विषण्ण करणारा अनुभव - लोणावळा

Submitted by टीना on 2 July, 2015 - 03:24

काल सकाळी अगदी झोपेत असताना ताईचा फोन आला लोणावळ्याला चलतेस का म्हणुन. अगदी ताबडतोब हो म्हटल आणि आवराआवर करुन तिच्या घरी पोहचली. तिथुन थोड्याच वेळात लोणावळ्याकडे प्रस्थान केल..

पहिला स्टॉप भुशी डॅम वर आणि पुर्ण दिवसासाठी मुड खराब .. अस वाटलं कुठुन दिमाग आला आणि इथ जाण्याकरीता हो म्हटलं .. पार्किंगसाठी फि रु.१००.. अबब! अस झालं. असो म्हणुन शंभरी त्याच्या हातात कोंबली आणि चालत निघालो. तिथ जाण्याच्या वाटेवर सगळी कचराकुंडी.. प्लॅस्टिकचे चमचे , ताट , सिगरेटचे थोटकं , कपडे काय नको ते पडलेलं.. किळस आली अगदी.. चिखलभरल्या चपलेनं लोक बाजुच्या पायर्‍यांवरुन चढत आणि खालच्या पायर्‍यांवर बसलेले लोक त्या पायर्‍यांवरुन पडणार्‍या पाण्यात बसुन मज्जा घेत होते..
तिथच बसलेल १५ २० पोरांचे २ ३ टोळके घाणेरड्या आवाजात ओरडत होते, अंगविक्षेप करत आहे आणि काय काय..

लोकांच्या मॉडर्न असण्याच्या संकल्पना कुठल्या थरापर्यंत वेगवेगळ्या असु शकतात त्याच पुस्तक उघडून बसल्यासारख वाटत होतं.. मुर्खासारखे वागत होते हे मोठे लोक तिथे.. कुणाला कुणाच सोयरसुतक नाही, करतय करु दे मरतय मरु दे यातला प्रकार..डॅम च्या भिंतीवर शब्दशः २५ ते ३० च्या दरम्यान असलेला सो कॉल्ड तरूण उभा राहुन मुततोय . माफ करा पण त्याच्या कृतीला बघुण दुसरा शब्द मला सुचत नव्हता.. खाली लोक पाण्यात ओले होत मज्जा करत होते.. काय म्हणाव याला ?

त्या पाण्यात भिजत , तिथं बसुन लोक कणिस खात होते आणि अक्षरशः तिथच त्या पायर्‍यांवर फेकत होते..
एक तरूण.. जबरदस्तीने लोवेस्ट करण्यासाठी जमेल तेवढा सरकवलेला जीन्स , कुल टिशर्ट, तारे जमीन पर मधल्या आमिर सारखी हेअरस्टाईल करुन गॉगल लावुन भिंतीवर उभा राहुन पचापचा त्या पाण्यात थुंकतोय आणि खाली छोटे लेकरं त्याच पाण्यात डुंबत असताना हे चाल्लयं.. त्याला मी शिव्या मारल्यावर तो आणि इतरहि लोक निव्वळ बघे बनलेले होते.. कुठ हरवल्या यांच्या संवेदना ? मुर्ख आहेत का हे ? श्शी..

माझ लग्न झालेल नाही , ना ही एखाद्या २ महिन्याच्या लहान मुलाला वागवायचा मला अनुभव आहे तरीही माझ्यामते २ ते ३ महिन्याच बाळ फुलासारखं नाजुक असतं आणि त्याला तसच जपावसुद्धा लागतं.. पण तिथ एक तरुणी तिच्या तेवढ्याच बाळाला भर पावसात हाती गुंडाळून डोक्यावर छत्री सुद्धा न घेता तसच घेऊन त्या पायर्‍या चढत होती.. एखाद्याची हौस मान्य करता येते पण त्या छोट्या न बोलत्या जीवाचे काय हाल होत असणार अथवा होणार ते त्या माऊलीला तरी ठाऊक होते की नाही देव जाणो. भुशी डॅम चा तो सुंदर अनुभव घेऊन इतर कुठ फिरायची इच्छाच मरुन गेली. जाता जाता तेवढ कार्ल्याला गेलो तर तिथही तिच तर्‍हा.

