आठवणीतलं पुणं

Submitted by चिनूक्स on 27 March, 2017 - 03:17

गेले काही दिवस अमा, लिंबूटिंबू, केपी, विक्रमसिंह, पूनम, वरदा, आशूडी, गजानन, हिम्सकूल हे 'पुण्यातले पुणेकर' या धाग्यावर जुन्या पुण्याबद्दल लिहीत होते / आहेत. या आठवणी अतिशय रंजक आहेत.

जुन्या पुण्याच्या या आठवणी एकत्र वाचता याव्या, म्हणून हा धागा.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Kharyaanche te famous aushadh mihi ghetlay. Happy
Te ghetlech pahije asa payanda v paramparaavh hoti. Happy

पशुपत, तुमचे तेथिल बालपण कोणत्या सालांमधिल?
शिंदेआळी गणेशोत्सवाचे संपुर्ण डेकोरेशनचे काम मी १९८० ते ८३ असे चार वर्षे केले होते.
हर्पेन, हो, पंतसचिववाड्याचा वापर केळ्यांच्या गोदामा सारखा व्हायचा. भास्करभुवनच्या गॅलरीतुन वरुन, मी कित्येकदा ते आलेले आख्खे ट्रक भर केळी कशी उतरवुन वाहुन नेतात ते बघत बसायचो.

तंतोतंत तसच होतं (ह्यातली वेदना समजावून घे)>> Lol

पशुपत भारीच.

हर्पेन बरोबर. संगम साडीसेंटर कडुन समोर चालत गेले की जिथे नाक टेकते त्याच वाड्यात होत्या\आहेत केळ्याच्या वखारी. पंत सचिव पिछाडी. तो पंत सचिवांचा वाडा.

पूना कंपनी नावाचे फारुख धोंडी यांचे पुस्तक मी खूप वर्षांपूर्वी वाचले होते. त्यात कॅम्प आणि त्या भागातील काही सुंदर आठवणी आहेत.
ते पुस्तक वाचताना मी ज्या काळी जन्माला देखील आले नव्हते त्या काळाबद्दल सुद्धा मला नॉस्टॅलजिया झाला. असेच पुण्याचे मस्त वर्णन व्यक्ती आणि वल्ली मधल्या नंदा प्रधान मध्ये आहे. नंदाच्या मैत्रिणीचा सदाशिव पेठ ते कॅम्पचा प्रवास पुलंनी इतका हळुवार लिहिला आहे की आपल्या आयुष्यात पण अशी लव्ह स्टोरी असावी असं ते वाचताना सारखं वाटत राहतं.

मी ज्या काळी जन्माला देखील आले नव्हते त्या काळाबद्दल सुद्धा मला नॉस्टॅलजिया झाला. >>> Happy
हो सई, मलाही होतं असं
'पुस्तकांमधलं पुणं' असा अजून एक वेगळा धागा काढावा लागेल इतक्या नानाविध पुस्तकांमधून पुण्याविषयी वर्णने वाचायला मिळतात.

हर्षद, एक धागा पुस्तकांमधून दिसणा-या मुंबईतल्या वाड्यांवर (वाडी ह्या अर्थाने - खेतवाडी, झावबाची वाडी वगैरे ) काढायला पाहिजे कुणीतरी. दादर-गिरगाव भागातल्या वर्णनांमध्ये खुप वाड्या येतात.

विषयांतराबद्दल क्षमस्व _/\_

लिम्बुटिम्बू , मी १९६७ ते १९७३ या काळात तिथे रहात होतो.
कान्दपोहे , शिन्दे आळीच्या तोन्डाशीच एका बिल्डिन्ग मधे केळ्याची व़हार होती. त्याच बिल्डिन्ग मधे माझा अत्रे नावाचा मित्र रहायचा त्यामुळे ती बन्द खोलीतली केळी जाता येताना दिसायची आणे एक ऊग्र दर्प तिथे पसरलेला असायचा.
सुमुक्ता ; बरिस्ता अजून आहे , आणि आतल्या कॉर्नरवर्चे महानाझ मला वाटते आता बन्द झाले.
तसेच तिथेच जवळ मोना फूड्स पण प्रसिद्ध होते.

इंदू वेलणकर! मला नाव आठवत नव्हतं.

