विषण्ण करणारा अनुभव - लोणावळा

Submitted by टीना on 2 July, 2015 - 03:24

काल सकाळी अगदी झोपेत असताना ताईचा फोन आला लोणावळ्याला चलतेस का म्हणुन. अगदी ताबडतोब हो म्हटल आणि आवराआवर करुन तिच्या घरी पोहचली. तिथुन थोड्याच वेळात लोणावळ्याकडे प्रस्थान केल..

पहिला स्टॉप भुशी डॅम वर आणि पुर्ण दिवसासाठी मुड खराब .. अस वाटलं कुठुन दिमाग आला आणि इथ जाण्याकरीता हो म्हटलं .. पार्किंगसाठी फि रु.१००.. अबब! अस झालं. असो म्हणुन शंभरी त्याच्या हातात कोंबली आणि चालत निघालो. तिथ जाण्याच्या वाटेवर सगळी कचराकुंडी.. प्लॅस्टिकचे चमचे , ताट , सिगरेटचे थोटकं , कपडे काय नको ते पडलेलं.. किळस आली अगदी.. चिखलभरल्या चपलेनं लोक बाजुच्या पायर्‍यांवरुन चढत आणि खालच्या पायर्‍यांवर बसलेले लोक त्या पायर्‍यांवरुन पडणार्‍या पाण्यात बसुन मज्जा घेत होते..
तिथच बसलेल १५ २० पोरांचे २ ३ टोळके घाणेरड्या आवाजात ओरडत होते, अंगविक्षेप करत आहे आणि काय काय..

लोकांच्या मॉडर्न असण्याच्या संकल्पना कुठल्या थरापर्यंत वेगवेगळ्या असु शकतात त्याच पुस्तक उघडून बसल्यासारख वाटत होतं.. मुर्खासारखे वागत होते हे मोठे लोक तिथे.. कुणाला कुणाच सोयरसुतक नाही, करतय करु दे मरतय मरु दे यातला प्रकार..डॅम च्या भिंतीवर शब्दशः २५ ते ३० च्या दरम्यान असलेला सो कॉल्ड तरूण उभा राहुन मुततोय . माफ करा पण त्याच्या कृतीला बघुण दुसरा शब्द मला सुचत नव्हता.. खाली लोक पाण्यात ओले होत मज्जा करत होते.. काय म्हणाव याला ?

त्या पाण्यात भिजत , तिथं बसुन लोक कणिस खात होते आणि अक्षरशः तिथच त्या पायर्‍यांवर फेकत होते..
एक तरूण.. जबरदस्तीने लोवेस्ट करण्यासाठी जमेल तेवढा सरकवलेला जीन्स , कुल टिशर्ट, तारे जमीन पर मधल्या आमिर सारखी हेअरस्टाईल करुन गॉगल लावुन भिंतीवर उभा राहुन पचापचा त्या पाण्यात थुंकतोय आणि खाली छोटे लेकरं त्याच पाण्यात डुंबत असताना हे चाल्लयं.. त्याला मी शिव्या मारल्यावर तो आणि इतरहि लोक निव्वळ बघे बनलेले होते.. कुठ हरवल्या यांच्या संवेदना ? मुर्ख आहेत का हे ? श्शी..

माझ लग्न झालेल नाही , ना ही एखाद्या २ महिन्याच्या लहान मुलाला वागवायचा मला अनुभव आहे तरीही माझ्यामते २ ते ३ महिन्याच बाळ फुलासारखं नाजुक असतं आणि त्याला तसच जपावसुद्धा लागतं.. पण तिथ एक तरुणी तिच्या तेवढ्याच बाळाला भर पावसात हाती गुंडाळून डोक्यावर छत्री सुद्धा न घेता तसच घेऊन त्या पायर्‍या चढत होती.. एखाद्याची हौस मान्य करता येते पण त्या छोट्या न बोलत्या जीवाचे काय हाल होत असणार अथवा होणार ते त्या माऊलीला तरी ठाऊक होते की नाही देव जाणो. भुशी डॅम चा तो सुंदर अनुभव घेऊन इतर कुठ फिरायची इच्छाच मरुन गेली. जाता जाता तेवढ कार्ल्याला गेलो तर तिथही तिच तर्‍हा.

