गोड पदार्थ

युगलगीत: बासूंदी गोड गोड

युगलगीत: बासूंदी गोड गोड

तो:
तू माझी बासूंदी बासूंदी बासूंदी गोड गोड
तुला पिवू का पिवू का पिवू का थोडं थोडं ||धृ||

ती:
तू माझा गुलाबजाम गुलाबजाम गुलाबजाम गोल गोल
तुला खावू का खावू का खावू का पोटभर ||धृ||

तो:
दुधासारखे शुभ्र तुझे ग आहे गोरं गोरं अंग
बशीमधे घेवू तुला की कपामध्ये तू जरा सांग
गरमा गरमी सहवेना ग तू हो आता थंड थोडं
तू माझी बासूंदी बासूंदी बासूंदी गोड गोड ||१||

ती:
माझ्या दिलाच्या मिठाईचा तू आहे एक हलवाई
मीच तूझी कधी बर्फी झाले, कधी झाले रसमलाई
बासुंदीची धार चोखण्या तू आता तोंड उघड

चिक्कू मिल्कशेक

लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चिक्कू - ४ (विकत घेताना गोड आहेत असे पाहून घ्यावे)
साखर - ८ चमचे
दूध - २ कप (थंड असल्यास उत्तम)

क्रमवार पाककृती: 

१. चिक्कूची साल काढून छोटे छोटे तुकडे करून घ्यावे.
२. चिक्कूचे तुकडे अर्धा कप दूध आणि ३ चमचे साखर घालून मिक्सरमधून बारीक thick पेस्ट करून घ्यावी.
३. नंतर उरलेले दूध आणि साखर घालून पुन्हा मिक्सरमधून काढावे.
४. मस्त चिक्कू मिल्कशेक तय्यार!!!!!! पिऊन टाकावा....... स्मित आत्मा तृप्त!!!!!!!!!

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी
अधिक टिपा: 

दूध थंड घेतले तर मिल्कशेक तयार झाल्याबरोबर गट्टम करता येतो....... पुन्हा फ्रिजमध्ये ठेवून वाट बघावी लागत नाही.... स्मित

माहितीचा स्रोत: 
स्वप्रयोग

आल्याचं डेझर्ट (दही)

0

एक अत्यंत अभिनव प्रकार. एकदम सोपा, स्वयंपाकघरात सहज सापडणार्‍या वस्तूंपासून बनवलेला आणि तरीही सर्वस्वी अनोखा. पाहुणे मंडळींना त्यांच्यादेखत डेझर्ट बनवून देऊन खुश करा.

साहित्य : आलं, दूध, साखर

प्रमाण : असं काही खास नाही. अंदाजे.

कृती : आलं किसून एका बारीक गाळणीत घालून पिळून घ्या. हा आल्याचा रस बाजूला ठेवा. आता दुध उकळवा. ते गार करत ठेवा. साधारण उकळत्या दुधाच्या पाऊणपट तपमान झाले की त्यात आवडीप्रमाणे साखर घालून विरघळवा.

खव्याची पोळी-पाकृ नव्हे वृत्तांत

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 
    सारणासाठी
  • २५० ग्रॅम खवा
  • १ वाटी साखर (साधी, नेहमीची)
  • २ मोठे चमचे बेसन, थोड्याश्या तुपावर भाजून
  • १ मोठा चमचा रवा, खसखस थोडीशी, थोड्याश्या तुपावर भाजून
  • फारच लाडात असल्यास किंचीत खोबरे, वेलदोड्याची पूड, केशराच्या काड्या, दुधाचा हबका वगैरे जे वाट्टेल ते फिदीफिदी

पारीसाठी
मैदा (२ मोठे चमचे) +कणिक (अडिच वाट्या)+ मोहन - फार घट्ट नाही, फार सैल नाही (just perfect u see) स्टाईलने कणिक भिजवून ठेवावी.

क्रमवार पाककृती: 

ही पाकृ नसून हा एक वृत्तांत समजावा. आपल्या जिकीरीवर करावे. फिदीफिदी
पदार्थ करायच्या आधी एखाद महिना वाहत्या बाफवर नुसतेच करणार, करणार म्हणत रहावे.
त्याने काय होते? माहौल बनतो आणि धीर गोळा करायला मदत होते. शिवाय फुकट टीका होते, त्याने मनोबल वाढते. शिवाय आपण कमिट केले, आता(तरी) करावेच लागेल, अशी परिस्थिती निर्माण होते.
मग एखाद आठवडा आधी उपलब्ध सर्व पाकृ वाचायला घ्याव्यात. वाचल्यानेही मनोबल वाढते (अथवा खचते).

