विषण्ण करणारा अनुभव - लोणावळा

Submitted by टीना on 2 July, 2015 - 03:24

काल सकाळी अगदी झोपेत असताना ताईचा फोन आला लोणावळ्याला चलतेस का म्हणुन. अगदी ताबडतोब हो म्हटल आणि आवराआवर करुन तिच्या घरी पोहचली. तिथुन थोड्याच वेळात लोणावळ्याकडे प्रस्थान केल..

पहिला स्टॉप भुशी डॅम वर आणि पुर्ण दिवसासाठी मुड खराब .. अस वाटलं कुठुन दिमाग आला आणि इथ जाण्याकरीता हो म्हटलं .. पार्किंगसाठी फि रु.१००.. अबब! अस झालं. असो म्हणुन शंभरी त्याच्या हातात कोंबली आणि चालत निघालो. तिथ जाण्याच्या वाटेवर सगळी कचराकुंडी.. प्लॅस्टिकचे चमचे , ताट , सिगरेटचे थोटकं , कपडे काय नको ते पडलेलं.. किळस आली अगदी.. चिखलभरल्या चपलेनं लोक बाजुच्या पायर्‍यांवरुन चढत आणि खालच्या पायर्‍यांवर बसलेले लोक त्या पायर्‍यांवरुन पडणार्‍या पाण्यात बसुन मज्जा घेत होते..
तिथच बसलेल १५ २० पोरांचे २ ३ टोळके घाणेरड्या आवाजात ओरडत होते, अंगविक्षेप करत आहे आणि काय काय..

लोकांच्या मॉडर्न असण्याच्या संकल्पना कुठल्या थरापर्यंत वेगवेगळ्या असु शकतात त्याच पुस्तक उघडून बसल्यासारख वाटत होतं.. मुर्खासारखे वागत होते हे मोठे लोक तिथे.. कुणाला कुणाच सोयरसुतक नाही, करतय करु दे मरतय मरु दे यातला प्रकार..डॅम च्या भिंतीवर शब्दशः २५ ते ३० च्या दरम्यान असलेला सो कॉल्ड तरूण उभा राहुन मुततोय . माफ करा पण त्याच्या कृतीला बघुण दुसरा शब्द मला सुचत नव्हता.. खाली लोक पाण्यात ओले होत मज्जा करत होते.. काय म्हणाव याला ?

त्या पाण्यात भिजत , तिथं बसुन लोक कणिस खात होते आणि अक्षरशः तिथच त्या पायर्‍यांवर फेकत होते..
एक तरूण.. जबरदस्तीने लोवेस्ट करण्यासाठी जमेल तेवढा सरकवलेला जीन्स , कुल टिशर्ट, तारे जमीन पर मधल्या आमिर सारखी हेअरस्टाईल करुन गॉगल लावुन भिंतीवर उभा राहुन पचापचा त्या पाण्यात थुंकतोय आणि खाली छोटे लेकरं त्याच पाण्यात डुंबत असताना हे चाल्लयं.. त्याला मी शिव्या मारल्यावर तो आणि इतरहि लोक निव्वळ बघे बनलेले होते.. कुठ हरवल्या यांच्या संवेदना ? मुर्ख आहेत का हे ? श्शी..

माझ लग्न झालेल नाही , ना ही एखाद्या २ महिन्याच्या लहान मुलाला वागवायचा मला अनुभव आहे तरीही माझ्यामते २ ते ३ महिन्याच बाळ फुलासारखं नाजुक असतं आणि त्याला तसच जपावसुद्धा लागतं.. पण तिथ एक तरुणी तिच्या तेवढ्याच बाळाला भर पावसात हाती गुंडाळून डोक्यावर छत्री सुद्धा न घेता तसच घेऊन त्या पायर्‍या चढत होती.. एखाद्याची हौस मान्य करता येते पण त्या छोट्या न बोलत्या जीवाचे काय हाल होत असणार अथवा होणार ते त्या माऊलीला तरी ठाऊक होते की नाही देव जाणो. भुशी डॅम चा तो सुंदर अनुभव घेऊन इतर कुठ फिरायची इच्छाच मरुन गेली. जाता जाता तेवढ कार्ल्याला गेलो तर तिथही तिच तर्‍हा.

