आठवणीतलं पुणं

Submitted by चिनूक्स on 27 March, 2017 - 03:17

गेले काही दिवस अमा, लिंबूटिंबू, केपी, विक्रमसिंह, पूनम, वरदा, आशूडी, गजानन, हिम्सकूल हे 'पुण्यातले पुणेकर' या धाग्यावर जुन्या पुण्याबद्दल लिहीत होते / आहेत. या आठवणी अतिशय रंजक आहेत.

जुन्या पुण्याच्या या आठवणी एकत्र वाचता याव्या, म्हणून हा धागा.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही आपले कोथ्रुडात होतो! त्यामुळे टिळक तलावावर कधी गेलो नाही..
पण सध्या शिवाजी पुतळा किंवा थोरात उद्यान आहे तिथे एक मोठ्ठी विहिर होती त्या विहरीत पोहायला जायचो!
कोथ्रुडवरून सायकलवर बर्‍याचदा जीपीसी ला गेलोय तिथे मित्र होते जाताना चतुर्शृंगी रस्त्यावरून बालभारतीच्या खिंडीतून जाताना शांतता असायची एकदम.. पुढे मग विद्यापीठ चौकात मोठा किर्लोस्कर कारंजा होता. नंतरही बरेच दिवस होता.. हिंजवडी विकासानंतर तो काढला असावा वाटते..

मंडळ आणि गोपाळ हायस्कूलच्या तलावांमधे मी पण शिकले आहे. ते पोस्टमनचे डबे, कमरेला दोरी बांधणे, विहिरीची भीती वगैरे अगदी अगदी.... मंडळात फक्त तरंगायला शिकले पण भीती गेली नाही. ती गोपाळ हायस्कूलच्या तलावात गेली...
हो फर्ग्युसनपाशी ते ठक्करचं दुकान होतं जुनी पुस्तकं आणि मासिकं असणारं. त्यांची एक शाखा एस्पी कॉलेजसमोर पण होती. दोन्हीकडची मी नियमित ग्राहक होते. ब्रिटिश लायब्ररी आणि फिनिक्स लायब्ररी (कुमठेकर रोड) याचीही सदस्य होते. फिनिक्सबद्दल अन्य बीबींबर माबोवरच सविस्तर लिहिल्याने परत लिहित नाही. पण माझ्या वाचनाच्या सवयीला आकार देणार्‍या, योग्य मार्ग सुचवणार्‍या लोकांमधे फिनिक्सचे पोंडा यादीत बरेच वरती आहेत. पुस्तक हाताळावं कसं इथपासून अनेक गोष्टी मी त्यांच्या धाकामुळे शिकले (घरचे प्रयत्न करून थकले होते).. गो.ना. दातार ते काम्यू अशा स्पेक्ट्रममधल्या कुठल्याही पुस्तकाबद्दल त्यांनी (न विचारताही) आपुलकीने मार्गदर्शन्/चर्चा केली आहे...

सई, हिंमतीची दादच द्यायला हवी हां. खुद्द चिनूक्ससमोर जेवण बनवते असं म्हणलीस ते Wink

ट्रेनिंग काॅलेजमधे रोज सकाळी आगाशे गुरुजी योगासने शिकवत. बहुदा फुकट. तेव्हा त्यांनी भस्रीका, अनुलोम विलोम, कपालभाती वगैरे शिकवले होते. पण तेव्हा आता आहे तेवढे ग्लॅमर नव्हते त्याला.

>>इंटरनॅशनल बुक स्टॉलच्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी त्याच्यासमोरही एक विक्रेता बसत असे.
हे इंटरनॅशनलमध्येच काम करणारे पराडकर. जुनी पुस्तकं मस्त मिळायची त्यांच्याकडे.

