वेगवान चेन्नई एक्स्प्रेस (Movie Review - Chennai Express)

Submitted by रसप on 9 August, 2013 - 03:10

झुळझुळ वाहणारं पाणी खळखळ नाद करतं. एक चैतन्य, उत्साह निर्माण करतं. कधी त्याचा फेसाळ, दुधाळ रंग चित्तवेधक असतो तर कधी त्याच्या स्वच्छ प्रवाहातून दिसणारा तळ ! पण हेच पाणी साचून राहिलं की ? नकोसंही होतं.
प्रवासही प्रवाही असायला हवा. कुठेही अडून राहावं लागलं, खोळंबा झाला की नकोसं होतं. दिशा चुकली, भरकटली की संयम सुटतो. गती ही प्रवासासाठी अत्यावश्यक.
'चेन्नई एक्स्प्रेस' हा एक गतिमान प्रवास आहे. ही गाडी कुठेही 'सायडिंग'ला पडत नाही. औरंगाबाद-पुणे रेल्वे दौंड मार्गे जाऊन ८ तास खाते, तशी ही चेन्नई एक्स्प्रेस वेड्यासारखी भरकटत नाही. ह्या गाडीचं तिकीट काढताना आपल्याला माहित असतं की ही कुठल्या मार्गाने जाणार आहे, किती थांबे आहेत, किती वेळ लागणार आहे आणि अर्थातच कुठून सुरु व कुठे संपणार आहे. सगळं काही माहित असतानाही हा प्रवास कंटाळवाणा होत नाही. डब्यातल्या शौचालयाच्या वासाने गुदमरायलाही होत नाही आणि विदाउट तिकीट चढलेल्या उपऱ्या लोकांचा त्रासही होत नाही.

गाडी मुंबईहून सुरु होते. जसा अमिताभ 'विजय' असायचा, तसा शाहरुख 'राज' किंवा 'राहुल' असतो. इथे तो राहुल आहे. भूमिकेत शा.खा. फिट्ट होण्यापेक्षा भूमिका शा. खा. साठी फिट्ट व्हावी म्हणून आधीच सांगून ठेवलेलं आहे की तो चाळीशीचा आहे. वयस्कर व्यक्तिची प्रेमकहाणी दाखवायची आहे म्हणून त्याचं आधी एखादं लग्न झालेलं आणि बायको गचकलेली वगैरे भावनिक ठिगळं इथे नाहीत. आई-बापाविना वाढवलेल्या नातवावरील अपार प्रेमासमोर, आजोबा नातवाचं लग्न वगैरे क्षुल्लक गोष्टी बाजूला ठेवतात, इतकंच. सचिन तेंडुलकरचे परमचाहते असलेले राहुलचे आजोबा, स्वत:च्या शंभराव्या वाढदिवशी भारत-पाकिस्तान सामना पाहत असतात. सचिन आणि आजोबा दोघेही ९९ वर असतात आणि एक चेंडू दोघांचीही विकेट काढतो. तिकडे पाकिस्तानी खेळाडू सुटकेचा निश्वास टाकतात आणि इकडे राहुल मुक्त हवेत मोकळा श्वास घेतो. मित्रांसोबत आधीच ठरलेला गोव्याला जायचा प्लान 'ऑन' ठेवतो आणि तयारी करतो. पण आजोबांची एक विचित्र इच्छा असते. त्यांच्या अर्ध्या अस्थींचं विसर्जन गंगेत आणि अर्ध्या अस्थींचं विसर्जन रामेश्वरमला करावं ! (ही अशी इच्छा का असते ? ह्याचं कारण/ संदर्भ कुठेच मिळणार नाही. बस्स. असते. कारण चित्रपट पुढे जायचा असतो.) राहुलला आजीला दाखवण्यासाठी चेन्नई एक्स्प्रेसने जाण्याचं नाटक करावं लागतं. प्रत्यक्षात कल्याणला उतरून, मित्रांसोबत गोव्याला जाऊन तिथेच अस्थि विसर्जित करण्याचा नतद्रष्ट प्लान केला जातो. मृत व्यक्तीच्या भावनांशी खेळ केल्याबद्दल त्याला तळतळाट लागतो आणि सगळ्या प्लानचा खेळखंडोबा होतो. चालू गाडीतून उतरताना मिनम्मा (दीपिका) गाडीसोबत धावताना त्याला दिसते. हात देऊन तो तिला आत घेतो. (असा सीन चित्रपटात असणार हे मला आधीच माहित होतं आणि त्याला पार्श्वसंगीत काय असेल, हे तुम्हालाही नक्कीच माहित आहे.) दीपिकापाठोपाठ ३-४ सांडसदृश मनुष्यसुद्धा धावत येतात आणि त्यांनाही राहुल आत घेतो. दीपिका एका डॉन (सत्यराज) ची मुलगी असते, 'थंगबली' (निकितिन धीर) नामक होतकरू डॉनशी होऊ घातलेल्या लग्नापासून ती पळालेली असते, हे आपल्याला ट्रेलरमधूनच माहित झालेलं असतं. पुढे सगळे जण तमीळनाडूतल्या त्यांच्या गावी येतात आणि परिस्थितीशरण राहुललाही त्यांच्यासोबत यावंच लागतं. निकितिन हा खरं तर 'शाखातिन' आहे. (शा. खा. X ३ इतका धिप्पाड) त्यामुळे इथून पुढे पळापळी असणार असते. होते. आणि सगळ्या धावपळीनंतर, काही गाड्या-माणसं उडून-उडवून झाल्यानंतर कहाणी अपेक्षित शेवटाला पोहोचते.

