नवीन मायबोली: असे सुधारता येईल

Submitted by admin on 19 May, 2008 - 13:54

आम्हाला कल्पना आहे नवीन मायबोली सध्यातरी नक्किच थोडे त्रासाचे आहे. यातला मोठा भाग हा काम अजून पूर्ण न झाल्यामुळे आहे तर कदाचित थोडा भाग हा बदल जाणवत असल्यामुळे आहे.

तुम्हाला काय आवडले नाही आणि का आवडले नाही हे लिहिलेत तर त्या सुविधा आधी दुरुस्त करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करता येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणत्याही गप्पांच्या पानावर गेल्यावर सरळ शेवटचे पान दिसेल का?
सध्या कोणत्याही गप्पांच्या पानावर गेल्यावर अगदी पहिल्या पोस्ट पासून सगळे दिसते पण एखादा सदस्य कायम ते पान बघत असेल तर त्याला लेटेस्ट अपडेट काय झाला यात स्वारस्य असते. सध्या त्याला पुनपान""शेवट" यावर क्लिक करावे लागते.

मनकवडा, पोस्ट्स च्या संख्येखाली '... नवीन' अशा लिंक वर क्लिक केलं तर फक्त नवीन पोस्ट्स दिसतात

अ‍ॅडमिन,
खाजगी जागेत प्रत्येकाला प्रकाशचित्र साठवण्यासाठी दिलेल्या कोट्यापैकी किती जागा वापरली गेली आहे हे पण दाखवता येईल का?

रुनी,
किती जागा वापरली आहे ते आत्ताही दिसत आहे. upload बटणाच्या बाजुला कोटा दिसतो.

मदत पुस्तिकेत खालिल सुधारणा हवि आहे काय?

सगळ्यात प्रथम ज्या गृपमधे तुम्हाला हे सुरू करायचंय त्या गृपचे तुम्ही सभासद असणे आवश्यक आहे. त्यासाठी गृपच्या पानावर जाऊन, पानाच्या वर डाव्या बाजूला पहा. तिथे तुम्हाला "सामील" होण्यासाठी दुवा किंवा अधिक माहिती मिळू शकेल. >>>>>>>>>>

Admin - "पानाच्या वर डाव्या बाजूला पह" च्या ऐवजि "पानाच्या वर उजव्या बाजूला पहा" असे पाहिजे तिथे ...

लवकरात लवकर रंगीत अक्षरे, पांढरी शाई, इ. ची सोय करता येईल का? फार फार बरे होईल.
धन्यवाद.

धन्यवाद अ‍ॅडमिन टीम. ते मी बघीतले होते पण कसा काय माझ्या डोक्यात प्रकाश पडला नाही काय माहित Proud

सर्वत्र 'गृप या शब्दाऐवजी 'ग्रूप' व 'गृपमधे / गृपमध्ये' याऐवजी 'ग्रुपमध्ये' असा बदल करता येईल का?

ग्रूप ठीक आहे पण ग्रुपमध्ये हे चुकीचे आहे. फूल, फुलावर या मराठी शब्दांत जसा बदलेल तसा इंग्रजी शब्दाचा उच्चार बदलत नाही. आणि त्यामुळे पहिले अक्षर र्‍हस्व होणार नाही. अर्थात हे माझे मत. Happy

मराठी/ईंग्लिश चे बटन फ्लोटींग ठेवा, किंवा प्रतिसाद च्या शेजारी ठेवा
सुरुवात, मागे, ... शेवट ही बटनांची रांग सगळ्यात खाली (पण) ठेवा

--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

आशिष
प्रतिसाद बॉक्सच्या अगदी डोक्यावर म/E आहे ना ते मराठी/इंग्रजीचेच बटन आहे रे. Happy

म/ई मी आधी कधीच पाहिले नव्हते Happy
धन्यवाद!
--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

मग 'ग्रुपमध्ये' ऐवजी 'ग्रुपामध्ये' लिहायला लागेल.

चाफा,

इंग्रजी शब्दांना मराठी प्रत्यय लावल्यावर उच्चार बदलायला हवेत. डॉ. अरुणा ढेरे व डॉ. सत्त्वशीला सामंत यांना विचारून तशी खात्री करून घेतली आहे.
गजाननदेसाई म्हणतात त्याप्रमाणे 'ग्रुपामध्ये' असा शब्द हवा.

