ब्रेड

ब्रेड बेसन टोस्ट

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बेसन (डाळीचे पीठ) - अर्धा कप
ब्रेड स्लाईस - ५ ते ६ (आकारावर अवलंबून)
कोथिंबीर, कढीपत्ता पाने (अंदाजे)

लसूण पाकळ्या - २
मिरची ठेचा - चवीप्रमाणे, किंवा बारीक चिरलेल्या २ हिरव्या मिरच्या
मीठ, तिखट, हळद चवीप्रमाणे
दही - १ डाव
तेल - मोहनासाठी १ चमचा व टोस्ट तव्यावर भाजण्यासाठी
पीठ भिजवण्यासाठी पाणी

besan bread toast1 copy (1).jpg

क्रमवार पाककृती: 

सर्वप्रथम कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण पाकळ्या व मिरची ठेचा / मिरच्या मिक्सरमधून बारीक होईस्तोवर फिरवून घ्याव्यात. एका रुंद तोंडाच्या पसरट भांड्यात बेसन घेऊन त्यात ही पेस्ट, तिखट, मीठ, हळद व १ डाव दही घालावे व नीट मिसळून घ्यावे. पाणी घालून भजीच्या पिठापेक्षा जरा किंचित जास्त सैलसर भिजवून घ्यावे व थोडा वेळ तसेच ठेवावे. (मी १५ मिनिटे ठेवले.) तेल कडकडीत तापवून या मिश्रणात एक चमचा तेलाचे मोहन घालावे व मिसळून घ्यावे.

तवा तापत ठेवून त्यावर तेल घालावे व नीट पसरवून घ्यावे. ब्रेडचे स्लाईस दोन्ही बाजूंनी पिठात बुडवून दोन्ही बाजूंना मिश्रण नीट लागल्याची खात्री करून ते तव्यावर दोन्ही बाजूंनी मंद आचेवर भाजावेत. भाजताना अधून मधून स्लाईस दाबाव्यात. त्या नीट भाजल्या जात आहेत ना हे पाहावे. एका वेळी रुंद तव्यावर दोन स्लाईसेस आरामात भाजता येतात. तयार टोस्टचे हव्या त्या आकारात तुकडे (त्रिकोणी, चौकोनी इ.) करून लोणी / चटणी / केचप सोबत गरमागरम खायला द्यावेत.

वाढणी/प्रमाण: 
खाणार्‍यांवर अवलंबून :-)
अधिक टिपा: 

हा पदार्थ धिरड्याच्या किंवा भजीच्या जवळपास आहे - फक्त तेलात भाजलेला आहे. नाश्त्याला पोटभरीचा होतो. फ्रेंच टोस्टचे हे देशी रूप म्हणता येईल!!

१. ह्यात इतर भाज्या (पालक, मेथी, कांदा पात, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, गाजर, ढब्बू मिरची किंवा अन्य आवडीच्या भाज्या बारीक चिरून अथवा किसून) घालता येऊ शकतात. वरची कृती ही बेसिक कृती आहे. त्यात आपापल्या आवडीप्रमाणे व चवीप्रमाणे फेरफार करू शकता.
२. बेसन थोडे कमी घेऊन इतर पिठेही ह्या पदार्थात वापरू शकता. (तांदूळ पीठ, मूग डाळ पीठ इ.) पण पदार्थाची मुख्यत्वे चव बेसनाची आहे.
३. लसणाचा स्वाद नको असेल तर ओवा / तीळ / ओव्याची चुरडलेली पाने इ. स्वादासाठी घालता येईल.

माहितीचा स्रोत: 
आई

बन-फुल्ल... (फोटो सहित)

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सारण:

यासाठी काही प्रमाण नाही. आपल्या आवडीप्रमाणे.

सारण प्रकार १ - मिक्स भाजी:

कांदा - बारीक चिरुन
लसुण - बारीक चिरुन
लाल आणि हिरव्या कॅप्सीकमचे बारीक तुकडे
गाजर - बारीक चिरुन
मटार (फ्रोजन चालतिल)
कॉर्न चे दाणे (फ्रोजन चालतिल)
स्वीट चिली/हॉट चिली सॉस /टोमेटो सॉस / पास्ता सॉस - आवडी प्रमाणे.
कोथोंबीर/पार्सली - आवडी प्रमाणे
गरम मसाला/हरीसा/इटालियन मिक्स्ड ड्राय हर्ब्ज - आवडी प्रमाणे
मीठ चवीप्रमाणे.

