आठवणीतलं पुणं

Submitted by चिनूक्स on 27 March, 2017 - 03:17

गेले काही दिवस अमा, लिंबूटिंबू, केपी, विक्रमसिंह, पूनम, वरदा, आशूडी, गजानन, हिम्सकूल हे 'पुण्यातले पुणेकर' या धाग्यावर जुन्या पुण्याबद्दल लिहीत होते / आहेत. या आठवणी अतिशय रंजक आहेत.

जुन्या पुण्याच्या या आठवणी एकत्र वाचता याव्या, म्हणून हा धागा.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूनम - टोटल नॉस्टॅल्जिक! मी कुंडलकरांकडे तू म्हणतेस त्या घरी अनेकदा गेलेलो आहे आणि तू म्हणतेस तसे सचिन व सुयोग दोघांनाही पाहिलेले आहे :). ते आमचे लांबचे नातेवाईक. त्यांचे फ्रीज रिपेअर करण्याचे शॉपही तेथेच होते. तू तेथे इतक्या जवळ राहात होतीस? मला वाटले तू पुढच्या गल्लीत (प्रबोधिनीच्या) राहात होतीस. त्यांनी पाळणाघर बरेच नंतर सुरू केले. आम्ही एकदा बरेच नातेवाइक दोन दिवस राहिलो होतो त्यांच्याकडे. तेव्हा ते व्हिडीओ भाड्याने आणून २-३ पिक्चर पाहायची फॅशन होती. आम्ही नमक हलाल वगैरे पाहिले होते ते लक्षात आहे. तसेच एकदा सचिन, सुयोग वगैरे सगळेजण चिंचवड ला एका कॉमन नातेवाइकांकडेही राहिलो होतो.

कुंडलकरांकडे तेव्हा राहिलो होतो तेव्हा जेवणाकरता बरेच पदार्थ सर्वांसाठी घरीच केले होते. मग दुसर्‍या दिवशी सकाळी सगळ्यांकरता हिंदुस्तान चे पॅटिस आणायचे ठरले. तेव्हा मी नव्याने सायकलवर दुनियाभर फिरू लागलो होतो, म्हणून मी म्हंटलो मी घेउन येतो. रात्रभर व्हिडीओ वर पिक्चर पाहिलेले, थोडीसी डुलकी मारून तसाच हिंदुस्तान मधे सकाळी गेलो. पॅटिस ची संख्या ऐकून त्यांना वाटले मी विकायला नेतोय. तयारच नव्हते द्यायला, बरेच कन्विन्स करावे लागले होते Happy

<<<<पटवर्धन बाग वगैरे नावे ही खरोखरीच्या बागेवरून पडली असतील बहुतेक... <<<< हो
या पटवर्धनांची व माझ्या वडीलांची चांगली ओळख होती. तेव्हा वडिलांना ते आग्रह करित होते की तिकडे जागा घेऊन रहायला या. काही कारणांनी (शेतजमिन खरेदी व सरकारी नोकरीचे नियम ) वडीलांनी नकार दिला. वडिलांनी तेव्हा तिकडे "एकरात" जागा घेतली असती तर???? Proud

गुलाबी पेरुंचे खरेचे नाविन्य होते तेव्हा. पण ते दिसायला छान व चवीला अंमळ प्लेन. व आपले नेहमीचे साधे पेरू चवीला मस्त. काही काही पदार्थ पण तेव्हा नवीन आले. ७० च्या दशकातली गोष्ट. म्हणजे घरी केचप व सॉस बनवणे एकदम मॉडर्न. मग मेदू वडा. घरी इडली बनवणे,
चटणी आपली घरचीच खोबर्‍याची नेहमीची. पुलाव नामक पदार्थ आईने कुठून कुठून रेसीपी शोधून अगदी निगुतीने केला होता. प्रत्येक भाजी
तळून घ्यायची वर दालचिनी व धनेजिरे पूड पेरायची. इत्यादि. अफलातून नव्या चवी. मग पिझ्झा. आंतरभारतीच्या पुढे एक जनरल फूड स्टोअर होते तिथे चीज मिळू लागले होते. घरी बेस पासून सॉस, कांदा कॅप्सिकम वगैरे कापून वट्ट दोन पिझे बनवले होते. पण पहिली चव एकदम टॉप क्लास. यीस्ट वापरून बेस एकदम रेसीपी बर हुकुम बनवला होता. आता कधी डॉमिनो खाल्ले की त्या घरच्या पिझ्याची आठवण येते. एकदम लाइट व चविष्ट.

