वेगवान चेन्नई एक्स्प्रेस (Movie Review - Chennai Express)

Submitted by रसप on 9 August, 2013 - 03:10

झुळझुळ वाहणारं पाणी खळखळ नाद करतं. एक चैतन्य, उत्साह निर्माण करतं. कधी त्याचा फेसाळ, दुधाळ रंग चित्तवेधक असतो तर कधी त्याच्या स्वच्छ प्रवाहातून दिसणारा तळ ! पण हेच पाणी साचून राहिलं की ? नकोसंही होतं.
प्रवासही प्रवाही असायला हवा. कुठेही अडून राहावं लागलं, खोळंबा झाला की नकोसं होतं. दिशा चुकली, भरकटली की संयम सुटतो. गती ही प्रवासासाठी अत्यावश्यक.
'चेन्नई एक्स्प्रेस' हा एक गतिमान प्रवास आहे. ही गाडी कुठेही 'सायडिंग'ला पडत नाही. औरंगाबाद-पुणे रेल्वे दौंड मार्गे जाऊन ८ तास खाते, तशी ही चेन्नई एक्स्प्रेस वेड्यासारखी भरकटत नाही. ह्या गाडीचं तिकीट काढताना आपल्याला माहित असतं की ही कुठल्या मार्गाने जाणार आहे, किती थांबे आहेत, किती वेळ लागणार आहे आणि अर्थातच कुठून सुरु व कुठे संपणार आहे. सगळं काही माहित असतानाही हा प्रवास कंटाळवाणा होत नाही. डब्यातल्या शौचालयाच्या वासाने गुदमरायलाही होत नाही आणि विदाउट तिकीट चढलेल्या उपऱ्या लोकांचा त्रासही होत नाही.

गाडी मुंबईहून सुरु होते. जसा अमिताभ 'विजय' असायचा, तसा शाहरुख 'राज' किंवा 'राहुल' असतो. इथे तो राहुल आहे. भूमिकेत शा.खा. फिट्ट होण्यापेक्षा भूमिका शा. खा. साठी फिट्ट व्हावी म्हणून आधीच सांगून ठेवलेलं आहे की तो चाळीशीचा आहे. वयस्कर व्यक्तिची प्रेमकहाणी दाखवायची आहे म्हणून त्याचं आधी एखादं लग्न झालेलं आणि बायको गचकलेली वगैरे भावनिक ठिगळं इथे नाहीत. आई-बापाविना वाढवलेल्या नातवावरील अपार प्रेमासमोर, आजोबा नातवाचं लग्न वगैरे क्षुल्लक गोष्टी बाजूला ठेवतात, इतकंच. सचिन तेंडुलकरचे परमचाहते असलेले राहुलचे आजोबा, स्वत:च्या शंभराव्या वाढदिवशी भारत-पाकिस्तान सामना पाहत असतात. सचिन आणि आजोबा दोघेही ९९ वर असतात आणि एक चेंडू दोघांचीही विकेट काढतो. तिकडे पाकिस्तानी खेळाडू सुटकेचा निश्वास टाकतात आणि इकडे राहुल मुक्त हवेत मोकळा श्वास घेतो. मित्रांसोबत आधीच ठरलेला गोव्याला जायचा प्लान 'ऑन' ठेवतो आणि तयारी करतो. पण आजोबांची एक विचित्र इच्छा असते. त्यांच्या अर्ध्या अस्थींचं विसर्जन गंगेत आणि अर्ध्या अस्थींचं विसर्जन रामेश्वरमला करावं ! (ही अशी इच्छा का असते ? ह्याचं कारण/ संदर्भ कुठेच मिळणार नाही. बस्स. असते. कारण चित्रपट पुढे जायचा असतो.) राहुलला आजीला दाखवण्यासाठी चेन्नई एक्स्प्रेसने जाण्याचं नाटक करावं लागतं. प्रत्यक्षात कल्याणला उतरून, मित्रांसोबत गोव्याला जाऊन तिथेच अस्थि विसर्जित करण्याचा नतद्रष्ट प्लान केला जातो. मृत व्यक्तीच्या भावनांशी खेळ केल्याबद्दल त्याला तळतळाट लागतो आणि सगळ्या प्लानचा खेळखंडोबा होतो. चालू गाडीतून उतरताना मिनम्मा (दीपिका) गाडीसोबत धावताना त्याला दिसते. हात देऊन तो तिला आत घेतो. (असा सीन चित्रपटात असणार हे मला आधीच माहित होतं आणि त्याला पार्श्वसंगीत काय असेल, हे तुम्हालाही नक्कीच माहित आहे.) दीपिकापाठोपाठ ३-४ सांडसदृश मनुष्यसुद्धा धावत येतात आणि त्यांनाही राहुल आत घेतो. दीपिका एका डॉन (सत्यराज) ची मुलगी असते, 'थंगबली' (निकितिन धीर) नामक होतकरू डॉनशी होऊ घातलेल्या लग्नापासून ती पळालेली असते, हे आपल्याला ट्रेलरमधूनच माहित झालेलं असतं. पुढे सगळे जण तमीळनाडूतल्या त्यांच्या गावी येतात आणि परिस्थितीशरण राहुललाही त्यांच्यासोबत यावंच लागतं. निकितिन हा खरं तर 'शाखातिन' आहे. (शा. खा. X ३ इतका धिप्पाड) त्यामुळे इथून पुढे पळापळी असणार असते. होते. आणि सगळ्या धावपळीनंतर, काही गाड्या-माणसं उडून-उडवून झाल्यानंतर कहाणी अपेक्षित शेवटाला पोहोचते.

