वेगवान चेन्नई एक्स्प्रेस (Movie Review - Chennai Express)

Submitted by रसप on 9 August, 2013 - 03:10

झुळझुळ वाहणारं पाणी खळखळ नाद करतं. एक चैतन्य, उत्साह निर्माण करतं. कधी त्याचा फेसाळ, दुधाळ रंग चित्तवेधक असतो तर कधी त्याच्या स्वच्छ प्रवाहातून दिसणारा तळ ! पण हेच पाणी साचून राहिलं की ? नकोसंही होतं.
प्रवासही प्रवाही असायला हवा. कुठेही अडून राहावं लागलं, खोळंबा झाला की नकोसं होतं. दिशा चुकली, भरकटली की संयम सुटतो. गती ही प्रवासासाठी अत्यावश्यक.
'चेन्नई एक्स्प्रेस' हा एक गतिमान प्रवास आहे. ही गाडी कुठेही 'सायडिंग'ला पडत नाही. औरंगाबाद-पुणे रेल्वे दौंड मार्गे जाऊन ८ तास खाते, तशी ही चेन्नई एक्स्प्रेस वेड्यासारखी भरकटत नाही. ह्या गाडीचं तिकीट काढताना आपल्याला माहित असतं की ही कुठल्या मार्गाने जाणार आहे, किती थांबे आहेत, किती वेळ लागणार आहे आणि अर्थातच कुठून सुरु व कुठे संपणार आहे. सगळं काही माहित असतानाही हा प्रवास कंटाळवाणा होत नाही. डब्यातल्या शौचालयाच्या वासाने गुदमरायलाही होत नाही आणि विदाउट तिकीट चढलेल्या उपऱ्या लोकांचा त्रासही होत नाही.

गाडी मुंबईहून सुरु होते. जसा अमिताभ 'विजय' असायचा, तसा शाहरुख 'राज' किंवा 'राहुल' असतो. इथे तो राहुल आहे. भूमिकेत शा.खा. फिट्ट होण्यापेक्षा भूमिका शा. खा. साठी फिट्ट व्हावी म्हणून आधीच सांगून ठेवलेलं आहे की तो चाळीशीचा आहे. वयस्कर व्यक्तिची प्रेमकहाणी दाखवायची आहे म्हणून त्याचं आधी एखादं लग्न झालेलं आणि बायको गचकलेली वगैरे भावनिक ठिगळं इथे नाहीत. आई-बापाविना वाढवलेल्या नातवावरील अपार प्रेमासमोर, आजोबा नातवाचं लग्न वगैरे क्षुल्लक गोष्टी बाजूला ठेवतात, इतकंच. सचिन तेंडुलकरचे परमचाहते असलेले राहुलचे आजोबा, स्वत:च्या शंभराव्या वाढदिवशी भारत-पाकिस्तान सामना पाहत असतात. सचिन आणि आजोबा दोघेही ९९ वर असतात आणि एक चेंडू दोघांचीही विकेट काढतो. तिकडे पाकिस्तानी खेळाडू सुटकेचा निश्वास टाकतात आणि इकडे राहुल मुक्त हवेत मोकळा श्वास घेतो. मित्रांसोबत आधीच ठरलेला गोव्याला जायचा प्लान 'ऑन' ठेवतो आणि तयारी करतो. पण आजोबांची एक विचित्र इच्छा असते. त्यांच्या अर्ध्या अस्थींचं विसर्जन गंगेत आणि अर्ध्या अस्थींचं विसर्जन रामेश्वरमला करावं ! (ही अशी इच्छा का असते ? ह्याचं कारण/ संदर्भ कुठेच मिळणार नाही. बस्स. असते. कारण चित्रपट पुढे जायचा असतो.) राहुलला आजीला दाखवण्यासाठी चेन्नई एक्स्प्रेसने जाण्याचं नाटक करावं लागतं. प्रत्यक्षात कल्याणला उतरून, मित्रांसोबत गोव्याला जाऊन तिथेच अस्थि विसर्जित करण्याचा नतद्रष्ट प्लान केला जातो. मृत व्यक्तीच्या भावनांशी खेळ केल्याबद्दल त्याला तळतळाट लागतो आणि सगळ्या प्लानचा खेळखंडोबा होतो. चालू गाडीतून उतरताना मिनम्मा (दीपिका) गाडीसोबत धावताना त्याला दिसते. हात देऊन तो तिला आत घेतो. (असा सीन चित्रपटात असणार हे मला आधीच माहित होतं आणि त्याला पार्श्वसंगीत काय असेल, हे तुम्हालाही नक्कीच माहित आहे.) दीपिकापाठोपाठ ३-४ सांडसदृश मनुष्यसुद्धा धावत येतात आणि त्यांनाही राहुल आत घेतो. दीपिका एका डॉन (सत्यराज) ची मुलगी असते, 'थंगबली' (निकितिन धीर) नामक होतकरू डॉनशी होऊ घातलेल्या लग्नापासून ती पळालेली असते, हे आपल्याला ट्रेलरमधूनच माहित झालेलं असतं. पुढे सगळे जण तमीळनाडूतल्या त्यांच्या गावी येतात आणि परिस्थितीशरण राहुललाही त्यांच्यासोबत यावंच लागतं. निकितिन हा खरं तर 'शाखातिन' आहे. (शा. खा. X ३ इतका धिप्पाड) त्यामुळे इथून पुढे पळापळी असणार असते. होते. आणि सगळ्या धावपळीनंतर, काही गाड्या-माणसं उडून-उडवून झाल्यानंतर कहाणी अपेक्षित शेवटाला पोहोचते.

