मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

Submitted by निमिष_सोनार on 9 November, 2013 - 03:10

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

mee baghate. mala aavadlee maalikaa...
<< त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!>>+100

मला आवडती आहे.
वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!! +१००

कलाकार कोण आहेत ?
भारत एक खोज मधे पण दोन भागात महाभारत दाखवले होते. त्या भागांची पण प्रशंसा झाली होती.

http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
इथे दिली आहे कलाकारांची जंत्री.

मला खासकरून या महाभारतामधे पात्रांच्या मनामधले विचार, पात्रांचे आपापसांतले रिलेशन्स फार चांगले घेतले आहेत. प्रत्येक पात्राला बॅकग्राऊडला दिलेले श्लोक नक्की कुठले आहेत माहित नाही पण तरी ऐकायला जरातरी बरे वाटत आहेत. ज्वेलरी आणि ड्रेसेस "टिपिकल" सोनेरी चंदेरी घेतलेले नाहीत हे अजून एक. (डीझायनर भानु अथैय्या)

महत्त्वाचे म्हनजे संवाद आणि स्क्रीप्ट मस्त आहे. असणारच कारण सलिम खान कन्सल्टट आहेत स्क्रिप्टसाठी.

मला खासकरून या महाभारतामधे पात्रांच्या मनामधले विचार, पात्रांचे आपापसांतले रिलेशन्स फार चांगले घेतले आहेत. >> +१

कृष्‍ण महाभारताचा सूत्रधार दाखवला आहे. कलाकाराचं नाव माहिती नाही, पण नितीश भारद्वाजनंतर कृष्‍ण खरंच छान घेतलाय. आणि महाभारतात कृष्‍णाचे कथानक कुठेही घुसडलेले नाही, ही एक चांगली गोष्ट आहे. विशेष उल्लेख करावा लागेल तो मालिकेचे भव्य सेटस्, स्पेशल इफेक्टस् आणि वेग याला. आणि पात्रांची निवडही अचूक. भिष्म, शकूनी, ध्रुतराष्ट्र अप्रतिम. खरंच, खूपच चांगली मालिका आहे. मी तर दररोज रात्री अकरा वाजताचे पुनर्प्रसारण पाहतो. अवश्य पहावी अशी मालिका.

सौरभ जैन शुक्ला नाव आहे. त्याने महादेवमधे विष्णुचा रोल केलाय . त्याचे उच्चार आणि बोलणं खूप सहज आहे.

कृष्णाची गोष्ट नंतर येइल बहुतेक,

परशुराम आणि भीष्म युद्धाच्या वेळी घेतलेली शंकराची एन्ट्री हा माझा आजवरचा आवडता सीन आहे. "देवाची" एन्ट्री कशी व्हायला हवी याचा उत्तम कल्पक नमुना.

ह्या महाभारतामध्ये पात्रांचे दैवत्व, चमत्कार वगैरे थोडे दुय्यम ठेवून त्यांच्या मानवी स्वभावाचे कंगोरे जास्त ठळकपणे दाखवले आहेत. नक्कीच एक सरस मालिका आहे ही.

नंदिनी,
परशुराम आणि भीष्म युद्धाच्या वेळी घेतलेली शंकराची एन्ट्री हा माझा आजवरचा आवडता सीन आहे. "देवाची" एन्ट्री कशी व्हायला हवी याचा उत्तम कल्पक नमुना.>>
कौरवांचा जन्मही तर्कसंगत पध्दतीने दाखवलाय. अर्थात मूळ कथेतही कौरवांचा जन्म माठातून झालेला असाच उल्लेख आहे, पण लोकांना आजही वाटतं की गांधारीने शंभर पुत्रांना प्रत्यक्ष जन्म दिलाय.

मलाही ही सिरीयल आवडली. सगळेच भाग बघणे शक्य नसले तरी अधुन मधुन बघत असतो.

कुंतीचा सिरीयल प्रवेशही मला आवडला. शिकारीसाठी वनात घोडेस्वारी करणारी कुंती एका लेकुरवाळ्या हरिणीला इतर शिकार्‍यांपासुन वाचवते आणि माता-पुत्राची ताटातुट करणे हा अक्षम्य गुन्हा आहे हे सांगते. आपल्या पुत्राला त्यागल्याचे दु:ख तिच्या बोलण्यातून, वागण्यातून जाणवत होते.

धृतराष्ट्र मात्र थोडा खटकला. आपल्या मनातले अन्यायाचे, राजा होण्याची महत्त्वाकांक्षा त्याने कधी जाहीरपणे बोलून दाखवली नसावी. दुर्योधनाचा हट्ट, माझे त्याच्यापुढे काही चालत नाही, मी हतबल आहे त्याच्यापुढे अशी कारणे तो देत असायचा. पांडूच्या राज्यभिषेकाचा निर्णय जेव्हा घेतला गेला तेव्हा त्याने केलेला वाद मला नाही पटला. थोडा क्रुर वाटला त्यावेळी तो.

