मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

Submitted by निमिष_सोनार on 9 November, 2013 - 03:10

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झक्की,
या अशा प्रतिसादांमुळेच तुम्हाला काका म्हणतो मी. छाण!

अवांतरः आज काय विकेंड असूनही ब्रिज पार्टनर्स नाहीत वाटते? इथे एकदम ३ नोट्रंपचा डाव टाकलात?

नकुल कि सहदेव कोणालातरी गरुड आपल्या पायात धरुन घेउन येतो. मग पांडवाला हवे तेव्हा व हव्या त्या ठिकाणी तो त्या स्पर्धेच्या मैदानात उतरवतो.... उतरवत पण नाही म्हणा तो हवेतच फेकतो व पांडव गुरूत्वाकर्षण शक्तीने जमीनीकडे ओढला जातो व एकदम पक्ष्यासारखा हवेतुन येउन जमिनीवर नीट उभा राहतो. मजा मजा चाललीय बुवा. एकदम धुम२ चित्रपटातल्या हृतिक व अभिषेक दरीत एकदम स्वतःला सांभाळत उतरतात याची आठवण झाली.

मोठा झालेल्यांमध्ये सर्वात प्रथम दुर्योधनाबरोबर युद्ध केलेला पांडव तितकासा अपील नाही झाला. संवादफेक नाही जमली आहे त्याला. एवढया मोठया मोठया तरुण पुरुषांच्या आई अजुन इतक्या तरुण कश्या बरे.... क्या है इनके खुबसुरती का राज Happy

बाकी युद्धिष्टीर, अर्जुन, दुर्योधन, सहदेव छान... भीमदेखील चांगलाच वाटला पण बघु पुढे कसा वाटतो. दुर्योधन युद्धिष्टीराला भडकवण्यासाठी त्याच्या आईबद्दल "चरित्रहीन" वगैरे शब्द वापरेल हे काही पटले नाही.

ओ मला वाटले कि पांडुराजाला मुलगे कसे झाले हे दुर्योधनाला माहिती नसेल. त्याला कोणता शाप मिळाला हे फक्त तो त्यांच्या राण्यांनाच सांगतो, असे दाखविले आहे ना.... आणि जरी इतरांना ते माहिती असले तरी त्या काळी त्यात गैर मानले जात होते असे नाही वाटत. त्याचे स्वतःचे वडिल धृतराष्ट्रदेखील वेदव्यासांपासुन जन्माला आले. पुढे दुर्योधन द्रोपदीचा अपमान करतो ते तिने त्याला मारलेल्या "आंधळ्याचा मुलगा आंधळाच" या टोमण्याचा सुड घेण्यासाठी व ते करुन पांडवांना अजुन अपमानीत करण्यासाठी...

इथे तर त्यांच्या भविष्यातील सुड-स्पर्धेची सुरुवात आहे. तेव्हा तो पांडवांच्या आईला असे बोलेल असे वाटत नाही. पण काही होउ शकते म्हणा दिग्दर्शक व एपिसोड लिहिणारेच ठरवणार कोणाला कोणते वाक्य बोलायला लावायचे. इथे मुळ महाभारत कोणाला नीट माहिती आहे. जे दाखवतील ते मम म्हणायचे. सध्या लोकांच्या हाती फक्त चोप्रांच्या महाभारतावरुन तुलना करणे एवढेच आहे.

आजपर्यंत जेव्हढे पाहिले त्यावरून खालील दोन विचार मनात येतातः

कुरुकुलाने स्त्रियांवर बरेच अन्याय केले:
एक:
अंबा. अंबिका, अंबालिका (विचित्रवीर्य काय लायकीचा माणूस होता हे आधीच माहित होते), गांधारी(जवळपास सामर्थ्याच्या बळावर, जबरदस्ती केली), पुढे द्रौपदीचे काय हाल केले ते जाहीरच आहे. कुंती माद्री यांचे मात्र दुर्भाग्य.

दोनः
सर्व गोष्टी केवळ कुरुकुलाच्या स्वार्थासाठी केल्या. कदाचित त्या काळच्या धर्माप्रमाणे, स्वार्थ साधणे सर्वात महत्वाचे, परीणाम कुणावरहि वाईट झाले तरी धर्माचे नियम तसे आहेत म्हणून पाळायचे. तेंव्हापासून आजतागायत, धर्माच्या नावाखाली काही पण बावळटपणाच्या चालीरिती चालू ठेवायच्या. किंवा स्वतः मस्त मजेत रहायचे नि इतरांना व्हिएट्नाम, इराक, कारगिल इथे पाठवून मरू द्यायचे!

