मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

Submitted by निमिष_सोनार on 9 November, 2013 - 03:10

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्जुनापेक्षा तर नकुल सहदेव पण मोठे दिसतात!!! Happy ते दोन जरा दिसायला बरे घ्यायला हवे होते. दुर्योधन सगळ्यात हॅण्डसम आहे.

कालच्या एपिसोडमधे कालय वन ऐकल्यावर नवरा म्हणाला "रावण कुठून आला इथे?"

ही द्रौपदी आहे? अरे देवा Sad

पायात अंतर पोझचं दिग्दर्शकालाच आकर्षण आहे की काय? Proud यांना तेजस्वी आणि चिडलेले यातला फरकच कळत नाही का? अंबा तर असह्य होती.

कृष्‍णाची कमरेवर हात ठेवून ती पोझ आणि बॅकग्राऊंडला ‘परित्राणाय साधूनां ’ हा श्र्लोक.एंट्री छान घेतली कृष्‍णाची.

हो ना ते नकुल सहदेव अजुन छान घेता आले असते. एवढया मोठया भारत देशात इतके सुंदर सुंदर चेहरे असताना इतका कंजुसपणा का बरे.... कर्णदेखील अजुन चांगला हवा होता. तो दुर्योधनासमोर थोडा साधा वाटतो कदाचित उंचीने व अंगकाठीने कमी असल्यामुळे वाटत असेल बाकी त्याच्या चेहरयावरील हावभाव चांगले असतात. दुशःला म्हणुन जी मुलगी घेतलीय ती सुभद्रा म्हणुन छान दिसली असती.

मला तो कालयवन राक्षस खुपच ओव्हर मेकअप वाटला. कलाकार मात्र चांगला आहे. मला आतापर्यंत घेतलेल्या सर्व स्त्री पात्रांमध्ये गांधारी, कुंती व दुशःला मस्त वाटल्या. द्रोपदी फोटोंमध्ये भरपुर मेकअप करुन सुंदर दिसल्यासारखी वाटत आहे. प्रत्यक्षात ज्यावेळी तिची कथा सुरु होईल तेव्हा कदाचित छान वाटेल. शेवटी ती महाभारतातील मुख्य पात्र आहे. तिची निवड विचारपुर्वकच केली असेल.

अरे हो परवा युधिष्ठिराचा युवराज म्हणुन अभिषेक झाल्यावर त्याचा जयघोष करताना राजकुमार युधिष्ठिर कि जय बोलण्याऐवजी युवराज युधिष्ठिर कि जय असे बोलायला हवे होते ना... आणि सर्व पांडव नेहमी मुकुट वगैरे घालुन रेडी असतात व कौरव पार्टी विथ कर्ण मात्र बहुतेकवेळा बिनमुकुटाचीच फिरत असते.

हो तो मला नेहमी प्रश्न पडत आला आहे. मुकुट सगळ्यांना सरसकट कसे काय. फक्त राजा, युवराज अशा टायटल असलेल्या लोकांनाच मुकुट हवेत ना. नाहीतर फरक कसा करणार.

कालचा एपिसोड मस्त होता. त्यातलं कृष्णाचं भजन मस्तच होतं. अर्जुनाला कृष्णबद्दल वाटणारा आदर आणि कुतूहल सही घेतलं होतं त्यामधे.

पल्लवी सुभाष रूक्मिणी म्हणून शोभते.

अर्जुन नंतर बृहन्नडेच्या भूमिकेत धमाल करणार आहे एकंदरीत.

कृष्ण तर बेष्टच जमलाय. मिश्किल चेहरे मस्त जमतात त्याला >>+१

तो अर्जुनाला या लग्नाबद्दल सांगतानाचा अख्खा सीन कॉमेडी होता. अर्जुनाचे एक्स्प्रेशन तर भारी होते.

