फिरनी

Submitted by नंदिनी on 21 October, 2012 - 07:19
kesar firni
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

"एकदम सोप्पी फिरनी" असं टायटल द्यायचं फार मनात होतं. पण याआधीच्या "एकदम सोप्प्या" रेसिपी संवेदनशील विषय बनल्याने ते टायटल दिलं नाही याची कृपया नोंद घ्यावी. Proud

हॉस्टेलमधे असताना रमझान चालू झाला की आम्ही भटकायला निघायचो. हॉस्टेल होतं माझगावला. तिथून मोहम्मद अलि रोडला जायचं. एरव्ही पण मोहम्मद अलि रोड, क्रॉफर्ड मार्केट हे भाग म्हणजे डोळ्यासाठी, जिभेसाठी अगदी भरपूर मेजवानी असायची. ईदिनिमित्त जवळ जवळ अख्ख्या भागाला रोषणाई केलेली असायची. विविध रंगांचे, चमकते स्टॉल्स नटलेले असायचे. आम्ही मैत्रीणीसोबत संध्याकाळी दिवेलागणीला बाहेर पडायचो. पोटभर खादंती करायची. पाया सूप, चिकन कबाब, मटण कबाब, मालपुआ मनसोक्त हादडायचे. रस्त्यावर बार्गेनिंग करत करत शॉपिंग करायची. येताना सुलेमान बेकरीम॑धून नानकटाई घ्यायची. आणि दहाच्या आत हॉस्टेलमधे यायचं असा आमचा महिनाभर दिनक्रम.

भरपूर खाणं झाल्यावर गोड काहीतरी खावंसं वाटलं की नजर भिरभिरायची ती फिरनीसाठी. एवढंसारं मसालेदार खाल्ल्यावर थंडगार फिरनी अगदी ताजंतवानं करून जायची. मातीच्या छोट्याशा पणतीसारख्या भांड्यामधे सेट केलेली फिरनी म्हणजे माझ्यादृष्टीने रमझानचं ते सर्व वातावरण पुन्हा एकदा जगल्यासारखंच. कधीतरी एकदा सहज नेटवर रेसिपी पाहिली तर अगदीच सोप्पी रेसिपी. शिवाय पदार्थ पण घरात कायम असनारे. झटपट होणारा हा गोडाचा पदार्थ हल्ली माझ्याकडे महिन्या दोन महिन्यातून एकदा घरात होतोच. मग घरात असलेल्या काही सामानांपासून फिरनीचे काही व्हेरीएशन्स केले.

फिरनी म्हणजे तांदळाची खीर.पण तरी साऊथ इंडियन तांदळाची खीर आणि फिरनीमधला सर्वात मोठा फरक तापमानामधे आहे. तांदळाची खीर गरमगरम खाल्ली जाते. गार झाल्यावर ती खाववत नाही कित्येकदा. त्याउलट फिरनी थंडगार खायची असते. मातीच्या भांड्यामधे सेट केलेली फिरनी घट्ट होते आणि गारेगार फिरनी वेगवेगळ्या इसेन्स आणि रंगांमधे प्रयोग करून चवीमधे बदल करता येतो. Happy

माझ्यासारख्या किचनमधल्या बिगारीमधे शिकणार्‍यासाठी फिरनी हा अगदीच "जमणेबल" प्रकार आहे. करून बघा आणि सांगा बरे.

१. दूध: अर्धा लिटर. निरसे म्हणजे न तापवलेले दूध घ्या.शक्यतो टोन्ड मिल्क नको. फुल क्रीम मिल्क घ्या.
२. बासमती तांदूळ: दोन ते तीन चमचे. (बासमती लॉन्ग ग्रेन घ्या. दिल्ली राईस अथवा डेहराडून बासमती)
३. साखर: दोन वाट्या. (व्हेरीएशननुसार साखरेचे प्रमाण कमीजास्त होइल.)
४. ड्रायफ्रूट्स आणि इसेन्स.

क्रमवार पाककृती: 

१. सर्वात आधी बासमती तांदूळ भिजवून, धुवून निथळून घ्या. थोडेसे कोरडे भाजून घ्या.

२. हे तांदूळ मिक्सरमधे अगदी बारीक करून घ्या. पीठासारखे बारीक झाले पाहिजे. विकतचे पीठ मात्र वापरू नका. फिरनीला बासमती (लाँग ग्रेन) हवाच. तांदूळ मिक्सरमधे फिरवताना थोडे पाणी घालून फिरवा म्हणजे नंतर पेस्ट करत बसायला नको.

३. दूध निरसे घ्या. एका जाड बुडाच्या भांड्यात दूध घेऊन त्यामधे तांदळाची पेस्ट घाला. व्यवस्थित कालवून घ्या. अजिबात गुठळ्या नकोत. आता हे मिश्रण गॅसवर ठेवा.

५. साखर घाला. गोडाचे प्रमाण तुमच्या आवडीवर असू देत. पण फिरनी फ्रीझमधे सेट होणार असल्याने साखर किंचित जास्तच घाला.

