अंड्यांचे प्रकार

Cinnamon swirl sour cream cake

लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

Nut Mixture:

१/४ कप साखर
१ टेबलस्पून दालचिनी पावडर
१/४ कप अक्रोडाचा चुरा

केकसाठी :

२ कप मैदा (चाळून)
१ टिस्पून बेकिंग पावडर
१ टिस्पून बेकिंग सोडा
१/४ टिस्पून मीठ
१/२ कप बटर ( ११० ते ११३ ग्रॅम्स)
१ कप साखर
१ टिस्पून व्हॅनिला इसेन्स
२ अंडी
8-oz sour cream


(हा जरा पूर्वी केलेला तेव्हाचा फोटो. साखर साधी वापरल्याने व दालचिनीची पूड घरी केल्यामुळे नट मिक्ष्चर काही छान दिसत नव्हते, व सिनॅमन स्वर्ल देखील धड आला नव्हता. त्यामुळे परत केला केक.. )

क्रमवार पाककृती: 

१) अव्हन ३५०डिग्रीजला प्रिहिट करायला ठेवा.
२) नट मिक्ष्चर तयार करून ठेवा. मी साध्या साखरेऐवजी ब्राऊन शुगर वापरली.
३) मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा चाळून घ्या.
४) साखर, बटर व व्हॅनिला एकत्र मिक्सरमधून काढून एका भांड्यात ठेवा.
५) त्यात अंडी एकावेळेस एक अशातर्‍हेने नीट beat करा.
६) या मिश्रणात (मैदा+बेपा+बेसो) व सावर क्रिम घालून ते सर्व स्मुद होईपर्यंत ब्लेन्ड करा.
७) बटर लावून तयार केलेल्या केकच्या अव्हनच्या भांड्यात अर्धे मिश्रण घालून त्यावर नट मिक्ष्चर पसरा व उरलेले केकचे मिश्रण घालून त्यावर उरलेले नटचे मिक्ष्चर पसरा.
८) ४० मिनिटे किंवा केकमध्ये खुपसलेली सुरी क्लिन येईपर्यंत बेक करा..
९) मायबोलीवर पाकृ द्या किंवा फोटो अपलोड करा! फिदीफिदी
१०) मगच खा! कॉफीबरोबर अमेझिंग लागतो हा केक!

वाढणी/प्रमाण: 
दोघांना २-३ दिवस पुरावा, माझ्यासारखा हावरटपणा न करता खाल्ला तर. :फिदी:
माहितीचा स्रोत: 
मी जसाच्या तसा पुढील लिंकवरून केला आहे. इथे देण्यासाठी मराठीत पाकृ लिहीली.. :) http://www.insidethekaganoffkitchen.com/2010/04/24/old-fashioned-sour-cream-cake/

ब्रेड पुडिंग

लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ कप (१६ औंस) दूध (म्हणजे साधारण अर्धा लिटर)
२ अंडी
*७-८ ब्रेड स्लाइसेस (भारतातल्या छोट्या स्लाइसेस १०सुद्धा लागतील)
*पाऊण कप साखर
व्हॅनिला इसेन्स

क्रमवार पाककृती: 

अंडी फेटून घ्या.
त्यात दूध, साखर आणि इसेन्स मिसळून घ्या.
आता यात ब्रेड कुस्करून मिसळा.
ग्रीज्ड बेकिंग पॅनमधे हे मिश्रण ओता. (या प्रमाणात घेतलेले मिश्रण साधारणपणे ८इंचX८इंच पॅनमधे मावेल.)
३५० डिग्रीजना ३० ते ३५ मिनिटे बेक करा.

अधिक टिपा: 

ब्रेडच्या या प्रमाणाने वडी पडण्याइतके घट्ट पुडिंग होते. तुम्हांला त्याहून सॉफ्ट (थलथलीत) पुडिंग आवडत असेल तर त्यानुसार ब्रेड कमी वापरा.
साखरेचे प्रमाण आवडीनुसार कमीजास्त करा.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण

कांदा-बटाटा भुर्जी

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ कांदे
१ बटाटा
२-३ हिरव्या मिरच्या
१ चमचा आलं-लसूण पेस्ट
३ अंडी... साधी नेहेमीची
कोथिंबीर
लाल तिखट
हळद
अर्धा चमचा गरम मसाला
तेल
मीठ

क्रमवार पाककृती: 

- कांदे चौकोनी बारीक चिरून घ्यावेत
- बटाटा धूवून कांद्यासारखाच चिरून घ्यावा
- हिरव्या मिरच्या धूवून बारीक चिराव्यात
- कोथिंबीर धूवून बारीक चिरावी
- एका पॅनमध्ये तेल तापवावं
- गरम तेलात मिरच्या + कांदा घालावा, परतावा
- कांदा पारदर्शक झाल्यावर बटाटा घालावा
- परतावं. आलं-लसूणपेस्ट घालावी, नीट मिसळावं. झाकण ठेवून एक वाफ काढावी. त्यामुळे बटाटा शिजेल...
- आता हळद, तिखट घालावं. परतावं.
- अंडी फोडून घालावीत, नीट मिसळावं
- गरम मसाला, मीठ घालावं, छान परतावं
- भुर्जी जरा सुकली की, कोथिंबीर घालून गरम गरम वाढावी