chennai-express-movie.jpg

चेन्नई एक्स्प्रेस ही काही रोलर कोस्टर राईड नाही. लागणारे धक्के पोटात गोळा आणत नाहीत. पण ही अगदीच संथगती ट्रामही नाही. काही सिनेमे सुरु होण्याआधीच 'आपकी यात्रा आनंददायी एवं सुखकाकरक हो, यही हमारी शुभकामानायें' वाली भारतीय रेलची अनाउन्समेण्ट करतात. तसाच चे.ए. आहे.

तमिळनाडू म्हणून दाखवलेला भाग गोवा असावा, असं वाटलं. कोम्बण गावाला जाण्यासाठी जिथे ट्रेन थांबवली जाते, तो बहुतेक गोवा-कर्नाटक सीमेवरचा नयनरम्य दुधसागर धबधबा असावा, असंही वाटलं.

दीपिकाच्या 'मिनम्मा'च्या अ‍ॅक्सेन्टवरून बरेच लिहिले-बोलले गेले आहे. हा अ‍ॅक्सेन्ट खरोखर तमीळ आहे की मल्याळी माहित नाही. पण तो काही काळ गंमतीशीर वाटतो. तिच्यासोबत राहून राहून राहुल थोडंसं तमिळ बोलायला लागतो तरी तिचा अ‍ॅक्सेन्ट जराही बदलत नाही. शेवटी शेवटी तिने जपलेलं ते बेअरिंग बोअरिंग वाटायला लागतं. पण दिसलीय लै भारी ! Happy
शा. खा. 'जतहैंजा'मध्ये दिसला त्यापेक्षा तरूण दिसलाय आणि त्यामुळे चाळीशीचाच (Not more) वाटलाय. शा. खा. ह्या चित्रपटाची जान आहे. बाकी काहीही असलं, तरी त्याचा उत्साह नेहमीच बेजोड असतो. (त्या उत्साहापोटी तो बरेचदा ओव्हर अ‍ॅक्टिंग करतो, हा भाग वेगळा) त्याचा उत्साह पडदा व्यापतो. विनोदनिर्मितीत अनेक ठिकाणी अचूक टायमिंग त्याने साधले आहे. एकंदरीत मला शा. खा. आवडला असेल अश्या काही मोजक्या चित्रपटांत मी चे.ए. ला मोजेन ! (Have I made it too large??)
साऊथ इंडियन पार्टी आणि निकीतीन धीरला विशेष काम नाहीये. जे आहे, जितकं आहे, ते आणि तितकं ते व्यवस्थित निभावतात.
कॉलीवूडमध्ये नावाजलेला 'सत्यराज' त्याच्या शारीरिक अभिनय व भेदक नजरेने लक्षात राहतो. ह्या अभिनेत्याला हिंदीत अधिकाधिक संधी मिळावी, असे वाटते.

