मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

Submitted by निमिष_सोनार on 9 November, 2013 - 03:10

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नकुल, सहदेव :- चोप्रांच्या महाभारतात या पात्रांना पुर्ण कच्चा लिंबु करुन ठेवले होते >>
नकुल अन सहदेव कच्चा लिंबूच आहेत महाभारतात . केवळ त्यांच्यावर आधारीत एक तरी गोष्ट आहे का महाभारतात ?

आरव चौधरीने भीष्मांचा आब राखलाय. मला सर्वात आवडला तो लहानपणीचा दुर्योधन. अप्रतिम अदाकारी. आणि सध्याच्या शकुनीमामाने गुफी पेंटलला विसरायला लावले, इतका तो भूमिकेशी एकरूप झालाय. मस्तच. चोप्रांच्या महाभारतातले कौरव, पांडव हे त्यावेळी तीशी-चाळीशीत होते. पोक्त असल्यामुळे ते शोभून दिसत होते. पंकज धीर, दुर्योधन यांची तर खास छाप होती.

मला बै दुर्योधनाचे केसांचे हायलाइट्स भारी आवडले!
<<<<<<< मला देखील त्याचे केस आवडले... मस्त कुरळे कुंतल

सध्या तरी कृष्ण आणि शकुनीचे उच्चार आवडलेत मला.<<< +१

आरव चौधरीने भीष्मांचा आब राखलाय. मला सर्वात आवडला तो लहानपणीचा दुर्योधन. अप्रतिम अदाकारी <<<< +१

नकुल अन सहदेव कच्चा लिंबूच आहेत महाभारतात . केवळ त्यांच्यावर आधारीत एक तरी गोष्ट आहे का महाभारतात ?<<<<<<

नाही केदार... मी महाभारतातील त्यांच्या कामगिरीच्या अर्थाने त्यांना कच्चा लिंबु नाही बोलले, तर चोप्रांच्या महाभारतात जे कोणी नकुल-सहदेव म्हणुन घेतलेले ते केवळ राजकुमार म्हणुन देखील अपिल होत नव्हते. खुपच साधारण व्यक्तिमत्वाचे वाटत होते. त्यामानाने आता घेतलेले नकुल सहदेव जास्त चांगले वाटतात. त्यांना लहान व मोठे दाखविताना पुर्ण वाव दिलाय. नुसते मोठया तीन पांडवांच्या बाजुला उभे करायचे म्हणुन अजुन दोन कोणतरी एवढाच वावर नाही दाखवलाय त्यांचा.

होय, दुर्योधन अगदीच देखणा आहे. रोलमधे पण शिरलाय. लहान दु.चे चपटे नाक आता छान नीट झाले आहे. Happy

द्रौपदी ती? फेबु.वर जळताना दाखवलीये ती? खरच ताई वाटते की. पाहुया आता वाट तिची.

कृष्णा, हायटाईम, आवाजात वजन आण बाबा मालिकेत प्रत्यक्ष पात्राच्या रुपात प्रवेश करण्याआधी नाहीतर बालीश वाटत रहाशील. तो भारद्वाज कसा होता बघ.

विदुर-विधुर >>> यशस्विनी Lol

कृष्णाबद्दल सगळ्यांशी सहमत. दिसतो छान, बोलतोही छान.
हे या मालिकेबद्दल नाही म्हणत मी फक्त, पण एकंदर सगळीकडेच कृष्ण, जो मुळात 'कृष्ण' आहे, तो इतका गोरापान का दाखवतात? Happy

जो मुळात 'कृष्ण' आहे, तो इतका गोरापान का दाखवतात?>>
कल्पना करा, कृष्‍ण्‍ा अगदी आफ्रिकन लोकांसारखा काळा कुळकुळीत दाखवला तर.:अओ: बघायला कसे वाटेल?
आणि महाभारतातील इतरही पात्रे सुंदर आणि सिक्स पॅकवालीच होती आणि ‌स्त्रिया सर्वच कमनीय बांध्याच्या होत्या, असे थोडेच आहे. पण तरीही तसं दाखवतातच ना?

