वेगवान चेन्नई एक्स्प्रेस (Movie Review - Chennai Express)

Submitted by रसप on 9 August, 2013 - 03:10

झुळझुळ वाहणारं पाणी खळखळ नाद करतं. एक चैतन्य, उत्साह निर्माण करतं. कधी त्याचा फेसाळ, दुधाळ रंग चित्तवेधक असतो तर कधी त्याच्या स्वच्छ प्रवाहातून दिसणारा तळ ! पण हेच पाणी साचून राहिलं की ? नकोसंही होतं.
प्रवासही प्रवाही असायला हवा. कुठेही अडून राहावं लागलं, खोळंबा झाला की नकोसं होतं. दिशा चुकली, भरकटली की संयम सुटतो. गती ही प्रवासासाठी अत्यावश्यक.
'चेन्नई एक्स्प्रेस' हा एक गतिमान प्रवास आहे. ही गाडी कुठेही 'सायडिंग'ला पडत नाही. औरंगाबाद-पुणे रेल्वे दौंड मार्गे जाऊन ८ तास खाते, तशी ही चेन्नई एक्स्प्रेस वेड्यासारखी भरकटत नाही. ह्या गाडीचं तिकीट काढताना आपल्याला माहित असतं की ही कुठल्या मार्गाने जाणार आहे, किती थांबे आहेत, किती वेळ लागणार आहे आणि अर्थातच कुठून सुरु व कुठे संपणार आहे. सगळं काही माहित असतानाही हा प्रवास कंटाळवाणा होत नाही. डब्यातल्या शौचालयाच्या वासाने गुदमरायलाही होत नाही आणि विदाउट तिकीट चढलेल्या उपऱ्या लोकांचा त्रासही होत नाही.

गाडी मुंबईहून सुरु होते. जसा अमिताभ 'विजय' असायचा, तसा शाहरुख 'राज' किंवा 'राहुल' असतो. इथे तो राहुल आहे. भूमिकेत शा.खा. फिट्ट होण्यापेक्षा भूमिका शा. खा. साठी फिट्ट व्हावी म्हणून आधीच सांगून ठेवलेलं आहे की तो चाळीशीचा आहे. वयस्कर व्यक्तिची प्रेमकहाणी दाखवायची आहे म्हणून त्याचं आधी एखादं लग्न झालेलं आणि बायको गचकलेली वगैरे भावनिक ठिगळं इथे नाहीत. आई-बापाविना वाढवलेल्या नातवावरील अपार प्रेमासमोर, आजोबा नातवाचं लग्न वगैरे क्षुल्लक गोष्टी बाजूला ठेवतात, इतकंच. सचिन तेंडुलकरचे परमचाहते असलेले राहुलचे आजोबा, स्वत:च्या शंभराव्या वाढदिवशी भारत-पाकिस्तान सामना पाहत असतात. सचिन आणि आजोबा दोघेही ९९ वर असतात आणि एक चेंडू दोघांचीही विकेट काढतो. तिकडे पाकिस्तानी खेळाडू सुटकेचा निश्वास टाकतात आणि इकडे राहुल मुक्त हवेत मोकळा श्वास घेतो. मित्रांसोबत आधीच ठरलेला गोव्याला जायचा प्लान 'ऑन' ठेवतो आणि तयारी करतो. पण आजोबांची एक विचित्र इच्छा असते. त्यांच्या अर्ध्या अस्थींचं विसर्जन गंगेत आणि अर्ध्या अस्थींचं विसर्जन रामेश्वरमला करावं ! (ही अशी इच्छा का असते ? ह्याचं कारण/ संदर्भ कुठेच मिळणार नाही. बस्स. असते. कारण चित्रपट पुढे जायचा असतो.) राहुलला आजीला दाखवण्यासाठी चेन्नई एक्स्प्रेसने जाण्याचं नाटक करावं लागतं. प्रत्यक्षात कल्याणला उतरून, मित्रांसोबत गोव्याला जाऊन तिथेच अस्थि विसर्जित करण्याचा नतद्रष्ट प्लान केला जातो. मृत व्यक्तीच्या भावनांशी खेळ केल्याबद्दल त्याला तळतळाट लागतो आणि सगळ्या प्लानचा खेळखंडोबा होतो. चालू गाडीतून उतरताना मिनम्मा (दीपिका) गाडीसोबत धावताना त्याला दिसते. हात देऊन तो तिला आत घेतो. (असा सीन चित्रपटात असणार हे मला आधीच माहित होतं आणि त्याला पार्श्वसंगीत काय असेल, हे तुम्हालाही नक्कीच माहित आहे.) दीपिकापाठोपाठ ३-४ सांडसदृश मनुष्यसुद्धा धावत येतात आणि त्यांनाही राहुल आत घेतो. दीपिका एका डॉन (सत्यराज) ची मुलगी असते, 'थंगबली' (निकितिन धीर) नामक होतकरू डॉनशी होऊ घातलेल्या लग्नापासून ती पळालेली असते, हे आपल्याला ट्रेलरमधूनच माहित झालेलं असतं. पुढे सगळे जण तमीळनाडूतल्या त्यांच्या गावी येतात आणि परिस्थितीशरण राहुललाही त्यांच्यासोबत यावंच लागतं. निकितिन हा खरं तर 'शाखातिन' आहे. (शा. खा. X ३ इतका धिप्पाड) त्यामुळे इथून पुढे पळापळी असणार असते. होते. आणि सगळ्या धावपळीनंतर, काही गाड्या-माणसं उडून-उडवून झाल्यानंतर कहाणी अपेक्षित शेवटाला पोहोचते.