मला आधी पल्लवी सुभाष "रुक्मिणी" म्हणुन कशी वाटेल याबद्दल शंका होती. कोणीतरी खुप सुंदर मुलगी घेतील असे वाटले होते. पण पल्लवी सुभाष देखील छान वाटते. अभिनयदेखील मस्तच. मला ती रुक्मिणी म्हणुन आवडली.

शाहिर शेखने स्त्रीचे काम मस्तच केले आहे. पुढे बृहन्नलाच्या कथेत मजा करणार हा.... त्याची उंची ६.२ आहे असे वाचले. ते दुर्योधन व कृष्ण त्याच्यासमोर कितीतरी उंच वाटतात. मग ते दोघे केवढे उंच असतील Uhoh सुभद्रा खुपच बुटकी वाटते कृष्णासमोर

अर्जुन नेहमी फक्त धनुष्य घेउन फिरत असतो. त्याला बाणांची आवश्यकता नाही. तो हवे तेव्हा धनुष्य समोर धरुन हवेत बाण निर्माण करतो. अरे याचे टेक्निक कोणीतरी जाउन याला विचारा. कितीतरी लाकुड,लोखंड व इतर धातुंची सेव्हिंग होईल Lol

बाकी रुक्मिणी स्वयंवर मध्ये अर्जुनाचा सहभाग होता हे कधी वाचले नव्हते. सिरीयलमध्ये आपल्याला हवी तशी महाभारताची कथा बदलतात. नविन पिढी ज्यांना मुळ महाभारत माहित नाही त्यांना हे सर्व खरेच वाटेल.

. कोणीतरी खुप सुंदर मुलगी घेतील असे वाटले होते. <<< पल्लावी सुभाष "खूप सुंदर मुलगी"नाहियेका ? Uhoh

पल्लवी मला सुंदर,स्मार्ट व प्रेझेंटेबल वाटते. पण "खुप सुंदर" अशी नाही वाटत किंवा ज्याप्रकारे कृष्ण सिरियलमध्ये जितका देखणा वाटत आहे तेवढा तो त्याच्या काही ऑफस्क्रिन फोटोंमध्ये नाही वाटला. त्यामुळे सिरियलमधील इतक्या देखण्या कृष्णाला पल्लवी शोभुन दिसेल का असे वाटत होते. पण मला वाटते तिने रुक्मिनीचे सौंदर्य, स्वभाव, तिला कृष्णाबद्दल वाटणारे आकर्षण, ओढ, भक्ती मस्तच दाखवले आहे.

श्रीकृष्ण फार मस्त आहे! तो छान आहे, की त्यावेळी लागणारं म्युझिक जास्त छान आहे, की संवाद हे समजत नाही इतकी ती भट्टी झकास जमली आहे! शिवाय अजून जोड द्यायला - त्याचं पितांबर आणि पिवळा शेला आणि अकूण वेषभूषा पण मस्त केली आहे!

मलाही हे नव्यानेच समजलं की अर्जुनाने रुक्मिणीला भेटून मदत वगैरे केली होती. किंबहुना, अर्जुन-कृश्णाची भेट कालयवन प्रसंगात होते हेही नव्यानेच समजलं.

अगदी खरे खरे खरे महाभारत फक्त व्यासांनाच माहीत असेल....
वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळी कथा आहे....
कोणत्याच दोन पुस्तकांमध्ये सारखी कथा नाही.

आज सुदर्शन चक्र फेकताना कृष्ण "रागावतो" सुद्धा हे समजले.
नाहीतर तो आतापर्यंत फक्त गोड गोड हसत होता, आणि खट्याळपणा करत होता.

मला पडलेले काही प्रश्न:

आज "रुक्मी" चे केस सुदर्शन चक्रा ने "कापनांना" का दाखवले नाही??
Direct कापलेले दाखवले.

तसेच:

कौरव पांडव स्पर्धे वेळी प्रवेशद्वाराचे अंगावर पडलेले दगड बाजूला "करतांना" अर्जुनाला का दाखवेल नाही?
Direct फोडलेले दगड आणि उभा असलेला अर्जुन दाखवला.
का ते सलमान स्टाईल वाटले असते म्हणून नसेल दाखवले??

