फिरनी

Submitted by नंदिनी on 21 October, 2012 - 07:19
kesar firni
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

"एकदम सोप्पी फिरनी" असं टायटल द्यायचं फार मनात होतं. पण याआधीच्या "एकदम सोप्प्या" रेसिपी संवेदनशील विषय बनल्याने ते टायटल दिलं नाही याची कृपया नोंद घ्यावी. Proud

हॉस्टेलमधे असताना रमझान चालू झाला की आम्ही भटकायला निघायचो. हॉस्टेल होतं माझगावला. तिथून मोहम्मद अलि रोडला जायचं. एरव्ही पण मोहम्मद अलि रोड, क्रॉफर्ड मार्केट हे भाग म्हणजे डोळ्यासाठी, जिभेसाठी अगदी भरपूर मेजवानी असायची. ईदिनिमित्त जवळ जवळ अख्ख्या भागाला रोषणाई केलेली असायची. विविध रंगांचे, चमकते स्टॉल्स नटलेले असायचे. आम्ही मैत्रीणीसोबत संध्याकाळी दिवेलागणीला बाहेर पडायचो. पोटभर खादंती करायची. पाया सूप, चिकन कबाब, मटण कबाब, मालपुआ मनसोक्त हादडायचे. रस्त्यावर बार्गेनिंग करत करत शॉपिंग करायची. येताना सुलेमान बेकरीम॑धून नानकटाई घ्यायची. आणि दहाच्या आत हॉस्टेलमधे यायचं असा आमचा महिनाभर दिनक्रम.

भरपूर खाणं झाल्यावर गोड काहीतरी खावंसं वाटलं की नजर भिरभिरायची ती फिरनीसाठी. एवढंसारं मसालेदार खाल्ल्यावर थंडगार फिरनी अगदी ताजंतवानं करून जायची. मातीच्या छोट्याशा पणतीसारख्या भांड्यामधे सेट केलेली फिरनी म्हणजे माझ्यादृष्टीने रमझानचं ते सर्व वातावरण पुन्हा एकदा जगल्यासारखंच. कधीतरी एकदा सहज नेटवर रेसिपी पाहिली तर अगदीच सोप्पी रेसिपी. शिवाय पदार्थ पण घरात कायम असनारे. झटपट होणारा हा गोडाचा पदार्थ हल्ली माझ्याकडे महिन्या दोन महिन्यातून एकदा घरात होतोच. मग घरात असलेल्या काही सामानांपासून फिरनीचे काही व्हेरीएशन्स केले.

फिरनी म्हणजे तांदळाची खीर.पण तरी साऊथ इंडियन तांदळाची खीर आणि फिरनीमधला सर्वात मोठा फरक तापमानामधे आहे. तांदळाची खीर गरमगरम खाल्ली जाते. गार झाल्यावर ती खाववत नाही कित्येकदा. त्याउलट फिरनी थंडगार खायची असते. मातीच्या भांड्यामधे सेट केलेली फिरनी घट्ट होते आणि गारेगार फिरनी वेगवेगळ्या इसेन्स आणि रंगांमधे प्रयोग करून चवीमधे बदल करता येतो. Happy

माझ्यासारख्या किचनमधल्या बिगारीमधे शिकणार्‍यासाठी फिरनी हा अगदीच "जमणेबल" प्रकार आहे. करून बघा आणि सांगा बरे.

१. दूध: अर्धा लिटर. निरसे म्हणजे न तापवलेले दूध घ्या.शक्यतो टोन्ड मिल्क नको. फुल क्रीम मिल्क घ्या.
२. बासमती तांदूळ: दोन ते तीन चमचे. (बासमती लॉन्ग ग्रेन घ्या. दिल्ली राईस अथवा डेहराडून बासमती)
३. साखर: दोन वाट्या. (व्हेरीएशननुसार साखरेचे प्रमाण कमीजास्त होइल.)
४. ड्रायफ्रूट्स आणि इसेन्स.

क्रमवार पाककृती: 

१. सर्वात आधी बासमती तांदूळ भिजवून, धुवून निथळून घ्या. थोडेसे कोरडे भाजून घ्या.

२. हे तांदूळ मिक्सरमधे अगदी बारीक करून घ्या. पीठासारखे बारीक झाले पाहिजे. विकतचे पीठ मात्र वापरू नका. फिरनीला बासमती (लाँग ग्रेन) हवाच. तांदूळ मिक्सरमधे फिरवताना थोडे पाणी घालून फिरवा म्हणजे नंतर पेस्ट करत बसायला नको.

३. दूध निरसे घ्या. एका जाड बुडाच्या भांड्यात दूध घेऊन त्यामधे तांदळाची पेस्ट घाला. व्यवस्थित कालवून घ्या. अजिबात गुठळ्या नकोत. आता हे मिश्रण गॅसवर ठेवा.