जुन्या मायबोलीवरील पाकृ
- खव्याची पोळी http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/59984.html?1079651858
- सांजोर्‍या/साटोर्‍या http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/93898.html

- पाकृ वाचून जमेल असे वाटल्यास नक्की जमते- (थंबरूल क्रमांक १)
- वाचता, वाचता, ज्या घटक पदार्थाचा अर्थ समजत नाही असे वाटते, अस्से दोनापेक्षा अधिक घटक पदार्थ निघाल्यास तो पदार्थ करण्याच्या इराद्यास डिच मारावे. (थंबरूल क्रमांक २)
- किंवा अगदी उत्तरआर्यंलडांतच मिळणारे exotic घटक पदार्थ असल्यासही डिच मारावे (आपण, आपला दुर्दम्य उत्साह आणि कामाचा उरक यांना शेवटपर्यंत विसरू नये. अंथरूण पाहून.. इ.इ.इ. ) (थंबरूल क्रमांक ३)
- सर्व पाकृ वाचल्या की ... मामी चांगल्या करते, तिलाच विचारू म्हणून फोन करावा. मग तिचीही पाकृ कानावर पडेल. की पुन्हा थंबरुल क्रमांक ३ रेफर करावा.
- मग गुमान सर्व पाकृ आणि आपले डोके यांचा वापर करुन आपल्याला जमेल तो घोळ घालावा. जमले तर पाकृ लिहावी आणि नाहीच जमले तर माकाचु वर अश्रु गाळावे. (थंबरूल क्रमांक ४)

१. खवा लालसार भाजून घ्यावा. (तूप सुटेपर्यंत). तो homogenous mass (mess) दिसेपर्यंत परतावे. (तो गिच्च गोळा जरा हार्टस्टॉपिंग दिसतो. फिदीफिदी)
२. मामी टाकते म्हणून त्यात साधी साखर टाकावी. मग ते एकदम लिक्वीड दिसते. मग गॅस बंद करावा.(मामीची टीप- रटराट उकळू नये म्हणे. साखर टाकली आणि वितळली की गॅस बंद कर.)
३. माकाचू, माकाचू म्हणून पॅनिक. मग अब 'ओखली में सिर दिया है तो मुसल से क्या डरना' असे आठवून, वाचलेल्या पाकृ आठवाव्या. मग भाजलेले बेसन, खसखस, खोबरे, आणि रवा त्यात ओतावे आणि हॅरीपॉटरच्या वाँड्सारखे वरवर न हलवता चांगले जीव खाऊन हलवावे. मग ते निदान सेमीसॉलिड दिसायला लागते. (तोवर घरातील एक सदस्य - हे लाटणार कसे? आमच्याकडे पुरणासारखे लाटताना मी पाहिले आहे' असा महत्त्वाची टिप्पण्णी करेल. त्याला अर्थातच इग्नोर करावे. त्यांच्या घराण्याबद्दल बोलण्याएवढा वेळ सध्या आपल्याकडे नाही एवढे लक्षात ठेवावे. मोह टाळावा. )
४. ते पुरेसे थंड होईपर्यंत टंगळमंगळ करावी. रामरक्षा (येत असल्यास) म्हणावी. रामरक्षा म्हणल्याने पदार्थ चांगला होतो की नाही ते त्या रामास ठाऊक. empirical evidence माझ्याकडे तरी नाही.
५. मिश्रण (आणि डोके) पुरेसे थंड झाले की पुरणासारखे पारीत ठेऊन, पोळ्या लाटाव्या.