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात दोन लोकांचं होतं
अधिक टिपा: 

- यात टोमॅटो नाही वापरला कारण बटाटयालापण शिजतांना पाणी सुटतं
- अगदी शेवटी, ग्लेज येण्याकरता चमचाभर तेल घालता येतं
- गरम पराठा, फुलक्याबरोबर छान लागते

माहितीचा स्रोत: 
प्रयोग! दुसरं काय!

च्यावान मुशी

लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- २ अंडी
- अर्धा कप स्टॉक ( चिकन, व्हेजिटेबल, मासे कुठलाही चालेल - मुळ रेसिपीत कात्सुओदाशी -फिशस्टॉक आहे)
- १ टिस्पुन सोयासॉस ( किंवा मीठ चवीपुरते )
ऑप्शनल -
- चिकनचे एक दोन उकडलेले तुकडे / गाजराचे उकडलेले दोन चार स्लाईस / कुठलेही मश्रुम
- सजावटीसाठी कोथिंबीर / काळे मीरे / मित्सुबाची एक दोन पाने

क्रमवार पाककृती: 

१. एका मोठ्ठ्या पातेल्यात थोडे पाणी उकळायला ठेवावे. (या पातेल्यात दोन सर्विंग बोल/ दोन कप मावले पाहिजेत. आणि पाण्याची पातळी त्या बोलमधे पाणि जाणार नाही इतपत ठेवावी. )
२. दोन अंडी नीट फेटुन घ्यावी.
३. त्या अंड्यात सोयासॉस / मीठ आणि स्टॉक मिक्स करुन ढवळुन घ्यावे.
४. ज्या छोट्या बोलमधे सर्व्ह करायचे त्या बाऊल मधे चिकनचे तुकडे / मश्रुम / गाजर जे असेल ते ठेवायचे. नसले तरी काही हरकत नाही.
५. अंड्याचे मिश्रण एका जाड गाळणीने गाळुन घ्यावे. गाळतानाच ज्या बोलमधे ते तुकडे ठेवले त्यात समप्रमाणात गाळावे ( म्हणजे अजुन एक भांडे लागणार नाही.)
६. पातेल्यामधले पाणी उकळायला लागले की गॅस अगदी कमी करावा आणि हे बोल पाण्यात ठेवावे. वरुन पातेल्यावर झाकण ठेवावे.
६. हे बोल ठेवल्यानंतर पाणी जोरात उकळता नये नाहितर च्यावान मुशी स्मुथ होत नाही.
७. सात / आठ मिनीटांनी टुथपिक घालुन बघावे, साधारण पुडींग सारखे झाले असेल तर गॅस बंद करावा. सजावटीला कोथिंबीर / मित्सुबो घालुन एक मिनीट तसेच झाकुन ठेवावे म्हणजे त्याचा वास लागतो.
८. आता गरम गरम च्यावान मुशी खायला तयार आहे. नाश्त्यासाठी चांगला प्रकार आहे.

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी ( एका बोलला एक अंडे + पाव कप स्टॉक)
अधिक टिपा: 

-आठ दहा मिनीटांपेक्षा जास्त शिजवु नये नाहीतर कंसिस्टंसी कशीतरीच होते.
- एका अंड्याला पाव कपापेक्षा जास्त स्टॉक वापरु नये नाहितर पुडींग सारखे बनत नाही.
-भाज्यांचा स्टॉक तयार करण्यासाठी. भाज्यांचे कापुन उरलेले तुकडे जसे फ्लावरचे देठ/ पाने इ. धुवून उकळवुन ते पाणीही वापरता येईल.
- मुळ रेसिपी मधे कात्सुओ दाशी म्हणजे कात्सुओ माशाचा स्टॉक आयत्या वेळी तयार करुन गार करुन वापरतात. पण तो सगळीकडे उपलब्ध नसतो, त्याचा वास काही जणांना आवडत नाही त्यामुळे मी चिकन स्टॉक आणि भाज्याचा स्टॉकचे व्हेरिएशन करुन दोनतीनदा पाहीले.

तळटीप
प्रादेशिक मधे "जपानी" हा ऑप्शन नाहीये. त्यामुळे ते सिलेक्ट नाही केले.

माहितीचा स्रोत: 
जपानी मैत्रीण

एग रोल - अंड्याचे रोल

लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ अंडी
१/२ वाटी कॉर्न फ्लोअर
१/२ चमचा जिरेपूड
१/२ चमचा मिरेपूड
१/२ चमचा लाल तिखट
४ चमचे तेल
चवीप्रमाणे मीठ.