५. साखर घाला. गोडाचे प्रमाण तुमच्या आवडीवर असू देत. पण फिरनी फ्रीझमधे सेट होणार असल्याने साखर किंचित जास्तच घाला.

४. सतत हालवत रहा. मिश्रण खाली लागू देऊ नका अथवा गुठळ्या बनू देऊ नका. हीच कृती जरा किचकट आणि वेळखाऊ आहे.

५. घट्ट खिरीसारखे होत आले की गॅसवरून खाली उतरवा.

६. वाफ निवेपर्यंत ढवळत रहा. अन्यथा या स्टेजला येऊन गुठळ्या होऊ शकतात. गुठळ्या झाल्याच असतील तर फिरनी गाळून घ्या. फिरनीचे टेक्श्चर अगदी मऊ आणि सिल्की व्हायला हवे.

७. असतील तर मातीच्या पसरट भांड्यामधे सेट करायला घ्या अन्यथा काचेच्या सुबकश्या वाडग्यांमधून काढा आणि फ्रीझमधे दोन ते तीन तास सेट करा.

८. थंडगार फिरनी खायला द्या आणि तुम्हीदेखील मनसोक्त खा. (सजावट करून फिरनी सर्व करा. -- हे वाक्य बर्‍याचदा मराठी कार्यक्रमांमधे ऐकले आहे. "खायला द्या" असे म्हणायला काय त्रास होतो न कळे) असो.

========================================

ही झाली साधी फिरनी. आता याचे अनंत व्हेरीएशन्स करता येतात. सेट करण्याआधी त्यामधे इसेन्स घालता येतात. सजावटीमधे कलाकुसर करता येते. मी करून पाहिलेली काही व्हेरीएशन्स.
१. केसर फिरनी: थंड दुधात थोडे केशर खलून फिरनीमधे मिक्स करा. वाडग्यामधे काढल्यावर वरती बदाम्-पिस्त्याचे काप घाला. (हे साधेसोपे व्हर्जन. चुकण्याची शक्यता फार कमी. )

२. काजू फिरनी: तांदळासोबत थोडे काजूदेखील भिजत घाला, शिजवताना ही काजूची पेस्ट दुधात घाला. सजावटीसाठी काजू-बदाम्-पिस्ता घाला.

३. मँगो फिरनी: फिरनी शिजत असताना त्यामधे मँगो पल्प घाला. मँगो पल्प गोड असल्यास त्यामानाने साखर कमी घाला. सजावटीसाठी आंब्याच्या फोडी अथवा थोडा मँगो पल्प घाला. (आमच्याकडे हे व्हर्जन भयंकर हिट आहे. आमरस खाऊन खाऊन कंटाळा आला की चेंज म्हणून आंबाफिरनी Proud )

४. चॉकोलेट फिरनी: फिरनी शिजत असताना कोको पावडर घाला. अथवा फिरनी शिजल्यावर त्यामधे चॉकोलेट सिरप घाला. सजावटीसाठी चॉकोलेट किसून घाला. (कोको पावडर अंदाजाने घाला. मी एकदा कडूढाण केलं होतं. तेव्हापासून चॉकोलेट सिरप घालते)

५. स्ट्रॉबेरी फिरनी/अ‍ॅपल फिरनी: शिजत असताना त्यामधे स्ट्रॉबेरी सिरप घाला, सजावटीसाठी स्ट्रॉबेरीच्या फोडी वापरा. ( हे व्हर्जन मी केल्यावर पिताश्रींनी "डायजिनसारखं लागतय" अशी टिप्पणी केली होती. त्यामुळे जरा जपूनच. अ‍ॅपल फिरनीसाठी दिनेशदांची रेसिपी अवश्य बघा)

६. बटरस्कॉच फिरनी: शिजवून झाल्यावर त्यामधे बटरस्कॉच ईसेन्स घाला आणी सजावटीसाठी ड्रायफ्र्रूट्स घाला. अशीच व्हॅनिला फिरनी करता येइल.

७. रोझ फिरनी: फिरनी शिजल्यावर त्यामधे गुलाबजल आणि गुलाब ईसेन्स घाला. सजावटीसाठी गुलाबाची पाकळी आणि किंचित गुलकंद वापरा.

८. कॅरामल फिरनी: वर्षूच्या "साधेसोप्पे पुडिंग"मधल्या रेसिपीने कॅरामल तयार करून घ्या. फिरनी सेट झाल्यावर त्यावर हे कॅरामल हलक्या हाताने पसरा. Proud पुडिंगपेक्षा हे जास्त सोपं पडेल.