chennai-express-movie.jpg

चेन्नई एक्स्प्रेस ही काही रोलर कोस्टर राईड नाही. लागणारे धक्के पोटात गोळा आणत नाहीत. पण ही अगदीच संथगती ट्रामही नाही. काही सिनेमे सुरु होण्याआधीच 'आपकी यात्रा आनंददायी एवं सुखकाकरक हो, यही हमारी शुभकामानायें' वाली भारतीय रेलची अनाउन्समेण्ट करतात. तसाच चे.ए. आहे.

तमिळनाडू म्हणून दाखवलेला भाग गोवा असावा, असं वाटलं. कोम्बण गावाला जाण्यासाठी जिथे ट्रेन थांबवली जाते, तो बहुतेक गोवा-कर्नाटक सीमेवरचा नयनरम्य दुधसागर धबधबा असावा, असंही वाटलं.

दीपिकाच्या 'मिनम्मा'च्या अ‍ॅक्सेन्टवरून बरेच लिहिले-बोलले गेले आहे. हा अ‍ॅक्सेन्ट खरोखर तमीळ आहे की मल्याळी माहित नाही. पण तो काही काळ गंमतीशीर वाटतो. तिच्यासोबत राहून राहून राहुल थोडंसं तमिळ बोलायला लागतो तरी तिचा अ‍ॅक्सेन्ट जराही बदलत नाही. शेवटी शेवटी तिने जपलेलं ते बेअरिंग बोअरिंग वाटायला लागतं. पण दिसलीय लै भारी ! Happy
शा. खा. 'जतहैंजा'मध्ये दिसला त्यापेक्षा तरूण दिसलाय आणि त्यामुळे चाळीशीचाच (Not more) वाटलाय. शा. खा. ह्या चित्रपटाची जान आहे. बाकी काहीही असलं, तरी त्याचा उत्साह नेहमीच बेजोड असतो. (त्या उत्साहापोटी तो बरेचदा ओव्हर अ‍ॅक्टिंग करतो, हा भाग वेगळा) त्याचा उत्साह पडदा व्यापतो. विनोदनिर्मितीत अनेक ठिकाणी अचूक टायमिंग त्याने साधले आहे. एकंदरीत मला शा. खा. आवडला असेल अश्या काही मोजक्या चित्रपटांत मी चे.ए. ला मोजेन ! (Have I made it too large??)
साऊथ इंडियन पार्टी आणि निकीतीन धीरला विशेष काम नाहीये. जे आहे, जितकं आहे, ते आणि तितकं ते व्यवस्थित निभावतात.
कॉलीवूडमध्ये नावाजलेला 'सत्यराज' त्याच्या शारीरिक अभिनय व भेदक नजरेने लक्षात राहतो. ह्या अभिनेत्याला हिंदीत अधिकाधिक संधी मिळावी, असे वाटते.