वाढणी/प्रमाण: 
पाव किलो खव्याच्या ८ पोळ्या
अधिक टिपा: 

- जमल्या तर लग्गेच भाव खाऊ नये, कारण आपल्यासारख्यांना पुन्हा करायच्या झाल्यास नक्की जमतीलच असे नाही. त्यासाठी कमीतकमी १० वेळा जमल्या की मग भाव खावा. तोपर्यंत विमानं जमिनीवरच राहतील असे पहावे.
- फोटो टाकला रे टाकला की मायबोलीवरील सुगरण/सुगरणी साईज,वजन,प्लेट वगैरेंपासून टिपण्णी करत बिनाखव्याच्या वगैरे खव्याच्यापोळ्या कशा करतात तेही सांगतील, म्हणून टेंशन घेऊ नये. Chill !!
- प्रतिक्रियांमध्ये ' घरी आत्ता खवा नाहिये', काकडीच आहे, ती चालेल का ? अस प्रश्न आला की खचून जाऊ नये. मग 'खास' लोकांकडे उत्तरासाठी रेफर करावे.
- साखरेच्या दाण्याचा साईज आणि उसमळणी यावरही मायबोलीवरचे एक्ष्पर्ट बोलतील, बाफ काढतील, शंका विचारतील. ते क्वाईट नॉर्मल आहे. आपण तोंड म्हणून उघडायचे नाही.
- खव्याची पोळी होळीला कशी काय चालते अशीही एक अर्धधार्मिकपूर्णतांत्रिक शंका काढली जाईल. मंद स्मित करावे. (थंबरूल क्रमांक ५)
- घरी खपोळीच काय पंचपक्वान्न केली तरी आपली कार्टी 'वरणभात आणि साधी पोळी'च खाणार. तेच जर लोकांकडे केलेली असली तर मात्र मागून खाणार. (हा मात्र मर्फीज लॉ. अगदी आणि हमखास)

माहितीचा स्रोत: 
मायबोली सुगरणी + (माझी) मामी. मॉरल सर्पोट- पूनम आणि पुपु (मंजूतै आणि हिरकु)

Lemon Tiramisu (लेमन तिरामिसु)

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. ३ मोठी लिंबं (इथे मोठी पिवळ्या रंगाची लिंब (Lemon) मिळतात ती घ्यावीत भारतातल्यासारखी छोटी लिंबं (Lime) मिळतात ती घेवू नयेत).
२. स्वीट्न्ड कंडेन्स्ड मिल्कचा १ छोटा डबा (साधारण ४०० ग्रॅमचा मिळतो तो)
३. ताज्या हेव्ही व्हिपींग क्रीमचा १ कार्टन (१ पिंट, साधारण अर्धा लिटर) हे कुठल्याही सुपरमार्केटमध्ये मिळेल
४. १ पाकीट लेडीफिंगर बिस्कीटे (२०० ग्रॅमच्या पाकीटात २४-२५ लेडीफिंगर्स येतात तेव्हडी पुरतात)
५. ३ चहाचे चमचे साखर.
६. साधारण कपभर कोमट दूध.
७. सर्व्ह करतांना सजावटीसाठी डेसीकेटेड कोकोनट किंवा डार्क चॉकलेटचा एक तुकडा खिसून घालायला. हे ऐच्छिक आहे मी वापरत नाही.

क्रमवार पाककृती: 

तिरामिसुचे क्रीम -
१. पहिल्यांदा एका भांड्यात सगळ्या लिंबाच्या साली बारीक खिसणीने (आलं किसायची) बारीक किसायच्या. किसलेली साल खवलेल्या नारळासारखी दिसते. त्यात २ लिंबाचा रस पिळुन हे मिश्रण बाजूला ठेवून द्या.
२. दुसर्‍या एका मोठ्या भांड्यात सगळे हेवी व्हिपींग क्रीम, साखर घेवून लाकडी चमच्याने ढवळा.
३. क्रीमच्या मिश्रणात कंडेन्सड् मिल्क टाका आणि लाकडी चमच्याने ढवळा. आता हे मिश्रण बासुंदी इतके घट्ट झाले असेल.
४. आता या वरच्या मिश्रणात लिंबाचा रस + किसलेली साले यातले अर्धे मिश्रण टाका. हळू हळू लाकडी चमच्याने हलवा. मिश्रण लगेच घट्ट व्हायला लागते. साधारण श्रीखंडाइतके घट्ट होते. या स्टेजला मिश्रणाची चव घेवून बघायची. आंबट गोड चव यायला हवी. नुसतीच गोडमिट्ट चव लागत असेल तर बाकीचा लिंबाचा रस हळू हळू घालायचा. सगळे मिश्रण नीट ढवळायचे, आतापण जर चव गोडच लागत असेल तर तिसर्‍या लिंबाचा रस घालायला हरकत नाही.
जसे जसे यातले लिंबाच्या रसाचे प्रमाण वाढते तसे तसे याचा घट्टपणा वाढत जातो. हे तयार झाले तिरामिसुचे क्रीम, लेडीफिंगर बिस्कीटं दूधात बुडवून कॅसरोलमध्ये रचेपर्यंत हे क्रीम मस्त घट्ट झालेले असेल.
आता एखादे कॅसरोलसारखे भांडे किंवा 8 बाय 8 चा केक टिन घ्या.

