मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

Submitted by निमिष_सोनार on 9 November, 2013 - 03:10

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भैरप्पांच्या "पर्व" मधे १०० कौरवांच्या संख्येचे पटेल असे विवरण आहे शिवाय त्यात मुली नसण्याचे पण कारण आहे. सगळा वाद हा औरस आणि अनौरस पुत्र असाच होता. त्या दृष्टीने सर्व कौरव औरस होते.

मै Proud

नियोग त्याकाळी सर्वमान्य होती, पण नंतर त्याला "सभ्यतेचे बुरखे" चढवायला असे काहीएक चमत्कार घातलेत लोकांनी.

हे जरा अवांतर होईल पण महाभारत बघताना मला जाणवले कि पांडुच्या दोन्ही राण्या फक्त पुरुषदेवतेचे आवाहन करतात. त्यांना फक्त पुत्र हवे असतात. कोणीच कन्येचा विचार करत नाही अरेरे . कोणीच दुर्गा, लक्ष्मी,सरस्वती या देवतेंचे आवाहन करुन त्यांच्यासारखी स्त्री संतती मागत नाहीत.>>
अहो, मूळ महाभारताची कथा तशी आहे, म्हणून निर्मात्यांनी तसे दाखवले. त्यांनी जर त्यात मोडतोड करून सरस्वत, लक्ष्मीचे वरदान दाखवले असते, तर आपणच चॅनलचे ऑफिस नसते का फोडले? उलट आहे त्या कथेला नावीन्यपूर्ण पध्दतीने सादर करणयचे खूप मोठे आव्हान दिग्दर्शकापुढे होते. त्यातही त्याला बीआर चोप्रांच्या महाभारताशी तुलना करण्याचा मोठा धोका होता. पण, मला वाटते, निर्माता, दिग्दर्शकांनी हे आव्हान यशस्वीरित्या पेलले आहे. सर्वांना माहिती असूनही, हे महाभारत नव्याने आपल्यापुढे येते.

मैत्रेयी Proud Lol

@ टोच्या

साहजिकच कथा ५००० वर्षांपुर्वीची आहे व त्या काळात जे अनुकुल होते, समाजमान्य होते त्याप्रमाने संतती निर्माण केली गेली. मग नंतरच्या काळातील लोकांना त्यात काही अश्लील किंवा अनैतिक वाटले त्याप्रमाने त्यांनी या कथेला वर, शाप, चमत्कार यांचा मुलामा दिला. मला खटकते एवढेच कि त्या काळी देखील समाज फक्त मुलगा, मुलगाच करत बसायचे व अजुनही तेच चालु आहे. त्यात महाभारताला किंवा तो समाजासमोर एवढी मेहनत घेउन सादर करणारया लोकांवर टिका करत नाही आहे तर समाजाचे विचार अजुनही तसेच आहेत जसे कि ५००० वर्षांपुर्वी... एवढाच त्याचा अर्थ.

बाकी वर सांगितल्याप्रमाने नविन महाभारत आम्हाला आवडले बुवा.

यशस्विनी, छान विवेचन. फक्त अंबा ही स्त्री सामर्थ्यवान, न घाबरणारी, न रडणारी, नि काही झाले तरी अपमानाचा, अन्यायाचा बदला घ्यायला अपार कष्ट करणारी दाखवले आहे. प्रत्यक्ष भीष्माशी वैर घेण्याचे धैर्य तिच्यात आहे. दुर्दैवाने ती तिच्या आयुष्यात यशस्वी झाली नाही. पण एक सामर्थ्यवान स्वतंत्र स्त्री म्हणून तिचे कौतुक वाटते. प्रश्न सूड घेणे योग्य आहे की नाही यापेक्षा एक न रडणारी स्त्री दाखवली आहे हे पाहून बरे वाटले. पहाताना बरेचदा तिची बाजू खरी वाटू लागते.