संगीत विशाल-शेखरचं आहे. संपूर्ण स्कोअरवर पुन्हा एकदा विचार करावा, अशी शा. खा. आणि रोहित शेट्टीची इच्छा वजा मागणी होती आणि अर्थातच त्यासाठी विशाल-शेखरने विनम्र नकार दिला होता म्हणे. बरोबरच आहे. विशाल-शेखर ह्याहून चांगले काम करतील अशी आशा वाटणेच चुकीचे आहे. कुठलेच गाणे लक्षात राहील असे दमदार नाही. प्रत्येक गाणे कुठल्या न कुठल्या गाण्याची नक्कल किंवा दोन-तीन गाण्यांची भेसळ वाटते. चांगल्या संगीताची अपेक्षा रहमानशिवाय इतर कुणाकडून करावी का ? असा प्रश्न आजकाल पडायला लागला आहे.

रोहित शेट्टीचे सिनेमे वैचारिक उंची गाठत नसतातच. ते अगदीच वैचारिक दिवाळखोरीसुद्धा दाखवत नाहीत. नर्मविनोदाचा जमाना गेला आहे. आताचा विनोद अंगावर आपटतो आणि शेट्टी इज मास्टर ऑफ इट. अनेक प्रासंगिक विनोद मस्त जमले आहेत. अनावश्यक पसारा न करता कहाणीला वेग देण्यावर लक्ष केंद्रित केल्याचं जाणवतं आणि त्यामुळेच पटकथेतल्या काही 'भोकां'कडे लक्ष जात नाही. जसं - कल्याणचा प्लान बदलून कर्जतला भेटणार असलेला आपला मित्र आला नाही. त्याचा फोन लागत नाही. ह्याची काळजी न वाटून, काहीच न करण्याच्या वयाचे राहुलचे मित्र नसतात. चाळीशीत इतपत तर समज येते, नाही का ? मोबाईल फोन जवळ नाही, पण एखादा नंबरही पाठ नसतो, असं नसतं ना ? किमान घरचा नंबर तरी प्रत्येकालाच पाठ असतो.

एकंदरीत चे. ए. एकदा बघायला नक्कीच हरकत नसावी, (शा. खा. भक्त पारायणंहीकरू शकतील) असा नक्कीच आहे. फक्त चित्रपटाचं तिकीट आणि रेल्वेचं खरंखुरं तिकीट एकाच किमतीचं नसावं !

रेटिंग - * * १/२
http://www.ranjeetparadkar.com/2013/08/movie-review-chennai-express.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोहित शेट्टीचे सिनेमे वैचारिक उंची गाठत नसतातच. ते अगदीच वैचारिक दिवाळखोरीसुद्धा दाखवत नाहीत. >>
ट्रेलरमधूनच वैचारिक दिवाळखोरी दिसतेय.. तुम्ही पिच्चर पहायची हिंमत केल्याबद्दल अन पुन्हा त्याची तारीफ केल्याबद्दल तुम्हाला माझ्याकडून ***** Wink Happy

शा. खा. ह्या चित्रपटाची जान आहे. बाकी काहीही असलं, तरी त्याचा उत्साह नेहमीच बेजोड असतो. (त्या उत्साहापोटी तो बरेचदा ओव्हर अ‍ॅक्टिंग करतो, हा भाग वेगळा) त्याचा उत्साह पडदा व्यापतो. >>>>> अनुमोदन
तुमचा रिव्ह्यू आहे चांगला.. म्हणजे वाचताना आली मजा. पण तरीही शाहरूखच्या चित्रपटावर आणि तेही 'चेन्नई एक्स्प्रेस'सारख्या चित्रपटावर पैसे खर्च करणं म्हणजे जरा कठीणच आहे. ( शाहरूखला सहन करण्यासाठी ३ तास कोण वाया घालवणार ?)
दीपिका या चित्रपटापेक्षा ओम शांती ओम, लव्ह आज और कल आणि ये जवानी है दिवानी मध्ये जास्त चांगली दिसली होती.