पहिल्यांदा लोणावळा २०१० मधे बघीतला होता.. त्यानंतर डायरेक्ट आत्ता जाण्याचा मुहुर्त निघाला. कित्ती फरक पडला या ५ ६ वर्षात..पुर्ण बाजारीकरण झालय प्रत्येक ठिकाणाचं.. कार्ल्याच्या लेण्यांना देवळाचं स्वरुप आलयं. ना ही त्या लेण्या पहिल्याएवढ्या वैभवात राहिल्याय आणि शंका आहे की देवीच्या देवळाच देवत्व तरी शाबुत आहे कि नाही ? तरी बर हि बेभान तरुणाई देवीदेवतांची तेवढी भक्त नाही .. नाहीतर तिथल्या देवळातल्या भक्तीच्या कृतीला विकृतीची जोड लाभायला असा कितीसा वेळ लागणारे..
लिहण तितकस जमत नाही पण सांगण्यापासुन खरोखरच राहावल नाही..
मला नाही वाटत यापुढं कधी लोणावळा जायची हिम्मत होईल . Sad . आणखी एक सुंदर ठिकाण भेटीला पारख झालं ..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखाचा नेमका विषय, नेमके मुद्दे.

वल्गरपणा वाढिस लागला असे नव्हे, तर वल्गरपणाला "प्रतिष्ठा" मिळू लागलि, व जे वल्गरपणाच्या विरोधी होते त्यांना "ब्राह्मणी" म्हणून हिणवण्याचे खूळ सुरू झाले त्यालाच कित्येक वर्षे होऊन गेली, परिणाम इतका की आज "ब्राह्मणांची" काही मूर्ख पोरेही या पिऊन्/झिंगुन केल्या जाणार्‍या तमाशात सामिल असतात.
अन जर काही सांगायला गेले तर "आले संस्कृतीरक्षक" म्हणुनही बरेच बोंब ठोकतात. असो.
हे सगळीकडेच बघायला मिळते.

ज्या प्रकारे वर्णन केले आहे तुमी ! ते पाहता मी लोणावळ्याला जाण्याचा प्ल्यान हि करणार नाही ..........या आधी नाही गेलो कधी पण या पावसाळ्यात सह कुटुंब जाण्याचा विचार होता पण इतकी वाईट अवस्ता असेल तर बेफि प्रमाणे सुट्टी घरीच बसून आनंदाने घालवावी .

एक समाजाचा घटक म्हणून जगण्याची आपली लायकीच नाही आहे. आपल्याला उठता लाथ बसता बुक्की पाहिजे. ह्या असल्या देशावर परकीय आक्रमणे होणे ह्यात काहीही नवल नाही.

ईथेही फसाद की जड दारूच !

माणसे चांगली वाईट सारीच असतात, बस्स त्यांच्यातील जनावराला बाहेर यायला आपण मुभा दिली नाही पाहिजे. अन्यथा ईथे दंगा घालणारेच सो कॉलड परदेशी स्वच्छ देशात शिस्तीत वागतातच ना.

संपूर्ण दारूबंदी अशक्य आहे म्हणणारे देखील याला समर्थन देतील की सार्वजनिक जागी दारू पिण्यास बंदी घालायला हवी. अश्या निसर्गरम्य पर्यटनस्थळी दारू पोहोचूच नये याची काळजी घ्यायला हवी.

एकदा का मद्य फॅक्टर नाहीसा झाला की ती मर्कटे माणसांत तरी येतील वा तिथे फिरकणार तरी नाहीत.

आणि हे सहज शक्य आहे, मामुली इच्छाशक्ती हवीय, पण ती सरकार दाखवत नाही कारण त्यांनाही मास पब्लिकला यातच खुश ठेवून त्यांचा स्तर असाच राहू द्यायचाय.

टीना - तुम्ही हे तरी पर्यटनस्थळांचे सांगताय. कास, भुशी डॅम, भाजे केव्हज अशा ठिकाणी चालणारे हे रम्य प्रकार पाहून कित्येक वर्षांपूर्वीच या अशा ठिकाणी सोडलेय. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आम्हा भटक्यांची पवित्र ठिकाणे किल्ले हेदेखील सुटले नाहीये.