कर्ण सुद्धा चांगलाच दाखवला आहे. त्याच्यावर अन्याय होतो आहे हे जाणवते आहे,

शकुनि मात्र कमालीच्या बाहेर वाईट दाखवला आहे,

तसेच दुष्यंताबद्दल मात्र प्रचंड राग आला. स्वतःला शिकलेला, जबाबदार राजा म्हणवतो नि स्वतःच्या केवळ कामुकतेपायी राज्याचे वाटोळे करतो! सत्यवती काय, ती साधी कोळीण होती, ती काय म्हणते, त्याचे परिणाम काय होतील हा विचार एका राजाने करायला नको का? विशेषतः त्या वेळेपर्यंत त्याला भीष्म व त्याची योग्यता याची पूर्ण माहिती झाली होती. त्याच्याखेरीज राज्याचा उत्तराधिकारी होण्याला कुणिहि योग्य नव्हता, हे त्या दुष्यंताला कळत नाही?

बाकी महाभारत, रामायण बद्दल बर्‍याच लोकांना बरेचदा वाटते की काही व्यक्तींच्या बाजूने बराच पक्षपात करून त्यांनी केलेल्या चुका सुद्धा बरोबरच होत्या असे युक्तिवाद केलेले आहेत.

या सर्वात मला कृष्ण काय सांगतो ते फार आवडते, तो फक्त तत्वज्ञान सांगतो, अर्जुनाने केले म्हणून बरोबर नि दुर्योधनाने केले म्हणून चूक असले काहीतरी म्हणत नाही.

>> दुष्यंताबद्दल मात्र प्रचंड राग आला. स्वतःला शिकलेला, जबाबदार राजा म्हणवतो नि स्वतःच्या केवळ कामुकतेपायी राज्याचे वाटोळे करतो! सत्यवती काय

शंतनू ना?

मी बघतो. पण दुष्यंत व शंतनू मधे जरा घोटाळा झाला. बाकी दुष्यंतहि तसलाच. आधी भानगड केली नि शापाचे भंकस कारण सांगून त्यातून निसटायचा प्रयत्न करत होताच.

मला आपले तत्वज्ञान पटते पण असल्या गोष्टी पटत नाहीत. उगाच आपले जिंकले म्हणून त्यांची स्तुति करायची!

दुष्यंत व शंतनू मधे जरा घोटाळा झाला. बाकी दुष्यंतहि तसलाच. आधी भानगड केली नि शापाचे भंकस कारण सांगून त्यातून निसटायचा प्रयत्न करत होताच.>> झक्की Lol

कृष्णाचे अधून मधून येऊन बोलणे मला पण आवडतं. सहज साधं निवेदन दिलंय त्याला.

या आठवड्यात सर्व सीनीअर सिटीझन्स दाढीमधे दिसाय्ला लागले. भीष्मपितामहांची दाढी हेअर स्पा केल्यागत दिसत होती.

कर्ण जरा अजून गुड लुकिंग हवा होता असं वाटलं. तरी बघू अजून कितपत इवॉल्व होतोय तो जो कोण अ‍ॅक्टर आहे तो. अर्जुन पोस्टर वर पाहिलाय, छान आहे तो.
पुनित इस्सार मला आधी पूर्वीच्या दुर्योधनाच्या भूमिकेत आठवत असल्यामुळे परशुरामाच्या भूमिकेत कसा वाटेल अशी शंका होती पण तो फार म्हणजे फारच फिट दिसलाय त्या भूमिकेत! मस्त आहे त्याचा स्क्रीन प्रेझेन्स!

नवीन महाभारत मला पण आवडतं . न चुकता बघते मी !
बाकी शंतनू बद्दल मला पण तसंच वाटलं होतं जसं झक्कींना वाटलं.
तो छोटा नकुल पण गोड आहे.

