डॉक्टरांचे वाईट अनुभव. पुढच्यास ठेच मागचा शहाणा

Submitted by मेधावि on 18 February, 2016 - 02:54

डॉक्टरांचे/ हॉस्पिटल्स्चे वाईट अनुभव इथे लिहुयात. पुढे जाऊन इतरांना फायदा होईल.

ह्या धाग्याचे प्रयोजन, सर्वच डॉक्टरांची प्रतिमा मलीन करण्याचे नक्कीच नाही, परंतु डॉक्टर हा देव आहे व तो आपले भलेच करेल ह्या (रुग्णाच्या किंवा नातेवाईकांच्या) पारंपारिक, भाबड्या व आंधळ्या श्रद्धेला छेद देणारी अनेक उदाहरणे वरचेवर आजूबाजूला दिसत आहेत. त्यामुळे ह्या व्यवसायातल्या व्यावसायिकांकडून आलेले वाईट अनुभव व धोके इतरांना समजले तर त्यांना अजून जागरुक होता यावे ह्यासाठी हा धागाप्रपंच.

अधिक माहिती - चांगल्या डॉ. चे अनुभव असा दुसरा एक धागा देखिल आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कर्वे/पौड रोडवरचे देशमुख. माझी मुलगी ३ रीत असताना त्यांनी ट्रीटमेंट सुरु केली व पहिला हप्ता ४ ह. घेतले. म्ह़णजे फक्त दाताचे माप घेतले नंतर दर महिन्यात त्यांना जाऊन दात दाखवायचे. नंतर ती ८ वीत अस्ताना खरी ट्रीटमेंट सुरु झाली. खरं तर एवढ्या लहान वयात ती सुरुच करायची नसते असे नंतर समजले. त्यानंतर ३ वर्षांनी ब्रेसेस काढल्यानंतर दात परत पुढे आले कारण रिटेनर्स घालता आल्या नाहीत. त्या घातल्या की उलटीची भावना होते म्हणून. हा धोका आधी सांगितला नव्हता. मग परत त्यांच्याक्डे गेल्यावर त्यांनी परत ६५ ह लागतील व आक्खी च्या आक्क्खी ट्रीटमेंट परत करावे लागेल असे सांगितले. त्यांच्याकडून काम केलेल्या व रिवर्क्च्या जवळपास अश्याच किमान १० केसेस आम्हांस माहीत आहेत. ब्रेसेस काढल्या की दात परत पुढे येतात पण रोज रिटेनर्स घालणे प्रॅक्टीकली शक्य नाही. पण हा धोका आधीच सांगायला हवा होता. आता परत तिच्या दाताला ब्रेसेस घातल्या आहेत व त्यासाठी फक्त २० ह घेणारे डॉ. मिळाले आहेत व ते उत्तम काम करत आहेत.आता ब्रेसेस काढल्यानंतर आतल्या बाजूने लावायच्या पर्मनंट रिटेनर्स लावणार आहोत. हा पर्याय आधी केलेल्या ट्रीटमेंटच्या वेळेस सांगितला नव्हता अन्यथा ब्रेसेस लावल्याही नसत्या. हे डॉ. मुलांशी, पालकांशी व स्वतःच्या स्टाफशी अत्यंत उर्मटपणे बोलतात.

एक भयंकर स्वानुभवः

ज्या दिवशी मला अ‍ॅडमीट केले होते आणि नंतर रक्ताची गाठ फुफ्फुसापर्यंत पोचली आहे असे निदान झालेले होते त्यादिवशी सायंकाळी नेमके घरी कोणी नव्हते. तीन ते चार वेळा मला तोंडातून रक्त गेले. पाठीत प्राणांतिक वेदना होत होत्या. अनंतचतुर्दशी असल्याने एकही दवाखाना उघडा नव्हता. शेवटी स्कूटर ताणत कसाबसा दवाखाना शोधायला बाहेर पडलो आणि पौड रोडवर एक डॉ. जगताप म्हणून भेटले. ते का कोण जाणे पण रागावूनच बसलेले असावेत. मी त्यांना माझे दुखणे सांगितले आणि रक्त वगैरे गेल्याचे सांगितले. मला अंदाज होताच की अ‍ॅडमीट व्हावे लागणार. पण निदान बायको बाहेरून येईपर्यंत काहीतरी जुजबी उपाय होतो का ते पाहावे अश्या हेतूने मी एकटाच ह्या डॉक्टरांकडे आलो होतो. तसेच रिक्षेत बसून हॉस्पीटलला गेलो असतो तर फारच एकाकी वाटले असते.

