आठवणीतलं पुणं

Submitted by चिनूक्स on 27 March, 2017 - 03:17

गेले काही दिवस अमा, लिंबूटिंबू, केपी, विक्रमसिंह, पूनम, वरदा, आशूडी, गजानन, हिम्सकूल हे 'पुण्यातले पुणेकर' या धाग्यावर जुन्या पुण्याबद्दल लिहीत होते / आहेत. या आठवणी अतिशय रंजक आहेत.

जुन्या पुण्याच्या या आठवणी एकत्र वाचता याव्या, म्हणून हा धागा.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लक्ष्मीरोडवर आजकाल बाईकची रांग असते तशी सायकलींची असायची! मी कोथ्रुडातुन सायकलवर यायचो बर्‍याचदा... एकदा किर्तीच्या चौकात सायकल विसरून तसाच बसने कोथ्रुडला गेलो... २ दिवसांनी सायकल जागेवर जशीच्या तशी! Happy

तुळशी बागेमधले राम मन्दीर restore करण्याचे काम चालू होते १-२ वर्ष .. खूप दिवसात गेलो नाही.
कावरे आइसक्रीआइच्या समोर (लक्ष्मी रोड कॉर्नर ) बोळात एक छोटे हॉटेल होते "आरोग्य मन्दीर" . कुणाला आठवते का?
नगर वाचन मन्दिरासमोर बेलबाग मन्दिर आहे आतल्या बाजूला. टिपिकल मन्दीर आहे हेही ! कुणी पाहिलय का ?

कोथ्रुडचा बस स्टॉप आता शिवाजी पुतळा आहे तिथे बाजुला होता... तिथून डेक्कनला जोडबस असायची कर्वेनगर वा वारज्याहून येणारी.. डेक्कन कॉर्नर पर्यन्त ४० पैसे तर डेक्कन बस स्टॉप ५५ पैसे त्यामुळी नेहमी १५ पैसे वाचवायचो.. २५ पैश्याल चहा मिळायचा हो मस्त! Happy

गर वाचन मन्दिरासमोर बेलबाग मन्दिर आहे आतल्या बाजूला. टिपिकल मन्दीर आहे हेही ! कुणी पाहिलय का ? > हो हो. मी लहानपणी गेले होते तिथे. तेव्हा तिथे मोर पाहिल्याचेही आठवतेय.

>>>> मंडई च्याच एरियात कुठेतरी बैल घाण्याला फिरवतात तशा प्रकारचे एक गुर्‍हाळ होते . <<<<
हे तुळशीबागेत काकाकुवा मॅन्शन पाशी (सध्याचे कोणते ते हॉटॅल आहे प्रसिद्ध जेवणाचे? त्याचे समोर) होते. म्हणजे डायमंड वॉच कंपनीकडुन लक्ष्मीरोडकडे जातानाच्या गल्लीत उजवीकडे. तिथे बैलाच्या घाण्यावर उसाचा रस मी स्वतः प्यायलो आहे. सन १९६८-६९ असेल. नंतरही बरीच वर्षे ते तिथे होते. पण ते लक्षात राहिले ते बैलाच्या घाण्यामुळे नव्हे तर, तिथे एक पाटी लिहीली होती, की "चहापेक्षा उसाचा रस बरा" .....
या पाटीमुळेही लक्षात नाही राहिले, तर गल्ल्यावरील नऊवारीतील बाई स्वतःच चहा पित होती, तिचे चहा पिणे अन ती पाटी यातिल विरोधाभास त्या वयातही लक्षात आल्याने आईला मोठ्या आवाजात त्याबद्दल विचारले तेव्हा आईने "शब्दशः कान पिरगाळुन" गप्प बसवल्याने ते ठिकाण, ती बाई, तो बैल, तो घाणा सगळे सगळे लक्षात राहिले. Happy

लहानपणी टान्ग्यातूनही आम्ही पुण्यात प्रवास केलेला आठवतो. पुणे स्टेशनला जाण्या येण्यासाठी.
त्यानन्तर रिक्शा आल्या. सुरुवातीला ५० पैसे भाडे होते . तो मीटर फिरवताना येणारा विशिष्ठ आवाज, स्टार्ट करतानाची रिक्शेवाल्याची अ‍ॅक्शन हे सगळ कुतूहल असे.

तुळशीबागेच्या गल्लीत (विश्रामबागवाडा ते बाबु गेनू चौक) डाव्या हाताला एक काजाचे दुकान होते, बहुधा त्याकाळी पुण्यातील एकमेव असावे, तिथे तोबा गर्दी असायची. आई घरीच लोकांकरता ब्लाऊज वगैरे कपडे शिवायची त्यास काजे करुन घेण्याकरता तिथे बरेच वेळा आईबरोबर जाणे व्हायचे. त्या गुबदुल माणसाचा चेहरा आजही लक्षात आहे. अन काजाच्या मशिनचा तो प्रत्येक काजावेळचा कर्रर्रर्र कर्रर्रर्र कड कट्ट असा आवाज अजुनही स्मरतो. कालौघात टेलरांकडेच ही मशिन आली, तिथली गर्दी ओसरली, तरी ८५ -८६ पर्यंत ते दुकान होते असे पुसटसे स्मरते. आता नाही ते.

आर्यन कडून लक्श्मी रोड कडे जाताना उजवीकडे फूल बाजार होता .. जुन्या काळच्या चाळीसद्रुष जागा होती ती.
तिथेच पुढे दत्त मन्दिरासमोर रस्त्यातच एक त्रिकोणी चाळ होती. ती आता नाही. त्या जागेवरच आता दगडूशेट गणपती बसतो.