पहिल्यांदा लोणावळा २०१० मधे बघीतला होता.. त्यानंतर डायरेक्ट आत्ता जाण्याचा मुहुर्त निघाला. कित्ती फरक पडला या ५ ६ वर्षात..पुर्ण बाजारीकरण झालय प्रत्येक ठिकाणाचं.. कार्ल्याच्या लेण्यांना देवळाचं स्वरुप आलयं. ना ही त्या लेण्या पहिल्याएवढ्या वैभवात राहिल्याय आणि शंका आहे की देवीच्या देवळाच देवत्व तरी शाबुत आहे कि नाही ? तरी बर हि बेभान तरुणाई देवीदेवतांची तेवढी भक्त नाही .. नाहीतर तिथल्या देवळातल्या भक्तीच्या कृतीला विकृतीची जोड लाभायला असा कितीसा वेळ लागणारे..
लिहण तितकस जमत नाही पण सांगण्यापासुन खरोखरच राहावल नाही..
मला नाही वाटत यापुढं कधी लोणावळा जायची हिम्मत होईल . Sad . आणखी एक सुंदर ठिकाण भेटीला पारख झालं ..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

(कचरा अर्थातच जवळच्या पिशवीत आणि मग रस्त्यात दिसलेल्या कचरापेटीत). >> प्रिती विराज..वाचुन दिलासा वाटला

aashu29 >> निदान ज्या मंदिरात दर्शनाला गेला त्यासमोरच असले घाण प्रकार करायला लाज वाटायला हवी लोकांना..

आता मोबाईल कॅमेरा प्रदुषण नावाची सुद्धा एक व्याक्ख्या तयार करावी का म्हणते..
येतेवेळी देहु च्या नविन मंदिराच काम पुर्ण्त्वास आलेल पाहुन तिथ जाण्याचा मोह टाळता आला नाही.. सुंदर बनवलय मंदिर..आत संतांची मुर्ति ठेवलीय आणि पुर्ण अभंग लिहिलेय..एकुण छान वाटत होत..
तिथं एक ग्रुप आला..पुण्यातला नव्हता जवळपासचा असेल..मंदिरात शिरत नाही तर सर्वांचे मोबाईल वर फोटो काढण्यासाठी..तिथे वीणा घेऊन भजन म्हणणार्‍या माऊलीने अक्षरशः आवाज चढवला त्या लोकांवर.. म्हणे मंदिरात एवढ्या स्पष्ट शब्दात फोटो काढू नये, मोबाईल बंद ठेवावा असे लिहिलेले असताना तुम्ही अडाणी आहात का असले काम करायला.. देव राहिला बाजुला , दर्शन घेण तर सोडा तुमचा मोबाईलच वर येतो..१० ते १५ लोक होते..सर्वांनी तोंड वेंगाडून तो ठेऊन दिला..
परत वरच्या मजल्यावर मधे विठू रखमाई ची मुर्ती आहे आणि नविन मंदिर असल्याने खाली जे २ ४ कर्मचारी होते ते सुद्धा नसल्याने परत मोबाईल वर आले हे तर सांगायलाच नको..
रात्रीचे ७ ७.३० ची वेळ होती आणि ते मोठ्ठ मंदिर, प्रशस्त आवार, मागे वाहणारी काळ, काळ निळं आकाश अप्रतिम नजारा होता आणि सगळेच्या सगळे आत फोटो काढत होते.. बाहेर असताना एकानही तो नजारा टिपण्यासाठी कॅमेरा काढला नाही.. काय लोक आहे..

टीना, गाथामंदिर का? फार सुंदर आहे ते. मी गेले आहे तिथे एकदा. पण मोबाईलची आठवणच नाही आली तिकडे गेल्यावर. अख्ख्या मंदिरात गाथा चितारल्या आहेत.

अश्विनी के , गाथामंदिर .. असेल नक्की .. पुर्ण गाथा लिहिलेल्या आणि चितारल्या आहेत.. खरच .. आत गेल्यावर मोबाईलची आठवण सुद्धा येत नाही..