पण पुण्यातल्या काही भागांमधली उन्हाळी दुपार मला फार आवडते. खासकरून जिथे रस्त्याच्या दुतर्फा गुलमोहर, बहावा, जॅकरांडा अशी झाडे असतात. कितीही प्रदूषित असलं आणि ट्राफिकने हैराण करणारं असलं तरीही ३-४ च्या दरम्यान जर अशा रस्त्यांवर गेलं तर पुन्हा तो पूर्वीचा फील येतो. नजर जाईपर्यंत लांबच लांब सांडलेली रंगीत फुलं, त्यातून मधेच सायकलवरून चाललेले एखादे आजोबा, एखादा आईस्क्रीमवाला, अधून मधून येणारे पक्षांचे आवाज आणि बॅकग्राऊंडला सगळे विश्रांती घेतायत याची चाहूल. फार मस्त वाटतं. मी मुद्दाम उन्हाळ्यात अशा वेळी कोरेगाव पार्क, कॅम्प, गोखले इन्स्टिट्यूटचा रास्ता अशा ठिकाणी जाते.

क्लासला जायचे रस्ते: १
पहिला सर्वात जवळचा. भागवत बिल्डिंग ते विमला बाई गरवारे शाळा. चौथीतून पाचवीत गेलो अ‍ॅडमिशन झाली. मग कळले की ह्या मोठ्या शाळेत छंद्वर्ग भरतात. त्याला आपण सुट्टीत जाउ शकतो. तर चौकशी करून फी भरून नाव घातले. इंग्रजी आणि हस्तकला. वा भा जोशी सरांचा इंग्रजीचा क्लास. माझं ह्या सरांबरोबर एक मेंटल कनेक्षन होतं जसं पुढे जाउन मेधा जोशी बाईंबरोबर होतं भाषेचं प्रेम हा समान धागा.
घरातून निघायचं लेफ्ट घेउन थोडं चालून वृंदावनच्या समोर रस्ता क्रॉस करायचा. मग मनात आलं तर परत एकदा प्रभात रोड क्रॉस करून सरळ जाउन कर्वेरोडच्या गेटने आत जायचं. आता कर्वेरोड वरून शाळेच्या इमारतीत उजवीकडे रस्त्याच्या कडेला जे वर्ग दिसतात पहिल्या मजल्याव्र तिथेच हे छंद वर्ग असत. ७४-७५ चे दिवस. तर मग थिटे सरांचा क्राफ्ट चा क्लास. त्यासाठी खूप मजेचे मटेरिअल मिळायचे. टिकल्या, जरतारी पेपर, क्रेप पेपर, रॅपिन्ग पेपरची हिरवी सुरळी,तारा मणी अन काय काय. क्रेप पेपरची गुलाबी व डार्क ग्रे देठ असलेली फुले बनवायला शिकलो. मग बांबूच्या बॅक्ग्राउंड वर मोर!!! आता चूक भूल मालिकेत आहे एका भिंतीवर टांगलेला तसा. तसलेच एक भिंतीवर टांगायचे
शोभेचे कायतरी. तीन कार्ड्बोर्डाचे तुकडे त्यवर लेस मिरर काड्या यथाशक्ती लावून ते शोभेचे कायते बनवायचे. मध्ये एका नाडीला चिकटवायचे. व एक लूप. जो खिळ्यावर टांगायचा. एकदम नोब्रेनर. थिटे सरांची शिकवण्याची पद्धत विशिष्ट होती. मॅथ्स, सायन्स वाल्या शिक्षकांपेक्षा ते अ‍ॅप्रोचेबल वाटत. मग क्लास झाल्याव्र रिकाम्या शाळेत एक चक्कर मारून प्रभात रोडच्या दाराने बाहेर. निवांत बागडत बागडत जेवायला घरी. ओरिगामी शिकलो. कधी कलरिंग पेंटिंग. सहावीत गेल्यावर जो वर्ग होता त्यात एक फडताळ होते. ते बंद असायचे पण त्यात आत कोणीतरी पूर्वी करून ठेवलेले एक दुमजली नीट्नेटके चार्ट पेपरचे घर होते. क्रीम कलरचा पेपर व वर लाल स्केचपेन ने सजावट. कौले खिडक्या इत्यादि. कुलूप लावलेल्या फडताळाच्या दारांशी झगडून ते आतले घर मिळविण्याची खूप धड्पड असे तिथे बसणार्‍या मुलींची पण ते घर बेटे आतच मिजाशीत बसलेले. आता मला ही खूप वैश्विक मेटॅफर वाट्ते.

