वेगवान चेन्नई एक्स्प्रेस (Movie Review - Chennai Express)

Submitted by रसप on 9 August, 2013 - 03:10

झुळझुळ वाहणारं पाणी खळखळ नाद करतं. एक चैतन्य, उत्साह निर्माण करतं. कधी त्याचा फेसाळ, दुधाळ रंग चित्तवेधक असतो तर कधी त्याच्या स्वच्छ प्रवाहातून दिसणारा तळ ! पण हेच पाणी साचून राहिलं की ? नकोसंही होतं.
प्रवासही प्रवाही असायला हवा. कुठेही अडून राहावं लागलं, खोळंबा झाला की नकोसं होतं. दिशा चुकली, भरकटली की संयम सुटतो. गती ही प्रवासासाठी अत्यावश्यक.
'चेन्नई एक्स्प्रेस' हा एक गतिमान प्रवास आहे. ही गाडी कुठेही 'सायडिंग'ला पडत नाही. औरंगाबाद-पुणे रेल्वे दौंड मार्गे जाऊन ८ तास खाते, तशी ही चेन्नई एक्स्प्रेस वेड्यासारखी भरकटत नाही. ह्या गाडीचं तिकीट काढताना आपल्याला माहित असतं की ही कुठल्या मार्गाने जाणार आहे, किती थांबे आहेत, किती वेळ लागणार आहे आणि अर्थातच कुठून सुरु व कुठे संपणार आहे. सगळं काही माहित असतानाही हा प्रवास कंटाळवाणा होत नाही. डब्यातल्या शौचालयाच्या वासाने गुदमरायलाही होत नाही आणि विदाउट तिकीट चढलेल्या उपऱ्या लोकांचा त्रासही होत नाही.

गाडी मुंबईहून सुरु होते. जसा अमिताभ 'विजय' असायचा, तसा शाहरुख 'राज' किंवा 'राहुल' असतो. इथे तो राहुल आहे. भूमिकेत शा.खा. फिट्ट होण्यापेक्षा भूमिका शा. खा. साठी फिट्ट व्हावी म्हणून आधीच सांगून ठेवलेलं आहे की तो चाळीशीचा आहे. वयस्कर व्यक्तिची प्रेमकहाणी दाखवायची आहे म्हणून त्याचं आधी एखादं लग्न झालेलं आणि बायको गचकलेली वगैरे भावनिक ठिगळं इथे नाहीत. आई-बापाविना वाढवलेल्या नातवावरील अपार प्रेमासमोर, आजोबा नातवाचं लग्न वगैरे क्षुल्लक गोष्टी बाजूला ठेवतात, इतकंच. सचिन तेंडुलकरचे परमचाहते असलेले राहुलचे आजोबा, स्वत:च्या शंभराव्या वाढदिवशी भारत-पाकिस्तान सामना पाहत असतात. सचिन आणि आजोबा दोघेही ९९ वर असतात आणि एक चेंडू दोघांचीही विकेट काढतो. तिकडे पाकिस्तानी खेळाडू सुटकेचा निश्वास टाकतात आणि इकडे राहुल मुक्त हवेत मोकळा श्वास घेतो. मित्रांसोबत आधीच ठरलेला गोव्याला जायचा प्लान 'ऑन' ठेवतो आणि तयारी करतो. पण आजोबांची एक विचित्र इच्छा असते. त्यांच्या अर्ध्या अस्थींचं विसर्जन गंगेत आणि अर्ध्या अस्थींचं विसर्जन रामेश्वरमला करावं ! (ही अशी इच्छा का असते ? ह्याचं कारण/ संदर्भ कुठेच मिळणार नाही. बस्स. असते. कारण चित्रपट पुढे जायचा असतो.) राहुलला आजीला दाखवण्यासाठी चेन्नई एक्स्प्रेसने जाण्याचं नाटक करावं लागतं. प्रत्यक्षात कल्याणला उतरून, मित्रांसोबत गोव्याला जाऊन तिथेच अस्थि विसर्जित करण्याचा नतद्रष्ट प्लान केला जातो. मृत व्यक्तीच्या भावनांशी खेळ केल्याबद्दल त्याला तळतळाट लागतो आणि सगळ्या प्लानचा खेळखंडोबा होतो. चालू गाडीतून उतरताना मिनम्मा (दीपिका) गाडीसोबत धावताना त्याला दिसते. हात देऊन तो तिला आत घेतो. (असा सीन चित्रपटात असणार हे मला आधीच माहित होतं आणि त्याला पार्श्वसंगीत काय असेल, हे तुम्हालाही नक्कीच माहित आहे.) दीपिकापाठोपाठ ३-४ सांडसदृश मनुष्यसुद्धा धावत येतात आणि त्यांनाही राहुल आत घेतो. दीपिका एका डॉन (सत्यराज) ची मुलगी असते, 'थंगबली' (निकितिन धीर) नामक होतकरू डॉनशी होऊ घातलेल्या लग्नापासून ती पळालेली असते, हे आपल्याला ट्रेलरमधूनच माहित झालेलं असतं. पुढे सगळे जण तमीळनाडूतल्या त्यांच्या गावी येतात आणि परिस्थितीशरण राहुललाही त्यांच्यासोबत यावंच लागतं. निकितिन हा खरं तर 'शाखातिन' आहे. (शा. खा. X ३ इतका धिप्पाड) त्यामुळे इथून पुढे पळापळी असणार असते. होते. आणि सगळ्या धावपळीनंतर, काही गाड्या-माणसं उडून-उडवून झाल्यानंतर कहाणी अपेक्षित शेवटाला पोहोचते.