पहिला थर/लेयर - हा थर तयार करण्यासाठी एका पसरट भांड्यात कोमट दूध घ्यायचे आणि त्यात एक एक बिस्कीट बुडवायचे, बिस्कीट पूर्णपणे बुडायला हवे. मग बिस्कीट तळहातावर दाबून त्यातले दूध काढून टाकायचे आणि चपटे बिस्कीटं पॅनच्या तळाशी अगदी एकाशेजारी एक ठेवायची. संपूर्ण भांडेभर बिस्कीटांचा थर लावायचा.

दुसरा थर/लेयर - तयार केलेल्या क्रीममधले अर्धे क्रीम चमच्याने या बिस्कीटांच्या थरावर सगळीकडे पसरवायचे.

तिसरा थर/लेयर - पहिल्या थराप्रमाणेच बिस्कीटं दूधात बुडवून तळहातावर दाबून त्यातले दूध काढून क्रीमच्या थरावर नीट माडून तिसरा थर तयार करायचा.

चौथा शेवटचा थर/लेयर - उरलेले सगळे क्रीम बिस्कीटांवर पसरवायचे. झाऽऽले तिरामिसु तय्यार. आता तयार झालेले तिरामिसु ४-५ तास फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवा.
नंतर सर्व्ह करतांना तिरामिसुवर डेसिकेटेड कोकोनट भुरभुरुन किंवा डार्क चॉकलेट किसून सर्व्ह करता येईल. हे न करता पण तिरामिसु सऽऽही लागते. स्मित

Bon appetit!

वाढणी/प्रमाण: 
वरच्या प्रमाणात १०-१२ सर्व्हिंगस होतील पण २-३ जण सहज हे तिरामिसु संपवू शकतात.
अधिक टिपा: 

१. ज्यांच्याकडे इथल्यासारखे मोठे लिंबू (लेमन) मिळत नाही फक्त लहान लिंबू (लाइम) मिळते त्यांनी लिंबाचा रस + संत्र्याची साल टाकायला हरकत नाही. फक्त संत्र्याची साल आणि संत्र्याचाच रस असे चालणार नाही. मिश्रण घट्ट होण्यासाठी लिंबाचा रस आवश्यक आहे.

२. पटकन थंड करायचे असेल तर हिवाळ्यात सरळ १५-२० मि. घराबाहेर बर्फात ठेवायचे आणि उन्हाळ्यात फ्रीजरमध्ये ठेवायचे. समजा फ्रीजरमध्ये जऽरा जास्त वेळ राहीले तर लेमन तिरामिसु आयस्क्रीम म्हणून वाढावे स्मित. अर्थात केल्यावर लगेचच खाल्ले तर कधीतरी लिंबाच्या सालीचा कडवटपणा जाणवतो. तेव्हा पार्टीच्या आदल्या रात्री करून फ्रीजमध्ये ठेवले तर मुरलेले तिरामिसु एकदम मस्त लागते.

३. यात भऽरऽपूऽर कॅलरीज असतात पण हे इतके भारी लागते की खातांना असले काही लक्षात ठेवणे अशक्य आहे तेव्हा दुसर्‍या दिवशी अवश्य जीमला जाणेचे करावे फिदीफिदी

४. ही कृती मी जर्मन भाषेत शिकले तेव्हा कोणी जर्मनीत असेल आणि त्यांना हे करायचे असेल तर त्यांच्यासाठी साहित्य देतेय. penimarkt मध्ये सगळे साहित्य मिळेल.
व्हिपींग क्रीमसाठी - 2 Schlagsahne (दह्याच्या डब्यासारख्या दिसणार्‍या कंटेनरमध्ये हे मिळते, २०० ग्रॅचे २ डबे लागतील.)
स्वीट्न्ड कंडेन्स्ड मिल्क - Gezuckerte Kondensmilk warmebehandelt (Milch Madchen) हे टुथपेस्ट्सारख्या २०० ग्रॅ. ट्युबमध्ये मिळायचे, २ ट्युब्स लागतात.
साध्या सारखेसोबत/ऐवजी तिथे मिळते ती vanila zukcker वापरावी.