आपले लोक दिलेले, सांगितलेले, लिहिलेले नियम पाळताना तसेही फार क्वचित दिसतात.. वरुन कुणी टोकल्यावर आपल चुकलच अशी भावना तर चेहर्‍यावर अज्जिब्बातच दिसत नाही.. नको तिथ स्वतःच घोड दामटवणार..

अगदी मनातलं बोललात.
अक्षरशः चीड येते अशा लोकांना पाहुन. अशिक्षित तर सोडाच, पण सुशिक्षित पण काही कमी नाहीत.

प्रत्येक ठिकाणी फॅमिली एरिया, मिक्स ग्रूप एरिया, सीनीयर्स एरिया आणि जनरल एरिया असे वेगळे भाग केले पाहिजेत. पहिल्या तीन भागांत इतरांना जायची बंदी करायला हवी, अगदी कुंपण वगैरे घालून, रखवालदार ठेवून. तर काहीतरी होऊ शकेल :). एखादे मुळशी, लोणावळा सारख्या ठिकाणी प्रायोगिक रीतीने हे सहज करता येइल. या स्पेशल एरियात चार्ज लावला तरी चालेल थोडाफार.

बाकी विमानाबद्दल सहमत. उतरताना आपल्या पुढच्या रांगेतील लोकांच्या आधी पुढे जाउन उतरण्याचा प्रयत्न करणारे दिव्य सुशिक्षित भारतीयच दिसतात फक्त. बाकी सगळीकडे जेथून बाहेर पडतात त्या बाजूच्या रांगेतील लोक जाईपर्यंत मागचे शांतपणे उभे असतात.

टिना-...आता मोबाईल कॅमेरा प्रदुषण नावाची सुद्धा एक व्याक्ख्या तयार करावी का म्हणते.....
एक नंबर वाक्य.
सगळ्या आठवणि फोटोतच काय त्या सेव्ह होतात. देवाने ज्ञानेंद्रिये दिली आहेत ती नुसती बटणे आहेत असे वागतात लोक. दिसेल त्या गोष्टी चा फ़ोटो काढत सुटतात. काया, वाचा, मने आनंद घेणे, अनुभवणे हे नाहीच.
एखादि अनुभवलेली सुरेख संध्याकाळ याचे वर्णन करणे नाहिच... नुसता फोटो दाखवणार...बघ काय ऑसम आहे ना! झाले संपले..
ऑसम संस्कृती वाढते आहे Sad

फारएण्ड , विमानाप्रमाणे मंदिरात सुद्धा हा प्रकार दिसतो .. पुढे पुढे करत देवाच्या पाया पडणार आणि तिथच भजन म्हणत बसणार ( कृपया शब्दशः अर्थ घेऊ नये ) बर जो दर्शन घेतोय त्याला हे धक्का बुक्की करुन तिथुन लवकर हटायला भाग पाडणार आणि स्वतः तासभर उभ राहणार ..
सगळे डोक्यानं पैदल असल्यासारखे वागतात.. Angry

टिना हल्ली अगदी एखादा लहान स्पॉट जरी लक्षात आला ना लोकांच्या की त्याचे बाजारीकरण झालेच समजा.

आमचा समुद्रकिनाराही पूर्वी इतका स्वच्छ व सुंदर होता की आम्ही दर मे महिन्यात रोज संध्याकाळी १५-२० मिनीटे चालून तिकडे जायचो. गावातील लोकांशिवाय तिथे कोणी नसायचे. फक्त शनिवार रविवार काही बाहेरचे पर्यटक दिसायचे. पण आत्ता किनार्‍याच्या दगडांवर बाटल्या फोडलेल्या दिसतात. अरे आख्ख्या टाका ना फोडता कशाला? पत्रावळी, प्लास्टीक पसरलेले दिसते. अशी चिड येते ना. आणि गर्दी तर इतकी असते रोजच की विकेंडची गरजच भासत नाही हल्ली लोकांना असे वाटते. तरूण मुल-मुली सगळ्यांसमोर हातात हात-गळ्यात गळे काय घालतात. सगळे भयानक होत चालले आहे.