chennai-express-movie.jpg

चेन्नई एक्स्प्रेस ही काही रोलर कोस्टर राईड नाही. लागणारे धक्के पोटात गोळा आणत नाहीत. पण ही अगदीच संथगती ट्रामही नाही. काही सिनेमे सुरु होण्याआधीच 'आपकी यात्रा आनंददायी एवं सुखकाकरक हो, यही हमारी शुभकामानायें' वाली भारतीय रेलची अनाउन्समेण्ट करतात. तसाच चे.ए. आहे.

तमिळनाडू म्हणून दाखवलेला भाग गोवा असावा, असं वाटलं. कोम्बण गावाला जाण्यासाठी जिथे ट्रेन थांबवली जाते, तो बहुतेक गोवा-कर्नाटक सीमेवरचा नयनरम्य दुधसागर धबधबा असावा, असंही वाटलं.

दीपिकाच्या 'मिनम्मा'च्या अ‍ॅक्सेन्टवरून बरेच लिहिले-बोलले गेले आहे. हा अ‍ॅक्सेन्ट खरोखर तमीळ आहे की मल्याळी माहित नाही. पण तो काही काळ गंमतीशीर वाटतो. तिच्यासोबत राहून राहून राहुल थोडंसं तमिळ बोलायला लागतो तरी तिचा अ‍ॅक्सेन्ट जराही बदलत नाही. शेवटी शेवटी तिने जपलेलं ते बेअरिंग बोअरिंग वाटायला लागतं. पण दिसलीय लै भारी ! Happy
शा. खा. 'जतहैंजा'मध्ये दिसला त्यापेक्षा तरूण दिसलाय आणि त्यामुळे चाळीशीचाच (Not more) वाटलाय. शा. खा. ह्या चित्रपटाची जान आहे. बाकी काहीही असलं, तरी त्याचा उत्साह नेहमीच बेजोड असतो. (त्या उत्साहापोटी तो बरेचदा ओव्हर अ‍ॅक्टिंग करतो, हा भाग वेगळा) त्याचा उत्साह पडदा व्यापतो. विनोदनिर्मितीत अनेक ठिकाणी अचूक टायमिंग त्याने साधले आहे. एकंदरीत मला शा. खा. आवडला असेल अश्या काही मोजक्या चित्रपटांत मी चे.ए. ला मोजेन ! (Have I made it too large??)
साऊथ इंडियन पार्टी आणि निकीतीन धीरला विशेष काम नाहीये. जे आहे, जितकं आहे, ते आणि तितकं ते व्यवस्थित निभावतात.
कॉलीवूडमध्ये नावाजलेला 'सत्यराज' त्याच्या शारीरिक अभिनय व भेदक नजरेने लक्षात राहतो. ह्या अभिनेत्याला हिंदीत अधिकाधिक संधी मिळावी, असे वाटते.

संगीत विशाल-शेखरचं आहे. संपूर्ण स्कोअरवर पुन्हा एकदा विचार करावा, अशी शा. खा. आणि रोहित शेट्टीची इच्छा वजा मागणी होती आणि अर्थातच त्यासाठी विशाल-शेखरने विनम्र नकार दिला होता म्हणे. बरोबरच आहे. विशाल-शेखर ह्याहून चांगले काम करतील अशी आशा वाटणेच चुकीचे आहे. कुठलेच गाणे लक्षात राहील असे दमदार नाही. प्रत्येक गाणे कुठल्या न कुठल्या गाण्याची नक्कल किंवा दोन-तीन गाण्यांची भेसळ वाटते. चांगल्या संगीताची अपेक्षा रहमानशिवाय इतर कुणाकडून करावी का ? असा प्रश्न आजकाल पडायला लागला आहे.