लोहगड, विसापूर, हरिश्चंद्रगड, कोरीगड - या ठिकाणीही सुट्टीच्या दिवशी जाणे म्हणजे शिक्षा. लोकांना इतके बहकल्यासारखे का करावेसे वाटते हेच कळत नाही.

बरे, शहरात तुम्हाला फार बंधने पाळावी लागतात म्हणून एखाद दिवशी बाहेर जाऊन मुक्तपणे धिंगाणा घालत असतील म्हणावे तर शहरातही रोजच्या रोज हा तमाशा चालतोच.

चीड, उद्वेग, संताप आणि याविरोधात काहीही करू शकत नाही याची हतबलता

अन जर काही सांगायला गेले तर "आले संस्कृतीरक्षक" म्हणुनही बरेच बोंब ठोकतात. >> +१

ईथेही फसाद की जड दारूच ! >> ऋन्मेऽऽष , डॅमवर लिहिलेल्या अनुभवात कुठ होत कुणी दारु पिऊन ? तरीही धतिंगी होतीच ना ..

संपूर्ण दारूबंदी अशक्य आहे म्हणणारे देखील याला समर्थन देतील की सार्वजनिक जागी दारू पिण्यास बंदी घालायला हवी. अश्या निसर्गरम्य पर्यटनस्थळी दारू पोहोचूच नये याची काळजी घ्यायला हवी. >> हं , हे भारतात कितपत शक्य होईल कुणास ठाऊक ?

मुळात दारुमुळेच सगळे वाईट काम होत अस्णार तर परदेशात ज्या ठिकाणी दारु पिणं हि पाणी पिण्याएवढी साधी गोष्ट समजल्या जाते तिथं तर पोरींनी, कुटुंबांनी घराबाहेर निघणचं बंद कराव.. एखादी गोष्ट पिल्यानं तुमच्यातला सैतान मोकळा होत असेल तर तुम्ही नक्की चांगली व्यक्ती आहात कि नाही हि परिभाषाच बदलुन जाते नै का ? एव्यातेव्या गोष्टीनं तुमच्यावर तुमचा ताबा राहत नाही तर तुम्हीच चुकताहात.. ती गोष्ट तुमच्या चुकण्याला कारणीभुत कशी ठरेल ?

टिना..:( भाजोपो
पावसाळ्यात जावु नयेत अशी अनेक ठिकाणे आहेत. त्यातील हे एक.
पाउस आणि निसर्ग याचा आनंद 'बेभान' होवुन घ्यावा याचा अर्थ 'बेशरम' होवुन असा घेतात हे लोक.

खरंतर विषण्ण म्हणण्यापेक्षा चीड आणणारा अनुभव म्हणायला हवंय. खरंच खूप चीड येते. गणपतीपुळ्याच समुद्र खोल आहे, इथे जास्त पाण्यात जाऊ नका असं बोर्ड सर्वत्र लावलेले आसतानाही दारू पिऊन "आमी काय नदीत पवत नाय का?" अशी अरेरावी दाखवत बुडलेल्यांची संख्या कमी नाही.

अजून एक बेक्कार अनुभव म्हणजे असल्या पर्यटनस्थळी (बीच, धबधबा) वगैरे ठिकाणी खुशाल कुणाचेही फोटो व्हीडीओ काढायचे. कसली पत्रांस नसल्यासारखंच वागणं.

बेफी, बरोबरच दक्षिणेकडे आहेच तसे. मला नेमके ठामपणे सांगता येणार नाही पण ही अशी वृत्ती मी जास्त करुन बिहार आणि हरयाणा मधल्या लोकांत बघितली आहे. अर्थात मराठी लोक सोवळे असा दावा नाही.

मी तूमच्या एका लेखात थायलंडमधील लोकशिक्षणाचा उल्लेख केला होता. तिथे जर तूम्ही तूमचा परीसर स्वच्छ ठेवला नाहीत तर पर्यटक येणार नाहीत, तूम्हाला रोजगार मिळणार नाही, असा प्रचार केला होता. शिवाय कुणी कचरा केलाच तर त्याला दंड होत असे आणि असा दंड वसूल करणार्‍या पोलिसांनाही प्रोत्साहन मिळत असे.