क्रमवार पाककृती: 

कॉर्न फ्लोअर,जिरेपूड,मिरेपूड,तिखट,मीठ एकत्र करून घ्यावे. .
अंडी फोडून, पांढरे पिवळे भाग एकत्र करून घ्यावे. फेटू नये. पॅनला तेल लावून अंड्याचा अगदी पातळ थर द्यावा. तेल पूर्ण पॅनला लागले पाहिजे तरच ते पूर्ण omelet ला लागेल.
प्रवाहीपणा कमी झाला की लगेच उलटावे. रंग बदलेपर्यंत वाट बघू नये स्मित
आता हि अंड्याची पोळी ताटात घेऊन तिचे सुरीने उभे भाग पाडावे. साधारण एका पोळीचे सहा होतात.
एक एक भाग पिठात घोळवून पुन्हा पॅनमधे ठेवावा. [omelet ला जे तेल असते त्यामुळे पिठ व्यवस्थीत चिकटते], वरून थोडेसे तेल टाकावे.थोडासा फुलला की उलट करून परत थोडेसे तेल टाकावे.
छान खरपूस झाले की त्याचा पॅनमधे असतानाच रोल वळावा.

Egg Roll.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ जणांना
अधिक टिपा: 

२ अंड्यांचे साधारण १२ रोल होतात.
Starter म्हणून चांगले आहे. पोटभरीचे वगैरे अजिबात नाही स्मित

माहितीचा स्रोत: 
आठवत नाही :(

फंडु अंडु - ५ - डेझर्ट - 'स्नो एग्ज' (फ्रान्स)

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

३ अंडी - पिवळे आणि पांढरे वेगळे करुन
२ कप दुध
अर्धा कप सखर
चिमुटभर मिठ
व्हॅनिला बीन किंवा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट
सजावटीसाठी लिंबाचे साल किसुन (लेमन झेस्ट) किंवा स्ट्रॉबेरी/रासबेरी सिरप, कॅरॅमल सॉस, टोस्टेड आमंड्स या पैकी काहिही.

क्रमवार पाककृती: 

'वर्ल्ड एग डे'

'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे' ही जाहिरात आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे. अंडी खाल्याने होणारे अनेक फायदे आहेत.

ऑक्टोबर महिन्यातील दुसरा शुक्रवार हा 'वर्ल्ड एग डे' म्हणुन साजरा केला जातो. इंटरनॅशनल एग कमिशन तर्फे या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

यंदाचा वर्ल्ड एग डे या शुक्रवारी १४ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने अंडी वापरुन बनवलेल्या काही पाककृती या आठवड्यात देण्याचा विचार आहे.

फंडु-अंडु - १ - 'मिनी पावलोवा' (ऑस्ट्रेलिया)

फंडु अंडु - २ - 'मार्बल्ड टी एग्ज' (चायना)

फंडु अंडु - ३ - 'मोक्का साबायॉन/झाबायोन - Mocha zabaglione ' (इटली)

फंडु अंडु - ४ - 'ग्येरन झिम - Gyeran Jjim' (कोरिआ)

**************************************************************************

'स्नो एग्ज डेझर्ट' (फ्रान्स)

snow111.JPG

स्नो एग्ज म्हणजे पोच केलेले एग व्हाईट्स. ही क्रिम अँग्लेस म्हणजे व्हॅनिला कस्टर्ड मधे घालुन खातात. १७व्या शतकात एका स्विस शेफ ने सर्वप्रथम एग व्हाईट्स फेटुन ते पोच करुन डेझर्ट्स मधे वापरायचा प्रयोग केला. त्यानंतर फ्रेंच शेफ्स नी ही स्नो एग्ज पाककृती डेव्हलप केली.

यालाच कधी कधी 'फ्लोटिंग आयलंडस डेझर्ट' असे देखिल म्हणतात. परंतु फ्लोटिंग आयलंड मधे युज्वली लिकर आणि बिस्किटाचे लेयर्स असतात.

क्रमवार पाककृती

स्नो एग्ज साठी:

१. सर्वप्रथम एका पसरट पातेल्यात किंवा पॅन मधे दुध गरम करायला ठेवा. यातच व्हॅनिला बीन किंवा व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट घाला. दुध मंद आचेवर गरम करा. उकळणार नाही याची काळजी घ्या.

२. एका स्वच्छ, कोरड्या काचेच्या बोल मधे ३ अंड्यातील पांढरे वेगळे करुन घ्या. पांढरे वेगळे काढताना पिवळ्या बलकाचा अंश येणार नाही याची खबरदारी घ्या.