पाचही पांडवांमध्ये लहानपणी पासुनचे प्रेम, एकजुट, मोठ्या भावाविषयीचा आदर उत्तमपणे प्रतित केला आहे.

आजचा एपिसोड पाहिला का?
गुरू शिष्य संबंधातले बारकावे तर होतेच तसेच द्रोणाचार्यांनी एकलव्याला अंगठा मागण्यामागाचे खरे कारण अर्जुनाला प्रतिस्पर्धी निर्माण होऊ नये असे नव्हते तर एकलव्य मगध देशाचा असल्याने आणि मगध देश हस्तिनापुराचा शत्रू असल्याने ते त्याला अंगठा मागून त्याची धनुर्विद्या शिकण्याची शक्यता नष्ट करून मगध देशात त्याला परत पाठवतात. कारण ते हस्तिनापुरा चे मीठ खात असतात... वगैरे वगैरे...

कालच पहिल्यानेच एपिसोड पाहिला, तो एकलव्याचा होता अन खूप inspiring वाटला. वेळोवेळी महाभारताची आपल्यापुरती revision होणे आवश्यक असते हे जाणवले.

आजचा एपिसोड विशेष आवडला. द्रोणाचे काम करणारा अ‍ॅक्टर कोण आहे? चांगले काम केले आहे.

उद्या बारा वर्षाचा टाईम लीप आहे. सर्व मोठ्ठे अभिनेते येणार आता.

एकच दिवस पाहण्याचा योग आला. आधिच्या महाभारत पेक्षा फारच सुमार दर्जाचे सेट्स , चित्रीकरण वाटले.

आधीच्या म्हणजे "बी आर चोप्राच्या" महाभारताचे का? त्याचे सेट्स तकलादू होते हे तेव्हासुद्धा समजायचे. स्पेशल ईफेक्ट्स तर अगदीच बाळबोध होते, तेव्हाच्या तंत्रज्ञानाची तेवढ्याच मर्यादा होत्या. पण कपडेपट आणी दागिनेपट याबद्दल तर बोलायलाच नको.

त्या महाभारतामधे सरधोपट कथा सांगत गेले होते. इथे आधुनिक तंत्रज्ञानासोबतच अभिनय आणि महाभारतातील पात्रांचे विविध डायनॅमिक्स उत्तम रीत्या घेतले आहेत.

कालच्या एकलव्यच्या एपिसोडमधे अंगठा मागितल्यानंतर द्रोणाची स्वतःशीच चाललेली तडफड, अर्जुनावर झालेला परिणाम (याला नंतर युद्धाआधी शस्त्रं टाकायची आहेत!!) त्यातून दुर्योधन आणि अश्वत्थामा यांची जुळलेली मैत्री हे चांगलं घेतलंय.

मवा, उलट लहान मुलांना दाखवायला चांगली मालिका आहे. सुनिधी आवडीने बघते, अर्थात तिची आवड "कान्हा" आणि स्पेशल ईफेक्ट्स यावरच आहे सध्या. Happy

chaan hota kaalacha episode.
pratyek vaakyaaganik शिष्य (vidyaarThee) kasa aasaava yaacha bodh hota.

आजचा एपिसोड पाहिला का?
गुरू शिष्य संबंधातले बारकावे तर होतेच तसेच द्रोणाचार्यांनी एकलव्याला अंगठा मागण्यामागाचे खरे कारण अर्जुनाला प्रतिस्पर्धी निर्माण होऊ नये असे नव्हते तर एकलव्य मगध देशाचा असल्याने आणि मगध देश हस्तिनापुराचा शत्रू असल्याने ते त्याला अंगठा मागून त्याची धनुर्विद्या शिकण्याची शक्यता नष्ट करून मगध देशात त्याला परत पाठवतात. कारण ते हस्तिनापुरा चे मीठ खात असतात... वगैरे वगैरे...
<<
निमिष,
अनेक सायटींवर एकच धागा 'चालवल्या'बद्दल अभिनंदन.

मिपा वरचा याचा प्रतिसाद डकवता का इथे?

चालायला हरकत नसावी. या मुद्द्यावर बरीच रोचक चर्चा तिथे झालेली दिसली. म्हटलं इथल्या वाचकांनाही माहिती मिळेल.

मला नविन महाभारत पहायला खुप आवडतय.... मागच्यावेळी मुंबईत आले होते त्यावेळी रस्त्यावर त्या सिरियलमधील मुख्य पात्रांचे इंट्रो करणारे पोस्टर्स पाहिले होते.छानच वाटले. पण नंतर त्याबद्द्ल मी विसरुन गेले होते. इथे सहज चॅनल सर्फ करताना नविन महाभारताचा एक एपिसोड बघितला, आवडला. मग आंतरजालावरुन पहिल्यापासुन सर्व भाग पाहिले. आता पुढील भागाविषयी उत्सुकता आहे.