chennai-express-movie.jpg

चेन्नई एक्स्प्रेस ही काही रोलर कोस्टर राईड नाही. लागणारे धक्के पोटात गोळा आणत नाहीत. पण ही अगदीच संथगती ट्रामही नाही. काही सिनेमे सुरु होण्याआधीच 'आपकी यात्रा आनंददायी एवं सुखकाकरक हो, यही हमारी शुभकामानायें' वाली भारतीय रेलची अनाउन्समेण्ट करतात. तसाच चे.ए. आहे.

तमिळनाडू म्हणून दाखवलेला भाग गोवा असावा, असं वाटलं. कोम्बण गावाला जाण्यासाठी जिथे ट्रेन थांबवली जाते, तो बहुतेक गोवा-कर्नाटक सीमेवरचा नयनरम्य दुधसागर धबधबा असावा, असंही वाटलं.

दीपिकाच्या 'मिनम्मा'च्या अ‍ॅक्सेन्टवरून बरेच लिहिले-बोलले गेले आहे. हा अ‍ॅक्सेन्ट खरोखर तमीळ आहे की मल्याळी माहित नाही. पण तो काही काळ गंमतीशीर वाटतो. तिच्यासोबत राहून राहून राहुल थोडंसं तमिळ बोलायला लागतो तरी तिचा अ‍ॅक्सेन्ट जराही बदलत नाही. शेवटी शेवटी तिने जपलेलं ते बेअरिंग बोअरिंग वाटायला लागतं. पण दिसलीय लै भारी ! Happy
शा. खा. 'जतहैंजा'मध्ये दिसला त्यापेक्षा तरूण दिसलाय आणि त्यामुळे चाळीशीचाच (Not more) वाटलाय. शा. खा. ह्या चित्रपटाची जान आहे. बाकी काहीही असलं, तरी त्याचा उत्साह नेहमीच बेजोड असतो. (त्या उत्साहापोटी तो बरेचदा ओव्हर अ‍ॅक्टिंग करतो, हा भाग वेगळा) त्याचा उत्साह पडदा व्यापतो. विनोदनिर्मितीत अनेक ठिकाणी अचूक टायमिंग त्याने साधले आहे. एकंदरीत मला शा. खा. आवडला असेल अश्या काही मोजक्या चित्रपटांत मी चे.ए. ला मोजेन ! (Have I made it too large??)
साऊथ इंडियन पार्टी आणि निकीतीन धीरला विशेष काम नाहीये. जे आहे, जितकं आहे, ते आणि तितकं ते व्यवस्थित निभावतात.
कॉलीवूडमध्ये नावाजलेला 'सत्यराज' त्याच्या शारीरिक अभिनय व भेदक नजरेने लक्षात राहतो. ह्या अभिनेत्याला हिंदीत अधिकाधिक संधी मिळावी, असे वाटते.