>>>फूल, फुलावर या मराठी शब्दांत जसा बदलेल तसा इंग्रजी शब्दाचा उच्चार बदलत नाही. आणि त्यामुळे पहिले अक्षर र्‍हस्व होणार नाही.<<<

चाफ्या, पहिल्यांदा 'ग्रूप' हा मराठीत उसना आलेला शब्द म्हणून आपण मायबोलीवर वापरतोय, हे तुला कबूल असेल असं गृहित धरतो. दुसर्‍याच्या पोराला दत्तक घेतल्यावर आपण आपलं आडनाव लावतो, त्याला *आपल्या घरातले* नियम-संकेत पाळायला शिकवतो, या पद्धतीप्रमाणेच उसन्या/दत्तक शब्दांनाही मराठी व्याकरणाचे व शुद्धलेखनाचे नियम निरपेक्षपणे लावले पाहिजेत या मताशीही तू सहमत असशील असं गृहित धरून पुढचं स्पष्टीकरण :
'ग्रूप' हे लेखन प्रथमा एकवचनातले आहे. मराठी शुद्धलेखनाच्या नियम क्र. ८.१ नुसार 'ग्रूप' या मराठी शब्दाच्या उभयवचनी (= एकवचनातील व अनेकवचनातील) सामान्यरूपांमधला उपांत्य ऊकार उकारात बदलला जाईल. म्हणजे, ग्रूप हा शब्द सप्तमी एकवचनात 'ग्रुपामध्ये', तर अनेकवचनात 'ग्रुपांमध्ये' असा चालेल. (वि.सू.: हा नियम नामाबाबत लिंगातीत आहे.)

'ग्रूप' या शब्दाची आठही विभक्त्यांमधली रूपे :

१. प्रथमा :
एकवचन : (तो) ग्रूप
अनेकवचन : (ते) ग्रूप
२. द्वितीया :
एकवचन : ग्रुपास, ग्रुपाला, ग्रुपाते
अनेकवचन : ग्रुपांस, ग्रुपांना, ग्रुपांते
३. तृतीया :
एकवचन : ग्रुपाने, ग्रुपे, ग्रुपाही
अनेकवचन : ग्रुपांनी, ग्रुपीं, ग्रुपांही
४. चतुर्थी :
एकवचन : ग्रुपास, ग्रुपाला, ग्रुपाते
अनेकवचन : ग्रुपांस, ग्रुपांना, ग्रुपांते
५. पंचमी :
एकवचन : ग्रुपाहून
अनेकवचन : ग्रुपांहून
६. षष्ठी :
एकवचन : ग्रुपाचा, ग्रुपाची, ग्रुपाचे
अनेकवचन : ग्रुपांचा, ग्रुपांची, ग्रुपांचे
७. सप्तमी :
एकवचन : ग्रुपात, ग्रुपी, ग्रुपा
अनेकवचन : ग्रुपांत, ग्रुपीं, ग्रुपां
८. संबोधन :
एकवचन : (हे) ग्रुपा
अनेकवचन : (हे) ग्रुपांनो

समांतर उदाहरणे :
१. 'मूठ'; अकारान्त स्त्रीलिंगी सामान्यनाम : मूठ शब्दाची रूपे चालवताना उपांत्य ऊकाराचा 'उकार' केला जातो. उदा.: मुठीने, मुठींचा/ची/चे, मुठीमध्ये.
२. 'काळवीट'; अकारान्त पुल्लिंगी समान्यनाम : तोच नियम - मूळ नामातील 'वी' अक्षराचा रूपे चालवताना 'वि' होतो. उदा.: 'काळविटाला', 'काळविटाने', 'काळविटांच्या', 'काळविटावर'

त्यामुळे, गजा, चिनूक्स (आणि अरुणा ढेरे, सत्त्वशीला सामंत) म्हणतात, त्याप्रमाणे 'ग्रुपामध्ये' हे रूप शुद्ध आहे. प्रशासक, कृपया हा बदल करावा.

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

..

अवघड आहे! Uhoh Sad
(मराठी व्याकरण हो...! Proud )

<<<< या पद्धतीप्रमाणेच उसन्या/दत्तक शब्दांनाही मराठी व्याकरणाचे व शुद्धलेखनाचे नियम निरपेक्षपणे लावले पाहिजेत या मताशीही तू सहमत असशील असं गृहित धरून पुढचं स्पष्टीकरण
>>>>

मी या मताशी (किमान इथे उल्लेखलेल्या संदर्भात) अजिबात सहमत नाही. Happy
त्याहीपुढे जाऊन मी असे धाडसी विधान करेन की भाषेच्या व्याकरणाचे नियम हे केवळ वाहतुकीच्या नियमांसारखे नियम नसतात. जर तुम्ही लिहिलेले उच्चारतांना तुमच्या कानाला ते योग्य वाटत नसेल तर तुम्ही लिहिलेले योग्य नाही, जरी ते ठराविक साच्यातून बाहेर पडलेले असले तरी. कुठल्याही लिपीचा आणि त्यातही खासकरून देवनागरीचा हाच तर मोठा गुणविशेष आहे!