हा कसा धर्म असेल? सर्वेपि सुखिनः संतु, ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या, तर त्यात स्वार्थापायी इतरांचे आयुष्य बरबाद करायचे, हे कसे? नि त्याला धर्म म्हणायचे? काही इतर मार्ग नाही सुचत या 'विद्वानांना?'

काही कळत नाही. हिंदू धर्माचे तत्वज्ञान उच्च असेल, पण रोजच्या व्यवहारात कसे वागायचे हे अजून लक्षात येत नाही.

दुर्योधन युद्धिष्टीराला भडकवण्यासाठी त्याच्या आईबद्दल "चरित्रहीन" वगैरे शब्द वापरेल हे काही पटले नाही.>>>> मला वाटतं नंतर हा दुर्योधनाचा महत्त्वचा पॉईन्ट बनतो. पांडव हे "कौरव" नाहीतच असे तो सुरूवातीपासून म्हणत राहतो. नंतर कृश्ण पाच गावे मागायला जातो तेव्हादेखील तो याचा उच्चार करतो.

एन्ट्रीला स्पेशल ईफेक्ट घालतातच इथे. धृतर्राष्ट्राच्या एन्ट्रीला अख्खा एपिसोड असाच खर्च केला होता, त्यात तर तो हत्ती वाघ सिंह अशांशी लड्।अताना दाखवला होता, ती सगळी मारामारी झाल्यावर मग डिरेक्टरला "आरे तुझा रोल आंधळ्याचा आहे " अशी आठवण करून दिली बहुतेक!! तोपर्यंत धृतराष्ट्र चांगला डोळस दिसत होता

मला युधिष्ठीर आवडला नाही. त्याच्या चेहर्‍यावर शांतपणा असा दिसलाच नाही. पुढे बघू!!!

महाभारतात प्रत्येक पात्राच्या जन्माच्या मागे काहीतरी कथा आहे. राजा शंतनु नंतर त्याचा खरा वंशज भीष्म प्रतिज्ञेमुळे स्वतः वंशनिर्मिती करत नाही. ज्या कारणासाठी तो हे करतो त्या सत्यवतीचे राजा शंतनुपासुन झालेले पुत्र अल्पायुषी ठरतात. इथे ती शंतनुशी लग्न करण्याच्या आधी झालेला आपला पुत्र वेदव्यास याच्यापासुन स्वतःच्या सुनांना गर्भवती बनवते. काही शतकांपुर्वी अश्या स्थितीत भारतात आपल्याच नात्यातील कोणाचेतरी मुल दत्तक घेतले जायचे. राजा शारिरिकरित्या आरोग्यवान असेल तर खुप सारया राण्या करुन आपला वंश वाढवायचा. पण महाभारतात मात्र पुरुष वंश पुढे नेण्यास असमर्थ असेल तर मुळ वंशात लग्न करुन आलेल्या स्त्रिया दुसरया पुरुषाद्वारे ( बहुतेक योग्य ब्राम्हण किंवा क्षत्रिय) वंश पुढे चालु ठेवायच्या.

जर सत्यवती राजा शंतनुशी लग्न होण्याअगोदर वेदव्यासाची आई बनते तरी तिला सम्राज्ञी व राजमाता म्हणुन राजकुल व तत्कालीन समाज स्विकारतो तर कुंती नवरयाचा संमतीने इतर पुरुषांकडुन पुत्रप्राप्ती करुन घेतल्यावर ती त्या काळाप्रमाने "चरित्रहिन" कशी ठरु शकते.

जर धृतराष्ट्र, पांडु हे कुरुवंशीय ठरु शकतात तर पांडवदेखील कुरुच होते. पण दुर्योधन स्वतःच्या सत्ताप्राप्तीसाठी हे सत्य अमान्य करत होता.

