विषण्ण करणारा अनुभव - लोणावळा

Submitted by टीना on 2 July, 2015 - 03:24

काल सकाळी अगदी झोपेत असताना ताईचा फोन आला लोणावळ्याला चलतेस का म्हणुन. अगदी ताबडतोब हो म्हटल आणि आवराआवर करुन तिच्या घरी पोहचली. तिथुन थोड्याच वेळात लोणावळ्याकडे प्रस्थान केल..

पहिला स्टॉप भुशी डॅम वर आणि पुर्ण दिवसासाठी मुड खराब .. अस वाटलं कुठुन दिमाग आला आणि इथ जाण्याकरीता हो म्हटलं .. पार्किंगसाठी फि रु.१००.. अबब! अस झालं. असो म्हणुन शंभरी त्याच्या हातात कोंबली आणि चालत निघालो. तिथ जाण्याच्या वाटेवर सगळी कचराकुंडी.. प्लॅस्टिकचे चमचे , ताट , सिगरेटचे थोटकं , कपडे काय नको ते पडलेलं.. किळस आली अगदी.. चिखलभरल्या चपलेनं लोक बाजुच्या पायर्‍यांवरुन चढत आणि खालच्या पायर्‍यांवर बसलेले लोक त्या पायर्‍यांवरुन पडणार्‍या पाण्यात बसुन मज्जा घेत होते..
तिथच बसलेल १५ २० पोरांचे २ ३ टोळके घाणेरड्या आवाजात ओरडत होते, अंगविक्षेप करत आहे आणि काय काय..

लोकांच्या मॉडर्न असण्याच्या संकल्पना कुठल्या थरापर्यंत वेगवेगळ्या असु शकतात त्याच पुस्तक उघडून बसल्यासारख वाटत होतं.. मुर्खासारखे वागत होते हे मोठे लोक तिथे.. कुणाला कुणाच सोयरसुतक नाही, करतय करु दे मरतय मरु दे यातला प्रकार..डॅम च्या भिंतीवर शब्दशः २५ ते ३० च्या दरम्यान असलेला सो कॉल्ड तरूण उभा राहुन मुततोय . माफ करा पण त्याच्या कृतीला बघुण दुसरा शब्द मला सुचत नव्हता.. खाली लोक पाण्यात ओले होत मज्जा करत होते.. काय म्हणाव याला ?

त्या पाण्यात भिजत , तिथं बसुन लोक कणिस खात होते आणि अक्षरशः तिथच त्या पायर्‍यांवर फेकत होते..
एक तरूण.. जबरदस्तीने लोवेस्ट करण्यासाठी जमेल तेवढा सरकवलेला जीन्स , कुल टिशर्ट, तारे जमीन पर मधल्या आमिर सारखी हेअरस्टाईल करुन गॉगल लावुन भिंतीवर उभा राहुन पचापचा त्या पाण्यात थुंकतोय आणि खाली छोटे लेकरं त्याच पाण्यात डुंबत असताना हे चाल्लयं.. त्याला मी शिव्या मारल्यावर तो आणि इतरहि लोक निव्वळ बघे बनलेले होते.. कुठ हरवल्या यांच्या संवेदना ? मुर्ख आहेत का हे ? श्शी..

माझ लग्न झालेल नाही , ना ही एखाद्या २ महिन्याच्या लहान मुलाला वागवायचा मला अनुभव आहे तरीही माझ्यामते २ ते ३ महिन्याच बाळ फुलासारखं नाजुक असतं आणि त्याला तसच जपावसुद्धा लागतं.. पण तिथ एक तरुणी तिच्या तेवढ्याच बाळाला भर पावसात हाती गुंडाळून डोक्यावर छत्री सुद्धा न घेता तसच घेऊन त्या पायर्‍या चढत होती.. एखाद्याची हौस मान्य करता येते पण त्या छोट्या न बोलत्या जीवाचे काय हाल होत असणार अथवा होणार ते त्या माऊलीला तरी ठाऊक होते की नाही देव जाणो. भुशी डॅम चा तो सुंदर अनुभव घेऊन इतर कुठ फिरायची इच्छाच मरुन गेली. जाता जाता तेवढ कार्ल्याला गेलो तर तिथही तिच तर्‍हा.