४. सतत हालवत रहा. मिश्रण खाली लागू देऊ नका अथवा गुठळ्या बनू देऊ नका. हीच कृती जरा किचकट आणि वेळखाऊ आहे.

५. घट्ट खिरीसारखे होत आले की गॅसवरून खाली उतरवा.

६. वाफ निवेपर्यंत ढवळत रहा. अन्यथा या स्टेजला येऊन गुठळ्या होऊ शकतात. गुठळ्या झाल्याच असतील तर फिरनी गाळून घ्या. फिरनीचे टेक्श्चर अगदी मऊ आणि सिल्की व्हायला हवे.

७. असतील तर मातीच्या पसरट भांड्यामधे सेट करायला घ्या अन्यथा काचेच्या सुबकश्या वाडग्यांमधून काढा आणि फ्रीझमधे दोन ते तीन तास सेट करा.

८. थंडगार फिरनी खायला द्या आणि तुम्हीदेखील मनसोक्त खा. (सजावट करून फिरनी सर्व करा. -- हे वाक्य बर्‍याचदा मराठी कार्यक्रमांमधे ऐकले आहे. "खायला द्या" असे म्हणायला काय त्रास होतो न कळे) असो.

========================================

ही झाली साधी फिरनी. आता याचे अनंत व्हेरीएशन्स करता येतात. सेट करण्याआधी त्यामधे इसेन्स घालता येतात. सजावटीमधे कलाकुसर करता येते. मी करून पाहिलेली काही व्हेरीएशन्स.
१. केसर फिरनी: थंड दुधात थोडे केशर खलून फिरनीमधे मिक्स करा. वाडग्यामधे काढल्यावर वरती बदाम्-पिस्त्याचे काप घाला. (हे साधेसोपे व्हर्जन. चुकण्याची शक्यता फार कमी. )

२. काजू फिरनी: तांदळासोबत थोडे काजूदेखील भिजत घाला, शिजवताना ही काजूची पेस्ट दुधात घाला. सजावटीसाठी काजू-बदाम्-पिस्ता घाला.

३. मँगो फिरनी: फिरनी शिजत असताना त्यामधे मँगो पल्प घाला. मँगो पल्प गोड असल्यास त्यामानाने साखर कमी घाला. सजावटीसाठी आंब्याच्या फोडी अथवा थोडा मँगो पल्प घाला. (आमच्याकडे हे व्हर्जन भयंकर हिट आहे. आमरस खाऊन खाऊन कंटाळा आला की चेंज म्हणून आंबाफिरनी Proud )

४. चॉकोलेट फिरनी: फिरनी शिजत असताना कोको पावडर घाला. अथवा फिरनी शिजल्यावर त्यामधे चॉकोलेट सिरप घाला. सजावटीसाठी चॉकोलेट किसून घाला. (कोको पावडर अंदाजाने घाला. मी एकदा कडूढाण केलं होतं. तेव्हापासून चॉकोलेट सिरप घालते)

५. स्ट्रॉबेरी फिरनी/अ‍ॅपल फिरनी: शिजत असताना त्यामधे स्ट्रॉबेरी सिरप घाला, सजावटीसाठी स्ट्रॉबेरीच्या फोडी वापरा. ( हे व्हर्जन मी केल्यावर पिताश्रींनी "डायजिनसारखं लागतय" अशी टिप्पणी केली होती. त्यामुळे जरा जपूनच. अ‍ॅपल फिरनीसाठी दिनेशदांची रेसिपी अवश्य बघा)

६. बटरस्कॉच फिरनी: शिजवून झाल्यावर त्यामधे बटरस्कॉच ईसेन्स घाला आणी सजावटीसाठी ड्रायफ्र्रूट्स घाला. अशीच व्हॅनिला फिरनी करता येइल.

७. रोझ फिरनी: फिरनी शिजल्यावर त्यामधे गुलाबजल आणि गुलाब ईसेन्स घाला. सजावटीसाठी गुलाबाची पाकळी आणि किंचित गुलकंद वापरा.

८. कॅरामल फिरनी: वर्षूच्या "साधेसोप्पे पुडिंग"मधल्या रेसिपीने कॅरामल तयार करून घ्या. फिरनी सेट झाल्यावर त्यावर हे कॅरामल हलक्या हाताने पसरा. Proud पुडिंगपेक्षा हे जास्त सोपं पडेल.

९. जास्मिन फिरनी: फ्रीझमधे ठेवताना फिरनीवर एक मोगर्‍याचे फूल ठेवून द्या, खायला देताना फूल बाजूला ठेवा. ड्रायफ्रूट्स घाला. या फिरनीला अप्रतिम वास येतो.

१०. केवडा: शिजवताना केवडा इसेन्स घाला. नंतर सजावटीसाठी केवडाजल घाला.