एकदा रेसीपी वाचून आईने उकडलेल्या अंड्यांचे पकोडे बनवले होते ते खाउन आम्ही मैत्रिणी डेक्कन टॉकिज ला अभिनेत्री चित्रपट बघायला गेलो होतो. मित्र सेपरेटली आले होते. त्यामुळे डोक्यात उगीचच अभिनेत्री = अंड्याचे पकोडे असे समीकरण बनले आहे. आठवीत सत्यम शिवम सुंदरम तिथेच बघितला पण डोअर कीपर हाकलून देईल अशी भीती वाटत होती. चित्रपटाला ए सर्टिफिकेट होते चक्क. पण पाहिला एंड परेन्त. डोअर्कीपर ने ढुंकूनही पाहिले नाही. जेम्स बाँड्चे सिनेमे अलका मध्ये. एक चित्रपट आहे ट्रबल इन इस्तंबूल. तो मी अलकाला दोनदा पाहिला होता. अजूनही पाहायचा होता. ह्याचे कारण त्यात इस्तंबूल शहराच्या पार्श्वभूमीवर एक मस्त ट्यून वाजायची. ती अजूनही डोक्यात आहे. पण शेअर करू शकत नाही. निळा समुद्र, वरचा ब्रिज, ती सामुद्रधूनी व समुद्रातून सिटीचे शॉट्स, पांढरे पक्षी. हे सर्व फार नवे व रिफ्रेशिंग होते. मी ह्या चित्रपटाबद्दल नेट सर्च केले पण फारसे काही मिळाले नाही. एक अमेरिकन विनोद वीरांची जोडी त्यांचे इस्तंबूल मधले उपद्व्याप अशी विनोदी कथा होती. ती ट्यून एकदा ऐकायची आहे परत. जसे कर्ज सिनेमातली ट्यून!!! पण त्याची सीडी आहे मजकडे.

पूना कॉफी हाउस च्या थोडे पुढे तेव्हा एक फ्लॉरिस्ट शॉप नव्यानेच उघडले होते. तिथे निशिगंधाच्या छ्ड्या रंगीत पाण्यात बुडवत व फुले केशरी निळी दिसत. सो हायटेक. व लेडीज लेस, इतर भारा भरती फुले. ते तसले बुके हे पण मस्त नवीन होते. मग शेजारी कुकूच कू नावाचा स्टॉल बोरावके चिकन ह्यांनी उघडला होता. इथे चिकनचे सर्व पदार्थ मिळत. कबाब वगैरे. मी दहावीत महाबळेश्वरला ट्रिप ला जाताना वर्गमित्र
उल्लास लाटकर उर्फ उल्ल्या ह्याने आणलेला मार्जोरिनचा चिकन सँडविच खाल्ला तेव्हा पहिल्यांदी चिकन खाल्ले. नंतर लग्न झाल्यावरच. त्यामुळे हे काय प्रकरण आहे ते फारसे माहीत नव्हते. व तितके पैसे हातात नसत. उकडलेल्या शेंगा, मक्याचे भाजलेले कणीस हाँग्काँगलेन पाशी इतकीच मजल होती. तर ह्या बोरावके स्टॉलच्या नंतर एक पार्ले ने पिटा ब्रेड मध्य व्हेज पॅटी घातलेले व भाजलेले असा एक पदार्थ विक्णारा स्टॉल लावला होता. पिटा ब्रेड नवीन. त्यात ते व्हेज कटलेट. व कांदा काकडी व सॉसेस, मस्टर्ड, कोथिंबीर. हा ही एक नवा स्वाद होता.
बरोबर डू इट नावाचे कोला सद्रूश्य पेय. हे प्रमोट करण्या साठी स्टिकर्स. हा घरी आणून पुस्तकांच्य कपाटावर लावला होता. हे विकणारी मुले पण प्रमोशन करणारी तरुण मुले साधारण मुंबईत कुठे ही दिसतात तशीच होती पण त्यांचे ही नाविन्य वाटायचे. ब्लू जीन्स ( ह्याही नव्याच आल्या होत्या. त्यात आत ट्क केलेले व्हाइट शर्ट्स, बेल्ट, प्रमाण बद्ध शरीर यश्टी अस्लेले व चट्पटीत इंग्रजी बोलणारे एकमे कांच्यात इंग्रजीतून विनोद करणारे हे लोक पाहिले की एकदम आपण काय बटाटा आहोत असे फीलिंग यायचे.