पहिल्यांदा लोणावळा २०१० मधे बघीतला होता.. त्यानंतर डायरेक्ट आत्ता जाण्याचा मुहुर्त निघाला. कित्ती फरक पडला या ५ ६ वर्षात..पुर्ण बाजारीकरण झालय प्रत्येक ठिकाणाचं.. कार्ल्याच्या लेण्यांना देवळाचं स्वरुप आलयं. ना ही त्या लेण्या पहिल्याएवढ्या वैभवात राहिल्याय आणि शंका आहे की देवीच्या देवळाच देवत्व तरी शाबुत आहे कि नाही ? तरी बर हि बेभान तरुणाई देवीदेवतांची तेवढी भक्त नाही .. नाहीतर तिथल्या देवळातल्या भक्तीच्या कृतीला विकृतीची जोड लाभायला असा कितीसा वेळ लागणारे..
लिहण तितकस जमत नाही पण सांगण्यापासुन खरोखरच राहावल नाही..
मला नाही वाटत यापुढं कधी लोणावळा जायची हिम्मत होईल . Sad . आणखी एक सुंदर ठिकाण भेटीला पारख झालं ..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरे सांगायचे तर आजकाल घरात बसणे म्हणजेच उत्तम ठरू लागले आहे. नोकरदार लोकांसाठीसुद्धा सुट्टी उत्तम घालवणे म्हणजे घरात बसणे असे होऊ लागले आहे.

लेख वाचून चिडचिड झाली.

टीना, जे लिहिले आहेस ते वाचून मला माझी २००८ ची लोणावळा ट्रिप आठवली. तेव्हा आम्ही सहकुटुंब एकूण दहा जण गेलो होतो. अश्याप्रकारचा अनुभव तेव्हा आम्हालाही भुशी डॅमवर आला होता आणि कार्ल्याचा तर त्याहून भयंकर होता.

अगदी खर आहे तु लिहीलेलं सगळं. पावसाळ्यात अशा कुठल्याही ठिकाणी जायची सोय राहिलेली नाही.

टीना, पाऊस अनुभवायचा असेल चांगल्या रीतीने तर गोव्याला जा. खुश होऊन जाशील.
गोवा खूप डिसेंट आणि स्वच्छ असतं पावसाळ्यात आणि निसर्ग सौदर्य अप्रतिम !!!

< खरे सांगायचे तर आजकाल घरात बसणे म्हणजेच उत्तम ठरू लागले आहे. नोकरदार लोकांसाठीसुद्धा सुट्टी उत्तम घालवणे म्हणजे घरात बसणे असे होऊ लागले आहे >
+ १

दुसरा पर्याय म्हणजे शनिवार रवीवार सोडून इतर दिवशी सुट्टी घेऊन फिरायला जाणे.

बेफि +१.. कुटुंब घेउन पावसाळ्यात अशा ठिकाणी जाणे म्हणजे सहलीचा विचकाच. आणि काहीवेळा भयानक अनुभवांना सामोरे जाणे.

मी देखील बरेच वर्षांपूर्वी गेलेले. परत जायची ईच्छा झालीच नाहि.

असले बेक्कार , मुर्खांसारखे प्रकार बघितले कि किळस येते.

टीना
भुशी डॅमला हे नवीन नाही. वीस वर्षांपूर्वी आणि आता काहीही फरक नाही किंबहुना सगळ्याच धबधब्यांच्या ठिकाणी हेच आहे.

मी अमि, शपथेवर सांगते .. पुर्ण दिवस डोक खराब होणार याची १०१% गॅरंटी ..