ह्या आधीच्या काळात नवीन मराठी शाळेत मातीकामाचा असा एक वर्ग होता. प्रचंड फर्स्ट्क्लास सावलीत तो वर्ग पण नैसर्गिक रीत्या गार असे. व मातीचे खोडरबर बनवण्यापलिकडे प्रगती नव्हती. पण हात मातवून घ्यायला मजा यायची.

>>>> मी १९६७ ते १९७३ या काळात तिथे रहात होतो <<<<
मी जवळपास १९६५ ते १९८५ पर्यंत भास्करभुवन मध्ये रहात होतो (अपवाद अधलीमधली वर्षे सोडता).
प्राथमिक शिक्षण शिंदे आळितुन पायी पायी जात आदर्श विद्यालयात झाले. (डिक्शनरीवाले वीरकर सर हायस्कुलचे मुख्याध्यापक होते, धोतर सदरा हा पेहराव, तर आमच्या प्राथमिकच्या मुख्याध्यापिका करमरकर बाई, नऊवारीत, बर्‍याचशा माझ्या आजीसारख्याच दिसायच्या, तितक्याच कडकही, त्यामुळे कधी भिती अशी वाटली नाही Wink म्हणजे सोबतची इतर बालके म्हणायची की त्यांना घाबरत जा, पण मी नाही घाबरायचो.... आपल्या आज्जीसारखीच तर आहे, त्यांना काय घाबरायचे? Proud )

आपल्या आज्जीसारखीच तर आहे, >> कि ती गोड. नवीन मराठीच्या हेड मिस्ट्रेस श्रीमति. लीला गोखले मॅडम. ह्यांचे शाळेच्या आउट गेट समोरच आतच एक घर होते. दोन का तीन खोल्यांचे बैठे घर. पण अतिशय नीट नेटके व सजवलेले असे. संसारी घरांपेक्षा हे वेगळे होते. बाहेर एक छोटा सिट आउट. क्रोशाचे वर्क केलेले रुमाल टेबलांवर, पेपर मासिके इत्यादि. आमच्या घरच्यांची काही ओळख होती म्हणून त्या मला बघत असत. मी एकदा स्कूल बसची वाट बघताना बस आल्यावर जोरात बस समोर उडी मारली होती. तेव्हा लै बोलणी खाल्ली लीलाताईंची.
आता गोड वाट्ते. रडवेले मूल आणि ओरडणारी व्हाइट साडी आंबाडा वाली टीचर. शाळेत स्वच्छ मलमलचा सदरा व धोतर, तसेच काळे करकर वाजणारे बूट घालून काळे सर येत. ज्यांना सर्व भीत असत. शाळेत सर्वत्र पायाखाली गार ओली वाळू, मग ह्या वर्गातून त्या वर्गात जायचे, उन्हाळासुरू व्हायच्या बेताला परीक्षा. ह्या शाळेच्या मागच्या पटांगणावर सायकल शिकलो.

नवीन मराठी शाळेत मातीकामाचा असा एक वर्ग होता. प्रचंड फर्स्ट्क्लास सावलीत तो वर्ग पण नैसर्गिक रीत्या गार असे. > हो . फार मस्त दिवस होते ते! मातीकामाचा वर्ग, शिवणकामाचा पण एक होता, तो फक्त ४थी साठी. शाळेची एक बाग पण होती. बागकामाचा प्ण तास असायचा बहुतेक. आणि शाळेच्या शेवटच्या वर्षी (४थीत) एक दिवस शाळेतुन बागेतली भाजी घरी मिळाली होती. त्या बागेजवळ ससे पण होते.

लिम्बू ; माझे काही कॉलेज मधले मित्र भास्कर भुवन मधले आहेत त्यामुळे तिथे १९८१ - ८५ मधे नेहमी येत जात होतो. सुन्दर गच्ची आहे भास्कर भुवन ला.
अमा , मी विमलाबाई शाळेत सुट्टीतल्या छन्द्वर्गात बॅडमिन्टन खेळायला जात असे (१९७८-८० मधे). शेवडे नावाचे सर शिकवत आम्हाला.