माझे म्हणणे ऐकून आणि मी घेत असलेली पेन किलर्स पाहून डॉक्टरांनी मला अ‍ॅडमीट व्हा असे सुचवले. ती अपेक्षा होतीच. मी ठीक आहे असे म्हणलो. त्यावर ते म्हणाले की अ‍ॅसीडिटीमुळे असे काही झाले असले तर पाव किलो आईसक्रीम खा. हे मला नवीन होते. अ‍ॅसिडिटीमुळे छातीतून रक्त वर येऊन तोंडावाटे जाते की नाही हे मला माहीत नव्हते पण मला असे वाटत होते की अ‍ॅसिडिटीने इतके रक्त वगैरे जाणार नाही. तरी म्हंटले ठीक आहे, आईसक्रीम खाईन. मग अचानक म्हणाले तुमच्या केमिस्टला काही डोक्याचा भाग आहे का, एवढी पेन किलर्स देतात का? हे सगळे पेन किलर्समुळे झालेले आहे. मला ते सगळे सहन होत नव्हते. तेवढ्यात कोणीतरी एक मुलगा स्वतःलाच दाखवायला आला तर त्याच्यावर खेकसले म्हणे बाहेर थांबता येत नाही का, दिसत नाही का मी पेशंट बघत आहे हे!

मी आपला कसाबसा फी देऊन आणि सुटका करवून घेऊन निसटलो.

चांगल्या डॉक्टर्सच्या धाग्यावार दीनानाथचे खुप उल्लेख वाचले, तेव्हाच माझे हात शिवशिवत होते. मी आणि माझ्या सारखे अ‍ॅन्टी दीनानाथ (माझ्या माहितीत खुप आहेत), आम्हाला असं वाटतं कि तुम्हाला तुमचा पेशंट नकोसा झाला असेल तरच तुम्ही दीनानाथ मधे अ‍ॅडमिट करावं. हा खात्रीशीर लिगली मारुन टाकण्याचा उपाय आहे. असं इतकं कडवट लिहिते आहे मी पण, तिथल्या अनागोंदी कारभार आणि केअरलेस स्टाफ आणि डॉक्टर्सची अतीव चीड येते मला. एकदा माझ्या सासुबाई, एकदा मावशी आणि एकदा कलिगचे बाबा अशा तीन वेळा टोकाचा वाईट अनुभव घेतला आहे.

सासुबाईंना स्कीनला असह्य जळजळत होतं. जखम नाही, रॅश नाही, बाहेर काहीच दिसत नव्ह्तं, पण मलमलच्या कापडाचा स्पर्श सुद्धा सहन होत नव्हता. हर्पिस असावं असा फॅ. फिजिशियनचा अंदाज होता. पण इतक्या सहनशील बाईला रडायला लावणारी गोष्ट नक्कीच फार सिरियस होती, म्हणुन दीनानाथला अ‍ॅडमिट केलं. आईची एक ७ महिन्यांपुर्वीच Angioplasty झाली होती, त्याचे पेपर्स बरोबर नेले होते. सगळे मेडिसिन्स, प्रिस्क्रिप्शन्स बरोबर होती. जे जे डॉक्टरला सांगायला हवं ते सुजाण माणसांप्रमाणे सांगितलं होतं.
अ‍ॅडमिशन झाली पण ३-४ दिवस कोणी फिरकेनाच. २ दिवसातुन एकदा कधी तरी एकदा रात्री ११.३०/१२.०० वाजता 'ते' खास डॉक्टर यायचे. स्वतःचं प्रायवेट क्लिनिक झालं, स्वतःची पर्सनल काम झाली कि झोपण्याआधी उपकार केल्यासारखी चक्कर मारायची. नवरा युरोपमधे होता त्याला काही कळवलं नव्हतं, कारण सिरियस आहे कि फक्त ट्रीटमेंट्स घेवुन जायचं आहे हे कळालं नव्ह्तं. त्याचे मित्र, कझिन्स किंवा माझा भाऊ यांना ठराविक वेळे नंतर थांबायला परवानगी नव्ह्ती. बरं त्यांना दुसर्‍या दिवशी उद्योग धंदे असणार त्यामुळे रात्री थांबवणार तरी किती वेळ. त्यांच्यापैकी कोणाला डॉक्टरला भेटायचं असेल तर फिक्सड वेळ काळ नाहीच. ९.३० ची वेळ राउंडची पण हे उगवणार कधीही. आई पण कधी तरी वेदनेतुन सुटका होवुन झोपलेली असायची, तर हे येवुन तिला उठवणार. परत झोप कधी लागेल त्याची खात्री नाही.

