hubalikar had built it and named after her son. She had to sell it off later.

>>>> पेठी पुण्याची आणखी एक खासियत म्हणजे वाड्यावाड्यातल्या विहिरी. <<<<< हो, आमच्या पाटलांच्या (पाटील एस्टेटवाल्या) भास्करभुवनमध्येही विहिर होति. एकेकाळी म्हणे त्या विहिरीचे पाणी औषधी म्हणुन प्यायले जायचे. नंतर तोंडात घेणेही निषिद्ध झाले.

>>>> अजून एक आठवण म्हणजे ज्या घरांच्या परिसरात विहीर असे त्या घरांच्या पुढे "विहीर" असे लिहीलेले असे. ते अग्निशामक दला करता असे की आणखी कशासाठी माहीत नाही. <<<<

तर पानशेत पुरानंतर, ज्या वाड्यात/चाळीमध्ये विहीर आहे तिथे बाहेरील बाजुस "विहीर" असे लिहिण्याची सक्ति झाली होती. पुन्हा कधी पाणीटंचाई निर्माण झाली तर विहीरी कुठे आहेत याचा शोध घेत बसावे लागू नये म्हणून ही सक्ति. व तेथिल पाणी तेवढ्याकाळापुरते मग सार्वजनिक अशी काहीतरी योजना होती.

फा, खुन्या मुरलीधरापाशी आता तो प्रसिद्ध सदाशिव ९ प्रोजेक्ट होऊ घातलाय, पण मंदिर अजून आहे. टिमविसमोर साठेआजींकडे पीजी रहायचो आम्ही. अगदी तोळामासा तब्येत, गो-याघा-या आणि एकदम कडक, ताठ होत्या. ९४ साली ऐश्वर्या मिस वर्ल्ड झाली तो कार्यक्रम आजींकडं बसून बघितला होता. त्याच वर्षी 'बॉम्बे' प्रदर्शित झाला होता, तेव्हा टेपरेकॉर्डवर सतत तीच गाणी वाजवायचो आणि भिंतीवर पोरींनी अरविंदची पोस्टर्स लावली होती. आता तळमजल्यावर गनमार्क आर्मरी दुकान आहे.
निंबाळकर तालीम चौकात वंदनचे समोसे मस्त मिळायचे. सुजाताची मस्तानी अगदी क्वचित खाल्ली (कारण परवडायची नाही), त्याच चौकात रंगोली बेकरीतून खाऊ, आजारपण आलं तर रंगोलीच्या वर वैद्य गाडगीळांकडे तपासायला, औषधं घ्यायला नागनाथ पाराच्या बाजूला वाडदेकरांकडे. सगळ्या मुलींच्या घरच्यांचे फोन्स रजनीगंधा किराणा दुकानात यायचे. मूड आला की शनिपार चौकात कांताबेनच्या मागच्या अंबिकात जाऊन चहा प्यायचो. वरदा म्हणतेय तसं, तिथे बहुतेक सगळ्या इमारतींमध्ये आपापल्या विहिरी होत्या.
आणि बरोबर, औंधपासून वि चौक अंतर खूपच जास्त होतं, तंगडतोड. ते अंतर आजही लांबच आहे. पण एकतर खूप लहान होतो, भेळेचं, कारंज्याचं आकर्षण आणि गदमदलेल्या दिवसानंतर उन्हाळ्यातल्या संध्याकाळी वारं खात उड्या मारत चढ चढत जायला बरं वाटायचं. आजोबा गप्पिष्ट होते, नेत असतील काहीतरी गंमतीजमती सांगत. शेअर रिक्षा वगैरे प्रकाराचा तेव्हा मागमूस नव्हताच. अधेमधे बस घेत असू का वगैरे ठार आठवत नाही.

केपी, केळकर संग्रहालयाच्या पुढच्या गल्लीतले खाडीलकर दूधवाले पण माहिती असतील तुला. म्हशी, गायींचा प्रचंड पसारा होता त्यांचा. त्यांच्यासुद्धा वाड्यात भलीमोठी विहीर होती.