काजे करायचे दुकान स्वीट होम च्या लायनीतही होते. माझी आजी शिवणकाम करायची. तेव्हा हे काजे करून आणायचे काम आम्ही मुले करत असू.

<< हो हो. मी लहानपणी गेले होते तिथे. तेव्हा तिथे मोर पाहिल्याचेही आठवतेय.>> अजूनही पक्षी आणि ससा वगैरे प्राणी आहेत तिथे..

आपल्या बॉटनीच्या साने बाई तिथेच कुठेतरी वाड्यात पशु पक्ष्यांबरोबर राहतात. त्यांच्यावर एक लेख वाचला होता. घरी वीज पण नाही. गुर्हाळात चाके फिरवायचे त्याला घुंगरे लावलेली असत व त्यांचा रिदमिक आवाज येत असे. गुर्‍हाळाला रसवंति गृह चहाच्या दुकानाला अमृत तुल्य चहा अशी नावे. शगुनच्या बोळात माझ्याकाकांचे टेलरिंगचे दुकान होते. मी तिथे जाउन पिपातून अनेक तुकडे शोधत बसे. त्यातून काहीतरी बाहुलीचा फ्रॉक वगैरे बनवायचे. किवा दुपटे. एच डी घाटे टेलर्स. काकांना पुढे १९८० मध्येच मधुमेह झाला व एक पाय कापावा लागला मग दुसरा मग शेवटी ते वारलेच. ही फॅमिली जोगेश्वरीच्या बोळात देवांच्या वाड्यात राहात असे.

>>> तिथेच पुढे दत्त मन्दिरासमोर रस्त्यातच एक त्रिकोणी चाळ होती. <<< हो, अन चाळिच्या पुढे गणपती बसायचा. एरवी तिथे एक सामोसा/कचोरीची हातगाडी लागायची, अफलातुन चव. ही आठवण मी १९७५ ते ८५ दरम्यानची सांगतोय. तेव्हा वडिलांबरोबर त्यांचा मुलगा असायचा, माझ्याच वयाचा. आता ती गाडी मुलगा चालवतो, व महाराष्ट्र टी डेपोच्या कॉर्नरला उभी असते. अजुनही मी वेळेत तिकडे गेलो तर त्याच्याकडुन घेतो.
चहाबाबत महाराष्ट्र टी डेपोचे प्रस्थ चितळेंइतकेच होते अजुनही असेल. वडील नेहेमी तिथुनच घेत. त्यामुळे ती चव कायमची लक्षात राहिली आहे. इतकी की बाहेर कुणाकडे पाहुणा गेले असता हा चहा असेल, तर तत्काळ ओळखता यायचा.
अमृततुल्य हॉटेल्स ही एक वेगळीच कथा, कष्टकरी कामकर्‍यामंध्ये लोकप्रिय. Happy पहाटे चार पासुन त्यांचा दिवस सुरु व्हायचा. आम्ही व्यायामाकरता म्हणुन खरे तर बाहेर पडलेलो असायचो. पण बिना स्वेटरचे ऐन नोव्हे.डिसेंजानेवारी मधिल थंडीत आमचा निभाव लागणे अवघड व्हायचे, पर्वती फार लांब राहिली, सारसबागही न गाठता सरळ भाऊमहाराज बोळात घुसायचो, तो उबदार असायचा. बरेचदा मंडईच्या गर्दीत शिरायचो, भाज्यांचे ट्रक आलेले असायचे, तिथेही उबदार असायचे, कधिमधी नेमके तेव्हाच रस्त्यांचे काम सुरु असेल, तर तिथवर जायचे, तिथे डांबराचे टॅन्क वितळत ठेवलेले असायचे, त्याच्या धगीजवळ थांबायचे, अन जर खिशात पैसे असलेच तर अमृततुल्यमध्ये चहा प्यायचा.... ही परवावधीची चैन असायची, पण ती "चैनच" होती हे समजायला आधी बिना स्वेटरचे केवळ शर्टा हाप पॅन्टीवर पहाटेच्या थंडित बाहेर पडायला हवेच हवे. Happy
हल्ली पुण्यात तेव्हांइतकी थंडीही जाणवत नाही. सिमेंटचि जंगले उभी राहिली अन सगळेच बदललय.

सगळेजण एकसे एक आठवणी लिहिताय. अमा, हर्पेन, वरदा, मस्त वाटतंय तुमच्या आठवणी वाचताना.
पुण्यात बाहेरून येऊन स्थायिक झालेल्यांनी आठवणी लिहिलेल्या दिसत नाहीत.

आम्ही प्रत्येक सुट्टीत मोठ्या मुक्कामाला यायचो पुण्यात. शुक्रवारात मंडईच्या बांबूविक्रेत्यांच्या कोप-यावर बारसोडे वाड्यात मधली आत्या रहायची. तिथून शनिवार वाडा, लाल महाल, तुळशीबाग, पर्वती, सारसबाग, पेशवेपार्क सगळंच जवळ. पायी पायी फिरायचो. तिथं वाडा संस्कृती अनुभवायला मिळाली. मोठी आत्या सपच्या प्राचार्य निवासात. धाकटी आत्या आधी औंधगावात आणि नंतर येरवड्याला हौसिंग बोर्डात. मामाचं घर गोखले हॉलशेजारी अगदी लक्ष्मी रोडवर, जनसेवाच्या समोर. आणि काकुचं माहेर दांडेकर पुलावर. त्यामुळे तेव्हा ब-यापैकी माहिती झालेलं पुणं. नंतर कॉलेजसाठी पुण्यात आल्यावर कलाप्रसादशेजारी, खुन्या मुरलीधरापाशी आणि मग पिल्ल्यांच्या शाळेपाशी अशी सहा वर्षं पुन्हा ऐन सपेतच. तेव्हा सायकलवरून मॉडर्न कॉलेज आणि दर वीकेंडला पुणं पालथं घालत हौसिंग बोर्ड.