लेख वाचून चिडचिड झाली. >> बेफि, तुम्ही सुखी आहात.. मी तर तिथं यावेला ते सगळं अनुभवत होती Sad

नरेशजी, मी २०१० मधे मे महिन्यात गेलेली.. तेव्हा पाऊस होता पण पायर्‍यांवरुन वाहणार पाणी नव्हत.. आम्ही २० २५ जण होतो कॉलेजमधले.. तेव्हा मागच्या टेकड्यांवर चढलेलो.. अर्ध्यांजवळ तरी बॅगा होत्या आणि अगदी एकालाही असा कचरा करण्याची दुर्बुद्धी झाली नाही महिन्याभराच्या भटकंतीतही हाच काय तो दिलासा.. खाद्यपदार्थ सोबत ठेवायचो आम्ही पण पद्धतशीर तो कचरा बॅग मधे पिशवीत जमा करुन मग कचराकुंडीत टाकायचो.. इथ बघाव तर स्वतःच घर सोडून सगळि काही कचराकुंडीच असते लोकांसाठी Angry

टीना...

~ तुम्हाला आलेल्या अनुभवाने तुम्ही किती संतापून गेला होता हे तर उघडच आहे शिवाय तशी दृश्ये आणि पैशाच्या बेफ़ामामुळे अंगी उतरत गेलेली मस्ती एक सर्वसाधारण प्रवासी या नात्याने पाहिल्यामुळे तुमच्या मनी आलेली विषण्णता प्रत्येक शब्दातून जाणवते. तर ही आजकालची वा सध्याची "वीकेन्ड कल्चर सिस्टिम इन व्होग" झाल्याने लोणावळाच नव्हे तर आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या अनेक पिकनिक सेन्टर्स वर राजरोज (आंबोली घाट धबधब्याजवळ तर पोलिस बंदोबस्त असूनसुद्धा अत्यंत घृणास्पदरित्या...) मग्रुरपणाचे निर्लज्ज प्रदर्शन चालू आहे...."काय करत्यात पोलिस ? द्यायचे पानसुपारीला कैतरी... पकडले तर...!" असली सामाजिक भाषा सर्रास वापरली जात आहे. तुमच्या लिखाणात नसलेला एक उल्लेख मी मुद्दाम इथे करतो....बीअरच्या बाटल्या. बर्कीचा धबधबा या ठिकाणी तर खच पडलेला दिसेल...अशा बाटल्यांच्या काचांचा. दोनेक वर्षापूर्वी केवळ बाटल्या दिसत. त्यावर कारवाई झाली म्हणून आता प्राशन झाले की त्याच बाटल्या बिनदिक्कतपणे बाजूच्या दगडी भिंतावर फोडल्या जात आहेत.

शनिवार रविवार घरी निवांतपणे बसून उत्तम काहीतरी वाचन करावे....हेच उत्तम, असे ठरविले तर निदान त्यात किमान काही समाधान मिळते.

ममो >> आई पप्पा आलेत जाऊन. त्यांचा अनुभव छान होता .. लोक जागोजागी मदत करतात.. पोलीस गाडीचा नंबर बघुन लाच घेतात असले प्रकार सुदैवान घडले नाही..आणि स्वच्छता पन भरपुर आहे म्हणे..

दुसरा पर्याय म्हणजे शनिवार रवीवार सोडून इतर दिवशी सुट्टी घेऊन फिरायला जाणे. >> ऋयाम, काल बुधवार होता.

>>नोकरदार लोकांसाठीसुद्धा सुट्टी उत्तम घालवणे म्हणजे घरात बसणे असे होऊ लागले आहे>>
हो हे खरं आहे....सध्या आम्हीतरी हेच करतो...घरात बसुन मस्त एखादा मुव्ही बघणे, मुलीसोबत खेळणे, घरीच एखादा चांगला पदार्थ करणे कारण सुट्टीदिवशी हॉटेल्मद्धे सुद्दा चांगले जेवण मिळत नाही आणि खुप वेटींग असतं असा अनुभव आहे.....अगदी कुठे जायचं असेल तर शनी-रवी सोडुन ईतर दिवशी सुट्टी घेउन जातो....मुलांनाही त्रास होतो गर्दी आणि गोंधळाचा....