९०च्या आसपास मनपाहून तळेगावला जायलासुद्धा डबलडेकर होती. आणि कधी कधी ड्रायव्हरची केबीन वेगळी असलेल्या डबल डेकरमधून पण गेलेलं आठवतंय. हे बसचं तोंड वेगळं झालं तर काय होईल ह्या भितीनं पाकपूक व्हायचं. लोकलनं तळेगावला जाताना मध्ये बेगडेवाडीला उतरून पलिकडे (आताच्या जुन्या) पुणे मुंबई हायवेवरच्या अमरजा देवीच्या मंदिरात आणि त्यामागच्या कमान आणि पाय-या असलेल्या डोंगरावर जायचो. आत्या तळेगावला भंडारी हॉस्पिटलपाशी रहायची. मग घरी परतायला दोन पर्याय असायचे. बस पकडून इगल फ्लास्कच्या फॅक्टरीकडून हायवेने जायचे, नाहीतर घोरावाडीकडून मधून चालत. हायवे आणि अमरजा देवीचं मंदिरही तसं उंचावर होतं तेव्हा, तिकडून समोरचा प्रचंड मोठा रिकामा परिसर आणि त्यातून लांबून येणारी, समोरून कितीतरी वेळ जात रहाणारी नागमोडी लोकल किंवा इतरवी ट्रेन्स दिसत रहायच्या.

९४-९५ च्या सालाच्या आसपास टिस्माशेजारी चौकात बादशाहीच्या समोर मुक्ता नावाचं उपाहार गृह होतं, आठवतंय का कुणाला? अप्रतिम साबुदाणा वडा आणि कॉफी मिळायची. एके दिवशी ते अचानकच बंद झालं. त्याच सुमारास डेक्कनला गरवारे ओव्हरब्रिजच्या गोल कोप-यात माला रेस्टॉरंट होतं, आम्ही तिथे पण नेहमी जायचो. आर डी बर्मन गेले त्यादिवशी ती बातमी आम्हाला मालामध्ये मिळाली होती.

अप्पा बळवंत चौकाच्या आसपास अनेक बँडवाल्यांची दुकाने / ऑफीसेस होती. बरेचदा नवख्या कलाकारांचा रियाझ देखिल तिकडेच चालत असे. डोक्यावरून वाहून नेण्यात येणारे पेट्रोमॅक्सचे दिवे ही ह्यांच्याचकडे / आसपास मिळायचे. तसेच एक भाड्याने ड्रेपरी मिळायचे ठिकाण मॅक ड्रेप का असं काहीतरी नाव असणारे त्यांचे ऑफीस पहिल्या मजल्यावर होते / उभ्यागजांच्या खिडकीबाहेर टांगलेला एक मुखवटा असलेली जागा म्हणजे त्यांची कचेरी (बहुतेक).

जमिनीखाली जरा खोदले की पाणी लागण्याचे प्रमाण गावात सगळीकडेच होते / आहे. प्रभात टॉकिजपाशी असलेल्या एका वाड्याचे पाडून नवीन
कराय्ची इक्मारत / बांधकाम नकाशानुसार दोन तळघरे (बेसमेंट) असलेले होते ते असेच पाणी लागल्याने जमिनीखाली एकच मजला (बेस्मेंट) असे बांधावे लागले असे बोलले जायचे.

प्रभात टॉकिजच्या बांधकामाच्या वेळी देखिल तिकडे असेच खूप पाणी लागले आणि त्यामुळे पाया टिकेना अशी काहीतरी अडचण उत्पन्न झाली असता माझ्या एका वर्गमैत्रिणीच्या (बॉम्बे प्रेसिडन्सीच्या काळात मुंबई पुण्याकडे प्रवेश न मिळाल्याने कराचीला सिविल ओवर्सियर चा कोर्स करून आलेले) पणजोबांनी त्यांचे ज्ञान आणि अनुभवपणाला लावून ती दूर केली आणि त्यांनी सुचवलेल्या तोडग्यानुसार काम केल्यावर ते बांधकाम पुर्ण होऊ शकले अशी एक आठवण तिच्याकडून ऐकली होती.

(शिवाजी नगर / डेक्कन वगैरे ) नदीपलीकड्च्या लोकांच्या तोंडी पुण्यामधल्या पेठांमधे जायचे असल्यास 'गावात' जाऊन येतो अशी भाषा असायची. हिंगणे / कर्वेनगर कडच्या लोकांच्या तोंडी तर पुण्याला जावून येतो अशी भाषाही ऐकली आहे.

सई तुझ्याही आठवणी मस्त आहेत.

