फिरनी

Submitted by नंदिनी on 21 October, 2012 - 07:19
kesar firni
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

"एकदम सोप्पी फिरनी" असं टायटल द्यायचं फार मनात होतं. पण याआधीच्या "एकदम सोप्प्या" रेसिपी संवेदनशील विषय बनल्याने ते टायटल दिलं नाही याची कृपया नोंद घ्यावी. Proud

हॉस्टेलमधे असताना रमझान चालू झाला की आम्ही भटकायला निघायचो. हॉस्टेल होतं माझगावला. तिथून मोहम्मद अलि रोडला जायचं. एरव्ही पण मोहम्मद अलि रोड, क्रॉफर्ड मार्केट हे भाग म्हणजे डोळ्यासाठी, जिभेसाठी अगदी भरपूर मेजवानी असायची. ईदिनिमित्त जवळ जवळ अख्ख्या भागाला रोषणाई केलेली असायची. विविध रंगांचे, चमकते स्टॉल्स नटलेले असायचे. आम्ही मैत्रीणीसोबत संध्याकाळी दिवेलागणीला बाहेर पडायचो. पोटभर खादंती करायची. पाया सूप, चिकन कबाब, मटण कबाब, मालपुआ मनसोक्त हादडायचे. रस्त्यावर बार्गेनिंग करत करत शॉपिंग करायची. येताना सुलेमान बेकरीम॑धून नानकटाई घ्यायची. आणि दहाच्या आत हॉस्टेलमधे यायचं असा आमचा महिनाभर दिनक्रम.

भरपूर खाणं झाल्यावर गोड काहीतरी खावंसं वाटलं की नजर भिरभिरायची ती फिरनीसाठी. एवढंसारं मसालेदार खाल्ल्यावर थंडगार फिरनी अगदी ताजंतवानं करून जायची. मातीच्या छोट्याशा पणतीसारख्या भांड्यामधे सेट केलेली फिरनी म्हणजे माझ्यादृष्टीने रमझानचं ते सर्व वातावरण पुन्हा एकदा जगल्यासारखंच. कधीतरी एकदा सहज नेटवर रेसिपी पाहिली तर अगदीच सोप्पी रेसिपी. शिवाय पदार्थ पण घरात कायम असनारे. झटपट होणारा हा गोडाचा पदार्थ हल्ली माझ्याकडे महिन्या दोन महिन्यातून एकदा घरात होतोच. मग घरात असलेल्या काही सामानांपासून फिरनीचे काही व्हेरीएशन्स केले.

फिरनी म्हणजे तांदळाची खीर.पण तरी साऊथ इंडियन तांदळाची खीर आणि फिरनीमधला सर्वात मोठा फरक तापमानामधे आहे. तांदळाची खीर गरमगरम खाल्ली जाते. गार झाल्यावर ती खाववत नाही कित्येकदा. त्याउलट फिरनी थंडगार खायची असते. मातीच्या भांड्यामधे सेट केलेली फिरनी घट्ट होते आणि गारेगार फिरनी वेगवेगळ्या इसेन्स आणि रंगांमधे प्रयोग करून चवीमधे बदल करता येतो. Happy

माझ्यासारख्या किचनमधल्या बिगारीमधे शिकणार्‍यासाठी फिरनी हा अगदीच "जमणेबल" प्रकार आहे. करून बघा आणि सांगा बरे.

१. दूध: अर्धा लिटर. निरसे म्हणजे न तापवलेले दूध घ्या.शक्यतो टोन्ड मिल्क नको. फुल क्रीम मिल्क घ्या.
२. बासमती तांदूळ: दोन ते तीन चमचे. (बासमती लॉन्ग ग्रेन घ्या. दिल्ली राईस अथवा डेहराडून बासमती)
३. साखर: दोन वाट्या. (व्हेरीएशननुसार साखरेचे प्रमाण कमीजास्त होइल.)
४. ड्रायफ्रूट्स आणि इसेन्स.

क्रमवार पाककृती: 

१. सर्वात आधी बासमती तांदूळ भिजवून, धुवून निथळून घ्या. थोडेसे कोरडे भाजून घ्या.