पहिल्यांदा लोणावळा २०१० मधे बघीतला होता.. त्यानंतर डायरेक्ट आत्ता जाण्याचा मुहुर्त निघाला. कित्ती फरक पडला या ५ ६ वर्षात..पुर्ण बाजारीकरण झालय प्रत्येक ठिकाणाचं.. कार्ल्याच्या लेण्यांना देवळाचं स्वरुप आलयं. ना ही त्या लेण्या पहिल्याएवढ्या वैभवात राहिल्याय आणि शंका आहे की देवीच्या देवळाच देवत्व तरी शाबुत आहे कि नाही ? तरी बर हि बेभान तरुणाई देवीदेवतांची तेवढी भक्त नाही .. नाहीतर तिथल्या देवळातल्या भक्तीच्या कृतीला विकृतीची जोड लाभायला असा कितीसा वेळ लागणारे..
लिहण तितकस जमत नाही पण सांगण्यापासुन खरोखरच राहावल नाही..
मला नाही वाटत यापुढं कधी लोणावळा जायची हिम्मत होईल . Sad . आणखी एक सुंदर ठिकाण भेटीला पारख झालं ..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोगा, असा का बरं प्रतिसाद इथे? इथे तक्रार करणार्यांनी कुठले नियम पाळले नाहीत? की बेशिस्त, बेताल वागणार्यांना वठणीवर आणणे हा तसं न वागणार्यांसाठी केलेला नियम आहे?

बापरे भयंकर अनुभव. हे असलेच लोक परदेशी पर्यटन करताना असेच वागतात आणि कोणी काही बोलले की वर्णद्वेष म्हणून स्वतःच ओरडतात. "कूल" च्या नावाखाली काय वाट्टेल ते चालू असते हल्ली!!!

परदेशातसुद्धा दारु पिऊन बेभान होणारा तरूण वर्ग आहेच!!! पण लोकसंख्या कमी असल्यामुळे असेल किंवा पोलिसांची संख्या जास्त असल्याने असेल शिस्त थोडी अधिक आहे. आमच्या येथे तर शुक्रवार, शनिवार रात्री मुख्य गावातून गाडी चालावायला भिती वाटते. अनेक दारु पिऊन बेभान झालेले तरुण आणि तरुणी रस्त्याच्या मध्ये येणे, उगाच आरडाओरडा करणे, शिविगाळ करणे हे प्रकार करतच असतात. पण हे असले अनुभव शुक्रवार, शनिवार रात्रीपुरते मर्यादित. पर्यटनस्थळी मी तरी आजपर्यंत कायम शिस्तच पाहिली आहे.

पण एरवी तुलनेत सौम्य, सभ्य, मुखवटेधारी भासणारे शेळपट जेव्हा दारू पितात तेव्हा त्यांच्यातलाही माजोरडेपणा प्रचंड वाढून माजोरड्यांची संख्या कैक पटीने वाढते.
>>>

लिंबूटिंबू सहमत,
हे तर आहेच, पण याच बरोबरचा मुद्दा म्हणजे गेले काही वर्षांपासून पिणार्‍यांमध्ये हे फॅड आले आहे की पावसाळा सुरू झाला की दर शनिवारी-रविवारी जवळचा कुठलातरी धबधबा पकडायचा आणि स्वस्तात मस्त पार्टी प्लस पिकनिक करायची. स्वस्तात मस्त यासाठी कारण दारूला बारचा रेट नाही, चिकन मटण शंभर दिडशे रुपयात पोटभर (भले कसे का असेना), तसेच हे बहुतांश ग्रूप लोकलनेही विनातिकीट प्रवास करतात.

जर यातला दारू हा फॅक्टर काढला तर हे लोक असे उठसूड दर विकेंडला असे जातील का?

शक्यच नाही!

आणि मग ईतर न पिणार्‍यांमध्ये जे बेशिस्त सुसंस्कृत असतील ते देखील एका लिमिटमध्येच राहतील.

पोलिस सोडा स्थानिकांनी विरोध दाखवला तरी याला आळा बसेल, पण वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे सारे स्थानिक देखील घरगुती कोंबडी अन पेप्सीकोल्याची दुकाने काढून बसलेत.