chennai-express-movie.jpg

चेन्नई एक्स्प्रेस ही काही रोलर कोस्टर राईड नाही. लागणारे धक्के पोटात गोळा आणत नाहीत. पण ही अगदीच संथगती ट्रामही नाही. काही सिनेमे सुरु होण्याआधीच 'आपकी यात्रा आनंददायी एवं सुखकाकरक हो, यही हमारी शुभकामानायें' वाली भारतीय रेलची अनाउन्समेण्ट करतात. तसाच चे.ए. आहे.

तमिळनाडू म्हणून दाखवलेला भाग गोवा असावा, असं वाटलं. कोम्बण गावाला जाण्यासाठी जिथे ट्रेन थांबवली जाते, तो बहुतेक गोवा-कर्नाटक सीमेवरचा नयनरम्य दुधसागर धबधबा असावा, असंही वाटलं.

दीपिकाच्या 'मिनम्मा'च्या अ‍ॅक्सेन्टवरून बरेच लिहिले-बोलले गेले आहे. हा अ‍ॅक्सेन्ट खरोखर तमीळ आहे की मल्याळी माहित नाही. पण तो काही काळ गंमतीशीर वाटतो. तिच्यासोबत राहून राहून राहुल थोडंसं तमिळ बोलायला लागतो तरी तिचा अ‍ॅक्सेन्ट जराही बदलत नाही. शेवटी शेवटी तिने जपलेलं ते बेअरिंग बोअरिंग वाटायला लागतं. पण दिसलीय लै भारी ! Happy
शा. खा. 'जतहैंजा'मध्ये दिसला त्यापेक्षा तरूण दिसलाय आणि त्यामुळे चाळीशीचाच (Not more) वाटलाय. शा. खा. ह्या चित्रपटाची जान आहे. बाकी काहीही असलं, तरी त्याचा उत्साह नेहमीच बेजोड असतो. (त्या उत्साहापोटी तो बरेचदा ओव्हर अ‍ॅक्टिंग करतो, हा भाग वेगळा) त्याचा उत्साह पडदा व्यापतो. विनोदनिर्मितीत अनेक ठिकाणी अचूक टायमिंग त्याने साधले आहे. एकंदरीत मला शा. खा. आवडला असेल अश्या काही मोजक्या चित्रपटांत मी चे.ए. ला मोजेन ! (Have I made it too large??)
साऊथ इंडियन पार्टी आणि निकीतीन धीरला विशेष काम नाहीये. जे आहे, जितकं आहे, ते आणि तितकं ते व्यवस्थित निभावतात.
कॉलीवूडमध्ये नावाजलेला 'सत्यराज' त्याच्या शारीरिक अभिनय व भेदक नजरेने लक्षात राहतो. ह्या अभिनेत्याला हिंदीत अधिकाधिक संधी मिळावी, असे वाटते.