३. एग बिटर किंवा इलेक्ट्रिक बीटर्स (हँड मिक्सर) लो स्पिडवर ठेऊन अंडी फेटायला सुरुवात करा. जरा फेसाळ दिसायला लागले की स्पिड मिडीयम वर वाढवुन फेसायला लागा. 'सॉफ्ट पिक्स' दिसायला लागले की चिमुटभर मिठ आणि दोन टेबलस्पून साखर एका वेळेस थोडी थोडी घालत फेसत रहा. सगळी साखर संपल्यावर सुद्धा थोडावेळ फेसायला लागेल. मिश्रण हलके आणि चकचकित दिसायला लागे पर्यंत फेटा. 'स्टिफ पिक्स' दिसायला हव्यात.

snow2.JPG

४. आता स्टिलचा एक टेबलस्पुन भरुन हे फेसलेले मिश्रण घ्या, दुसर्‍या टेबलस्पुन घेऊन या फेसाला जमेल तितका गोल किंवा फुगिर लंबगोलाकार शेप द्या आणि गोळे जस जसे बनत जातिल तसे ते तापत ठेवलेल्या दुधात सोडा आणि पोच करा.

snow1.JPG

५. साधारण २ मिनीटांनी हे गोळे उलटे करुन परत पोच करा. गोळे थोडे फुगतिल आणि एकसंध दिसायला लागले की भोकाच्या चमच्याने काढुन किचन टॉवेल किंवा किचन पेपर वर निथळायला ठेवा. असे सर्व गोळे 'पोचुन' घ्या स्मित

****
क्रिम अँग्लेस साठी:

१. गॅसवर डबल बोयलर किंवा एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा.

२. गरम दुधातील व्हॅनिला बीन काढुन घ्या आणि दुध गाळुन घ्या. यात उरलेली साखर घाला आणि व्हॅनिला बीन मधिल बीया खरवडुन घाला.

३. एका हिट प्रुफ बोल मधे ३ अंड्यांचे उरलेले पिवळे बलक हलके फेसुन घ्या. यात थोडे गरम दुध घालुन मिक्स करा आणि मग बाकीचे दुध घाला. हे भांडे उकळत ठेवलेल्या पाण्यावर खाली पाण्याला स्पर्श करणार नाही असे ठेवा. आंच मंद करा आणि मिश्रण लाकडी चमच्याने ढवळत रहा. थोड्याच वेळात मिश्रण घट्ट व्हायला लागेल व क्रिमी कस्टर्ड तयार होइल.

४. बोल पाण्यावरुन काढुन घ्या आणि क्रिम अ‍ॅग्लेस थोडे गार होऊ द्या.

*****

असेंबली:

कस्टर्ड सर्विंग बोल मधे ओता त्यावर १/२ स्नो बॉल्स ठेवा. ते कस्टर्डवर तरंगतिल. बोल्सना प्लॅस्टिक रॅप्/क्लिंग रॅप लावुन हे बोल्स फिज मधे गार करत ठेवा. आयत्या वेळेस त्यावर आपल्या आवडीचे टॉपिंग घालुन सर्व्ह करा.

snow10.JPG

*****************

माझे प्रयोगः

- दुधात व्हॅनिला न घालता मी केशर आणि वेलची घातली.
- कस्टर्ड बनवताना त्यात मी थोडे केशर सिरप घातले.
- सर्व्ह करताना वरतुन टोस्टेड बदाम घातले आणि केशर सिरप ड्रिझल केले.

snow5.JPG

*****************

वाढणी/प्रमाण: 
खाल तितके :)
अधिक टिपा: 

- स्नो बॉल्स पूर्णत: निथळु द्या. दुधाचा अंश राहिल्यास ते पचपचित होतिल.
- हे स्नो बॉल्स ३-४ तासापेक्षा जास्त वेळ नुसते राहात नाहित त्यामुळे कस्टर्ड गार होताच त्यावर हे ठेऊन फिज मधे ठेवा.
- कस्टर्ड फार घट्ट नको (साधारण रबडी आणि बासुंदीच्या मधली कन्सिस्टंसी).
- कस्टर्ड न वापरता कुठल्याही फळाच्या प्युरीवर किंवा सॉसवर घालुन हे स्नो बॉल्स खाता येतात. फक्त ते तरंगतिल अशी कन्सिस्टंसी हवी.