आत्या औंधला असताना तिचे सासरे आम्हाला चालत संध्याकाळी विद्यापीठ चौकात कारंज्यावर घेऊन जायचे. गोलाकार कारंज्यात मध्ये सुंदर शिल्प आणि भोवती कठडा होता. त्यावर बसून अंगावर तुषार घेत भोवतीनं रहदारी बघायची. तेव्हा चौकाच्या पाषाण रोडच्या कोप-यावर चौपाटी होती. तिथून भेळ, एस्पीडीपी घेऊन कारंज्यावर बसून खायची. हे साधारण ८४-८७ ह्या दोन-तीन वर्षातलं. तेव्हा विद्यापीठ चौक आणि औंध रस्ता निवांत असायचा.
८७ साली ते येरवड्याला रहायला गेल्यावर येरवड्यातून काका आम्हाला बंडगार्डनला, दोन सिंहांच्या पुलावर, नालापार्कात, मेन कोरेगाव पार्क रोडवर फिरायला न्यायचे. दोन सिंहांच्या पुलाचा आता वॉकिंग प्लाझा केलाय. वाडिया कॉलेज-बंड गार्डन रस्त्यावर आताच्या सन & सँड हॉटेलच्या जरा पुढे तेव्हा हाफीज काँट्रॅक्टरचा (मी चुकतही असेन, पण कुणीतरी नावाजलेला आर्किटेक्ट होता एवढं आठवतंय) एक प्रोजेक्ट झाला होता, नवीनच. आता इमारतींच्या गर्दीत तो हरवून गेलाय, पण तेव्हा त्या सोसायटीच्या नावीन्यपूर्ण इमारती लक्ष वेधून घ्यायच्या.

येरवड्यातला गुंजन थिएटर ते नागपूर चाळीचा रस्ता खूप सुंदर आणि दणदणीत प्रशस्त होता. गुंजन टॉकीज, पालिकेची सुभाषचंद्र बोस शाळा, डॉ. किवळकरांचं हॉस्पिटल, मग चौक ओलांडला की लांबवर पसरलेलं देखणं हिरवंगार गोल्फचं मैदान, मग तुरुंगाचं कैद्यांनी बनवलेल्या वस्तूंचं विक्री केंद्र आणि पुढे विश्रांतवाडीचा चौक. उजव्या बाजूला येरवडा पोस्टाच्या अलिकडे बीएसएनएल आणि सेल्स टॅक्सची मोठी ऑफिसेस, आणि गल्लीत पुरातत्त्वखात्याचं. ती सगळी अजूनही आहेत. तिथपर्यंतची उजवी बाजू आता नगर रोडच्या कोप-यापासूनच पूर्ण कॉर्पोरेट झालीये.

२४ नंबरच्या बसनं ये-जा करत असू. ती कात्रज-हौ बोर्ड बस स्वारगेट ते नागपूर चाळ दीड तास लावायची. शंकरशेठ रस्त्यानं मधनं नाना पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, स्टेशन वगैरे करत जायची. बसायला कधीच मिळायचं नाही. जर गावात कुठं असलो, तर मनपाहून नागपूर चाळीला जाणारी १७३ घ्यायची. येरवडा पोस्टाला उतरून तंगड्या तोडत घरी. ते अंतर अर्धा किमीसुद्धा नसेल, पण तेव्हा ते जाम कंटाळवाणं व्हायचं. तिकडून दर सुट्टीत एक तुळशीबाग फेरी व्हायची. सकाळी लवकर निघून दहाच्या आसपास पोचायचं, दिवसभर सगळ्यांची खरेदी करायची, दुपारी अगत्यमध्ये ब्रेक घ्यायचा. नंतर प्रभात किंवा विजयला एखादा सिनेमा बघायचा आणि संध्याकाळी परत. तुळशीबागेत जायचं म्हणजे खास करून नॉनपुणेकरांना आनंदीआनंद असायचा. अजूनही तुळशीबागेचं आकर्षण असतंच. हौसिंग बोर्डात, त्रिदल नगर भागात तेव्हाही कॉस्मो वातावरण होतं.

लक्ष्मी रोडवर मामाकडे आल्यावर समोर भानुविलासला श्री रामायण, संपूर्ण रामायण वगैरे सिनेमे पाहिल्याचं आठवतंय. एकदा मला आणि मामेभावाला दहा रुपये देऊन मामानं सिनेमाला पाठवलं. गर्दी होती. एक माणूस आला आणि आम्हाला म्हणाला, द्या, मी तिकिटं काढून आणून देतो तुम्हाला. आम्ही दिले त्याला पैसे, तो गेला तो गेलाच. आम्ही तास दिड तास वाट बघून घरी परत आलो. आता मामा ओरडणार ह्याची खूप भिती आणि सिनेमा बघायला न मिळाल्याची हळहळ असं काहीतरी अजूनही डोक्यात आहे. अलकाच्या दिशेनं पुढं गेल्यावर लिनाचिमंच्या चौकात अलिकडे चैत्राली हॉटेल होतं. जनसेवाच्या शेजारचं अमृत तुल्यवालं दुकान (ते अजूनही आहे, नाव विसरले) रात्रभर उघडं असायचं आणि लोकंही रात्री अपरात्री चहा पित असायचे. ते कपबशांचे आणि बोलण्याचे आवाज रात्रीच्या शांततेत लख्ख ऐकू यायचे.