संगीत विशाल-शेखरचं आहे. संपूर्ण स्कोअरवर पुन्हा एकदा विचार करावा, अशी शा. खा. आणि रोहित शेट्टीची इच्छा वजा मागणी होती आणि अर्थातच त्यासाठी विशाल-शेखरने विनम्र नकार दिला होता म्हणे. बरोबरच आहे. विशाल-शेखर ह्याहून चांगले काम करतील अशी आशा वाटणेच चुकीचे आहे. कुठलेच गाणे लक्षात राहील असे दमदार नाही. प्रत्येक गाणे कुठल्या न कुठल्या गाण्याची नक्कल किंवा दोन-तीन गाण्यांची भेसळ वाटते. चांगल्या संगीताची अपेक्षा रहमानशिवाय इतर कुणाकडून करावी का ? असा प्रश्न आजकाल पडायला लागला आहे.

रोहित शेट्टीचे सिनेमे वैचारिक उंची गाठत नसतातच. ते अगदीच वैचारिक दिवाळखोरीसुद्धा दाखवत नाहीत. नर्मविनोदाचा जमाना गेला आहे. आताचा विनोद अंगावर आपटतो आणि शेट्टी इज मास्टर ऑफ इट. अनेक प्रासंगिक विनोद मस्त जमले आहेत. अनावश्यक पसारा न करता कहाणीला वेग देण्यावर लक्ष केंद्रित केल्याचं जाणवतं आणि त्यामुळेच पटकथेतल्या काही 'भोकां'कडे लक्ष जात नाही. जसं - कल्याणचा प्लान बदलून कर्जतला भेटणार असलेला आपला मित्र आला नाही. त्याचा फोन लागत नाही. ह्याची काळजी न वाटून, काहीच न करण्याच्या वयाचे राहुलचे मित्र नसतात. चाळीशीत इतपत तर समज येते, नाही का ? मोबाईल फोन जवळ नाही, पण एखादा नंबरही पाठ नसतो, असं नसतं ना ? किमान घरचा नंबर तरी प्रत्येकालाच पाठ असतो.

एकंदरीत चे. ए. एकदा बघायला नक्कीच हरकत नसावी, (शा. खा. भक्त पारायणंहीकरू शकतील) असा नक्कीच आहे. फक्त चित्रपटाचं तिकीट आणि रेल्वेचं खरंखुरं तिकीट एकाच किमतीचं नसावं !

रेटिंग - * * १/२
http://www.ranjeetparadkar.com/2013/08/movie-review-chennai-express.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रच्याकने हा सिनेमा पहाताना मला एक प्रश्न पडला.....

ती त्याला सारखं सारखं हलवाई म्हणत रहाते त्याने हलवायांच्या भावना दुखावल्या कशा नाहीत?
कारण माधुरीने बोले मोची भी खुदको सोनार है म्हणल्याने हंगामा मच गया था

ती त्याला सारखं सारखं हलवाई म्हण रहाते त्याने हलवायांच्या भावना दुखवल्या कशा नाहीत? >>> रजनीकांतमुळे हिम्मत झाली नसेल. Proud

बेसिकली शाखाने हलवायाचा रोल केल्याचं त्यांनी सहन केलंच होतं. त्यामुळे ते 'हलवाई-हलवाई' बोललेलं डिवचल्यासारखं वाटलं नसेल.

झाली का इथे पण तीच चर्चा चालू... Happy ३३ नवीन पोस्टी पाहिल्यावर वाटलंच गडबड झाली म्हणून.

