फिरनी

Submitted by नंदिनी on 21 October, 2012 - 07:19
kesar firni
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

"एकदम सोप्पी फिरनी" असं टायटल द्यायचं फार मनात होतं. पण याआधीच्या "एकदम सोप्प्या" रेसिपी संवेदनशील विषय बनल्याने ते टायटल दिलं नाही याची कृपया नोंद घ्यावी. Proud

हॉस्टेलमधे असताना रमझान चालू झाला की आम्ही भटकायला निघायचो. हॉस्टेल होतं माझगावला. तिथून मोहम्मद अलि रोडला जायचं. एरव्ही पण मोहम्मद अलि रोड, क्रॉफर्ड मार्केट हे भाग म्हणजे डोळ्यासाठी, जिभेसाठी अगदी भरपूर मेजवानी असायची. ईदिनिमित्त जवळ जवळ अख्ख्या भागाला रोषणाई केलेली असायची. विविध रंगांचे, चमकते स्टॉल्स नटलेले असायचे. आम्ही मैत्रीणीसोबत संध्याकाळी दिवेलागणीला बाहेर पडायचो. पोटभर खादंती करायची. पाया सूप, चिकन कबाब, मटण कबाब, मालपुआ मनसोक्त हादडायचे. रस्त्यावर बार्गेनिंग करत करत शॉपिंग करायची. येताना सुलेमान बेकरीम॑धून नानकटाई घ्यायची. आणि दहाच्या आत हॉस्टेलमधे यायचं असा आमचा महिनाभर दिनक्रम.

भरपूर खाणं झाल्यावर गोड काहीतरी खावंसं वाटलं की नजर भिरभिरायची ती फिरनीसाठी. एवढंसारं मसालेदार खाल्ल्यावर थंडगार फिरनी अगदी ताजंतवानं करून जायची. मातीच्या छोट्याशा पणतीसारख्या भांड्यामधे सेट केलेली फिरनी म्हणजे माझ्यादृष्टीने रमझानचं ते सर्व वातावरण पुन्हा एकदा जगल्यासारखंच. कधीतरी एकदा सहज नेटवर रेसिपी पाहिली तर अगदीच सोप्पी रेसिपी. शिवाय पदार्थ पण घरात कायम असनारे. झटपट होणारा हा गोडाचा पदार्थ हल्ली माझ्याकडे महिन्या दोन महिन्यातून एकदा घरात होतोच. मग घरात असलेल्या काही सामानांपासून फिरनीचे काही व्हेरीएशन्स केले.

फिरनी म्हणजे तांदळाची खीर.पण तरी साऊथ इंडियन तांदळाची खीर आणि फिरनीमधला सर्वात मोठा फरक तापमानामधे आहे. तांदळाची खीर गरमगरम खाल्ली जाते. गार झाल्यावर ती खाववत नाही कित्येकदा. त्याउलट फिरनी थंडगार खायची असते. मातीच्या भांड्यामधे सेट केलेली फिरनी घट्ट होते आणि गारेगार फिरनी वेगवेगळ्या इसेन्स आणि रंगांमधे प्रयोग करून चवीमधे बदल करता येतो. Happy

माझ्यासारख्या किचनमधल्या बिगारीमधे शिकणार्‍यासाठी फिरनी हा अगदीच "जमणेबल" प्रकार आहे. करून बघा आणि सांगा बरे.

१. दूध: अर्धा लिटर. निरसे म्हणजे न तापवलेले दूध घ्या.शक्यतो टोन्ड मिल्क नको. फुल क्रीम मिल्क घ्या.
२. बासमती तांदूळ: दोन ते तीन चमचे. (बासमती लॉन्ग ग्रेन घ्या. दिल्ली राईस अथवा डेहराडून बासमती)
३. साखर: दोन वाट्या. (व्हेरीएशननुसार साखरेचे प्रमाण कमीजास्त होइल.)
४. ड्रायफ्रूट्स आणि इसेन्स.

क्रमवार पाककृती: 

१. सर्वात आधी बासमती तांदूळ भिजवून, धुवून निथळून घ्या. थोडेसे कोरडे भाजून घ्या.

२. हे तांदूळ मिक्सरमधे अगदी बारीक करून घ्या. पीठासारखे बारीक झाले पाहिजे. विकतचे पीठ मात्र वापरू नका. फिरनीला बासमती (लाँग ग्रेन) हवाच. तांदूळ मिक्सरमधे फिरवताना थोडे पाणी घालून फिरवा म्हणजे नंतर पेस्ट करत बसायला नको.