डॉ. ढेरे आणि डॉ. सामंत यांच्या मताचा आदर करून मला इथे काही उदाहरणे द्यावीशी वाटतात.
खालील शब्द मोठ्याने म्हणून पहा. म्हणताना पहिल्या अक्षराच्या उच्चाराकडे विशेष लक्ष द्या:

Rooster - रूस्टर
of roosters - रुस्टर्सच्या / रूस्टर्सच्या

Fruit - फ्रू
to fruits - फ्रुट्सना / फ्रूट्सना

School - स्कू
for the schools - स्कुल्ससाठी / स्कूल्ससाठी

blue - ब्लू (निराश या अर्थी)
because of the blues - ब्लुजमुळे / ब्लूजमुळे

माझ्या कानांना तरी दीर्घ उच्चारच योग्य वाटतात. आणि "ग्रूपा" विषयी नव्याने सांगायचे तर मला तेही पटत नाही. हे मी आधीही लिहिले होते कुठेतरी "व्हिजनीप्रमाणे" असा विचित्र शब्द पाहिल्यावर. कारणे तीच, वर दिलीत ती.

प्रशासकांनी हा बदल करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी कृपया पुनर्विचार करावा. अर्थात अंतिम निर्णय सर्वस्वी त्यांचा आहे. परंतु मला माझा आक्षेप नमूद करणे आवश्यक वाटले. Happy

ऍडमिन, उपग्रह वाहिनीचे मराठी व हिंदी (आणी इतर) असे दोन भाग करता येतील का?

चाफा,

'कानांना योग्य वाटत नाही', हे खरंच कारण असू शकतं का? व्याकरणाचे, भाषेचे काही नियम आहेत. भाषेचं विशुद्ध रूप जर टिकवायचं असेल, तर ते नियम पाळले गेले पाहिजेत. नाहीतर सरळ इंग्रजीतच बोला आणि लिहा..

मायबोलीचा वाचकवर्ग जगभर पसरला आहे. अनेक लेखक, प्रकाशक, आकाशवाणीचे अधिकारी मायबोलीला भेट देत असतात. त्यामुळे मायबोलीची जबाबदारी अधिकच वाढते.

>>नाहीतर सरळ इंग्रजीतच बोला आणि लिहा..
चिनुक्सच्या मताला अनुमोदन.
धेडगुजरी भाषा बोकाळण्यांस अजून एक कारण बनण्यापेक्षा व्याकरणनिष्ठ राहणे कधीही सयुक्तिक. फ ने सुचविलेला बदल योग्यच आहे.

चाफ्या, एखाद्या मुद्द्यावर आक्षेप असू शकतो आणि तो मांडलाही जावा, पण त्या आक्षेपाला काहीतरी तार्किक, भाषाशास्त्रीय आधार हवा. 'कानांना योग्य वाटत नाही' यापेक्षा अचाट नि अतर्क्य कारण भाषाशास्त्रासंदर्भात दुसरे नसेल.

इंग्लिशीतदेखील पंडित, गुरु असे परभाषीय शब्द घेतले जातात तेव्हा त्यांची अनेकवचन, विशेषण ही रुपे त्या भाषेच्या नियमांप्रमाणेच केली जातात.
http://dictionary.reference.com/browse/pundit

मग मराठीत एखादा शब्द आणताना, त्याला मराठीतील व्याकरणाचे नियम लावण्यात चूक काय? कप किंवा टेबल यांसारखे मूळ इंग्लिश शब्द मराठीत वापरताना 'कपात चहा ओतला', 'टेबलाचा पाय मोडला' अशा प्रकारे बोलले/लिहिले जातात. त्याचप्रकारे इतरही शब्दांची रुपे व्हायलाच हवीत.

(मुळात इतक्या भाराभार संख्येने परभाषीय शब्द आपल्या भाषेत आणण्यापेक्षा समर्पक मराठी शब्द योग्य रुपात का वापरले जाऊ नयेत? हा मुख्य प्रश्न आहे. पण त्यावर सध्या चर्चा नको.)

बापरे, इथेही ग्रूप / ग्रुप चालू आहे!
अख्खा बाफ वाहिलाय त्याला इथे! तिकडे हलवा, तिकडे हलवा!
पुनःपुन्हा तेचतेच मुद्दे येऊ नयेत म्हणून फक्त. Happy

चाफ्या, 'रूस्टर्सच्या, स्कूल्ससाठी' यांच्या र्‍हस्व-दीर्घ उकारांबद्दल चर्चा करण्यापूर्वी मला या रूपांचं मराठी व्याकरण फोड करून समजावून सांगशील का?