उत्साहापोटी तो बरेचदा ओव्हर अ‍ॅक्टिंग करतो >>>>

यातील "बरेचदा" या शब्दावरच आक्षेप आहे. फौजीनंतर त्याने कधी अ‍ॅक्टींग केली असं वाटत नाही. शारुक ४० चा दाखवला हे बरं केलं. बाकी पैसे आणि वेळ घालवायचा नाही, म्हणुन बघणार नाहीच.

तुम्ही बघितला आणि सहन केला आणि कुठेही टर्र उडवली नाही, याबद्दल ***** Happy

शाब्बास पठ्ठे !!

माझा हुरूप वाढवला कि राव तुम्ही .. आज दुपारच्या शो ला जातोय... ५० वाली तिकिट काढली आहेत पण १०० वसूल होणार असा दिसतंय..

आज दुपारच्या शो ला जातोय... ५० वाली तिकिट काढली आहेत पण १०० वसूल होणार असा दिसतंय..>>>>>>>>>अहो गुलाम चोर रात्रीच्या शोला जा, नाहीतरी तुम्हाला रात्री झोप लगत नाही ना...........

दिपीका जराही तामिळ उच्चार जमले नाहीत..
तिने मिसेस अय्यर मध्ये कोंकणा सेनला पहावे.... अतिशय सहजतेने ती बोलते. खास करून युशाली(usually)
आणि मिनाक्षी चे स्पेलिंग सांगताना.. डब्बळ ई...

इथे दीपिका एकदम ओढून ताणून तोंड उगाच वाकडं करून बोलते ते एकदम अचाट वाटते.

मूवी उद्या बघणार! अपेक्षा कल भी नही थी, आज भी नही है, परसो वा तेरसो भी नही रहेगी शाखाच्या मूवीजमध्ये ह्याची खात्री पक्की है हमको...(फक्त फौजी, चक दे ईंडीया, स्वदेश सोडून).

मै कल जाता और बताता मा..... कुसी तो नही होगी ऐसाइच बोलनेमे मा.. पर क्या करता मै मा... Proud

शाखा असूनही आवडला. १००% मनोरंजन करतो. शाखाचा अभिनय अफलातून. दीपिकानेही चक्क अभिनय केलाय आणि दिसलीय सुंदर. या सुपरफास्ट ट्रेनचं क्लायमॅक्सचं स्टेशन मात्र अपेक्षाभंग करतं. एक दोन गाणी गुणगुणाविशी वाटणारी. बाकि आनंद आहे. छायाचित्रणाला दाद द्यायला हवी. ट्रेन क्वीन्स नेकलेसच्या आकारात थांबते तो शॉट पैसा वसूल आहे. आयटेम सॉंगला फाटा दिल्याबद्दल शेट्टीला धन्यवाद. सिंघमची साउथ स्पेशल नॉनसेन्स अ‍ॅक्शन सिनेमा साउथ मध्ये घडत असूनही सुसह्य केल्याबद्दल पुन्हा एकदा आभार... अती तिथं माती हे शेट्टीला समजलेलं दिसतंय. Happy

मी सुद्धा उद्याच्या चेन्नई एक्स्प्रेसचे आरक्षण केले आहे... परीक्षण आल्यावर या धाग्यावर जमल्यास देईनच... टिपिकल शाहरुखपट आहे हेच चित्रपट बघण्यासाठी पुरेसे आहे.. रोहित शेट्टीने अजय देवगण सारख्या कडून अतरंग कॉमेडी करवून घेतली असल्याने शाहरुखच्या जोडीने काय दिवे लावलेत हे बघण्यास उत्सुक आहे.. Happy

ब घ णा र!!!

रसप, मी मधला अख्खा पॅरा वाचायचा दिला सोडून, शेवटच्या कॉमेण्ट्स वाचल्या फक्त!

आधी आपणच घाईघाईत सगळं वाचायचं आणि मग स्पॉयलर अलर्ट का नाही टाकलंत म्हणून भांडायचं त्यापेक्षा स्टोरीच न वाचलेली बरी!
Lol Lol

अप्पडिया? मूव्ही वरांगा? वर्थ वॉचिंग मा? रूम्बा कष्ट नल्लामा? Proud

मी थेटरात जाऊन बघू की नको या द्विधा मनस्थितीत आहे. शेजारणीला बघायचाच आहे. त्यामुळे तिच्यासोबत म्हणून मी जाईन. Happy तिने माझ्यासोबत मार्यन आणि कडल बघितले. त्याची परतफेड म्हणून.