ह्या डू इट सेल्स स्टॉलचे फ्रंचाइसी मिळावे म्हणून मी कंपनीला वहीच्या कागदावर इंग्रजीतून पत्र लिहीले होते. माझे वय १६-१७ असेल. तेव्हा.

लंपन,
ती पायवाट म्हणजे शासकीय मुद्रणालय / ग्रंथागाराच्या आवारातून जाणारी वाट होती तीच का? त्याला एका बाजूने गेट होते जे सदैव उघडेच असायचे.>> तीच. Happy

भांडारकरच्या समोर एक चायनीज हायटेक हाटेल होते कोणाला आठवते का? ते आतून कसे असेल ह्याची जाम उत्सुकता होती. नंतर तिथे HSBC Bank झाली. ती पण बंद पडली. आम्ही ह्या हाटेल समोर उगाच उभे रहात असू. नळस्टॉप वरून २५ नं ची बस येताना दिसली की रस्ता क्रॉसकरून पलिकडे जायचे बस पकडायला Happy तेव्हा बापट रोडवर पर्सिस्टंटचे छोटे ऑफिस , पासपोर्ट ऑफिस सोडले तर काही नव्हते. एक्दम मोकळा रस्ता. रमत गमत चालताना मजा यायची. पासपोर्ट ऑफिस ते विखे-पाटील शाळा ईतकी घनदाट झाडी होती, आता बरीचशी तोडली आहेत. इथेच बारामतीकरांचा बंगला पण आहे.

(मंजुश्री??) सारडा खून खटला आठवतो आहे का कुणाला? साधारणतः १९८० ते ८३ दरम्यानचा काळ असेल, नेमके साल आठवत नाही. पण ती घटना घडली, ती बिल्डिंग व फ्लॅट (दाराबाहेरुन) बघायला गेल्याचे आठवते. सध्याच्या सिंबॉयसिस कडुन चतु:शृंगीकडे जाताना खिंड पार केल्यावर लगेच डाव्या हाताला आतिल बाजुस बिल्डिंगचा पत्ता शोधत शोधत सायकलवरुन गेल्याचे आठवते.

इसवीसन १९७३ ते ७६ दरम्यान मी सायकलला ताडपत्रीच्या दोन पिशव्या लावुन फटाके विकायला दारोदार भटकायचो, तेव्हा सध्याचा पौड रोडवर डावी कडे काही तुरळक अपार्टमेंट्/बिल्डिंगा होत्या तिथे गेल्याचे आठवते. तेव्हा बाकी पुण्यात कुठे नाही, पण त्या बिल्डिंगमधिल नविन दांपत्याने अगत्याने केलेले स्वागत आठवते, व त्यांचे बाळ खूपच लहान (तान्हे) होते तरिही माझ्याकडुन रिकाम्या हाताने परत जाऊ नये म्हणून घेतलेले फटाके हे आठवते. Happy तशी अनुभवलेली माणूसकी तेव्हाही दुर्मिळ होती, आता बघायला मिळणे दुरापास्तच.

आंतरभारतीच्या पुढे एक जनरल फूड स्टोअर होते तिथे चीज मिळू लागले होते. >>> अमर फूड प्रॉड्क्ट्स इथल्या बोर्डावर कधीही न ऐकलेली चित्र-विचित्र वाटणारी पदार्थांची नावे लिहिलेली होती. अजिनोमोटो एक असंच रुतून बसलेले नाव.

अमा, निशिगंधाच्या रंगीत छड्यांची आठवण मस्तच !

पूना कॉफी हाऊस, फ्लोरिस्ट, बोरावके ह्यांच्याच लाईनीत पुढे महाराष्ट्र बँकेच्या इमारतीत नीरा मिळायचे दुकान (हे अजूनही) आहे. जिल्हा परिषद इमारत आणि हे डेक्कन वरचे अशा दोनच ठिकाणी (माझ्या माहिती प्रमाणे) टपरी नव्हे तर दुकानात नीरा मिळायची.