श्रद्धेने दिलेल्या लिंकेवरून : पंडित हा संस्कृत शब्द इंग्लिशीत गेल्यावर त्यांनी त्यांच्या नियमाप्रमाणे pundits असं अनेकवचन केलंच की! त्यांनी संस्कृत अनेकवचनाप्रमाणे (अनेकवचन - पण्डिता:) त्याचं इंग्लिशीतलं रूप 'punditah' वगैरे केलं नाही हा मुद्दा लक्षात घेण्याजोगा आहे.
rajas आणि ranis या अनेकवचनी रूपांकरताही इंग्लिशभाषिकांनी आपले व्याकरणनियम वापरले; हिंदुस्तानी बोलीतले 'राजा' आणि 'रानियां' अशी अनेकवचनी रुपं निवडली नाहीत.
हिंदीतदेखील 'स्कूल' या उसन्या नामाला हिंदी व्याकरणाचे नियम लावून 'स्कूलोंमें', 'स्कूलोंकी छुट्टियां' वगैरे रूपं योजली जातात, ती 'स्कूल' हे हिंदीमध्ये अकरान्त पुल्लिंगी नाम असल्यासारखे नियम लावूनच!
तस्मात, मराठीत उसने शब्द लावताना आपण आपले नियम लावावे. 'स्कूल्ससाठी'/'ग्रूप्समध्ये' वगैरे वैयाकरणी चमत्कृती साधण्यात हशील नाही.

आता मूळ मुद्दा : आता एकदा का 'ग्रूप' हे उसनं घेतलेलं अकारान्त नाम 'आपलं' मानलं की त्याचं लिंगानुरूप योग्य रूप वापरायला हवं. '(तो) गट/(तो) समुदाय/(तो) कंपू' या समानार्थी नामांप्रमाणे नेहमीच्या वापरात '(तो) ग्रूप' असं पुल्लिंग आरोपून हा शब्द वापरला जातो. त्यामुळे त्याचं सप्तमी एकवचनातलं रूप 'ग्रुपामध्ये' व अनेकवचनी रूप 'ग्रुपांमध्ये' होतं. यात 'ग्रु' हवा की 'ग्रू' हवा या शंकेवर उत्तर म्हणून शुद्धलेखन नियम क्र. ८.१ नियमाचा दाखला दिला होता. त्या नियमानुसार 'ग्रुपामध्ये' हे लेखन योग्य आहे.

>>आणि "ग्रूपा" विषयी नव्याने सांगायचे तर मला तेही पटत नाही. हे मी आधीही लिहिले होते कुठेतरी "व्हिजनीप्रमाणे" असा विचित्र शब्द पाहिल्यावर<<<

'व्हीजनीप्रमाणे' हे रूप 'व्हीजन' हे अकारान्त नाम '(ती) व्हीजन' असं स्त्रीलिंग आरोपून बनवलेलं रूप आहे. परभाषिक शब्द मराठीत येताना, त्यांच्यावर समानधर्मी मराठी शब्दांचं लिंग कसं आरोपलं जातं याबद्दल मी मागे भाषा ग्रुपातल्या कुठल्यातरी चर्चेत लिहिलं होतं. परभाषांमधले शब्द मराठीत वापरताना लिंग ठरवण्याचा मामला निकाली काढला, की मग तो शब्द मराठी व्याकरणनियमांनुसार वापरायला हवा. आजवर मराठीत इतर भाषांमधून आलेले शब्द, उदा.: तारीख, गरीब, वकील (अरबी-फारसी भाषांमधून), कप, टेबल, डायरी (इंग्लिशीतून), हे लिंग आरोपून आपल्या *व्याकरणनियमांप्रमाणेच* चालवले जातात. त्याप्रमाणे तो 'व्हीजनीप्रमाणे' हा प्रयोग होता. समजा, मराठीभाषिकांपैकी काही जण '(तो) व्हीजन' असं पुल्लिंग आरोपत असतील, तर त्यांनी एकारान्त पुल्लिंगी नामाप्रमाणे 'व्हीजनाप्रमाणे' असं रूप वापरणं योग्य आहे. परभाषांमधली नामं अविकारी असल्याचा गैरसमज बाळगून 'व्हीजननुसार' असं रूप किंवा अनेकवचनी रूपाकरता 'व्हीजन्सनुसार' असं रूप बनवणं अतार्किक आहे.