आणि --

प्राणीप्रेमी संघटनांचे इतके भय की हा मासा कॉम्पुटर ग्राफिक्स द्वारा निर्मित आहे, हा विंचू ग्राफिक्स द्वारा निर्मित आहे, (अर्जुनाच्या तोंडावर बसणारी) माशी कॉम्पुटर ग्राफिक्स द्वारा निर्मित आहे असे सांगून ते त्या त्या प्रसंगाची मजा घालवत आहेत.??

बॅकग्राऊंड म्युझिक मधे किती वेळ घालवतात.
सुदर्शन चक्र त्याच्या बोटातुन निघुन रुक्मीपर्यंत पोचायला पुर्ण ५ मिंट.
सुरूवातीला रुक्मीणी आणि कृष्णाच्या भेटीला पुर्ण ५ मिंट.

प्राणीप्रेमी संघटनांचे इतके भय की हा मासा कॉम्पुटर ग्राफिक्स द्वारा निर्मित आहे, हा विंचू ग्राफिक्स द्वारा निर्मित आहे, (अर्जुनाच्या तोंडावर बसणारी) माशी कॉम्पुटर ग्राफिक्स द्वारा निर्मित आहे असे सांगून ते त्या त्या प्रसंगाची मजा घालवत आहेत.??<<< तसा नियम आहे!!!! हे असले यडपट नियम कुणाला सुचतात माहित नाही.

आजचा कृष्ण रुक्मिणीचा प्रसंग आवडला, पल्लवी सुभाषचा अभिनय सुंदर होता.

आज "रुक्मी" चे केस सुदर्शन चक्रा ने "कापनांना" का दाखवले नाही??
Direct कापलेले दाखवले.<<< सुदर्शन चक्राने कुणाचे तरी डोकं भादरताय अशी कल्पना करा. किती बेक्कार सीन असेल तो. त्यापेक्षा नंतर डायरेक्ट रूक्मी दाखवला तर त्याचा ईफेक्ट जास्त बसतो.

<<< सुदर्शन चक्राने कुणाचे तरी डोकं भादरताय अशी कल्पना करा. किती बेक्कार सीन असेल तो. त्यापेक्षा नंतर डायरेक्ट रूक्मी दाखवला तर त्याचा ईफेक्ट जास्त बसतो >>>

हा हा हा ... बरोबर !!
Happy

नाहीतर "या सिरीयल मधला पहिला वाहिला सुदर्शन चक्राचा उपयोग कृष्णाने कशासाठी तर म्हणे "या" साठी केला?" ... असे वाटण्याची तीव्रता जास्त झाली असती ....

मालिका योग्ञ त्या वळणावर जात नाहिये. ईथे अर्जूनास खूप मह्त्व दिले आहे.असे वाटते कि हि मालिका महाभाताविषई नसुन अर्जूनाविषई आहे. कर्णास खुप खालचा दर्जा दिला आहे.

त्या अर्जुनाचे उच्चार सुधारा नाहीतर डबिंग द्या त्याला. "वायाम" म्हणाला काल!!!

दुर्योधन व्हिलनगिरी मस्तच करतोय, मला जाम आवडतो तो. Happy

आता लाक्षागृह जाळल्यावर मग अज्ञातवास आणि हिडीम्बा वगैरे येणार ना!! भीम गायबच आहे कित्येक एपिसोड.

मी ही सिरीयल पाहत नाही..पण नॉर्मली सर्व ठिकाणी कर्णाला व्हिलन का केले जाते??? मृत्युंजय आणि राधेय वाचुन त्याच्यावर किती अन्याय झाला हे समजलं.....मग सिरियल वाले लोक पुस्तकं वाचत नसतील???