*****
सारण प्रकार २: मॅश्ड पोटॅटो

उकडलेल्या बटाट्याच्या फोडी
बटर
दूध
इटालियन मिक्स्ड ड्राय हर्ब्ज - आवडी प्रमाणे आणि ऐच्छिक
मीठ, मिरेपुड चवीला.

*****

सारण प्रकार ३: अंडा भुर्जी

अंडी,
चिरलेला कांदा
चिरलेला टॉमेटो आवडत असल्यास
कोथिंबीर/पार्सली - आवडीप्रमाणे
मीठ, मिरेपुड - चवी प्रमाणे

*****
इतर पदार्थ:

बन्स किंवा ब्रेड रोल्स
किसलेले चीज
बटर

roll1.jpg

क्रमवार पाककृती: 

सारण प्रकार १: मिक्स भाजी:

- पॅनमधे थोड्या तेलावर/बटरवर लसुण थोडी परतुन घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा घाला.
- कांदा मऊ होत आला की त्यात चिरलेल्या भाज्या (गाजर, मटार, कॉर्न, लाल + हिरवा कॅप्सिकम)
- भाज्या शिजत आल्या की आपल्या आवडीनुसार सॉस, मसाले, कोथिंबीर/पार्सली, मीठ घाला अणि मिक्स करुन गॅस बंद करा.
- भाजी एका बोलमधे काढुन ठेवा आणि त्यात थोडे किसलेले चीज घालुन मिक्स करा.

*****

सारण प्रकार २: मॅश्ड पोटॅटो

- पॅन मधे थोडे बटर घालुन त्यात उकडलेल बटाटे घाला. वरतुन अर्धाकप कोमट दुध घाला.
- मंद गॅससवर हे मिश्रण डावाने किंवा पावभाजी च्या मॅशर ने मॅश करा, लागेल तसे दुध घाला.
- मिश्रण नीट एकजीव झाले की त्यात अजुन थोडे बटर, आवडीप्रमाणे चीज, मीठ आणि मिरेपुड किंवा इटालियन हर्ब्ज घाला.
- मिश्रण फार घट्ट किंवा पातळ नको.

*****
सारण प्रकार ३: अंडा भुर्जी:

- अंडी थोड दुध, मीठ, मिरेपुड घालुन फेसुन घ्या.
- पेन मधे तेल्/बटर घालुन कांदा मऊसर होईतोवर फ्राय करा. आवडत असल्यास टॉमेटोचे चे तुकडे घाला.
- फेसलेली अंडी घालुन भुर्जी बनवा.
- वरतुन कोथिंबीर/पार्सली घाला.

******

असेंब्ली करता:

१. बन्स/ब्रेड रोल्स चा वरचा भाग धारधार सुरीने कापुन घ्या... ह्या टोप्या बाजुला ठेवा.
२. रोल्सचा आतला भाग फोटोत दाखवल्याप्रमाणे चमच्याने खरवडुन काढुन घ्या - बन आता वाटीसारखा दिसेल ... काढलेला भाग बाजुला ठेवा (टिप नं ६ बघा).

roll2.jpg

३. आतल्या भागाला थोडे बटर लावुन त्यात आपल्या आवडीचे सारण भरा.

roll3.jpg

४. वरतुन किसलेले चीज घालुन हे तयार रोल्स ओव्हन मधे/ग्रीलखाली ठेवा.
५. वरचं चीज मेल्ट झाली की त्यावर त्या त्या ब्रेडरोल्सच्या टोप्या लावुन बंद करा.
६. चीज गरम असल्याने टोप्या चिकटतिल.
७. प्रत्येक रोल सिल्वर फॉईलमधे गुंडाळुन थोडावेळ ५-७ मिनीटं ओव्हनमधे ठेवा.
८. सर्व्ह करताना प्लेटमधे सॅलड घालुन त्यावर फॉईलमधुन काढलेला रोल ठेवा.
९. सुरीने मधे कापुन आवडत्या सॉस बरोबर गरम गरम खा स्मित

roll5.jpg

roll4.jpg

वाढणी/प्रमाण: 
आवडेल तसे, आवडेल तेव्हढे
अधिक टिपा: 