सगळ्याच धबधब्यांच्या ठिकाणी हेच आहे.>> +१

टीना, हे सगळं वाचूनच अतिशय किळस आली. प्रत्यक्ष तुझी काय मनस्थिती झाली असेल, कल्पना करु शकते.

अशोक, अगदी अगदी..
या फोडलेल्या बीअर च्या बाटल्यांचा आम्हाला पण वाईट अनुभव आहे..
बनेश्वर , नरसापुर येते गेली होती २०११ साली.. तुमच्यापैकी कुणाला माहिती असेल तर तिथ नर्सरी आहे देवळाबरोबरच आणि मागे नदी वाहते त्यावरील धबधब्याचा.. आमच्याबरोबर ७वी मधे शिकणारू आत्याची मुलगी होती..आम्ही त्या धबधब्यावर गेलो तर तिचा तोल गेल्यामुळे खाली दगडावर आधारासाठी हात टेकवला तिने तर तिथे असलेल्या फुटलेल्या काचामुळे जवळ्पास २ ते अडिच इंचाची चिर पडली तिच्या हाताला.. भरपुर रक्त गेल.. गावातल्या डॉक कडून प्रार्थमिक उपचार केले आणि तसेच परतलो..सगळ्यांचा निरस झाला. तिचा तर चेहरासुद्धा पहावत नव्हता Sad ..
मग्रुर .. हाच तो शब्द.. आजकालची लोक मग्रुर झालीए..

खुप चिडचिड होते हे असलं काही ऐकुन/पाहुन.
आजकाल पिकनिक म्हणजे दारु आणि गोंधळ, त्यात अशा डॅम ,बीच या ठिकाणी तर हे सर्रास चालतं. सोबत असलेल्या किंवा इतरही पिकनिकला आलेल्या महिलांची पर्वा न करता गाडी खुली ठेऊन मोठ्या आवाजात गाणी लावुन अचकट विचकट अंगविक्षेप करुन तर्र होऊन नाचणे यालाच 'Enjoy' म्हणतात. आणि कचरा फेकण्याबद्दल तर जणु हे स्पॉट कचरा फेकण्यासाठीच बनविला आहे अशा आवेशाने हे लोक कचरा फेकत असतात. अस्सा राग येतो ना....

काही वर्षांपुर्वी एका पावसाळी आम्ही माळशेज घाटात गेलो होतो सहल म्हणुन त्यावेळेस असाच अनुभव घेतला होता. ठिकठिकाणी गाड्या उभ्या करुन, दारुच्या बॉटल हातात, डोक्यावर घेऊन नाचणार्‍या त्या लोकांच्या चाळ्यांनाच मी एव्हढी घाबरले होते की मला तिथुन निघणेच योग्य वाटले. ते सर्व बघुन आमच्यातील इतरांचीही तिथे थांबण्याची इच्छा राहिली नव्हती त्यामुळे आम्ही काहीही मजा न करता तिथुन निघुन आलो. : अरेरे:

तेव्हापासुन कुठेच पावसाळी पिकनिकसाठी जाण्याची इच्छाच होत नाही कारण कुठेही गेलो तरी 'तसली' गर्दी असतेच.

लोणावळा जा, खंडाळा जा, महाबळेश्वर जा नाहीतर अजुन कुठे. सर्वत्र हाच अनुभव. आपल्यासारखे लोक बाजुला उभे राहुन बघत असतात. कोणाला काय सांगायला गेले तर अति नम्र आवाजात आपल्या वडलांच्या एस्टेटीची चौकशी केली जाते. पावसाळ्यात असल्या एकाही जागी जायचे धाडस मी आजवर केलेले नाही.

हे म्हणणे जरा जीवावर येतेय पण कारण पुर्ण भारत पाहिला नाही पण जे काय मोठ्या शहरात पाहिले त्यावरुन एक गोष्ट लक्षात आलीय की बहुसंख्य भारतीय लोक आपले डोके गमावुन बसलेले आहेत. समोर दिसतेय ते ओरबडायचे ही एकमेव वृत्ती शिल्लक राहिलीय. जे ओरबडायचे ते सजीव आहे की निर्जिव याचेही भान सुटलेय.

