फिरनी

Submitted by नंदिनी on 21 October, 2012 - 07:19
kesar firni
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

"एकदम सोप्पी फिरनी" असं टायटल द्यायचं फार मनात होतं. पण याआधीच्या "एकदम सोप्प्या" रेसिपी संवेदनशील विषय बनल्याने ते टायटल दिलं नाही याची कृपया नोंद घ्यावी. Proud

हॉस्टेलमधे असताना रमझान चालू झाला की आम्ही भटकायला निघायचो. हॉस्टेल होतं माझगावला. तिथून मोहम्मद अलि रोडला जायचं. एरव्ही पण मोहम्मद अलि रोड, क्रॉफर्ड मार्केट हे भाग म्हणजे डोळ्यासाठी, जिभेसाठी अगदी भरपूर मेजवानी असायची. ईदिनिमित्त जवळ जवळ अख्ख्या भागाला रोषणाई केलेली असायची. विविध रंगांचे, चमकते स्टॉल्स नटलेले असायचे. आम्ही मैत्रीणीसोबत संध्याकाळी दिवेलागणीला बाहेर पडायचो. पोटभर खादंती करायची. पाया सूप, चिकन कबाब, मटण कबाब, मालपुआ मनसोक्त हादडायचे. रस्त्यावर बार्गेनिंग करत करत शॉपिंग करायची. येताना सुलेमान बेकरीम॑धून नानकटाई घ्यायची. आणि दहाच्या आत हॉस्टेलमधे यायचं असा आमचा महिनाभर दिनक्रम.

भरपूर खाणं झाल्यावर गोड काहीतरी खावंसं वाटलं की नजर भिरभिरायची ती फिरनीसाठी. एवढंसारं मसालेदार खाल्ल्यावर थंडगार फिरनी अगदी ताजंतवानं करून जायची. मातीच्या छोट्याशा पणतीसारख्या भांड्यामधे सेट केलेली फिरनी म्हणजे माझ्यादृष्टीने रमझानचं ते सर्व वातावरण पुन्हा एकदा जगल्यासारखंच. कधीतरी एकदा सहज नेटवर रेसिपी पाहिली तर अगदीच सोप्पी रेसिपी. शिवाय पदार्थ पण घरात कायम असनारे. झटपट होणारा हा गोडाचा पदार्थ हल्ली माझ्याकडे महिन्या दोन महिन्यातून एकदा घरात होतोच. मग घरात असलेल्या काही सामानांपासून फिरनीचे काही व्हेरीएशन्स केले.

फिरनी म्हणजे तांदळाची खीर.पण तरी साऊथ इंडियन तांदळाची खीर आणि फिरनीमधला सर्वात मोठा फरक तापमानामधे आहे. तांदळाची खीर गरमगरम खाल्ली जाते. गार झाल्यावर ती खाववत नाही कित्येकदा. त्याउलट फिरनी थंडगार खायची असते. मातीच्या भांड्यामधे सेट केलेली फिरनी घट्ट होते आणि गारेगार फिरनी वेगवेगळ्या इसेन्स आणि रंगांमधे प्रयोग करून चवीमधे बदल करता येतो. Happy

माझ्यासारख्या किचनमधल्या बिगारीमधे शिकणार्‍यासाठी फिरनी हा अगदीच "जमणेबल" प्रकार आहे. करून बघा आणि सांगा बरे.

१. दूध: अर्धा लिटर. निरसे म्हणजे न तापवलेले दूध घ्या.शक्यतो टोन्ड मिल्क नको. फुल क्रीम मिल्क घ्या.
२. बासमती तांदूळ: दोन ते तीन चमचे. (बासमती लॉन्ग ग्रेन घ्या. दिल्ली राईस अथवा डेहराडून बासमती)
३. साखर: दोन वाट्या. (व्हेरीएशननुसार साखरेचे प्रमाण कमीजास्त होइल.)
४. ड्रायफ्रूट्स आणि इसेन्स.

क्रमवार पाककृती: 

१. सर्वात आधी बासमती तांदूळ भिजवून, धुवून निथळून घ्या. थोडेसे कोरडे भाजून घ्या.