त्या काळात (१९७०-८०) सुट्टीत वाड्यान्मधे टिपिकल खेळ चालायचे. दुपारच्या उन्हाच्या वेळेत पत्ते ( बदाम सात , झब्बू , ३०४ , लॅडीज) आणि कॅरम खेळायचे आणि सन्ध्याकाळी उन्हे उतरल्यावर लपन्डाव ( ज्याची विविध वर्जन्स होती : इस्टॉप-पार्टी , डबा ऐस्पैस वगैरे) , भस्मासूर ( काही उच्चभ्रू वाड्यात हाच खेळ विश - अम्रुत या नावाने प्रचलीत होता.)
लपन्डाव खेळताना आम्ही शर्ट एकमेकात बदलत असू त्यामुळे ज्याच्यावर राज्य असे तो भलत्याच नावाने मुलाना "इस्टॉप" करायचा ... मग तो मुलगा "अन्ड" असे म्हणत बाहेर यायचा. ह्या "अन्ड" आणि "इस्टॉप" ; "धपार्टी" ह्या वोकॅब्युलारी चा उगम आणि त्यामागचे लॉजिक अजूनही सापडलेले नाही.
क्रिकेट ला फार डिमान्ड नसायची.

दुपारच्या उन्हाच्या वेळेत पत्ते ( बदाम सात , झब्बू , ३०४ , लॅडीज) आणि कॅरम खेळायचे आणि सन्ध्याकाळी उन्हे उतरल्यावर लपन्डाव ( ज्याची विविध वर्जन्स होती : इस्टॉप-पार्टी , डबा ऐस्पैस वगैरे) , भस्मासूर ( काही उच्चभ्रू वाड्यात हाच खेळ विश - अम्रुत या नावाने प्रचलीत होता.)
लपन्डाव खेळताना आम्ही शर्ट एकमेकात बदलत असू त्यामुळे ज्याच्यावर राज्य असे तो भलत्याच नावाने मुलाना "इस्टॉप" करायचा ... मग तो मुलगा "अन्ड" असे म्हणत बाहेर यायचा. ह्या "अन्ड" आणि "इस्टॉप" ; "धपार्टी" ह्या वोकॅब्युलारी चा उगम आणि त्यामागचे लॉजिक अजूनही सापडलेले नाही.
क्रिकेट ला फार डिमान्ड नसायची. >+++१११११११११ शर्ट बदलायचा आणि मुद्दाम दिसेल असा थोडा बाहेर ठेवायचा. अजून एक श्ब्द म्हणजे टॅम्प्लिज Happy ते पण थुंकी लावून Happy आम्ही 'धप्पा' म्हणत असू. आणि राज्यासाठी 'चकायचे' जास्तीची 'मेजॉल्टी' कमीची 'मेजॉल्टी' असे तारसप्तकात ओरडून.

>>>म्हणजे टॅम्प्लिज Happy ते पण थुंकी लावून Happy आम्ही 'धप्पा' म्हणत असू. आणि राज्यासाठी 'चकायचे' जास्तीची 'मेजॉल्टी' कमीची 'मेजॉल्टी' असे तारसप्तकात ओरडून.

हा हा! सेम! लंपन आपण बहुतेक एकाच वयाचे आहोत. Happy

त्या काळी पुण्यात हाकामारी पण अली होती. सगळे दरवाज्यांवर फुल्या मारून ठेवायचे. काही होतं ते! मला खूप भीती वाटायची हाकामारीची.

त्या काळी पुण्यात हाकामारी पण अली होती. सगळे दरवाज्यांवर फुल्या मारून ठेवायचे. काही होतं ते! मला खूप भीती वाटायची हाकामारीची. >> हो हाकामारी जी हाक मारे रात्री पण तिला उत्तर नाही द्यायचे. आम्ही आम्च्या वाड्याच्या दरवाज्यावर ३ फुल्या मारल्या होत्या. आणि वर 'जय श्रीराम' असे लिहिले होते . Happy

>>>> माझे काही कॉलेज मधले मित्र भास्कर भुवन मधले आहेत त्यामुळे तिथे १९८१ - ८५ मधे नेहमी येत जात होतो. <<<
कुणाकडे? शिरवळकर? खरे? काकतकर? फडके? आपटे? रानडे? इनामदार? केळकर?
मैत्रीणी म्हणत असाल, तर आगाशे?