शेवटी आमचा दिवस उजाडला. गेल्या ३ दिवसात केलेल्या एकमेव टेस्ट - सोनोग्राफीनंतर गॉल ब्लॅडर काढुन टाकावं लागेल असा डिसिजन मिळाला. स्टोन्स मुळे स्कीनला इरिटेशन होतं आहे असं निदान झालं. तेवढ्यात नवरा परत आला होता. त्याने सहज एका डॉक्टर मित्राला आईच्या सर्जरीबद्दल सांगितलं. तो घरचाच होता त्यामुळे त्याला Angioplasty नंतर चालु असलेल्या ब्लड Viscosity च्या मेडिसिन्सची आठवण केली. ब्लड थिनींग मुळे सर्जरी करणं धोक्याचं असतं असं सांगितलं. आम्ही लगेच डॉ. ग्रँटला फोन करुन ओपिनियन घेतलं. त्यांनी सर्जरी अशी अचानक करायची नाही आधी ब्लड Viscosity ची मेडिसिन्स बदलुन / कमी करुन मगच सर्जरी करा असा सल्ला दिला. हे दीनानाथच्या स्पेशॅलिस्टना माहित नसावं कि केस हिस्टरी चेक करण्याइतका वेळ त्यांना नसावा? :रागः
दररोज आलं कि भरमसाठ औषधं मात्र लिहुन द्यायचे. तो खर्च सहजच परवडणारा होता आणि नसता तरी पेशंट्स अशा बाबतीत हयगय करत नाहीत. मात्र ती औषधं वेळेवर देणं हे तिथल्या स्टाफचं कर्तव्य नव्हतंच. मला सगळ्या वेळा आणि सगळी मेडिसिन्स माहित होती, त्यामुळे २-३ वेळा नर्सला बोलावल्यावर आली नाही तर मी वेळ झाली कि स्वतःच ते स्केड्युल सांभाळत होते. पण अशिक्षीत लोकांनी काय करायचं? जेवण येवुन गार होत आलं तरी शुगर चेकसाठी ब्लड न घेणं किंवा जेवणा आधी इन्सुलीन साठी १० वेळा बोलवावं लागायचं. चीड येइल असे मख्ख नर्सेस आणि स्टाफ होता. बाजुला एक आजी अ‍ॅडमिट होत्या त्यांना बेड पॅन हवं असलं कि द्यायला येणार्या मावशी त्या आजींना रडकुंडीला आल्या शिवाय कधीच यायच्या नाहीत. तेव्हा तर मला मारामारी करावीशी वाटायची. त्या ४ दिवसांमधे मला हॉस्पीट्ल्स आणि त्या रिलेटेड लोकांशी नफरत झाली होती. ( बाय द वे, माझा patience quotient भरपुर आहे ). डॉक्टर्सचा उत्साह तर फुकट ट्रीटमेंट देताहेत इतपतच होता.
शेवटी आम्ही आईला, आमच्या डॉक्टर मित्राच्या सल्ल्याप्रमाणे तिथुन घरी आणलं. त्याला सहज शंका आली कि हा डायबेटिक न्युरोपॅथी (टर्म कदाचित चुकली असेल, पण असंच साधारण) मुळे होणारा त्रासही असु शकतो. म्हणुन आम्ही डॉ. दिवटेंची अपॉइंटमेंट मिळवली ( खुप अवघड असते, पण नंतर कळालं कारण कि केवढा जिनियस माणुस आहे आणि पेशंट्स का त्यांनाच भेटण्यासाठी थांबुन रहातात. कोणी तरी म्हणालं तसं न्युरोलॉजीतला बाप माणुस) त्यांनी फक्त एक मिरॅकल मेडिसिन दिलं. नाव लिहित नाही इथे. आणि आई दुसर्‍या दिवशी पासुन ठणठणीत झाली. अगदी नॉर्मल. स्कीन जऴजळणं पुर्ण बंद. आम्ही गॉल ब्लॅडर सर्जरीसाठी तयारी म्हणुन जी औषधं घेत होतो. ती डॉ. दिवटेंनी बंद करायला सांगितली आणि सोनोग्राफी रिपोर्ट पाहुन गॉब्लॅ काढु नका सांगितलं.