९. जास्मिन फिरनी: फ्रीझमधे ठेवताना फिरनीवर एक मोगर्‍याचे फूल ठेवून द्या, खायला देताना फूल बाजूला ठेवा. ड्रायफ्रूट्स घाला. या फिरनीला अप्रतिम वास येतो.

१०. केवडा: शिजवताना केवडा इसेन्स घाला. नंतर सजावटीसाठी केवडाजल घाला.

११. मोदक फिरनी: फिरनी शिजवताना त्यामधे मोदकाचे सारण घाला. साखर घालू नका. याची चव छान येते. मोदक बिघडल्यावर उरलेल्या सारणाचे काय करावे असा प्रश्न पडल्यास ही फिरनी करून बघा. Proud

केसर फिरनी

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे ४ वाडगे भरून होइल.
अधिक टिपा: 

अजून सुगरण मायबोलीकरांना काही व्हेरीएशन्स माहित असतील तरी अवश्य सांगा.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! Happy
फोटो मस्ट Happy

यात ऑरेंज फिरनी, कॉफी / मोक्का फिरनी, पायनॅप्पल फीरनी, मिक्स्ड बेरी फिरनी, खजुर फिरनी, टेंडर कोकोनट फिरनी असेही प्रकार करुन बघता येतिल बहुतेक Happy

टूनटून, केवडा फिरनी विसरलेच होते मी. संपादन करत होते तेव्हा तुमचा प्रतिसाद आलेला दिसला. Happy

आंबा१, करा आणि फोटो द्या.

लाजो, ऑरेंज/पायनॅपल फिरनी करायचा कधी धीर झाला नाही. कॉफी/मोक्का फिरनी विंटरेस्टिंग.

एकदम मस्त लिहिलंय. डायजिन Lol
तू मागे विपुत सांगितलेल्या रेसिपीने केलेली फिरनी एकदम भारी झाली होती. केशर किंवा कुठलीही ड्रायफ्रूट्स घालून हीच आवडते ( आणि तशी खातानाच फिरनीचा फील येतो ) त्यामुळे इतर पद्धतीने करुन बघेन की नाही माहीत नाही. साध्या फिरनीतच केवडा इसेन्स मात्र नक्की घालते.

"एकदम सोप्पी फिरनी" असं टायटल द्यायचं फार मनात होतं. पण याआधीच्या "एकदम सोप्प्या" रेसिपी संवेदनशील विषय बनल्याने ते टायटल दिलं नाही याची कृपया नोंद घ्यावी. >>>>>>>>> हे लै म्हणजे लैच भारी...

रेसिपी सोप्पी वाटतीय.. पण फोटो टाकच एखादा म्हणजे तोंपासु वगैरे म्हणता येइल Happy

फोटो पाहून तों पा सु!! मस्त दिसतेय फिरनी.

मला दे जा वू का वाटतंय? आपण याआधी फिरनीबद्दल चर्चा केली होती का?

प्राचीला चॉकलेट फिरनी डेकोरेटेड विथ काजूकतलीची रेसिपी लिहिण्यास सांगणे.

अर्ध्या लिटर दुधाला दोऽऽन वाट्या साखर घातल्यावर अगदी गोडमिट्ट नाही का होत?

मला दे जा वू का वाटतंय? आपण याआधी फिरनीबद्दल चर्चा केली होती का? >> हो. Happy

प्राची, चॉकोलेट फिरनीची रेसिपी देणे. मी केलेल्या चोकोलेट व्हर्जन बर्‍याचदा नमुनेदार झाल्यात.

अर्ध्या लिटर दुधाला दोऽऽन वाट्या साखर घातल्यावर अगदी गोडमिट्ट नाही का होत?
>>> साखरेचा अंदाज आपापल्या गोडीच्या आवडीवर. आमच्याकडे गोडघाशे असल्याने कितीही साखर घातली तरी त्यांना काही वाटत नाही. Proud

>>>फिरनी म्हणजे तांदळाची ख>>><<
नक्की ना हे तुमचे मत? कारण आधी हि खीर नाहीच मुळी अशी जोरदार चर्चा/वाद(?) तुम्हीच केलेली होती. Wink

बरं, असो.

छान आहेत व्हेरिएशन्स !
माझा अनुभव म्हणजे दूध प्यायला नकार देणारे कुठलेही बाळ, फिरनी मात्र आवडीने खाते.

झंपी,

फिरनी म्हणजे दूधभात या कमेंटवरून ती चर्चा झाली होती. विसरलात की काय?

दिनेशदा, हो. आमच्या घरातलं मोठं बाळ आवडीने फिरनी खातं. छोट्या बाळाचे खाण्यापिण्याचे नखरे अजूनतरी नाहीत. Proud

मला सांगा, २-३ चमचेच तांदूळ घेतल्यावर आणि ते वाटून दूधात घातल्यावर किती घट्ट/ दाटपणा येतो? म्हणजे आयडियल कन्सिसटन्सी कशी हवी- उकळण्या आधी?