तिथे तूम्ही हे देखील बघितले असेल कि अगदी घराची मागची बाजू ऐन नदीत असली तरी नदी प्रदूषित नाही. हे साधले गेले त्यांच्याच गरजेतून. नदीच घाण केली तर मासे मिळणार नाहीत आणि मासे तर त्यांचे अन्न. हे त्यांना समजाऊन द्यावे लागले नाही.

यापैकी कुठलाच मुद्दा आपल्याकडे लागू नाही !

अजून एक बेक्कार अनुभव म्हणजे असल्या पर्यटनस्थळी (बीच, धबधबा) वगैरे ठिकाणी खुशाल कुणाचेही फोटो व्हीडीओ काढायचे. कसली पत्रांस नसल्यासारखंच वागणं. >> नंदिनी, त्याबद्दल आणखी एक स्वतंत्र लेख होईल .. स्वतंत्र व्यक्तीत्व आणि व्यक्ती स्वातंत्र्य याची पद्धतशीर मोडतोड करुन गल्लत केल्या जाते.. मुर्ख लेकाचे.. इथ आम्ही मित्रमैत्रीणींमधे सुद्धा एकमेकांचे फोन नं देताना त्या त्या व्यक्तीला विचारतो आणि हे सर्रास कुणाचेही फोटो , व्हीडीओ काढून जालावर डकवतात .. :रागः

दिनेश, सहमत आहे.

नंदिनी, मलाही अगदी गणपती पुळ्याबाबतची तीच आठवण आली. पाट्या लिहिलेल्या आहेत, अनुभव वाचनांत असतात तरीही लोकं जाऊन बुडतात म्हणजे काय म्हणावे!

ऋन्मेष - ह्याच्या मुळाशी दारू आहे हा निष्कर्ष बरोबर नाही. ह्याच्या मुळाशी असंस्कृतपणा व बेदरकारपणा आहे. तो न पिताही उफाळून येत असतो.

अनुभवाशी एकदम सहमत. आमचा ग्रुप मागे एकदा माळशेजला गेला होता. तिथला सगळा तमाशा बघून तसाच मागे फिरला. एक सेकंदही थांबणे नको वाटले सर्वांना. तसेच परत आलो. गाडीत बसून जेवढा निसर्ग दिसला त्याचाच आस्वाद घेतला.
निसर्गाच्या सान्निध्यात जातानाही भसाड्या आवाजातील गाणी लागतात कशाला तेच कळत नाही. निसर्गायन मुक्तपणे ऐकायचं सोडून तिथेही आपलंच तुणतुणं वाजवायचं असेल तर जायचं कशाला?
गु्रपने एक नक्की ठरवलंय. अनेकदा मुक्तछंद फिरताना अनेक अनवट वाटा ओळखीच्या होतात. आपल्याला नव्याने काही सापडतं. पण अशा अनवट वाटांची प्रसिद्धी अजिबात करायची नाही आणि तिथे वाट्टेल तसा गोंधळ घालण्याची संधी उपलब्ध करुन द्यायची नाही असा निर्णय घेतलाय. जो आजपर्यंत तरी अंमलात आणलाय.
दुसरं, आपल्या मुलांना, त्यांच्या मित्रांना लहानपणापासुनच निसर्गाचा आदर करायला शिकवायचं. निसर्गाचा आनंद घेण्याचा, जाऊ तिथे कचरा निर्माण न करण्याचा, निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर त्याचेच संगीत ऐकण्याचा संस्कार करायचा. ते प्रयत्न मात्र सातत्याने सुरु आहेत. यशही येते आहे हे अधिक आनंददायी आहे.

बाकी ह्या गोष्टी गेली कैक वर्षे चाललेल्या आहेत. भुशी डॅम सोडाच, ताम्हिणी घाटासारख्या एकेकाळच्या निर्मनुष्य जागीही केव्हापासूनच मानवी पशू आपल्यातील जनावर दाखवत भटकत असतात.