समाजाचे विचार अजुनही तसेच आहेत जसे कि ५००० वर्षांपुर्वी... एवढाच त्याचा अर्थ.>>
तेव्हाही दुष्ट लोक होते, आताही आहेत. तेव्हाही स्वार्थ, काम, क्रोध, लोभ, होताच आताही आहे. फक्त तंत्रज्ञान बदलतंय. मानवी भावभावनांमध्ये बदल होणे शक्यच नाही. मुलगा तेव्हा राजा बनू शकत होता, मुलगी झाली असती तर ती दुसर्याच्या घरी गेली असती. तिने राज्य सांभाळले नसते. कुरुराज्याला राजा देणे ही शपथ भीष्माने घेतली होती. त्यामुळे त्यांना पुत्र हवा होता. पांडवांचा जन्मही याच उद्देशातून झाला होता, असे दिसते.

आज सगळ्यांच्यात "प्रतियोगिता" होणार आहे. धृतराष्ट्र आणि शकुनी यांना "प्रदर्शन" नको आहे...
आज सगळे पांडव आणि कौरव बहुतेक मोठे झालेले चेहेर्‍यांसह दाखवणार असे वाटते....
खूप उत्सुकता आहे...

कालच्या भागात (जेव्हा अश्वत्थामा कौरव पांडवांचे नाव लाकडी चक्रावर कोरत असतो तेव्हा) द्रोण आणि अश्वत्थामा यांच्यात "मैत्री" बद्दल जो "सं(वाद)" झाला त्यातले विचार परत परत ऐकण्या जोगे. चिंतन मनन करण्याजोगे आहेत.एपिसोड चुकला असेल तर ऑनलाईन पहा बरे का!!

महाभारताची निर्माते, लेखक या सह कलाकार हे सगळे अक्षरश मन लावून काम करत आहेत आणि महाभारत "जगत" आहेत असे मला वाटते आणि ते दिसून ही येत आहे....

बरं, मी लिहिलेल्या एका निरिक्षणाबद्दल कुणाची अजून प्रतिक्रिया आलेली नाही:
मी लिहिले होते की:

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

मी आज बघितले रात्री ११ वाजता. अर्धा तास कमी वाटतो, सलग एक तास हवे होते. दुर्योधन पुनीत इस्सारने केलेला मला जास्त आवडला, शकुनीचे दात विचित्र दाखवले आहेत, थोडा अतिरंजित वाटतो आधीच्या गुफी पेंटलपेक्षा.

एकंदरीत आवडला मला आजचा भाग, आता रोज बघेन.

फालतू सिरीयल.

जरासा भाग पाहिला, निव्वळ माकडचाळे. अरे हेच दाखवायचे असेल तर सीआयडी मधून दया, अभिजित आणि मोठा माकुर (शब्दसौजन्य - आगरी रामायण) डॉक्टर साळुंखेला तरी आणा. आईशप्पथ एक एपिसोड चुकवणार नाही Proud

काल 'प्रतियोगीता' पाहिली. काय ती एकेकाची एन्ट्री !
ट्रिम्ड दाढी राखणारा दुर्योधन येतो क्रिश सारखा.. तीन हत्तींच्यावरून लाँग जम्प घेत. नकुलला एक मोठा पक्षी उचलून आणतो आणि आकाशातून खाली 'टाकतो.' सहदेव येताच त्याचे सोनेरी शूज स्किड करत येतो आणि रजनीकांत स्टाईल ठिणग्या उडतात. युधिष्टीर भाल्यावर बसून हवेत उडत जमिनीवर आलेला दाखवला आहे. अरे तो युधिष्ठीर आहे की हॅरी पॉटर? Uhoh

तंत्राचा मूळ कथानकाला पूरक असा प्रभावी वापर करणे आणि तंत्राला शरण जाऊन नुसतीच चमकोगिरी करणे यातला फरक कळला पाहिजे. आपण नुसत्या चमचमाटाला भुलतो. चोप्रांच्या महाभारताचे सेट्स आणि स्पेशल इफेक्ट्स बाळबोध असतील, पण त्यांनी उभे केलेले कॅरेक्टर्स कितीतरी प्रभावी होते. मी लहानपणी पाहिलेल्या त्या महाभारतातील अनेक कॅरेक्टर्स आजही जशीच्या तशी आठवतात.
या महाभारतातील सुरूवातीचे काही भाग चांगले वाटले होते, पण कालच्या भागानंतर मूड गेलाच एकदम.