महाराष्ट्र मंडळाच्या पुलावर मी कधी कधी जायचे माझ्या मैत्रिणी ला सोबत म्हणून. तिथे एकदम टिपिकल वातावरण असायचं. एक बॅच संपली की एक धोतर वाले सर "चलाsss वर" असे मोठ्याने ओरडून मुलांना बाहेर काढायचे! Happy
मी स्वतः मात्र टिळक टॅन्क वरच शिकले पोहायला. टिळक टॅन्क ला पोहताना रिबिनी, गुंतवळं, कपडे, काय वाट्टेल ते यायचं पायात ! पण तेव्हा त्याचं काही विशेष वाटत नसे. त्या घसरगुंडीवर घसरून घसरून पोहायचे कपडे झिजायचे पार!
रहायला कोथरुड ला, महिन्याचा पास काढायचा सुट्टीत पण. बस ने आधी गरवारे मधे ते सुट्तीतले छंद वर्ग. मग टॅन्क वर, पोहून झाले की बस ने घरी. दुपार भर पत्ते कुटणे, संध्याकाळी रोज च्या रोज लायब्ररीत पुस्तक बदलणे . मज्जेची परमावधी!! कसली मिनिमलिस्टिक लाइफ स्टाइल ना!! गंमत म्हणजे हे सगळे कारभार स्वतःच करायचे. आई बाबांनी क्लासेस ना घेऊन जाणे, चौकश्या करणे, असली काही भानगड च नाही. अगदी लहान असतानापासून असंच. आता माझी हिंमत नाही होणार ३-४ थीतल्या मुलांना असे बस ने एकटे कुठे पाठवायची!!
आय गेस तेव्हाचे जग वेगळे होते. जास्त सुरक्षित होते असे नाही म्हणता येणार , कदाचित अज्ञानात आनंद असेल.

लकडी पुलाच्या खंडुजी बाबा चौकाच्या बाजूला अंधलोकांची काठी ज्यात रात्री लाईट लागत असे. >>> "Honour the white cane" असे काहीतरी लिहीलेली होती, तीच का?

लहानपणी बरेच मित्र गावात पोहायला म्हणून जायचे. टिळक, गोपाळ हायस्कूल च्या व्यतिरिक्त एक शाहू तलाव ही होता ना? स्वारगेट जवळ ही आणखी एक होता कोणतातरी. ही सगळी नावे त्यांच्या बोलण्यात कायम यायची.

परवाच 'काही अप काही डाउन' हजाराव्यांदा वाचताना वॉटर कूलर चा उल्लेख दिसला आणि पुण्यात पब्लिक वॉटर कूलर्स कधी आले ते आठवत होतो. मला आठवतात ते तळ्यातल्या गणपतीच्या शेजारी होते सारसबागेत. नंतर मधे काही दिवस डेक्कन च्या बसस्टॉप वर होते. बटन दाबल्यासारखी त्याची तोटी दाबून त्यातून गार पाणी येत असे. डेक्कन वरचा तो कूलर पिंजर्‍यात ठेवल्यासारखा जाळीने वेढलेला होता, फक्त पाणी येण्याचा भाग सोडून.

पब्लिक "माठ" ही अनेक ठिकाणी असत. सर्वात लक्षात आहेत ते सेनापती बापट रोड वर बालभारतीच्या दारात असलेले दोन माठ. सायकलने खिंड चढताना मधे थांबून त्यातले गार पाणी फार मस्त लागत असे. त्याच्या बाजूला एक खोपट्यासारखे घर होते व बाजूला मोकळे रान.

से.बा. रोड च्या त्या भागाला "खिंड" असे अजूनही म्हणतात का माहीत नाही. गणेशखिंड ची शॉर्ट व्हर्जन. एनसीसी चा जो चौक आहे (एक छोटा रस्ता एनसीसी कडून येतो, तोच पुढे लॉ कॉलेज रोड होतो तो चौक) तेथे वेग पकडून सिम्बायोसिस च्या किंचित पुढे चढ संपतो तिथपर्यंत घड्याळ लावून एक मिनिटात सायकलने पोहोचायचे अनेकदा प्रयत्न केले होते. बहुधा जमले होते अनेकदा, लक्षात नाही. पण अनेक लोक त्या चौकातून सायकली सरळ उतरून हातात धरून चालत वरपर्यंत जात असत ते आठवते.

से.बा. रोड च्या त्या भागाला "खिंड" असे अजूनही म्हणतात का माहीत नाही. >>>
ऐकीव माहिती. एनसीसी वरुन चढ चढत सिंबॉयसिस कडे चढ जिथे संपतो, तिथे उजवीकडे पॅगोडाचा डोंगर, तर डावीकडे वेताळ टेकडी असं आहे, आणि मधून रस्ता जातो. हीच ती खिंड. कधी काळी हे दोन वेगळे डोंगर नसून सलग एकच डोंगर होता . कालांतराने मधून रस्ता काढून तो पुढे नेला म्हणे. गोखलेनगर मधील बरीचशी वसाहत ही पुरग्रस्त (पानशेत पुरानंतरची) वसाहत होती एके काळी.