१. हा प्रकार झटपट होणारा आहे. सारणं आधी करुन ठेवता येतात. आयत्यावेळेला फक्त रोल्स स्टफ करायचे, गरम करायचे आणि सर्व्ह करायचे.
२. कुठल्याही भाज्या वापरता येतिल.
३. सारणाचे पण विविध प्रकार करता येतिल. व्हेज्/नॉन व्हेज कुठलेही.. फक्त चीज आणि त्याचे कॉम्बो चांगले लागले पाहिजे स्मित
४. रोल्स खुप मऊ असतिल तर टोप्या नीट कापल्या जाणार नाहित. त्यासाठी रोल्स अगदी २-३ मिनीट ओव्हन मधे गरम करुन घ्या. आणि मग टोप्या कापा.
५. ओव्हनमधे रोल्स जास्तवेळ राहिले तर बाहेरुन कुरकुरीत्/कडक होतिल आणि कापताना क्रम्ब्स पडतिल.
६. ब्रेडचा आतला काढलेला चुरा, उरलेले मॅश्ड पोटॅटो, भाजी वगैरे घालुन दुसर्‍या दिवशी कटलेट्स करा स्मित नाहीतर ब्रेडचा चुरा ओव्हन मधे गरम करुन ब्रेड क्रम्ब्स म्हणुन वापरा. किंवा ह्यात बटर + चीज आणि थोडी साखर किंवा मीठ घालुन छोटे छोटे लाडु वळा आणि खा. हेच लाडु तळुन्/बेक करुन ग्रेव्हीत घालुन खा....

*****

वैधानिक इशारा: या प्रकारात चीज चा सढळ हाताने वापर केलेला आहे. तरी डाएट कॉन्शस मंडळींनी लांबुनच बघावा अथवा आपल्या जबाबदारीवर अर्धाच बन्/रोल खावा स्मित

माहितीचा स्रोत: 
माझे प्रयोग :)

लो कॅलरी बनाना ब्रेड

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

२ कप कणिक,
३ मध्यम आकाराची पण खूप पिकलेली केळी,
१/२ कप कनोला ऑइल्/वेजीटेबल ऑइल/क्रिस्को,
१/२ कप घट्ट दही,
२ मध्यम अंडी(१ व्हाईट १अक्खे (लो फॅट आहे ना)),
१ चमचा बेकींग सोडा, १ चमचा बेकींग पावडर,
सिनामन,
वॅनिला इसेन्स,
अर्धा कप साखर/मेपल सिरप,

क्रमवार पाककृती: 

( मी आधी इथे लिहिलेली कारण ब्लॉग वर संकलित करायची होती पण बर्‍याच मायबोलीकरांनी विचारली म्हणून परत इथे लिहिली.)

आधीच ओवन ३७५ वर ओवन चालून करून ठेवा.
१) कणीक बेकिंग पॉवडर व बेकींग सोडा मिक्स करून चाळून घ्या.
२) केळी सोलून 'हातानेच' मॅश करून घ्यायची. त्यातच सिनामन, मीठ किंचीत व दही टाकून मिसळायचे. मग साखर टाकून मग ऑईल टाकून एकजीव करा व बाजूला ठेवायचे.
३) एक आक्खे अंडे वेगळ्या बोल मध्ये फेटून घ्यायचे दर दुसरे अंड्याचे पांढरे फक्त घ्यायचे. इसेन्स टाकून दोन्ही मस्त फेटून घ्यायचे व वरील मिश्रणात मिक्स करा.
४) हळूहळू कणीक मिक्स करून घ्या व अलगद हाताने ढवळा मिश्रण. आता त्यात अक्रोड, बेदाणे वगैरे टाका.
ओवन मध्ये २५ मिनीटे बेक करा. सुइ घालून पहा झालाय का मग थंड होवून काढा. एक स्लाईस बरोबर वॅनीला आईसक्रीम व स्लाईसवर चॉकलेट सॉस टाका, मस्त लागते. हे खाल्ले तर लो कॅलरी रहाणार नाही मग. स्मित

चॉकलेट सॉस:
कुठल्याही आवडती डार्क चॉकलेट घेवून अर्थ बॅलेन्स मध्ये विरघळून मग त्यात साखर व क्रीम/एवापोरेटेड मिल्क पॉवडर जराशीच घालून डबल बॉइलर मध्ये विरघळून घ्यायचे. जर लहान मुलांना द्यायचे नसेल तर ह्या मिश्रणात जरासे थंड झाले की त्यातच cognac नाहीतर expresso टाकायची. एकदम रिच टच येतो साध्या केकला. थंडीत एकदम मस्तच. स्मित
कोणी केलाच हा ब्रेड तर फोटो टाका इथे. मला आवडेल. माझे फोटो हरवलेत ह्या ब्रेडचे.