"टोच्या" यांची कानटोचणी आवडली..>>
धन्यवाद निमिष सोनार. (खरं तर ‘सोनारा’नेच कान टोचायला हवे, नाही का? :))

कृष्ण काही अफ्रिकन काळा नव्हता. तो भारतीय संदर्भाने काळा होता. तसा दाखवला तर चालेल, मला तरी. Happy
'सगळेजण सिक्स पॅक' हा ट्रेन्ड आताच्या टीव्हीवरल्या महाभारतात आहे. चोप्रांच्या महाभारतात भीम, दुर्योधनादी शूरवीर वगळता बाकीचे नॉर्मलच दिसत. द्रौपदी वगळता बाकीची स्त्री पात्रेही जशी असावी तशी दिसत.
त्याआधी रामायणातही हनुमान (दारासिंग) वगळता बाकी राम-लक्ष्मणाची शरीरयष्टी सर्वसामान्य होती. आता रामायण बनले तर तेही सिक्स पॅकमधेच येतील. Happy

जाऊ द्या. गंमतीत विचारले होते मी.

कृष्‍ण्‍ा अगदी आफ्रिकन लोकांसारखा काळा कुळकुळीत दाखवला तर

कृष्ण श्याम म्हणजे तापलेल्या सोन्याच्या वर्णाचा होता. काळा हा अर्थ कुणि काढला माहित नाही. उगाच कवितेसाठी निळा सावळा वगैरे बनवले आहे त्याला!

सिक्स पॅक अ‍ॅब्स हा भंपकपणा आहे. आमचे तर १२ चे पॅक होते, पण अवयवस्थित माणसासारखे पसरून ठेवण्यापेक्षा, आवरून घट्ट गाठोडे बांधून ठेवत होतो. लोक उगाचच ढेरपोट्या म्हणायचे! खरे तर भारतात ढेरपोट्या म्हणजे श्रीमंत माणूस असे समजले जायचे. आता चांगले खायला मिळते आहे तर उगाच डायेट वगैरे करून खपाटी पोट करायचे, कसली ही आवड!

डीडीवनवर बालाजीची सीरीयल (एकताचा बालाजी नव्हे, तिरूपतीचा वरिजिनल बालाजी) त्यामधे बालाजी बादलीभर निळीमधे बुचकळून काढल्यासारखा निळाजांभळा दाखवला होता. शिवाय लाल लिपस्टिक वगैरे.... त्यापेक्षा हा गोरा कृष्ण परवडला.

आजच्या आणि कालच्या एपिसोडमधला कर्ण आणि कुंतीचा सीन मस्त होता. फुल्लटू मसाला स्टाईलने लिहिलेला सीन होता. पण सुंदर लिहिला होता. कर्णाचे काम त्या सीनमधे आवडले.

उद्या सुभद्रा एन्ट्री करत आहे. द्रौपदीच्या आधीच सुभद्रा?????

मला अर्जुन खूप आवडला, नव्या नावाच्या सिरियलमध्ये त्यानेच अनंत हा नायक रंगवला होताना, तेव्हापण मला तो आवडायचा. सुभद्रा ठीक आहे, बालिका-वधु मध्ये बघितल्यामुळे, कोणीतरी फ्रेश घ्यायला हवी होती असे वाटते.

कालचा भाग आवडला... सर्वजण एकदम "Tit for Tat" वागत आहेत. सुभद्राचे अर्जुनावर प्रेम असते, तिला अर्जुनाविषयी आकर्षण कसे निर्माण होते हे दाखविण्यासाठी कदाचित तिला आतापासुन दाखवत आहेत.