संगीत विशाल-शेखरचं आहे. संपूर्ण स्कोअरवर पुन्हा एकदा विचार करावा, अशी शा. खा. आणि रोहित शेट्टीची इच्छा वजा मागणी होती आणि अर्थातच त्यासाठी विशाल-शेखरने विनम्र नकार दिला होता म्हणे. बरोबरच आहे. विशाल-शेखर ह्याहून चांगले काम करतील अशी आशा वाटणेच चुकीचे आहे. कुठलेच गाणे लक्षात राहील असे दमदार नाही. प्रत्येक गाणे कुठल्या न कुठल्या गाण्याची नक्कल किंवा दोन-तीन गाण्यांची भेसळ वाटते. चांगल्या संगीताची अपेक्षा रहमानशिवाय इतर कुणाकडून करावी का ? असा प्रश्न आजकाल पडायला लागला आहे.

रोहित शेट्टीचे सिनेमे वैचारिक उंची गाठत नसतातच. ते अगदीच वैचारिक दिवाळखोरीसुद्धा दाखवत नाहीत. नर्मविनोदाचा जमाना गेला आहे. आताचा विनोद अंगावर आपटतो आणि शेट्टी इज मास्टर ऑफ इट. अनेक प्रासंगिक विनोद मस्त जमले आहेत. अनावश्यक पसारा न करता कहाणीला वेग देण्यावर लक्ष केंद्रित केल्याचं जाणवतं आणि त्यामुळेच पटकथेतल्या काही 'भोकां'कडे लक्ष जात नाही. जसं - कल्याणचा प्लान बदलून कर्जतला भेटणार असलेला आपला मित्र आला नाही. त्याचा फोन लागत नाही. ह्याची काळजी न वाटून, काहीच न करण्याच्या वयाचे राहुलचे मित्र नसतात. चाळीशीत इतपत तर समज येते, नाही का ? मोबाईल फोन जवळ नाही, पण एखादा नंबरही पाठ नसतो, असं नसतं ना ? किमान घरचा नंबर तरी प्रत्येकालाच पाठ असतो.

एकंदरीत चे. ए. एकदा बघायला नक्कीच हरकत नसावी, (शा. खा. भक्त पारायणंहीकरू शकतील) असा नक्कीच आहे. फक्त चित्रपटाचं तिकीट आणि रेल्वेचं खरंखुरं तिकीट एकाच किमतीचं नसावं !

रेटिंग - * * १/२
http://www.ranjeetparadkar.com/2013/08/movie-review-chennai-express.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी,

>> पण त्याला आता परत सिंगल स्क्रीन बादशाह व्हायचे डोहाळे लागलेत!!

अगदी अचूक वेध घेतलात! Happy

मला स्वत:ला चित्रपटातलं फारसं कळत नाही. इथला लेख वाचून तुमच्या या विधानाची आठवण आली.

आ.न.,
-गा.पै.

नंदिनी __ ओके.. आठवला तो ही..
परेश रावल आणि पूजा भटचाही "तमन्ना" चित्रपट होता (आता गूगाळून हे नाव चेकले) त्यात त्याची अशी तृतीयपंथीयाची भुमिका होती..
मी दोन्ही पाहिले नाहीत फक्त ऐकून होतो म्हणून कन्फ्यूज झालो.. धन्यवाद