आजकाल पावसाळी पर्यटन म्हणजे डिज्जे (कार मधला धणाणा वाजणारा) दारू धिंगाणा एवढंच उरलंय.
शक्यतो वीकडे ला गर्दी कमी असते!

तुम्हाला ३ ४ तास ट्राफिक मिळाल नाही का?

टीना, मी पण २००५ साली तिथे गेलो होतो, तेव्हा अशी सुरवात झालीच होती. कितीही बोर्ड लावा आणि कितीही आरडाओरडा करा. आपणच मूर्ख ठरतो त्या तिथे.

बेसिक स्वच्छता, दुसर्‍याचा विचार या बाबी इतक्या का कठीण आहेत आत्मसात करायला ?

तुलना करू नये, पण केल्याशिवाय रहावतही नाही परदेश कशाला गोव्यातही यापेक्षा जास्त स्वछता आणि शिस्त
दिसत असे मला. परदेशात तर अगदी छोट्या छोट्या देशातही हरखून जावी एवढी शिस्त आणि स्वच्छता आढळते.

मी सुद्धा भुशी डॅमला बहुधा २०११ ला गेलो असावो. पहिल्यांदा आणि शेवटचे. तेव्हाही हे सारे असेच होते. सोबत ग्'फ्रेंड होतीच. आम्ही तिथे भुशी डॅम भुशी डॅम एक फेमस पावसाळी पिकनिक पॉईंट हे कौतुक ऐकून गेलेलो, अन निव्वळ दर्शन घेऊनच परतलो. त्यानंतर एक रिक्षावाला पकडला आणि त्याला लोणावळ्यातील शांत निसर्गरम्य जागा दाखव म्हणालो जिथे अशी बकाल गर्दी नको. त्याने पावसात कुठेकुठे मस्त फिरवले, जाम मजा आली, या अनुभवानंतरही ती ट्रिप आयुष्यातील एक चांगली आठवण ठरली, अन्यथा लोणवळा एक बकाल जागा आहे असेच मत घेऊन तिथून गेलो असतो.

टीना, भुशी डॅमवर अगदी हाच अनुभव नेहमी येतो आणि बाकी टूरिस्ट स्पॉटही तसेच आहेत. असे अनुभव आल्यापासून आम्ही एक नवा रस्ता शोधला.. नावाला डांबरी रस्ता आहे पण अगदी अनवट कोकणी वाटांची आठवण आल्याशिवाय रहात नाही. चांदणी चौकातून ताम्हिणी घाटाकडे जाताना उजवीकडच्या एका रस्त्याने आत गेल्यावर मल्हार माची रिझॉर्ट आहे त्याच रस्त्याने पुढे जात रहायचे, याचा शेवट अँबी व्हॅली- लोणावळा रस्त्यावर होतो. वाटेत पूर्ण एकांत, असंख्य धबधबे, डोंगर दर्‍या, छोटी छोटी गावं, शेतात चाललेल्या भात लावण्या, प्रचंड हिरवाई, प्रेमाने चौकशी करणारी गावातली साधी माणसं आणि लपाछपी खेळणारा पाऊस, कधी रिमझीम तर कधी तूफान!! इथे ना गजबज ना भयंकर टूरिस्ट?!! शांतता इतकी की फक्त पावसाचा आवाज येत रहातो. फक्त पाऊस अंगोपांगी अनुभवून पुण्यात परत यावे Happy

आपण काही फेकल कि समोरचा परत फेकुन मारत नाही तोवर आळा बसणार नाही या वृत्तीला..
म्हणुन तर मॉल सारखे गजबजलेले ठिकाण स्वच्छ राहतात आणि निसर्ग काय ? अंगावर येत नाही तोवर चलता है चलने दो..मरो सालो..