११. मोदक फिरनी: फिरनी शिजवताना त्यामधे मोदकाचे सारण घाला. साखर घालू नका. याची चव छान येते. मोदक बिघडल्यावर उरलेल्या सारणाचे काय करावे असा प्रश्न पडल्यास ही फिरनी करून बघा. Proud

केसर फिरनी

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे ४ वाडगे भरून होइल.
अधिक टिपा: 

अजून सुगरण मायबोलीकरांना काही व्हेरीएशन्स माहित असतील तरी अवश्य सांगा.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रद्धा मस्त फोटो आणी सुरस कथा. फिरनीचे ते मातीचे वाडगे लाम्बुन पाहीले की त्या वर्खवाल्या टिकल्या वाटतात.

करावी का काय Happy
रच्याकने ते क्रुसिबल सारखे लहान बोल्स /ही लहान लहान गाडगी कुठे मिळतील (पुण्यात) . ती गाडगी एकदा वापरायची का वारंवार?
ह्या /ह्यासारख्या डेझर्ट्स साठी

इन्ना, माठ, कुंड्या विकणारे बसतात त्यांच्याकडे मिळतात. प्रत्येक वापराआधी कडकडीत गरम पाण्याने धुवून घ्यायचे. पुनर्वापर करता येतो. टाकून दिले तरी फार महाग नाहीत. पुन्हा आणता येतात. साबण लावायचा नाही. आपली साधी प्लॅस्टिकची पिशवी असते, त्याने घासलं की स्वच्छ होतात.

बब्बो! किती सुरेख दिसतेय फिरनी. मलाही करायची सुरसुरी आलीये आता.

पेस्ट करायला ठेवलेल्या तांदुळापैकी थोडे खाऊन टाकले. >>> कठीणे! Lol

कातिल फिरनी! जय हो!
करायचं डेरिंग अजून सतरा अठरा महिन्यांनी होईल बहुधा. दुधाचे पदार्थ म्हंजे लय रिस्की त्यात श्र च्या मावशीबाईपण आमच्याकडे येणार नाहीत सकाळी. Sad Happy

मस्त दिसते आहे फिरनी श्रद्धा !
आम्ही पण केली गेल्या आठवड्यात.. घट्टा व्हायला फार वेळ लागतो !! आम्हाला त्यात शेवया घालून खिर करून टाकायचा अतिव मोह होतं होता.. पण शेवटी झाली एकदाची घट्ट..

बब्बो! किती सुरेख दिसतेय फिरनी. मलाही करायची सुरसुरी आलीये आता --मलापण मलापण
अगदी कोणी पाहुणा बोलवावा कि काय इतपत (

धन्यु नंदिनी या भन्नाट रेसिपी साठी. निवडक १० मध्ये गेली आहे.

आणि श्रद्धा तुला सुध्धा वरती काढल्याबद्दल. (ते फोटो इतके कतिल आहेत की लगेच खायला बसवे असे वाटते Proud )

IMG-20140718-WA0003[1]_7.jpg

ही मी रमजान ईदच्या वेळी केलेली फिरनी.. त्या महिन्यात महम्मद अलि रोडवर चक्कर मारणे अगदी मस्त असते.. अफलातुन, मेंदीचे कोन, विविधरंगी बांगड्या आणि फिरनी..!!!

अश्विनी त्यांचा फोटो अर्धा दिसतो आहे अस त्यांना लिहायच असेल कदाचित. त्यांचा फोटोसुद्धा मस्तच आहे.
इथे आता मातीच्या वाडग्यांची क्रेज आली आहे. माझ्याकडे दोन आहेत शोधून त्याचा उपयोग करून ईथे फोटो द्यायला हवा. Proud

(एक अमेरिकन, एक पाकिस्तानी आणि एक भारतीय बोलत बसलेले असतात...या टाईपच्या जोक्समधे जसं दुसरा पहिल्याला 'हेत्तरकैच्नै' म्हणतो, त्या टोनमधे -)

हेत्तरकैच्नै...याहूनही सोप्पं असं याचं एक व्हेरिएशन सांगू का? Proud

ओटस-अ‍ॅपल फिरनी (अक्षरशः १० मिनिटांत होते.)

३ कप दूध उकळायला ठेवायचं. पाऊण कप ओटस (क्विक कुकिंग रोल्ड ओटस) जरासे भाजून मिक्सरमधून कोरडेच जाडसर वाटून घ्यायचे. उकळत्या दुधात ते टाकायचे. पटापट ढवळायचं. ओटस लगेच शिजतात. मग गॅस बंद करायचा. २-३ चमचे साखर टाकून मिश्रण ढवळायचं. रूम टेंप.ला येऊ द्यायचं. मग त्यात पाऊण कप किसलेलं सफरचंद मिसळायचं. आणि सगळं फ्रीजमधे गार करायला ठेवायचं.
थंडगार ओटस-अ‍ॅपल फिरनी खायला द्यायची.
आमच्या घरी हिट्ट आहे हा पदार्थ. मधुमेही मंडळींसाठी साखरेऐवजी शुगर-फ्री घालूनही करता येते.
शून्य पूर्वतयारी, घरी दूध असतंच. ओटस, सफरचंद एकावेळी आणलेले असतील तर मनात आलं की बघताबघता फिरनी तयार.
बेताची गोड असल्यामुळे मला फार आवडते.

Pages