संगीत विशाल-शेखरचं आहे. संपूर्ण स्कोअरवर पुन्हा एकदा विचार करावा, अशी शा. खा. आणि रोहित शेट्टीची इच्छा वजा मागणी होती आणि अर्थातच त्यासाठी विशाल-शेखरने विनम्र नकार दिला होता म्हणे. बरोबरच आहे. विशाल-शेखर ह्याहून चांगले काम करतील अशी आशा वाटणेच चुकीचे आहे. कुठलेच गाणे लक्षात राहील असे दमदार नाही. प्रत्येक गाणे कुठल्या न कुठल्या गाण्याची नक्कल किंवा दोन-तीन गाण्यांची भेसळ वाटते. चांगल्या संगीताची अपेक्षा रहमानशिवाय इतर कुणाकडून करावी का ? असा प्रश्न आजकाल पडायला लागला आहे.

रोहित शेट्टीचे सिनेमे वैचारिक उंची गाठत नसतातच. ते अगदीच वैचारिक दिवाळखोरीसुद्धा दाखवत नाहीत. नर्मविनोदाचा जमाना गेला आहे. आताचा विनोद अंगावर आपटतो आणि शेट्टी इज मास्टर ऑफ इट. अनेक प्रासंगिक विनोद मस्त जमले आहेत. अनावश्यक पसारा न करता कहाणीला वेग देण्यावर लक्ष केंद्रित केल्याचं जाणवतं आणि त्यामुळेच पटकथेतल्या काही 'भोकां'कडे लक्ष जात नाही. जसं - कल्याणचा प्लान बदलून कर्जतला भेटणार असलेला आपला मित्र आला नाही. त्याचा फोन लागत नाही. ह्याची काळजी न वाटून, काहीच न करण्याच्या वयाचे राहुलचे मित्र नसतात. चाळीशीत इतपत तर समज येते, नाही का ? मोबाईल फोन जवळ नाही, पण एखादा नंबरही पाठ नसतो, असं नसतं ना ? किमान घरचा नंबर तरी प्रत्येकालाच पाठ असतो.

एकंदरीत चे. ए. एकदा बघायला नक्कीच हरकत नसावी, (शा. खा. भक्त पारायणंहीकरू शकतील) असा नक्कीच आहे. फक्त चित्रपटाचं तिकीट आणि रेल्वेचं खरंखुरं तिकीट एकाच किमतीचं नसावं !

रेटिंग - * * १/२
http://www.ranjeetparadkar.com/2013/08/movie-review-chennai-express.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुमार गौरव, फैझल खान (आमिरपेक्षा छान दिसायचा), राजीव कपूर, फरदीन खान >> हे सुंदर आहेत.....!!
DesiSmileys.com

अग्गोबै, कॅसल रॉक ते हेच का? आमच्या कॉलेजच्या दिवसात पोरं सहलीला गेले होते. म्या नव्हतो गेलो. नंतर महिनाभर ते लोक कॅसलरॉकबद्दलच बोलत होते.

आज कळलं म्या काय मिसलं ते. Sad

स्टार बनण्यासाठी सुंदर असून चालत नाही, "एक्स फॅक्टर" असावा लागतो.
>>>>>>>>>>
सहमत नंदिनी,
त्याचप्रमाणे निव्वळ अव्वल दर्जाचा अभिनय असूनही चालत नाही..
या एक्स फॅक्टरचा काही एक असा फॉर्म्युला नसतो.. पब्लिकला काय आवडते ते मॅटर करते..

चे.ए. संपल्यावर एक गाणे लागते, त्याचा चित्रपटाशी काही संबंध नाही, शाहरुख काही हृतिक-शाहिद सारखा डान्सर नाही, गाणेही काही खास नव्हते... तरीही पब्लिक खुर्च्या सोडायला तयार नव्हते, थिएटर खाली करायला मागत नव्हते... हे शा.खा.ची क्रेझ तसेच चित्रपट लोकांना आवडला हे दोन्ही गोष्टी सांगून जाण्यास पुरेसे आहे.