२. हे तांदूळ मिक्सरमधे अगदी बारीक करून घ्या. पीठासारखे बारीक झाले पाहिजे. विकतचे पीठ मात्र वापरू नका. फिरनीला बासमती (लाँग ग्रेन) हवाच. तांदूळ मिक्सरमधे फिरवताना थोडे पाणी घालून फिरवा म्हणजे नंतर पेस्ट करत बसायला नको.

३. दूध निरसे घ्या. एका जाड बुडाच्या भांड्यात दूध घेऊन त्यामधे तांदळाची पेस्ट घाला. व्यवस्थित कालवून घ्या. अजिबात गुठळ्या नकोत. आता हे मिश्रण गॅसवर ठेवा.

५. साखर घाला. गोडाचे प्रमाण तुमच्या आवडीवर असू देत. पण फिरनी फ्रीझमधे सेट होणार असल्याने साखर किंचित जास्तच घाला.

४. सतत हालवत रहा. मिश्रण खाली लागू देऊ नका अथवा गुठळ्या बनू देऊ नका. हीच कृती जरा किचकट आणि वेळखाऊ आहे.

५. घट्ट खिरीसारखे होत आले की गॅसवरून खाली उतरवा.

६. वाफ निवेपर्यंत ढवळत रहा. अन्यथा या स्टेजला येऊन गुठळ्या होऊ शकतात. गुठळ्या झाल्याच असतील तर फिरनी गाळून घ्या. फिरनीचे टेक्श्चर अगदी मऊ आणि सिल्की व्हायला हवे.

७. असतील तर मातीच्या पसरट भांड्यामधे सेट करायला घ्या अन्यथा काचेच्या सुबकश्या वाडग्यांमधून काढा आणि फ्रीझमधे दोन ते तीन तास सेट करा.

८. थंडगार फिरनी खायला द्या आणि तुम्हीदेखील मनसोक्त खा. (सजावट करून फिरनी सर्व करा. -- हे वाक्य बर्‍याचदा मराठी कार्यक्रमांमधे ऐकले आहे. "खायला द्या" असे म्हणायला काय त्रास होतो न कळे) असो.

========================================

ही झाली साधी फिरनी. आता याचे अनंत व्हेरीएशन्स करता येतात. सेट करण्याआधी त्यामधे इसेन्स घालता येतात. सजावटीमधे कलाकुसर करता येते. मी करून पाहिलेली काही व्हेरीएशन्स.
१. केसर फिरनी: थंड दुधात थोडे केशर खलून फिरनीमधे मिक्स करा. वाडग्यामधे काढल्यावर वरती बदाम्-पिस्त्याचे काप घाला. (हे साधेसोपे व्हर्जन. चुकण्याची शक्यता फार कमी. )

२. काजू फिरनी: तांदळासोबत थोडे काजूदेखील भिजत घाला, शिजवताना ही काजूची पेस्ट दुधात घाला. सजावटीसाठी काजू-बदाम्-पिस्ता घाला.

३. मँगो फिरनी: फिरनी शिजत असताना त्यामधे मँगो पल्प घाला. मँगो पल्प गोड असल्यास त्यामानाने साखर कमी घाला. सजावटीसाठी आंब्याच्या फोडी अथवा थोडा मँगो पल्प घाला. (आमच्याकडे हे व्हर्जन भयंकर हिट आहे. आमरस खाऊन खाऊन कंटाळा आला की चेंज म्हणून आंबाफिरनी Proud )

४. चॉकोलेट फिरनी: फिरनी शिजत असताना कोको पावडर घाला. अथवा फिरनी शिजल्यावर त्यामधे चॉकोलेट सिरप घाला. सजावटीसाठी चॉकोलेट किसून घाला. (कोको पावडर अंदाजाने घाला. मी एकदा कडूढाण केलं होतं. तेव्हापासून चॉकोलेट सिरप घालते)

५. स्ट्रॉबेरी फिरनी/अ‍ॅपल फिरनी: शिजत असताना त्यामधे स्ट्रॉबेरी सिरप घाला, सजावटीसाठी स्ट्रॉबेरीच्या फोडी वापरा. ( हे व्हर्जन मी केल्यावर पिताश्रींनी "डायजिनसारखं लागतय" अशी टिप्पणी केली होती. त्यामुळे जरा जपूनच. अ‍ॅपल फिरनीसाठी दिनेशदांची रेसिपी अवश्य बघा)

६. बटरस्कॉच फिरनी: शिजवून झाल्यावर त्यामधे बटरस्कॉच ईसेन्स घाला आणी सजावटीसाठी ड्रायफ्र्रूट्स घाला. अशीच व्हॅनिला फिरनी करता येइल.