५. ओरीजनल तिरामिसुची कृती इथे सापडेल.

६. विद्यार्थीदशेत असतांना बर्‍याचदा ऐन वेळेला शुक्रवारी रात्री पार्टी ठरत असे तेव्हा घरातल्या असलेल्याच वस्तू वापरून हे तिरामिसु झटपट करता येई म्हणून आम्ही याला इंस्टंट तिरामिसु म्हणायचो.
लेडीफिंगर्स्/कंडेन्स्ड मिल्क/साखर/दूध/लिंबं नेहमी घरात सापडतेच फक्त घरी येतांना हेव्ही व्हिपींग क्रीम आणले की झाले त्यामुळे दहातल्या किमान आठ पार्ट्यांसाठी हे केले जायचे.

७. याला अस्सल इटालियन लोक तिरामिसु म्हणतील का हे माहीत नाही. क्रीम आणि बिस्कीटांचे एकावर एक थर असतात म्हणून आम्ही याला तिरामिसु म्हणायचो.

८. इटलीला गेले होते तेव्हा बघीतले की सगळ्या दुकानात आयस्क्रीमच्या काचेचा कपात, तर कधी छोट्याश्या साध्या काचेच्या वाटीत तिरामिसु विकायला ठेवलेले असते. त्यामुळे सर्व करायला खूप सोपे पडते. छोट्या पार्टीसाठी बर्‍याचदा मी ७-८ डेझर्ट कपातच तिरामिसु करते म्हणजे मग कापा आणि ताटलीत सर्व्ह करा वगैरे भानगडी कराव्या लागत नाहीत. प्रत्येकाला एक कप दिला की झाले.

माहितीचा स्रोत: 
रुमेनियन रूममेट

शाही ब्रेड पुडिंग

लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

शिळा हाला(challah) किंवा ब्रिओश ( Brioche) ब्रेड
६ अंडी
अर्धा कप साखर
अर्धा कप मास्कारपोने चीझ,
दूध,
बदामाचे काप
बदामाचा इसेंस ( ऐच्छिक )

क्रमवार पाककृती: 

एका स्टिलच्या पातेल्यात अर्धा कप साखर करपवून घ्यावी व हे करपलेले मिश्रण ( कॅरमेल ) एका ९ इंच व्यासाच्या ओव्हनप्रूफ भांड्याच्या तळाला व कडांना एक इंच पर्यंत पसरवून घ्यावे. हे गोल भांडे थोडावेळ ( ३० मिनिटे पुरतील ) फ्रीझमधे ठेवावे.

एक दिवसाचा शिळा ब्रिओश किंवा हाला ब्रेड (किंवा अंडं घातलेला कुठलाही गोडसर ब्रेड ) च्या अर्धा इंच जाडीच्या स्लाइसेस कराव्यात.

एका भांड्यात ६ अंडी , अर्धा कप मस्कारपोने चीझ( किंवा साधं सॉफ्टन केलेलं क्रीम चीझ ) २ -३ टे स्पून साखर एकत्र फेटावं. २टिस्पून व्हनिला इसेंस किंवा आल्मंड इसेंस घालावा. त्यात हळू हळू अर्धा कप दूध घालून फेटावं. ब्रेडच्या स्लाइसेस एकेक करून या मिश्रणात २-३ बुडवून मग तळाशी कॅरमेल लावलेल्या भांडयात रचाव्या . उभ्या, रेडियल टायर सारख्या दिसतील अशा रचल्या तर छान दिसते हे पुडिंग. मग उरलेलं दुध, अंड्याचं मिश्रण या स्लाइसेसवर ओतून , प्लास्टिक रॅप लावून हे भांडं फ्रीझ मधे १०-१२ तास ठेवावं.
नंतर ३२५ डिग्री फॅ वर १५-२० मिनिटे बेक करावं
मग यावर थोडे बदामाचे पातळ काप भुरभुर्वून परत १५ ते वीस मिनिटे बेक करावं.

ओव्हन मधून काढल्यावर कडांना सुरी फिरवून घ्यावी अन मग एका प्लेट वर हे भांडं उपडं करावं. ( हे करताना सांभाळून, ओव्हन मिटस घालावे व हे काम सिंकपाशी करावे ).
सर्व्ह करताना पाय च्या करतो तशा स्लाइसेस कापून सर्व्ह करावे

प्रत्येक स्लाइस वर थोडे थोडे फ्रेश व्हिप्पड क्रीम घालून खावे .