आता ९-१० वर्ष झाली. अजुन गॉब्लॅ काढलं नाही, तिला काही त्रास ही झाला नाही त्याचा. आता एकदम टुण्टुणीत आहे. Happy

प्राणांतिक वेदना होत असताना नेहमीच्या डॉक्टरकडे किंवा हॉस्पिटलमधे न जाता जनरल प्रॅक्टीशनरकडे जाणे ही चूक आपण केली आहे हे जर समजले नाही तर पुढे बोलण्यात अर्थ नाही. मोठ्या हॉस्पिटलमधे लगेचच तपासण्या केल्या जातात. पण मागच्या तपासण्या करूनही जर नव्या ठिकाणी त्याच त्याच तपासण्या कराव्या लागत असतील तर ?

माझ्या वडिल्यांच्या पोटदुखीच्य निमित्ताने हा अनुभव सर्वत्र घेतला आहे. घोले रोडवरच्या गोखलेंकडे तपासण्या केल्या. पण गुण आला नाही. त्यांना अंदाजच येत नव्हता. मग कर्वे रोडवर राजेश तांदुळवाडकर यांच्याकडे दाखवले. त्यांनी पूना हॉस्पिटलला अ‍ॅडमिट व्हा असं सांगितलं. महिना पण झाला नव्हता. पण त्याच तपासण्या पुन्हा. ते म्हणाले की बहुतेक मानसिक आजार असावा की मला काहीतरी होतंय. पन्नास हजाराच्या घरात इथे पैसे घालवले. बिलात डॉक्टर फीज मधे १३००० रु. आकडा घातला होता. वडिलांनी आरडाओरडा केला. पण कसंबसं प्रसंगावधान राखलं. काही फायदा नसतो. ट्रीटमेंटनंतर महिना तीन चार हजारांच्या गोळ्या सहा महीने घेतल्या. सुरुवातीला पंधरा दिवस जरा बरं वाटलं.पुन्हा ये रे माझ्या मागल्या.

त्या आधी स्वारगेटच्या पुढे कटारिया नावाच्या डॉक्टरने त्याच नावाच्या हॉस्पिटलमधे भिंगातून शस्त्रक्रिया करू असं सांगितलं. पोटात खडे झाल्याने दुखतं असं म्हटलं होतं. भूल दिली. शस्त्रक्रिया झाली. त्यांनी खडे पण दाखवले. गोखलेंकडे दाखवलं तेव्हां शस्त्रक्रियेचं काहीच चिन्ह दिसत नाही असं म्हणाले. तांदुळवाडकर पण तेच म्हणाले. आणखी दोघांनीही तेच सांगितले. अजून बरेच अनुभव आहेत.

शेवटी वैतागून निसर्गोपचार केंद्रात ठेवावं असा निर्णय घेतला. कारण रात्रभर त्यांचं कण्हणं सहन होत नव्हतं. दुर्लक्षही करता येत नव्हतं. हातात काहीच पर्याय नाहीत. उरुळीच्या केंद्रात सहा महीने अपॉइण्टमेण्ट्स फुल्ल. मग डॉ जायस्वाल यांच्याकडे इलाज केला. त्याचा गुण आला. नंतर होमिओपॅथीकडे वळालो. आता नियंत्रणात आहे सर्व.