मागच्याच वेळेला सिंघम २ पाहिलाय. आता परत तसलेच अ‍ॅक्शन सीन्स असेल तर पहायला नको. पण शाहरूख खानचं कॉमिक टायमिंग चांगलंच आहे. येस बॉस आणि फिर भी दिल है हिन्दुस्तानी मधे धमाल उडवली होती त्याने. या चित्रपटात तेवढी कॉमेडी आहे का? फालतू इमोशनल आणि रोम्यान्टिक सीन्स असतील तरी वैताग.

दीपिकाबद्दल चित्रपट बघेपर्यंत नो कमेंट्स. Happy

छान लिहिलय रसप .
आपल्याला तर फुल टू आवडला . सगळ थिअ‍ॅटरही पहिला पूर्ण हाफ खिदळत होत .
सेकंड हाफ आणी त्यातल्या त्यात शेवट आवडण / नावडण ज्याच्या त्याच्यावर आहे .
रोहित शेट्टीच्या मानाने बराच लॉजिकल आहे Happy
शा. खा. भक्त असल्यामुळे उदया आणखी एकदा पारायणंही होणारच आहे Happy
एखाद्याला शाहरूख आवडण न आवडण हा त्याचा प्रश्न आहे , पण उगाचच तो आहे म्हणून आधीच पिक्चर डबडा याला काही अर्थ नाही .

मी जरा जास्तच तत्ववादी आहे चित्रपट बघण्याबद्दल......फक्त मराठी चित्रपट थिएटर मध्ये पाहते....हिंदी फक्त टी.व्ही. वरच. त्यामुळे टी.व्ही.वर येईल तेव्हा बघून मग मत देईन. Happy

या चिञपटाचे इतक (Over) Promotion झाले आहे की आता चिञपट पाहण्याची इच्छा होत नाही.

उद्याची तिकिटे काढली आहेत.

अवांतर,,
संगीत विशाल-शेखरचं आहे. संपूर्ण स्कोअरवर पुन्हा एकदा विचार करावा, अशी शा. खा. आणि रोहित शेट्टीची इच्छा वजा मागणी होती आणि अर्थातच त्यासाठी विशाल-शेखरने विनम्र नकार दिला होता म्हणे>>>>>>>
इंडियन आयडॉल ज्युनियर च्या "चेन्नई एक्सप्रेस" च्या प्रमोशनसाठी शाहरुख, दिपीका आणि रोहित शेट्टी आलेले असताना विशाल-शेखर (परीक्षक) याना अतिमह्त्वाचे काम का आले आणि ते का अनुपस्थित होते याचे रहस्य आता उलगडले. धन्यवाद.
अर्थात फिल्म इंडस्ट्रीत पर्मनंट मित्र किंवा शत्रु नसतात हेही खरेच आहे म्हणा.

तमिळनाडू म्हणून दाखवलेला भाग गोवा असावा, असं वाटलं. कोम्बण गावाला जाण्यासाठी जिथे ट्रेन थांबवली जाते, तो बहुतेक गोवा-कर्नाटक सीमेवरचा नयनरम्य दुधसागर धबधबा असावा, असंही वाटलं.

>>>>> हो रसप तुझे ऑबर्व्हेशन एकदम बरोबर आहे. कोम्बण गावाला जाण्यासाठी जिथे ट्रेन थांबवली जाते ते स्टेशन म्हणजे लोंढ्याच्या पुढील कॅसलरॉक स्टेशन आहे. बॅकग्राऊंडला दिसतो तो सुंदर नयनरम्य दुधसागर धबधबाच आहे. त्या टी. सी. ला पुलावरुन खाली फेकतात तो सुध्धा गोव्यातील कोकण रेल्वे वरील पुल आहे.

तसेच कोम्बण / कम्बण गाव किंवा शाहरुख व दिपीका ज्या गावात जाऊन नवरा-बायको म्हणून राहतात ते तर कोयनेचे बॅकवॉटर असावे असे वाटते. (बामणोली - तापोळा रस्त्यावर ते लोकेशन असावे असे वाटतेय. कारण बॅकग्राऊंडला वासोटा असावा असे वाटते.)