७. रोझ फिरनी: फिरनी शिजल्यावर त्यामधे गुलाबजल आणि गुलाब ईसेन्स घाला. सजावटीसाठी गुलाबाची पाकळी आणि किंचित गुलकंद वापरा.

८. कॅरामल फिरनी: वर्षूच्या "साधेसोप्पे पुडिंग"मधल्या रेसिपीने कॅरामल तयार करून घ्या. फिरनी सेट झाल्यावर त्यावर हे कॅरामल हलक्या हाताने पसरा. Proud पुडिंगपेक्षा हे जास्त सोपं पडेल.

९. जास्मिन फिरनी: फ्रीझमधे ठेवताना फिरनीवर एक मोगर्‍याचे फूल ठेवून द्या, खायला देताना फूल बाजूला ठेवा. ड्रायफ्रूट्स घाला. या फिरनीला अप्रतिम वास येतो.

१०. केवडा: शिजवताना केवडा इसेन्स घाला. नंतर सजावटीसाठी केवडाजल घाला.

११. मोदक फिरनी: फिरनी शिजवताना त्यामधे मोदकाचे सारण घाला. साखर घालू नका. याची चव छान येते. मोदक बिघडल्यावर उरलेल्या सारणाचे काय करावे असा प्रश्न पडल्यास ही फिरनी करून बघा. Proud

केसर फिरनी

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे ४ वाडगे भरून होइल.
अधिक टिपा: 

अजून सुगरण मायबोलीकरांना काही व्हेरीएशन्स माहित असतील तरी अवश्य सांगा.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या उलट प्रॉबलेम कसा येतो जनतेला?>> Lol
शूम्पे, दुधावरही हे अवलंबून असेल कदाचित.
:आजीमोडॉन:
मेल्यान् ढोभर पाणी ओतलेलं दिसतंय दुधात
:मोडॉफ:

परत फिरुनी फिरनी वर!! बाकी सगळ्यांबे फोटो मस्तयंत..आता मी पण ट्राय करेन म्हणतेय!

माझ्या उलट प्रॉबलेम कसा येतो जनतेला? >> Lol

सशल, मीही अ‍ॅपल ओट्स करते म्हणून लिहिते आहे, सफरचंद रंग बदलत नाही.
(रच्याकने, काळं कुठे पडतं सफरचंद? चिरल्या चिरल्या पांढरं असतं आणि थोड्यावेळाने पिवळं पडतं. खूप वेळाने रस्टी कलर येतो. पण काळं नाही ब्वा!)

फिरनीचा घाट घातला इथे वाचून (इन्स्पायर वगैरे होउन ) , त्यात वर आपल्या कर्तॄत्वावर लैच विश्वास त्यामुळे लागणारा वेळ २० मि. हे नंदिनीनी लिहिलेल प्रमाण मानून जेमतेम अर्धा तास ठेवला होता, माझ्या सुगरण असण्याबद्दल कोणतीही शंका मला नसल्याने, मी घरी पदार्थाच नाव डिक्लेअर न करण्याची खबरदारी घेतली होतीच, नाहीच जमली , तर खिर अथवा पुडिंग म्हणून खपवणाअर होते Wink त्यामुळे फ्लेवर सिनॅमन ठरवला होता. वरून गार्नीश कॅरॅमल.
तांदुळ वाटून पावडार पेस्ट परेंत नीट होतं सगळ पण फ्रीज उघडल्यावर लक्षात आल की फक्त गाईच ( तस्मात पातळ) दुध आहे. असो २० च्या ऐवजी २५ लागतील मिनीट अस म्हणून उकळायला ठेवल, माकाचु , हा धागा , फसलेल्या फिरन्यांचे अनुभव याचा अभ्यास पुर्ण केल्यानी फुल्प्रूफ प्लॅन आहे असा विश्वास होता . पंधरा मिनीटानी ही काहीही फरक पडला नाही , चव पण गोड दुध ह्यापलीकडे काही नाही , अर्ध्या तासानंतर पेशंट आय्सीयुत याची खात्री पटाली , मग च्मचाभर तांदळाच पिठ घातल आणि अजून दहा मिनीटात काही बदलल नाही तर डिक्लेअर्ड डेड म्हणायच ठरवल. हैला उगाच त्या माबोवर्च्या रेस्प्या वाचून नस्ते उद्योग असे मनातल्या मनात म्हणून झाल , अजून एक चमचा पीठी , मग फरक दिसायला लागला, सिल्की वगैरे कन्सीस्टन्सी !! जितं मया म्हणत पेशंट ला जनरल वार्डात! मट्के नव्हते मग साके चे लहान उभट बोल्स वापरले सेट करायला ठेउन दिल.
हुश्श! चवीला सिंपल अ‍ॅपरंटली पा़कृ पण सिंपल! जमता जमता ( हिंदी आणि मराठी) जरा धीर धरावा लागतो Wink
IMG_2386.jpgIMG_2392.jpg