कलाप्रसादशेजारी रहायला आल्यावर सपसमोरचं उदय विहार बघायला मिळालं तेव्हा आनंद झाला होता Happy दुनियादारीनं त्याबद्दल जाम कुतुहूल निर्माण झालं होतं. सप आणि एकंदरच विजयनगर कॉलनीचा तो परिसर तर आजही छान आहे. त्या आणि सदाशिव पेठेतल्या खुप चांगल्या चांगल्या आठवणी आहेत. सगळे गल्ली बोळ, दुकानं, खाण्यापिण्याची ठिकाणं, सगळं केव्हाही आठवलं तरी प्रसन्नता येते.

खुपच लिहिलं!

हर्डीकर टाइपिंग इन्स्टिट्युट च्या शेजारी एक इंदोरी फरसाण नावअचे टपरीवजा दुकान होते. सामोसा फोडून त्यात चटण्या, वरून शेव अशी एक एक्झॉटिक ( तेव्हा तसच वाटायच ) डिश मिळायची. अलीकडे पेट्रोल पंपापाशी ग्रीटवेल च स्टेशनरी च दुकान होतं . तिथे नुसत विन्डो शॉपिंग करायला परवडायच ! , कमवायला लागले की काय काय घ्यायच ह्याची लांबच लांब यादी होती. Happy
शाळेमुळे ,पेठांमधे सायकली घेउन फिरण झालय भरपूर पण बोळांची अन देवळां च्या नावात फार गोंधळ व्हायचा माझा . तेव्हा मैत्रीनींच्या घरांवरून खूणा लक्षात आहेत . जवळपास नारायणपेठ , सदाशिव पेठेतल्या सगळ्या घरांत मी राख्या , रसमयीचे पदार्थ विकले ( विकायचा प्रयत्न ) आहेत. :ड
शाळेमुळे पेठा अन रहात होते त्यामुळे मुकुंदनगर , अन मग मार्केटयार्डाचा भाग , अन सातवीत सायकल मिळाल्यावर जमेल तेवढ पूण फिरून झालय.
मार्केटयार्डाचा भाग बर्‍यापैकी निर्मनुष्य असायचा संध्याकाळ्नंतर. शाळेत अभ्यास कमी इतर उपक्रम जास्त असायचे . पण एकटीनी रात्री अपरात्री भटकायला कधी धास्ती वाटली नाही.
मी लहान असताना , आमच घर , कटारिया शाळेसमोर ,टिमवी कॉलनी, मुकुंद नगरला होतं . बंगल्याच्या आवारात एक अशोकाच ( उंच उभ नाही ,डेरेदार ) झाड होतं त्याच्या सगळ्यात वरच्या फांदीवरून पर्वती दिसायची. झाडावर चढता यायला लागून पहिल्यांदा पर्वती पाहिल्याचा आनंद लख्ख आठवतोय. टिमवि कॉलनी एक मस्त रसायन होतं . भरपूर सार्वजनिक कार्यक्रम असायचे, कोजागिरीच दुध , तेव्हा एक बाल नाट्य अन एक दोन अंकी मोठ्यांच नाटक असायच . गाणी , कवितावाचन पण आठवतय. वर्‍हाड निघालय लंडन ला चा प्रयोग ही झाला होता. गणपतीचे कार्यक्रम , मुलांच्या स्पर्धा व्हायच्या. सुबक बंगल्यांची नेटकी कॉलनी होती ती. आमच्या शेजारच्या टिळकांच्या बंगल्यात तेव्हा जक्कल अन सुतार मंडळी यायची तिथली एक ताई त्यांच्या बरोबर शिकत होती.

सगळेच मस्त मस्त आठवणी लिहिताय. मी पण सुट्टीत जरी पुण्यात आले तरिही मला पुण्यातले रस्ते अजिबात कळायचे नाहीत. पण ९५ साली आले तेव्हा आणि आतापर्यंत च्या वास्तव्यात पुण्यात झालेले बदल खरंच खूप जास्त आहेत.

सई म्हणाली तसं सदाशिव पेठेत रहात होतो, पण स्वारगेट वरून सरळ चालत चालत पण गेली आहे मी कित्येकदा. सुरूवातीला मला कायम कुठेही ब्रॉड रस्त्यावर गेलं की आपण टिळक्/लक्ष्मी रस्त्यावर आलोय असंच वाटायचं.
बादशाही ची मेस राजेशाही होती तेव्हा. क्वचित मज्जा म्हणून समोरच्या अंबिकात चहा... सुंदर चहा मिळायचा तेव्हा.
विठ्ठलवाडी ओलांडलं की हिरवीगार उंचच्या उंच झाडं होती खूप... आणि रस्ता मोकळा..... नंतर पुणं कधी पसरलं कळलंच नाही.