२. हे तांदूळ मिक्सरमधे अगदी बारीक करून घ्या. पीठासारखे बारीक झाले पाहिजे. विकतचे पीठ मात्र वापरू नका. फिरनीला बासमती (लाँग ग्रेन) हवाच. तांदूळ मिक्सरमधे फिरवताना थोडे पाणी घालून फिरवा म्हणजे नंतर पेस्ट करत बसायला नको.

३. दूध निरसे घ्या. एका जाड बुडाच्या भांड्यात दूध घेऊन त्यामधे तांदळाची पेस्ट घाला. व्यवस्थित कालवून घ्या. अजिबात गुठळ्या नकोत. आता हे मिश्रण गॅसवर ठेवा.

५. साखर घाला. गोडाचे प्रमाण तुमच्या आवडीवर असू देत. पण फिरनी फ्रीझमधे सेट होणार असल्याने साखर किंचित जास्तच घाला.

४. सतत हालवत रहा. मिश्रण खाली लागू देऊ नका अथवा गुठळ्या बनू देऊ नका. हीच कृती जरा किचकट आणि वेळखाऊ आहे.

५. घट्ट खिरीसारखे होत आले की गॅसवरून खाली उतरवा.

६. वाफ निवेपर्यंत ढवळत रहा. अन्यथा या स्टेजला येऊन गुठळ्या होऊ शकतात. गुठळ्या झाल्याच असतील तर फिरनी गाळून घ्या. फिरनीचे टेक्श्चर अगदी मऊ आणि सिल्की व्हायला हवे.

७. असतील तर मातीच्या पसरट भांड्यामधे सेट करायला घ्या अन्यथा काचेच्या सुबकश्या वाडग्यांमधून काढा आणि फ्रीझमधे दोन ते तीन तास सेट करा.

८. थंडगार फिरनी खायला द्या आणि तुम्हीदेखील मनसोक्त खा. (सजावट करून फिरनी सर्व करा. -- हे वाक्य बर्‍याचदा मराठी कार्यक्रमांमधे ऐकले आहे. "खायला द्या" असे म्हणायला काय त्रास होतो न कळे) असो.

========================================

ही झाली साधी फिरनी. आता याचे अनंत व्हेरीएशन्स करता येतात. सेट करण्याआधी त्यामधे इसेन्स घालता येतात. सजावटीमधे कलाकुसर करता येते. मी करून पाहिलेली काही व्हेरीएशन्स.
१. केसर फिरनी: थंड दुधात थोडे केशर खलून फिरनीमधे मिक्स करा. वाडग्यामधे काढल्यावर वरती बदाम्-पिस्त्याचे काप घाला. (हे साधेसोपे व्हर्जन. चुकण्याची शक्यता फार कमी. )

२. काजू फिरनी: तांदळासोबत थोडे काजूदेखील भिजत घाला, शिजवताना ही काजूची पेस्ट दुधात घाला. सजावटीसाठी काजू-बदाम्-पिस्ता घाला.

३. मँगो फिरनी: फिरनी शिजत असताना त्यामधे मँगो पल्प घाला. मँगो पल्प गोड असल्यास त्यामानाने साखर कमी घाला. सजावटीसाठी आंब्याच्या फोडी अथवा थोडा मँगो पल्प घाला. (आमच्याकडे हे व्हर्जन भयंकर हिट आहे. आमरस खाऊन खाऊन कंटाळा आला की चेंज म्हणून आंबाफिरनी Proud )

४. चॉकोलेट फिरनी: फिरनी शिजत असताना कोको पावडर घाला. अथवा फिरनी शिजल्यावर त्यामधे चॉकोलेट सिरप घाला. सजावटीसाठी चॉकोलेट किसून घाला. (कोको पावडर अंदाजाने घाला. मी एकदा कडूढाण केलं होतं. तेव्हापासून चॉकोलेट सिरप घालते)

५. स्ट्रॉबेरी फिरनी/अ‍ॅपल फिरनी: शिजत असताना त्यामधे स्ट्रॉबेरी सिरप घाला, सजावटीसाठी स्ट्रॉबेरीच्या फोडी वापरा. ( हे व्हर्जन मी केल्यावर पिताश्रींनी "डायजिनसारखं लागतय" अशी टिप्पणी केली होती. त्यामुळे जरा जपूनच. अ‍ॅपल फिरनीसाठी दिनेशदांची रेसिपी अवश्य बघा)

६. बटरस्कॉच फिरनी: शिजवून झाल्यावर त्यामधे बटरस्कॉच ईसेन्स घाला आणी सजावटीसाठी ड्रायफ्र्रूट्स घाला. अशीच व्हॅनिला फिरनी करता येइल.