अवांतर - त्यामानाने माझे आवडीचे ठिकाण वसईजवळचे तृंगारेश्वर, तिथे हे प्रकार तुलनेत कमी अनुभवलेत, पण शेवटचे ३-४ वर्षांपूर्वी गेलेलो, आताची कल्पना नाही.

आमच्या येथे तर शुक्रवार, शनिवार रात्री मुख्य गावातून गाडी चालावायला भिती वाटते. अनेक दारु पिऊन बेभान झालेले तरुण आणि तरुणी रस्त्याच्या मध्ये येणे, उगाच आरडाओरडा करणे, शिविगाळ करणे हे प्रकार करतच असतात.
पण हे असले अनुभव शुक्रवार, शनिवार रात्रीपुरते मर्यादित.
पर्यटनस्थळी मी तरी आजपर्यंत कायम शिस्तच पाहिली आहे.
>>>

एक्झॅक्टली
माणसे तिच, पण तुम्ही त्यांना बंधन कुठे कसे घालता ते महत्वाचे.

उद्या कोणी मंदिरात दारू प्यायला बसले तर आपल्या धार्मिक भावना चटकन दुखावून आपण लाठ्याकाठ्या घेऊन डोके फोडायला उतरू.. आणि हे माहीत असल्याने दारूच्या नशेत चूर चूर असलेले सुद्धा असे काही करताना शंभरदा विचार करतील, आणि करणारच नाहीत.

पण निसर्गावर हल्ला होतोय तर त्याबाबत आपण फक्त चीडचीड व्यक्त करण्यापलीकडे काही करणार नाही, हे आपल्यालाही ठाऊक आहे आणि त्यांनाही.

तसं नाही... फारच थोडे लोक असे असतात की जे नियम/ स्वच्छ्ता पाळतात.. बाकी सगळीच माणसे विशेषत: सुशिक्षीत मंडळी सार्वजनिक ठिकाणी अशीच वागताना दिसतात.. तो नियम ९०+ टक्क्याना लागू होतो, आणि तिथेच सगळा घोळ आहे.. पण जनता म्हणजे आपणच ना? चर्चेचे ठिकाण बदलून पहा... असा विचार करा की आपण आपल्यास मित्रमंडळी/नातेवाईकांमधे बसलो आहोत, आणि याच विषयाची चर्चा होते आहे.. लगेच सगळे 'कश्शी मजा केली' या सदराखाली अश्या त्यानी केलेल्या गोष्टींचे समर्थन करतील.. आणि त्यावर इतरांना शिस्त कशी नाही हे ही सांगतील.
मामला फार 'गहन' आहे, पण 'बदल' कसा घडेल यावर उपाय सापडलेला नाही.

पोलिस सोडा स्थानिकांनी विरोध दाखवला तरी याला आळा बसेल
>>>>>

अशक्य.
भूशी डॅमच्या पुढे अँबी व्हॅली रोडवर जो धबधब्याचा स्पॉट आहे (बहुतेक टायगर पॉईंट) तो हल्लीत्रात्रभर ओपन असतो. अगदी पहाटे ४ पर्यंत. गाडी घेऊन ग्रूपने तिथे रात्रभर बसता येतं.... मोबाईल कार्ट (ढकलगाडी) घेऊन स्थानिक तरूणच तुमच्या गाडीजवळ येऊन तुम्हाला चायनिज पदार्थ, हुक्का, भजी असं सर्व देतात. अर्थातच ड्रिंक्स ग्रूप्स बरोबर नेतात. लाऊड म्युझिक इज अलाऊड.... आणि म्हणे दोन ग्रूप्समध्ये बाचाबाची झाली तर हे स्थानिक तरून मधे पडून दोन्ही भांडणार्‍या ग्रूप्सना हाकलून लावतात.
स्थानिक तरूणांनीच हा प्रचंड कमाईचा बिझनेस उघडलाय. पोलिसांशी संगनमत असणारच.

गेल्या महिन्यात रात्री १० नंतर त्या रस्त्याने एकट्याने पवना रिसोर्ट्ला पोचायची वेळ आली होती आणि सुनसान रस्त्यावर चक्क गाड्यांची वर्दळ आणि त्या स्पॉटवर चाललेला धुमाकूळ पाहून हैराण झालो... तेंव्हा एका स्थानिकाकडूनच ह्या प्रकाराबद्दल माहिती मिळाली.