माहितीचा स्रोत: 
डिव्हाईन डेझर्ट्स पुस्तक आणि माझे प्रयोग

अंडेदिन - कॅसरोल

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ ते ३ अंडी (मोठी असतील तर २ पुरेत.)
३ कप ब्रेडचा चुरा (ब्रेडचा चुरा मोकळा असावा. कडा काढून हलक्या हाताने चुरा करावा.)
पाऊण कप दूध
३ ब्रेकफास्ट सॉसेजेस (चिकन किंवा इतर), फ्लेवर्ड चालतील
पालक, टोमॅटो, ढबू इ. इतर भाज्या ऐच्छिक.
मीठ
मिरपूड
साखर
१ मोठा चमचा किसलेले चीज (cheddar)
तेल

क्रमवार पाककृती: 

- सॉसेजेस ५-१० मिनिटे ग्रिल करुन घेऊन त्यांचे तुकडे करावेत. कुक्ड असतात त्यामुळे ग्रिल केले नाहीत तरी चालेल.
- ब्रेडच्या चुर्‍यात अंडी फोडून घालावी.
- हळूहळू दूध घालत नीट फेटून घ्यावे.
- त्यात सॉसेजेस घालावीत.
- भाज्या, मीठ, मिरपूड, साखर घालून मिसळावे.
- बेकिन्ग डिशला सढळ हाताने तेल लावून मिश्रण त्यात ओतावे. वरुन चीज पसरावे. (दिलेल्या प्रमाणाला ८ इन्च स्क्वेअर डिश पुरेल)
- ४०० डिग्री फॅ. ला १५-२० मिनिटे बेक करावे
- फुगून वर आले आणि बाजूने सुटू लागले की oven बंद केला तरी चालेल. मग थोडावेळ भांडे आतच ठेवावे.

फोटोतल्या पदार्थात भाजी म्हणजे फक्त पालक वापरला आहे.

casserole.jpg

casserole2.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ किंवा १च व्यक्ती
अधिक टिपा: 

झटपट ब्रेकफास्ट होतो किंवा सूपबरोबर डिनरला चालतो. आवडीनुसार कांदा, भाज्या इतर मसाले घालू शकता. पण न्याहरीसाठी असाच चांगला लागतो.

लाजोच्या 'अंडीदिन' कार्यक्रमांतर्गत माझ्यातर्फे हा पदार्थ. स्मित

माहितीचा स्रोत: 
सहकर्मचारी (माजी)

फंडु अंडु - ४ - 'ग्येरन झिम - Gyeran Jjim' (कोरिआ)

लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३ अंडी,
१ कप पाणी,
१ टेबलस्पून फिश सॉस किंवा लाईट सोयासॉस (मी सोयासॉस वापरला आहे),
बारीक किसलेले गाजर,
कांद्याची पात चिरून
मिठ चवीला

क्रमवार पाककृती: 

'वर्ल्ड एग डे'

'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे' ही जाहिरात आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे. अंडी खाल्याने होणारे अनेक फायदे आहेत.

ऑक्टोबर महिन्यातील दुसरा शुक्रवार हा 'वर्ल्ड एग डे' म्हणुन साजरा केला जातो. इंटरनॅशनल एग कमिशन तर्फे या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

यंदाचा वर्ल्ड एग डे या शुक्रवारी १४ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने अंडी वापरुन बनवलेल्या काही पाककृती या आठवड्यात देण्याचा विचार आहे.

फंडु-अंडु - १ - 'मिनी पावलोवा' (ऑस्ट्रेलिया)

फंडु अंडु - २ - 'मार्बल्ड टी एग्ज' (चायना)

फंडु अंडु - ३ - 'मोक्का साबायॉन/झाबायोन - Mocha zabaglione ' (इटली)

फंडु अंडु - ५ - डेझर्ट - 'स्नो एग्ज' (फ्रान्स)

**************************************************************************

'ग्येरन झिम - Gyeran Jjim'

Jjim4.JPG

कोरिआ मधे घराघरात नेहमी केला जाणारा हा पदार्थ म्हणजे एकप्रकारचे एग कस्टर्डच आहे. परंतु हे कस्टर्ड वाफवुन बनवलेले असते. अतिशय हलके आणि लुसलुशीत असे हे 'ग्येरन झिम' तसे बनवायला ही सोपे आहे स्मित

यात अजिबात तेल, क्रिम, बटर इ इ वापरलेले नसते त्यामुळे तब्येतीला ही उत्तम स्मित

क्रमवार पाककृती

१. पातेल्यात/मोदक पात्रात/स्टिमर मधे पाणी उकळायला ठेवा. त्यावर चाळणी ठेवा.

२. एका बोलमधे अंडी फोडुन हलक्या हाताने मिक्स करुन घ्या. फेटायचे नाहिये तर फक्त पिवळे आणि पांढरे नीट एकत्र मिक्स करायचे आहे.

३. आता हे मिश्रण गाळणीतुन गाळुन घ्या आणि त्यात पाणी, फिश/सोया सॉस, मिठ घालुन परत एकदा हलके मिक्स करा.

४. हिट प्रुफ काचेच्या बोल्समधे किंवा घट्ट झाकणाच्या स्टिलच्या डब्यांमधे हे मिश्रण ओता. साधारण पाऊण बोल भरेल इतपत.

Jjim1.JPG

५. बोल्स ना वरतुन सिल्वर फॉइल लावुन बंद करा आणि चाळणीवर ठेवा. वरतुन झाकण लावुन साधारण १५-२० मिनीटे वाफवुन घ्या.