आई ग्ग अमर फूड प्रॉडक्ट्स. पण सिंधी असाच कोणीतरी होता. मध्यमवयीन. चेहरा व पोट सुटलेले. दाढीचे पांढरे खुंट. निळ्या पँट मध्ये व्हाइट डिझाइनचे शर्ट घालून बसायचा. तिथे गेले की मला अगदी हरखून जायला व्हायचं एक वेगळीच खाद्यसंस्कृती कुठेतरी आहे व आपल्याला बोलावते आहे असे वाटत असे.

सही किस्सा आहे फारेन्डा हिन्दुस्थानचा Lol
अरे ते रहायचे पंताच्या गोटात आणि मी प्रबोधिनीशेजारी. बॅक टु बॅक कनेक्शन Happy
हिन्दुस्थानच्या पॅटीसना उगाचच पर्याय म्हणून शनिपाराशेजारच्या ग्रीन बेकरीचे पॅटीस आणायचो आम्ही कधीतरी, पण आवडले नाहीत फारसे कधी. पॅटीस= हिन्दुस्थानच Happy

अमा, बोरावके!! मला वाटतं अजूनही आहे ते चालू. त्यांची तंदूर चालू झाली संध्याकाळी की जो काही घमघमाट सुटायचा की बस! टांगलेले लेगपीसही दिसायचे रस्त्यावरून येताजाता Happy

हॉन्गकॉन्ग लेन चालू आहे अजून... जातात का कॉलेजमधली मुलं-मुली तिथे? मी अनेक वर्षात गेलेले नाहीये! पण 'तन्ना' लायब्ररीची मी मेम्बर होते, त्यामुळे एकेकाळी अगदी रेग्युलरली जायचे. कोणत्या दुकानात काय मिळतं, कुठून काय घ्यायचं हे पाठ होतं! तन्नाने आता बहुदा सागर आर्केडमध्ये जागा घेतली आहे. एकदम मस्त लायब्ररी होती ती. मालक एकही पुस्तक वाचायचा नाही, पण कोणतं चांगलं, कोणतं वाईट, कोणतं चालतंय, कोणतं बकवास- सगळं त्याला ठाऊक! पाच बाय तीनची ती जागा, वर पोटमाळाही. खचाखच भरलेलं होतं ते दुकान इंग्रजी पुस्तकांनी! फिक्शन इंग्रजी वाचायची सुरूवात तिथूनच झाली, जी अजूनही टिकून आहे!

राजवाडे आणि सन्स मध्ये कुंडलकरांनी जुन्या पुणेरी विचारसरणी मधील तृटींवर नेमके बोट ठेवले आहे. मुलींचे अगदी लवकर लग्न लावून देणे, वयस्कर वडीलांसमोर आपले म्हणणे बोलायला तोंडही उघडता न येणे हे अनुभवले आहे. मोठ्यांचे ऐकायचेच असा माइंडसेट होता. त्यातून बाहेर पडायला फार श्रम करावे लागले. तीन शक्यता असत मोठ्या भावासारखे सर्व अ‍ॅक्सेप्ट करून त्यातच सूख मानून राहणे. उगीच एलोएल म्हणजे काय व्गैरे विचारून विथ इट व्हायचा प्रयत्न करणे, नाहीतर मधल्या भावासारखे दुहेरी जीवन जगणे. नाहीतर लहान भावासारखे पळून जाणे. स्वतःचा मार्ग शोधणे. आळे करांनी हे वैश्विक पुणेरी बाबा चांगले उभे केले आहेत. मुलीचे काय लग्न करून दिले प्रश्न संपला. आणि पुण्याच्या बाहेर करीअर ब्रेक साठी जायचे नाही. आपण्ही ह्या व्यवस्थेचा एक बळी आहोत असे वाटू लागले. सोडून जा पुणे, आपापली क्षितिजे शोधा हे झाले आयुष्यात. म्हणून आता ह्या आठव्णीत गोडी वाट्ते. तिथेच जगलो अस्तो तर काचले असते ते बंध. चित्रपटात आईला सुद्धा नवर्‍यापुढे बोलता येत नाही. काय ती जरब. मला प्रेमळ पुणेरी पालकांवर काहीही टीका करायची नाही. फक्त एक माइंडसेट सांगितला. वैयक्तिक अनुभव वेगळे असतीलच.