वाढणी/प्रमाण: 
६-८ लोकांकरता
अधिक टिपा: 

ह्याची सर्व तयारी आधी करुन ठेउन पाहुणे आल्यावर शेवटचं बेकिंग केलं तर आयत्यावेळि फारशी धडपड न करता गरम गरम स्वीट डिश सर्व्ह करता येते.
ब्रंचला कोणी येणार असतील तर आदल्या रात्री सगळी तयारी करायची.

माहितीचा स्रोत: 
इकडून तिकडून वाचून अन स्वतःचे प्रयोग

कॉफी कप केक्स विथ मोका आयसिंग

लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कप केक्स (मफिन्स):

१/२ कप कनोला/सनफ्लावर तेल
३/४ कप बारीक साखर
२ अंडी
१ कप दुध
२ + १/२ कप सेल्फ रेसिंग फ्लार
१ टी स्पून इंस्टंट कॉफी ग्रॅन्युल्स (नेसकॅफे/ब्रु वगैरे)

मोका क्रिम:

१/२ कप क्रिम चीज (सॉफ्ट)
२ टे. स्पून सॉफ्ट बटर
२ टी स्पून दुध
१ टी स्पून कोको ( किंवा १+१/२ टी स्पून ड्रिंकिंग चॉकलेट)
१/२ टी स्पून इंस्टंट कॉफी ग्रॅन्युल्स (नेसकॅफे/ब्रु वगैरे)
१ टे स्पून पिठी साखर

सजावटीसाठी: जेम्स, m & m किंवा डार्क चॉक बट्टन्स

क्रमवार पाककृती: 

पूर्वतयारी:

१. ओवन १८० से. तापमानाला तापत ठेववा.
२. मफिन पॅन्स मधे पेपर कप्स घालुन तयार ठेवावे. पेपर कप्स नसतिल तर मफिन पॅन नीट ग्रीस करुन मैदा भुरभुरवुन तयार ठेवावेत.

कप केक्स:

१. सर्वप्रथम सेल्फ रेसिंग फ्लार, साखर एकत्र बारीक चाळणीतुन एका मिक्सिंग बोल मधे चाळावे.
२. सर्व ओले जिन्नस = २ अंडी + १/२ कप तेल + १ कप दूध (यातले २ चमचे दूध काढुन ठेवावे) एकत्र करुन लाकडी चमच्याने मिक्स करावे.
३. काढुन ठेवलेल्या २ चमचे दुधात कॉफी ग्रून्युल्स नीट मिक्स करावेत आणि हे मिश्रण ओल्या मिश्रणत हलकेच मिक्स करावे.
४. आता कोरड्या मिश्रणात मधे खड्डा करुन हे ओले मिश्रण हळुहळु ओतावे. लाकडी चमच्याने नीट मिक्स करावे. मिश्रण एकजीव होईपर्यंत चांगले घोटावे.
५. हे मिश्रण तयार मफिन पॅन्स मधे घालावे व बेक करायला ठेवावे.
६. कप केक्स तयार झाले की बाहेर काढुन थंड होऊ द्यावे.

मोका क्रिम:

१. क्रिम चीज (सॉफ्ट असावे. फ्रिज मधुन एक तासभर तरी बाहेर काढुन ठेवावे) + सॉफ्ट बटर + साखर हँड मिक्सर ने एकत्र फेटावे.
२. २ टी स्पून दुधात कोको पावडर आणि कॉफी ग्रून्युल्स नीट मिक्स करुन घ्यावेत. हे मिश्रण वरच्या क्रिम मधे मिक्स करावे व परत एकदा हँड मिक्सर ने एकत्र फेटावे.
३. मिश्रण पायपिंग बॅग मधे भरावे.

डेकोरेशन:

१. पायपिंग बॅग चे नोझल कप केक्स च्या मधे खुपसुन थोडे क्रिम आत घालावे. आणि मग केकवर पसरावे.
२. आयसिंग सेट व्हायच्या आधी वरती जेम्स/m & m/ चॉक बटन्स लावावित.
३. सर्व करायच्या आधी आयसिंग पूर्ण सेट होऊ द्यावे.