अधिक टिपा: 

१.मिश्रण खूप घट्ट झालेच तर जरासे दूध मिक्स करा.
२. बे़कींग सोड्याला वास येतो असे बर्‍याचदा एकले म्हणून त्याल ऑप्शन म्हणून " डबल अ‍ॅक्टींग बेकींग पॉवडर वापर". ती वापरत असाल तर फक्त वरील मिश्रणात दिड चमचाच घ्या.

शाही ब्रेड पुडिंग

लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

शिळा हाला(challah) किंवा ब्रिओश ( Brioche) ब्रेड
६ अंडी
अर्धा कप साखर
अर्धा कप मास्कारपोने चीझ,
दूध,
बदामाचे काप
बदामाचा इसेंस ( ऐच्छिक )

क्रमवार पाककृती: 

एका स्टिलच्या पातेल्यात अर्धा कप साखर करपवून घ्यावी व हे करपलेले मिश्रण ( कॅरमेल ) एका ९ इंच व्यासाच्या ओव्हनप्रूफ भांड्याच्या तळाला व कडांना एक इंच पर्यंत पसरवून घ्यावे. हे गोल भांडे थोडावेळ ( ३० मिनिटे पुरतील ) फ्रीझमधे ठेवावे.

एक दिवसाचा शिळा ब्रिओश किंवा हाला ब्रेड (किंवा अंडं घातलेला कुठलाही गोडसर ब्रेड ) च्या अर्धा इंच जाडीच्या स्लाइसेस कराव्यात.

एका भांड्यात ६ अंडी , अर्धा कप मस्कारपोने चीझ( किंवा साधं सॉफ्टन केलेलं क्रीम चीझ ) २ -३ टे स्पून साखर एकत्र फेटावं. २टिस्पून व्हनिला इसेंस किंवा आल्मंड इसेंस घालावा. त्यात हळू हळू अर्धा कप दूध घालून फेटावं. ब्रेडच्या स्लाइसेस एकेक करून या मिश्रणात २-३ बुडवून मग तळाशी कॅरमेल लावलेल्या भांडयात रचाव्या . उभ्या, रेडियल टायर सारख्या दिसतील अशा रचल्या तर छान दिसते हे पुडिंग. मग उरलेलं दुध, अंड्याचं मिश्रण या स्लाइसेसवर ओतून , प्लास्टिक रॅप लावून हे भांडं फ्रीझ मधे १०-१२ तास ठेवावं.
नंतर ३२५ डिग्री फॅ वर १५-२० मिनिटे बेक करावं
मग यावर थोडे बदामाचे पातळ काप भुरभुर्वून परत १५ ते वीस मिनिटे बेक करावं.

ओव्हन मधून काढल्यावर कडांना सुरी फिरवून घ्यावी अन मग एका प्लेट वर हे भांडं उपडं करावं. ( हे करताना सांभाळून, ओव्हन मिटस घालावे व हे काम सिंकपाशी करावे ).
सर्व्ह करताना पाय च्या करतो तशा स्लाइसेस कापून सर्व्ह करावे

प्रत्येक स्लाइस वर थोडे थोडे फ्रेश व्हिप्पड क्रीम घालून खावे .

वाढणी/प्रमाण: 
६-८ लोकांकरता
अधिक टिपा: 

ह्याची सर्व तयारी आधी करुन ठेउन पाहुणे आल्यावर शेवटचं बेकिंग केलं तर आयत्यावेळि फारशी धडपड न करता गरम गरम स्वीट डिश सर्व्ह करता येते.
ब्रंचला कोणी येणार असतील तर आदल्या रात्री सगळी तयारी करायची.

माहितीचा स्रोत: 
इकडून तिकडून वाचून अन स्वतःचे प्रयोग