गच्ची चांगली होती म्हणताय म्हणजे, तुम्ही आमच्या समोरील बिल्डीम्ग मधे येत असणार. आत शिरताना बोगदा वजा कॅरिडॉर ज्या बिल्डिंगचा होता, त्या बिल्डिंग मध्ये आम्ही रहायचो

इस्टॉप" ; "धपार्टी>> आम्ही पण आम्हीपण. धपांडी इस्टाप हे आमचे व्हर्जन होते. शिवाय विषामृत, खांब खांब खांबोळी, जमीन पाणी, भोर्‍याचे दुकान साडे आठाला रात्री बंद झाले तिथल्या पटांगणात खेळायचो. तिथे मोठी खेळायला होईल अशी जागा व मग पुढे फूट पाथ व रस्ता त्याच्यापुढे. ज्या भाजिवाल्या बसायच्या त्यांची मुले पण आमच्या बरोबर खेळत. सुट्टीत क्यारम सुद्धा. बराच वेळ. हाड्क्यांनी एक अमिताभ नामक लांब लचक पायांचे कुत्रे पाळले होते. पांढरे व काळ्या ठिपक्यांचे. ते आजूबाजूला उंडारायचे. व एकद फुल्ल कॅरम बोर्डावरच उभे राहिले. आमचा गेम तेवढा वेळ. बंद. पांचाळेश्वराअच्या देवळासमोर ते पटांगण होते तिथे ही पळापळीचे खेळ पार अंधार होईपरेन्त चालायचे. शिवाय बांधकामाची वाळू यायची त्यात पाय घालून खोपे करायचे. कमानी किल्ले. हे ही तासंतास. पाय पांढरे व्हायचे मग घरी येउन हातपाय धुवायचे. पुस्तक वाचत बसायचे.