६. १५-२० मिनीटांनी झाकण काढुन चेक करा. मिश्रण थोडे घट्ट व्हायला लागले असेल. आता यात किसलेले गाजर आणि कांद्याची पात घाला व परत फॉइल लाऊन अजुन साधारण १०-१२ मिनीटे वाफवायला ठेवा.

७. १०-१२ मिनीटांनी परत चेक करा. टूथपिक किंवा स्क्युअर घालुन बघा. जर टूथपिक किंवा स्क्युअर काहिही न चिकटता क्लिन बाहेर आले तर ग्येरन झिम तयार आहे. अन्यथा अजुन २-५ मिनीटे वाफवायला ठेवा.

Jjim2.JPG

८. तयार ग्येरन झिम गरमा गरम भाताबरोबर, राईस नुडल्स बरोबर खायला घ्या. त्यावर हवा तर थोडा सोयासॉस आणि चिली सॉस घाला.

Jjim5.JPG

*****************************************

आणि आता हे माझे प्रयोग स्मित

Jjim6.JPG

Jjim8.JPG

* यात मिश्रण वाफवताना फक्त मिठ आणि मिरेपूड घातली. नंतर मधे चेक केल्यावर त्यात चिरलेला पालक आणि रेड कॅप्सिकमचे तुकडे घातले. सर्व्ह करताना थोडे गार्लिक बटर आणि पास्ता सॉस घातला - कोरिटालिअन ग्येरन झिम तयार स्मित

****************************

Jjim3.JPG

Jjim9.JPG

^ यात मिश्रणात आमंड इसेन्स आणि पिठीसाखर घातली. शिजल्यावर वरतुन व्हिएन्ना आमंड्स चे तुकडे आणि चॉक सॉस घातला - मस्त डेझर्ट तयार स्मित

******************************

वाढणी/प्रमाण: 
दिलेल्या प्रमाणात साधारण २ व्यक्ती.
अधिक टिपा: 

- ग्येरन झिम अगदी हलके आणि खायलाही सोपे आहे त्यामुळे लहान मुलाम्ना, मोठ्या माणसांना, आजारातुन उठलेल्या व्यक्तींना देण्यासाठी उत्तम. त्याचप्रमाणे डाएट करणार्‍यांसाठीही लो फॅट हाय प्रोटिन ऑप्शन स्मित
- अंडी मिक्स केल्यावर गाळुन घेणे जरुरी आहे कारण त्यामुळे मिस्रणात काही गुठळ्या, कपच्या असतिल तर त्या काढुन टाकता येतात आणि झिम एकसारखे मऊसुत होते.
- यात आपल्या आवडीच्या कुठल्याही भाज्या, हर्ब्ज, फिश किंवा मीट चे तुकडे यात घालता येतात.
- बोल्स वाफवायला ठेवताना त्यावर फॉइल नीट घट्ट बसवा. अन्यथा आत वाफेचे पाणी जाऊन कस्टर्ड पाणचट होईल.
- यात फ्लेवर्स बदलताना शक्यतो गदद रंगाचे द्रव्य घालु नये. कस्टर्डचा ओरिजनल पिवळसर रंगच चांगला दिसतो.
- या क्स्टर्डला अंड्याचा वास अजिबात येत नाही स्मित

माहितीचा स्रोत: 
कोरिअन मैत्रिण आणि फ्लेवर्स बदलायचे माझे प्रयोग

फंडु अंडु - ३ - 'मोक्का साबायॉन/झाबायोन - Mocha zabaglione ' (इटली)

लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ अंड्यातील पिवळे बलक
१ टेबलस्पून साखर
१ टेबलस्पून पाण्यात विरघळवलेली इंन्स्टंट कॉफी

सजावटीसाठी:
चॉकलेटचा चुरा, चॉकलेट स्ट्रॉज, लेडी फिंगर/स्पाँज फिंगर बिस्किटे, आमाराती बिस्किटे किंवा कुठलिही चॉकलेट बिस्किटे या पैकी काहिही.

क्रमवार पाककृती: 

'वर्ल्ड एग डे'

'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे' ही जाहिरात आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे. अंडी खाल्याने होणारे अनेक फायदे आहेत.

ऑक्टोबर महिन्यातील दुसरा शुक्रवार हा 'वर्ल्ड एग डे' म्हणुन साजरा केला जातो. इंटरनॅशनल एग कमिशन तर्फे या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

यंदाचा वर्ल्ड एग डे या शुक्रवारी १४ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने अंडी वापरुन बनवलेल्या काही पाककृती या आठवड्यात देण्याचा विचार आहे.