जर सत्यवती राजा शंतनुशी लग्न होण्याअगोदर वेदव्यासाची आई बनते तरी तिला सम्राज्ञी व राजमाता म्हणुन राजकुल व तत्कालीन समाज स्विकारतो तर कुंती नवरयाचा संमतीने इतर पुरुषांकडुन पुत्रप्राप्ती करुन घेतल्यावर ती त्या काळाप्रमाने "चरित्रहिन" कशी ठरु शकते.>>> म्हणून्च महाभारत हे एका युगाचा अथवा पर्वाचा अंत मानले गेल आहे, कारण इथे बदलत्या नीतीमूल्यांची आणि संकल्पनांची दखल घेतली आहे.

कुंती "चरीत्रहीन" वगैरे बाजूला ठेवू, पण तिलादेखील कानीन पुत्र होताच, जो तिने समाजापासून लपवला. जर सत्यवतीने वेदव्यासाला आपला पुत्र हे जगजाहीर पणे सांगितले तर कुंतीने का नाही सांगितले? कारण त्या पिढीमधे समाजाची मूल्ये बदलली आहेत.

हे असं बोलून दाखवणं हा दुर्योधनाचा परफेक्ट राजकारणी डाव आहे. त्याच्या मते, जर हे पंडूचे पुत्रच नाहीत, तर हस्तिनापुरच्या गादीवर यांचा हक्क कसा काय आहे?कारण, अंबिका अंबालिका इत्यादि जेव्हा नियोगाने पुत्र प्राप्त करतात तेव्हा ते समाजासमोर- सासूच्या आज्ञेने.. लपून छपून नाही, पण कुंती पांडू माद्री तिघे वनात असतात, तिथून कुंती एकटीच पाच पुत्र घेऊन परत येते. "नियोग"च झाला की नाही हे सांगायला पंडू हजर नाही. मग तसं पाहिलं तर हा प्रश्न योग्यच आहे. पण असं लिहिलं की लोकांच्या धार्मिक भावना दुखावतात कारण आपल्याला पांडव धर्माचे आणि कौरव खलनायक असं सांगितलं आहे. प्रत्यक्षात पांडव काही फार सज्जन वगैरे होते अशांतला भाग नाही. तेही तितकेच आणि तेवढेच खलनायक, जितका दुर्योधन.

कानीन पुत्र असणे समाज स्विकारत असणे तिथपासून ते नियोगाने झालेले पुत्र पित्याचा हक्क सांगू शकत नाहीत, असा तो पूर्ण प्रवास आहे खरंतर. शंतनुच्या कुरूवंश भीष्माबरोबरच संपतो. नंतर राहतं ते फक्त सत्तेसाठी चालू असलेले भांडण.....

शंतनुच्या कुरूवंश भीष्माबरोबरच संपतो. नंतर राहतं ते फक्त सत्तेसाठी चालू असलेले भांडण >> सोला आने सच, नंदिनी. चोप्रांच्या महाभारताची सुरुवातच 'राज्याचा वारस' ठरवण्यापासून दाखवली आहे. पुर्वीच्या काळी (युगात) राजाचा पुत्र असणे ह्या निकषापेक्षा 'योग्यता' हा निकष लाऊन राजाची निवड व्ह्यायची. नविन युगात ते बदलले.

चोप्रांच्या महाभारतात अनेक त्रुटी असतील. आज झगमगाटाच्या बाबतीत कदाचीत ते अगदीच सामान्य वाटू शकेल. पण त्याची पटकथा आणि संवाद यांना अजून तरी तोड नाही.

नंदिनी छान माहिती... पांडव कितपत खलनायक होते हे माहित नाही पण महाभारतात दुर्योधन व पार्टी यांनी मात्र पांडवांना पदोपदी सत्तेपासुन दुर ठेवण्यासाठी नाना कट-कारस्थाने केली आहेत. त्यामानाने पांडवांनी सुडबुद्धी वापरली असे दिसत नाही. उलट एखादया डेलीसोपमधील सोज्वळ, आज्ञाधारी सुनेसारखी त्यांनी कौरवांनी केलेली कटकारस्थाने सहनच जास्त केली. लायकी व ताकद असतानाही तेवढया जोरदारपणे प्रतिवाद केला असे दिसत नाही. शेवटी जे काही महाभारत झाले ते सर्व नितीचे मार्ग आजमावुन पाहिल्यावर शेवटचा पर्याय म्हणुन होते.