माफ करा, पण अगदी थोडेस्से अवांतरः
बाकि , कंपुशाहीचा पहिला झटका मी भास्करभुवनमध्येच खाल्ला होता.
तेव्हा आम्ही नुकतेच नांदेडला दोन वर्षे राहुन परतलो होतो. वाड्यातल्या समोरच्या बिल्डिंगमधल्या पोरांना आम्ही तसे नविनच होतो, त्यांचा अगदी बिगारीपासुनचा कंपु होता.
तर लपाछपी खेळताना (ऐसपैस) एका जागेवर उभे राहून तिथुनच अमक्या तमक्याच्या नावाने ऐसपैस म्हणायचे म्हणजे तो आउट. पण आपण जागा सोडून दुसरी कडे गेलो, अन लपलेल्या खेळाडूने त्या जागेवर येऊन ऐसपैस की कायसेसे म्हणले म्हणजे आपल्यावर परत राज्य.
तर मी सहजासहजी राज्य झुगारुन देतो म्हणल्यावर, यांनी आपापसात ठरवुन माझ्यावरच परत परत अगदी रडवेले होईस्तोवर राज्य यावे याकरता जे काय केले त्याला "झुंडशाहीपेक्षा" वेगळा शब्द नाही. हे सगळेजण एकदम ठरवुन चाल करुन एकत्रीत यायचे, व ते येताहेत हे दिसुन एकेकाचे नाव व ऐसपैस हा शब्द उच्चारेस्तोवर एखाददोनजण शिल्लक राज्य चढवायचेच. तरी एकदा सर्वांची नावे घेऊनही, शेवटी यांनी कंपुबाजी करीत सपशेल खोटे ठरविले व मलाच राज्य घ्यायला लावले,
समजा माझ्यावर लपायची वेळ असेल, तर बाकिचे लपलेले, ज्याच्यावर राज्य आहे, त्यास खुणा करुन मी कुठे लपलोय हे सांगायचे, व तो मला शोधायला आल्यावर त्यास आउट करायचे नाहीत. कंपुची "एकी" या दृष्टीने हे खुपच भुषणावह असले, तरी ज्याकरता ते ही एकी दाखवित होते, ते निंदनीयच होते. त्यानंतर थोरल्या भावाने, आईने, व शेजारच्या एका मोठ्या मुलिने समजावल्यानंतर मी त्यांच्यात खेळायला जायचे सोडून दिले.
या निवडक ब्राह्मणी पोरांचा इतका खोटारडेपणा मला झेपणारा नव्हता, जेव्हा की माझे घरून खोटे बोलू नये, खोटे वागू नये, कुणाला त्रास होईल असे करू नये असले संस्कार होते, (जे त्यांच्या घरातुनही होते) अन नेमके त्याविपरीत हे या कंपुचे वागणे होते. अन हे सगळे होताना, त्यांचे आईबाप/नातेवाईक गॅलरीतुन बघत असायचे, पण एकही आईबाप आपल्या पोरांना "असे करू नका" असे सांगताना कधीही आढळला नाही, उलट आपल्या पोरांचे हे "सांघिक" प्रताप त्यांच्या कौतुकाचेच विषय होते की काय असे भासायचे. पुढे त्या मुलांचे काय झाले ठाऊक नाही, पण परिस्थितीच्या रेट्यापुढे जेव्हा आम्ही अकाली पैसे कमविण्याच्या मागे लागलो, तेव्हा या ब्राह्मणी मुलांची संगत सुटली ती सुटलीच. यापेक्षा शिंदेआळीतील ब्राह्मणेतर मला अधिक जीवाभावाचे मैतर म्हणुन भावले, व त्यांच्याशीच जवळीक राहिली, अन त्यामुळेही, भास्करभुवनमधिल ब्राह्मणी समवयस्कांशी मैत्री फार दूरची, कधीच फारसा संबंध उरला नाही.
लोकांचे दाखवायचे दात (मुखवटे - भाषा) एक असतात अन खायचे दात वेगळे असतात याचे फार लहानपणीच दर्शन घडविल्याबद्दल मात्र मी देवाचे आभारच मानतो. त्याचबरोबर, जितक्या कटू आठवणी भास्करभुवनशी निगडीत आहेत, त्याच्या एक शतांशानेही कटू आठवणी माझ्या तत्कालिन अन्य शहरातील म्हणजे नाशिक/नांदेड/परभणी/सातारा या शहरांमधिल नाहीत. नविन कुणी आले, तर त्यास सहजासहजी अ‍ॅक्सेप्ट न करता पाण्यात पहाण्याचा "अवगुण" मला तत्कालिन ब्राह्मणांमध्येच जास्त आढळला. शिवाय अजुन एक निरीक्षण म्हणजे यांची वैयक्तिक वा कंपुगिरीची मस्ती केवळ अन केवळ "ब्राह्मणातील कमजोरांवरच" चालायची, बाकी वेळेस इतर ठिकाणी ही प्रजा खालमानेने शेपुट घालुनच वावरायची. बाहेर कुठे तथाकथित "मर्दुमकी " गाजवायचे बळ यांचे मध्ये नव्हते. कुणासारखे काय बनु नकोस, व कुणासारखा बन, हे मात्र मला भास्करभुवनमध्येच शिकायला मिळाले.
(अवांतरः तर सांगायचा अजुन एक मुद्दा असा की, शाळकरी वयात "कंपुशाहीच्या" खाल्लेल्या त्या झटक्याच्या तुलनेत इकडे मायबोलीवरील कंपु म्हणजे "किस झाडकी पत्तीच" होता माझ्याकरता.... Proud )