तेव्हा सिंहगड रोड ला जाणार्‍या बसेस सारसबागेच्या आसपास एक मैदान होतं तिथून सुटत. भाडं वगैरे लक्षात नाही.
मी गंमत म्हणून सदाशिव पेठेतल्या एका बिल्डर कडे नोकरी करत होते तेव्हा कानावर पडायचे की संतोष हॉल, धनलक्ष्मी सोसायटी इ. ठिकाणी ६५०-७०० प्रती स्केवर फूट असा रेट होता.

चतृश्रुन्गि मंदिर अगदी थेट गावाबाहेर म्हट्लं तरी चालेल. बालभारती आणि पासपोर्ट ऑफिस सोडलं की थेट मंदिर... आणि त्या वेळी अगदी डावीकडे (पाषाणला) जाणार्‍या रस्त्यावर अनेक हातगाड्या लागत, त्यावर चायनिज, पराठे इ काय काय मिळत असे. ६०-७० रुपयात २ लोक आरामात पोटभर खाऊ शकत.

आत्या तुळशीबागेत घेऊन गेली की नेहमी अगत्य ला न्यायचीच. तिथे मी ओनियन रवा मसाला डोसा पहिल्यांदा खाल्ला आणि खूप आवडला त्यानंतर जेव्ह्वा जेव्हा तिथे गेले तेव्हा तेव्हा तोच पदार्थ खाल्ला. पुण्यात बहुधा ते एकमेव हॉटेल असेल जे त्या डोश्याच्या भाजीत आणि डोशात सुद्धा काजू बेदाणे घालतात. सुदैवाने ते हॉटेल अजूनही आहे. पण बरेच बदलले आहे आता. पुर्वीचे आठवत नाही. Sad

संतोष हॉल नंतर फारच तुरळक वस्ती होती, नंतर फार वाढले, आता लोक पार नांदेड सिटीत पण जाऊन राहतात. थोड्या वर्षांनी ते ही गावात येईल Happy

इन्ना हर्डिकर इन्स्टिट्युट चं नाव काढलंस आणि मला एक गोष्ट आठवली. मी पुण्यात नोव्हेंबर मध्ये शिफ्ट झाले, कॉलेज सुरू व्हायला वेळ होता तोपर्यंत मी शॉर्टहॅन्ड चा क्लास लावला होता हर्डिकर मध्ये, फी वगैरे आठवत नाही पण शॉर्टहॅन्ड शिकवणारे कोल्हटकर सर अगदी ठळक आठवतायत. त्यांच्याकडे तेव्हा काळी की ती सिल्व्हर ब्लुईश अशी कायनेटिक होती. क्लासला मी सपे तून चालत जायची फर्ग्युसन रोड् ला. सात्विक थाळी, मग भ ना मं, तिथून कुमठेकर रोड, टु व्हिलर ब्रिज ला मध्येच ऋतुगंध च्या तिथे एक लोखंडी जिना होता तो उतरून मी जात असे...

मला आठवतंय एकदा असंच सुट्टीला पुण्यात आलेलो असताना मी आणि सई कॉर्पोरेशन वरून हौसिंग बोर्डात परत निघालो होतो, बस ला वेळ होता म्हणून बहुधा तोतापुरी आंबे हातगाडीवर विकत घेत होतो, आणि अचानक माझ्या नाकातून रक्त वहायला लागले, नाकाला मोठा नॅपकिन धरून तेव्हा आम्ही कॉर्पोरेशन वरून हौसिंग बोर्डापर्यंत थेट रिक्षेने गेलो.... बिल झालं होतं २४ रुपये.

हाऊसिंग बोर्ड म्हणजे शॉर्टकटचा रस्ता होता आमचा. कल्याणीनगरहून सायकलवरून विश्रांतवाडीला किंवा टिंगरेनगरला जाताना ते सोयीचं होतं. तिथे शांतीरक्षक सोसायटीत जाणं येणं व्हायचं. २४ नंबरची बस पण माहीत आहे.
आम्ही जवळ राहत असूनही नगरवाला मधे प्रवेश नव्हता मिळाला. आमच्या सोसायटीतली मुलं एक तर जे एन पेटीट किंवा फिलिक्स आणि नंतर वाडिया. वाडियाच्या समोर डिलाईट आणि मोहनीश असे कॅफेज होते. डिलाइट फेव्हरिट. कॉलेजला पोहोचेपर्यंत त्याचं स्वरूप बदललं. मग ते कधीच नाही आवडलं. वाळूच्या जागी ग्रेनाईट आणि काय काय. पण मजाच गेली.
कल्यानीनगर पण बदलत गेलं. मल्टीप्लेक्स आले. नदीवरचा पूल झाला होताच. पलिकडे फाईव्ह स्टार हॉटेल्स आले. पण ओळख हरवली. ती गुलमोहराची झाडं दिसत नाहीत आता.