>>तरीही पब्लिक खुर्च्या सोडायला तयार नव्हते, थिएटर खाली करायला मागत नव्हते... <<

आमच्या अभिषेका,

आम्ही खुर्च्या सोडल्या.... थिएटर खाली झाले होते.... गाणे एकटेच वाजत होते आणि शाखा उगाच नाचत होता..!!

एकुण काय लोकांना काय आवडेल काही सांगता येत नाही. जुन्या काळात रफी, मुकेश आणि किशोरकुमार यांच्या आवाजाच्या जिवावर कित्येक ठोकळे चालले. त्यामानाने शाहरुख स्वतःच्या नावावर गर्दी खेचतोय, हे महत्त्वाचं. (भलेही मला आवडत नाही, हा भाग वेगळा).

शाहरुक चित्रपटात शाहरुक दिसतो, 'राहुल' नाही. हेच खटकतं. बर्‍याचश्या चित्रपटात अमीर त्या भुमिकेत शिरतो, ते आवडतं. गजनी, मेला वगैरे फालतू चित्रपटात तो अमिरच वाटला, हे ही खरच.

आमच्या अभिषेका,<<< Lol

आम्ही खुर्च्या सोडल्या.... थिएटर खाली झाले होते.... गाणे एकटेच वाजत होते आणि शाखा उगाच नाचत होता..!!<<< Rofl

माफ करा, पण खरंच हसू आवरले नाही.

उगाच नाचत होता.:हहगलो: अहो रसप त्याला नाचण्याचे पैसे आधीच मिळाले होते की, उगाच कशाला ताथैय्या करेल तो?:फिदी:

मयी शारुक बाबा दिसायला सामान्य असला तरी त्याचा स्क्रीन् फेस ( फोटोजेनिक चेहेरा) आहे म्हणूनच तो हिरो आहे. मेघा घाटगे पण खूप सामान्य दिसते ( आता दिसते म्हणल्यावर आहे, पण ती हसतमुख पण आहेच) पण सिनेमात अतीशय सुंदर दिसते. ( भरत जाधव बरोबरची गाणी आठव).

नंदिनी तुझ्याशी बाकी सहमत असले तरी प्लीज प्लीज गं त्या शारुखला अमिताभबरोबर बसवु नकोस्.:अरेरे: मोठा चटका लागतो. कुठे इंद्राचा ऐरावत आणी कुठे शामभटाची...

त - लाश मधे तर मध्यांतर पर्यंत कसेबसे बसलेले प्रेक्षक नंतर उठुन गेलेले. मोकळ्या थियेटर मधे आमिर प्रेक्षकांची "तलाश" करत होता...
Biggrin

अच्छा अच्छा, म्हणजे या धाग्यावरील वाद शाहरूख विरुद्ध आमीर असा आहे होय! मला आत्तापर्यंत वाटत होते की शाहरूख कृश आहे की नाही यावर आहे.

उदयन, जब तक है जान साठी तर प्रेक्षक मध्यंतरापर्यंत पण थांबले नाही म्हणे!!!! कारण, ते थेटरात गेलेच नव्हते.. Proud मला तुझी हीच गंमत लक्षात येत नाही. कशाला तुलना करायची? तुला शाहरूख आवडतो ना बास.... मग तो आमिरपेक्षा किती चांगला, आणि सलमानपेक्षा किती ग्रेट कशाला लिहायचे??? तिघेही ग्रेट आहेत म्हणून ४०+ असताना अजूनही सुपरस्टार आहेत.

रश्मी, मी कुणाचीही कुणाहीसोबत तुलना करत नाही. अमिताभ, शाहरूख दोघेही सुपरस्टार आहेत हेच एकमेव सत्य. त्यांचं टॅलेन्ट आणि दिसणं, नाचणं, अभिनय वगैरे सर्व बाजूला. गल्ला कमावतात की नाही??? हाच एक निकष असतो बॉलीवूडचा.