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

फ, इंग्रजांनी इंग्रजीत काय केले त्याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही, कारण मराठी संस्कृतपासून तयार झाले त्याला संस्कृत व्याकरणाचे नियम जास्त जवळचे. इंग्रजी लॅटिनपासून निर्माण झाले नि जरी लॅटिन नि संस्कृत यांच्या व्याकरणात ओढून ताणून समानता दाखवता आली तरी त्याची पण गरज नाहि. कारण संस्कृत व मराठी भाषा दोन्ही अतिशय समृद्ध नि संस्कृतचे व्याकरण तर संगणक प्रणालि लिहीता येईल इतके नियमबद्ध आहे. दुर्दैवाने आजकाल मराठी व संस्कृत या दोन्हीचाहि अभ्यास मागे पडत चालला आहे. त्यामुळे इंग्रजी शब्द जसेच्या तसे उचलण्याची पद्धत पडली आहे.

<<(मुळात इतक्या भाराभार संख्येने परभाषीय शब्द आपल्या भाषेत आणण्यापेक्षा समर्पक मराठी शब्द योग्य रुपात का वापरले जाऊ नयेत? हा मुख्य प्रश्न आहे. पण त्यावर सध्या चर्चा नको.)>>

श्रद्धाके, १०० टक्के अनुमोदन.
समर्पक मराठी शब्द आणता येतील, पण ते रोजच्या वापरात आले नाहीत तर लोक वापरणार नाहीत. आजकाल तुम्ही पाहिलेच असेल की मराठी वर्तमानपत्रे खुशाल इंग्रजी शब्द वापरताट, कारण त्यांना धंदा करायचा आहे. मराठी लेखकहि त्यांच्या लिखाणात इंग्रजी शब्द वापरतात, कारण कचेरीतले संवाद आजकाल इंग्रजीतूनच होतात म्हणे, ती वास्तवता कथेत यायला नको का? नाहीतर पुस्तके खपणार नाहीत. मग लिखाण काय भाषेची सेवा करायला करायचे काय? कैच्च्याकैच्च.

मुळात मराठी माणसाला अशी इच्छाच नाही की मराठी वाढवावे. नाही म्हणायला महाराष्ट्र सरकारने अमेरिकेतल्या 'गरीब मराठी मुलांना, ज्यांना मराठी वाचायची तीव्र इच्छा असून परवडत नाही,' (कुठे असे दिसले लोक त्यांना कुणास ठाऊक?) त्यांच्यासाठी २५ लाख रुपये देणगी दिली.

दुसरे दाळीद्र्य असे की गेल्या दोनशे वर्षात सगळे नवीन शोध साहेबांनी लावले, आगगाडी, विमान, संगणक, शीतपेटी, जे म्हणाल ते! मग त्याला मराठी शब्द शोधून काढून ते वापरण्याची दगदग कोण करेल? माझे आवडते उदाहरण म्हणजे सा रे ग म च्या संचालिका. "डिसिजन घेणं किती डिफिकल्ट झाले आहे!" निर्णय घेणे कठीण झाले आहे हे वाक्य लोकांना समजले नसते का?

<<त्याहीपुढे जाऊन मी असे धाडसी विधान करेन की भाषेच्या व्याकरणाचे नियम हे केवळ वाहतुकीच्या नियमांसारखे नियम नसतात. जर तुम्ही लिहिलेले उच्चारतांना तुमच्या कानाला ते योग्य वाटत नसेल तर तुम्ही लिहिलेले योग्य नाही, जरी ते ठराविक साच्यातून बाहेर पडलेले असले तरी. कुठल्याही लिपीचा आणि त्यातही खासकरून देवनागरीचा हाच तर मोठा गुणविशेष आहे!>>

अनुमोदन, चाफा.

मी मला वेळ झाला की अ‍ॅडमिननी खाली दिलेल्या दुव्यावर लिहेन.

>> '... नवीन' अशा लिंक वर क्लिक केलं तर फक्त नवीन पोस्ट्स दिसतात
धन्यवाद मिलिंदा Happy

हल्ली 'माझे सदस्यत्व' या विभागात गेल्यावर 'ग्रूप' नावाची एक यादी दिसतेय. आणि त्याखाली 'माझं हितगुज' अशी दुसरी यादी दिसतेय. त्यामुळे विचारपुशीतले संदेश खूप खाली जातायत. आणि या दोन्ही याद्यांमधे सारखेच दुवे दिसत आहेत. मग हे दोनदा का दाखवले जातेय?

1.jpg2.jpg

------------------------------------
It's good that you can laugh at yourself.

Pages