महाभारतात दुर्योधन व पार्टी यांनी मात्र पांडवांना पदोपदी सत्तेपासुन दुर ठेवण्यासाठी नाना कट-कारस्थाने केली आहेत. त्यामानाने पांडवांनी सुडबुद्धी वापरली असे दिसत नाही. उलट एखादया डेलीसोपमधील सोज्वळ, आज्ञाधारी सुनेसारखी त्यांनी कौरवांनी केलेली कटकारस्थाने सहनच जास्त केली. लायकी व ताकद असतानाही तेवढया जोरदारपणे प्रतिवाद केला असे दिसत नाही. >>> आपण महाभारत कुठल्या अँगलने वाचतो त्यावर अवलंबून आहे. मी मूळ महाभारत वाचलेले नाही, पण इंग्रजी भाषांतर आणि मराठीमधली काही पुस्तके वाचली आहेत त्यावरून तरी पांडव देखील तेवढेच मुत्सद्दी आणि इंट का जवाब पत्थर् से देनेवाले थे. फक्त त्यांनी "सत्याचा" मार्ग सोडला नाही, म्हणत गोडपणा करत राहिले. महाभारतात कुठलीच व्यक्तीरेखा ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट नाही, प्रत्येकाला काहीतरी ग्रे शेड आहेच आहे.

आज पहिल्यांदा हा धागा वाचला, मालिकाच बघत नाही तर चर्चा तरी काय वाचायची या हिशोबाने नव्हतो फिरकलो, आज वाढत्या पोस्ट बघून चक्कर मारली आणि जुन्या महाभारताच्या आठवणीने मात्र नॉस्टेल्जिक व्हायला झाले.

हे नवीन महाभारत चांगले असो वा वाईट, ज्याचे त्याचे मत, पण येथील चर्चा वाचूनही मला उत्सुकतेपोटी ते चुकूनही बघायचे नाही,
जुन्या महाभारताच्या ज्या सुखद आठवणी बालमनावर कोरल्या गेल्या आहेत, ती पात्रे, त्यांच्या वेशभूषा, एकेकाची बोलायवागायची शैली, ते भव्यदिव्य सेट, झगमगीत चंदेरीसोनेरी कपडे, अन त्यापलीकडले मनात ठासलेले चेहरे.. यावर काहीही ओवरराईट करून ते मिटवायची इच्छा नाही. Happy

प्रत्यक्षात पांडव काही फार सज्जन वगैरे होते अशांतला भाग नाही. तेही तितकेच आणि तेवढेच खलनायक, जितका दुर्योधन. >> +१

आधीचे महाभारत ज्यांनी पाहिलेय, त्यांच्याकडून तुलना होणे स्वाभाविक आहे कारण त्या महाभारताने इतिहास घडवला टीव्ही दुनियेत.

आज कर्ण दाखवला त्याच्या पायात आजच्यासारखे शूज दाखवलेत, पंकज धीरने कर्ण अजरामर केला, बहुतेकांना कर्ण हा पांडवापेक्षापण आवडायचा हि ताकद पंकज धीरमध्ये होती, नवीन कर्ण आजतरी आवडला नाही त्याच्यापुढे, पुढच्या काही दिवसात लक्षात येईल तो कसा आहे.

दिसायला सर्व चांगले घेतलेत पण अभिनय उजवा हवा, ठीक आहे काही वेळ द्यायला हवा त्यांना, जे पहिल्यांदा महाभारत बघत असतील ते तुलनात्मकदृष्ट्या बघत नसतील, माझ्याकडून तुलना केली जाते, कळत-नकळत.

अरेरे काय तो कर्ण... अगदी बिचारा वाटला, सर्वजण त्याला स्पर्धेतून जायला सांगतात त्यावेळी.... दया आली त्याची.... दुर्योधन तर पक्का राजकारणी व धोरणी आहे, शकुनीने भाच्याला चांगलाच तयार केला आहे.

अधुनमधुन पहात आहे सध्या. आवडलेली गोष्ट म्हणजे केवळ खलनायक आहे म्हणुन राक्षसी दिसणारी पात्रे नाहीत. प्रसन्न दिसणारे लोक घेतलेत.
आत्तातरी कौरव-पांडव बोलण्यात मिळमिळीत वाटले थोडे. अर्जुन छाने. काही दिवसांनी बोलण्यात सर्व सुधारतील. बहुधा सर्वांची व्यक्तीमत्वे अजुन चांगली होतील अशी आशा, मालिका पुढे जाईल तशी.