मृत्युंजय आणि राधेय वाचुन त्याच्यावर किती अन्याय झाला हे समजलं.....मग सिरियल वाले लोक पुस्तकं वाचत नसतील>>> तुम्ही म्हणताय त्या दोन्ही "कादंबर्‍या" आहेत, ज्यात कर्णाला लार्जर दॅन लाईफ असं रंगवलंय. ते ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून नेहमीच प्रमाण मानता येत नाहीत.

मुळात कर्ण चांगला होता, अन्याय झाला हेही खरं, पण दुर्योधन आणि इतर कौरव चुकीच्या मार्गाने जातायत हे सतत कळूनही तो मित्रप्रेम/ दुर्योधनाला पहिल्या भेटीत दिलेली मैत्रीची शपथ आणि त्यासाठी सगळं आयुष्य कारणी लावणं या गोष्टी तोही करतच राहिला. वचनपूर्तीसाठी का असेना, पण अधर्माचीच बाजू घेत राहिला. ऐतिहासिक सिरिअल काढताना ललित लेखन/ कादंबरी किंवा तत्सम साहित्यात असतात त्याच आणि एवढ्याच गोष्टी पुरेशा नसतात. व्यक्तिरेखेचा अभ्यास वस्तुनिष्ठ पद्धतीने करावा लागतो, किंबहुना तसा तो केला जावा ही अपेक्षा असते.

मालिका सेट आणि काही पात्रनिवड (दुर्योधन, धृतराष्ट्र, शकुनी, कृष्ण वगैरे) या बाबत ठीक आहे.काहि प्रसंग उत्तम जमून पण आले आहेत. मात्र बलराम आणि नकुल सहदेव जोडितला एक नग खरे तर कौरवात शोभाले असते.तसेच पाणी लावणे/ लांबवत राहणे हे प्रकार जास्त आहेत. रोज एक एपिसोड असल्याने यांनी अनावश्यक गोष्टी पण जास्त वाढवत नेल्या आहेत.

बाकी हे नॉर्थ इन्डियन लोकांचे काही उच्चार पण जबराट असतात. कालयवनचा उच्च्चार कालय वन पासून काल्यवन, काल्येवन असा काहीही केलाय. दिल्लीमध्ये मी काही ठिकाणी हिमाल्या (हिमालय) आणि मेट्रो मधील उद्घोषणेमध्ये केंद्रीय सचिवाल्य (सचिवालय) असले काही उच्चार ऐकले आहेत.
अवांतर : अब तक छप्पन मध्ये पण असेच एकाला नाना वेशाली नाही तर वैशाली असा नीट उच्चार करत जा असे समाजावतो ते आठवले.

मृत्युंजय आणि राधेय वाचुन त्याच्यावर किती अन्याय झाला हे समजलं.....मग सिरियल वाले लोक पुस्तकं वाचत नसतील>> कुठल्याही सीरीयलपेक्षा या सीरीयलची रायटींग टीम फार स्ट्राँग आहे. सलिम खान यांनी प्लॉट रचनेमधे सहाय्य केलेले आहे. कादंबरी किंवा इतर सहित्यापेक्षा मूळ महाभारताला बेस मानून केलेले लिखाण आहे, तरीही काही प्रसंग बदलले आहेत हे समजतं.

कर्णाच्या अन्यायाबद्दल एक अख्खा एपिसोड खाल्ला होता या सीरीयलमधे. त्यामधे कर्णाच्या तोंडून प्रचलित जातीव्यवस्थेवरती प्रचंड ताशेरे ओढले होते. कृष्ण रूक्मिणीच्या एपिसोडमधे पण "स्त्री कोइ संपत्ती नही" वगैरे विचारदेखील मांडले होते. मूळ महाभारत थोडेसे बदलून, स्पेशल ईफेक्ट्स जास्त घालून बनवलेले असले तरी काहीकाही प्रसंग विचार करायला प्रवृत्त करणारे आहेत. पूर्वी येणारे कृष्णाचे स्वगत तर पुन्हा पुन्हा ऐकावं असं होतं.