फंडु-अंडु - १ - 'मिनी पावलोवा' (ऑस्ट्रेलिया)

फंडु अंडु - २ - 'मार्बल्ड टी एग्ज' (चायना)

फंडु अंडु - ४ - 'ग्येरन झिम - Gyeran Jjim' (कोरिआ)

फंडु अंडु - ५ - डेझर्ट - 'स्नो एग्ज' (फ्रान्स)

**************************************************************************

'मोक्का साबायॉन/झाबायोन - Mocha zabaglione ' (इटली)

zab3.JPG

साबायॉन/झाबायोन हा क्लिसिक इटालियन डेझर्ट पेयाचा प्रकार आहे. नवव्या शतकात पहिल्यांदा साबायॉन/झाबायोन बनवला गेला असे विकीपेडियामधे दिले आहे.

ओरिजनल साबायॉन/झाबायोन मधे अंड्याचे पिवळे, साखर आणि मर्साला लिकर वापरली जाते. मर्साला ऐवजी मडिरा वाईन किंवा स्वीट शेरी किंवा शँपेन देखिल वापरली जाते.

क्रमवार पाककृती:

१. इंस्टंट कॉफी थोड्या पाण्यात विरघळवुन घ्या.

२. एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा. उकळी आली की आच बारीक करुन पाणी तापू द्या.

३. त्या पातेल्यावर बसेल असे दुसरे हीटप्रुफ पातेले/बोल घेऊन त्यात अंड्याचा बलक आणि साखर घाला. हे मिश्रण थोडे हलके होईपर्यंत फेटुन घ्या.

४. या मिश्रणात आता कॉफी घाला आणि परत थोडे फेटा.

५. आता हे पातेले गरम पाण्याच्या पातेल्यावर ठेवा (डबल बॉयलर पद्धत). वरचे पातेले आतल्या पाण्याला लागणार नाही याची खबरदारी घ्या.

zab1.JPG

६. आतले मिश्रण सतत फेटत रहा. मिश्रण घट्ट पण फेसाळ दिसायला लागेपर्यंत फेटत रहा.

७. ग्लासात बिस्किटाचे, स्पाँज फिंगरचे तुकडे टाकुन त्यावर हे मिश्रण ओता. थोडे गार झाल्यावर त्यावर किसलेले चॉकलेट घालुन सजवा व खायला द्या.

zab4.JPG

वाढणी/प्रमाण: 
१ व्यक्ती - १ अंड्यांचे पिवळे बलक हे साधारण प्रमाण
अधिक टिपा: 

- साबायॉन/झाबायोन - zabaglione हे युज्वली लिकर वापरुनच बनवले जाते. मी लिकर ऐवजी कॉफी वापरली आहे.
- हे करायला थोडी प्रॅक्टिस लागते. गरम पाण्यावर पातेले ठेऊन अंड्याचे मिश्रण फेटताना भरभर फेटावे लागते पण त्याचबरोबर पातेल्याच्या तळाला गरम पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी लागते. आपल्याला अंदे हळुहळु शिजवायचे आहे. नाहीतर ऑमलेट बनेल स्मित
- साबायॉन/झाबायोन - zabaglione हे गरम किंवा थंड कसेही सर्व्ह करता येते. बिस्किटाच्या तुकड्यांऐवजी फळांचे तुकडे, केक यावर सॉस सारखे घालुन देखिल खाता येते.

---------------
- माझे हात मिश्रण फेटत होते आणि दुसरे कुणी घरात फोटो काढायला नव्हते त्यामुळे या पाकृचे मधल्या स्टेप्सचे फोटो नाहीयेत.

माहितीचा स्रोत: 
बेसिक कृती डिवाईन डेझर्ट्स पुस्तक, कॉफी घालायचा बदल माझा प्रयोग

फंडु अंडु - २ - 'मार्बल्ड टी एग्ज' (चायना)

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

३ अंडी,
१-२ टी बॅग्ज / १ टेबलस्पून चहा पत्ती (स्ट्राँग)
१ चक्री फूल,
३-४ लवंगा,
१ मसाला वेलची किंवा ३-४ साधी वेलची
४-५ मिरी दाणे,
दालचिनीची काडी,
१ चमचा साखर
थोडा सोया सॉस

tea1.JPG

क्रमवार पाककृती: 

'वर्ल्ड एग डे'

'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे' ही जाहिरात आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे. अंडी खाल्याने होणारे अनेक फायदे आहेत.

ऑक्टोबर महिन्यातील दुसरा शुक्रवार हा 'वर्ल्ड एग डे' म्हणुन साजरा केला जातो. इंटरनॅशनल एग कमिशन तर्फे या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

यंदाचा वर्ल्ड एग डे या शुक्रवारी १४ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने अंडी वापरुन बनवलेल्या काही पाककृती या आठवड्यात देण्याचा विचार आहे.