माणसे तिच, पण तुम्ही त्यांना बंधन कुठे कसे घालता ते महत्वाचे. >> येथेसुद्धा सार्वजनिक ठिकाणी दारु पिऊन दंगा करणे हा कायद्याने गुन्हाच आहे. पण तरीही हे प्रकार घडतातच. आणि दारु पिऊन dignity ने घरी जाणारे लोक आहेतच की. मी दंगा फक्त तरूणांचा पाहिला आहे. म्हणजे हेच तरूण जेव्हा मध्यमवयीन होतात तेव्हा त्यातील बरेच dignified होतात. आपल्याकडे मुळातच शिस्तीचा अभाव, बेजबाबदारपणा, असंस्कृतपणा खूप आढळतो. दारु न पिऊन सुद्धा उद्दामपणे वागणारे लोक आहेतच. मुळातच स्वभावात उद्दामपणा असेल तर दारुने तो अधिक वाढतो.

तरीही सार्वजनिक ठीकाणी दारुबंदी असावी ह्या तुमच्या मताशी मी सहमत आहे. मग प्रश्न उरतो कायदा implement करण्याचा!!! शिस्त, जबाबदारीची जाणीव आणि सुसंस्कृतपणा कायद्याने आणता येत नाही. साधा सिग्नल पाळणे जिथे लोकांना जमत नाही त्यांच्याकडून आपण कसली अपेक्षा करावी???

चर्चा अपेयपानावरच जायला हवी असा का आग्रह दिसत आहे काहींचा?

निव्वळ स्वातंत्र्य आहे, पाऊस आहे, आजूबाजूला पोरीबाळी आहेत इतक्यानेही मर्कटलीला करणारे चिक्कार लोक आहेत.

आजकाल लोकांना चेकाळायला अक्षरशः कुठलीही गोष्ट पुरते.
हे असे कुठही कचरा फेकणार्‍या लोकांसाठी एक छान युक्ती ठरवलेली मी..एक जमेल तेवढा तुच्छ कटाक्ष टाकत आणि शुद्ध शब्दांचे चढ्या आवाजात फटकारे मारत त्यांनी टाकलेला कचरा उचलायचा.. एकदाचा लाजुन टाकायचा बंद होईल अथवा तिथुन तोंड लपवुन निघुन जाईल हि त्यामागची धारणा होती माझी..पण यामुळच पांढर्‍या शर्ट्पँटातले, तोंडभर दाढीमिश्या असलेले, आणि डोळ्यावर सोनेरी कडा असलेला गॉगल लावणार्‍या लोकांनी परत माझाच अपमान केला तेव्हा त्यांना प्रत्युत्तर कुठल्या शब्दात द्याव ह्याचा बॅकअप प्लॅनच तयार नव्हता मजजवळ.. मग काय हसुन बाजुला झाली आणि माझी ट्रीप सुरु ठेवली .. आता तर गर्दिच्या पर्यटन स्थळी जाण्याच्च टाळते .. बघु पुढ काय काय वाढून ठेवलय ते..

दारू बंद झाल्याने यातले काहीही बंद होणार नाहीये हे समजतंय का?

मुळात निगरगट्ट वॄत्ती, नियम तोडण्याला आपल्या भारतीय मानसिकतेत असलेले ग्लॅमर (हो भारतीयच. नियम तोडण्याचे कौतुक फक्त भारतीय उपखंडात मूळ असलेल्या लोकांनाच असलेलं पाह्यलंय.)

दारू बंद झाल्याने यातले काहीही बंद होणार नाहीये हे समजतंय का?>>>+१.