३. दूध निरसे घ्या. एका जाड बुडाच्या भांड्यात दूध घेऊन त्यामधे तांदळाची पेस्ट घाला. व्यवस्थित कालवून घ्या. अजिबात गुठळ्या नकोत. आता हे मिश्रण गॅसवर ठेवा.

५. साखर घाला. गोडाचे प्रमाण तुमच्या आवडीवर असू देत. पण फिरनी फ्रीझमधे सेट होणार असल्याने साखर किंचित जास्तच घाला.

४. सतत हालवत रहा. मिश्रण खाली लागू देऊ नका अथवा गुठळ्या बनू देऊ नका. हीच कृती जरा किचकट आणि वेळखाऊ आहे.

५. घट्ट खिरीसारखे होत आले की गॅसवरून खाली उतरवा.

६. वाफ निवेपर्यंत ढवळत रहा. अन्यथा या स्टेजला येऊन गुठळ्या होऊ शकतात. गुठळ्या झाल्याच असतील तर फिरनी गाळून घ्या. फिरनीचे टेक्श्चर अगदी मऊ आणि सिल्की व्हायला हवे.

७. असतील तर मातीच्या पसरट भांड्यामधे सेट करायला घ्या अन्यथा काचेच्या सुबकश्या वाडग्यांमधून काढा आणि फ्रीझमधे दोन ते तीन तास सेट करा.

८. थंडगार फिरनी खायला द्या आणि तुम्हीदेखील मनसोक्त खा. (सजावट करून फिरनी सर्व करा. -- हे वाक्य बर्‍याचदा मराठी कार्यक्रमांमधे ऐकले आहे. "खायला द्या" असे म्हणायला काय त्रास होतो न कळे) असो.

========================================

ही झाली साधी फिरनी. आता याचे अनंत व्हेरीएशन्स करता येतात. सेट करण्याआधी त्यामधे इसेन्स घालता येतात. सजावटीमधे कलाकुसर करता येते. मी करून पाहिलेली काही व्हेरीएशन्स.
१. केसर फिरनी: थंड दुधात थोडे केशर खलून फिरनीमधे मिक्स करा. वाडग्यामधे काढल्यावर वरती बदाम्-पिस्त्याचे काप घाला. (हे साधेसोपे व्हर्जन. चुकण्याची शक्यता फार कमी. )

२. काजू फिरनी: तांदळासोबत थोडे काजूदेखील भिजत घाला, शिजवताना ही काजूची पेस्ट दुधात घाला. सजावटीसाठी काजू-बदाम्-पिस्ता घाला.

३. मँगो फिरनी: फिरनी शिजत असताना त्यामधे मँगो पल्प घाला. मँगो पल्प गोड असल्यास त्यामानाने साखर कमी घाला. सजावटीसाठी आंब्याच्या फोडी अथवा थोडा मँगो पल्प घाला. (आमच्याकडे हे व्हर्जन भयंकर हिट आहे. आमरस खाऊन खाऊन कंटाळा आला की चेंज म्हणून आंबाफिरनी Proud )

४. चॉकोलेट फिरनी: फिरनी शिजत असताना कोको पावडर घाला. अथवा फिरनी शिजल्यावर त्यामधे चॉकोलेट सिरप घाला. सजावटीसाठी चॉकोलेट किसून घाला. (कोको पावडर अंदाजाने घाला. मी एकदा कडूढाण केलं होतं. तेव्हापासून चॉकोलेट सिरप घालते)

५. स्ट्रॉबेरी फिरनी/अ‍ॅपल फिरनी: शिजत असताना त्यामधे स्ट्रॉबेरी सिरप घाला, सजावटीसाठी स्ट्रॉबेरीच्या फोडी वापरा. ( हे व्हर्जन मी केल्यावर पिताश्रींनी "डायजिनसारखं लागतय" अशी टिप्पणी केली होती. त्यामुळे जरा जपूनच. अ‍ॅपल फिरनीसाठी दिनेशदांची रेसिपी अवश्य बघा)

६. बटरस्कॉच फिरनी: शिजवून झाल्यावर त्यामधे बटरस्कॉच ईसेन्स घाला आणी सजावटीसाठी ड्रायफ्र्रूट्स घाला. अशीच व्हॅनिला फिरनी करता येइल.

७. रोझ फिरनी: फिरनी शिजल्यावर त्यामधे गुलाबजल आणि गुलाब ईसेन्स घाला. सजावटीसाठी गुलाबाची पाकळी आणि किंचित गुलकंद वापरा.

८. कॅरामल फिरनी: वर्षूच्या "साधेसोप्पे पुडिंग"मधल्या रेसिपीने कॅरामल तयार करून घ्या. फिरनी सेट झाल्यावर त्यावर हे कॅरामल हलक्या हाताने पसरा. Proud पुडिंगपेक्षा हे जास्त सोपं पडेल.