रोहित शेट्टीचे सिनेमे वैचारिक उंची गाठत नसतातच. ते अगदीच वैचारिक दिवाळखोरीसुद्धा दाखवत नाहीत. नर्मविनोदाचा जमाना गेला आहे. आताचा विनोद अंगावर आपटतो आणि शेट्टी इज मास्टर ऑफ इट. अनेक प्रासंगिक विनोद मस्त जमले आहेत. अनावश्यक पसारा न करता कहाणीला वेग देण्यावर लक्ष केंद्रित केल्याचं जाणवतं आणि त्यामुळेच पटकथेतल्या काही 'भोकां'कडे लक्ष जात नाही. जसं - कल्याणचा प्लान बदलून कर्जतला भेटणार असलेला आपला मित्र आला नाही. त्याचा फोन लागत नाही. ह्याची काळजी न वाटून, काहीच न करण्याच्या वयाचे राहुलचे मित्र नसतात. चाळीशीत इतपत तर समज येते, नाही का ? मोबाईल फोन जवळ नाही, पण एखादा नंबरही पाठ नसतो, असं नसतं ना ? किमान घरचा नंबर तरी प्रत्येकालाच पाठ असतो.

एकंदरीत चे. ए. एकदा बघायला नक्कीच हरकत नसावी, (शा. खा. भक्त पारायणंहीकरू शकतील) असा नक्कीच आहे. फक्त चित्रपटाचं तिकीट आणि रेल्वेचं खरंखुरं तिकीट एकाच किमतीचं नसावं !

रेटिंग - * * १/२
http://www.ranjeetparadkar.com/2013/08/movie-review-chennai-express.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चेन्नई एक्सप्रेस चित्रपटाचे काही चित्रीकरण हे वाई जवळच्या धोम आणि बलकवडी धरणाच्या परीसरात (महाबळेश्वर आणि पाचगणी) च्या पायथ्याच्या गावात झालेले आहे.आम्ही फेब्रूवारीत महाबळेश्वरला गेलो असताना केट्स पोईंटवरचा दुर्बिणवाला १५० रूपयात चित्रपटाचा सेट्स दाखवत होता..

चेन्नई एक्सप्रेस काल पाहिला
मनोरंजनात्मक चित्रपट आहे ... फार काही भव्यदिव्य आगळीवेगळी कथा नाही आहे.. मुळात कथा आणि स्क्रिप्ट ही
"थोडक्यात उत्तरे लिहा" या टाईप ची लिहिलेली आहे.. रोहित शेट्टीला प्रश्न पडतात आणि तो त्या प्रश्नांचे थोडक्यात ४-५ ओळी उत्तर लिहितो...या टाईप ची कथा बहुदा लिहिलेली आहे.. पण उगाच ठिगळ लावल्यासारखे जोड जोडले नाही हे नशिब आपले.. सरळ सोप्पी कथा... एक हिरो जो मौजमजा करायला जात असताना चुकुन एका लफड्यात अडकतो आणि त्याचे जीवन आणि नशिब दोन्ही त्यामुळे बदलते .. कथा तर "रसप"जींनी वर सांगितलीच आहे... Wink
त्यामुळे तेच तेच उगाळत बसायला अर्थ नाही .... चित्रपटावर बोलु

नकारात्मक : - ४० वर्षापर्यंत अजुन लग्न झाले नाही हिरोचे ? इतके कशात गुरफटलेला ? चला भारताच्या मोठ्या पक्षाचा वारस वगैरे असता तर एक वेळ लक्षात आले असते Wink पण आजोबांच्या बरोबर आज्जी होती ना.. ? मग जवाबदारी फक्त दुकानाचीच आहे ? चला प्रेमात बिब्बा घालण्याचे काम आजोबांनी केले तर अरेंज मॅरेज नावाची सुध्दा एक पध्दत आहे लग्नाची ..... ती का नाही वापरली कधी...? आज्जीला सुध्दा वाटले नाही का?
४० वर्षाचा आहे हिरो...ठिक आहे मग हिरोईन कशी पडते प्रेमात ? ती सुध्दा किमान३२-३४ ची दाखवायला हवी..? ती दिसते २४ ची .. असे वाटत होते की " ४६चा सलमान बरोबर २४ ची कटरिना" यांच्या प्रेमावरुन ढापलेले आहे Wink असो..
दिपीका दिसते छान सुंदर परंतु तिला तामिळ अ‍ॅक्सेंट मधे बोलताना उगाचच चेहरा वाकडा करावा लागत होता..सरळ चेहर्याने देखील बोलु शकत होती ?
निकितन ला नाही घेतला असता तर चालला असता.. शाहरुख एकदम त्याच्या समोर लय म्हनजे लयच दिसत होता.. त्याची लांबी किमान ६.५ फुट रुंदी किमान ४.५ फुट तरी असेल ( मी लाकडाच्या ओंडक्याबद्दल नाही निकितन या अभिनेत्याबद्दल बोलत आहे) .. खली समोर पोपटलाल (तारक मेहतावाला) वाटत होता...:)
त्यापेक्षा दुसरा थोडा कमी लांबीरुंदीचा घेतला असता तरी चालले असते . (खर तर पटले असते असे म्हणायला हवे)
शेवटची हाणामारी कमी करुन फक्त फोकस निकितन आणि शाहरुख वरच ठेवला तो ही थोडक्यात तर अजुन परिणामकारक झाली असती)