७. रोझ फिरनी: फिरनी शिजल्यावर त्यामधे गुलाबजल आणि गुलाब ईसेन्स घाला. सजावटीसाठी गुलाबाची पाकळी आणि किंचित गुलकंद वापरा.

८. कॅरामल फिरनी: वर्षूच्या "साधेसोप्पे पुडिंग"मधल्या रेसिपीने कॅरामल तयार करून घ्या. फिरनी सेट झाल्यावर त्यावर हे कॅरामल हलक्या हाताने पसरा. Proud पुडिंगपेक्षा हे जास्त सोपं पडेल.

९. जास्मिन फिरनी: फ्रीझमधे ठेवताना फिरनीवर एक मोगर्‍याचे फूल ठेवून द्या, खायला देताना फूल बाजूला ठेवा. ड्रायफ्रूट्स घाला. या फिरनीला अप्रतिम वास येतो.

१०. केवडा: शिजवताना केवडा इसेन्स घाला. नंतर सजावटीसाठी केवडाजल घाला.

११. मोदक फिरनी: फिरनी शिजवताना त्यामधे मोदकाचे सारण घाला. साखर घालू नका. याची चव छान येते. मोदक बिघडल्यावर उरलेल्या सारणाचे काय करावे असा प्रश्न पडल्यास ही फिरनी करून बघा. Proud

केसर फिरनी

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे ४ वाडगे भरून होइल.
अधिक टिपा: 

अजून सुगरण मायबोलीकरांना काही व्हेरीएशन्स माहित असतील तरी अवश्य सांगा.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजुडीने बरोबर लिहीलेय. तरीही प्रांता प्रांतामध्ये वेगळी प्रथा असतेच.

आपल्याकडे महाराष्ट्रात सांज्याच्या ( शिर्‍याच्या ) पोळ्या श्राद्धाला करतात, तर गोव्याकडे त्या पक्वान्न म्हणून सणाला करतात, असे एका गोव्यात २ वर्षे राहिलेल्या कुटुंबाकडुन समजले. त्यांनाही आधी हे माहीत नव्हते, तिथे गेल्यावर कळले.

एरवी आपल्याकडे तांदळाची खीर निषीद्ध समजतात, पण वरील पद्धतीने केलेली ( फिरनी म्हणा पाहिजे तर ) खीर ही देवीच्या प्रसादासाठी लागते. मी करते नेहेमी अशी.

मंजु मलाही हे माहीत नव्हते कारण आमच्याकडे या पोळ्या करतात कधी नैवैद्य म्हणून्:स्मितः

श्राद्धाला कधी केल्याचे मला आठवत नाही, आई पण करीत नाही. पण बर्‍याच ओळखीच्या लोकांकडुन हे कळल्यावर आश्चर्यच वाटले.

आज केली होती या पद्धतीने. नेहमीप्रमाणेच वस्तू गॅसवरून उतरण्याची घाई केली त्यामुळे हवा तेवढा घट्टपणा आला नाही.

वरती दिलेलं साखरेचं प्रमाण हे बहुतेक पश्चिम महाराष्ट्रातल्या गोडघाश्यांनाच ठिक होईल Happy
मी दोन वाट्या लिहिलेलं असून सुद्धा घाबरत घाबरत दीड पेक्षा जास्त आणि पावणेदोनपेक्षा कमी घातली. माझ्यासाठी खूप जास्त झाली साखर. सव्वा वाटी पुरली असती.

गार करायचे असल्याने साखर जास्त लागते हे मात्र खरे आहे. गार करायला ठेवायच्या आधीची चव आणि नंतरची चव यात गोडपणात खूप फरक होता.
नवर्‍याने कधीतरी चालतं जास्त गोड म्हणत साधारण दिड वाडगे फिरनी संपवली. म्हणजे एकूणात व्यवस्थित झाली असावी Happy

माझ्याकडे इसेन्स नाहीयेत कसले तर मी एक प्रयोग करून बघितला तो मात्र फसला. चायनाहून आणलेल्या वाळवलेल्या गुलाबाच्या कळ्या आहेत माझ्याकडे. ज्या पाण्यात टाकल्यावर पाण्याला मस्त फ्लेवर येतो. या कळ्या चमचाभर दुध-पाण्यात भिजवून ठेवल्या आणि वाडग्यात फिरनी ओतल्यावर, गार झाल्यावर प्रत्येकावर अर्धा अर्धा चमचा हे कळ्यावाले दूध पाणी गार्निश सारखे घातले. तेव्हा मस्त गुलाबाचा वास लागला होता. पण खाईपर्यंत तो वास गायब होता.