तुळशीबागेतून भाऊमहाराज बोळात जाताना चौकात जे गजरेवाले उभे रहातात ना ती जागा कित्येक वर्षे तीच आहे. आणि तो मोगरा चाफा यांचा संमिश्र वास अगदी तसाच....
काळे सुगंधी यांचं दुकानही तिथेच होतं फक्त जुन्या जागेत.. आत एक वेदपाठशाळा होती ...आणि वर लंके क्लास ..स्कॉलर शिप साठी ....सर खूप कविता गाणी म्हणून घ्यायचे त्यातलं आला खुशीत समिन्दर अजून पाठ आहे..... पाटीवाल्या सान्यांचं एक दुकान होतं ....शालगर आणि सध्याच्या देसाई यांच्या मधे एक स्टेशनरीचं दुकान होतं .....नाव विसरलं...हे दुकान अडीनडीला पण नेहमी खरं तर स्वतःसाठी किंवा मैत्रिणीसाठी रोजच जायचो ते दुकान म्हणजे रतन सायकल समोर देवधरांचं......तीन चार फूट फ्रंटेज वालं ......काका एक ऑर्डर पूर्ण झाल्याशिवाय पुढची घेत नसत ....आणि पोरं ओ काका ओ काका करून त्यांना भंडावून सोडत....
मुलांसाठी आधी गोडबोले बाईंची शिशुनिकेतन आणि मग नूमवि किंवा हुजूर पागा... अगदी नाहीच मिळाला प्रवेश तर अहिल्यादेवी....पण ती शाळा फारच (?) लांब पडते बाई असं आयाबाया बोलायच्या.
सपेमधल्याखरं तर पुण्यातल्या वाड्यांची संस्कृती हा एक वेगळ्याच धाग्याचा विषय होईल......२०-२२ बिर्‍हाडात दोन संडास ...तेही वाड्याच्या दरवाज्याजवळ असले पाहिजेत हा अलिखित नियम होता. प्रत्येक बिर्‍हाडाला १ किंवा २ खोल्या त्यामुळे निम्मे संसार वाड्याच्या मोकळ्या जागेत...
मला आठवतय.. आमचा बंब, एक कॉट, पाणी साठवायचं पिंप, आणि तुळशीची कुंडी कायम स्वरुपी घराबाहेरच होती.
हलवा करून त्याचे दागिने, पापड, कुरडया, चैत्रातलं हळदीकुन्कू , कुणाकडे शकुनाचे गव्हले हे सगळे कार्यक्रम सार्वजनिक होत.

लिंबू,
धन्यवाद... मी किती वेळ आठवतेय ते लाकडी चरकाचं बैलवालं गुर्‍हाळ कुठे होतं? बरोब्बर....काकाकुवा मॅन्शनच्या आधी....
आणि ते काजंवाले काका ...तुबाच्या मागच्या बोळातले.....मलाही आठवतो चेहरा जस्साच्या तस्सा.....नेहमी पांढर्‍या शर्ट पायजम्यातले काका उन्चेपुरे...काळेसावळे... मोठ्ठं कपाळ .........आणि टकलावर दोन चार केस उभे राहिलेले.....एकही जास्तीचा शब्द न बोलता काम करत....

भांडारकर रस्त्यावर साने डेअरी अजूनही आहे. पण तिथेच त्यांचा गाईंचा गोठा देखिल होता.
असाच एक गोठा अगदी आत्तापर्यंत मेहेंदळे गॅरेजच्या चौकातही होता. (आता जिथे अर्ध भुयारी मार्ग आहे तिथेच)
असेही हे गोठे साम्भाळणं हे जिकीरीचे काम होतेच पण मग गावात गोठे ठेवायला बंदी आणल्यानंतर हे सगळे बंद झाले / गावाबाहेर गेले.

फर्ग्युसन कॉलेज रोडला वाडेश्वर चालू झालेलं. त्यांनी बहुतेक कितीही खा आणि आपल्या मनाला वाटेल ते बिल द्या अशी काहीतरी स्कीम आणली होती. आम्ही ठरवलं होतं की पहिल्याच दिवशी जमेल तेव्हढं ट्राय करायचं. म्हणून वाडीयापासून सायकली काढून फर्ग्युसनला गेलेलो ( आता नाही जमणार). तर भल्या मोठ्या रांगा लागलेल्या. थोडा वेळ रांगेत पण थांबलो. पण रांगेत थांबायची सवय नव्हती. म्हणून डेक्कन ला फिरून येऊ असा विचार केला. तर आल्यानंतरही रांग अजिबात हटली नव्हती. मग कंटाळून परत गेलो. पुन्हा दुस-या दिवशी तोच प्रकार. पाच सहा वेळा असे झाल्यावर मग प्रयत्न सोडून दिला. गंमत म्हणजे नंतरही कधीच वाडेश्वर जमले नाही. ती स्कीम बंद झाली तरी गर्दी असायचीच. चिट्ठ्यांचे नंबर्स सुद्धा होते. मग वाडेश्वरच्या नावावर फुली मारली ती कायमचीच.

नंतर लॉ कॉलेज रोडला सुरू झाले तेव्हां इथे नंबर लागायला हरकत नाही असा विचार केला. तेव्हां नेमकीच कार होती. आणि कार पार्किंगसाठी तिथे अजिबात जागा नाही. थांबायलाही जागा नाही. थोडक्यात नाहीच जमलं...