अमा माझ्या आठवणी प्रमाणे आंतर भारती कोणीतरी अमराठी होता पण अमर वाला मराठीच होता आणि त्या शेजारच्या गल्लीतल्या 'चालुक्य'च्या धर्तीवर त्याने डेक्कन बसस्टॉपच्या मागे छत्रपती हॉटेल म्हणजे लॉज काढले होते. नंतर त्याचे हॉस्टेल केले.

पुना कॉफीच्या तिथे आत वरच्या मजल्यावर बहुतेक कलाछाया की अशाच नावाचे कथ्थक शिकवण्याचे केंद्र होते ना रोहिणी भाट्यांचे?

सॉरी अमा, डिसअग्री, कारण तुम्ही म्हणता ही काही 'पुणे स्पेसिफिक' विचारसरणी नाही... ही त्याकाळी जो मराठी मध्यमवर्ग होता, त्या सगळ्याची सरसकट विचारसरणी होती असं मला वाटतं.

चित्रपटात आईला सुद्धा नवर्‍यापुढे बोलता येत नाही. काय ती जरब. >> हे पुणं स्पेसिफिक नक्कीच नाही. हे त्या काळचं मराठीच काय, तर भारतीय सत्य होतं, आजही काही प्रमाणात आहे!

<<पूना कॉफी हाऊस, फ्लोरिस्ट, बोरावके ह्यांच्याच लाईनीत पुढे महाराष्ट्र बँकेच्या इमारतीत नीरा मिळायचे दुकान (हे अजूनही) आहे. जिल्हा परिषद इमारत आणि हे डेक्कन वरचे अशा दोनच ठिकाणी (माझ्या माहिती प्रमाणे) टपरी नव्हे तर दुकानात नीरा मिळायची.>> दोनही ठिकाणी आम्ही जायचो.
त्यावरून आठवले ; अ‍ॅग्रीकल्चर कॉलेज च्या दारात अप्रतीम उसाचा रस मिळायचा. तेवढ्यासाठी सायकल मारत भर उन्हात रस प्यायला जात असू.

ऊसाचा रस प्यायचं अजून एक ठिकाण म्हणजे कॅम्पात मोलेदिना रस्त्यावरून बंडगार्डन कडे जाताना आता एक मोठे हॉटेल झालंय त्याच्या शेजारी एक रुपयात मोठा ग्लास भरून रस मिळायचा. जम्बो साईझ ग्लास म्हणजे एका ग्लासात पोट भरूनच जायचे.

इन्ग्रजी सिनेमे फक्त अलका ; राहुल आणि वेस्ट एन्ड लाच लागायचे.
अलकाची ही मक्तेदारी दादा कोन्डकेन्च्या सिनेमान्नी मोडली होती.
नटराज अगदी नवीन असताना तिथे "Guns of Navarone" बरेच आठवडे चालला होता.
नीलायम नवीन असताना "अनुराग" आणि "बॉबी" हे सिनेमे लागले होते . बॉबीचे पोस्टरही अजून आठवते.

पुना कॉफीच्या तिथे आत वरच्या मजल्यावर बहुतेक कलाछाया की अशाच नावाचे कथ्थक शिकवण्याचे केंद्र होते ना रोहिणी भाट्यांचे? >> हो.

कैतरी झोल आहे.... कॅम्प कुठे, बंडगार्डन कुठे... दोन टोके. पण तपशील बरोबर आहे. लाल देवळाकडुन मोलेदिना रोडने एमजीरोड कडे जाताना, डाव्या हाताच्या गल्लीत एक थिएटर होते, त्याचे शेजारि हा रसवाला होता. पण आम्हि तिथे प्यायचो नाही, कारण तो बर्फाच्या लाद्या रस निघतो तिथे ठेवायचाच, शिवाय काधलेल्या रसात भरपुर बर्फ (अर्थात बर्फाचे पाणी) घालायचा, त्यामुळे तो रस अतिथंड लागायचा, त्यामुळे चव कळायचीच नाही, पण आम्ही पट्टीचे "पिणारे" असल्याने ही चलाखी समजुन घेऊन तिथे रस पिणे टाळायचोच. आमचे नेहेमीचे ठिकाण म्हणजे शनिपारासमोरच्या कॉर्नरचे गुर्‍हाळ, अजुनही आहे.