लेखातल्या भावना चांगल्याच पोहोचल्यात.

चांगले ठिकाण प्रसिद्धीस येऊ न देण्याबद्दल : आपल्याकडे आजकाल फेसबुक्/व्हॉट्सॅप स्टेटसवर लग्गेच फोटो टाकून मी अमुक ठिकाणी आलो आहे व तमुक मजा करतो आहे असे जगजाहीर करण्याचे फॅड आलेले आहे. तेव्हा हे असे काही होईल/करता येईल हे कठीण वाटते.

दारूबद्दल : केरळ सहलीस जाताना केरळमधे दारू पिण्याचे प्रमाण भरपूरच आहे असे ऐकून होतो. पण अनुभव वेगळा आला. दारू दुकाने सापडणे अवघड होते. जी होती ती टिपिकल सरकारी दुकाने होती. व फार नव्हती. महाराष्ट्रात एका गल्लीत दोन दुकाने सहज सापडतात. मिळायला कठीण असली, तर आपोआपच दंगा कमी होतो. थोडा कंट्रोल राहतो.

बुशी डॅम : हा स्पॉट ३०-३५ वर्षांपूर्वीही तितकाच वाईट होता. दारू सर्रास मिळत असेच, पण पुण्यातून फिरायला म्हणून गेलेल्या आमच्या ग्रूपमधल्या दोघातिघांना, दारू-मैत्री झाल्यानंतर मुंबईच्या एका ग्रूपने सिगरेट शेअर करण्याच्या निमित्ताने गांजा जॉइंट की काय म्हणतात ते काही मादक द्रव्य दिल्याचे व त्यामुळे एकाला ससूनमधे अ‍ॅडमिट केल्याचेही आठवते. या व्यसनाचे प्रमाण आजकाल शाळकरी मुलांतही पसरले आहे.

सार्वजनिक स्वच्छता व सामाजिक भान : याबद्दल बोलणेच व्यर्थ आहे. स्वतःस जितके करता येईल तितके करावे. कुणाला अशा ठिकाणी सांगायच्या फंदात पडू नये हे उत्तम. कोण किती जोरात अंगावर येईल ते सांगणे कठीण असते.

लोणावळा-खंडाळ्यात मुख्य रस्ता सोडून नुसतं पायी फिरलं, पावसात भिजलं तरी भरपूर मजा होते. अनेक अनोळखी झाडं फुलं पक्षी दिसतात. गप्पा होतात. हे सगळं सोडून बुशीडॅमलाच जायची यात्रा का काढली जाते हे माझ्यासाठी तरी अनाकलनीय आहे.

सार्वजनिक स्वच्छता व सामाजिक भान : याबद्दल बोलणेच व्यर्थ आहे. स्वतःस जितके करता येईल तितके करावे. कुणाला अशा ठिकाणी सांगायच्या फंदात पडू नये हे उत्तम. कोण किती जोरात अंगावर येईल ते सांगणे कठीण असते. >> काही अंशी बरोबर असल तरी हमेशाच तोंड दाबुन बुक्क्यांचा मार सहन करण नाही जमत..

लोणावळा-खंडाळ्यात मुख्य रस्ता सोडून नुसतं पायी फिरलं, पावसात भिजलं तरी भरपूर मजा होते. अनेक अनोळखी झाडं फुलं पक्षी दिसतात. गप्पा होतात. हे सगळं सोडून बुशीडॅमलाच जायची यात्रा का काढली जाते हे माझ्यासाठी तरी अनाकलनीय आहे. >>
हे झाल त्या लोकांसाठी ज्यांनी वरील सर्व गोष्टी अनुभवल्या आहे आणि त्यांचा त्यांना राग आहे.. ज्या लोकांना मुळातच त्याची पर्वा नसते ते तर स्पेसिफिकली त्याच स्पॉट वर जातील ना.. जे बाहेरुन आले आहेत आणि नाव ऐकुन आहेत त्यांना तिथला सावळा गोंधळ कसा माहिती असणार ? आणि अनवट वाटा सर्वांच्याच आवडीच्या असणार हे पण तर गरजेच नाही ना ..माझ्या तर पाहण्यात असेही लोक आहे ज्यांना गर्दी, बोर्ड, दुकान दिसली नाहीत तर म्हणतात,"ह्या..यात काय बघायच..कुणीच तर नाही इथं.. यावर हसाव कि रडाव ते पण कळत नाही..