डॉक्टर म्हणजे ब्रह्मदेव आहे का त्याला सगळं समजायला?
बग आला आणि लॉगस नीट नसले आणि धड सिम्प्टमस सांगितले नाही किंवा आम्हाला कळले नाही. तो इश्यू रिप्रोड्यूस करता आला नाही (म्हणजे तिकडे डॉक्टरनी आधी कधी पाहण्यात नाही, जर्नल मध्ये वाचलं नाही) तर आम्ही इंजिनिअर जे करतो ते, म्हणजे साधारण जिकडे प्रॉब्लेम असू शकेल तिथे आणखी लॉगस टाकणे, कोड रीड करून काही ओब्व्यूअसं प्रॉब्लेम समजतोय का बघणे, तुमचा कोड असेल तर शेजारच्याला तो वाचायला देणे की नव्या डोळ्यांना काही दिसतंय का? नेटवर्किंगचा असेल तर packet ट्रेस मागवणे, कॉन्फिगरेषन parameter बदलून बघणे, लोड कमी करणे, टायमिंग इश्यू आहे का बघणे. किमान काही वर्क अराउंड तरी शोधणे, काही सापडलं नाही पण अंदाज आला कुठे प्रॉब्लेम असेल आणि तेवढा भाग कमेंट आऊट करून जनरल काम चालणार असेल तर ते करून एक नाईटली बिल्ड काढणे, मोठा कस्टमर असेल तर वेगळी ब्रांच काढणे की त्याला दिलेले बदल रिपो मध्ये सेव होतील.
असं करत राहिलं की प्रॉब्लेम मिळतोच मिळतो. फक्त आम्ही यंत्रावर काम करत असतो, हार्ट बीटचा कोड थांबला तरी रिस्टार्टचा पर्याय असतो. डॉक्टरलोक जिवंत माणसावर प्रयोग करत असतात. हार्ट बीट आणि बरेच व्हायटलस कोलमडले की बोंब होते. Happy
पण चांगला धागा, जनरल माहिती मिळेल आजार आणि कॉम्प्लीकेशनची.

लिहिलेले नीट वाचलेले नसले की काही प्रतिसाद येतात. अनंतचतुर्दशीला कोथरूडमधील सर्व रस्ते गर्दीने फुल्ल होते. सायकल काढायलाही जागा नसण्याचा प्रकार होता. मी माझ्या घरात एकटा होतो. जवळपास कोणाचाही दवाखाना उघडा नव्हता. दवाखाना शोधत फिरावे लागत होते. दीनानाथला एकट्याने जाणे शक्य नव्हते. ह्या गोष्टी टाईमपास म्हणून लिहिलेल्या नाहीत. अधिक लिहवत नाही.

अमितव
माझ्या अनुभवामधे त्याच तपासण्या पुन्हा करण्याविषयी बोलतोय. प्रत्येक महिन्याला काय गरज आहे असं विचारलं तर डॉक्टरांची उत्तरं उडवाउडवीची असतात. एकाने तर करायच्या नसतील तर रामराम असं उर्मट उत्तर वडिलांना दिलं. मी पुन्हा गेलो आणि त्याला म्हटलं तुमचं जे काही कमिशन बुड्त असेल ते देतो पण आहे त्या रिपोर्ट्सवरून काम चालवता येत नसेल तर दुकान बंद करा.

प्रत्येक वेळी रिपोर्ट्स नॉर्मल येत असतील तर एखादी तरी टेस्ट वेगळी असायला हवी ना ? निदान होत नाही, औषधयोजना लागू पडत नाही म्हणून फीस कमी घेतात का ? पूर्ण फीज देऊन वर बिलात कमिशनची रक्कम दिसते तेव्हां काय अवस्था होते हे त्याच वेळी कळतं. यांच्या रॅकेटचा आपण कळून सुद्धा भाग होत असतो. ही लूटमार नाही का ? पाचशे रूपये कन्सल्टिंग आणि पुढे प्रत्येक व्हिजीटला तीनशे रूपये खळखळ न करता देतो. शिवाय इयतर चार्जेस निराळे. जर मागितले तर पाचशेच्या जागी हजार रूपये पण द्यावेच लागले असते. मग ही पाकीटमारी कशासाठी ?

एव्हढं करून काही फायदा नाही. तरीही डॉक्टर म्हणतात प्रयत्न चालू ठेवू. सलग तीन वर्षे हा त्रास काढल्यानंतर पूर्णपणे मेडीकल दरोडेखोरीचा अनुभव घेऊन झाल्यानंतर चांगलंच बोलायचं ? निसर्गोपचार केंद्रात गेल्यावर गुण येत असेल तर मग हे नेमकं काय करत होते इतके दिवस ?

याउलट सुद्धा अनुभव येतात. त्यांच्याबद्दल सुद्धा लिहीन सावकाश.