मयी, फॉर दॅट मॅटर, तुम्ही तरी शाहरूखला प्रत्यक्ष पाहिले आहे का???

नंदिनी... हो मी पाहिले आहे ... म्हणुनच एवढं ठामपणे बोलते आहे ...
>>>> कुठे? ते पण सांगा की. मला जरा स्टार्सबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. Happy

मी पण पाहिला! काही एवढा आवडला नाही. ज्यांना नुसत्या करमणूकीपेक्षा कथेमधेही तेवढाच इंटरेस्ट असतो त्यांना नाही आवडणार असे मला वाटते. कॉमेडीही ठिकच आहे, समहाऊ, गोलमाल सिरिज नक्कीच चांगली होती असे वाटले.
एक गमतीशीर विचार मनात आला:
शाहरुखचा डिडिएलजे आला तेव्हा दिपिका शाळकरी असेल, तेव्हा कदाचित तिने असा विचारही केला नसेल की आपण कधीतरी ह्याच हिरोबरोबर असाच एक सीन करणार आहोत म्हणून Happy

यथा प्रजा तथा कला.
अत्यंत बालिश, कथानक नसलेले, थिल्लर गाणी आणि पाचकळ विनोद असलेले चित्रपट काढून जर १००+ कोटींचा धंदा होत असेल तर कमीत कमी वेळात भरपूर पैसे कमावण्याचा याहून "पांढरा" मार्ग नसावा!

कुठे? ते पण सांगा की. मला जरा स्टार्सबद्दल प्रचंड उत्सुकता आहे >>>>>>> म्हणजे त्याला पाहू शकणार नाही असा कोणी तो दुर्मिळ ग्रह लागून गेला नाहीये Lol

तरीही सांगते …. अगदी आत्ता IPL चालू असतांना कोलकाता Airport वर तो त्याच्या मुलीसोबत मुंबई ला जाण्यासाठी म्हणून आलेला ….योगायोगाने आम्ही एकाच विंग मधून काही अंतराने चालत होतो … जवळ जवळ ५ एक मिनिट पहिले त्याला (पाहू वाटत नवते तरीही पहावे लागले) तो अतिशय कृश देहयष्टीचा, रंगाने चक्क काळा आणि दिसायला सामान्य सुद्धा नाहीये त्यापेक्षा खालीच…. त्याचे बॉडीगार्ड हि चांगले दिसत होते त्यापेक्षा …. आणि हे मस्करीत सांगत नाहीये …. १००% सत्य आहे

श्री, फार काही नाही...... पुढील बदल झाले असते :
१) एका प्रसंगात शाहरुख दिपिकाला हात देऊन गाडीत घेतो, सोनाक्षीने हात देऊन शाहरुख ला गाडीत चढवले असते
२) एका प्रसंगात शाहरुख दिपिकाला उचलून ३०० पायर्‍या चढतो, तिथे शाहरुखला वीर मरण आले, मग सोनाक्षीने रडून देवाला विचारलं की ये है सछे प्यार की किंमत तुम्हारे दरबार मे? मग देवाला करुना आली आणि शाहरुख जीवंत झाला असा एखादा प्रसंग असता
३) शेवटी शाहरुखची व्हिलन सोबत मारामारी आहे, तिथे सोनाक्षी पण शाहरुखच्या मदतीला गेली वगैरे द्रुष्य असती

इतकच! वाटल्यास अधुन मधुन ती शाहरुखला 'खामोश,खामोश' म्हणाली असती....
बास!!!!!