इन्ना Lol

तांदूळ "गंधासारखे" बारीक वाटणं फार महत्त्वाचं. गरम असताना फिरणी सेटच होत नाही तेव्हा ते प्रकरण घट्ट होत नाही. फिरणी गार झालं की सेट होत येते.

माकाचुमध्ये माझा नंम्बर लागायची १०१टक्के खात्री असल्याने करायच्या वेळेस नंदिनीला फोन लावण्यात येईल Lol Proud

रच्याकने इन्नातै भारीही फोटो.. फिरनी चाखायच्या वेळेस साकी साकी रे ओ साकी हे गाण आठवल की नाही Wink Light 1

सेट व्हाय्चा आधी बासुंदी ची व्हिस्कॉसिटी.
<<<< माझी पद्धत - ग्यासवरची फिरनी डोशाच्या पिठासारखी दिसू लागली की पाच मिन्टांनी ग्यास बंद करणे.

बाकी फिरनी सामाण्य काचबोल आणि मातीचे बोल या दोहोंत सेट करून बघितली आहे, तर याठिकाणी मी अशे सांगू इच्छिते की मातीच्या बोलमधल्या फिरनीला तोड नाही. त्यामुळे मातीचे बोल हा एक जरुरी घटक म्हणून णमूद करावा अशी मी याठिकाणी नंदिनी यांना विनंती विशेष करते. Lol

पणत्या!!!!

एका माबोकरणीनं मला एकदा अमुक माणसांसाठी प्रमाण कसं लागेल हे विचारल्यावर मी टोटल नॉनप्लस. आजवर चारपेक्षा जास्त माणसांसाठी कधी फिरनी केली नाही. मग आम्ही साकडं घातलं जॅमीला. वीस-तीस माणसांचा अंदाज म्हणजे रोजची बात. मला त्यानं विचारलं. "भांड्याचा साईझ सांग म्हणजे मला नीट साम्गता येईल."
"ती मातीच्या मोठ्या पणत्यांमध्ये सेट करणार आहे असं म्हणाली"
"असं नको, मला त्या पणतीची लिक्वीड कॅपॅसीटी किती आहे ते सांग. एक्झाक्ट प्रमाण सांगता येईल"
मग माबोकरणीला हा मेसेज पोचवला. तिचं उत्तर "पणत्या अजून आणल्या नाहीत. कुंभाराकडंच आहेत!!!!" Lol

जॅमी म्हणे काय वाट्टेल तो गोंधळ घाला!!! Proud

बार्बेक्यू नेशनमध्ये अगदी छोट्या साईझच्या पणतीतच सेट केलेली असते बहुतेक फिरनी. पोर्शन कंट्रोलही चांगला होतो.
हिंजवडीतल्या मरकेशमध्ये मोठ्या सुगडीतून भरभक्कम क्वांटिटीत फिरनी देतात ( ही सुगडीतली बहुतेक बर्‍याच हॉटेल्सना पुरवली जाते ) कोरेगाव पार्कातल्या एबीसी फार्म्समध्येही एकदा तीच मिळाली होती Happy

युकेत असताना नंदिनीलाच विचारुन फिरनी केलेली आहे मी मागे. परफेक्ट झाली होती पण वेळ खूप लागला होता असं आठवतंय. तिथल्या पाकिस्तानी रे. मध्ये अशक्य फिरनी मिळत असल्याने परत घरी करायचा योग आला नाही.

इथले फोटो जबरी आहेत एकेक.