मी तुमच्या प्रतिसादा नंतर प्रतिसाद दिला, पण तो सर्वस्वी तुम्हाला उद्देशून न्हवता. अनेक डॉक्टरना कळलं नाही किंवा नक्की निदान झालं नाही या भागाला माझ्या क्षेत्रातली analogy लावली. जितके इंजिनिअर किंवा इतर कुठल्याही प्रोफेशन मधेले लोक हुशार असतात, काळे गोरे असतात तितकेच डॉक्टरही असतात. इतकंच म्हणायचं आहे. तुम्हाला आलेल्या अनुभवाला तोलायचा उद्देश नाही.

अमित, देव नसतो हे माहित आहे. पण कमीत कमी प्रामाणिक माणुस असावा एवढीच अपेक्षा.

समोरच्या माणसाला मी काय करतो आहे ते माहित नाही म्हणुन प्रयत्न न करणे किंवा कमी करणे हे चुक. मिरॅकल्सची अपेक्षा नाही पण प्रामाणिकपणाची नक्कीच आहे.

अपवाद चिक्कार आहेत. सगळ्या डॉक्टर्स बद्दल आकस नाही, पण शेंड्या लावणारे काही सगळ्यांनाच बदनाम करतात.

माझंही प्रोफेशन तेच आहे. डिझाईन व्हॅलीडेशन प्रकार कळतो. तसंच मेडीकलचं ज्ञान नाही हे ही कबूल. पण काही गोष्टी ध्यानात येण्यासाठी त्याची आवश्यकता नसते. त्या त्या वेळेला आपल्याला ते जाणवत असतं.

अपेक्षा अगदी ठीक आहे. मला कशाही बद्दल आक्षेप नाही, या धाग्याबद्दल अजिबात नाही. आपले अनुभव आणि माहिती नावासकट मला वाचायला नक्की आवडेल. रादर ती मदतच करेल. भारतात अशा साईट आहेत का माहित नाही, पण रेट युर डॉक्टर बघूनच मी डॉक्टर कडे जातो. सो या धाग्याचा फायदाच आहे.
फक्त डॉक्टरबद्दलची analogy लावून बघितली. डॉक्टर देव आहे इ. कल्पना मला मान्य नाहीत, तो एका शाखेचं शिक्षण घेतलेला तुमच्या आमच्या सारखा माणूस आहे. त्यात काही खोटे, खरे, प्रामाणिक, लालूच दाखवणारे सगळे असणारच.
बस इतकंच. ते कोण हे स्वानुभवातून कळण्याआधी कोणी सांगितलं तर निर्णय घेताना फायदाच होईल.
अर्थात इथले सगळे ग्रेन ऑफ सॉल्ट बरोबर सगळ्यांनी घ्यावे, मी तरी घेईन.

माझ्या वहिनीच्या डिलेवरीच्या वेळेस सोलापुरातिल डॉ. कुलकर्णिचां भयानक अनुभव आलेला
कुठल्या तरी जन्माची दुश्मनी काढल्यासारखे वागणे होते
थोडा वेळ गेला असता तर पोटात मुल दगावले असते.

दुसरा अनुभव पुण्याचा परिहार चौकातले स्पर्श क्लिनिक मधिल स्किन स्पेशालिस्ट्चे डॉ. चे नाव लक्षात नाही.

पिंपल्सच्या ट्रीटमेंटने एवढे भयानक परिणाम झाले की लोकांनी त्याच्यावर केस करायचे सल्ले दिले.

अमितव ह्यांच्या प्रतिसादामुळे एक आठवलं! साईनफिल्ड मालिकेत जेरी साईनफिल्ड एकदा विचारतो की जे डॉक्टर शिकत असताना वर्गात सर्वात कमी मार्क्स घेऊन पास होतात त्यांचे पुढे काय होते? ते कुठे जातात? वगैरे! ते मजेशीर होते म्हणून आठवले. पण खरेच अ‍ॅकॅडेमिकली अशी वर्गवारी झालेली असणारच! शिवाय, हा असा पेशाही असावा ज्यात 'हाताचा गुण, अनुभवाचा लाभ, निदान अचूक करण्याची हातोटी' वगैरे 'बहुधा शिकवल्या न जाणार्‍या'ही बाबींचा समावेश होत असावा किंवा ते रुग्णसापेक्षही असावे. म्हणजे एकाला एक डॉक्टर आवडतो तर दुसर्‍याला नाही वगैरे.

दीनानाथचा कारभार हळूहळू अनागोंदी होत आहे हे मान्य आहे. पसाराही अफाट वाढवून ठेवलेला आहे. तरीही माझी अशीच आपली श्रद्धा आहे कारण दोन्ही वेळा मला अतिशय उत्तम ट्रीटमेन्ट व डॉक्टर्स मिळाले.