कसली भारी दिसतेय दीपा_एस फिरनी

आपल्याकडे महाराष्ट्रात सांज्याच्या ( शिर्‍याच्या ) पोळ्या श्राद्धाला करतात >> सरसकट नसावं.
मंजुडी, आमच्याकडे - श्राद्धाला ह्या प्रकारे नाही करत खीर (तांदूळ शिजवून).
तांदुळ धुवून, वाळवून,रवा काढून करतात.
मला फार आवडते ती खीर. फक्त पातळ असते ती.

दीपा, फोटो छान आहे. Happy माझ्या फिरनीच्या फोटोपेक्षा जास्त चांगला.

नी, पुढच्यावेळेला ते गार्निश खायला घ्यायच्या आधीच घालून घे. फ्रीझमधे कदाचित वास उडून गेला असावा. असा माझा अंदाज.

काल बेसिक व्हर्जन केलं फिरनीचं. तांदळाच्या पिठीबरोबर मिल्क पावडरपण घातली होती मी. केसर-विलायची + ड्रायफ्रुट्स. साखर मात्र पाऊण वाटीच घातली आणि तेवढी पुरली. (माझ्याकडे पंजाबी वाटी आहे, आपल्याकडच्या वाटीच्या दिडपट असेल)

आज केली फिरनी. तांदूळ कॉफी ग्राइंडरमध्ये दळल्याने रवाळ राहिले त्यामुळे फिरनी पण रवाळ झाली. बराच वेळ मंद आचेवर ढवळाढवळ करुन सुद्धा खिरीला येतो तसा दाटपणा न आल्याने धीर सुटून ( मांसाहेबांच हे असंच. जरा स्वयंपाकघरात पाऊल ठेवलं की त्यांचा धीर सुटतो :फिदी:) त्यात दोन पेढे कुस्करुन घातले. केसर ईलायची करायला घेतली ती केसर ईलायची खवा फिरनी झाली. जे काही आहे ते फार छान लागतंय.

२ वाट्या साखर खूप जास्त होइल असे वाटल्याने पाऊण वाटी साखर घातली. ते दोन पेढे आणि साखर असा मिळून चांगला गोडवा आला आहे.

रेसिपी बद्दल धन्यवाद Happy हा फोटो -

firanee1.JPG

केसर ईलायची करायला घेतली ती केसर ईलायची खवा फिरनी झाली.>> हा प्रकार मी पण करून बघेन.

पण फिरनी गरम टेम्पला खिरीसारखी घट्ट होत नाही. फ्रीझमधे ठेवल्यावर घट्ट होत येते.

फोटो छाने. तो फ्रीझमधे ठेवायचाच डबा आहे का? आवडला मला तो डबा Happy

लहान मुलांचे कप्पे नसलेले लंच बॉक्स मिळतात तसा आहे डबा. मूसच्या छोट्या वाट्या, जेलोचे कप्स व्यवस्थित मावतात त्यामुळे सेट करताना फ्रिझमध्ये झाकून ठेवता येतात.

खव्यामुळे असेल किंवा खवा घातल्यानंतर सुद्धा खूप वेळ मंद आचेवर ठेवल्यामुळे असेल पण छान दाट झाली होती फिरनी. दूध जवळजवळ पाऊणपट आटले होते. नंतर एवढी छान सेट झाली नाही. तांदळाची बारीक पेस्ट न केल्यामुळे कदाचित.