>>>परवाच 'काही अप काही डाउन' हजाराव्यांदा वाचताना वॉटर कूलर चा उल्लेख दिसला आणि पुण्यात पब्लिक वॉटर कूलर्स कधी आले ते आठवत होतो. मला आठवतात ते तळ्यातल्या गणपतीच्या शेजारी होते सारसबागेत.
हो! फार मजा वाटायची त्या कूलरचं पाणी प्यायला.
सारस बागेसमोरच्या मोकळ्या पटांगणात सुट्टीत अम्युझमेंट पार्क उभी व्हायची. तेव्हा ती खरंच अम्युझिंग होती कारण तसं इतर कुठे काही नसायचं.
तिथेच बहुतेक सर्कसपण यायची.

आणि समोर बालभवन. शेजारी पेशवेपार्क (आणि त्यातले प्राणी, फुलराणी). तो सगळा रास्ताच लहान मुलांसाठी बनवलेला होता.

से.बा. रोड च्या त्या भागाला "खिंड" असे अजूनही म्हणतात का माहीत नाही. >>>

जुने पुणेकर म्हणतात. पण नवीन पुणेकर नाही म्हणत. नवीन पुणेकरांना खूण म्हणून 'बालभारती' सांगीतले तरी नाही कळत. सिबीएस्सी च्या युगात बालभारती म्हणजे काय असेही प्रश्न लोकांना पडतात. पासपोर्ट ऑफीस ही खूण देखिल मध्यंतरी ते ऑफीस दुसरीकडे हलवल्याने नाहीशी झाल्ये. सध्या त्या भागास ऑरिजिनल सिम्बी कॉलेज च्या खुणेने ओळखले जाते.

नुकतेच त्या एन सी सी च्या मैदानाला भिंतीचे कुंपण घातले आहे त्यामुळे तर त्या भागाची रयाच गेली आहे. डाव्या बाजूला भांडारकर संस्था आणि बालभारतीच्या यांच्या मधला भाग उंच पत्रे लावून बंदीस्त केला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला नजर अडते आहे.

अवांतर-
जिपिएस च्या लिंक ने गुगल लोकेशन ने पत्ते पाठवायच्या युगात प्रचलीत नावे सोडून कागदोपत्री असलेली छापील नावे वापरात येत आहेत.

आय गेस तेव्हाचे जग वेगळे होते. जास्त सुरक्षित होते असे नाही म्हणता येणार , कदाचित अज्ञानात आनंद असेल. >>
अज्ञानातल्या आनंदा चा भाग नव्हताच असे नव्हे पण त्यावेळी जग सुरक्षित वाटण्या / असण्यामधे लोकांमधल्या पापभिरुपणाचा वाटा फारच मोठा होता.

हे इंटरनॅशनलमध्येच काम करणारे पराडकर. जुनी पुस्तकं मस्त मिळायची त्यांच्याकडे. हो हे मी नुकतेच कुठेतरी वाचले पण त्यावेळी माहीत नव्हते.

ट्रेनिंग काॅलेजमधे रोज सकाळी आगाशे गुरुजी योगासने शिकवत. बहुदा फुकट. बहुदा नाही नक्की फुकटच शिकवायचे. पुण्याचे
केवळ पुणेरीपणच नव्हे तर सांस्कृतिक / सामाजिक पुढारलेपण अशा अनेक ध्येयवेड्या पैशाला गौण महत्व देणार्‍या वेड्या पेठी पुणेरी लोकांमुळेच टिकून होते. पुण्यातल्या अनेक संस्था अशा निरलस कार्यकर्त्यांच्या जोरावर जागतिक कामगिरी करणार्‍या ठरलेल्या आहेत.

मित - हो ते वर्णन बरोबर आहे. त्याला खिंड तेथे काढलेल्या रस्त्यामुळेही म्हणतात (गणेशखिंड हे जुने प्रचलित नाव पण ते पुढे चतु:शृंगी च्या जवळच्या भागाला होते तेथील गणपतीच्या देवळामुळे). त्यामुळे खिंड का ते माहीत आहे :). मी गोखलेनगर मधेच राहात होतो. अजूनही म्हणतात का असे विचारतोय कारण नवीन लोकांकडून खिंड म्हंटलेले फारसे ऐकले नाही. से.बा. रोड च ऐकले आहे.