आम्ही गेल्याच आठवड्यात खंडाळ्याला जाऊन आलो. मायबोलीवरचा धागा वाचून ड्यूक्स रिट्रीट मध्ये उतरलो होतो. खोलीतून दिसणारा नजारा अतिशय अप्रतिम होता. हॉटेलपासून जवळच राजमाची पॉईंट होता म्हणून संध्याकाळी तिथे गेलो. वीकडे होता. गर्दी ठीकठाक होती त्यामुळे वरच्या अनुभवाइतका वाईट अनुभव नाही आला. पण सगळीकडे कचरा, कणसं खाऊन फेकलेली, विष्ठा-लघवीचा तीव्र वास ह्यामुळे किळस आली.
कुठल्याही स्थळाला भेट न देता हॉटेलवरच रिलॅक्स करणे पसंत केले मग !

पाट्या लिहिलेल्या आहेत, अनुभव वाचनांत असतात तरीही लोकं जाऊन बुडतात म्हणजे काय म्हणावे!>>> मेलेल्यांची नावे आणि वये लिहिली आहेत, खाली "इथे तुमचेनाव हवे का?" असे लिहिले आहे तरी लोकं ऐकत नाहीत. समुद्र डेंजर आहे म्हणजे काय ते समजून घ्यायची पण इच्छा नसते. आमच्याकडे बोटींवर साअसात महिने काम करणारे, लाईफ सेव्हिंगचे सर्व ट्रेनिंग घेतलेली लोकंसुद्धा पुळ्याच्या समुद्रात उतरत नाहीत. पण हेच त्यांच्या गावाकडचय पाहुण्यांना सांगायला गेले तर तोंडावर अपमान केलेला आहे.
दक्षिणेकडे मंगळूर, कूर्ग, कासारगोड, पुदुचेरी, मद्रास इथे फिरण्याचे अनुभव खरंच चांगले आहेत. असा आणि इतका त्रास जाणवलेला नाही. (अर्थात आम्ही फेमस पावसाळी वगैरे स्पॉटवर शक्यतो या भागात गेलेलोच नाही)

तं. पण अशा अनवट वाटांची प्रसिद्धी अजिबात करायची नाही आणि तिथे वाट्टेल तसा गोंधळ घालण्याची संधी उपलब्ध करुन द्यायची नाही असा निर्णय घेतलाय. जो आजपर्यंत तरी अंमलात आणलाय.<<< सीरीयसली, आम्हीही हेच करतो.

>>>> ह्याच्या मुळाशी दारू आहे हा निष्कर्ष बरोबर नाही. ह्याच्या मुळाशी असंस्कृतपणा व बेदरकारपणा आहे. तो न पिताही उफाळून येत असतो. <<<< अगदी थोडासा असहमत.
माजोरीपणा, बेदरकारपणा, असंस्कृतपणा उफाळून यायला दारूची गरज नाही हे मान्य.
पण एरवी तुलनेत सौम्य, सभ्य, मुखवटेधारी भासणारे शेळपट जेव्हा दारू पितात तेव्हा त्यांच्यातलाही माजोरडेपणा प्रचंड वाढून माजोरड्यांची संख्या कैक पटीने वाढते. म्हणून अशा ठिकाणी तरी दारूबंदी हवीच. किंबहूना आहेच. सार्वजनिक ठिकाणि दारू पिऊन धिन्गाणा घालणे कायद्याने वैध नाहीये. अगदी सिगारेटा सारखेच सार्वजनिक ठिकाणी दारू पिणेही बेकायदेशीर आहे. शिवाय बिना लायसनचे पिणे हा देखिल गुन्हा आहे. प्रश्न आहे तो अंमलबजावणीचा. आहे ते कायदे ही कठोरपणे अंमलात आणले तरी खूप झाले.

आत्मधून+१००..