@दिनेशदा- 'पर्व' बद्दल तुमच्याशी सहमत. महाभारताचे मनाला सर्वाधिक पटणारे वर्जन आहे 'पर्व' म्हणजे. केवळ अद्वितीय कादंबरी ! खरं तर त्या पुस्तकावर बेस्ड काहीतरी बनले पाहिजे. पण आपल्याकडे अद्याप असे काही व्हायला अवकाश आहे असे दिसते एकूण.

मलापण harry potterसारखी युधिष्ठिराची entry वाटली. तंत्रज्ञानाबद्दल तुम्ही म्हटले ते मला पटले ज्ञानेश.

ज्ञानेश, संपूर्ण सहमत! चोप्रांच्या महाभारताची मोहिनी अजूनही राहिलीये हे खरय. उद्या खरा कृष्ण जरी समोर आला तरी मी त्याला कदाचित नितिश भारद्वाज च्या रूपात यायला सांगीन. ह्या नविन महाभारताचे सुरुवातीचे काही भाग बघितले होते, पण स्पेशल ईफेक्ट्स चा अतिरेक / ऑब्सेशन अंगावर आलं होतं. दुसरं म्हणजे सगळेजण एकदम मॉडेल वाटले होते, कॅरेक्टर नाही. आणि भव्यतेचा अतिरेक झाल्यामुळे ते भयानक वाटलं होतं. (बिरबलाच्या गोष्टीतलं फरशीएवढं माणिक आठवलं).

भगवान श्रीकृष्णांचा जयघोष करणारे हे छोटेसे गीत इतके कर्णमधुर व अप्रतिम संगितबद्ध केले आहे की अहाहा.... किती वेळा एकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते... बासरीचे सुर तर अगदी सुमधुर व त्याला मिळालेली टबल्याची साथ तर मस्तच, शेवटी केलेला शंखध्वनी गाण्याला पुर्णत्वाला नेतो. एकदा तरी ऐकाच मायबोलीकरांनो Happy

मला हे गाणे मुळ स्वरुपात हवे आहे. स्टारप्लसच्या वेबसाईटवर हा विडियो नाही आहे. तरी सध्या या लिंकवरुन एकते.

http://www.youtube.com/watch?v=G6iMnbY9ySI

हा अख्खा आठवडा फुकट घालवला त्या पांडवांच्या एन्ट्रीमधे. आधी म्हटलं तसं स्पेशल ईफेक्टचा अतिसोस चालू आहे.

आता पुढे बघू.

मला वाटले मधेच एकदा कृष्ण येऊन म्हणेल, पुरे करा हा पांचटपणा. पुढे सरकवा इश्टोरी! पण कसले काय? पब्लिकला जे आवडते तेच देणे हे त्यांचे काम उगाच विचार कीजीये म्हणणारी माणसे नकोतच मधे मधे.

महाभारत असो नाहीतर हिंदी सिनेमा असो, आपली दे दनाद्दन मारामारी, चांगल्या सजवलेल्या, मेकप केलेल्या बायका शक्य तितक्या कमी कपड्यात दाखवल्या की जाहीरातदार एकदम हजारो कोटी रुपयांच्या जाहिराती देतील.

लोकांचे भले करायला इतर अनेक आसाराम बापू आहेतच.

या प्रतियोगिता भागातले स्पेशल इफेक्ट्स आवडले नाहीत. अजिबात सफाईदार आणी बिलिव्हेबल नव्हते!! नेहमीचे एक्सपर्ट्स सुट्टीवर असल्याने तात्पुरते बी आर चोप्रा काळातले लोक येऊन काम आटपून गेल्यासारखे वाटले.
दुर्योधन, नकुल , भीम, अर्जुन छान दिसताय्त त्या त्या रोल मधे.

Pages