अगदी सुरुवातीला दोन तीन ओळीचा प्रतिसाद दिला तेव्हां लिहीता लिहीता राहीलेलं आज लेख वाचून आठवलं. चेई कुणाला आवडो वा न आवडो पण एका गोष्टीसाठी त्याला धन्यवाद दिलेच पाहीजेत, एकदम स्वच्छ सिनेमा आहे. संपूर्ण कुटुंबासहीत, मुलांसहित पाहता येण्यासारखा. नाही तर कथेचा काहीही संबंध नसताना घुसडलेलं आयटेम साँग आणि टू पीस बिकिनीसदृश्य कपड्यात नाचणा-या (शक्यतो युरोपियन / रशियन) मुली या सर्वाचा अतिरेक झाला होता. बहुतेक हे प्रेक्षकांना आवडतं असा बॉलिवूडवाल्यांचा गैरसमज झालेला असावा. चेई ने दोनशे कोटींचा टप्पा क्रॉस करून बॉलिवूडवाल्यांच्या समजाला धक्का दिला आहे (आंबटशौकिनांसाठी इंटरनेट आहेच). दोन घटका करमणूक इतकी माफक अपेक्षा असताना प्रत्येक वेळी या सगळ्याची गरज नाही. आता नॉनसेन्स साउथ अ‍ॅक्शन पासून मुक्ती मिळाली कि झालं.

चेई कुणाला आवडो वा न आवडो पण एका गोष्टीसाठी त्याला धन्यवाद दिलेच पाहीजेत, एकदम स्वच्छ सिनेमा आहे. संपूर्ण कुटुंबासहीत, मुलांसहित पाहता येण्यासारखा. नाही तर कथेचा काहीही संबंध नसताना घुसडलेलं आयटेम साँग आणि टू पीस बिकिनीसदृश्य कपड्यात नाचणा-या (शक्यतो युरोपियन / रशियन) मुली आणि संपूर्ण उघडे पुरूष. बहुतेक हे प्रेक्षकांना आवडतं असा बॉलिवूडवाल्यांचा गैरसमज झालेला असावा. >> परत एकदा चेन्नई एक्स्प्रेसचं परफेक्ट मार्केटिंग!!!!!

परत एकदा चेन्नई एक्स्प्रेसचं परफेक्ट मार्केटिंग!!!!! >>

नाही. हा सिनेमा रिलीज झाला त्याच दिवशी पाहीला होता. त्याबद्दल पहिल्या प्रतिसादात अगदी थोडक्यात लिहीलंच होतं. तोपर्यंत मार्केटिंगमधे हा मुद्दा नव्हता आलेला. आज शाहरूखने त्याचं भांडवल केलंय.

तोपर्यंत मार्केटिंगमधे हा मुद्दा नव्हता आलेला. आज शाहरूखने त्याचं भांडवल केलंय.>>
मी चेन्नई एक्स्प्रेसचं मार्केटींग जेव्हापासून चालू झालं (शूट चालू असताना) तेव्हापासून पाहतेय, क्लीन सिनेमा आहे हा त्यांचा आधीपासून पॉईन्ट होताच. आता कुठे पब्लिकच्या डोक्यात तो झिरपतोय. शाहरूखचा आजवर कुठलाही सिनेमा कधीच अश्लील कॉमेडी अथवा चावट वगैरे सदरात बसणारा नव्हता. त्यामुळे आता त्याने फार काही वेगळं केलंय अशातला भाग नाही.

रांझणा वगैरे सिनेमा पण "क्लीनच" होते, पण त्यांच्या पब्लिसीटी मधे तो पॉईन्ट नव्हताच.

मला आवडला चेन्नई एक्सप्रेस. अजिबात अपेक्षा नव्हती. हसु आले. लई झाले.
दीपिका आवडली. शाहरुखने स्वतःवर जोक्स क्रॅक करु दिलेत त्यामुळे तोही आवडला.

चित्रपट टोटल टीपी आहे, मजा आली. कधी रोहितशेट्टीचा कुठलाही चित्रपट आवडेल असे वाटले नव्हते त्यामुळे आश्चर्यचकित.

नंदिनी ,
काय मार्केटींग केलं होतं या मुव्हीचं , आय मीन इतर बिग बजेट मुव्हीज पेक्षा वेगळं काही होतं का ?
देशी चॅनल्स नाहीयेत माझ्याकडे त्यामुळे मला अजिबातच माहित नाही , मी अजुन गाणी पण पाहिली नाहीयेत , थिएटर मधे एकदा ट्रेलर पाहिलं होतं पण लक्षात नाही राहिलं फारसं !
पण मार्केटींग चा विशेष उल्लेख केलायेस म्हणून उत्सुकता आहे त्या बद्दल वाचायची !