गेली दहा वर्षे आम्ही असल्या तुंबळ पावसाळी गर्दीच्या वाट्याला गेलेलो नाहिओत.
खरंच असं फिरताना कित्येक अहाहा! अशा जागा सापडल्या , आपल्यातच रमलेल्या वाटा भेटल्या, नाचरे धबधबे पाहिले, पावसाचं खरंखुरं गाणं ऐकलं...आपल्याच मस्तीत खळखळणारे झरे पाहिले, हिरवाईचा पोटभरुन सुगंध प्यायला... आणि अगोदरच पावसाच्या प्रेमात असणारी मी अजूनच सुखावून गेले..
पुन्हा वर्षभर भेटत नाही तो. घरात राहून कसं पहायचं त्याला? जरा कष्ट पडतील पण जा अश्या वाटांनी. अनुभऊ द्या पोराबाळांना असा मस्त पाऊस...!!

थोडेसेच कष्ट..

नंदिनी, अग आम्ही तर शहरी बाळे, पण आंजर्ल्याला गेल्यावर आड्याकडे जाताना वाटेत खडकाळ किनारा आहे, तर आम्हाला बजावूनच नव्हे तर कान उपटून तंबी दिलेली असायची की तिकडे पाऊलही ठेवायचे नाही पाण्यात. बुडलात तर मर्तिकाकरता प्रेतही सापडणार नाही.
पण अतिशहाण्यांना काय सांगणार? मुळात स्वतःमध्ये तेव्हडी ताकद, अक्कल नसताना अनोळखी ठिकाणि तडफडायला जाऊच नये, न जाणे म्हणजे घाबरटपणा नाही, पण नको तिथे "मर्दुमकी/पुरुषार्थ(?)" दाखवावयास गेले की जे व्हायचे ते होतेच.
अग, यासारखाच गुहागरचा किनारा आहे. पण वेगळ्या पद्धतीने धोकादायक आहे. ओहोटीच्या वेळेस दूरपर्यंत किनारा मोकळा झालेला दिसतो, पण भरतीच्या वेळेस अतीवेगात तो भरतो इतका की माणूस चालत/पळत किनार्‍यावर पोहोचू न शकल्याने बुडतो. स्थानिक लोक विनवुन्/बजावुन सांगुनही माणसे अहो त्यात काय विशेष, हे आत्ता जातो अन येतो म्हणत जातात अन अडकतात. नशिब चांगले असले तर वेळीच मदत मिळून सुटका होते. पुळ्याला तर मदतीचाही काही उपयोग नाही.
मी आजही आंजर्ल्याला गेल्यावर थोरल्या भावाला विचारतो की बाबारे समुद्रावर जायचे आहे, सोईची वेळ कोणती, मग तो तिथीचे गणित मांडून भरतीओहोटीची वेळ बघतो अन सांगतो की आत्ता जा/नंतर जा/अमुक वेळपर्यंतच थांबा वगैरे.

बायदिवे, पिंचीमधे गेली ३० वर्षे राहून, लोणावळ्यात कैकदा जाऊनही मी अजुनही भुशी डॅम बघायला गेलेलो नाही. तशी गरज वाटली नाही.

आमच्या गावाला (तारापूर, चिंचणी), अफाट समुद्र किनारा, अगदी निर्मनुष्य असायचा. पण टुरीस्ट स्पॉट झाल्यापासुन, भेळेच्या गाड्या काय, उंट काय, मोटरसायकली काय आणि गर्दी तर विचारुच नका. दादर चौपाटीला मागे सारील अशी. नवनवे उद्योग निघालेत. गावकर्‍यांना शेतीपेक्षा आता रिसॉर्ट्स काढणे सोयीचे वाटु लागले आहे.

समोर कोंबडी दाखवली जाते. थोडे फिरुन आलात कि भाजलेले चिकन तयार, त्यावर गावची पोरे पेप्स्सीची मोठ्ठी बाटली घ्यायला विसरत नाहीत. त्यामुळे आमच्याकडे रिसॉर्टसचा उद्योग जोरात सुरु आहे. गंमत म्हणजे जुनेजाणते देखिल शिंग मोडुन वासरात शिरलेत आणि रिसॉर्टसची मजा लुटताहेत.

बाकी टुरिस्टस्पॉट झाला म्हणजे सर्वतर्‍हेचा दळभद्रीपणा येतोच बहुधा.