या महाभारतातील आवडलेल्या गोष्टी :-

आतापर्यंत पाहिलेले सर्वच एपिसोड्स छानच आहेत. कलाकारांची निवड, सादरीकरण,त्यांचा अभिनय परफेक्ट वाटला स्पेशली भिष्म, शकुनी, धृतराष्ट्र, कृष्ण, गांधारी, माद्री मस्तच.... सेट्स, कपडे, दागिने लाजवाब व नेत्रसुखद. त्यात प्रत्येक कॅरक्टरच्या काही विशेष प्रसंगांच्या वेळी बॅकग्राउंड मध्ये एकु येणारे श्लोक, त्याला दिलेले संगित अप्रतिम आहे. इथेही अजय-अतुलची जादु चालली आहे. प्रत्येक पात्राची एंट्री एखाद्या हिंदी चित्रपटातील हिरो-हिरोईन सारखी दाखविली आहे. तसेही हे सर्व कॅरेक्टर्स भारतीयांच्या मनातील नायक-नायिकाच आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी अशी एंट्री आवश्यक व शोभनीय आहे. तसेच या महाभारतात उगाच प्रत्येक पात्राला फक्त काळ्या-पांढरया रंगात रंगविलेले नाही. प्रत्येक पात्र चांगले-वाइट का वागत आहे, त्यांच्या मनात चांगल्या वाईटाविषयी काय प्रतिक्रिया येत आहेत, त्यांच्या भावभावना, मनातील द्वंद्व हे छान दाखविले आहे. मला वाटते इथेच मालिकेचे पहिले यश आहे व वेगळेपण आहे.

चोप्रांच्या महाभारतामुळे सर्वसामान्य भारतीयांना महाभारताची कथा काय आहे हे समजले. तर या नविन महाभारतामुळे त्याला अजुन थोडे ग्लॅमर, आकर्षकपणा मिळाला असे वाटते. बाकी नावे ठेवायची असतील तर एकता कपुरच्या महाभारताला ठेवु शकता. आंतरजालावर नविन महाभारत बघताना कपुरच्या महाभारताचे काही एपिसोड्स बघितले. मुळीच आवडले/ पटले नाहीत.

नविन महाभारतात न आवडलेल्या गोष्टी :-

१. बॅकग्राऊंड म्युझिक कधी कधी खुप लाउड होते ज्यामुळे कलाकारांचे डायलॉग्ज नीट एकु येत नाहीत.
२. प्रत्येक पात्राला दिलेल्या श्लोकांना अजुन वेगवेगळ्या प्रकारे चाल व संगीत देता येइल. काही काही श्लोकांना एकसारखीच चाल व संगीत दिले आहे.
३. नविन महाभारतात तरी स्त्री पात्रांना रडुबाई नाही दाखविले तर बरे होईल. त्यांनाही स्वत्व, स्वाभिमान आहे हे दाखविले तर आवडेल. एका एपिसोडमध्ये शकुनी येउन गांधारीला विचारतो कि सर्व राजपुत्रांचा जन्म झाला का? तेव्हा गांधारी बोलते कि सर्व राजपुत्रांचा जन्म झाला फक्त माझ्या एका कन्येचा जन्म अजुन झाला नाही. तर शकुनी त्यावर बोलतो कि तिचा जन्म झाला काय नाही झाला काय काही फरक पडत नाही Sad . अरे काय आहे हे, आताच्या काळात तरी असले डायलॉग्ज कुठे देताय तोंडी Angry
४. हे जरा अवांतर होईल पण महाभारत बघताना मला जाणवले कि पांडुच्या दोन्ही राण्या फक्त पुरुषदेवतेचे आवाहन करतात. त्यांना फक्त पुत्र हवे असतात. कोणीच कन्येचा विचार करत नाही Sad . कोणीच दुर्गा, लक्ष्मी,सरस्वती या देवतेंचे आवाहन करुन त्यांच्यासारखी स्त्री संतती मागत नाहीत.
गांधारीदेखील पतीला शंभर पुत्र दयायचीच इच्छा धरते. मग या मोदकांबरोबर नावाला म्हणुन एक नेवरी येते. तरी एका एका राजाला एवढ्या राण्या कश्या असायचा व एवढ्या स्त्रिया कुठुन जन्म घ्यायच्या कुणास ठाउक. गुरुकुलातदेखील फक्त सर्व राजपुत्रच जातात व राजकन्या महालातच बाहुलीबरोबर खेळते. म्हणजे एवढ्या वर्षात समाज आहे तसाच आहे तर Sad गेल्या शंभर वर्षात बदल झाले तेवढेच....

अरे पुरुष देवतेचे आवाहन हे फक्त गोंडस् नाव आहे त्या विधीला. सूर्याने किंवा आणी कुठल्या देवाने "मुलगा दिला" म्हणाजे असा हातात थोडीच दिला आणून.... त्या दृष्टीने स्त्री देवतेला कसे आवाहन करणार Happy Happy

Pages