बालिका-वधु मध्ये बघितल्यामुळे, कोणीतरी फ्रेश घ्यायला हवी होती असे वाटते. <<< +१

हे गोरेपणाचे आकर्षण मला वाटते इंग्रजांच्या काळापासुन जास्तच वाढले. गोरे म्हणजे हुशार, सुंदर असे काहीतरी. महाभारतात कृष्ण, अर्जुन, द्रोपदी हे सावळ्या वर्णाचे (काळ्या नव्हे) होते असे सांगितले आहे तरी हि तिन्ही पात्रे त्यावेळची सर्वाधिक लोकप्रिय होती.

मला वाटते तापलेल्या सोन्याप्रमाने असणारा वर्ण म्हणजे गौरवर्ण जो राधेचा होता.
कारण तिचे वर्णन " तप्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी, वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये" असे आहे.

त्या अर्जुनाला मुकुट घालू नका ब्वा, त्याचे केस कसले स्सही आहेत!! त्याच्या चेहर्‍याला शोभणारे. नकुल सहदेवला विग कसले घाण दिलेत. त्यापेक्षा त्यांना पण केस वाढवायला सांगायचं ना!!

द्रौपदी म्हणून मला नंदिता दास बघायला आवडेल. द्रौपदीचं वर्णन तिला परफेक्ट मॅच होतं.

झक्की,
सिक्स पॅक अ‍ॅब्स हा भंपकपणा आहे. आमचे तर १२ चे पॅक होते, पण अवयवस्थित माणसासारखे पसरून ठेवण्यापेक्षा, आवरून घट्ट गाठोडे बांधून ठेवत होतो. लोक उगाचच ढेरपोट्या म्हणायचे! >> Biggrin

नंदिनी,
आजच्या आणि कालच्या एपिसोडमधला कर्ण आणि कुंतीचा सीन मस्त होता. फुल्लटू मसाला स्टाईलने लिहिलेला सीन होता. पण सुंदर लिहिला होता. कर्णाचे काम त्या सीनमधे आवडले. >>
खरंच, कर्ण आणि कुंतीचीही अॅक्टिंग आवडली. अगदी सास बहु सिरियलसारखा फॅमिली ड्रामा वाटला. पण कर्णाची खूप दया आली.

यशस्विनी,
सुभद्राचे अर्जुनावर प्रेम असते, तिला अर्जुनाविषयी आकर्षण कसे निर्माण होते हे दाखविण्यासाठी कदाचित तिला आतापासुन दाखवत आहेत.>>
पण सुभद्रा दाखवली कुठे अजून? तो भाग तर आज होणारेय बहुतेक.

उद्या सुभद्रा एन्ट्री करत आहे. द्रौपदीच्या आधीच सुभद्रा?????
..............
टोच्या, नंदिनीच्या वरील वाक्यावर माझा तो प्रतिसाद होता कि सुभद्राला अर्जुनाबद्दल द्रोपदी त्याच्या आयुष्यात येण्याअगोदरपासुन प्रेम वाटत होते. आज त्याबद्दल दाखवणार आहेत.

सुभद्राचा भाग आज दाखवणार आहेत, पण काल आजचं थोडे दाखवल्यामुळे लक्षात आले की सुभद्रा कोण आहे, आधी दोन सिरियलमध्ये बघितली आहे तिला.

दु:शलाचे काम आवडले, ती सुभद्रा तिच्यापुढे बापुडवाणी वाटली. दु:शला तिच्यापेक्षा चांगली दिसतपण होती आणि डायलॉगपण चांगले म्हणत होती.

आज आगदि न राहवता 'एकता कपूर' चि मभा मालिका बघण्याचा प्रयत्न केला....तुलना करण्यासाठि म्हणुन

प्रायश्चित्त घेण्या इतपत वाइअट वाटल कि आत्ता चा अणि तिचा मभा चि कंपॅरिझन मि का करुन पाहिल Blush

हा एपिसॉड चा शेवट पहा...आरति ऐकुन मि तर पोट दुखे पर्यन्त हसत होते.... Rofl
हि लिंक....

http://www.youtube.com/watch?v=khbYFtPPbhw

यशस्विनी, मागच्या धाग्यावर तूच लिहिले होतेस ना? दु:शलापण शाळेत गेली होती बरं का. Proud कालच्या एपिसोडमधे तसा उल्लेख आला. पोरं समदी मिलिटरी स्कूलमधे गेल्यावर पोरी होम सायन्स शिकायला कन्यावासमधे जायच्या म्हणे.