मला वैयक्तिकरीत्या शाहरूख खान आवडत नाही, पण मला तो आवडत नाही म्हणून तो फालतू होत नाही. आनि मला सलमान खान आवडतो म्हणून तो महान होत नाही. Happy

तुला शाहरूख आवडतो ना बास.... मग तो आमिरपेक्षा किती चांगला, आणि सलमानपेक्षा किती ग्रेट कशाला लिहायचे?? >>>

मी कशी तुलना करेन......? Uhoh .. त्याची इतरांशी तुलना होउ शकते का ? Biggrin

इतरजण फालतु बडबड करत असतात ...त्यामुळे आम्हाला देखील ही फालतु बडबड करावीच लागते Wink
.
.

हा धागा चेन्नै एक्स्प्रेसच्या वेगाने धावतोय की काय >>> छे, मला तर चेन्नै एक्सप्रेस सायडिंगला टाकल्यासारखे वाटत आहे.

बेसिकली एका पिढीचेच कंडिशनिंग झालेले आहे. निव्वळ अभिनय म्हंटला तर आमीरने अनेकदा आणि शाहरुखने पूर्वीच्या जमान्यात काहीदा चांगला अभिनय केला. सलमानने खरे तर फार कमी वेळा.

पण अमिताभ बच्चनने 'सुपरस्टार, अँग्री यंग मॅन, हिरो' वगैरे भूमिकांमधून एक्झिट घेतल्यानंतर निर्माण झालेल्या पोकळीत अनेक सनी देओल्स, जॅकी श्रॉफ्स, अनिल कपूर्स, देवगण्स, खान्स इत्यादी हे चालवून घ्यावे लागले. त्यांच्या प्रत्येकातही काही ना काही होतेच, ते मिळतही होते प्रेक्षकाला. पण जे अमिताभला पाहून मिळायचे त्याच्या तुलनेत फारच कमी. मग हळूहळू पर्याय नसल्याने हे लोक पात्रतेहून मोठे ठरू लागले. अमिताभला पर्याय मात्र अजूनही निर्माण झालेला नाही. त्याचमुळे अनिल कपूर ते रणबीर कपूर या वीस एक वर्षातील नायकांच्या तीन चार पिढ्या आपापल्या परीने गाजत राहिल्या, संपत राहिल्या. (रणबीर संपला असे म्हणायचे नाही).

मला आठवते, मधूबरोबर अजय देवगणचा फूल और काटे असा चित्रपट होता त्यात ओ निव्वळ सडकछाप रोमिओ भासत होता. हळूहळू काळानुसार अभिनेत्यांची प्रगल्भताही वाढत जाते याची अनेक उदाहरणे या वीस वर्षात दिसली. पण अमिताभच्या बाबतीत मात्र हम आणि अग्निपथमध्ये त्याने ज्या दर्जाचा अभिनय केला होता त्याच दर्जाचा अभिनय दीवार, जंजीर आणि अभिमानमध्येही केल्याचे आठवेल. द ग्रेट इज ऑल्वेज द ग्रेट! त्याचमुळे, सर्व खान, कपूर्स व इतरांनी नंतर अभिनयात केलेली प्रगती हे बर्‍याच अंशी दिग्दर्शकाची मेहनत, अनुभवाने आलेले शहाणपण, वाढलेला आत्मविश्वास यांचे निदर्शक आहे.

सलमान, शाहरूख यांचे लार्जर दॅन लाईफ ठरणे हेही असेच 'बच्चनलेस इंडस्ट्रीचे' प्रॉडक्ट आहे.

ही सर्व माझी वैयक्तीक मते असून ती योग्यच मानली जावीत असा मुळीच दावा नाही, मी मात्र या मतांशी मनापासून प्रामाणिक आहे.

अवांतराचा दोष पत्करूनः

आमीर खान आणि मनीषा कोईराला यांचा अकेले हम अकेले तुम हा माझा एक अत्यंत आवडता चित्रपट आहे. दोघांनी त्यात (वैयक्तीक मतानुसार) लाजवाब अभिनय केला आहे. यात आमीर खानने केलेला रोल जर शाहरुखला दिला असता तर शाहरुख त्या रोलवर हावी झाला असता, होऊ पाहात राहिला असता. त्याला असे वाटत राहिले असते की शाहरुख किती ग्रेट आहे हे प्रेक्षकांना समजत राहावे, व्हेअरअ‍ॅज आमीरने रोलला स्वतःपेक्षा ग्रेट मानल्यासारखे जाणवले. हे प्रत्येक अभिनेत्याच्या टॅलेंटचे भिन्न भिन्न असणारे असे ग्रेन स्ट्रक्चर व निसर्गदत्त प्रवृत्ती आहे. याचमुळे, बाजीगर आणि डर या चित्रपटांत आमीर खान शोभला नसता.