पूनम, उकळण्याआधी दूध घट्ट व्हायला नको. अन्यथा शिजल्यावर अतिघट्ट होत येइल.. नाहीतर खाली लागेल तरी. दुधात पेस्ट कालवल्यानंतर दुधाची कन्सिस्टन्सी बदलायला नको. दूध उकळायला लागले की मग ते घट्ट होत येते.

मी कधीच फिरनी खाल्लेली नाही Uhoh हे बावळट्टपणे कबूल करते. पण तांदळाच्या खिरीला हात पण लावत नाही. पण हे करून बघावसं वाटतयं. दसर्‍याला ट्राय मारावी काय अशा सिरियस विचारात आहे. Happy

मस्तं पाककृती. व्हेरिएशन्सच्या आधी बेसिक करून बघेन.

खरंतर तांदळाची खीर आवडत नाही पण प्रस्तावनेत मातीच्या भांड्यात सेट केलेली फिरनी वगैरे वाचून जीभ चाळवली हे कबूल करावंचं लागेल Wink वर फोटोही आहेच..
>>साऊथ इंडियन तांदळाची खीर>> पायसम ना?

>>>
फिरनी म्हणजे दूधभात या कमेंटवरून ती चर्चा झाली होती. विसरलात की काय? <<
अहो मी नाही विसरले. पण तुम्ही तेव्हा काय म्हणलात ते सांगितले. तशी पण ती रेसीपी काही पारंपारीक फिरनी म्हणून क्लेम केलीच नव्हती. बरं जावू दे. Happy

तांदूळाची खीर करतात की थोडाफार बदलाने बर्‍याच राज्यात.

श्राद्धाला करतात, त्या तांदळाच्या रव्याच्या खीरीपेक्षा ही वेगळी कशी? कन्सिस्टन्सी हा एक फरक दिसतोय - ते सोडता?

हा कुचकट प्रश्न नसून प्रामाणिक शंका आहे. Happy

नानबा, कन्सीस्टन्सी हाच मोठ्ठा फरक की ..

शूम्पी, पर्शियन रेस्टॉरन्टमध्ये मिळते फिरनी बर्‍याचदा .. रोझ इसेन्स घालून केलेली असते ..

रेसिपी छान आहे .. (वरच्या फोटोत मात्र पाणी सुटल्यासारखं वाटत आहे ..)

फार पुर्वी मी एकदा ("दिल तो पागल है" बर्‍यापैकी नविन सिनेमा समजला जाऊ शकेल अशा काळात) संजीव कपूर ची रेसिपी वापरून फिरनी करायचा प्रयत्न केला होता .. पण बहुतेक त्याच्या रेसिपीत तांदळाची वस्त्रगाळ पेस्ट करावी असं लिहीलेलं नसावं, तांदूळ भाजून घ्यायला सांगितलेलेही आठवत नाहीत .. त्यामुळे माझी फिरनी फारच रवाळ झाली होती ..

नानबा, श्राद्धाला करतात ती खीर इतकी सजवून नटवून करतात का? Proud

शिवाय ती तांदळाच्या रव्याची खीर असते, इथे तांदुळाची बारीक पेस्ट वापरली आहे. त्यामुळे कन्सिस्टन्सीमधे फरक तर येतोच. शिवाय मातीच्या भांड्यात सेट केलेली असल्यास त्याला एक वेगळी चव येते.

सायो, तमिळमधे खरंच माहित नाही. पण कानडीमधे पायसम म्हणजे खीर. शेवयाची, रव्याची, पुरनाची किंवा अजून कसलीही खीर असली की त्याला पायसम म्हणतात.तांदळाच्या खीरीला अक्की पायसम म्हणतात.

(वरच्या फोटोत मात्र पाणी सुटल्यासारखं वाटत आहे ..)>>> नाही, ते केवडाजल आहे.

नानबा, माझ्या मते श्राद्धाला करतात ती खीर तांदूळ शिजवून (भात) घोटून दुधात घालून आटवतात.
आणि इथे तांदूळ धुवून कोरडे करून रवा काढून दुधात शिजवतात. ही थंड झाली की साधारण कस्टर्डसारखी (किंचीत पातळ) कन्सिस्टन्सी येते. शिवाय भरपूर सुकामेवा आणि रोझ/ केवडा यांसारखे इसेन्स Happy आपण 'खीर' म्हणून करतो तेव्हा केशर-वेलची-जायफळ याव्यतिरीक्त इसेन्स वापरण्याचं धाडस नाही करणार Wink

Pages