सकारात्मकः- चित्रपटाची सुरवात अतिशय सकारात्मक पध्दतीने झाली आहे.. ही बाब फारच कमी लोकांच्या लक्षात आली असेल (म्हणुन म्हणतो डोके घेउन जा Wink ) टायट्ल्स दाखवताना सर्वात आधी "दिपिका पदुकोण" हिचे नाव येते मग "शाहरुख खान" चे नाव येते.. देशात चाललेल्या महिलांबद्दल असलेली वैचारिक आणि मानसिक स्थितीत हा बदल नक्कीच परिणामकारक आहे याबद्दल शाहरुख खान , रोहीत शेट्टी आणि टिम चे अभिनंदन ... बदल छोटासा आहे पण.... एक पाउल पुढे पडले आहे..
या चित्रपटात महिलांच्या बाबतीत एक महत्वाची काळजी घेतली आहे.. कुठेही महिलांवर चुकिचे चित्रण अथवा उलटेसुलटे दाखवले नाही...
कुठेही दिपिकाला थिल्लर पणा अथवा अश्लिल दिसायला भाग पाडले नाही .. संपुर्ण साडीत आणि एका विशिष्ट मर्यादेत ठेवलेली आहे.. इतकेच काय तर तिचे अपहरण करणार्यांना तिचे ऐकवावे लागते आणि तिच्याशी अदब बाळगुन बोलताना दाखवले आहे.....आयटम साँग च्या नावाखाली प्रियामणी सारख्या अभिनेत्रीला फुटकळ आणि गल्ल्लाभरु हावभाव करावे लागले नाहीत... मुळात त्या गाण्याच्या वेळेच्य ४० % च दाखवली आहे.. बाकी गाणे शाहरुख आनि इतर तामिळ पुरुष लोकांवरच जास्त फोकस करण्यात आलेला आहे..
दिल्लीतल्या प्रकरणावरुन एके ठिकाणी बोलताना शाहरुख आणि रोहित यांनी स्पष्ट केलेले होते की आमच्या चित्रपटात कुठेही अनावश्यक ठिकाणी महिलांचा अपमान होईल आणि त्यांच्या प्रतिमेला तडा जाईल असे कोणतेही प्रसंग दिसणार नाहीत याची काळजी घेण्यात येईल.. .. एक प्रकारे हा सम्मान दिला गेलेला आहे.. आणि एकप्रकारचे चित्रपटात आलेली "सोफ्ट्पोर्न" ची लाट हिला किनारी लावले आहे..

तसेच चित्रपटाचे बरेचसे संवाद तामिळ मधुनच आहेत .. आता हा बदल जरा वेगळा आहे.. तामिळनाडु मधे फारसे हिंदी बोलले जातच नाही अथवा येत असले तरी उत्तर हिंदीतुन देत नाहीत .. ही झाली शहरातली परिस्थिती गाव तर अजुन जास्त असेल.. अश्यावेळेला गावातल्यांना हिंदी बोलताना दाखवतील का ? विरोधाभास नाही का वाटणार ? एकी कडे आपण असे म्हणतो की फॉरेन मधे चित्रिकरण असलेल्या चित्रपटातले लोक हिंदी कसे काय बोलतात ? इंग्लिश का नाही बोलत ? फॉरेन मधे काय हिंदी कळते का कुणाला? आणि तेच जर या सारख्या चित्रपटात बरोबर तामिळच बोलताना दाखवले तरी काही लोकांना प्रोब्लेम ? चित भी मेरी पट भी मेरीच ? Biggrin तामिळ भाषेत काय बोलणे झाले हे दिपिका अ सबटायटलर Wink हिच्या संवादातुन नंतर कळतेच काही ठिकाणी पंजाबी इंस्पेक्टर द्वारे सुध्दा हिंदीमधे भाषांतर केले आहे... संवाद बोलताना आपल्याला भावार्थ कळतोच की ? मग कशाला हवा तो अट्टाहस की हिंदी सबटाईटल्सच हवीत खाली ? मुंबई पुणे यासारखी ठिकाणी राहिलेली असल्यामुळे दिपिकाला मराठी सुध्दा चांगलेच येते ( नानाची टांग तुझ्या आईचा घो) तरी पण तिच्या भाषेतला तामिळ अ‍ॅक्सेंट जात नाही.. तो बर्याच दक्षिणभारतीय लोकांचा जात नाहीच...