जागु >> मी तर अजुनही दिवेआगार, अलिबाग च्या किनार्‍यावर पाऊल ठेवलेल नाहिए..इथल्या सर्वांच्या प्रतिक्रिया बघुन ठेवू कि नको ? हा विचार यायला लागलाय..

१०१ प्रतिक्रिया आल्या,

सर्वच जण हे मान्य करतात की सार्वजनिक स्थळांवर वर्तनाचे संकेत लोक मानत नाहीत,

पण कोणीही उपाय योजना सुचवत नाहीय !

ह्यावर काय उपाय योजना करता येईल ? शॉर्ट टर्म आणी लाँग टर्म,

स्वच्छते बद्दल लहान मुलावरच संस्कार करायला पाहीजेत, तसेच पब्लिक प्लेस मध्ये कस वागायच हे सुद्धा त्यांच्या मनावर बिंबवायला पाहीजे !

उपाययोजना दुर्दैवाने जवळपास अशक्य आहेत संदिप!

१. फटके मारणे

२. पोलिस उभा करणे व त्याने पैसे न खाता शिस्त लावणे

३. घाण करणारे किंवा मर्कटलीला करणारे ह्यांच्यावर खटला होणे

वगैरे!

तसेच अश्या सर्व सार्वजनिक स्थळांवर कॅमेरे लावुन मॉनिटरींग केल पाहीजे,

सर्वजनिक स्थळांवर दारु पिणे, बाटल्या फोडणे, पाण्यात थुंकणे किंवा .. ह्यावर जबरदस्त फाईन लावला पाहीजे,

कॅमेराचा फिड असल्याने लाच घेउन गुन्हे मिटवता येणार नाही !!

इतका जबरदस्त फाईन असावा की कॅमेरा लावायचा खर्च निघावा एका महीन्यात !
सर्व ठिकाणी कॅमेरे लावणे हा उपाय होउ शकेल

परदेशात सर्व ठिकाणी कॅमेरे लावलेले असतात आणी तशी सुचना लिहीलेली असते,
त्यामुळे लोकांच्या वर्तनावर आपसुकच बंधन येतात !!

अश्या सार्वजनिक ठिकाणी केलेल्या वर्तनासाठी फाईनची लिस्ट / सुचना सुद्धा लावलेली असायला हवी !

अश्या स्थळांवर येणार्या लोकांची एंट्री करताना :
१. ओळख पत्राची कॉपी घेउन ठेवावी
२. मोबाईल फोनचा नंबर (नंबर चेक करुन) रेकॉर्ड करुन ठेवावा.

मॉल मधे एंट्री करताना कशी झाडझडती घेतल्या जाते तसेच प्रिमायसेस मधे आत जाताना दारूच्या बाटल्या, प्लॅस्टिकचे सामान या गोष्टी पण निषिद्ध असाव्यात.. बाकी स्वतःचे वर्तन आटोक्यात असले की मुलांवर सुद्धा या गोष्टी सहजरित्या बिंबवता येतात.. तसेही लोक गुंडांखालोखाल पोलिसांना घाबरतात तर ड्युटी लावावी व्यवस्थित मानधन देउन..

टीना,

एकूणच आपला अनुभव फारच त्रासदायक आहे.

२०-२५ वर्षांपुर्वी परिस्थिती इतकी निराशादायक नव्हती निसर्गात जाणे, त्याचा अनुभव घेणे, स्वतःला नवीन उर्जा देणे, आपल्या जवळच्या/ आवडीच्या /स्नेही लोकांबरोबर वेळ घालवणे, निसर्गाचा अभ्यास करणे, इतिहासाचा अभ्यास / उजळणी, त्या परिसराची भौगोलिक माहिती, घाट-वाट, संस्कृती, जैव विविधता अभ्यासाने अश्या एक न अनेक कारणासाठी लोक घरा बाहेर पडत. निसर्गाचा आदर राखत, स्वच्छता जपत.