बाय द वे - पूरग्रस्त वसाहत म्हणजे जनवाडी. गोखलेनगर मधले बहुसंख्य लोक रस्ता रूंदी, धोक्यामुळे सोडावे लागलेले वाडे या कारणाकरता आलेले. आमच्या वाड्यातील सगळ्या फॅमिलीज एकाच चाळीत आल्या. त्यामुळे आमच्या बर्‍याच मित्रांचे वडीलही एकमेकांचे मित्र होते Happy

हर्पेन - "नजर अडते" शब्द आवडला. परफेक्ट वर्णन आहे. पूर्वी बाल शिक्षण मंदिर समोर पीवायसी वर मॅच चालू असली की तेथे रेंगाळून ती बघत बसलेले बरेच लोक दिसत. कधीही पाहिले तरी १०-२० तरी असत. मी तेथेच कृष्णाम्माचारी श्रीकांत वगैरे लोकांना स्थानिक स्पर्धांत खेळताना पाहिलेले आहे. मात्र आता ते पीवायसी सुद्धा पूर्वीसारखे दिसत नाही.

तसेच लॉ कॉलेज चौकात तेथे एक 'मोरे निवास' म्हणून इमारत सहज दिसायची. आता ती शोधावी लागते पुढच्या बकाल बजबजपुरीत. पूर्वी मी तेथे एका नातेवाइकांकडे दुपारी जायचो कॉलेज मधे ब्रेक असल्याने. तेव्हा इण्डसर्च, कृष्णा डायनिंग वगैरे नव्हते. इण्डसर्चच्या गल्लीत काय होते लक्षात नाही. मात्र दुसर्‍या बाजूला कांचन गल्ली पर्यंत मोकळे रान होते. मग पलीकडे लॉ कॉलेज चे ग्राउण्ड.

मात्र इतक्या नॉस्टॅल्जिक पोस्ट टाकल्यावर एक विचार करत आहे, की अशा कोणत्या जागा असतील की ज्या १०-२० वर्षांपूर्वी दिसायला काही खास नव्हत्या पण आता सुंदर दिसतात. एआरएआय ची टेकडी? मी तेथे अनेक वर्षांत गेलेलो नाही पण इतरांकडून ऐकले आहे.

७५ सालि गन्धर्व चौकात राजहस म्हणहाँटेल होत त्यात मिसळ चागलि मिलत असे. मि त्या वेळि माडर्न ला शाळेत होतो. तसेच एस्पि च्या समोर
उदय विहार नवचे हि हाटेल होत. महाराश्ट्र मडळ मधे जाताना आम्हि तिथे जात असु ७२-७३सालि म्हन्जे खुप्च जुने गोश्ट..... माडर्न ला असताना शाळे समोर बहुतेक. ढाकाळ्करान्चा ब्नगला होता ते नेहमि शिकार करुन जिप मधुन मार्लेला प्राणि घेवुन येत असत... सारस बागेत सणस मैदनावर सर्कस महाराष्ट्र मंडळा च्या तिथ रोड वर नेहमि मसाल्या चा वास येत असे । बालगंधर्व ला गुंतता ह्रीदय हे हे काशीनाथ घाणेकराच नाटक पाहीलेल आठवतय

से.बा. रोड च्या त्या भागाला "खिंड" असे अजूनही म्हणतात का माहीत नाही. >>> या भागाला गणेश खिंड म्हणत . आम्ही NCC साठी तेथे जायचो दर रविवारी . रोज SP College ला शिवाजी हौसिंग सोसायटी ( लाला लजपतराय वसतीगृह ) वरुन निघून याच रस्त्याने जायचो . बालभारती नंतर सायकलला पॅडल मारणे बंद करायचो डेक्कन पर्यंत . परत येताना बरेच श्रम पडत. रुपाली , वैशाली तेव्हा बिल्कुल खाली असायचे . बरेच विध्यार्थी वसतीगृह न मिळाल्यास जुन्या वाड्यात राहयचे . शिवाजीनगरचे मॉडर्न कॅफे दहीवड्यासाठी प्रसिद्ध होते .

अरे वा, मस्त धागा!