मंडई जवळच्या दोनही पार्कींगच्या जागांवर आधी सिनेमा हॉल होते. तुळशीबागे जवळच्या पार्कींग च्या इथे आर्यन नावाचे पुण्यातले पहिले टॉकीज होते. मंडई लगतच्या पार्कींगच्या जागी कोणते होते बरे? आर्यनला शेवटचा सिनेमा भालजींचा 'गनिमी कावा' लावला होता बहुतेक.

मंडई समोर आर्यन आणि लगचे मिनर्व्हा दोन्ही ठिकाणी आता पार्किंग झालयं!
आधी आर्यन जमिनदोस्त झाले मग मिनर्व्हा!

७२-७३ ची माझी आठवण म्हणजे, तेव्हा आम्हि नांदेडला जाण्यासाठी स्टेशन एसटीस्टँडकरता, आई, थोरला भाऊ (८वी) व मी(५वी) असे शुक्रवारपेठेतुन (रामेश्वरचौकातुन) निघालो, तर रीक्षेला पुरेसे पैसे नव्हते म्हणून पायीच निघालो. चक्क शनिवारवाडा, तिथुन उजवीकडे वळून कुंभारवेस जुनाबाजार, कोपर्‍यावरील पोलिसचौकी तशीच होती, पुढे जाऊन सध्याचे आंबेडकरभवनचौकात डावीकडे वळून मालधक्यावरुन सरळ पुढे एसटीस्टँण्ड अशी आमची वरात पहाटे ४ चे सुमारास निघालेली होती. रस्ते निर्मनुष्य, भयाण वातावरण, प्रत्येकाच्या हातात/खान्द्यावर दोनतिन ओझी. लौकर पोहोचायची घाई नाहीतर बस चुकेल. काहीतरी पाचसाडेपाचची वेळ होती असे पुसटसे आठवतय. अगदी वेळेत पोहोचलो व पाचच मिनिटात बस निघाली.
तेव्हा एक माणुस शनिवारवाड्यापाशी सांगु लागला की आतुन कसबा पेठेतुन चला, पण आईने ऐकले नाही व माहित असलेल्या बाहेरील रस्त्यानेच आम्ही गेलो.
त्याकाळी पैसे नसले किंवा असलेले वाचवायचे असल्यास असे काहीही केले तरी कुणाला त्यात कमीपणा वाटत नसे. उलट तशा कष्टांना देखिल प्रतिष्ठाच होती, जी कालौघात नष्ट होत गेली.
आता तर काय? जिकडेतिकडे (बापाच्या जीवावर उड्यामारणारे) नवाबजादे /नवाबजाद्याच जास्त दिसुन येतात. आणि "हे काम माझे नाही" हे सांगण्यात भूषण वाटणारेच जास्त.
त्याकाळी कोणतेही काम करण्यास "लाजू नका" असे स्वावलंबन शिकविण्याकडे आईबापशिक्षकांचा कल असायचा..... आजकाल कोणतेही काम दुसर्‍याकडुन करवुन घेऊन आपण कसे स्वस्थ सुखात बसु याकडे जास्त कल असतोय. अर्थात याकरता आईबापही तितकेच दोषी आहेत, कारण "आम्हांला कष्ट पडले, ते आमच्या मुलाबाळांना पडू नयेत " अशा अर्थाची संस्थानी खानदानी मानसिकता सर्वदूर भिनायला लागली. त्याची फळेही भोगत आहेतच जे ते.... कारण शारिरीक कष्ट /हालचाल कमी झाले, की तब्येत हमखास कमजोर होऊ लागते हे "विधीलिखित " आहे.
आजच्या इतके जाड मुले/मुली तेव्हा अगदी क्वचितच बघण्यात यायच्या. आख्ख्या शाळेत दोन चार मुलेच जाडी असायची, तर हल्ली आख्ख्या शाळेत बारीक बेतास बात तब्येत असलेली शिडशिडीत पण काटक मुले शोधुन काढावी लागत आहेत. हा दोष काळाचा नसुन, माणसांचाच आहे असे माझे मत.

Pages