बेफिकिर, गणपतीपुळ्याचा समुद्र किनार्‍याला खोल आहे, आणि त्याच्या किनार्‍यापासूनची खोली अचानक वाढते, त्यामुळे ओहोटी-भरतीच्यावेळी (खास करून ओहोटीला) पाणी एकदम खाली आत ओढलं जातं आणि त्याचबरोबर माणूससुद्धा. परत किनार्‍याकडे पोहून यायला फार जोर लागतो. तोपर्यंत दुसरी लाट येऊन ओढते. परिणामी माणूस बुडतो. आमच्याकडे आलेल्या प्रत्येकाला आम्ही हे घरातच समजावून सांगतो. समुद्रात खेळायचं असेल तर भाट्याच्या समुद्रात. पुळ्याच्या समुद्रात उतरायचं नाही हे कबूल करून मगच घेऊन जातो. अन्यथा तुमचे तुम्ही जा.मेकदा किनार्‍यावर एक जण जाताजाता राहिलाय, ते आंखोदेखा पाहिलंय. ( लाईफगार्डने येऊन त्याला खेचून आणला)

लेखतला अनुभव आणि प्रतिसादांमधेले अनुभव खरच भयानक आहेत. मलासुद्धा हेच अनुभव आल्यामुळे अशा ठिकाणी जाणं बंदच केलं. माझे नशीब थोर कि माझ्या कॉलेजजीवनात एवढा भयानक प्रकार झाला नव्हता त्यामुळे आम्ही किल्ले मस्त फिरलो.

इथे येणार्‍या प्रतिसादावरून ह्या प्रकाराला सगळेच वैतागले आहेत, कोणालाच ते आवडत नाहि आहे असं दिसतय. माझ्या ओळखीत तर एकही मनुष्य नाही ज्याला हे असे करण्यात मजा वाटते. मग हा धिंगाणा करणारे लोक नक्कि कोण असतात? काय मनोवृत्ती असते ह्या मागे हा प्रश्न मला कायम पडत आला आहे. आणि नीधप म्हणाल्याप्रमणे
>>मुळात निगरगट्ट वॄत्ती, नियम तोडण्याला आपल्या भारतीय मानसिकतेत असलेले ग्लॅमर (हो भारतीयच. नियम तोडण्याचे कौतुक फक भारतीय उपखंडात मूळ असलेल्या लोकांनाच असलेलं पाह्यलंय.)> > ह्याच्याशी १०००% सहमत.

पु.ल म्हणून गेले आहेत ना, आपल्या लोकांच्या ***वर हंटर हवा फक्त हंटर!!

बाकि दारुबंदी बद्दल सद्ध्या बर्‍याच धाग्यांवर तेच तेच परत परत बोललं जातय त्यामुळे माझा पास.

जरा अवांतर आहे पण सांगतो.

>> मुळात निगरगट्ट वॄत्ती, नियम तोडण्याला आपल्या भारतीय मानसिकतेत असलेले ग्लॅमर (हो भारतीयच. नियम तोडण्याचे कौतुक फक भारतीय उपखंडात मूळ असलेल्या लोकांनाच असलेलं पाह्यलंय.>> ह्याचे अजुन एक उदाहरण. अमेरिकेत एरवी सर्व नियम व्यवस्थित पाळुन रहाणार्‍या लोकांचा भारतीयपणा भारतात जाणार्‍या विमानात बसताना / बसल्यावर एकदम उफाळून येतो. विमान कंपनी मधे काम करत असल्यामुळे हा अनुभव अनेक वेळा घेतला आहे. मुंबईला जाणारे २५० लोकांचे विमान भरायला कंपनी ६ सिनिअर स्टाफ नेमायची आणि ते प्रचंड कटकट करुन तयार व्हायचे कारण प्रवाशांची अरेरावी आणि नियम न जुमानणे. सगळे लोक विमानात बसायला ३ तास लागतातच! तेच नरीटा ला जाणार्‍या २५० लोकांना ३ स्टाफ चे लोक पुरतात आणि ते २५० लोक दीड तासात बसून विमान बर्‍याचदा वेळे आधी निघते!!

लेखातल्या प्रत्येक शब्द अन शब्दाशी सहमत. असे वाटत होते कि मीच लिहिलेय कि काय? मला महाबळेश्वरला पूर्वी एकदा थोड्याफार फरकाने हाच अनुभव आला होता. सगळी "प्रसिद्ध" पर्यटनस्थळे आणि तीर्थक्षेत्रे बकाल झाली आहेत. सुट्टी आणि सणासुदीच्या दिवसात तर शहाण्याने बाहेर पडूच नये अशी स्थिती आहे.