तर विषय (किंवा मुद्दा) असा, की एक तर तुलनेला अर्थ नाही आणि दुसरे म्हणजे तुलनेच्याही पलीकडचे असे एक टॅलेंट असू शकते जे अमिताभ, दिलीपकुमार, नसिरउद्दिन शहा, अशोक कुमार अश्या अनेकांनी आजवर दाखवून दिलेले आहे. Happy

आमीर खान आणि मनीषा कोईराला यांचा अकेले हम अकेले तुम हा माझा एक अत्यंत आवडता चित्रपट आहे. दोघांनी त्यात (वैयक्तीक मतानुसार) लाजवाब अभिनय केला आहे. यात आमीर खानने केलेला रोल जर शाहरुखला दिला असता तर शाहरुख त्या रोलवर हावी झाला असता, होऊ पाहात राहिला असता. त्याला असे वाटत राहिले असते की शाहरुख किती ग्रेट आहे हे प्रेक्षकांना समजत राहावे, व्हेअरअ‍ॅज आमीरने रोलला स्वतःपेक्षा ग्रेट मानल्यासारखे जाणवले.>>>>>>>>>>>

अचुक लिहिलय. आता कळलं की माझी चॉईस अशी का आहे. Happy

आमच्या अभिषेका,

आम्ही खुर्च्या सोडल्या.... थिएटर खाली झाले होते.... गाणे एकटेच वाजत होते आणि शाखा उगाच नाचत होता..!!
>>>>>>>>>>>>>>>>>

मी शनिवारच्या दुपारी बाराच्या वाशीच्या रघुलीला मॉलमध्ये हा चित्रपट पाहिला.. शो फुल्ल हाऊस होता.. आणि खरेच ते पुर्ण गाणे संपेपर्यंत एकही जण साधा उभाही राहिला नाही.. अन्यथा बरेचदा पब्लिक उभी राहून, किंवा रेंगाळत चालत हे बघते.

आणि हो, मी शा.खा. फॅन असलो तरी मी वैतागलो की काय पब्लिक फालतूचे गाणे पण बघत बसलीय, अन असे मी बायकोला बोलूनही दाखवले.. कारण माझी एक सवय आहे, पब्लिक थिएटर सोडत असताना मुद्दाम मी शाहाण्यासारखा बसून राहतो.. शेवटपर्यंत.. आणि माझ्या बसण्याने कोण अडत असेल तर त्यालाही अडवतो किंवा पलीकडून जाण्यास भाग पाडतो.. त्या दिवशी मला हा माझा शहाणपणा करता आला नाही याचा राग आला.. आणि हे विशेष लक्षात राहिले..

अवांतर - हि शाहरुखची नाही तर श्री रजनीकांत यांची जादू आहे असे खुसपट काढायला पुरेपूर वाव आहे. Happy

ज्याला जो हिरो आवडतो त्याचा सिनेमा बघावा,
पैसे तुमचे स्वताचे स्वकष्टाचे असतात नां,
त्यात परत तुमचा अमूल्य वेळ तुम्ही नं आवणाऱ्या हिरो कां खर्च करता

Wink अरे हिरोईन बघायला जात जा Proud

यात आमीर खानने केलेला रोल जर शाहरुखला दिला असता तर शाहरुख त्या रोलवर हावी झाला असता, होऊ पाहात राहिला असता. त्याला असे वाटत राहिले असते की शाहरुख किती ग्रेट आहे हे प्रेक्षकांना समजत राहावे, व्हेअरअ‍ॅज आमीरने रोलला स्वतःपेक्षा ग्रेट मानल्यासारखे जाणवले.