'रजनीगंधा' नावाचेच बहुतेक कस्टम मधल्या / इंपोर्टेड मालाचे दुकान एस्पी च्या मागच्या बाजूस अस्लेल्या चौकाजवळ आणि तसंच एक कर्वे रस्त्यावरपण होतं बहुतेक.
त्या दुकानांमधल्या मालाची क्रेझ होती.

हर्पेनजी, मस्तं लिहीताय.
पुण्यात जाणे येणे होत असले तरी इतक्या तपशीलवार आठवणी नाहीत. मोठ्यांचे ही जाणे येणे फारतर अब चौक, रविवार पेठ मंडई एव्हढेच. त्यामुळे कोथरूडचे पेरू वगैरे नवलाईची माहिती वाटली.
आमच्या भागातले लोक प्मायबोलीवर नाहीत का ?

गुंजन समोरच्या जेलरोडवर पूर्वी एक भूतबंगला होता ना ? आता तिथेच मनोरुग्णालय (विस्तारीत कक्ष ) आहे कि ओम प्रसूती गृह च्या जागी होते ते?

सई हो आठवतोय तो गोठा Happy

९४-९५ च्या सालाच्या आसपास टिस्माशेजारी चौकात बादशाहीच्या समोर मुक्ता नावाचं उपाहार गृह होतं, आठवतंय का कुणाला? अप्रतिम साबुदाणा वडा आणि कॉफी मिळायची. एके दिवशी ते अचानकच बंद झालं.>> आठवते आहे की. ते वाडेश्वर वाल्यांचेच. बाजीराव रोड वाडेश्वर, मुक्ता, विद्यापिठातले कँटीन एकाच मालकाचे. विद्यापिठातले कँटीन बहूतेक रायाकाका पटवर्धन (प्रसन्न ट्राव्हल्स) भागीदारीत होते.

मुक्तामधे वाडेश्वरची चटणी तयार होत असे. तिथे एक कॉफी घेऊन २ तास बसणारी युगुले वाढल्यावर बहूतेक त्यांनी बंद केले.

वाडेश्वर ब्रँड बनण्या अगोदरचे वाडेश्वर बाजीराव रोडला नातुबाग गणपती पाशी जे आहे ते. तिथे एक चहावाला होता. एका पत्र्याच्या शेडमधे तो चहा व उत्तम उडीद वडा विकत असे. बाहेर वाडेश्वर वाले सकाळी इडली व डोसा, संध्याकाळी इडली व उत्तप्पा व ८ नंतर पराठा भाजी व पुलाव विकत असत. पराठा भाजी नंतर चालु केले. मी तिथे ६० पैशात इडली व ८० पैशात डोसा खाल्लेला आहे. Happy मधे ती पत्र्याची शेड जाऊन समोर गोखले मांडववाल्यांच्या आवारात पण काही दिवस स्थलांतर केले व नंतर उडीद वडा बंद झाला. बाकी ही वेळेची परंपरा अजुन चालु आहे.

कल्पना व विश्व ही दोन्ही साऊथ इंडीयन हाटेलं चांगलीच फेमस होती. कल्पना भेळसुद्धा. जक्कल सुतार प्रकरणा मधे त्यांची नावे झाली. बहूतेक ७७ च्या सुमारास. विश्वच्या मालकाच्या मुलालाच त्यांनी मारुन सारसबागेच्या तळ्यात पिंपाला बांधुन टाकले होते. मी खूपच लहान होतो. मला आठवतंय तेव्हा पुण्यात कर्फ्यु लागला होता. आमच्या वाड्याचे दार बंद करुन घेत होते. बाहेर गस्त असायची पोलीसांची. हे सगळे लोक खुन झाल्यावर पोलीस स्टेशन मधे जाऊन लागला का तपास असे विचारत असत. प्रचंड दहशत होती पुण्यात.