९. जास्मिन फिरनी: फ्रीझमधे ठेवताना फिरनीवर एक मोगर्‍याचे फूल ठेवून द्या, खायला देताना फूल बाजूला ठेवा. ड्रायफ्रूट्स घाला. या फिरनीला अप्रतिम वास येतो.

१०. केवडा: शिजवताना केवडा इसेन्स घाला. नंतर सजावटीसाठी केवडाजल घाला.

११. मोदक फिरनी: फिरनी शिजवताना त्यामधे मोदकाचे सारण घाला. साखर घालू नका. याची चव छान येते. मोदक बिघडल्यावर उरलेल्या सारणाचे काय करावे असा प्रश्न पडल्यास ही फिरनी करून बघा. Proud

केसर फिरनी

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे ४ वाडगे भरून होइल.
अधिक टिपा: 

अजून सुगरण मायबोलीकरांना काही व्हेरीएशन्स माहित असतील तरी अवश्य सांगा.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शूम्पी, तू महान आहेस. Happy
नेमकी रमझानमधेच फिरनीची रेसिपी वर आली आहे. मला आता डोळ्यासमोर मोहम्मद अलि रोड दिसतोय.
Sad

शूंपी,
रोजा चालूच आहे तर रोज संध्याकाळी इप्तारी समजून खावू शकता एकेक गोळा (खिरीचा हो) काढून तात केवड/बदाम इसेन्स घालून. इप्तारी नाही समजून खाल्ली तरी चालू शकते... (ए. फु. स). Happy

नंदु, छान झाली गं फिरनी. जरा भीत भीतच तांदूळ घातलेले. पण आता भांड्याचा तळ दिस्तोय म्हणजे चांगलीच झाली! Happy मी पायसमदेखील हेच ingredients वापरून करते. तांदळाचा रवा करून डब्यात ठेवला की दिल चाहे तब फिरनी किंवा पायसम! Happy तेवढी धावपळ वाचते ऐनवेळी.
थांकु, रेस्पी आणि वेरिएशन्सबद्दल.

शूम्पी, Biggrin संपली का फिरनी मग?

रच्याकने, फिरनीच्या वाट्या ठेवलाय तो डबा टार्गेटमध्ये बॅक टु स्कूल भागात दिसला. कुणाला हवा असल्यास सांगा. घेऊन ठेवते.

Thank you Happy and thanks Nandini for sharing this recipe...it was super duper hit in my daughter's first birthday party Happy

मी मस्तानी, मी कधी वापरलेले नाही. पण वापरायला हरकत नसावी. कंडेन्स्ड मिल्क अतिशय गोड असल्यानं साखरेचा अंदाज त्यानुसार घ्या.

काल एका पॉटलकसाठी काजू-पिस्ता फिरनी केली होती. तांदूळ जास्त प्रमाणात असल्याने नेहमीसारखे रवाळ राहिले नाहीत. काजु-पिस्त्यांची पण बारीक पूड करून घातली. दोन्ही मिळून छान सेट झाली. झटपट होणारा गोड पदार्थ असल्याने टॉप २ (पैला नंबर मँगो शिर्‍याचा) मधे फिरनी गेलेली आहे. त्यात वेगवेगळे सर्विंग बोल्स आणि बारीकसारीक डेकोरेशन मिळून लेमन्यांचा एक्झॉटिक गोड पदार्थ होतो. अर्थातच आवडली सगळ्यांना.

firanee.JPG

'एकदम सोपी फिरनी'च्या Proud या बीबीवर आधी केलेल्या फिरनीचा फोटो टाकणे राहूनच जात होते. त्यात रविवारी केलेल्या चित्तथरारक फिरनीची भर पडली. म्हटले, दोन्ही फोटो एकदमच टाकूया.
ही गेल्यावर्षीची -
firanee.jpg