कृष्णतर भयंकरच मिळमिळीत बोलतो. नाही आवडला. दुर्योधनाला डबिंग केल्याचे जाणवते. भव्यता ह्यात छान दाखवलिये. तत्वज्ञान अजुन जास्त ऐकले नाही पण चांगले असावे जितके पाहिले त्यावरुन व वरील प्रतिसादातुन. पेशल इफेक्टबद्दल अनुमोदन. जास्तच केले.
पण एकंदर चांगले चाल्ले आहे. मालिकेवर खुप कष्ट केले जात आहेत ते जाणवते.
द्रौपदीला पहाण्याची उत्सुकता आहे.

वरची चर्चा आवडली. जगातलीसर्वात गुंतागुंतीची कथा असावी ही.

होय.
"सुनिधि" यांच्या म्हणण्यानुसार ही खरोखरच जगातली खूप गुंतागुंतीची कथा आहे.
त्यातल्या प्रत्येक पात्राला न्याय देणे, त्यांच्यातले परस्पर संबंध दाखवणे खरोखरीच आव्हानात्मक आहे.
खरेच कष्ट घेतलेले आहेत सर्वांनी ह्या मालिकेकरता!

द्रौपदी ला पहाण्याच्या उत्सुकते विषयी व इतर माहितीसाठी:

आपण फेसबुकवर असाल तर https://www.facebook.com/OfficialMahabharat हे पेज लाईक करा.
यात सर्व कलाकारांबद्दल माहिती, त्यांचे रोजच्या जीवनातले फोटो, पुढच्या भागांबद्दल माहिती आणि रोजच्या रोज अनेक अपडेट मिळतात....

दुर्योधन सर्वात जास्त आवडला- कास्टींगच्या दृष्टीने. देखणा आहे एकदम. सर्वात जास्त निराशा युधिष्ठिरानेच केली. तो सर्वात मोठा मुलगा वाटत नाही, चेहराही गंभीर / मॅच्युअर नाहीये.

दुर्योधन छान आहे.. अभिनय आणि व्यक्तिमत्त्व सुद्धा !!
म्हणजे व्यक्तिरेखा नाही तर मी दुर्योधन चे काम करणारा कलाकार या बाबत म्हणतो आहे.

मला बै दुर्योधनाचे केसांचे हायलाइट्स भारी आवडले! Happy
आणि भीम बलदंड होता स्थूल/ ढेरपोट्या नव्हे, आय होप यातल्या भीमाला तसले इनोदी कॅरेक्टर बनवून टाकणार नाहीत हे लोक. बाकी कुणाला अजून काही वाव मिळाला नाहिये. कळेलच आता.
आणि हेच आता पांडवांचे फायनल गेटअप असतील तर फोटोत पाहिलेली द्रौपदी बहुतेक सगळ्या पांडवांची ताई वाटू शकेल. अर्जुनाची तर मावशीच. अर्थात आतापर्यन्त फक्त ती पोस्टर्स , फोटोंमधेच पाहिलीय. बघू...

आय होप यातल्या भीमाला तसले इनोदी कॅरेक्टर बनवून टाकणार नाहीत हे लोक.<<< लहान्पनीचा भीम तसाच दाखवला होता.

अर्जुन छाने. Happy युधिष्ठीर, नकुल सहदेव अजिबात आवडले नाहीत. कर्ण लहान वाटतो त्यांच्यापेक्षा.

दुर्योधनाला त्याचं बेअरिंग बरोबर मिळालंय. बाकीचे अजून चाचपडताहेत.

महाभारत बघताना सहजच विचार आला की ह्यांचे कौरव्+पांडवांचे अजुन लग्न झाले नाहीये. म्हणजे योग्य वयात त्यंचं लग्न होणार. म्हणजे पुराणात बालविवाह वै नव्हते का?मग बालविवाह वै कधीपासुन सुरु झाले??

नविन महाभारतात घेतलेली पात्रे छानच आहेत. होईल हळु हळु सवय त्यांना त्या त्या कॅरेक्टरमध्ये बघायची ( दुसरा पर्याय तरी कुठे आहे सवय करण्याव्यतिरिक्त Happy )

१. भीष्म :- भीष्म म्हणुन घेतलेला अभिनेता छानच आहे. शरिरयष्टी, आवाज, अभिनय सर्व भिष्माच्या पात्राला न्याय देणारे आहे.