शाखा आणि डीपी मधला संवाद हिंदी गाण्यांच्या चालीवर होतो हा भाग रोहित शेट्टी चा चित्रपट असल्याची जाणिव देत. तसेच रो शेट्टी स्पेशल, गाड्यांची पाडापाडी आहेच, शाखानला देखील स्वताच्या जुन्या चित्रपटातील आठवणी अधूनमधून पेराव्याश्या वाटतात ते पाहून नटसम्राट मधील आप्पासाहेब बेलवलकर कसे स्वताच्या नाटकातील पद्य म्हणत गतस्मृतीना उजाळा देत त्याची आठवण झाली . तामिळनाडूमधील हिरव सौदर्य दिसेल अशी अपेक्षा करू नका बराचसा चित्रपट सातारा, वाई जवळ चित्रित झाला आहे , एकदाच पहाणेबल आहे, आवर्तन करणे कठीण!

बराचसा चित्रपट सातारा, वाई जवळ चित्रित झाला आहे ,>>> असे का बरे? पिक्चरचे बजेट चिक्कार नक्कीच असणार. आणि तमिळनाडू हा काही अगदीच दुर्गम भाग नाही, जिथे चित्रीकरणाच्या सोयीच नसतील. तरीपण चित्रपट वाईजवळ कशाला शूट केलाय?

तरीच इकडे कालपासून चेन्नई एक्स्प्रेस वर लोकं चिडलेली आहेत. Happy तमीळी संस्कृतीची चेष्टा केली आहे असं त्यांचं म्हणणं.

<<< तरीपण चित्रपट वाईजवळ कशाला शूट केलाय?>>>>कल्पना नाही पण सुरुवातीलाच स्पेशल थंक्स मध्ये गोवा , सातारा अस लिहील आहे , आणि सातारा म्हणजे रोहित शेट्टी स्पेशल वाई आलच. Happy

छान रीव्ह्यू.
आजच पाहिला. चक दे नंतर पहिल्यांदा शाहरुखचा चित्रपट थेटरमध्ये जाऊन पाहिला. बराच सुसह्य आहे शाहरुख आणि चित्रपटही. शाहरुख क्लोज-अप्समध्ये मात्र अगदी मार खातो, खप्पड गाल, गळ्याचं वरखाली होणारं हाड आणि भावनिक संवादात ओठ मुडपून बोलणे वैताग आणते.
कॉमेडी टायमिंग झकास. भाषिक कोलांट्या आणि गाण्यात बोलणे अशा सीन्स वेळी खरेच हसू येते. ट्रेन आणि धबधबा सीन खूपच जबरदस्त. दीपिका खूप सुंदर दिसलीय. मलातरी तिच्या अ‍ॅक्सेंटचा त्रास झाला नाही संवाद ऐकताना. एखाददुसरे गाणे आणि जरा शेवट वगळता बाकी गतीही सुसाटच आहे त्यामुळे नो कंटाळा आणि डोके सिनेमाहॉलमध्ये जाताना सिक्युरीटीकडे सोपवून गेलात तर नो हेडेक त्यामुळे पैसा वसूलच Happy

जान्हवी....,
शा. खा. ह्या चित्रपटाची जान आहे. बाकी काहीही असलं, तरी त्याचा उत्साह नेहमीच बेजोड असतो. (त्या उत्साहापोटी तो बरेचदा ओव्हर अ‍ॅक्टिंग करतो, हा भाग वेगळा) त्याचा उत्साह पडदा व्यापतो. ------- चौपट अनुमोदन

अन्कुरी, मी रिलीज होणारा जवळपास प्रत्येक सिनेमा पाहतो.. रात्रीच्या शोचं तिकीट काढायचं म्हणजे मल्टीप्लेक्स ला जाणं आलं. दर वीकेंड ला मल्टीप्लेक्स ला सिनेमा बघायचा म्हणजे खरोखरच मला (चोर) नावाला जागावं लागेल, आणि आधी एरव्ही जे जागणं सुरु आहे तेच नको झालंय.

Pages