Aditya birla cha hi asach bhayanak anubhavatey anekana alay.
Mala nahi.... Mazya sudaivane ani devichya krupene amhala aajwar sagalech dr changale milaleyet.
Mazya sathi devasarkha dr n dev hach dr

माझ्या पत्नीच्या बाबतीतला अनुभव.

रुपा गाडगीळ म्हणून गायनॅक होती. आमच्याच सोसायटीत रहायला. त्रास होतो म्हणून तिला दाखवले तर तिने अ‍ॅडमिट व्हायला सांगितले. ओळख आणि विश्वास यामुळे ती म्हणेल तिथे अ‍ॅडमिट केलं. सीस्ट होतं. पण कॅन्सर होईल , इमर्जन्सी आहे, ताबडतोब निर्णय घ्यावा लागेल असं सांगून एक बाजू त्यांनी काढून टाकली. मूल होण्याचे चान्सेस निम्म्यावर आल्याने मग ब-याच ठिकाणी फिरावं लागलं. त्या प्रत्येक ठिकाणी रिपोर्ट्स पाहून उगीच घाई केलीत असं सांगितलं. ओळखीची असल्याने क्वालिफिकेशन पाहीलेलं नव्ह्तं ती बीएएमस असून गायनॉकॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टीस करत होती. गानला हॉस्पिटलमधे सर्जरी वगैरे करत होती. केस केली असती तर नक्कीच कारवाई झाली असती. पण त्या वेळचं वय, ओळख आणि शिवाय झालेलं भरून निघणार आहे का हा विचार यामुळे नाही केली केस.

शंकरशेठ रोडला मीरा हॉस्पिटल आहे. इथला अनुभव अतिशय चांगला. सज्जन लोक आहेत. त्यांनी प्रयत्न करूया म्हणाले. नंतर तेच म्हणाले की माझ्याकडून होण्यासारखे जे काही होते ते मी केलं आहे. दोष असता तर दूर करता येतो. इथून पुढे उगाच तुम्हाला खर्चात पाडावं असं वाटत नाही. मग कुणीतरी रिफर केलं म्हणून लक्ष्मी रोडला डॉ. सोमण यांच्याकडे गेलो. त्यांनी दीड वर्षे भरपूर बिल केलं. नंतर ते वारले. त्यानंतर त्यांच्या क्लिनिकमधली रिसेप्शनिस्ट भेटली होती. तिने सांगितलं की ते स्त्रीरोगतज्ञ नाहीत. त्यांना यातलं काहीही कळत नाही. भरपूर तक्रारी येतात, बरेचदा मलाच हँडल कराव्या लागतात. राजीनामा द्यायचाच होता पण अचानक असं झालं.
काही एक चूक नसताना भोगावं लागल्याने मन कटू होतं.

डॉक्टर देव असतो असं कुणी म्हणत नाही. चुका पण समजून घेऊ शकतो. पण यांना चुका कसं म्हणता येईल ?

चांगल्या अनुभवांमधे पुतणीच्या बाबतीत.

जन्मःच तिच्या हृदयात छिद्र होतं. ते दुस-या वर्षात उघड झालं. सुरूवातीला डिटेक्ट नाही झालं. डॉ फडणीस म्हणाले आपण औषध गोळ्यांनी प्रयत्न करून पाहू. त्यात तीन वर्षे गेली. मग हिरेमठांना रिफर केलं. त्यांचं म्हणणं होतं अशी ऑपरेशन्स लवकरात लवकर केलेली बरी असतात. पण पडणिसांचं म्हणणंही योग्य आहे असं म्हणाले. हिरेमठांनी मग ख्यातनाम सर्जन जगताप यांना बोलवलं. रुबीमधे ऑपरेशन पार पडलं. त्या वेळी त्यांनी काय दर घेतले वगैरे सगळं गौण आहे. कारण पूर्ण माहिती दिली गेली. धोके समजावून सांगितले गेले. सर्जननी आत जाण्याच्या आधी काय करणार आहे हे सांगितलं. झाल्यानंतर येऊन भेटले. काही डॉक्टर्स तर खेकसतात. एकेकाला प्रचंड इगो देखील असतो. जगताप आज पुण्यात एक नंबरचे सर्जन असताना त्यांना भेटणं कसं काय जमतं ?