मारामारीमधे सुध्दा काही ठिकाणी अतिशयोक्ती सोडली तरी रिअलिटीजवळ जाणारी आहे... गाड्या उडवणे .. कोयत्याने टायर ला मारुन ती उडवणे अश्या सारखे प्रसंग सोडले तर ठिकठाक आहे...( आता रोहित च्या चित्रपटात गाड्या नाही उडाल्या तर तो रोहीत चा चित्रपट वाटतच नाही Wink ) ६.५ फुट लांब आणि ४.५ फुट रुंद निकेतन नावाच्या दगडाशी फाईट करण्याचा विचारच अतिशयोक्ती आहे ... इथे तर होत आहे ...
तरी सुध्दा थोडेफार इमान राखुन ... एका फाईट मधे हवेत उडवणे .. एक लाथेत भिंतीचा चुरा करणे इत्यादी दक्षिणात्यछाप फाईट सिक्वेस्न ना दुर राखुन .. हिरो हाताला येईल त्या वस्तुने व्हिलन शी सामना करतो.. मग ते स्टोव असो या कोल्डड्रिंक च्या बाटल्या असो.. हातात दम नाही आपल्या हे वस्तुभान हिरोनी शेवट पर्यंत राखले आहे...

काहीकाही प्रसंग खुलवलेले आहेत.. गाण्यातुन संवाद साधण्याचा प्रसंग .. "मिन्नम्मा डोंट अंडरइस्टिमेट पॉवर ऑफ कॉमन मॅन " सारखी पंचलाईन असो.. तसेच मिन्नम्माच्या स्वप्नाच्या प्रसंगातुन तिच्या मनावर " थंगबली" ची किती भिती बसलेली आहे हे दाखवले गेले आहे... चांगले प्रसंग लिहिण्याचा प्रयत्न दिसुन आला आहे.. दर वेळी राहुल त्यांच्या तावडीतुन सुटतो परंतु नशिब त्याला परत त्यांच्याकडे घेउन येतेच...

आता चित्रपटाच्या इतर तांत्रिक बाबींकडे वळु :-

चित्रपटाचे लोकेशन्स मस्त आणि नाविन्यपुर्ण आहे.. आपल्या भारतात इतके सुंदर लोकेशन्स आहेत की त्या पुढे जगातले इतर ठिकाण सुध्दा फिके आणि ब्लॅक अँड व्हाईट वाटावे.. इतके सुंदर रंगसंगती ...ताजे तवटवितपणा... धबधबा तर निव्वळ अप्रतिमच... अक्षरश : दुधाचाच वाटतो इतका रम्य ... ओव्हरब्रिज असो या नदिवरुन / समुद्रावरुन रेल्वेचा ब्रिज असो... साधे साधे दृश्य देखील नयनरम्य वाटते... अगदी शेवटी रेल्वेचे टिकीट काढण्यासाठी ज्या स्टेशन वर जातात त्याच्या मागे सुंदर हिरवागार डोंगर आजुबाजुला बागबगिचा.. प्रेत्येक फ्रेम मधे निसर्गाचे देणे भरभरुन आहे ...सिनेमाटोग्राफर "डुड्ले" ने कॅमेराचा अप्रतिम वापर केलेला आहे.. ट्रेन वरुन चोहीबाजुने कॅमेरा ३६० डिग्रीमधे फिरवुन अँगल घेणे... या वरच्या ओव्हरब्रिज वरुन जीप जात असताना खाली असलेल्या ब्रिज वरुन ट्रेन त्याच वेळेला जाते ती टायमिंग ... मस्त घेतली आहे...
दिग्दर्शनात रोहीत त्याच्या नेहमीसारखा आहे... विनोद धमाल धुलाई...... या तिन शब्दांना त्याने पकडुन ठेवलेले आहे...
गाण्यात फारसा उल्लेखनिय कामगिरी यावेळी विशालशेखर कडुन झालेली नाहीच... "वन टु थ्री" सारखा ठेकेदार सुध्दा जास्त प्रभाव पाडत नाही..... त्यातल्या त्यात "तितली" आणि "तुझे ना छोडु" बरी झाली आहे...
चित्रपटातले सर्वात प्रभावी गाणे "लुंगी डांस" शेवटी येते.. मस्त डान्स आणि अफलातुन शब्द .. वर रजनीसर द बॉस... चारचांद वर एक चांद फ्री..... Wink