सार्वजनीक ठिकाणी थुंकणारे आणि घाण करणाऱ्या प्रवृत्ती बेलगाम झाल्या आहेत. त्यांना कुणीही बोलणारे नाही. शिवाय जागोजागी हातात पावत्या घेऊन पार्किंगच्या वा अन्य नावाखाली पैसे उकळणारे सरकारमान्य गुंड उभे असतात. त्या पैशाने त्या पर्यटनस्थळाचा कसलाही विकास झालेला किंवा पर्यटकांसाठी सोयी केलेल्या दिसत नाहीत. यांना शेकडो रुपये द्यायचे आणि चिखलाच्या लाद्यांनी भरलेल्या जागेत गाड्या पार्क करून घाणीवरून आणि थुंकभरल्या रस्त्यांवरून उड्या मारत फिरायचे!

असल्या "विकेंड" पेक्षा घरीच एखादी सुंदर धून लावून वाफाळलेला चहा घेत आकाशातून पडणाऱ्या सरींकडे पाहत चार क्षण निवांत घालवणे हे जास्त मन:शांती देणारे आहे. आणि अगदी बाहेर जायचीच इच्छा असेल तर सरळ रजा टाकून एखाद्या सोमवारी किंवा मंगळवारी जावे. नाही का?

दारू बंद झाल्याने यातले काहीही बंद होणार नाहीये हे समजतंय का?
>>>
मला ही पळवाट वाटते. जे करणे आपल्याला शक्य नाही ते गरजेचेच नाही अशी समजूत काढणे.

ईथे बहुतांश लोकांनी त्या धिंगाणा करणार्‍या लोकांना लांबून पाहिले आहे आणि तर्कवितर्क लढवत आहेत, मी अश्यांच्यात स्वत: राहून अनुभव घेतला आहे.

अरे यार ,
देख भाई ऋन्मेऽऽष , दारु भल्याभल्यांच्या डोक्याला झोंबते हे कळल सर्वांनाच पण मी लिहिलेल्या अनुभवात फक्त दारु हेच एकमेव कारण लिहिलेलं नाहीए.. नाही म्हटल तरी अजुनपर्यंत माझ्या पाहण्यात तरी दारुच पर्यटनस्थळी पुर्ण प्रमाणात जागतिकीकरण झालेलं नाहीए.. विषय आहे जेव्हा तुम्ही आम्ही दारु न पिताही पर्यटनस्थळी निसर्गाची नाहक हानी करतो त्याबद्दल.. यात एकट्या दारु ला धरुन नाही न बोलुया प्लीज.. परत तेच तेच.. मी म्हणतेय की लोक मित्रमैत्रीणींसोबत येतात, कुटूंबासोबत येतात ( न पिता ) तरीही हि नासधुस , गचाळपणा , विक्षिप्त वृत्ती कशी त्रासदायक ठरते..

ईथे बहुतांश लोकांनी त्या धिंगाणा करणार्‍या लोकांना लांबून पाहिले आहे आणि तर्कवितर्क लढवत आहेत, मी अश्यांच्यात स्वत: राहून अनुभव घेतला आहे. >> मी वर अनुभवलेल्या आणि मांडलेल्या गोष्टींमधे मला तरी कुणी पिउन दिसले नाही .. कुणीही झोकांड्या वगैरे देत तर अज्जिब्बातच नव्हते.. पोर गाणे लावुन नाचत होते त्या अनुभवात सुद्धा ते दारु पिउन होते अस म्हटलेल नाहिए तर तर्कवितर्क लढवायचा प्रश्नच नाहिए.. प्रत्येकवेळी समोरचा पिउन आहे कि नाही हे कळायला बर्‍याच अंशी त्याच वागणं बघण सुद्धा पुरे असत.. त्यासाठी त्यांच्या सतत बरोबर असण, वा त्यांच्यात जाऊन त्यांच्या तोंडाचा वास घेण गरजेच नाही ना..

Let's stick to our subject...आणि तो निव्वळ दारु हाच नाहिए मुळात .

हम्म्म.

खूप वाटत होतं निदान लोणावळा, भुशी dam जावं. पण खरंच जाऊ नये अशी परिस्थिती आहे. टीना thanx. या लेखामुळे बऱ्याच ठिकाणची परिस्थिती कळली.

हे सर्व वाचून वाटतं, आमच्या गावचा समुद्रकिनारा टुरिस्ट स्पॉट नाही ते बरं. शांत, निवांत, स्वच्छ आहे अगदी.