आजच मी मलाच अनपेक्षितपणे तुळशीबागेतल्या रामाच्या देवळत जाऊन आले! भाऊ महाराज बोळात गाडी लावली. ३१, नवा शुक्रवार या इमारतीत १९९९-२००० ही २ वर्षं मेस होती माझी. आणि त्याच्या शेजारीच असलेला शेवडे बोळ इथे मी रहायचे. १४५२, शुक्रवार. बेहेरे आंबेवाले, हिंदी राष्ट्रभाषा भवन वगैरे..... त्यामुळे तुळशीबाग, शनिपार, ग्रीन बेकरीचे पट्टी सामोसे आणि पाभा चे पाव आणि सगळंच...
अर्थात त्याकाळी पैसे अगदी चिक्कूपणे खर्च करावे लागत त्यामुळे बाहेर खयचं प्रमाण कमी. आणि मेसच्या काकू अगदीच आईसारखा स्वयंपाक करायच्या त्यामुळे तिथे जेवून, पुन्हा डबा घेऊन गेलं की बाहेर खायची गरज पडत नसे .
लिहायला घेतलं तर निव्वळ २ वर्षांतल्याही चिक्कार आठवणी निघतील. १ वर्ष शुक्रवारात आणि १ वर्ष स पे मधे देशमुखवाडीत, पुणे मराठी ग्रअंथालयाची अभ्यासिका, सुजाता मस्तानीच्या समोर फिजिक्सचा क्लास, योगेश हॉस्पिटलच्या शेजारी मॅथ्स, लक्ष्मी रोडला शनि-रवि केमिस्ट्रीचा क्लास..
मग शिक्षण संपवून ८ वर्षांच्या नंतर नोकरीसाठी थेट मॉडेल कॉलनी, ऑफिस नळ स्टॉपला! त्या आणिकच वेगळ्या आठवणी! असो. पण आज जाम नॉस्टॅलजिक झाले होते!!!

सोडून जा पुणे, आपापली क्षितिजे शोधा हे झाले आयुष्यात. म्हणून आता ह्या आठव्णीत गोडी वाट्ते>> हे अगदी मनापासून पटले. मी पुणेरी मानसिकतेच्या घरात अजिबात वाढलेली नाही पण तरीही एकाच शहरात माझं आयुष्य बांधून घालायला मला आवडलं नसतं हे नक्की. घुसमटायला झालं असतं असं वाटतंच.
माझ्यासाठी हे सगळे स्मरणरंजन हे 'कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही' याच क्याटेगरीतील आहे हे आणि ती कृष्णाही मुळात पहिली उरली नाहीये हे अगदी पक्कं माहित आहे Happy

कोथरूड च्या आमराईबद्दल वाचलं ह्या धाग्यावर. पद्मावती - बिबवेवाडी परिसरात, आंबील ओढ्याच्या बाजूला, गुरूराज सोसायटी च्या मागे एक आमराई होती. त्या परिसरात बरीच मोकळी मैदानं होती. तिथे भरपूर खेळलोय (अर्थात क्रिकेट!). त्यावेळी सातारा रोड दोन-पदरीच होता. पण त्यावरून सतत जाणार्या ट्रक्स चं ट्रॅफिक होतं.

त्या आमराई मधे ए. व्ही. भटांच्या मुलाची मुंज झाली होती आणी त्यानिमित्त त्यांनी तिथे एक वाटीका उभी केली होती. मी पाहिलेलं पहिलं थीम पार्क म्हणता येईल. काही अ‍ॅड्व्हेंचर स्पोर्ट्स (उंच मनोर्यावरून खाली गवताने भरलेल्या खड्ड्यात उडी मारणे वगैरे) होते. तिथे रामायणाच्या एका एपिसोड चं शूटींग झाल्याची बातमी / अफवा होती.

आम्ही एमेत असताना कोरेगावपार्कचं एबीसी फार्म्स हे दूर सुनसान वस्तीच्या टोकाचं ठिकाण होतं. तिथे रात्री जायचं तर परतायला वाहन तर मिळायची मारामार असेच पण एकूणच एकाकी होता तो भाग. आता त्यापल्याड वेस्टिन, नदीवरचा पूल असं काय काय झालंय. म्हणजे एबीसी फार्म्सचं अगदी एफ्सी रोडवरचं वैशाली झालंय, लोकेशनच्या दृष्टीने.
तसंच एकदा एमेच्या आधी ट्रायबल म्युझियमला जायला निघाले होते (९२/९३ची गोष्ट). ब्लूडायमंड शेजारच्या. त्या भागाची तेवढी माहिती नव्हती तेव्हा. घरून सूचना मिळाली होती की भारत फोर्जची मोठ्ठी पाटी दिसली की डावीकडे वळायचं. ती पाटी उजवीकडे होती ही गोष्ट मात्र मी ऐकलीच नाही. पेठेतून निघून कॅम्पातून मी मधल्या रस्त्याने आर्मी एरीयातल्या रोडवरून जात होते. मी डावीकडे शोधतेय शोधतेय... किती पुढे गेले तरी पाटी येईना. माझ्या लक्षात आलं की आपण खूप पुढे आलो असणार कारण आसपास शहरी इमारती जाऊन बकालपणा दिसायला लागला होता. मग मी लगेच दिसलेल्या पहिल्या डाव्या रस्त्यावर वळले. सरळ गेले तर एकदम रेल्वे क्रॉसिंग. घोरपडी रेल्वे क्रॉसिंगला पोचले होते. पूर्ण गावठाणातच गेले होते मी. एकाला विचारलं की आता मी ब्ल्यू डायमंडला कसं जाऊ. त्या बाईकवाल्याने मला आपादमस्तक न्याहाळून (कसले पावटे येतात पौडाहून टाईप्स) तुम्ही चुकल्यात की ताई असं ऐकवलं. मग म्हणला क्रॉसिंग ओलांडा आता आणी लांब तिरक्या दिशेला हात करून काही झाडं, इमारती असाव्यात दूरवर असं वाटत होतं तिथे जा म्हणला. तो क्रॉस करून सुमडीत उजवीकडे गेला. मी त्या दिशेला एमेटी ताणली तर काय. रस्ता सोडाच एकदम मी माळरानावरच पोचले. तिथे निवांतपणे म्हशी, शेळ्या बकर्‍या चरत होत्या. आणि पायवाटा होत्या. एका पायवाटेवर सायकलच्या खुणा दिसल्या फक्त. मग तिथल्या एका गुराख्याला विचारलं की ब्लूडी ला कसं जाऊ. परत तेच तिकडे तिरका हात करून - यावेळेस तंबाकूमुळे तोंड बंद होतं. मग मी थोडं तसंच त्या माळरानावरून गचके खात गेले. थोडं लांब गेल्यावर डांबरी रस्त्याला लागले एकदाची. आणखी थोडं गेल्यावर कोरेगाव पंपिंग स्टेशनपाशी पोचले. मग रस्ता विचारून न चुकता म्यझियमल पोचले.
आता हेच घोरपडी खूप पॉश झालंय म्हणे, एकदा कधीतरी त्या रेल्वे क्रॉसिंगला भेट देऊन यायची इच्छा आहे Proud
पण नंतर ब्लूडी शोधता शोधता आपण माळरानावर कशा पोचलो हे आठवून आठवून स्वतःच खूप हसले होते किती दिवस!