सोबत असलेल्या किंवा इतरही पिकनिकला आलेल्या महिलांची पर्वा न करता गाडी खुली ठेऊन मोठ्या आवाजात गाणी लावुन अचकट विचकट अंगविक्षेप करुन तर्र होऊन नाचणे यालाच 'Enjoy' म्हणतात. >> निल्सन , अगदी हा अनुभव मी काल कार्ल्याला गेलो तेव्हा घेतला.. वय वर्ष १६ ते २० मधली पोर होती.. गाडी रस्त्यावरुन जाउ द्यायला पन तयार नाही वर जाण्यासाठी .. आणि वर सगळीकडे त्या दुकानांच्या रांगा .. तिथ बाजुला स्पिकर आणि देवीच्या गाण्यांच्या सिडीज ची चळत आणि प्लेअर वर सनी लिऑनच "एक आखँ मुझपे दुजी कुरती के हुक पे, मेरी देसी लुक ते मर गये गोरे गोरे छोकरे" वाजत.. मी तिथुनच देवीला हात जोडले.. कठिणे..

सगळीकडेच असं झालयं .. कुठेही फिरायला जा Sad
२-३ वर्षाआधी आम्ही शक्य असेल तर चुकीच्या वागणार्या लोकांना \ ग्रुपला लगेच समजावुन सांगायचो चुक लगेच .. आता तर तीही सोय नाही ... कारण सगळे सुशिक्षित अडाणी!!

मनीमोहोर .. गोव्याबद्द्ल +१ .. अजिबात त्रास नाही .. प्रचंड स्वछता!
आम्ही विविआंता ताज रिसोर्टजवळ गेलो होते तिथे बाहेर आईस्क्रीम घेतले.. तर दुकानदाराने सरळ सांगितले की "प्लॅस्टिक रॅपर या कचर्याच्या डब्यात टाका!!"..
आपल्या इथे सांगितल की लोक तु.क. देतात!

तुलना करू नये, पण केल्याशिवाय रहावतही नाही परदेश कशाला गोव्यातही यापेक्षा जास्त स्वछता आणि शिस्त
दिसत असे मला. परदेशात तर अगदी छोट्या छोट्या देशातही हरखून जावी एवढी शिस्त आणि स्वच्छता आढळते. >> दिनेशदा , हाच मुद्दा लिहिता लिहिता सोडून दिला मी..

नेमका अनुभव लिहिल्यावर थोपू वर वाचलं कि, स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.. ऐकायला बोलायला छान वाटत.. अंगिकारल आहेसुद्धा पण अस प्रत्येकाला वाटणं , जाणवणं हे सुद्धा तितकच आवश्यक नाही का ?
म्हणे सुरुवात तुमच्यापासुन करा जग सुंदर बनेल.. पण मनोवृत्तीच मुळात सुंदर जगात राहण्याची त्याला जपण्याची नाही तर बदल कसा होणार ?

आत्मधून >> हा रस्ता पकडायला हवा ..

माहितीए, जवळ दुचाकी आहे पण राजरोसपणे एकट तर सोडाच पण एखाद्या मित्राला घेऊन फिरायचं म्हटल तरी भिती वाटते.. अधे मधे भेटणारे चारचाकी वाले आणि दुचाकी वर फिरणारे लोक असे एक्स-रे काढत जातात कि समोर जाणसुद्धा नकोस वाटत.. एक तर आपल्याला बघत बघत जाणार, पोर सोर असले तर अंगावर वस्सकन ओरडत जाणार.. पुढे मागे गाडी चालवत जाणार.. किळस, संताप, भिती, हतबलता सर्व काही एकत्र मनात येत.. बर यांपैकी एखाद सोबतीला असाव म्हणुन जात असेल तर तस जाणवायचीही सोय नाही.. मग जेव्हा इतरांचे प्रवासवर्णनं वाचतो ना तर अस वाटत यापैकी एकही गोष्ट आपल्या वाट्याला का येऊ नये Sad

ओ एम जी.. टीना.. किती भयंकर आहे हे सगळं..
इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.. आता नाही जावसं वाटणार तिथे कधीही!!
खूप वर्षांपूर्वी पाहिलं होतं लोणावळा, पण फरियाज से शुरु होके फरियाज पे खत्म हुआ था सफर.. म्हणूनच खूप एंजॉय केलं असावं.. Happy