टीना,
आपण विकांताला गेला नव्हता बहुधा त्यामुळे आपला अनुभव फक्त कचरा करणारे बेशिस्त वगैरे लोक ईथपर्यंतच मर्यादीत असावा.
मग आपण जमल्यास या विकांताला जाऊन पुन्हा एकदा नजारा बघून या. मग समजेल की दारू पिऊन जो धिंगाणा घातला जातो, जे हल्ली एक नवीनच फॅड आले आहे की रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून उघड्या अंगाने हातात दारूचा ग्लास घेउन कानठळ्या बसवणार्‍या डीजेच्या तालावर नाचा, ते काय भयंकर असते. हे एक उदाहरण दिलेय, याहूनही बरेच बीभत्स प्रकार घडतात, पण मग आपण जे पाहिले ते आपल्याला फार सौम्य वाटू लागेल. मला ते तसे वाटतेय म्हणून माझ्या पोस्टचा रोख तुलनेत जास्त गंभीर समस्येकडे आहे ईतकेच Happy

ऋन्मेऽऽष, आम्ही तुम्ही नकोच..तु म्हटल तरि चालेल..
हा अनुभव मी कालपरवाच्या प्रसंगावर लिहिलेला आहे याचा अर्थ असा नक्कीच नाही कि विकांताचा गोंधळ मी बघितला नाही.. परत एकदा नमुद करु इच्छीते कि एखाद्या स्पॉटबद्दल मी बोललीए जो बर्‍यापैकी परिचित आहे.. रस्त्यांवर हा प्रकार मी बघीतलेला आहे पण वर लिहिलेल्या अनुभवात जिथ लोक सर्व कुटुंबीयांसकट येतात .. फक्त तरुणाईच नाही अश्या ठिकाणाबद्दल बोलतेय..
रस्ता आहे त्यावर अश्या घटना घडतातच मी त्याला नाही नाही म्हणतेय पण फक्त रस्त्यावर दारुन पिऊन धिंगाणा घालणार्‍यांपेक्षा फक्त दारु या विषयावर जी चर्चा भरकटत आहे त्याबद्दल आवरुया अस म्हणतेय..
तुझं अगदी बरोबर कि दारु पिउन धतिंगी करण वाईट..पुर्ण्पणे सहमत पण सोबत आणखीही गोष्टी वाईट आहेत हे पण तर बरोबरेय ना ?

पण सोबत आणखीही गोष्टी वाईट आहेत हे पण तर बरोबरेय ना ?
>>>
हो नक्कीच पण माझ्यामते या गोंधळाचे प्रमाण कमी झाल्यास त्याचेही आपसूक थोडेफार कमी होईलच. कारण एकाचे बघून दुसरे करणे आणि चलता है मनोवृत्ती आपल्या लोकांमध्ये जास्त आढळते. एकीकडे अत्यंत बीभत्स प्रकार चालू असतील तर मी अमुकतमुक तरी ईथे आरामात करू शकतो, त्यांना कोणी हटकत नाही तर मला कश्याला काय बोलताहेत, जिथे तिथे दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलाहेत तर मी बिस्किटचे रिकामे पुडके टाकने हे फार मामुली आहे वगैरे वगैरे वाटणे साहजिकच असते...

असो, तुर्तास माझी दारू विषय बंदी .. शुभरात्री Happy

अमेरिकेत एरवी सर्व नियम व्यवस्थित पाळुन रहाणार्‍या लोकांचा भारतीयपणा भारतात जाणार्‍या विमानात बसताना / बसल्यावर एकदम उफाळून येतो. >> १००% सहमत
विमानाचा Boarding Pass जेव्हा देतात, तेव्हा त्यावर सीट नं. छापलेला असतो. त्या नंबरच्या सीटवर तुमच्याशिवाय दुसरा कोणी माणूस बसण्याची शक्यता फारच कमी असते. Boarding Pass हातात आला आणी तुम्ही गेट्च्या जवळ्पास असलात की तुम्हाला घेतल्याशिवाय फ्लाइट सुटण्याची शक्यता फारच कमी असते. बरं, International Flight मधे खायला, प्यायला जरी चकट्फू मिळत असलं तरी, take off झाल्याशिवाय ते मिळतं नाही.
असं सगळं असतानाही भारतीय लोकांना घाईघाईने विमानात का चढायचं असतं, हे मला आजतागायत कळलेलं नाही.