चुकून नंबर लागेल त्या दिवशी आख्ख्या मायबोलीला वाडेश्वरमधे पार्टी.

धपांडी!! विसरलेच होते तो शब्द Happy

थोडी वेगळी पण कायमची जपून ठेवलेली आठवण.
कॉलेजमधे होते. ९१-९२च्या सुमारास. एक दिवस रात्री आठच्या सुमारास मोठा भाऊ घरी येऊन म्हणला आत्ताच्या आत्ता जेवणंखाणं आटपा आणि उपाशी विठोबाच्या देवळात चला (भरतनाट्यमंदीराच्या जवळ, काही इमारती सोडून हे देऊळ आहे). मी विचारलं काय आहे तर तुला चौकशा कशाला, सांगतो तेवढं ऐक असं (खास मोठ्या भावांच्या स्टायलीत) म्हणाला. मग आम्ही घरातले सगळे जेवणं आटपून पावणेनऊला देवळात गेलो. तिथे आतच मालक राहतात. त्यांच्याकडच्या सगळ्यांची थोडी लगबग चालली होती, देवळात सतरंज्या वगैरे घालत होते. आणखी दोनचार जण होते. आम्ही बसून घेणार तेवढ्यात देवळाच्या दारातून खुद्द भीमसेन जोशी आत आले. बरोबर साथीदार. गाण्याच्या सरंजामासहित. मग लक्षात आलं. भाऊ गाण्याचा वेडा, जळगावकरांकडे पेटी शिकायला जायचा. त्याला बरोब्बर आतली बातमी कळलेली की अण्णा विठोबाची सेवा म्हणून गायला येणारेत. खाजगीतच. त्यांना लोक जमवायचे नाहीत वगैरे काहीतरी होतं. खरंच अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक होतो आम्ही.
अण्णा गायला बसले. मला गाण्यातलं कळत तर नाहीच पण फारशी आवडही नाही. पण त्यादिवशीचं गाणं आतपर्यंत गेलं. आधी त्यांनी थोडी रागदारी गायली. मला अर्थातच कळलं नाही, जरी छान वाटत होतं. मग थोड्यावेळाने त्यांनी अभंग सुरू केले. मदनाचा पुतळा राजस सुकुमार||... मी आयुष्यात पहिल्यांदाच ही रचना ऐकत होते. इतकी अफाट शब्दकळा आणि भीमसेन.. अंगावर एक मोठ्ठा शहारा येऊन टचकन डोळ्यात पाणी आलेलं स्पष्ट आठवतंय. भीमसेन मात्र फक्त आणि फक्त त्या गाभार्‍यातल्या विठ्ठलासाठी गात होते, त्यांच्यासाठी समोरचे लोक अस्तित्वातच नव्हते असं वारंवार जाणवत होतं. आणखीही कुठले कुठले अभंग गायले. माझ्या अजिबात लक्षात नाही आता. पण अजूनही तो 'मदनाचा पुतळा' विसरले नाहीये... नंतर बाबा आणि भाऊ ते अफाट गायले, कसे गायले त्याची तांत्रिक चर्चा करत होते. माझ्या दृष्टीने ती अगम्य असलेली चर्चा अजिबात महत्वाची नव्हती. त्या दिवशीचं गाणं ऐकायला मी तिथे होते ही माझ्या आयुष्यातला एक अतिअतिखास आठवणींपैकी एक आहे.

वरदा किती सुंदर आठवण.
मी पण त्यांना असंच एकदा जंगली महाराज मंदीरात ऐकलंय. अगदी समोर बसून. तो कार्यक्रमही असाच जाहीरात न केलेला होता. बहुतेक गुरु पौर्णिमा की असाच कसला तरी उत्सव होता. फार काही कळण्याचे वय नव्हतेच (आताही फक्त वय वाढलंय संगीताची समज नाहीच) पण तू म्हणते तसा देवळात गाणं म्हणजे देवाची केलेली पूजाचे जणू. माझ्याही मनावर त्या वेळी देवळात कला सादर करतानाची त्यांची एकाग्रता / एकतानता अगदी खोलवर छाप सोडून गेलेली.

Pages