से.बा. रोड च्या त्या भागाला "खिंड" असे अजूनही म्हणतात का माहीत नाही. >>>
मी सध्या त्याच एरीयात रहातो. बाबा नातेवाईकांना पत्ता सांगताना गणेष खिंड, बालभारती, पासपोर्ट ऑफीस, शेती महामंडळ इ. खुणांपासून सुरुवात करतात. बर्‍याच जणांना यातली एकही खुण माहीत नसते. मग वैतागून सिंम्बायोसिस सांगतात किंवा फोन माझ्याकडे देतात Happy

kasal bhari lihitay tumhi sagale....maz lahanpan sagal shukrawar pethet gel.... ani shala hujurpaga.... kala haud, bhau maharajancha bol , thoratancha wada sagal sagal punha athaval.... mastach.... shaniparavarun saral attach je ramesh dying ch dukan ahe ..tya valanavar ek cycle repairiing che dukan ahe...tyatala madhubalacha photo. ... ajunahi to tasach tithe ahe.. adhi black and white hota...ata colour lavala ahe.... tya bajula gele ki me ajunahi tya dukanavarun chakkar takate.....

गोखले नगर व चतु श्रुंगीच्या आधीच्या भागात एक बहिरट वाडी म्हणून वसाहत होती. तिथे माझा मामा राहात असे काही वर्शे. त्याची तीन मुले. मी कधी कधी तिथे राहायला जायचे व घराच्या अगदी समोरच डोंगर सुरू व्हायचा. अनेकदा आम्ही तिथे वर चढत चढत जाउन बघत बसायचो. संध्याकाळी दिवेलागणीच्यावेळी, प्रेशर कुकर नव्हे चुलीवर डाळ भात शिजत पडायची व बहिरट वाडीवर त्या एकत्रित वासाचा ढग बनोन राही. उतरे परेंत अधांर पडे पण कसलीही भीती वाटा यची नाही.

पान सिगरेटीच्या दुकानासमोर काडेपेटी, लायटर परवडत नसत म्हणून म्हणा किंवा प्रत्येकाला ती द्या परत घ्या करायला नको म्हणून म्हणा जवळच बहुतकरून एखाद्या झाडाला सुंभ / जाड दोरी एका टोकाशी पेटवून सुलगत ठेवलेली असायची. बिडी सिगरेट विकत घेऊन झाली की इतर कोणाच्याही मदती शिवाय सिगरेट पेटवणे सहज जमत असे.

इतक्यात ह्या धाग्याची आठवण येण्यास कारणीभूत ठरलेल्या दोन गोष्टी

१. टिळक तलावातील हिरव्या पाण्याच्या भागाचे नि नुतनीकरण चालू झाले आहे त्या निमित्ताने टिळक तलावाविषयी माहिती पुरवणारा एक फलक लावलाय.
२. प्रभात रस्त्यावर इराणी कॅफे सुरु झाले आहे. त्या कॅफेत जुन्या पुण्याचे फोटो लावण्यात आले आहेत.

१. टिळक तलावातील हिरव्या पाण्याच्या भागाचे नि नुतनीकरण चालू झाले आहे त्या निमित्ताने टिळक तलावाविषयी माहिती पुरवणारा एक फलक लावलाय.>>> म्हणजे आता हिरव्या पाण्याचा भागही निळे पाणी घेणार का?? अरेरे Sad

जुन्या पुण्याचे फोटो असतिल तर अपलोड करा ना प्लीज... जुने आणि नाविन असे दोह्नी असतिल तर उत्तमच..आमच्या सारख्या लोकाना समजायला आणि त्या काळात जायला मजा येईल..

एक भयानक आठवण म्हणजे 'जोशी- अभ्यंकर हत्याकांड'. कॉलेजवयीन तरुणांनी केलेले. जेव्हा आरोपींना पकडले तेव्हा पोलीस जबाबात त्यांनी सांगितले की खुनाच्या पद्धती आम्ही ब्रिटिश लायब्ररीतील पुस्तकांतून शिकलो.
….
त्यानंतर ब्रिटिश लायब्ररीचे सभासदत्व मिळण्यासाठी सर्व विदयार्थ्यांना कॉलेजकडून सद्वर्तनाचे प्रमाणपत्र आणावे लागे.