थोडक्यात

नो थिल्ल्लर पणा, नो अश्लिल गाणी, नो कपडे काढिंग अ‍ॅड बॉडी दाखविंग , नो ३र्ड क्लास डबल मिनिंग गाणी.

चित्रपट चालवण्यासाठी "शाहरुख चा उत्साह दिपिकाचा चार्म आनि रोहित ची अ‍ॅक्शन " च काफी आहे ...

जाता जाता...

पेड प्रिव्हु मधे ६.७५ करोड ची कमाई आणि पहिल्या दिवशी तब्बल ३३.५ करोड ची रेकॉर्ड ब्रेक कमाई
आणि ओव्हरसिज मधे २० ते ३५ करोड ची कमाई .. म्हणजे पहिल्याच दिवशी ६० ते ६५ करोड ची कमाई ..;)

मी पाहिला, ठिक वाटला.
काही पंचेस ठिक.

डीपिका ठिकठाक.. खूपच ओढून ताणून तामिळ डायलॉग डिलीवरी.

आणि हो, तामिळ मध्ये काहीच शूटींग नाहीये. चेन ओढून आमचे गाव आले म्हणून दूधसागर धबधब्याच्या जवळच उतरतात दाखवलेय..( तू दूधसागरच आहे)

एक वेळ बघायला ठिक.

चित्रपटाची सुरवात अतिशय सकारात्मक पध्दतीने झाली आहे.. ही बाब फारच कमी लोकांच्या लक्षात आली असेल (म्हणुन म्हणतो डोके घेउन जा डोळा मारा ) टायट्ल्स दाखवताना सर्वात आधी "दिपिका पदुकोण" हिचे नाव येते मग "शाहरुख खान" चे नाव येते.. देशात चाललेल्या महिलांबद्दल असलेली वैचारिक आणि मानसिक स्थितीत हा बदल नक्कीच परिणामकारक आहे याबद्दल शाहरुख खान , रोहीत शेट्टी आणि टिम चे अभिनंदन ... बदल छोटासा आहे पण.... एक पाउल पुढे पडले आहे..>>>>>

एका चहाच्या (जागो रे...टाटा टी???) जाहिरातीत शाहरूख एका स्त्री वार्ताहराला 'इथून पुढे माझ्या पिक्चर्समध्ये माझ्या आधी हिरोईनचे नाव येईल ' असे सांगतो. ते आठवले. Happy

थियटर मध्ये तामिळ पब्लिक ज्यास्त होते. बहुधा तामिळ मधले काही असेल असे वाटल्याने आले होते वाटतं.

मुलांना नेलं नसतं तर कदाचित इतका आवडला नसता असं वाटतय. >>>>>>>>> हेच म्हणाय्चय मला Wink

हि फिल्म लहान मुलांसाठिच आहे Lol

मग कशाला जातात म्हातारी लोक काठी टेकवत? जमत नाही तर करू नये या वयात त्यापेक्शा घरात बसुन रामनाम जपत बसा Wink

आम्ही वयाने असलो तरी बुद्धीने लहान नाहीना ….म्हणून तर असल्या माकड उड्या झेपत नाही … हल्ली कम्प्युटर युग हो आम्हाला कस काहीतरी क्रिएटीव काहीतरी बुद्धीला चालना देणारं हव असत हल्ली….उगाच नुसत्याच TP वर पैसा,एनर्जी आणि वेळ काय वाया घालवायचा ना…. Proud Wink Lol

उगाच नुसत्याच TP वर पैसा,एनर्जी आणि वेळ काय वाया घालवायचा ना…. >>> मग या धाग्यावर कशाला एनर्जी आणि वेळ वाया घालवत आहात Uhoh याला "म्हातारचळ" म्हणतात Biggrin

खास मेला चित्रपटात आमिर खान ने माकडउड्या मारल्या आहेत त्या बघा मग Wink

काल पाहिला..