Sad वाचूनच वाईट वाटले.

मी २००७ च्या वेळेस गेले होते. त्यावेळी परीस्थिती जरा बरी होती. आता असह्य होत चाल्लय सर्व.

मागच्या वेळेस पार्ल्यात जैन मन्दिरासमोर म्हणजे रस्त्याच्या १ बाजुस मन्दिर आणि दुसर्या बाजूस एका वयस्कर गुज्जु माणसाची कार लावली होती, हा रस्ता छोटसाच आणि धावता आहे, त्यात परत ह्याची कार अशीच लावलेली, असो.
तो माणुस दर्शन घेऊन बाहेर आला, गाडीत बसला, आणि काच खाली करून सन्त्राच्या पोतभर साली गच्च्कन धावत्या रस्त्यावर ओतल्या Sad त्या कचर्यावरून दुसर्या गाड्या धावू लागल्या.....
क्षणभर त्याने इकडे तिकडे ओशळून पाहिले, मी समोरच रिक्षेत होते, मी अचम्भित होऊन त्याला हाताने काय हे? लाज आहे क? असा इशारा केला...त्याने पटकन काच वर केली
असे लोक असतात, भावीक, वयस्कर पण डोक्याचा रकाना पुर्ण मोकळा सुटलेले Sad

बाकी इथे ही रुन्मेश च आपल तुणतुण सुरू आहे ते आहेच Angry

आमच्या दिवेआगरचा समुद्र किनारा पर्यट्कांनी खराब केला आहे. चक्क किनार्‍यावर गाड्या आणणं आणि वाळूतून चालवण्ं , कचरा टाकणं चालू असतं. काय घाण करून टाकलं माझं गाव.

ऋन्मेष, सार्वजनीक जागी दारु पीणं हे कायद्याने बंद करावं ह्याबद्द कोणाचही दुमत नसावं.

दारूमुळेच केवळ असे होते हे मलाही मान्य नाही, पण दारू सहाय्य करते जसे आधीच मर्कट, तशातच विंचुदंश झाला, आणि मद्य प्याला वगैरे पद्धतीने.... असो.

>>>>> नियम तोडण्याला आपल्या भारतीय मानसिकतेत असलेले ग्लॅमर (हो भारतीयच. नियम तोडण्याचे कौतुक फक्त भारतीय उपखंडात मूळ असलेल्या लोकांनाच असलेलं पाह्यलंय.) <<<<
माझ्यामते दारूपेक्षाही भारतीय मानसिकतेला लागलेली "कायदेभंगाची" कीड (ती कधी कशी का लागली हे सगळ्यांनाच खरे तर माहित आहे, फक्त मान्य करायची तयारी नस्ते असा अनुभव) या सगळ्यांच्या मागे आहे.

सार्वजनीक जागी दारु पीणं हे कायद्याने बंद करावं ह्याबद्द कोणाचही दुमत नसावं.
>>

तशी बंदी आहेच! पण लक्षात कोण घेतो?

पण दारू सहाय्य करते
>>
१००% सहमत लिंबूकाका. दारू पिऊन व्यवस्थित ड्रायव्हरच्या हातातच गाडी सोपवून घरी जाणारे लोक पाहिलेत आणि झोकांड्या देत आदळत आपटत घरी पोचणारे पण ...

पण दोष मात्र तिच्या नशिबी Lol

Personal or rent car ने गेलात तर भुशीला न जाता वर लायन्स आणि टायगर्स point ला जावं. तिथेही स्वच्छता नाहीये पण पाऊस झेलायला छान वाटतं.
किंवा त्या रस्त्याने सरळ ambey vally चा रस्ता धरावा. अप्रतिम long drive आणि बर्याच अनवट वाटा अहाहा!
मी दरवर्षी जाते लोणावळ्यात पण फक्त long drive आणि लायन्स point च्या मकाभजी आणि घोटीव गावठी चहा साठी.(कचरा अर्थातच जवळच्या पिशवीत आणि मग रस्त्यात दिसलेल्या कचरापेटीत).

Pages