ही गेल्या रविवारची.
IMG_2780.JPG

हिची कथा येणेप्रमाणे -
घरच्या गेटटुगेदरला मुख्य मेनू बिर्याणी होता म्हणून मी पंधरा दिवस आधी 'मी गोड म्हणून फिरनी करणार' हे डिक्लेअर केले. त्यासाठी मातीचे वाडगे पण खास आणून घेतले. शनिवारी संध्याकाळी मावसभावाच्या बायकोच्या संक्रांतसणासाठी जाऊन, थकून उशिरा परतल्यावर फिरनी बनवायचा अतिधाडसी बेत आखला. त्यातून माझ्या पाककौशल्याचे कौतुक वाटणार्‍या एका लहान मावसबहिणीला 'मदतीला ये प्लीज' असेही सांगून ठेवले होते. आणि रात्री साडेदहाला फिरनी घडवायला घेतली.
'तांदळाची पेस्ट फार टाकायची नाही, नाहीतर फिरनी अतिघट्ट होईल आणि उद्या कदाचित मंडळींना फिरनीच्या वड्याच खाव्या लागतील' असा विचार मनात आला त्यासरशी पेस्ट करायला ठेवलेल्या तांदुळापैकी थोडे खाऊन टाकले. मग उरलेल्यांची छानपैकी पेस्ट करून दुधात कालवली. दुधाची कन्सिस्टन्सी अजिबात बदलली नव्हती. स्वतःला 'शाब्बास!' म्हणत साखरबिखर घालून फिरनी ढवळणे सुरू केले. मग घड्याळाचे काटे हळूहळू सरकू लागले. फिरनी दाट व्हायचे नाव घेईना. बाजूला मदतीला आलेल्या मावसबहिणीचे पिस्ते कापून झाले होते आणि ती उत्सुकतेने फिरनीकडे पाहत होती. थोड्या वेळाने तिने एका चमच्यात थोडा नमुना घेऊन चाखला आणि 'हे दूधसाखर लागतंय. या स्टेजला असंच लागतं का हे मिश्रण?' असा बालसुलभ निरागस प्रश्न केला. माझा ८० टक्के धीर तिथेच खचला. मग समोरच्या कपाटात मला काजू दिसले. फिरनी एव्हाना आयसीयूमध्ये पोचली होती. उसकी जान बचाने के लिये करण्याच्या डेस्परेट प्रयत्नात मी थोडी काजूपेस्ट केली आणि.. आणि.. रूम टेम्परेचरची काजू पेस्ट गरम दुधात घातली. ताबडतोब त्यांनी गोळ्यांचे स्वरूप धारण केले. मावसबहीण बाहेर टीव्ही पाहायला जाऊन बसली होती एव्हाना! फायनली थकून मी ते सगळे प्रकरण गॅसवरून उतरवले. ढवळून निवू दिले. शक्य झाले असते तर त्यावर पांंढरी चादर सरकवून 'सॉरी.. हमने बहोत कोशिश की पर उसे बचा नही सके!' असंसुद्धा म्हटलं असतं. मग ते सगळे प्रकरण फ्रीजमध्ये ठेवून दिले. व्हॉट्सअ‍ॅपवर जाऊन पब्लिकला 'सॉरी... फिरनीचा फियास्को झाला.. भ्यां भ्यां.' असे मेसेज आणि रडके एमोटिकॉन टाकले. मग कधीतरी रात्री झोप लागली.

दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर फिरनीला पुन्हा जिवंत करायचा प्रयत्न करायचं ठरवलं. जास्तीचे तांदूळ घेऊन पेस्ट करून ठेवली. पण अजूनही त्या मिश्रणाला हात घालायचा धीर होत नव्हता. तोवर आमच्या स्वैपाकाच्या मावशी आल्या. फिरनीची वार्ता आईकडून त्यांना समजली होती. त्यांनी आल्याआल्या 'चल करू प्रयत्न.. काही होत नाही. होतंय सगळं नीट' म्हणून मला धीर दिला आणि ते मिश्रण नवीन भांड्यात गाळून, काजूचे गोळे मिक्सरमधून फिरवून स्मूथ पेस्ट करून माझ्या हवाली केले. त्यात नव्याने पेस्ट मिसळली आणि 'हर हर महादेव!' म्हणून फिरनी गॅसवर ठेवून ढवळायला सुरुवात केली. मोजून दहाव्या मिनिटाला मिश्रण दाट होऊ लागलं. अर्ध्या तासात निवलेले मिश्रण मातीच्या वाडग्यात भरले. ड्रायफ्रूट मिश्रणाने सजवले आणि फ्रीज करायच्या आधी फोटो काढून पब्लिकला धाडला. Happy टोटल ३४ वाडगे फिरनी झाली.

फिरनीचेही पुनरुत्थान रविवारीच घडले ही त्या आकाशातल्या दयाळू बापाची कृपा!

श्रद्धा, कहर आहेस. तुला आणि शूम्पीला फिरनीबेगम असा पुरस्कार विभागून द्यायला हवाय Lol

गरम दुधात काजूपेस्ट घातली की ती इतक्या पटकन शिजते आणी घट्ट होते की बास.

श्रध्दा , सॉलिड कथा आहे फिरनीची आणि तुझ्या जिद्दीची ही
फोटो अल्टीमेट आहे. एक नंबर !!

Pages