कालचा आणि आजचा तो भांडणाचा सीन बहुतेक कर्णाचे पाय सेम कुंतीसारखे आहेत असं युधिष्ठीरला वाटत असतं त्या कथेसाठी आहे वाटतं बहुतेक.

काल अर्जुन फारच क्युट दिसला बरं का.... नव्याचा हीरो होता ना तो? मग शहीर शेख बहुतेक!!

यशस्विनी, मागच्या धाग्यावर तूच लिहिले होतेस ना? दु:शलापण शाळेत गेली होती बरं का. कालच्या एपिसोडमधे तसा उल्लेख आला. पोरं समदी मिलिटरी स्कूलमधे गेल्यावर पोरी होम सायन्स शिकायला कन्यावासमधे जायच्या म्हणे.

<<<<<<<<<<<<<

नंदिनी मी हेच लिहिणार होते.... किती किती आनंद झाला ब्वा मला हे पाहुन, अगदी भरुन आले. चला होम सायन्स तर होम सायन्स कन्यादेखील शाळेत जायच्या तर Lol

अखेर या रविवारी बायकोबरोबर पाहिले १०-१२ सलग एपिसोड, ज्यात सारा गुरूकूल अध्याय कवर झाला.

आवडली मालिका, गुरुकुलमध्ये पांडवांमधील अर्जुनालाच फुल्ल चमकवला होता, नकुल सहदेव हिशोबातच नव्हते, युधिष्टिर दोनचार डायलॉग पुरताच आणि भीमालाही जास्त फूटेज नव्हते दिले.

मात्र लक्षात राहिला तो बाल दुर्योधन !! मस्तच पीस शोधून काढलाय ..

अधूनमधून एखादे मोरपीस उडायचे आणि कृष्णाचे डायलॉग सुरू व्हायचे. ते ज्याने कोणी लिहिले असतील त्याला कडक सलाम. जर ते कोण्या प्राचीन ग्रंथातील असतील तर त्या ग्रंथाला प्रणाम.

कर्णाने समकालीन जातीव्यवस्थेवर केलेली टिका पटण्यासारखी होती पण त्याचवेळी त्या वाक्यांना अहंकाराची जोड देऊन त्याला सहानुभुती मिळू नये याचीही काळजी घेतल्यासारखे वाटले.

तुर्तास मालिका पुढे पोहोचली असेल, येणारे विकांत यापुढचे १०-१२ भाग बघत शक्य तितक्या लवकर कवर करेन, आणि मग कधीतरी आधीचे चुकलेलेही बघून काढेन.
जुन्या महाभारताच्या नॉस्टेल्जिक आठवणी पुसायच्या नव्हत्या पण बघण्यासारखी आहे खरी मालिका..

महाभारतचा रिपीट टेलिकास्ट बघायची मी रात्री ११ला. आजपासून नवीन मालिका चालू झाली, अरेरे आता ८.३०वाजता दुसरी सिरीयल बघते. दुसऱ्या दिवशी रिपीट कधी होते हि सिरीयल, कोणाला माहिती आहे का?

महाभारतचा रिपीट टेलिकास्ट बघायची मी रात्री ११ला. आजपासून नवीन मालिका चालू झाली, अरेरे आता ८.३०वाजता दुसरी सिरीयल बघते. दुसऱ्या दिवशी रिपीट कधी होते हि सिरीयल, कोणाला माहिती आहे का?>>

कालपासून माझीही तीच गोची झालीय. मी रोज ऑफिसहून घरी गेल्यावर रात्री अकरा वाजता पहायचो. पण मग आज सकाळी ८ वाजता पाहिली. पण रात्रीच्या वेळी निवांत पाहता येते. सकाळी बरीच गडबड असते.

Pages