मॅडकॅप कॉमेडीचे मला वावडे नाही. रोहित शेट्टीचे गोलमाल आणि गोलमाल २, ऑल द बेस्ट इ मला आवडले होते पण चेन्नई एक्सप्रेस मधे मला तेवढी मजा नाही आली. फक्त दीपिका लक्षात राहिली. पण पिक्चर वर केलेले २००० रु. (४ जणांचे) फुकट गेले असे वाटत असतानाच माझी मुलगी (वय वर्षे ८) आणि मुलगा (वय वर्षे ५) याना विचारले आवडला का? त्यावर "खुSSSSSप.. I can watch it 10 times.. 100 times" हे उत्तर मिळाले आणि माझी खर्च झालेली पै न पै वसुल झाली. Happy

मग या धाग्यावर कशाला एनर्जी आणि वेळ वाया घालवत आहात अ ओ, आता काय करायचं याला "म्हातारचळ" म्हणतात खो खो >>>>>>>>>>> म्हणजे या धाग्यावर बोलणाऱ्या सगळ्यांना म्हातारचळ लागलीये अस म्हणताय राव तुम्ही … स्वतःसकट :O Proud असो
BTW म्हातारचळचा नवा (च) अर्थ कळाला जो TP करतो त्याला म्हातारचळ लागते म्हणे Lol

काहीही का असेना … आम्हास काय … आम्ही तर बुवा हिकडे काहीतरी शिकाया मिळल म्हणून येतो….

mansmi18 माझ्या मते हा रोहित शेट्टी style नाहिये ... हा Pure शा.खा. style सिनेमा आहे ... हवं तर पुर्विचे संदर्भ जोडून बघा ...

अहो हे मस्करी मधेच आहे सगळे..........

मी फक्त उत्तर देतोय....

पर्सनली मी कधीही बोलत नाही Happy

बाजु जोरदार मांडायला आवडते फक्त.... Wink

अरे इथे पण वाद... मी कालपासून कुठेकुठे हेच करतोय Proud

उदयन, छान परीक्षण, फक्त आपल्या गाण्यांच्या आवड किंचित भिन्न, बाकी सहमत Happy

हिरोचे नाव हिरोईनच्या आधी हे शाहरुखने डिक्लेअर केलेले आधीही माहीत होतेच, काल सुरुवातीला ते पाहिलेही.. एकंदरीतच त्या महिलासंबंधित पॅराग्राफला संपूर्ण अनुमोदन.. Happy

हिरोचे नाव हिरोईनच्या आधी हे शाहरुखने डिक्लेअर केलेले आधीही माहीत होतेच<<<< नाय हो. हिरॉइनचे नाव हीरोआधी. Happy महिला दिनानिमित्त शाहरूखने त्याच्या यापुढील प्रत्येक सिनेमामधे असेच क्रेडिट येतील असे जाहीर केले होते. त्यानंतर टाटा टीची याच विषयावर जाहिरात आली...

उदयन, मेलाची तुलना चेन्नई एक्स्प्रेसबरोबर???? केफेहेपा!!!!

मयी पुर्ण अनुमोदन.... ठीक आहे, आता म्हातारा झालोच म्हटलं तरी चालेल. तुर्तास शाहरुखपेक्षा मी तरुणच (वयाने आणि बुद्धीनेही?) आहे. Lol

मरो त्तो चैनै एक्सप्रेस.
मे महिन्यत ह्यानी वाइ मधलं एक हॉटेल एक लॉज शिल्लक ठेवलं नव्हतं.
सगळं फुल्ल.
आम्हाला सातार्‍यात जावं लागलं रहायला.
त्यामुळे निषेध म्हणुन मी टिव्हीवरच बघेन. Wink

१०० करोड + क्लबात आरामात जाणार हा चित्रपट.

१०० करोड + क्लबात आरामात जाणार हा चित्रपट.>>> आहात कुठे झकासराव पहिल्या ३ दिवसातच त्याने १०० च्यावर जमवले... पहिल्याच दिवशी भारतात पेड प्रिव्हु ७ + ३३ करोड शुक्रवारी + जगभरात २२ करोड = ६२ करोड जमवलेले...

आज पर्यन्त लक्शात राहिलेले जगजाहीर सर्वोत्तम सिनेमे करोडोंच्या घरात गेलीत असं ऐकीवात सुद्दा नाही.... चांगले सिनेमे बघनारयांचा क्लासच वेगळा असतो ... आणि तसे सिनेमे पैसा कमावण्यासठी बनवले पण नसतात..... जे पैसा कमावणे या एकाच उद्देशाने बनवले असतात .... ते चे.ए. सारखेच असतात ... Wink

आज पर्यन्त लक्शात राहिलेले जगजाहीर सर्वोत्तम सिनेमे करोडोंच्या घरात गेलीत असं ऐकीवात सुद्दा नाही.. >>>

तुमच्या मते "भाग मिल्खा भाग" गल्ला भरु चित्रपट आहे ? Uhoh

तुमच्या मते "भाग मिल्खा भाग" गल्ला भरु चित्रपट आहे ? >>>>>>>>> नाहिच आहे... तो पण चालला हे अलहिदा ....तो त्याच्या क्वलिटी वर चालला... पण चालावा म्हणुन त्यात मुद्दाम माकड उड्या नव्ह्त्या टाकल्या हे विषेश ....