अलका च्या समोर दोन हॉटेल होती ती पण आता बंद पडायच्या मार्गावर आहेत. तिथे काकडी घातलेली भेळ फार मस्त मिळत असे. (नाव नेमके आठवत नाहीये)

'रजनीगंधा' नावाचेच बहुतेक कस्टम मधल्या / इंपोर्टेड मालाचे दुकान एस्पी च्या मागच्या बाजूस अस्लेल्या चौकाजवळ आणि तसंच एक कर्वे रस्त्यावरपण होतं बहुतेक. त्या दुकानांमधल्या मालाची क्रेझ होती.>> अगदी अगदी. त्यात एक शर्टचे कापड मिळायचे ते फार कौतुकाचे होते. (नाव आठवले की लिहीतो) Happy

एक शर्टचे कापड मिळायचे >> मर्स राइज्ड कॉटन? टुब्रोनाइज्ड? ही दोन नावे आली समोर. बाप्यांचे एव्ढे माहीत नाही पन ६४४ इंपोर्टॅ ड शिफॉनच्या साड्या लै भारी होत्या. आमच्या शेजारणी कडे एक होती अस्सल मॉव कलर जगात भारी. प्लेन येत व त्यावर मशीन एंब्रॉडरी करून मिळे, कटवर्क इत्यादि. मी तसलीच एक्झॅक्ट आंब्याच्या रंगाची साडी ( आणि दोन वेण्या) साखरपुड्याला नेसले होते. भागवत बिल्डिंगच्या गच्चीवर साखर पुडा. व पन्हे, खोबर्‍याची बर्फी सर्वांना. नॉट मच शो शा. आता कसे हॉल घेउन वगैरे करतात.

>>> वाडेश्वर ब्रँड बनण्या अगोदरचे वाडेश्वर बाजीराव रोडला नातुबाग गणपती पाशी <<< हो, अप्रतिम इडली असायची. किंबहुना मी तर म्हणेन की जसे जोशीवडेवाल्यांनी, बालगंधर्व पुलाच्या टोकासमोर वडापावसेंटर टा़कुन तत्कालिक पुणेकरांना भुकेला "वडापावची" सवय लावली, तसेच, पुणेकरांना "इडली/उतप्पा/उडीदवडा" याची घाऊक ओळख या वाडेश्वरनेच करुन दिली . मी केळकर म्युझियममध्ये १९८० ला कामाला होतो, तेव्हा बरेचदा तिथुन इडली घेऊन येऊन आम्हा वर्कर्सची पार्टी करायचो. Happy
कान्द्या, भिकारदासमारुती कडून कुमठेकर रोडकडे जाताना, डाव्या हाताला एक भलीथोरली निळ्या रंगाची सुंदर बस (आत्ताच्या व्हाल्वो बससारखी) उभी असायची, (१९७५-८५) ती आठवते का? तेव्हा आत्तासारखे ट्रॅव्हल्सच्या बसेस चा सुळसुळाट तर नव्हताच, पण ती बस तिच्या बांधणीवरुन इंपोर्टेड असावी असे वाटायचे कारण तशी बस त्याकाळी अन्यत्र कुठेच बघायला मिळत नव्हती. अगदी एशियाडही तोवर यायच्या होत्या. त्याबस बद्दलचे कुतुहल शमलेच नाही की ती कुणाची काय धंदा/की अशीच हौस.
तिथेच शेजारी तेव्हा "कपडे रंगवुन द्यायचे" दुकान होते. तेव्हा साडी वगैरे कपडे रंगवुन घेण्याची क्रेझही होती.

अलका समोर एक 'दरबार' होते ना? मलाही नाव आठवत नाही. एक टीपिकल इराणी पण होते चौकात त्यात.

आम्हीही 'गावात' च म्हणायचो लक्ष्मी रोड वगैरे एरियात जायचे असेल तर. शिवाजीनगरला ही रेल्वे स्टेशन असले तरी 'स्टेशन' जवळ म्हणजे पुणे स्टेशनजवळ असेच म्हंटले जायचे. तसेच नंतर कितीही पूल बनले, तरी कॉर्पोरेशन जवळचा पूल हा 'नवा' च राहिला.

'डेक्कन' शब्दाचा नक्की अर्थ काय याचा मला बरीच वर्षे सस्पेन्स होता. शाळेत तेव्हा डेक्कन प्लॅटो वगैरे शब्द भूगोल इंग्रजीत नसल्याने माहीत नव्हते. मग समजले की दख्खन (दक्षिण) चा अपभ्रंश आहे तो. तसेच कोकणात उतरायला थळ घाट व बोर घाट हे दोन घाट भूगोलात वाचले होते. त्यातला बोर घाट म्हणजे खंडाळ्याचा हे माहीत होते. पण थळ घाट म्हणजे नक्की कोणता ते माहीत नव्हते. बहुधा कसार्‍याचा असेल.

Pages