मला एक प्रश्न फिरनी करून इथे फोटो टाकणार्‍यांना विचारायचा आहे की फिरनीसाठी साखर तुम्ही 'अर्धा लिटर दुधाला दोन वाट्या साखर' या प्रमाणाताच घालताय का?

हां.. कारण मी बासुंदीलाही एक लिटर दुधाला पाऊण वाटी साखर असं प्रमाण घेते. फिरनीत तांदूळ असल्याने किंचीत(च) जास्त.. मला वाटलं माझा गोडाचा पारा खाली आलाय की काय Wink

बायको म्हणते अस्लं श्राद्ध्हाला खातात. णको म्हणुन.

श्राद्धाला अख्ख्या तांदळाचे करतात. हे पिठाचे आहे. असा फर्क सांगुन पर्वानगी मिळवली आहे.

मातीची भांडी अजुन बाजारातच आहेत.

फिरनीवर २० नविन पोस्टी आणी परत तोच माझ्या विरुद्ध प्रॉबलेम Happy
मी काय म्हणते... दूध अर्धच घ्या आणि कंडेन्स्ड मिल्क वापरा म्हणजे झटक्यात घट्ट होइल मग साखर मात्र कमी किंवा नाहीच अजिबात.

काल फिरनी करुन बघीतली...
मी २ मोठे चमचे तांदुळ घेतले होते...
ईथे लिहिल्यासारखच सगळं सगळं केलं...
खिरीसारखी व्हायला लागल्यावर गॅस बंद केला...आणि सेट करायला चिनीमातीच्या भांड्यात काढुन फ्रिज माद्धे ठेवली...पण फिरनी सेट झालीच नाही...म्हणजे ती पातळ च राहीली...
कितपत घट्ट झाली की गॅस बंद करणे अपेक्षित आहे...??

माझं काय चुकलं... /?
आणि अजुन एक म्हणजे..माझ्या मिक्सर वर एकदम बारीक वाटले जात नाव्हते तांदुळ...थोडी का होईना पण भरड राहिलीच...तर तांदुळ बारीक करण्यासाठी काही युक्ती आहे का ?

चव मात्र आफलातुन आली होती...मी केशर काड्या टाकल्या आणि थोडा केवडा जल पण...

केली .. केली . .. बहूचर्चित फिरनी अखेरीस केली. धन्यवाद नंदिनी.
मला येकच शंका आहे.
सेट झाल्यावर 'जेली' एवढे घट्ट व्हायला हवे का ? तसे असल्यास मग माझी फिरनी 'सेट' झाली नाही असे म्हणावे लागेल.

फार सुंदर, मऊसूत झाली होती, मातीच्या भांड्यात ठेवल्याने.

सेट झाल्यावर 'जेली' एवढे घट्ट व्हायला हवे का ?>>>> नाही. जेली इतकी थलथलीत होणार नाही.

फार सुंदर, मऊसूत झाली होती>>> मग झालंच की जीतम जीतम जीतम Proud

पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद. परवा ४ लिटरची फिरनी केली होती. जबरदस्त हिट गेली. आता जरा हात बसलाय असं वाटतं. मेलं ते दोनदोन तास चुलीपुढे उभं राहणं तेवढा लै वैताग आहे. पण वर्थ इट. Happy
फोटु नाही काढला सॉरी. माझ्याकडे सुंदर वाट्या पण नाहियेत. पण फिरनी सुरेख आणि मऊसूSSSत झाली होती आणि उपस्थित लोकांच्या जीवाला गार, गार वाटले. जवळजवळ प्रत्येकाने पाककृती विचारली.

खूप दिवस मनात होतं.. शेवटी मागच्या आठवड्यात केलीच Happy
मस्त झाली होती..

मी फक्त सजावटीकरता बदाम काप वापरले होते, बदाम पेस्ट वापरली नाही.
आणि स्वादाकरता वेलची पूड वापरली.

साखर मात्र दीड वाटी घातली घाबरत घाबरत तरी ती खूप जास्त गोड वाटली सगळ्यांना, पुढच्या वेळी सव्वा वाटी च साखर पूरे.

एक निरीक्षण आहे, दूध गॅस वर ठेऊन ढवळत असताना दाट होत नाही, ढवळताना साधारण जड जायला लागलं की गॅस बंद करावा.

आणि हा फोटो Happy

IMG_20150227_224530.jpg

Pages