हे तय्यार कप केक्स स्मित

IMG_1462.JPG

वाढणी/प्रमाण: 
या मिश्रणात साधारण ८ मोठे मफिन्स होतात.
अधिक टिपा: 

१. सेल्फ रेसिंग फ्लार ऐवजी = अडिच कप प्लेन फ्लार + ३ टी स्पून बेकिंग पावडर चालेल.
२. कप केक्स्/मफिन्स हे शक्यतो थोडे डेन्स असतात त्यामुळे मिश्रण एलेक्ट्रिक मिक्सर ने मिक्स करु नये, हातानेच नीट फेटावे. मिक्सर वापरलाच तर अगदी लोएस्ट सेटिंगवर जिन्नस मिक्स होण्या इतपतच वापरावा.
३. क्रिम्/आयसिंग करायच्या आधी केक पुर्णपणे थंड होऊ द्यावेत. अन्यथा आयसिंग मेल्ट होईल.
४. वर दिलेले कप केक्स चे मिश्रण हे बेसिक मिश्रण आहे. त्यात आपल्या आवडी प्रमाणे फ्लेवर्स घालु शकता. उदा - स्ट्रॉबेरी चे तुकडे आणि इसेन्स, बेदाणे आणि मध वगैरे वगैरे.
५. आयसिंग्/क्रिम मधे सुद्धा कोको आणि कॉफी ऐवजी कुठलाही दुसरा इसेन्स वापरु शकता.

माहितीचा स्रोत: 
माझे आणि मैत्रिणीचे प्रयोग.

स्पॅनिश फ्लान

लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

१ कप साखर
३ अंडी
१ (१४ oz) कन्डेन्सड मिल्कचा कॅन - sweetened
१ (१२ oz) इव्हॅपोरेटेड मिल्कचा कॅन
१ टीस्पून वॅनिला इसेन्स

क्रमवार पाककृती: 

१. ओवन ३५० डी. फॅ. ला गरम करुन घेणे.
२. एका नॉनस्टीक भांड्यात मध्यम आचेवर साखर वितळवायला ठेवणे. पाणी अजिबात लागू द्यायचे नाही. लाकडी चमच्याने ढवळत रहायचे. छान सोनेरी रंगाचे कॅरेमल तयार झाल्यावर लगेचच ९" आकाराच्या काचेच्या गोल बेकींग डीश मधे ओतायचे. डीशच्या तळाला सगळीकडे व्यवस्थीत कॅरेमल पसरले पाहीजे.
३. एका मोठ्या बाउलमधे अंडी फेटणे.
४. त्यात कन्डेन्सड मिल्क, इव्हॅपोरेटेड मिल्क आणि वॅनिला इसेन्स टाकणे. सगळे मिश्रण परत एकदा फेटुन नीट एकजीव करणे.
५. आता हे मिश्रण कॅरेमल कोट केलेल्या बेकींग डीश मधे हळूवारपणे ओतणे.
६. अ‍ॅल्युमिनिअम फॉइलने कव्हर करून ओवन मधे ६० मिनिटे बेक करणे.
७. बेक झालेला फ्लान पूर्णपणे थंड करुन घ्यावा. मग सुरीने कडेकडे सोडवून घेऊन सर्व्हींग डीश मधे उपडा करुन सर्व्ह करावा.

वाढणी/प्रमाण: 
८ जणांसाठी
अधिक टिपा: 

थोडिशी खरवसासारखी चव येते याला.

माहितीचा स्रोत: 
माझे आंतरजालीय प्रयोग :)

वाळवलेल्या बटाटे किसाचे लाडू (उपवासा साठी)

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी बटाटा किस, १/२ वाटी किसलेले खोबरे, १/२ वाटी दाण्याचा कुट, २ टे.स्पुन खसखस, थोडी जायफळपूड (चविला), २ टे. स्पुन साजुक तुप, १ वाटी बारिक केलेला गुळ.

क्रमवार पाककृती: 

बटाटा किस तुपात तळुन घ्या, खसखस भाजुन घ्या.
किसलेले खोबरे, दाण्याचा कुट, भाजलेली खसखस, तळलेला किस सगळे एकत्र मिक्सर मधे बारीक करुन घ्या. त्यात जायफळ पुड घाला.
गुळामधे २ चमचे पाणी घालुन मंद गॅसवर पाक करा. वरील मिश्रण पाकात घाला व चांगले मिक्स करा.
हाताला तुप लावुन लाडू वळा.

मस्त खमंग लागतात, महाशिवरात्री निमीत्त आजच करा स्मित