भुशी डॅमला खुप कधीतरी आधी गेलो होतो.
तेव्हाही चांगलीच गर्दी होती.
पण एकुणात धिन्गाणा थोडासा कन्ट्रोल मध्ये होता.

त्यावेळी आवडलेल असल्यामुळे एकदा विथ फॅमिली गेलो.
पायर्‍यांवरुन पाणी वहात नव्हतं तरिही तुफानी गर्दी होतीच.
पाणी नसल्याने पार्किन्ग मध्येच चारचाक्या लाउन त्यातील साउन्ड सिस्टीम वर मोठ्याने गाणी लावत हातात बाटल्या घेत डॅण्स सुरु होता, त्याच्या अलिकडे १०० मिटरवर पोलिसांचा बोर्ड होता दारु पिणे वै वरुन.

तो धिन्गाणा बघुन तिथे थांबलोच नाही. हा हि अनुभव साधार्ण ३-४ वर्षापुर्वीचा असेल.
आता तर काय तिकडे फिरकतच नाही.

केवळ ह्याच कारणामुळे मी अजुन माळशेज घाट पाहिलेला नाहि.

त्या धरणात बुडुन मरण्यार्‍यांची संख्या वाढत आहेच.
पोलिस आणि लोकल ऑथॉरिटी बरच काही कन्ट्रोल करु शकतात.
अर्थात त्याला बरीच राजकीय इच्छाशक्ती पाहिजे.

बाकी टुरिस्टस्पॉट झाला म्हणजे सर्वतर्‍हेचा दळभद्रीपणा येतोच बहुधा. >> अगदी.

पोलिस आणि लोकल ऑथॉरिटी बरच काही कन्ट्रोल करु शकतात.
अर्थात त्याला बरीच राजकीय इच्छाशक्ती पाहिजे. >> १००% की बात..

ह्म्म.. चिड येत नाही आता. आता फक्त विषण्णपणा येतो.

म्यानमाचे फोटो पाहताना वाटत होते की आपल्या तुलनेत हा देश गरिब असणार. पण चकाचक किती आहे... कुठलेही फोटो पाहताना माझे लक्ष तिथल्या रस्त्यांवर जातेच जाते. आणि मग तिथली चकाचकी पाहुन मन अजुन् विषण्ण होते. आपल्याकडे हे कधीच जमणार नाही. इथे तर चालत्या गाडीतुन काच खाली करुन बिस्किटांचे रॅपर्स खाली टाकले जातात, दरवाजा उघडुन तोंड मोकळे केले जाते.

त्या धरणात बुडुन मरण्यार्‍यांची संख्या वाढत आहेच

मला असल्या लोकांबद्दल अजिबात सहानुभुती वाटत नाही. ज्यांच्याकडे सुचना वाचायला डोळे नाहीत, इत्रांचे ऐकायला कान नाहीत, त्यांच्याकडे फक्त पाय आहेत आणि त्या पायांनी चालत ते मृत्युच्या दारात जाताहेत. त्यांच्याबद्दल कशाला वाईट वाटून घ्यायचे?

के अंजली,

सहमत आहे. लोकांना नीटसे माहीत न झालेले कित्येक स्पॉट्स आहेत. तिथे हळूच जाऊन यायचे.

मी एक धागा काढला होता त्यातील दोन, तीन स्पॉट्स तसे आहेत.

आपल्याला नव्याने काही सापडतं. पण अशा अनवट वाटांची प्रसिद्धी अजिबात करायची नाही आणि तिथे वाट्टेल तसा गोंधळ घालण्याची संधी उपलब्ध करुन द्यायची नाही असा निर्णय घेतलाय. <<<
येस्स. हेच उत्तम.
ज्यांना निसर्गाची काही पडलेली नसते त्यांना अश्या अनवट जागा न सांगितलेल्या बर्‍या. निदान पुढच्या वेळी आपल्याला शांततेत बसायला एक तरी जागा राहते.

धाडस दाखवणे याचा इतका मूर्ख अर्थ घेतात अनेक लोक की बस्स. त्यांना निसर्गाची शिक्षा मिळतेच (पुळ्याचा समुद्र कुणालाच माफ करत नाही!) पण वाईट त्यांच्या घरच्यांचं वाटतं.

Pages