यावर मी स्वतःपुरता शोधलेला ऊपाय- सोम ते शुक्र रजा घेऊन विकेंड ला घरी आराम करणे- तरी हे बुधवारी झालय म्हणजे खरच विचार करणाया सारखी गोष्ट आहे- अवांतर- मी शुक्रवारी लोणावळ्यामधे बरेच फिरलो आणी भुशी डॅम वर न जाता वरती डायरेक्ट लायन पॉईंट वगैरे ला गेलो होतो.. आता वाटत की बरच केलं ते कारण फॅमिली सोबत होतो आम्ही सगळे

नाहीतर तिथल्या देवळातल्या भक्तीच्या कृतीला विकृतीची जोड लाभायला असा कितीसा वेळ लागणारे..>>>>>
puntlya Ganeshutsav ani visarjan miravanuki ne tumchi hi pan echha puri keli ahe

टिना खूपच वाईट अनुभव. लोणावळा हे छान ठिकाण अश्या लो़ंकांमुळे बदनाम झाले आहे. मी आतापर्यंत वीक डेझ लाच तिथे गेले होते ( एकदम ठरवून सोमवार, मंगळवार असे की जेणेकरून गर्दी नसेल) त्यामुळे असा अनुभव नाही आला आणि गर्दी ही कमी मिळाली किंवा माझे सुदैव म्हण . पण तुला बुधवारी जाऊन ही हे सगळे सहन करावे लागले म्हणजे आता वीक डे ला जाताना ही विचार करावा लागेल.

आत्मधून तुम्ही म्हणताय त्या रस्त्यावरच Lion's point आहे. ते ठिकाण खूप छान आहे. खूप गर्दी ही नस्ते तिथे.

काही वर्षांपूर्वी हाच अनुभव भाजे धबधब्यापाशी सुद्धा आला होता. लोहगडाच्या वाटेवर. रस्त्याच्या दोन्ही बाजुने जिथे कोरडी जागा मिळेल तिथे लोक बाटल्या उघडून बसलेले. घाणेरडे अंगविक्षेप काय, कर्कश्य आवाजात आरडाओरडा करत गाणी काय, शिव्यागाळी काय.... किळस आली होती सगळ्याची !

दिनेश,

तुम्ही गोवा म्हणता तसेच दक्षिणेतही अनेक ठिकाणी लोक रिलिजसली समाजाचे भान ठेवून वागतात.

अचकट विचकट अंगविक्षेप करत नाचणे, उघड्यावर दारू पिऊन मर्कटलीला करणे, छेडछाड ह्या अश्या गोष्टींमुळे कुटुंबियांना घेऊन जावेसे वाटत नाही.

मुळात तुम्ही दारू पीत आहात, भिजत आहात आणि त्यामुळे आनंदात आहात हे किळसवाण्या प्रकारे जगाला ओरडून सांगण्याची गरज काय?

असे वाटते की एखादा गज घेऊन जावे आणि बेभानपणे ह्यांच्या पार्श्वभागावर हाणून ह्यांना पळवून लावावे.

हे जाऊदेत, भरपूर पैसे देऊन गेल्यावरही काही ठिकाणी उच्चभ्रू लोक असेच बेभान झालेले दिसतात. येथे कोणी कोणाचा स्क्रीनशॉट नका टाकू (गुगळेंसाठी Happy ) पण दुर्दैवाने त्यातही गुजराथीच लोक ओरडाआरडा करत असतात आणि सगळी मजा फक्त आपल्याला मिळावी अश्या प्रयत्नांत असतात. उदाहरणार्थ स्विमिंग पूलमध्ये हेच फक्त आरडाओरडा करत डुंबत बसणार, बाकीच्यांनी ह्यांच्या वागण्यामुळे बुजून बाजूला उभे राहायचे.

इंग्रज हवे होते असे जुने लोक का म्हणतात ते समजते.

Pages