काय मार्केटींग केलं होतं या मुव्हीचं , आय मीन इतर बिग बजेट मुव्हीज पेक्षा वेगळं काही होतं का ? >> चित्रपटाचे माहित नाही पण नोकियाच्या फोनचे मार्केटींग मात्र भरपूर केलय Lol

ह्या चित्रपटातील डीपी च काम आवडल ,पण संवादफेक तिने जाणुन अगदी लक्षात येईल अशी केली असल्याच जाणवलं , त्यात डीपी ही ताडमाड , शाखा अगदीच इल्लु टिल्लू दिसतो तिच्याबरोबर . ह्यापेक्षा दाक्षिण्यात असीन ह्या रोल साठी घेतली असती तर जास्त चांगल झाल असत, तस तिने रोशे बरोबर ह्यापूर्वी काम केल आहे, तिची उंचीसुद्धा शाखाला सूट झाली असती आणि मुख्य म्हणजे तामिळ बोलताना तिला तोंडाचे जास्त व्यायाम करावे लागले नसते.

संपुर्ण चित्रपटात दिपिका एकाच प्रसंगात खुप आवडली. ते म्हणजे रात्री ती झोपेत कसलीशी बडबड करते आणि शाहरुखचं मानगुट पकडते. एकदम क्युट हडळ वाटते. Happy

हिला अ‍ॅनेमिया झालाय का? का ती तशिच हडकुळी आहे ? Happy

बाकी इतर जण शाहरुख समोर सडकछाप कार्यकर्ते आहेत >>>>>>> नसिरुद्दिन , नाना , आमिर , दिलिप कुमर, राजेश खन्ना, देवानन्द , ओम पुरि, परेश रावल, मनोज बाजपेयी, अनुपम खेर, इर्फान खान, रण्बीर कपूर, रितिक, कमल हसन, फर्हान अख्तर हे सगळे सडकछाप ...-|>>>>>>>>>>>>> असं कोणी म्हटलय????

तो अतिशय कृश देहयष्टीचा, रंगाने चक्क काळा आणि दिसायला सामान्य सुद्धा नाहीये त्यापेक्षा खालीच>>>>>>> दिसायला तर अमिताभ पण स्मार्ट नव्हता...पण तो कुठल्या बळावर ईंडस्ट्रीत स्थान टिकवुन आहे ते वेगळं सांगायची गरज नाही.........आणि तसच शा खा चं..........बाकी कुठल्याही स्टार डॅड च्या घरी जन्माला न येता स्ट्रगल करुन आज दोघेही किंग आहेत........

आपेक्षे इतका धमाल विनोदी अजिबातच नाही वाटला पण खूप दिवसांनी शाहरुख चा वावर सुसह्य वाटला .. त्याचे गेले काही सिनेमे संपूर्ण पाहूच शकले नवह्ते ( माय नेम इज खान, जब तक है जान , रावन ) पण हा शेवट पर्यंत पाहिला इतकच!
रोहित शेट्टीनी शाहरुखच्या धमाल कॉमेडी सेन्स चा अजुन चांगला उपयोग केला असता तर मजा आली असती!
शिवाय त्या तमिळ डॉयलॉग्ज ला जरा आवर घालायला हवा होता किंवा सबटायटल्स तरी हवे होते Uhoh
मी शाहरुख फॅन नाही , त्याचं मुव्ही सिलेक्शनही बहुतेक वेळा आव्डत नाही पण त्याचं कॉमेडी टायमिंग आणि त्याच्या पोटेन्शिअल बद्दल दुमत नाही..'बादशाह ' सारखा धमाल विनोदी सिनेमा शाहरुखनी पुन्हा एकदा केला तर आवडेल पहायला!

अरे वा......आता मराठी चित्रपट सुध्दा १०० कोटीचा गल्ला जमवणार ..... Happy ....

एकदा "ग्रँड मस्ती" या आचरट चित्रपटाचा ट्रेलर बघा........... असले ३र्ड क्लास चित्रपट पाहण्यापेक्षा चेए १०० वेळा बघितलेला परवडेल Biggrin

Pages