रच्याकने मी बर्‍याच ठिकाणी उल्लेख वाचला की दिपिकाने वेडीवाकडीतोंड केलीयेत? Uhoh कधी? एकदाच तर एकाच प्रसंगात केलीयेत
मला दिपिकाही आवडली या सिनेमात ( बहुदा पहिल्यांदाच)

तरीही सांगते …. अगदी आत्ता IPL चालू असतांना कोलकाता Airport वर तो त्याच्या मुलीसोबत मुंबई ला जाण्यासाठी म्हणून आलेला ….योगायोगाने आम्ही एकाच विंग मधून काही अंतराने चालत होतो … जवळ जवळ ५ एक मिनिट पहिले त्याला (पाहू वाटत नवते तरीही पहावे लागले) तो अतिशय कृश देहयष्टीचा, रंगाने चक्क काळा आणि दिसायला सामान्य सुद्धा नाहीये त्यापेक्षा खालीच…. त्याचे बॉडीगार्ड हि चांगले दिसत होते त्यापेक्षा …. आणि हे मस्करीत सांगत नाहीये …. १००% सत्य आहे>>>>>>>>>>>>>>

सेम सेम असच ऐकलय मी मित्राकडुन. बाकी मयी तुमच्या सगळ्याच पोस्टला +१.

दिपिका ऐवजी सोनाक्षी सिन्हा सिनेमात असती तर काय झालं असतं ?>> तो थांगबलीच आपणहून नको म्हणाला असता. मग कसला सिनेमा होणार?

शाहरुखचा डिडिएलजे आला तेव्हा दिपिका शाळकरी असेल, तेव्हा कदाचित तिने असा विचारही केला नसेल की आपण कधीतरी ह्याच हिरोबरोबर असाच एक सीन करणार आहोत म्हणून >>> Happy नाही बहुतेक ती एवढाच विचार करीत असणार Happy

तो अतिशय कृश देहयष्टीचा, रंगाने चक्क काळा आणि दिसायला सामान्य सुद्धा नाहीये त्यापेक्षा खालीच…. >>>> आणि तरीदेखील तो सुपरस्टार आहे, लोक त्याच्या सिनेम्यावर पैसे खर्च करतात (तुम्ही पण केलेच ना?) स्टार बनण्यासाठी सुंदर असून चालत नाही, "एक्स फॅक्टर" असावा लागतो. आणि तो दिसायला सामान्य आहे, म्हणजे त्याच्याकडे टॅलंट नाही असे होत नाही.

दिसायला सुंदर म्हणजे सुपरस्टार असं समीकरण असतं तर कुमार गौरव, फैझल खान (आमिरपेक्षा छान दिसायचा), राजीव कपूर, फरदीन खान इत्यादि लोक सुपरस्टार असते, आणि अमिताभ बच्चन, शाहरूख खान, इत्यादि लोक एक्स्ट्रा म्हणून काम करत असताना दिसले असते. कधीतरी मेहबूब अथवा फिल्मीस्तान सारख्या स्टुडिओअच्या बाहेर जाऊन बघा, किती चिकणे चेहरे स्टार बनण्यासाठी स्ट्रगल करत असतात.

तो अतिशय कृश देहयष्टीचा, रंगाने चक्क काळा आणि दिसायला सामान्य सुद्धा नाहीये त्यापेक्षा खालीच>> तरिही त्याचे चित्रपट बिजनेस करतात. फॅन फॉलोविन्ग जबरदस्त आहे.
कुच्च तो जादु है बॉस..

मयी। अति तिथे माती होत आहे.
शाहरूख चा फोटो तरी बघितला तर तुमचे नशिब।.. कैच्याकै बोलायचे?
मी सुरूवात केली तर किमान 20 जणांना मिर्ची लागेल.. ट्रेलर मागच्या पानावर बघितले आहेच..
तुम्ही तुमच्या सुरकुत्या पडलेल्या, बुटक्या, फेगंड्या चालीच्या आमिर ला बघून धन्य माना,,, Wink

रंगाने काळा >>>> तुम्ही रंगभेदी आरोप करत आहात,, मग रजनीकांत, धनुष सारखे आवडतच नसतील,, धन्य आहात,,,, चेहर्याला "फेअर अँड लव्हली" फासून अँक्टर होत नसतो

बालिश लिहीत आहात आता

वेडा राघू..

ते ट्रेन स्टेशन गोवा-कर्नाटक सीमेवर असलेलं 'कॅसलरॉक' स्टेशन आहे. तो धबधबा म्हणजे 'दूधसागर' धबधबा.

Pages