आजच्या काळात, सगळच इतका वेगवान झाला आहे कि घराकडे लक्ष द्यायला वेळ नाही, मग कसला निसर्ग आणि कसलं काय? त्यातुन आजकाल भ्रमंती करवून आणणाऱ्या संस्थाचा 'खान्ग्रेस गवत' गल्ली बोळात आला आहे. दर event मागे मिळणारा नफा आणि फुगत जाणारे तथाकथित 'निसर्गप्रेमी'. ह्या अर्ध्या हळकुंडात पिवळ्या झालेल्या लोकांनी लोहगड- विसापुर, राजमाची, राजगड, हरिश्चंद्रगड, कळसुबाई, अलंग मदन कुलंग सारख्या जागांचा बाजार मांडला आहे. त्यांना ह्या मागचा मिळणारा पैसा दिसतो पण निसर्गाचा ऱ्हास दिसत नाही Sad बर येणाऱ्या गर्दी वर आयोजकांचे नियंत्रण नसते, गर्दीच्या ठिकाणी कसं वागावं ह्या बद्दल जरा सुद्धा सांगावं वाटत नाही, कचरा करू नका, पाणी घाण करू नका काही नाही. मग हे अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले लोक पुढची गर्दी घेऊन येतात. बर स्थानिक लोक सुद्धा विरोध करत नाहीत कारण, येणारा पैसा 'गंदा है पर धंदा ही' अस म्हणत पैसे घेतात.

'लोणावळा पब्लिक बार', 'ताम्हिणी घाट परमिट रूम' हे भविष्य जास्त लांब नाही. फार कशाला नवीन वर्षाची सुरुवात म्हणून नाशिकच्या 'सातमाळ' रागेत ट्रेक ला गेलो होतो. ३ दिवस ट्रेक करून 'वणी - मार्कंडेय-रावल्या जावल्या - धोडप- इखारा' करून शेवटी कांचनबारी गावात गेलो, गावात शाळेमध्ये राहायची परवानगी मागायला गेलो तर गावकरी रात्री साठी काही पाहिजे का? अस विचारू लागले. अधिक चौकशी केल्यवर म्हणाले आडवाटेचा किल्ला आहे जास्त कोणी येत नाही, आणि आला कि अस काही मागतात म्हणून आम्ही पण ठेवतो Sad गावात महामंडळाची बस नाही पण प्यायची सोय आहे.

कॅमेर्‍याची आयडीया चांगली आहे.
मोदींच्या स्वच्छ भारत अभियानात पोहोचवा हे.

नवी मुंबईचे कर्नाळा अभयारण्यात दारू घेऊन जाणार्‍या लोकांना बहुधा तेथील स्थानिकच अडवतात. त्यामुळे ती जागा चांगली टिकून राहिलीय आणि साध्यासोप्या ट्रॅकिंगची हौस असणार्‍यांसाठी तो एक चांगला पर्याय आहे असे ऐकून आहे.

पण कोणीही उपाय योजना सुचवत नाहीय ! >> अरे? मी सुचवली आहे की एक वर! आणि ती प्रशासकीय टाईपची आहे, म्हणजे तो भागच सरकारच्या पर्यटन केन्द्राच्या विभागाने किंवा एखाद्या खाजगी संस्थेने विकसित करून तेथे तिकीटासाठी पैसे घेउनच तसे करावे. मग आपोआप स्वतंत्र एरिया असले की हा त्रास कमी होईल. पर्यटन खात्याला केवढा तरी महसूल मिळेल यातून.

सॉरी काय त्यात. आपण एवढे लिहीले त्याकडे दुर्लक्ष होउ नये असे बहुतेकांना वाटत असेल तसेच वाटल्याने पुन्हा उल्लेख केला एवढेच.