जोशी- अभ्यंकर हत्याकांड संदर्भात आजवर खूप लिहिले गेले आहे. पण हा लेख वेगळा आहे:

https://drive.google.com/file/d/1ALHeWNbGIvNArdwFkaywTM1qPA_xamGt/view

तो राजेंद्र जक्कलच्या तत्कालीन वर्गमित्रानेच लिहिला आहे. श्याम भूतकर त्यांचे नाव. "चिन्ह" साठी त्यांनी २०१२ साली त्यांनी हा लेख लिहिला आहे. एका जवळच्या मित्राने कल्पनाही नसताना इतका भयंकर गुन्हा केल्याचे कळल्यानंतर त्यांची काय मानसिकता झाली व त्यानंतर कित्येक वर्षे ते त्याच मानसिक दडपणाखाली वावरत होते. तब्बल पस्तीस वर्षांनी म्हणजे २०१२ साली ते व्यक्त झालेत. म्हणून या घटनेवरील हा लेख आजवरच्या लेखांत सगळ्यात वेगळा आहे. अतिशय तपशीलवार आणि डोळ्यासमोर चित्र उभे करणारी लिखाणशैली आहे. आपल्या मन:स्थितीचे अचूक शब्दात जे वर्णन त्यांनी केलेय ते मला खूपच अपील झाले. एक अतिशय संवेदनशील असलेला कलाकार, एक चांगला मित्र आणि त्याचवेळी थंड डोक्याने तब्बल दहा निर्घृण हत्या करणारा गुन्हेगार असे जक्कलचे व्यक्तिमत्व वाचून अक्षरशः हताश व निशब्द व्हायला होते. या संपूर्ण हत्याकांडाच्या काळातील अनेक वेगळे पैलू या लेखात वाचायला मिळतात.

मुख्य म्हणजे त्या काळातले पुणे, तेंव्हाच्या लोकांची मानसिकता, संवेदनशीलता, या घटनेचे तेंव्हाचे आणि त्यानंतरचे जनमानसावरचे परिणाम या सगळ्याचे खूप प्रभावी चित्रण या लेखात त्यांनी केले आहे. एक प्रकारे ते आपल्याला त्या काळात घेऊनच जातात. मला काही दिवसांपूर्वीच हा लेख वाचायला मिळाला. इथे शेअर केल्यावाचून राहवत नाही.

@अतुल पाटील, तो लेख वाचला, शहारे आले अंगावर वाचताना.

दिलीप सुतारची बहीण माझ्या आईची वर्गामैत्रीण होती मुलींच्या भावे स्कूलमध्ये. ती देखील उत्तम चित्रकार होती. तिच्या घरी माझी आई बरेचदा जात असे. दिलीपला तिने अनेकदा घरी पाहिले आहे. माझ्या आईच्या आठवणीनुसार दिलीप शांत, सौम्य होता. आईच्या वर्गाने 10वीच्या वर्षी एक हस्तलिखित अंक काढलला होते ते सुतारने(बहीण) सुवाच्य अक्षरात लिहिले होता, त्यातली काही चिते दिलीपने काढून दिली होती. त्या अंकाच्या प्रमुख कंटेंट रायटर होत्या माझी आई आणि स्मिता पाटील!
91/92च्या आसपास आई तिच्या ऑफिसच्या रिजनल हेड ओफिसला काही कामासाठी आली होती, मी पण आईबरोबर पुण्याला आलो होतो तेव्हा. बिब्बेवाडी भागात ते ऑफिस होते. तिथे आईला तिची जुनी मैत्रीण सुतार भेटली. आम्ही जवळच्याच एका होटेलात चहा प्यायलो ते आठवते. तिथून स्वारगेटला येताना रिक्षात आई 'बिचारीचे लग्न नाही झाले कधी' असे म्हटल्याचे आठवते.
या मुलांच्या कुटुंबीयांनी मागे खूप सोसले असणार. तसेच ज्यांचे खून झाले त्यांच्या कुटूंबियांनी सुद्धा.

माझ्या आजोबांकडे 97साली एक गृहस्थ फियाट चालवत दुपारी येत असत. साधारण 6 7 महिने ते येत. मग दुपारी 2 3 तास ब्राह्मसूत्रशांकरभाषय नावाच्या ग्रंथाचे मुद्रितशोधन चाले. त्या ग्रंथाची ती प्रूफ रिडींग कॉपी होती. तो ग्रंथ येणारे गृहस्थ प्रकाशित करणार होते, माझे आजोबा संस्कृत वैय्याकरणी म्हणून बहुतेक कन्सल्टंटचे काम करत असावेत. माझा संबंध चहा करून देणे इतकाच असे. एकदा ते आले नाहीत म्हणून आजोबांनी मला वाचायला बसवले पण ते पुस्तक फारच 'जड' होते. मग एकदा रात्री जेवताना समजले की ते येणारे साठीचे गृहस्थ हे अभ्यंकर होते.

Pages