हे तुळशीबागेत काकाकुवा मॅन्शन पाशी (सध्याचे कोणते ते हॉटॅल आहे प्रसिद्ध जेवणाचे? त्याचे समोर) होते. म्हणजे डायमंड वॉच कंपनीकडुन लक्ष्मीरोडकडे जातानाच्या गल्लीत उजवीकडे. तिथे बैलाच्या घाण्यावर उसाचा रस मी स्वतः प्यायलो आहे.>> मी पण

टायपिंगचे काय खुळ होते देव जाणे. पण लिमये टायपिंगकडे ६० ची परीक्षा पास होऊन धन्य वाटले होते.त्यामुळे आज आम्ही एकबोटे टायपिस्ट नाही. न बघता टायपिंग करता येते.

तुळशीबागेतील राममंदीर व बेलबागेतील मंदिर ही फारच मस्त आठवण. आजही तुळशीबागेत जायचे असल्यास तो शॉर्टकट वापरुन तिथे २ मिनीटे बसल्यावर स्वर्गीय वाटते. तिथे मस्त सुंठवडा मिळत असे.

केळकर संग्रहालय आमच्या घराच्या बरोब्बर मागच्या बाजुला. तेव्हा ते प्राचीन वास्तुत गेले नव्हते. आमच्या साईडला केळकर यांचा वाडा होता त्यामधुन प्रवेश विनामुल्य होता. मस्त बागडायचो आम्ही त्या मधे. त्या पुरातन वस्तु आडकित्ते, चिलखते, तलवारी खिडक्या वगैरे पाहुन भारी वाटायचे.

त्याच्याच शेजारी कोल्हटकरांची कैलास जीवन फॅक्टरी होती. त्यामुळे आमच्या वाड्यात कैलास जीवनचा वास अखंड असायचा. आमच्या शेजारच्या वाड्यातील एका भिंतीवर चढले की त्या फॅक्टरीच्या पत्र्यावर जाता येत असे. तिथे एक कलमी पेरुचे झाड होते. त्यावरील पेरु चोरणे हा आवडता उद्योग. पेरु तोडायचे व वाड्यात उभ्या असलेल्या गँगला फेकायचे. मग आल्यावर आपला भाग मिळायचा. तरी पोरांवर विश्वास नसल्याने बनियनमधे पेरु भरुन ठेवत असु. पत्र्यावर आवाज आला की काही वेळा कोल्हटकर काका पकडत असत. मग बनियनचे पेरु तिकडे रिकामे करायला लागायचे. Wink

त्या वास्तुला धर्मचैतन्य असे म्हणत. आता इथे मोठी इमारत झाली आहे. या धर्मचैतन्यचे आकर्षण म्हणजे गोपालकाल्याला. लहान मुलांना फोडता येईल अशी छोटुकली दहिहंडी लावुन ती फोडून झाली की सुंठवडा व पोह्याच्या काला मिळत असे. अवर्णनीय असा हा कार्यक्रम असे.

सई - खुन्या मुरलीधर आणि औंध! दोन्ही ठिकाणी मी लहानपणी अनेकदा गेलेलो, राहिलेलो आहे. खुन्या मुरलीधराचे देऊळ ज्या वाड्यात आहे, त्या खरे वाड्यातच (तो वाडा पाडणार होते, माहीत नाही अजून आहे का).

औंधलाही खूप राहिलो आहे. तेथून विद्यापीठ गेट ला चालत म्हणजे बरेच अंतर आहे. सहज जाण्याइतके जवळ नाही.

समाधान चौकातून लक्ष्मी रोड ने गणपती चौकाकडे जाताना उजव्या बाजूला जे मंदिर आहे आतमधे तेच बेलबाग ना? तेथे पूर्वी मोर होते बहुधा. या पूर्वीच्या देवळांमधे वरती त्या हंड्या टांगलेल्या असत ना - हंड्याच का त्या? त्या "प्लस साइन" च्या आकाराच्या खेळातील (त्याचेही नाव आठवत नाही Happy ) सोंगट्यांच्या आकाराचे असत. पुण्यातील जुन्या देवळांत खूप पाहिले आहेत.

त्यावरून आठवले - पावसाचे दिवस असले, तर एरव्ही बाहेरच्या दोरीवर वाळत पडणारे आमचे कपडे घरातल्या दोरीवरच असत. मग ते येता जाता डोक्यावर असत. आमचे आजोबा वैतागून "हे हंड्या, झुंबरे फार मधे येतात" म्हणत त्याला Happy

रानडेच्या समोर होते इंदोरी फरसाण. उत्तम सामोसा व कचोरी मिळत असे.