संदिप सावकर >> मी जिथेही ही बातमी वाचली त्यात प्रथमदर्शनी म्हणतात कि हेमा मालिनी ची गाडी चुकिच्या दिशेने चालत होती आणि धडक समोरासमोर झाली.. अजुनही बातम्यांमधे तेच दिसतयं ( इथ कृपया टिव्हीवरच्या बातम्या असा अर्थ घेऊ नये ) ..

मुळात निगरगट्ट वॄत्ती, नियम तोडण्याला आपल्या भारतीय मानसिकतेत असलेले ग्लॅमर (हो भारतीयच. नियम तोडण्याचे कौतुक फक्त भारतीय उपखंडात मूळ असलेल्या लोकांनाच असलेलं पाह्यलंय.) >>>> +१

मुळात निगरगट्ट वॄत्ती, नियम तोडण्याला आपल्या भारतीय मानसिकतेत असलेले ग्लॅमर (हो भारतीयच. नियम तोडण्याचे कौतुक फक्त भारतीय उपखंडात मूळ असलेल्या लोकांनाच असलेलं पाह्यलंय.) >>>> +१

खरे तर फारेंडने लिहिले आहे तसे पर्यटन खात्याने केल्यास निसर्गाचे संवर्धन आणि स्थानिकांना रोजगार हे दोन्ही होइल. पण बरेचदा आपल्या इथे असे काही होताना रेड टेपचाच इतका गोंधळ होतो की बस्स! अनधिकृतपणे काही करायचे तर सर्व काही खपवून घेतले जाते मात्र अधिकृतपणे करताना हजार अडचणी असे होते.

हायवे गाड्या चालवतानाच चुकीच वागतात, ज्यानी लोकांचे जीव जातात अश्या अर्थाने ईथे लिहीलेल होत.

अवांतर होत असेल तर म्हणुन काढुन टाकलय !

मला फारेण्ड यांची सूचना पटतेय. ज्यांना पावसातला निसर्ग अनुभवायचा आहे पण अश्या लोकांचे गैरवर्तन सहज होत नाही त्यांच्यासाठी नाममात्र फी घेऊन असे स्पॉट्स निर्माण व्हावेत. तिथे कडक नियमावली असावी आणि नियमभंग केल्यास दंड / हकालपट्टी / कायमची बंदी असे उपाय असायला हवेत. अशी जागा खरोखरीच अस्तित्वात आली, तर उदंड प्रतिसाद मिळेल पण मला एकच भिती आहे कि तिथे कार्यवाही करतानादेखील हेच घटक ( आम्ही साहेबांची माणसं, आम्ही गावगुंड, आम्ही या गटातले ) आडवे येतील.

तसेच अश्या सर्व सार्वजनिक स्थळांवर कॅमेरे लावुन मॉनिटरींग केल पाहीजे,
>>>>>>>>>>>>

फारच भाबडा विचार.
एका आठवड्यात कॅमेराच चोरिला जाणे किंवा मग असा एखदा प्रसंग घडल्यावर पुरावा म्हणून चेक करायला गेल्यावर कॅमेरा दुरुस्त नसल्याचे लक्षात येणे वगैरे बर्‍याच वेळा घडलेले आहे.

किंवा सोशल मिडियाचे इतके फॅड आहे तर त्याचा उपयोग केला तर ? एक कॉमन हॅश टॅग जसे "#शेम शेम" किंवा "#पर्दा फाश" वापरून असले रस्त्यावर कचरा टाकणरे , असभ्य , आचरट वागणार्‍यांचे फोटो घेऊन पोस्ट करायचे, ते जास्तीत जास्त लोकांनी शेअर करून अशा लोकांना फेमस करून टाकायचे!! असंख्य लोकांच्या गर्दीत कुणीही आपल्या आचरट वागण्यचे फोटो घेऊन ते अशा पेज वर पब्लिश होऊ शकतात हे कळून लोकांमधे थोडा जरी अवेअरनेस आला तर उत्तमच. अर्थात याचा उपयोग गुंड मवाल्यांवर किती होईल शंकाच आहे, पण पांढरपेशे लोक जे पब्लिक मधे शिस्त पाळत नाहीत त्यांच्याकरता बेस्ट.

Pages