कर्णाच्या व्यक्तीरेखेचा टर्निंग पॉइन्ट येतो द्रौपदी स्वयंवरामधे. तोपर्यंत त्याची आणि अर्जुनाची केवळ स्पर्धा असते, त्या प्रसंगानंतर कर्णाच्या मनामधे पांडव आणि द्रौपदी याबद्दल प्रचंड द्वेष तयार होतो. नंतर वस्त्रहरणच्या प्रसंगी तो द्वेष उफाळून येतो. जरी कर्ण मुळात वाईट असला नसला तरी या प्रसंगामुळे तोदेखील अधर्मीच वागतो.

Aawadla aajcha bhag....emotional hota pan masta
Krishna Arjunala future safetysathi masta hint det rahato
Aayushyat devachi aashi sath mirali tar ajun kay hawe
Arjun kharokhar bhagyawan aahe

तोदेखील अधर्मीच वागतो..

माझा तर फारच गोंधळ उडाला आहे. फक्त दुर्योधन इ. च अधर्म करतात की दुसर्‍या बाजूचे लोक पण?
विशेषतः भीष्माने चार बायकांच्या आयुष्याचे वाटोळे केले त्याला त्याने स्वतःच धर्म म्हणून घोषित केले. मग कर्ण, दुर्योधन यांनीहि स्वतःच स्वतःला पटेल त्याला धर्म मानले तर माझी तर काहीच हरकत नाही.

कर्णाला दुर्योधनाचा धर्म फारसा पसंत पडत नाही असे दिसते. पण त्याला राजा केल्याने त्याच्या मनाचा गोंधळ उडाला असावा.

या गोष्टीत धर्म वगैरे काही नाही. चक्क सत्तेचे राजकारण, स्वार्थ याची गोष्ट आहे.

पण एकूण गोष्ट मात्र अजरामर रहाण्या इतकी माईंड बॉगलिंग नि ग्रिपिंग आहे.

एकूण गोष्ट मात्र अजरामर रहाण्या इतकी माईंड बॉगलिंग नि ग्रिपिंग आहे.<<<<<< +१

भीष्माने चार बायकांच्या आयुष्याचे वाटोळे केले त्याला त्याने स्वतःच धर्म म्हणून घोषित केले. मग कर्ण, दुर्योधन यांनीहि स्वतःच स्वतःला पटेल त्याला धर्म मानले तर माझी तर काहीच हरकत नाही.
<<<<<<<<

मला तरी भिष्माने कोणाच्या आयुष्याचे वाटोळे केले असे वाटत नाही. एकतर तो राजा शंतनुनंतर कुरु घराण्यातील कर्ता पुरुष होता. तसेच त्याने जी प्रतिज्ञा केली होती त्याला अनुसरुन त्याला जे जे शक्य होते ते त्याने केले. आता सत्यवतीच्या व तिच्या मुलांच्या, नातवांच्या नशिबातच राज्यसुख आनंदाने भोगणे लिहीले नव्हते त्याला तो काय करणार. घराण्याला वारस हवा म्हणुन राजकुमारांची लग्ने लाउन देणे. त्यासाठी स्वंयवरात जाउन राजकन्या जिंकुन आणणे असो किंवा आपल्या आंधळ्या पुतण्यासाठी गांधारसारख्या दुरदेशी राज्यातुन सत्तेच्या पुण्याईवर मुलगी दयायला भाग पाडणे असो. भिष्माने फक्त आपले कर्तव्य केले. पुढची पिढी तयार करण्यासाठी राजकुमार कितीही कर्तुत्वहिन असले तरी त्यांची लग्ने लाउन देणे हे काम भिष्माने चोख बजावले. पुढे कौरव-पांडवांच्या काळात राजकुमार स्वतःच इतके शुर व बलशाली होते कि त्यांनी स्वतःच्या कर्तुत्वावरच राजकन्यांशी विवाह केले.