शुक्रवारात मंडईच्या बांबूविक्रेत्यांच्या कोप-यावर बारसोडे वाड्यात मधली आत्या रहायची.>> मला माहीत आहे हा वाडा. संगम साडी सेंटरपासुन केळ्याच्या वखारी आहेत त्या भागापर्यंत बागडत असायचो आम्ही. अनेकदा पतंगाच्या मागे पळत तर पार शिवाजी रोड पर्यंत पोचलो होतो.

जुन्या पुण्याची आणखी एक अगम्य आठवण - वरातीत की मिरवणुकीत डोक्यावर तसेच एका विशिष्ठ आकाराचे दिवे घेउन जाणार्‍या बायका असत - ते काय असायचे? फक्त अंधुक आठवते.

लक्ष्मी रोड वर एक "जादूची पेन्सिल" म्हणून बोर्ड होता कोणत्यातरी दुकानांत. ते नक्की काय होते माहीत नाही.

शिवाजीनगर स्टेशनच्या खडकीच्या बाजूला (न.ता. वाडी बस स्टॅण्ड) आता जेथे भुयारी मार्ग आहे तेथे पूर्वी लेव्हल क्रॉसिंग होते. मग तेथे भुयारी मार्ग बांधायला घेतला मनपाने. तेव्हा लोक असे म्हणत की तो होईपर्यंत इंग्लंड व फ्रान्स मधले चॅनेल टनेल बांधून झाले होते :). पण लहानपणी शिवाजीनगर स्टेशन जवळ एक नातेवाइक राहात. त्यांच्या घरातून "गाड्या" दिसत. त्यामुळे आमच्या दृष्टीने प्राइम स्पॉट! त्यांच्याकडून संध्याकाळी शिवाजीनगरच्या प्लॅटफॉर्म वर जाउन बसायचे आणि मुंबईहून येणार्‍या गाड्या बघत बसायच्या हा एक आवडीचा उद्योग होता. डेक्कन क्वीन बघितली की मग घरी परत.

पुणे स्टेशन वर तेव्हा कोल्हापूर साइडला जाणार्‍या ट्रॅक वर कोळशाची इंजिनेही असत. ती नक्की कधी गायब झाली कल्पना नाही.

संभाजी पार्क मधे अजून ते मत्स्यालय आहे का कोणास ठाउक. तेथे दिवाळीत मोठा किल्ला बघायला गेल्याचे आठवते.

डेक्कन जिमखाना पोस्ट ऑफिस पाशी उभे राहिल्यावर डेक्कन जिमखाना क्रिकेट ग्राउण्ड, मागची झाडी, त्यामागे दिसणार्‍या टेकड्या हा व्ह्यू खूप सुंदर दिसत असे. अगदी इग्लंड मधल्या ग्राउण्ड्सइतका भारी असेल असे तेव्हा वाटायचे. आता खुद्द इंग्लंडमधली ग्राउण्ड्स बघून आल्यावर ते खरेच होते हे जाणवते.

फर्ग्युसन टेकडी (आम्ही तिला हनुमान टेकडी म्हणायचो) वर जे मारूतीचे देऊळ आहे तेथे सकाळी फिरायला, पळायला वगैरे अनेकदा गेलो. सूर्योदयाच्या आधी तेथे गेलो, की मग होणारा सूर्योदय व त्यावेळचे अर्धेअधिक धुक्यातले पुणे खूप सुंदर दिसत असे. आणि बरेचसे पुणे दिसत असे. सदाशिव पेठेत नागनाथ पाराजवळ राहणार्‍या आमच्या एका नातेवाइकांचा वाडा पाडून तेथे अनेकमजली इमारत झाली होती. तिच्या गच्चीवर गेलो, की असेच "बरेच" पुणे दिसायचे. आजूबाजूला उंच इमारती नव्हत्या फारशा. नंतर ते सगळे बदलले.

खुन्या मुरलीधराच्या मंदिरात कोल्हटकरबुवांचे (तेच ते धर्मचैतन्यवाले) किर्तन ऐकायला आईने कित्येकदा नेले आहे. कधी वेगळे बुवाही असत.
एकदा कोल्हटकर बुवा त्यांचे घराकडुन तुळशीबागेकडे जात असताना बदामीहौद चौकात त्यांची समोरा समोर गाठ पडली, तेव्हा आईने भर रस्त्यात त्यांना वाकून नमस्कार केला, व मलाही करायला लावला. (अर्थात, तेव्हाही काही "सुधारक" वाकुन नमस्कार करण्यास नाके मुरडणारे / कुत्सितरित्या हसणारे उपस्थित होतेच. ) पण कोल्हटकर बुवांचा तो पांढरी दाढी असलेला धीरगंभिर ऋषितुल्य चेहरा आजही स्मरणात आहे. असा नमस्कार केल्यावर तेव्हांची लोकं छानसा आशिर्वादही देत असत... उगाच पाय मागे ओढत, मला कशाला मला कशाला असली थेरं नव्हती. अर्थात काही जणांबाबत मात्र "ही थेरं" म्हणजे, आपण "नमस्कार करवुन घेण्याच्या" लायकीचे नाही आहोत याची सूप्त जाणिव मनात असण्याचे द्योतक देखिल आहेच्चे , अन मी त्यांच्या त्या भावनेचाही आदरच करतो. असो.

Pages