शनिवारी अचानक पहायला मिळाला... एकदम बकवास आहे ... शाहरुखला तर वैतागलो होतो. तीच तीच घिसिपिटी स्टोरी. ते बॅकराउंड म्युसिक 'चेन्नायइयइयइयइयइ एक्प्रेस' तर डोक्यात जात होत. शाहरुखचा डान्स पण एकदम भंगार. जब तक हे जान नंतर त्याचा मूव्ही बघायचा धसकाच घेतला होता.
मधुनच उठुन जाण्याची फार फार इच्छा होत होती.

बादवे, ते थलायवा चा अर्थ काय?

बादवे, ते थलायवा चा अर्थ काय?
>>> तलायवा... (उच्चार तलैवाच्या जवळ जाणारा) म्हणजे बॉस. प्रमुख.

रजनीकांतचं इथलं प्रेमाचं नाव आहे ते. आपण कसं बादशहा खान, एबी, ड्रीमगर्ल हेमा वगैरे म्हणतो तसंच.

फौजी मालिका, बाजीगर, डर, दिवाना, कभी हां कभी ना व दिलवाले या चित्रपटांनंतर शाहरूख खान एक 'मस्ट सी' कलाकार म्हणून संपला असे मला वाटते.

दिल खुष कर दिया तुने मेरा >>>>>> Happy
रीये,
शाळा-कॉलेजात असताना मी पण शाहरुख खान फॅन होते तुझ्यासारखी. बाजीगर, डर, डीडीएलजे, कहाकना, अंजाम, कुकुहोहै आनी दितोपाहै. माझं टीनेज - नवतारुण्य ह्यावरच निभलं Happy चक्क फिभीदिहैहिं, राम जाने, डुप्लिकेट, चम्त्कार, बादशहा पण. भरपुर फोटोज् होते माझ्याकडे शाखाचे. नंतर कखुकग, कलहोनाहो बरे होते. पण समहाउ ती जादु ओसरलीच कभी अलविदा ना कहना पासुन. त्यात मग पुन्हा चकदे, स्वदेस छानच होते. मग वाढत्या वयानुसार (माझ्याही आणि त्याच्याही :-)) आता शाखा ला बघावं तर चकदे स्वदेश सारख्याच मुवीमधे असं वाटलं. कारण लहानपणापासुन बघत होते ना त्याला. मग माझ्याबरोबर तोही झालाच की मोठा. तीच गत माधुरीची. रोमान्सची व्याख्या बदलली म्हण किंवा रोमान्स, कॉमेडी, तारुण्यातली छेडछाड - तकरार दाखवण्यासाठी नवीन चेहरे आले. (आणि शाखा दुसर्‍यांच्या बायका पळवु लागला :-)) सलमान त्यातला त्यात अजुनही भाव खाउन आहे. आमिर कधीच खुप्प नाही आवडला. तेवढ्या तेवढ्या चित्रपटात त्या त्या वेळी आवडला बस्स. तु जेव्हा जेव्हा शाखा फॅन भक्त म्हणतेस तेव्हा मला माझे शाळा-कॉलेजातले दिवस आठवतात. Happy तो सुपरस्टार आहेच ग पण समहाउ ती जादु ओसरलीच. वयाचा परीणाम असावा. त्याच्याही अन् माझ्याही. Happy नाही नाही. कदाचित माझ्याच. कारण तुलाही अजुनही तो आवडतो म्हणजे नक्कीच माझ्याच वयाचा परीणाम असावा. Happy ए पण मला सल्लु, रणबीर, फरहान, रीतीक पण आवडतात पण ती क्रेज आता ह्या वयात नसतेच Happy ती फक्त त्याच्यासाठीच तेव्हाच होती. Happy

एक जुनी शाखा फॅन. Happy

सर्वात आधी मी शाखा प्रेमी नाही

तरी सुद्धा खुप आवडला सिनेमा, जे चांगल आहे ते चांगलाच आहे , फुल्टू Entertainment Entertainment Entertainment

कोणी ही परफेक्ट नसतोच

Pages