कर्ण, दुर्योधन यांनीहि स्वतःच स्वतःला पटेल त्याला धर्म मानले तर माझी तर काहीच हरकत नाही.
<<<<<<

एक तर मला कधी कधी प्रश्न पडतो कि मोठया मुलाचा मोठा मुलगा हा राजा बनतो असे बहुतेकदा गृहितक असते. तर दुर्योधन राजा बनने योग्य होते. धृतराष्ट्र व पांडुच्या काळात धृतराष्ट्राच्या आंधळेपणामुळे पांडु राजा बनतो. पण पुढे त्याच्या मृत्युनंतर इतर पर्याय न उरल्यामुळे धृतराष्ट्र राजा बनतो. आता त्याचा मोठा मुलगा दुर्योधन व्यंगविरहित व शुर असतो मग त्याला राजा बनवला तर बिघडले कुठे? पण आता युधिष्ठिर सर्व भावंडात मोठा म्हणुन युवराज बनतो. सर्वात बलशाली किंवा हुशार राजपुत्र बघितले असते तर भीम व अर्जुनदेखील चांगले पर्याय होते.

आता धर्म-अधर्म बघितले तर मला तरी पांडव नेहमी नितीने, सत्याने वागणारे, उगाच भांडण उकरुन काढण्याच्या भानगडीत न पडणारे वाटतात . लहानपणापासुन पित्याला सम्राट बघितल्यामुळे मीच भविष्यातील सम्राट आहे असे दुर्योधनाचे प्रबळ मत असणे व पांडुपुत्रांच्या आगमनाने त्या मताला सुरुंग लागणे इथपर्यंत समजु शकतो. पण पुढे शकुनी, दुर्योधन मिळुन सत्तेसाठी जे जे काही प्रकार करतात व कर्णाला देखील स्वतःच्या उपकाराखाली दाबुन ठेवुन अनितीत भाग घ्यायला बाध्य करतात त्यावेळी ते अधर्मच करतात. मग त्यात कुंती व पांडवांना वारणावतात मारुन टाकण्याचा प्रयत्न करणे, वनवासात पाठवणे,कमीतकमी सत्ता म्हणुन पाच गावे देखील न देण्याची भाषा वापरणे, पांडवांच्या पट्टराणीचा भर सभेत नीचरीतीने अपमान करणे हे सर्व अधर्मच आहे.

मला तरी महाभारत धर्म-अधर्माचे युद्धच वाटते. त्यात कृष्णाच्या पाठबळाने पांडवांचा विजय हा धर्माचाच, नितीचा, सत्याचाच विजय वाटतो. मात्र या युद्धात पांडवांनीदेखील राज्यसत्ता सोडुन काहीच कमावले नाही. पुत्र-पौत्र मृत पावले. वृद्ध स्त्री-पुरुष व विधवा स्त्रिया यांच्यावर राज्य करण्याची पाळी आली.

मला तरी महाभारत धर्म-अधर्माचे युद्धच वाटते. त्यात कृष्णाच्या पाठबळाने पांडवांचा विजय हा धर्माचाच, नितीचा, सत्याचाच विजय वाटतो. >> साफ चूक .
फक्त जास्ती हुशार लोकानी मिळवलेला विजय इतकाच .
फक्त त्यासाठी कृष्ण हा माणूस होता (अतिशय हुशार ) हे मानण महत्वाच होत , तो देव , त्याने केल्या त्या लीला , अस म्हटल की विषयच संपला .
भीष्म , द्रोण , कर्ण , दुर्योधन प्रत्येकाला या ना त्या प्रकारे अधर्मानेच मारलय .
वस्त्रहरण चूकच , पण माझ्या मते तरी स्वतःच्या बायकोला जुगारात डावावर लावणारा नवराही तितकाच (किंबहुना जास्त ) दोषी आहे .

Pages