फंडु-अंडु - १ - 'मिनी पावलोवा' (ऑस्ट्रेलिया)


फंडु अंडु - ३ - 'मोक्का साबायॉन/झाबायोन - Mocha zabaglione ' (इटली)

फंडु अंडु - ४ - 'ग्येरन झिम - Gyeran Jjim' (कोरिआ)

फंडु अंडु - ५ - डेझर्ट - 'स्नो एग्ज' (फ्रान्स)

**************************************************************************

फंडु अंडु - २- "मार्बल्ड टी एग्ज"

tea6.JPG

'चायनीज मार्बल्ड एग्ज' किंवा 'चायनीज टी एग्ज' हा चायनामधे नेहमी खल्ला जाणारा उपहाराचा पदार्थ आहे. खासकरुन चायनीज न्यु इयरच्या वेळेस ही एग्ज खुप प्रमाणात बनवली जातात कारण अशी समजुत आहे की ही अंडी म्हणजे 'गोल्ड नगेट्सच' जणू, त्यामुळे तुम्ही जितकी बनवाल आणि दुसर्‍यांबरोबर शेअर कराल तितकी भरपूर संपत्ती तुमच्याकडे येते. एरवी देखिल टेकअवे शॉप्स मधे, रेस्टॉरंट्समधे ही टी एग्ज हमखास मेन्युवर असतात.

क्रमवार पाककृती:

१. एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवावे. पहिली उकळी येताच त्यात अंडी उकडायला ठेवावीत.

२. ३-४ मिनीटे अंडी उकडल्यावर डावाने/चमच्याने अंडी हलकेच बाहेर काढुन एका बोल मधे ठेवावीत व वरुन गार पाणी सोडावे.

३. अंडी हाताळण्याइतपत गार झाली की एका टीस्पूनने अंड्याच्या वरच्या कवचाला हलकेच टॅप करावे. कवचाला तडे गेले पाहिजेत पण कवच निघता कामा नये.

tea2.JPG

४. आता अंडी ज्या पाण्यात उकळली त्याच पाण्यात (खराब झाले नसेल तर) वरील सर्व मसाल्याचे पदार्थ, चहा पत्ती/बॅग्ज, साखर इ इ घालावे व त्यात ही कवच क्रॅक केलेली अंडी सोडावीत. साधारण ४० मिनीटे अंडी गरम पाण्यात राहु द्यावीत (सिमरींग टेम्परेचर).

tea3.JPG

५. साधारण ४० मिनीटांनंतर गॅस बंद करुन पातेल्यावर झाकण ठेवावे.

६. पाणी कोमट झाले की हे पाणी, त्यातला मसाला, चहा आणि अंडी एका काचेच्या बोलमधे काढुन ठेवावीत व वरुन क्लिंग रॅप लावावे. हा बोल फ्रिज मधे ठेऊन द्यावा. अधुन मधुन अंडी पाण्यात हलवावीत.

७. कमीतकमी १२ तास आणि जास्तीत जास्त ३ दिवस ही अंडी पाण्यात राहु द्यावीत.

८. अंड्याची कवचे सोलुन काढावीत. अंड्याची कवचे काढल्यावर अंड्याच्या पांढर्‍या भागावर सुंदर डिझाईन उमटलेले दिसेल. तसेच टरफलाच्या आतल्याभागावर सुद्धा सुंदर नक्षी दिसेल.

tea4.JPG

९. ही सोललेली अंडी सॅलड सोबत किंवा नुसतीच स्नॅक म्हणुन खावीत. या अंड्यांना चहाचा आणि मसाल्याचा एक सुंदर स्वाद / फ्लेवर यायला लागतो.

tea5.JPG

***************

वाढणी/प्रमाण: 
एक व्यक्ती २ अंडी हे साधारण प्रमाण
अधिक टिपा: 

- पाणी उकळताना त्यात वर दिलेल्या मसाल्यासोबत बडीशेप, थोडे धणे आणि लिंबाचे / संत्र्याचे वाळवलेले साल घालु शकता.
- ओरिजीनल रेसिपी मधे चायनीज फाईव स्पाईस (चक्री फुल, दालचिनी, शेजवान पेपर, बडीशेपेची पूड आणि लवंगा) घातले जाते. त्याचबरोबर ब्लॅक टी आणि सोया सॉस पण घालतात.
- मी साधारण आपल्या मसाल्याच्या चहाचे घटक वापरले आहेत. अंड्याला खुप सुंदर स्वाद लागला होता. खल्यानंतरसुद्धा बराचवेळ तो स्वाद जीभेवर रेंगाळत होता.
- जितका जास्त वेळ अंडी पाण्यात रहातिल तितके जास्त गडद डिझाईन अंड्यावर उमटेल आणि तितका जास्त स्वाद अंड्यात उतरेल.
- अंड्याच्या या नक्षीदार टरफलांचे काय करावे बरे???? स्मित

माहितीचा स्रोत: 
चायनीज न्यु इयरच्या वेळेस एका मासिकात आलेली पाकृ आणि माझे प्रयोग