>>>>>>>>>>

बेफिकीर +७८६
सहमत ... शाहरुख असेच करतो.. किंबहुना त्याने तेच करावे असे त्याचा एक चाहता म्हणून मला मनापासून वाटते.. त्याने मागे सम्राट अशोका केला होता, अशी चूक त्याने कधीच करू नये.. काहीही असो, शाहरुख डोकावतच राहिला पाहिजे.. पैसे आम्ही त्याचेच मोजतो.. अभिनय कोणीही करेल, तो सुपर्स्टार आहे, त्याने मनोरंजन करावे.. Happy

अभिषेकच्या धाग्यावर लिहिले होते , तेच लिहितो परत , आपल्याला आवडतो ना तो बास आहे Happy
सलमान , आमिर कसे आहेत काय फरक पडतो ?
शारूक , रूकरूक म्हणा काय फरक पडतो ?
आता मी स्वतः शाहरूखला ४-५ वेळा पाहिला आहे (याचा अर्थ मी त्याला भेटलो असा होत नाही :)) .
मला तरी तो काळा ,क्रूश वगैरे कधी नाही वाटला . असते एकेकाची नजर , जाऊ दे . Happy
पण जर तसे असतानाही जर तो सुपरस्टार होऊ शकत असेल तर कुछ तो बात होगी ना यार ?
दुसर पारायण कंप्लीट (आई बाबांबरोबर , त्यानीही व्यवस्थित एंजॉय केला , स्टोरी नव्हती म्हणाले बाबा , पण रोशे च्या पिक्चरला स्टोरी असती तर .... ), तिसर १७ ऑगस्टला .

यथा प्रजा तथा कला >>>
अहो मलाही असंच वाटायचं आधी. पण असलं काही नसतं, आणि इतक्या उंचीला प्रकरण नेण्याची गरजही नसते, हे मग लक्षात आलं. थेट्राच्या अंधारात लोक आपापली छोटीमोठी दु:खं विसरण्यासाठी, घडीभर हसण्यासाठी, आणि आपापली स्वप्नं-भावविश्वं शोधण्यासाठी जातात. कुठेतरी त्यांना हे सगळं किंवा थोडंफार सापडतं, आणि ते देणारे लोक हा प्रकार कॅश करतात- इतकाच त्याचा अर्थ. Happy आपण उगाच वाद घालतो..

मी शनिवारच्या दुपारी बाराच्या वाशीच्या रघुलीला मॉलमध्ये हा चित्रपट पाहिला.. शो फुल्ल हाऊस होता.. आणि खरेच ते पुर्ण गाणे संपेपर्यंत एकही जण साधा उभाही राहिला नाही.. >>>>>>>>>पिक्चर संपलाय हे पब्लिकच्या ध्यानात आले नसेल कदाचित Happy

मी एका दिवसात तीन वेळा पाहिला हा सिनेमा
तिसरा शो रात्री ९ ला संपला तरीही (मी आणि बहिणच गेलो होतोत, अशा अनेक लहान मोठ्या मुली मैत्रिणी-मैत्रिणी किंवा बहिणी बहिणी आल्या होत्या) त्यांनीही पुर्ण गाणं पाहूनच थिएटर सोडलं....

केदार, टुकटुक माझी तीन पारायण झाली सुद्धा तुझ्याआधी Proud

एक पारायण शाहरुखप्रेमी माबोकर गटगमध्ये होऊन जाऊ देत की
धम्माल येईल

ते पुर्ण गाणे संपेपर्यंत एकही जण साधा उभाही राहिला नाही.. अन्यथा बरेचदा पब्लिक उभी राहून, किंवा रेंगाळत चालत हे बघते.
हे मी गेले होते त्यावेळी पण होते,

सगळे इतके आग्रह करत आहे तर बायकोला सांगाव लागेल बघ म्हणुन.... तेव्हडच मला पुस्तक वाचायला वेळ मिळेल. Happy

>>एक पारायण शाहरुखप्रेमी माबोकर गटगमध्ये होऊन जाऊ देत की<<

ऑन अ सिरियस नोट.... जर ह्यामुळे हे घडणार असेल, तर असा एखादा शो नक्कीच मारुन टाकू !!

Pages