डॉ मानकर म्हणून बालरोगतज्ञ आहेत. वीस वर्षापासून ते प्रसिद्ध आहेत. सुरूवातीला पंधरा रूपये फी होती. नंतर तीस रूपये झाली. ती दहा वर्षे होती. पुढे खूप गर्दी आणि एकंदरच महागाई मुळे सत्तर रूपये केली. त्या वेळी इतर लोक तीनशे रूपये घेत . गरीबांची फीज ते आजही घेत नाहीत. तसंच गरीब रुग्णांना प्राधान्य दिलं जातं. अनेकदा आमचा नंबर असून यांना का आत घेतलं म्हणून वादही होतात. तीनशे तीनशे नंबर संध्याकाळचे असतात.

याचं रहस्य कळालं. त्यांची मुलाखत आली होती. लहान असताना त्यांची बहीण उपचाराचा खर्च झेपत नसल्याने मृत्यूमुखी पडली. त्याच वेळी त्यांनी डॉक्टर होऊन अशा रुग्णांची सेवा करीन अशी प्रतिज्ञा केली होती. आज त्यांच्या हाताखाली तयार झालेले डॉक्टर्स बालरोगतज्ञ म्हणून प्रख्यात झालेले आहेत.

कपोचे,
तुम्ही डॉक्टरांकडे उपचार घेण्याआधी शहानिशा केली नव्हती का? शिवाय दीर्घकाळ उपचार घेताना सेकंड ओपिनीयन घेतला नाही का?

हा धागा कालांतराने वाहू लागणार आहे का? (प्रतिसाद विशीत पोचले की भीतीच वाटू लागते अलीकडे)

कपोचे यांना आलेले अनुभव डॉक्टरांचे नसून वैदू उर्फ क्वॅक्सचे असावेत असे दिसतेय.

अमुक महोदयांना (लक्ष्मी रोडला स्मृतीशेष डॉ. सोमण) डॉक्टरकीतलं काही कळत नाही, मलाच हँडल करावं लागतं असं रिसेप्शनिस्ट सांगते, व हँडलही करते, हा अनुभव सद्गदित करून गेला..

जेव्हां मनुष्य एकाकडून दुसरीकडे फिरत असतो तेव्हां सेकंड पेक्षा जास्त ओपिनियन झालेले असतात. माझे वडील आधी स्वत्:च फिरत होते . सेकंड ओप्नियन ज्यांच्याकडे घेतला त्यांनी घोले रोडला त्यांचे मित्र आहेत डॉ गोखले त्यांच्याकडे रिफर केलं. त्यांनी आणखी एकाकडे रिफर केलं. तिथेच माझा वाद झाल्याने मग डॉ. तांदुळवाडकरांकडे मी पुन्हा ओपिनियनसाठी गेलो. तिथला अनुभव दिलाच आहे.

एकाच ठिकाणी गेलो आणि वाईट अनुभव आला तर सेकंड ओप्नियन का घेतला नाही असं नक्कीच म्हणू शकतो आपण. जसं माझ्या पत्नीच्या केसमधे. पण त्या वेळी एकतर वय कमी आणि घाबरवून टाकलेलं होतं. सेकंड ओपिनियनला चान्सच नव्हता.

दीड मायबोलीकर'
तुम्ही या केसेसमधे पर्सनली केसपएपर्स पाहून बोलताय की फक्त आपल्या व्यवसाय म्हणून ? तुम्ही शपथेवर सांगता का की तुम्ही सोमणांना ओळखता आणि ते गायनॅकॉलॉजिस्ट होते म्हणून ?
कमिशन मागितलं जात नाही हे तुम्ही शपथेवर सांगता का ?
माहीत नसताना बोलू नका
माझ्या वडलांची आख्खी फाईल तुम्हाला पाठवतो, तुम्ही एकतर समोर तरी या.

तुम्हाला विजय सांगर यांचा पत्ता फोन नंबर देतो.ते तुम्हा़ला मयत रुग्ण अ‍ॅडमिट करण्याचा अनुभव सांगतील. तुमच्यात गटस अस्तील तर त्यांना आव्हान द्या.

एक अवांतर - वरील संवादही 'डॉक्टरांचे वाईट अनुभव' ह्यात मोडू शकतील का? Light 1

अवांतराबद्दल दिलगीर!

Pages