२. धृतराष्ट्र :- चोप्रांच्या महाभारतातील धृतराष्ट्र त्यावेळी थोडा बोअर वाटलेला. आता घेतलेला धृतराष्ट्र छान वाटला. आंधळा असला तरी सम्राट म्हणुन असलेली मिजास, ऐट, स्वतःच्या वैगुण्याचा कोणी गैरफायदा घेउ नये म्हणुन सतत अलर्ट असणारे चेहरयावरील व मनातील भाव मस्त वठवले आहेत.

३. कृष्ण :- सुंदर भावपुर्ण गोड चेहरा, सौम्य स्मितहास्य, मधुर बोलणे म्हणुन हा कृष्ण मस्तच वाटतो. पण कधी कधी थोडा नाजुक साजुक, बायकी वाटतो. कृष्णाला चॉकलेट हिरो दाखविण्याच्या नादात त्याला पुरुषी दाखविण्यात कमी पडतात. खरे म्हणजे कृष्ण हा पुरुषोत्तम, त्या काळच्या सर्व योद्ध्यांमध्ये सर्वाधिक बुद्धिमान, बलवान व शुर होता. तो Tall, Dark, Handsome या कॅटेगरीतला Manly पुरुष दाखवला तर अधिक शोभुन दिसेल.

४. शकुनी :- उत्तम अभिनयाद्वारे हे कॅरेक्टर अगदी जिवंत केले आहे. बहिणीवर प्रेम करणारा, तिच्या दुखा:ने दुखी: होणारा, तिच्यावर झालेला अन्याय तिला व तिच्या मुलाला सत्ताप्राप्ती करु देउन दुर करु पाहणारा, त्यासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावणारा अश्या सर्व छटा मस्त वठविल्या आहेत.

५. कर्ण :- नविन महाभारतात घेतलेला कर्ण छान आहे. पण तो सर्व कौरव, पांडवांमध्ये वयाने मोठा दिसणारा, उंच व तगडया शरिरयष्टीचा, तेजस्वी, चेहरयावर शुर योद्ध्याचे भाव असणारा असा हवा होता त्यामानाने सध्याचे पात्र एवढे अपिलिंग वाटत नाही. दुर्योधन त्याच्यासमोर जास्त चांगला वाटतो.

६. अर्जुन :- सध्या घेतलेला अर्जुन छान आहे. पण अजुन छान घेता आला असता. थोडाफार कायपोछे मधल्या सुशांत सिंग राजपुतसारखा

७. युधिष्ठीर, भीम :- सध्यातरी दोन्ही पात्र चांगली वाटत आहेत. युधिष्ठीर व भीम पुढील एपिसोडमध्ये फोकस होतील तेव्हा कळेलच त्यांच्या कामगिरीबद्दल.

८. नकुल, सहदेव :- चोप्रांच्या महाभारतात या पात्रांना पुर्ण कच्चा लिंबु करुन ठेवले होते त्यामानाने आता थोडे अपिलिंग वाटतात. नकुल सर्व कौरव, पांडवांमध्ये सर्वाधिक देखणा होता त्यामानाने घेतलेला तरुण नकुल साधारण वाटतो. लहान नकुल खुप गोड होता.

९. द्रोणाचार्य, परशुराम :- दोन्ही मस्त आहेत.

१०. कृपाचार्य, विदुर :- कृपाचार्य साधारण वाटतात. विदुर छान आहे पण कधी कधी खुप थंड वाटतो.

११. दुर्योधन :- उंच, देखणा, उद्दाम, कुरु राजकुमारांमध्ये जेष्ठ म्हणुन शोभुन दिसतो.

१२. कुंती :- छान आहे, पण अभिनयात ठिक वाटते.

१३. गांधारी :- डोळ्यांवर पट्टी बांधलेली असली तरी तिच्या चेहरयावरील भाव खुप छान दिसतात.

कृपाचार्य, विधुर :- कृपाचार्य साधारण वाटतात. विधुर छान आहे पण कधी कधी खुप थंड वाट<<< अहो विदुर लिहा हो. बायको आहे अजून त्याची.... Happy

Pages