२०१२ साली ही रेसिपी वाचली तेव्हापासून करून बघायची होती आणि खाउन पण कारण आधी कधीच खाल्ली नव्हती.
काल फायनली योग जुळून आला. योग जुळायला कारण ठरलं ते फ्रीजमध्ये उरलेलं कंडेन्स्ड मिल्क. (ते वापरून मी काही दिवसांपूर्वी 'ती' फेमस खरवस्/गोडाचा पदार्थ रेसिपी केली होती)
सध्या आई-बाबा इथे आले आहेत आणि बाबांचा उपास सोडायला काहितरी गोड असलेलं त्यांना खूप आवडतं म्हणून मी उत्साहाने बासमती तांदूळ धुवून ठेवला. मिपावर पण एक रेसिपी वाचली होती त्यात बदाम पण घातले असल्याने ते पण १२-१५ भिजवले.
मस्त तांदूळ जरा भाजून त्यांचा रवा काढला. बदामाची पण स्मूद पेस्ट केली. आणि खीर ढवळत उभी राहिले. १० मिनिटात माझ्या मनात आलं की आत्ता वेळ आहे हाताशी तर पटकन सलॉन मध्ये जाउन यावं. मनात आलेली गोष्ट पटकन करून टाकण्याचा स्वभाव असल्याने बाबांनाच फिरनी ढवळत उभं रहा, खाली लागू देउ नका, तांदूळाचा रवा शिजला की गॅस बंद करा आणि निवेपर्यंत ढवळत रहा म्हनजे गुठळ्या होणार नाहीत हे सर्व बजावलं. आईला खीरीवर आणि बाबांवर लक्ष ठेव असं बजावलं आणि बाहेर पडले.
मग मी दीड्दोन तासांनी घरी गेले. धावत जाउन फिरनीचं भांड पाहिलं तर ती घट्ट गोळा हाउन बसली होती.
मी हताश होउन आईकडे पाहिलं तर ती म्हणाली तू पाव वाटी तांदूळ घेतलेस तेव्हाच माझ्या मनात आलं होतं की गावाला पुरेल इतकी फिरनी होइल पण तू माबो रेसिपी म्हणून नाचत होतीस म्हणून मी काही बोलले नाही.... मी म्हणाले की अगं नंदिनी जिने ही रेसिपी लिहिली आहे तिच्या घरी दोनच माणसं खाणारी म्हणून तिनी १ चमचा लिहिलं असेल आणि आपण ७-८ जणं खाणार म्हणून मी पाव वाटी तांदूळ विचार्पूर्वक घेतले होते तव्हा माझ्या माबो रेसिपीला दोष देउ नकोस. पण आत्ता ह्या क्षणी मी तुला शरण आले आहे तेव्हा हे प्रकरण निस्तरू कसं ते तेवढं सांग.. मला तो सर्व गोळा टकून द्यायचं अजिबातच मान्य नव्हतं.
मग तो सर्व गोळा एका डब्यात भरून फीजमध्ये ठेवला आणि त्यातली ४ मोठे चमचे घट्ट पेस्ट + साखर + दूध असं ब्लेंडरवरून फिरवलं आणि परत थंड करायला थोडा वेल फ्रीजमध्ये ठेवलं. जेवताना अप्रतिम चवीची फिरनी खाल्ली. मी त्यात व्हॅनिला एक्सट्रॅक्ट पण घालणार होते पण कोणत्यातरी स्टेजला विसरलेच. बहुधा सलॉन ला जायचा अभद्र विचार मनात घोळत होता तेव्हाच विसरले असणार.
तर हे रामायण लिहायचं कारण असं की मी केली ती चूक तुम्ही करू नका. त्या फिरनीत फुगायचं प्रचंड पोटेन्शियल आहे तेव्हा चमचाभर तांदूळ खूप होतात.
उतू नका मातू नका केली फिरनी टाकू नका.
ही साठा उत्तराची फिर्नईकथा पाचा उत्तारी सुफळ संपूर्ण.

तात्पर्य १: मदर इन नीड इज अ मदर इनडीड
तात्पर्य २: फिरनीची चव फार मस्त लागते.

>>हे रामायण लिहायचं कारण असं की मी केली ती चूक तुम्ही करू नका. त्या फिरनीत फुगायचं प्रचंड पोटेन्शियल आहे तेव्हा चमचाभर तांदूळ खूप होतात>> हात तुझी!!! मला वाटलं घेतलेलं काम अर्धवट टाकून सलॉनला जाऊ नका म्हणशील Wink

मला वाटलं घेतलेलं काम अर्धवट टाकून सलॉनला जाऊ नका म्हणशील>> LOL. सलॉनला न जाउन तांदूळ फुगायचे थांबले असते काय?

Pages